बदल हाच जगाचा नियम आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तर बदलाचा वेग अजूनच प्रचंड वाढतो आहे. हा बदल सतत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर येतो आहे. उपयोगी आणि निरुपयोगी नवनवीन माहिती दर मिनिटाला WhatsApp किंवा फेसबुकमार्गे फोनवर दिसते आहे. फोनमधून डोकं वर काढावं तर चोवीस तास भडक बातम्या ओकणारी खाजगी टीव्ही चॅनेल्स आहेत. वृत्तपत्रांची पण तीच परिस्थिती. या मधली मराठी भाषा ऐकल्यावर किंवा वाचल्यावर लक्षात येतं की गेल्या वीस वर्षात मराठी खूपच बदलली आहे. मराठी भाषेतल्या योग्य आणि चपखल शब्दांचा वापर कमी होताना दिसतो आहे. असं का होतंय ते कळत नाही. कदाचित सगळ्या लोकांना समजावं म्हणून भाषा बिघडवायची असं काही टीव्हीवाल्यांनी परस्पर ठरवलं असावं का? किंवा त्यांनाच अजून मराठी भाषेची ताकद समजलेली नाही?
मराठीत अनेक शब्द असे आहेत की त्यांना सांस्कृतिक किंवा गर्भित अर्थ आहे. ‘नारळ’ आणि ‘श्रीफळ’ या शब्दांचा अर्थ जरी एकच असला तरी दोन्हीची छटा वेगळी आहे. ‘पाणी’ आणि ‘तीर्थ’. ‘तांदूळ’ आणि ‘अक्षता’. अजून कितीतरी उदाहरणं आहेत. शब्दाचे अर्थ एकच, पण भाव वेगळे, छटा वेगळी. भाषेची शुद्धता ही प्रत्येकाच्या दृष्टीनी वेगळी असू शकते. पुण्याची मराठी भाषा शुद्ध मानायची की कोल्हापूरची? की नागपूरची? की अमुक एक लोकांचा समूह बोलतो ती मराठी शुद्ध मानायची? त्यामुळे भाषेची शुद्धता जरी सापेक्ष असली तरी मराठी भाषेतले योग्य ते शब्द योग्यवेळी वापरायलाच हवेत. तसं केलं नाही तर नुकसान आपलं आणि मराठी भाषेचं आहे.
काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. कसल्या तरी कारणानी लोक जमले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले. खाता खाता मंडळी काहीतरी गप्पाटप्पा करत होती. एकंदरीत थोडासा कंटाळवाणा प्रसंग होता. राजकारण, शेअर मार्केट, हिंदी सिनेमा असे ठराविक विषय झाले. पंडित जसराज यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम तेव्हा नुकताच झाला होता. त्या कार्यक्रमाचा गप्पांमध्ये विषय निघाला. कोणीतरी एक जण त्याच्या मित्राला म्हणाला,
“जसराज काय गाणी बोलले रे त्या कार्यक्रमात?”
स्टीलच्या ताटाखाली चुकून बारीक खडा आला तर ओरखड्याच्या आवाजानी जसा अंगावर सर्रकन काटा येतो तसं माझं झालं. कर्णकर्कश्य! मी आवंढा गिळला आणि दीर्घ श्वास घेतला.
“काय गाणी बोलले” हे काय वाक्य झालं?
गाणी ‘बोलायची’ नसतात. गाणी ‘गायची’ असतात. किंवा गाणी ‘म्हणायची’ असतात. ‘बोललेला’, ‘गेलेला’, ‘केलेला’ ही कुठल्या मराठी भाषेची निशाणी? त्याकडे दुर्लक्ष केलं, पण जसराज ‘गाणी’ म्हणतात हे ऐकणं म्हणजे अतिच झालं. पंडित जसराज ‘चीज’ म्हणतात, ‘ख्याल’ म्हणतात, ‘तराणा’ म्हणतात, ‘भजन’ म्हणतात, अगदी ‘ठुमरी’ देखील म्हणतात. पण ते ‘गाणी’ नाही म्हणत. शब्दांची छटा नीट कळायला हवी.
नुसतं “हिरव्या रंगाची पानं होती” असं म्हणून कसं चालेल? पानाच्या रंगांमध्ये कितीतरी वेगवेगळ्या छटा आहेतच की. कोवळ्या पानांचा ताजा हिरवा रंग वेगळा आणि जून झालेल्या पानांचा काळसर गडद हिरवा रंग वेगळा. श्रावणातल्या पावसानी सह्याद्रीवर आलेल्या गवताच्या गालिच्याचा हिरवा रंग. केळीच्या पानाचा हिरवा रंग. मेहेंदी भिजवल्यावर होणारा हिरवा रंग. असे कितीतरी प्रकार. सगळी पानंच, पण हिरवा रंग मात्र वेगवेगळा. तश्याच गाण्यातही खूप वेगवेगळ्या छटा आहेत. आणि मराठी भाषा त्या सगळ्या छटा दाखवायला समर्थ आहे.
आता हेच बघा ना. ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ हे चार जवळचे शब्द. प्रथम दर्शनी वाटेल, या शब्दांमध्ये काय एवढा फरक आहे? सगळ्या शब्दांचा अर्थ ‘गाणं’ हाच आहे. हे बरोबर असलं तरी हे चारही शब्द वेगळ्या छटा आणि वेगळे भाव दाखवतात. कसे?
गाणं
‘गाणं’ हा शब्द ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज या चार शब्दांचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणा हवं तर. गाणं म्हणजे थोडक्या वेळात संपणारं. या शब्दाच्या व्याख्येला फार मोठा वाव आहे. गाण्याला विषय, भाव, रस, ताल, सूर, आणि काव्य या कशाचंच कडक असं बंधन नाही.
“अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” असं नितांतसुंदर भावपूर्ण हे गाणं, आणि “चार बोतल व्होडका” असं पूर्णपणे भावहीन देखील गाणंच.
“मेघा छायें आधी रात, बैरन बन गयी निंदिया” असं काव्यमय गाणं, आणि “झ झ झ झोपडी में, च च च चारपाई” याला काव्य म्हणावं का असंही गाणंच.
“हर घडी बदल रही है रुप जिंदगी, छाव है कभी, कभी है धूप जिंदगी” हे छंदबद्ध गाणं आणि, “मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है” सारखं मुक्तछंद ही गाणंच.
“रघुवर तुमको मेरी लाज” असं भक्तीरस पूर्ण गाणं, आणि “मेरा रंग दे बसंती चोला” असं वीररस पूर्णही गाणंच.
“चुरा लिया हैं तुमने जो दिलको” असं तालानी सुरु होणारं गाणं, आणि ताल कुठे असं शोधावं लागणारं “आती क्या खंडाला?” हे पण गाणंच.
लतादीदी अतिशय सुरात म्हणतात ते गाणं, आणि हिमेश रेशमिया म्हणतो ते ही (दुर्दैवानी) गाणंच!
“आने वाला पल, जाने वाला है” असं जीवनावरचं तत्वज्ञान हा विषय असलेलं गाणं, तसंच “मधुबन में राधिका नाचे रे” असं गोकुळाचं वर्णन हा वेगळा विषय असलेलं गाणं.
इतका प्रचंड ‘गाणं’ या शब्दाचा विस्तार. सगळी सरमिसळ. परीक्षेत देतात तसे गुण द्यायचे झाले तर काही गाण्यांना शंभरपैकी शंभर गुण सहज देता यावेत, आणि काही गाण्यांना शून्य गुण देखील जास्त वाटावेत. इतकी गाण्यांमध्ये तफावत.
म्हणजे ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या चार शब्दांना खाण्याची उपमा दिली तर?
‘गाणं’ हे ‘स्नॅक्स’ या खाद्यप्रकारासारखं. आटोपशीर आणि पटकन खाता येणारं. प्रत्येक स्नॅकची चव, स्वाद, सुगंध, पोत, मूड, प्रेझेंटेशन, खायची वेळ हे सगळं वेगळं. प्रचंड व्हरायटी! स्नॅक्स म्हणून कितीतरी गोष्टी आपण खातो. हातगाडीवर कागदाच्या पुडीत बांधून मिळणारे खारे दाणे, फुटाणे. मीठ लावलेली सुकी बोरं. उग्र वासाचे पण तरीही चविष्ट फणसाचे गरे. गरमागरम पोहे, उपमा. आधल्या दिवशी उरलं-सुरलं वापरून केलेली फोडणीची पोळी नाहीतर फोडणीचा भात. उडप्याच्या हॉटेलातली इडली, डोसा, उत्तप्पा. मिसळ, वेफर्स, सँडविच, असे कितीतरी स्नॅक्सचे प्रकार. बाकरवडी, फरसाण, पाणीपुरी, दाबेली. गोडामध्ये पेढे, बर्फी, गोळ्या, बिस्किटे, नानकटाई, चॉकलेट, लस्सी. अक्षरशः शेकडो प्रकारचे स्नॅक्स आहेत आणि आपण ते आवडीनी खातो. तसेच गाण्याचे शेकडो प्रकार. प्रत्येकानी आपल्या मूड प्रमाणे आणि आवडीप्रमाणे स्नॅक्स खायचे.
सात्विक आहार शरीर शुद्ध करणारा आणि मनाला शांती देणारा म्हणतात. कोणाला सात्विक गुणाची ताजी साबुदाणा खिचडी, ताजी फळे, दूध, मध, काजू, बदाम, खारीक असे पदार्थ आवडतील. त्याचप्रमाणे कोणाला सात्विक गुणांची आरती, भजन, प्रार्थना, धावा ऐकायला आवडेल.
राजस पदार्थ हे शरीर आणि मनाला प्रेरित करणारे मानले जातात. चहा, कॉफी, फोडणी-कांदा-लसूण घातलेले आणि तळलेले स्नॅक्स. बरीचशी हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी या प्रकारात मोडणारी. उत्तेजित करणारी आणि तजेला देणारी.
तामसी पदार्थ शरीर आणि मनाला जडत्व देणारे. मन भरकटायला लावणारे. खूप तिखट, तेलकट, अति गोड, मांसाहारी स्नॅक्स सारखे. त्याचा अतिरेक झाला की सेवन करणाऱ्याचा स्वभाव चिडचिडा, रागीट, बेचैन होतो म्हणतात. तशीच रॅप, रॉक, फ्युजन ही ‘गाणी’.
थोडक्यात म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितक्याच प्रकारची गाणी. कोणाला आवडणारी आणि न आवडणारी. समाधान देणारी आणि न देणारी. पण प्रत्येकासाठी ‘गाणी’ आहेतच, अगदी स्नॅक्स सारखी.
गीत
गीत, पद, चीज हे सगळे गायनाचे प्रकार, त्यातलं ‘गीत’ हे ‘गाण्याच्या’ सगळ्यात जवळचं भावंडं. गीत हे गाण्यासारखंच चार-पाच मिनिटात संपणारं. गीतालाही गाण्यासारखे बरेच विषय चालतात, आणि गाण्यासारखे गीताचे बरेच प्रकार आहेत - भावगीत, प्रेमगीत, विरहगीत, अंगाई गीत, समरगीत, राष्ट्रसन्मान गीत. सुर आणि ताल हे तर सगळ्या संगीताचे प्राण, पण गीत या प्रकाराला काव्य आणि त्या काव्यामधल्या भावना फार महत्वाच्या.
काव्य लिहिणारी, त्या काव्याला संगीत देणारी आणि ते संगीतबद्ध केलेलं गीत गाणारी अश्या तीनही व्यक्तींची जबरदस्त तयारी हवी. त्या गोष्टींचा अभ्यास झालेला असावा. गाण्यासारखं प्रेझेंटेशन भपकेदार नसलं तरी गीताचा दर्जा उत्तम हवा. कस चांगला हवा.
‘गाणं’ हे स्नॅक्स सारखं आहे असं म्हणलं तर ‘गीत’ हे घरी बनवलेल्या जेवणासारखं म्हणा हवं तर. वरण, भात, भाजी, पोळी आणि एखाद्या चटणीसारखं. मोजके आणि सुटसुटीत पदार्थ. पण ते रुचकर, सकस, गरमागरम आणि मनापासून तयार केलेले.
म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला कधी-कधी रोजच्या जेवणाचा कंटाळा येत असेलही, पण तिच्या हातून नीरस आणि बेचव अन्न कधी बनत नाही. कंटाळा आला असला तरी तिचा रोजच्या सवयीनी हात बसलेला असतो. त्यामुळे ती पटकन घरी असलेली भाजी चिरून तिला फोडणी घालून साधीच पण रुचकर ओली किंवा सुकी भाजी तयार करते. भाजी तयार होतानाच कुकरमध्ये डाळ-तांदूळ शिजवून झाले की डाळ सारखी करून त्यात हिंग, हळद, मीठ घालून वरण तयार करते. ते झालं की झरझर लाटून गरमागरम पोळ्या ताटात वाढते देखील. त्याबरोबर काकडी, गाजर अशी काहीतरी कोशिंबीर, नाहीतर बाटलीतलं लोणचं ताटात वाढते. म्हणजे सुरुवात केल्यापासून एका तासाच्या आत तिचा गरम आणि रुचकर स्वैपाक तयार होऊन घरातली मंडळी जेवायला देखील बसलेली असतात. असाच आटोपशीरपणा आणि सुटसुटीतपणा गीतामध्ये.
चांगली अर्थ असलेली आशयसंपन्न कविता घ्यायची. तिला चांगल्या तालासुरात बांधायची. मोजकेच साथीदार वादक बरोबर घ्यायचे. रोजच्या जेवणात जसा वरण-भात हवा, तसं पेटी-तबला असायलाच हवे. भाजी-पोळी या ताटातल्या जोडगोळीसारखी, उत्तम चाल आणि गायिकेचा सुरेल आवाज ही जोडगोळी तितकीच महत्वाची. या चार मुख्य पदार्थांचा भक्कम पाया केल्यावर कवितेतला जो भाव असेल त्याप्रमाणे साथीला एखाद-दुसरं वाद्य घ्यायचं. कधी टाळ, तर कधी घुंगरू. कधी संतूर, तर कधी सतार. अगदी रोजच्या जेवणात मूडप्रमाणे चवीला आपण लोणचं, चटणी, कांदा, पापड, तूप-साखर नाहीतर गुळंबा घेतो तसं.
गीतामध्ये सिनेमाच्या गाण्यासारखा ऑर्केस्ट्रा नाही. वाद्यांचा भलामोठा ताफा नाही. काव्य आणि त्या काव्यातली भावना थोड्या वाद्यांमध्येही श्रोत्यांपर्यंत पोचवून त्यांना तृप्त करायची ज्याची ताकद असते, ते म्हणजे ‘गीत’. “स्वये श्री रामप्रभू ऐकती” पासून “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” ते अगदी “गा बाळांनो श्रीरामायण” अशी रामायण कथा सांगणारी छप्पन गीते, म्हणजे गीतांचा अत्युच्च बिंदू.
‘गीत’ या प्रकारची वेगवेगळ्या भाषांमध्ये कितीतरी उत्तम उदाहरणं आहेत. “धीरे से आ जा रे अखियन में, निंदिया आ जा रे आ जा” असं अंगाई गीत. “चांदोबा चांदोबा भागलास का?” असं बालगीत. “घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा” असं शालीन भावगीत. “वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम” असं प्रखर देशभक्तिगीत. पंडित किशोर कुमारांच्या आवाजातलं “कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहेना” हे जननिंदेला तोंड कसं द्यायचं सांगणारं गीत. किंवा मनावर आवर घालणारं उस्ताद रफींनी गायलेलं गीत “मन रे तू काहे ना धीर धरे”. आनंद बक्षींचे गीत “जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम”.
अशी एकापेक्षा एक उत्तम अर्थपूर्ण आणि विचारपूर्ण गीतं. मनाला शांति देणारी. स्वतःच्या आत पाहायला लावणारी.
पद
‘पद’ हा नाटकात आढळणारा गायनप्रकार. त्याची मजा फारच वेगळी. ‘पद’ हे लग्नमुंजीतल्या जेवणावळीच्या स्वैपाकासारखं. ते करायला कसलेल्या तयारीचा अनुभवी बल्लवाचार्य हवा. पदाला वेळेचं बंधन नाही. एकेक पद गायक त्याच्या कल्पकतेप्रमाणे कितीतरी वेळ रंगवू शकतो. पदात काव्याचं महत्व गीतापेक्षा थोडं कमी होतं, कारण पदात महत्व असतं ते म्हणजे गायकाच्या तयारीला, त्याच्या आवाजाला, त्याच्या सुरेलपणाला, आणि मुख्य म्हणजे गायक ते पद कसं फुलवतो या कलेला.
पद फुलवायचं म्हणजे पदाची एक ओळ घ्यायची आणि वेगवेगळ्या गायन अलंकारांनी ती नटवायची. तीच ओळ दहा-पंधरा वेळा गाताना प्रत्येकवेळी त्यात काहीतरी नवीन हवं. खटका हवा, मुरकी हवी, गमक हवं, तान हवी, लयकारी हवी, तालाशी खेळ हवा. प्रत्येकवेळी ती ओळ नवीन वाटली पाहिजे. त्याक्षणी सुचेल असं काहीतरी त्या ओळीत हवं, पण ते मात्र तालात, सुरात आणि प्रेक्षकांना रंजक वाटेल असं हवं. तासनतास एका जागी उभं राहून नाटकातली वेशभूषा सांभाळत पदाचे सूर सांभाळायचे. बरीचशी पदं रागांवर आधारित असल्यामुळे पद गाताना रागाचं शास्त्र सांभाळायचं. असं सूर, ताल आणि भरघोस अलंकारांनी नटलेलं भव्यदिव्य गीत म्हणजे ‘पद’!
रुखवताच्या जेवणासारखं पदात खूप काही हवं. वेगवेगळ्या पदार्थानी ताट भरलेलं असावं तसं पदात विविधता आणि रेलचेल हवी. ताटाभोवती महिरप किंवा रांगोळी काढतात तसं पदाचं प्रेझेंटेशन महत्वाचं. पदाभोवती वाद्ये हवी आणि वाद्यांची चोख साथ हवी. नटेश्वराच्या मूर्तीसमोर उदबत्त्यांचा सुवास दरवळला पाहिजे. गरमागरम सुग्रास मसालेभात, अळूची भाजी, मठ्ठा आणि चटण्या खाताना सगळ्या पंक्तीची भूक वाढली पाहिजे. त्याबरोबर जिलबी किंवा श्रीखंडाच्या घासाप्रमाणे ताना, सुरांची फेक आणि काव्यप्रसंगाचा भाव असं जमलं की श्रोत्यांची अतृप्ती अजून वाढायला लागली पाहिजे. मग अश्यावेळी यजमान आग्रह करून खाणाऱ्याच्या ताटात जसं दोन जिलब्या वाढतो आणि खाणारादेखील त्या केशरयुक्त जिलब्या अधीरतेनी उचलून त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतो, तसं तयारीच्या गायकाचं पद सुरु झालं की श्रोत्याला किती ऐकू आणि साठवू असं होतं.
पदांना अतिशय लोकप्रियता मिळाली ती बालगंधर्वांमुळे. तेच पदांचे खरे सम्राट. त्यांनी गायलेली “कशी या त्यजू पदाला”, “खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी”, “जोहार मायबाप जोहार”, “मला मदन भासे हा”, “नाथ हा माझा मोही”, “वद जाऊ कुणाला शरण” अशी अनेक पदं आज शंभर वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. कुमारजींनी गायलेलं “उठी उठी गोपाला”, दीनानाथांचं “कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई”, वसंतरावांचं “कर हा करी धरिला शुभांगी”, अभिषेकीबुवांचं “घेई छंद मकरंद”, “नच सुंदरी करू कोपा”, “सर्वात्मका सर्वेश्वरा”. उत्तमोत्तम पदांची शेकडो उदाहरणं आहेत. एकच पद अनेक गायकांनी गायल्याची खूप उदाहरणं आहेत. प्रत्येक गायकाचं त्याचं स्वतःचं त्यात काहीतरी ओतत असल्यामुळे ती मजा अजून वेगळी.
पद ऐकणारा श्रोताही तसा असावा लागतो. नवरा-नवरीवर अक्षत टाकून लगेच पंधरा-वीस मिनिटात जेवण उरकून ऑफिसला पळणारा चाकरमाना लग्नाच्या साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. तसंच घाईत असलेला श्रोता पद ऐकायला कुचकामी. गाण्यातला आनंद घेता येण्यासाठी श्रोत्याला उसंत हवी. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जशी खवैय्याला उत्तम खाण्याची चटक असते तशी श्रोत्याला सुरांची चटक हवी! पटकन पोट भरता कामा नये. मग लग्नाचं साग्रसंगीत आणि अत्यंत चविष्ट जेवण झाल्यावर जेवणाऱ्याची जशी ब्रम्हानंदी टाळी लागते, तसंच उत्तम पद ऐकल्यावर श्रोता दोन-चार तास तरी त्याच आनंदात तृप्त असतो.
लग्नसमारंभ हा शुभप्रसंग असल्यामुळे त्यावेळी अशुभ खाद्यपदार्थ टाळायचे असतात. लग्नात जसे श्राद्ध-पक्षाचे पदार्थ वर्ज्य, तसे पदात सुद्धा काही गोष्टी वर्ज्य आहेत. पदात सवंगपणा नको. थिल्लरपणा नको. संगीताच्या शुचितेला आणि खरेपणाला धक्का लागायला नको. वाद्यांचा दणदणाट नको. वादकांनी एकमेकांवर किंवा गायकावर कुरघोडी करायला नको. गळ्याची तयारी आहे म्हणून उगीच पद लांबवत कसरती करणंही नको. ‘असा मी, असामी’ मधला प्रसंग आठवा. ‘लग्नाला जातो मी’ हे पद खूप लांबवणाऱ्या गायकाचा.
हे सगळं तंत्र जर जमलं नाही तर लग्नाच्या जेवणात क्वचित कधी पदार्थ फसलेला असतो तसं व्हायचं. मऊ पडलेली जिलबी, आंबट झालेलं श्रीखंड, वास यायला लागलेल्या खोबऱ्याची चटणी, किंवा किंचित उतरलेली आहे काय अशी शंका येणारी रसमलई. एखादा पदार्थ थोडा जरी खराब असला तरी पंक्तीतल्या माणसाला समाधान मिळणार नाही. एखादा खवैय्या तर संपूर्ण जेवणाचा विचका झाला असा निराश होईल. तसा जाणकार श्रोता पद भरकटलं किंवा चांगल्या पदाचं वाटोळं झालं असं म्हणून दुःखी होईल.
‘पद’ या शब्दामध्ये एवढा अर्थ भरलेला असताना त्याला नुसतं ‘गाणं’ असा शब्द वापरायचा म्हणजे मराठी भाषेवर केवढा मोठा अन्याय होईल.
चीज
‘चीज’ ही एक वेगळीच चीज आहे! ‘चीज’ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे शास्त्रीय गायन करताना गायलेल्या चार ओळी. प्रत्यक्षात ‘चीज’ म्हणजे कठोर व्रत करून गायन साध्य करायच्या कलेचा मिळणारा प्रसाद. जणूकाही सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी या सारखं कडक व्रत-वैकल्य करून पूर्ण झालं की त्याच्या उद्यापनाच्या दिवशी नेवैद्याचा स्वयंपाक म्हणजे ‘चीज’.
एका तासात शब्द चालीत बसवले, त्यानंतर अजून एक तासभर सराव करून ती चाल घट्ट केली की ‘गाणं’ तयार होतं. चीजेचं तसं नाही. मुळात चीज गायची पात्रता येण्यासाठी कित्येक वर्षं कठोर संगीत साधना करायला पाहिजे. आवाज स्थिर व्हायला पाहिजे. नुसता नीट षड्ज लागेपर्यंत कित्येक महिने लागून जातात. मग एकेक सूर शिकत, पहात आणि अनुभवत पुढे जायचं.
सुरांची ओळख झाली की त्यापुढे शास्त्रीय संगीताचा अथांग सागर, अगदी प्रशांत महासागरासारखा. त्याच्या काठावर उभे राहून नुसता सागराच्या भव्यतेचा अंदाज यायला परत अनेक वर्षं जाणार. एवढ्या मोठ्या समुद्राच्या काठावरून थेट पाण्यात पोहायला जायचं धाडस कोणाचं नसतं. त्यासाठी अनुभवी गुरूच पाहिजे. गुरुनी शिष्याला समुद्राची ओळख करून देता देता समुद्र ओळखायची ‘नजर’ दिली पाहिजे. हे सगळं जमून समुद्रात पोहायला जमणारे अगदी थोडे. आणि जमलं तरी किनाऱ्यापासून फार आतपर्यंत न जाणारे. पण एखादा भीमसेन, कुमार किंवा एखादी किशोरी जन्मतःच दैवी नजर घेऊन येतात आणि त्या अथांग समुद्रावर सत्ता गाजवतात.
आपल्यासारख्या समुद्रापासून लांबवर कोरड्या जमिनीवर राहणाऱ्या रहिवाश्याना त्या अथांग समुद्राची निळाई, त्याची खोली आणि त्यातलं वैभव ज्या सुरांनी गायक सांगतो ते गायन म्हणजे ‘चीज’. एवढ्या मोठ्या समुद्राची गाथा पाच-दहा मिनिटात कशी वर्णन करावी? शक्यंच नाही! त्यामुळे चीजेला वेळेचं बंधन नाही. फक्त चार ओळींची चीज गाणारा तासभरदेखील गाऊ शकतो. तिथे घाई गडबड चालायची नाही.
चीजेला खूप बंधनं आहेतही आणि नाहीतही. चीज गाताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सूर शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखा हवा. कारण सुरांशी एकरूपता हेच मुळी गायकाचं साध्य असतं, अगदी कठोर व्रत करणाऱ्या उपासकासारखं. ईश्वरप्राप्ती हेच ध्येय. त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी कमीच पडायचे.
सोळा सोमवार किंवा एकवीस चतुर्थी अश्या कठोर व्रताच्या उद्यापनासाठी पहाटे उठून स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर आधी पूजा करायची. सोवळ्यानी स्वैपाक करायचा, तो ही पूर्णपणे निर्जल उपास करून. स्वैपाकातला प्रत्येक घटक शुद्ध, सात्विक आणि स्वतः बनवलेला. स्वैपाक चालू असताना सतत ईश्वराचं स्मरण करत राहायचं. सुरांची शुद्धता मनातल्या शुद्धतेसारखी कायम ठेवायची. नैवेद्यासाठी मोजकेच पदार्थ करायचे. भगर नाहीतर साबुदाण्याची खिचडी, खीर, पंचामृत, मोदक असे थोडेच आणि सात्विक पदार्थ, अगदी चीजेतल्या ओळींसारखे. दोन ओळींची अस्ताई आणि दोन ओळींचा अंतरा. बस. मोजून चार ओळी.
ताटात उगीच आंबट, मसालेदार, तिखट, चमचमीत भारंभार पदार्थ नाहीत; तसंच चीजेतले शब्द शांत आणि मर्यादापूर्ण. उगीच उठपटांग शब्द नाही आणि भावरसांची सरमिसळ नाही. चीजेत भावही दोन प्रकारचे. सगळ्यात जास्त करून चीजेतून प्रकट होणारा भाव ईश्वरभक्ती. दुसरा भाव म्हणजे विरह, कधी ईश्वराचा आणि कधी प्रियकराचा. चीजेत शब्दांची गर्दी नाही आणि शब्दांचं महत्वही तसं कमीच. शब्दाला भाव असलेच पाहिजेत असंही नाही. पण ते शब्द अश्या सुरांमधून दाखवून द्यायचे की शब्द असला नसला तरी चालून जावं, तराण्यात होतं तसं. ते सूरच असे भरून चीज तयार करायची की पदार्थातून ईश्वरदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.
चांदीच्या ताटात त्या मोजक्याच पण सात्विक पदार्थांचा नेवैद्य देवाला दाखवायचा. तो नेवैद्य म्हणजे शास्त्रीय संगीत साधकाने गायलेली ‘चीज’. तो प्रसाद सगळ्या उपस्थित भक्तांना वाटायचा आणि त्यांनी तो भक्तिभावाने ग्रहण करायचा. उद्यापन सोहळ्याला येणारे लोकसुद्धा सात्विक आणि विचार करून बोलावलेले असतात. प्रसादाला आलेली व्यक्ती वेगळी आणि हातगाडीवर चायनीज खाणारी व्यक्ती वेगळी. तसंच फिल्मी ‘गाणं’ ऐकणारा वर्ग वेगळा आणि ‘चीज’ ऐकणारा वर्ग वेगळा. त्यात कोणी कमी-जास्त नाही, फक्त प्रकृतीमध्ये फरक एवढंच.
सत्यनारायणाच्या प्रसादाला किंवा उद्यापनाला लोक जसे भक्तिभावाने येतात तसेच चीज ऐकणारे सुरांच्या भक्तिभावात बुडालेले. त्यांची श्रद्धा फक्त शुद्ध सुरांच्या तरंगांवर आणि आज स्वररूपी ईश्वरदर्शन होईल यावर. चीज जर जमली असेल तर त्याचा अंमल ऐकणाऱ्यावर फार काळ राहणारच. कित्येक वर्षांनंतरही ती चीज श्रोत्याला नीट आठवते, अगदी साक्षात देवाचं दर्शन झाल्यासारखी.
चीजेच्या शब्दाला महत्व कमी असल्यामुळे चीज ऐकायची म्हणजे खरंतर राग ऐकायचा. पण तरी काही चीजा कानावर पडून बऱ्याच प्रचलित झाल्या आहेत. उदाहरणार्थ किशोरीताईंची भूप मधली “सहेला रे” ही चीज. यमनमध्ये बऱ्याच गायकांनी गायलेली “ए री आली पियाबीन”. सिनेमामुळे जास्त परिचित असलेली अहिर-भैरव मधली चीज “अलबेला सजन आयो रे”. आपल्या सुदैवानी हिंदुस्थानात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत आणि होत आहेत. त्यांची कुठलीही चीज ऎका. ईश्वराच्या जवळ घेऊन जाणारच! ही ‘चीज’ या शब्दाची करामत.
तात्पर्य काय, तर वरकरणी सारखे दिसणारे असले तरी इतके प्रचंड गर्भितार्थ ‘गाणं’, ‘गीत’, ‘पद’ आणि ‘चीज’ या शब्दांमध्ये भरले आहेत. अशी समर्थ आणि समृद्ध मराठी भाषा असताना योग्य शब्द योग्य तसा वापरण्याची जबाबदारी आपली आहे. संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर, शब्दप्रभू गदिमा, कुसुमाग्रज, शांताबाई या सारख्या तेजस्वी सरस्वतीपुत्र आणि सरस्वतीकन्या यांनी घातली तशी भाषेत भर घालणं हे काही प्रत्येकाचं काम नाही. पण निदान पूर्वजांनी दिलेली भाषाही आपल्याला नीट सांभाळता आली नाही तर करंटेपणा आपला!
--------------
ता. क.: विचार करून मराठी भाषा वापरतात त्यांना हे लिखाण कळणारच आहे. पण त्या वाचकांच्या पलीकडे पोचावं म्हणून जाणूनबुजून या लेखात थोडे इंग्रजी शब्द वापरले आहेत. टार्गेट ऑडियन्स डोळ्यासमोर ठेऊन त्यांना समजेल अश्या भाषेत मेसेज द्यावा हा मार्केटिंगचा सिद्धांत आहे म्हणे!
मुंबईकडची भाषा या सरसकट
मुंबईकडची भाषा या सरसकट जनरलायझेशनचा निषेध. मायबोलीवरच अनेक मुंबैकर आहेत जे असं कधी बोलत नाहीत.
तुमचं शिर्षक वाचून काटा आला
तुमचं शिर्षक वाचून काटा आला अंगावर. आणि मग थोडा लेख वाचल्यावर अर्थ लागला.
मी त्याला बोललो वगैरे मुंबईची भाषा की आणखीन कुठची कल्पना नाही. आम्ही मुंबईचे असून असं बोलत नाही.
एकोणीसशे साठच्या शैलीतलं
एकोणीसशे साठच्या शैलीतलं दवणीय लिखाण लै बोअर होतं, नाही?
( जांभई )
नै, मला नाही बोअर झालं. मी
नै, मला नाही बोअर झालं. मी आपलं येंजॉय केलं. ऐकलयं काय प्रत्यक्ष बघीतलयं. एका लग्नाला गेलो होतो. तिथे मग एक घोळका जमला. जेवणानंतर गप्पा मारत बसलो असतांना एका मुंबईकराने आम्हाला विचारले, कोण कोण गाणी बोलणार? हे ऐकल्यावर आम्ही खुर्चीवरुन पडायचे बाकी होतो.
अशी आणखीही उदाहरणे आहेत. जसं
अशी आणखीही उदाहरणे आहेत. जसं की
१. साडी नेसली या ऐवजी साडी घातली.
२. केस विंचरले या ऐवजी केसं विंचरली.
ऐकताना विचित्र वाटतं.
हो उदाहरणं बरीच आहेत..
हो उदाहरणं बरीच आहेत.. मुंबईमधे थोडं जास्त अनुभवलं हे पण आहेच.. पण जनरलाझेशन करु शकत नाही असं वाटतं..
मी पण असा वेडेपणा केला होता एकदा.. अर्थात पटकन काय बोलावं ते सुचलं नाही म्हणुन..
अरुण नलवडेंचएक नाटक बघायला गेलो होतो.. नाटकात एक भुमिका वठवणारे काका आमच्या ऑफिसमधे काम करायचे.. त्यानी नाटक संपल्यावर नलवडेंशी ओळख करुन दिली..काय बोलावं या गोंधळात.. ''छान अॅक्टिंग केली तुम्ही'' असं काहितरी म्हणाले मी.. ते तर गप्पच बसले
हा एक किस्सा झाला पण ..
गावा गावा बरोबर प्रत्येक गोष्टीला संबोधन्याचे प्रकार पण वेगवेगळे आहेतच.. त्या त्या गावच्या लोकाना आपण बरोबर दुसरे चुकीचे असही वाटतचं
शब्दछटांचा अनोखा आढावा.
शब्दछटांचा अनोखा आढावा.
मला लेख आवडला.
शिर्षक वाचून मी ही थोडी गोंधळले, मला वाटलं रोहित राऊत च्या भाषेवर उहापोह वगैरे आहे की काय.
अतिशय दर्जेदार लिखाण ! थेट पु
अतिशय दर्जेदार लिखाण ! थेट पु. ल. न्ची आठवण करून देणारी शैली... तुम्हाला भाषा आणि संगीताची दोन्हीचिही गाढ जाण आहे. असे सकस लिखाण वाचण्यासठी डोळे तहानलेले असतात.
असेच लिहित रहा. शुभेछ्छा !
तुम्हाला भाषा आणि संगीताची
तुम्हाला भाषा आणि संगीताची दोन्हीचिही गाढ जाण आहे.
>> त्याहीपेक्षा जास्त खाण्याची जाण असावी. भूक लागली मला वाचताना
त्याहीपेक्षा जास्त खाण्याची
त्याहीपेक्षा जास्त खाण्याची जाण असावी. भूक लागली मला वाचताना
>>
+१
आता एवढे सगळे पदार्थ खायचे कधी व काम कधी करायचे असा प्रश्न पडल्याने मी पुर्ण वाचलेच नाही!
लेख चांगला आहे. पण रॅप, रॉक,
लेख चांगला आहे. पण रॅप, रॉक, फ्युजनला एकदम तामसी करून टाकलेत तुम्ही
तसंच फिल्मी ‘गाणं’ ऐकणारा वर्ग वेगळा आणि ‘चीज’ ऐकणारा वर्ग वेगळा. >>> असेही काही नाही. गाणी, गीते, पदं, चीजा आणि फिल्मी गाणीसुद्धा सारख्याच आत्मीयतेने ऐकणार्या व्यक्ती असतात. तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रसादाला येणारी व्यक्ती हातगाडीवर चायनीजसुद्धा खातेच की
पण रॅप, रॉक, फ्युजनला एकदम
पण रॅप, रॉक, फ्युजनला एकदम तामसी करून टाकलेत तुम्ही..
>> त्या गाण्यातल्या शाकाहारी कट्टरवादी दिसतात....
आपल्या राज्यात भाषेची शैली
आपल्या राज्यात भाषेची शैली प्रांतवार बदलत गेली आहे..शब्दांचा आणि उच्चरांचे असे काही वेगळेपण आहे की, बऱ्याचदा समोरच्या माणूस कुठल्या भागातील आहे . हे विचाराव लागत नाही.. त्याची बोली भाषा आणि उच्चार सहजपणे त्यांच्या वस्तव्याचा पत्ता देवून टाकतात.. बाकी लेखाची शैली ही उत्तम आहे.
बोलचालीच्या भाषेविषयी फार
बोलचालीच्या भाषेविषयी फार काटेकोर राहू नये असे माझे मत आहे. शिवाय प्रत्येक व्यवहारक्षेत्रातली भाषा वेगवेगळी असते. महाराष्ट्रात व्यापारउदीमाची परंपरा नाही आणि सुतार कासार तांबट सोनार अशा उद्यमशील कारागिरांना ( या व्यवसायातल्या कामगारांना) प्रतिष्ठा नाही. त्यांच्या भाषेलाही नाही. गुजरातीत असे नाही. गुजरातीने अनेक कसब- हुनराचे शब्द सामावून घेतले आहेत. मराठीने गुजरातीचे अनुकरण करायला हरकत नाही. भाषेची वाढ म्हणजे केवळ ग्रांथिक अथवा साहित्यिक वाढ नव्हे. भाषेची प्रगती म्हणजे वेगवेगळ्या क्रियाप्रक्रियांना शब्दरूप देता येण्याची क्षमता वाढणे. वेगवेगळ्या थरातील लोकांना सोपेपणाने अभिव्यक्त होता येणे आणि त्यांची अभिव्यक्ती इतरांना परकी न वाटणे. खरे तर भाषेची प्रगती ही त्या त्या भाषकांच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगतीवर अवलंबून असते. हे सर्व व्यापारव्यवहार समर्थपणे आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त करता येणे म्हणजेच भाषा समृद्ध होणे.
तेव्हा थोडे उन्नीस बीस चालवून घ्यायला हरकत नसावी.
त्या गाण्यातल्या शाकाहारी
त्या गाण्यातल्या शाकाहारी कट्टरवादी दिसतात..>>
अगदी हेच वाटलं. सुमुक्ता +१
गाणी बोलला हे खटकतं ... तरी ते चालवून घेतलं पाहिजे असही वाटतं कधीकधी.
मुंबई ही एक भारतातील सर्वात
मुंबई ही एक भारतातील सर्वात मोठी मेट्रो सिटी आहे. अगडपगड सतराशे साठ जातीधर्माचे लोकं इथे एकत्र नांदतात. असे वैविध्य असणारे आणि भाषानियमांच्या भानगडीत पडायला फारसा वेळ नसणारे वेगवान शहर आहे मुंबई. याबाबतीय महाराष्ट्रात दुसरे कोणतेही शहर मुंबईच्या आसपास नसेल. त्यामुळे मुंबईकरांकडून पुस्तकी भाषेच्या अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आणि कोणी तश्या अपेक्षा ठेवल्या तरी मुंबईकरांना त्याने फरक पडत नसावा. त्यांच्याकडे भाषाशुद्धीसाठी वेळही नसावा आणि गरजही वाटत नसावी. मुळात कोणताही निकषावर महाराष्ट्रातल्या ईतर गावे शहरांची आपापसात तुलना करताना त्यात मुंबईला मोजणे हेच अॅपल ऑरेंजवाला फंडा आहे. मुंबई हा ईतरांसाठीए गटात न बसणारा शब्द आहे.
अवांतर - मुंबईत कित्येक परप्रांतीय सुद्धा ईतके छान मराठी बोलतात की ते कित्येक शहरातील मराठी माणसांना बोलता येत नसावे
असो, एक हाडामांसाचा दक्षिण मुंबईकर म्हणून चार शब्द लिहिणे कर्तव्य म्हणून टाईपले.

पण लेख मात्र आवडला. गाणे आणि भाषा दोहोंची समज जाणवतेय. चीज म्हटले की खाण्यातले चीज आणि पिझ्झा आठवणार्या मला कोणी गाण्यातल्या चीज वर ईतका मोठा पॅराग्राह लिहिलाय त्याची लांबी बघूनच दडपायला झाले
आणि जोक्स द अपार्ट, गाणे बोलणे म्हणजे काहीतरी चुकीचा शब्द प्रयोग आहे हेच अजून मला पचायला जड जातेय. जसे ते साडी घालणे बाबत होते तसेच
आम्ही मुंबईच्या आसपास रहाणारे
लेख चांगला आहे. संगीतातले फार काही कळत नाही. कानाला ऐकायला आवडतं ते आपलं.
आम्ही मुंबईच्या आसपास रहाणारे. गायले, गाणं म्हटलं असंच ऐकलंय लहानपणापासून आणि म्हणतोही बरेच जण तसेच.
पण गेल्या काही वर्षात जाणवतं आहे मुंबई आणि आसपास एक गोष्ट सरसकट मला की सांगितलं, म्हणाले अशा स्पेसिफिक शब्दांना बोलले, बोलली असंच म्हणताना कानावर पडायला लागलं आहे. बोलणे हे एकच क्रियापद बरेच जण वापरताना जास्त दिसतात, हे जाणवलं. माझी छोटी भाचीही जेव्हा सारखी सरसकट सर्व बोलला, बोलली, बोलले वगैरे म्हणते तेव्हा कानांना खटकतं आणि मी सांगत रहाते अग इथे म्हणाले म्हण. इथे सांगितलं म्हण. शब्दसंपदा हरवत चाललीय की काय असंही मला वाटतं. पण हे दहा वर्षात जाणवत आहे मला. आधी असं नव्हतं.
सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे लेख
सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे लेख वाचल्याबद्दल आणि वेळ काढून प्रतिक्रिया कळवल्याबद्दल अतिशय आभारी आहे. माझ्या कल्पनेपेक्षा लेख थोडा मोठा झाला आहे; वाचणाऱ्याकडे वेळ पाहिजे. वाचकाला लेख मोठा आहे हे आधीच सावधान कसं करायचं, या बद्दल काही संकेत असेल तो कृपा करून कळवा. हे लिखाण "धन्य ते गायनी कळा" या ठिकाणी द्यायला पाहिजे होते का?
@रश्मी.., एस, _आनंदी_, दक्षिणा, अँड. हरिदास, पियू आणि अभि_नव, अन्जु - मनापासून धन्यवाद. अश्या प्रतिसादामुळे लिहायची प्रेरणा मिळते.
@मेधा आणि सायो - लिखाणामागचा मुख्य उद्देश म्हणजे चार मराठी शब्दांच्या छटा खाण्यातल्या उपमा (ब्रेकफास्ट मधला नव्हे
) वापरून सांगणे हा आहे. मराठी भाषिकांमध्ये वाद वाढवणे हा तर मुळीच नाही. जनरलायझेशनची चूक दाखवल्याबद्दल आभार. ती दुरुस्ती केली आहे.
@पशुपत - शतशः धन्यवाद. पण पुलं सारखं म्हणजे जरा जास्त झालं. हे म्हणजे "सुर्व्यासमोर काजव्याने चमकन्यासारखे आहे!" (यातला "च" चष्म्यातला आहे). माझ्या तुरळक लिखाणाच्या मर्यादा मी ओळखून आहे. प्रयत्न चालू ठेवीन!
@एस - "केसं" असंच अगदी उत्तम उदाहरण!
@सुमुक्ता, नानाकळा - प्रेफर्ड शाकाहारी म्हणा हवंतर. रॅप, रॉक, फ्युजनही ऐकतो, पण नंतर डोकं भणभणायला लागतं. लेखात म्हणाल्या सारखं - कोणी कमी-जास्त नाही, फक्त प्रकृतीमध्ये फरक एवढंच. मूडवरती अवलंबून. आणि हो, एकाच व्यक्तीला सर्व प्रकारची खाणी आवडतात अशी कितीतरी उदाहरणं आहेत, इन्कलुडिंग युवर्स ट्रूली!
@हीरा, अमितव - लोक त्यांना हवी तसं बोलणारच. भाषा सतत बदलतच राहणार आहे. आपण चालवून घेण्याचा किंवा न घेण्याचा प्रश्नच येत नाही.
@ऋन्मेऽऽष - मुंबई हे किती बिझी आणि वेगवान शहर आहे याचा स्वानुभव आहे. कामावर गेलेल्यांना संध्याकाळी सुखरूप घरी येऊ देत, या शिवाय ऊपरवाल्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाहीत.
>>>>गाणे बोलणे म्हणजे काहीतरी चुकीचा शब्द प्रयोग आहे हेच अजून मला पचायला जड जातेय.
तुमच्या कंमेंट्स नेहेमीच मार्मिक आणि छान असतात, पण ही वरची कंमेंट मला कळली नाही. "गाणी बोलणे" हे शब्द तुम्हाला बरोबर वाटतात, असा याचा अर्थ आहे का?
@π- तुमचेही आभार. नाहीतर उगीच लिहायला जमलं असा अहंकार वाढला असता.
काय फरक पडतो, समोरच्याला
काय फरक पडतो, समोरच्याला समजल्याशी मतलब.
बाकी लेख मस्त, भाषा ओघवती आहे.
"बोलणे" ही एक मूळ क्रीया आहे.
"बोलणे" ही एक मूळ क्रीया आहे. या क्रीयेचा वापर करून वेगवेगळ्या क्रुती साध्य केल्या जातात. त्यांचे वेगळेपण सांगण्यासाठी मराठीत वेगवेगळे शब्द आहेत. उदां
"म्हणाला" - व्यक्तीशी निगडीत
" सांगितले" - माहिती देणे
" कुजबुजला" - दुसर्या कुणाला ऐकू येणार नाही अशा तर्हेने माहिती दिली
"ओरडला" - लांबवर ऐकू जाण्यासाठी , रागावून
अशा तर्हेने बोलणे या क्रिये च्या विविध अभिव्यक्ती इतर शब्दातून उध्रुत होतात.
भाषेचा मूळ उद्देश दुसर्याला काहीतरी सांगणे हा असला तरी तो अधिक परिणामकारक आणि अचूक पणे व्यक्त करणे हे आवश्यक असल्यामुळेच शब्दभांडार वाढ्त गेले. भाषा संम्रुद्ध होत गेली.
त्याचा वापर करणे अनवश्यक मानणे हे प्रगतीकडे पाठ फिरवणे ठरेल.
मुंबईत असतांना मी
मुंबईत असतांना मी सुरुवातीच्या दिवसात वर्हाडी बोलायचो, ते ऐकून स्थानिक हसायचे. मग त्यामुळे मला कुणाशी बोलतांना अडखळायला लागले. एकाने तर मला एकदा विचारले म्हणे तुला स्पीच प्रॉब्लेम आहे का? देवा, म्हटले मी वादविवाद स्पर्धा गाजवणारा माणूस, हजार लोकांच्या सभेत बोलायचा दांडगा अनुभव आहे पण तुमच्या धेडगुजरी बंबैय्या मराठीत बोलतांना मेंदूचा भुगा होतो म्हाराजा... कारण तसे बोलले नाही तर तुम्हा लोकांना कळत नाही व समोरच्याला अलिबागसे आयला है क्या अशा नजरेने बघता... कालांतराने तीच धेडगुजरी मराठी आपसूक बोलता यायला लागली. जैसा देश वैसा भेस. पण नंतर नंतर जाणीवपूर्वक पुस्तकी प्रमाणभाषा आणि उच्चारांसह बोलायचे ठरवले. मग तर मजा यायची. कारण आताही बोललेलं समजत नसे आणि त्यांचीच अक्कल निघत असे. एमएनसीत असतांना तर अशा शुद्ध मराठी शब्दांना वापरणे मजेदार असे.
पशुपत छान पोस्ट
पशुपत छान पोस्ट
भाषेचा मूळ उद्देश दुसर्याला
भाषेचा मूळ उद्देश दुसर्याला काहीतरी सांगणे हा असला तरी तो अधिक परिणामकारक आणि अचूक पणे व्यक्त करणे हे आवश्यक असल्यामुळेच शब्दभांडार वाढ्त गेले. भाषा संम्रुद्ध होत गेली. >>> बरोबर. पण विविध प्रवाह मिळत गेल्यामुळे भाषा संम्रुद्ध होत गेली . त्यामुळे जर वेगळा काहि उच्चार/वापर कोणी करत असेल त्यात वाइट काहि नाहि.
सर्व सवयीचा परिणाम आहे.
छान लिहलयं! आवडले आणि पोहोचले
छान लिहलयं! आवडले आणि पोहोचले देखिल!
पण ही वरची कंमेंट मला कळली
पण ही वरची कंमेंट मला कळली नाही. "गाणी बोलणे" हे शब्द तुम्हाला बरोबर वाटतात, असा याचा अर्थ आहे का?

>>>>>
बरोबर वाटतात असे नाही, पण मुंबईकरांना काय शुद्ध काय अशुद्ध, कोणते शब्द मूळचे मराठी आणि कोणते हिंदीतून आले आहेत हे समजत नाही ईतकेच
जसे ग्रामीण भाषा बोलीभाषा अशुद्ध समजल्या जात नाही, तसे मुंबईचीही एक भाषा तयार झाली आहे. त्यात बरेचसे शब्द हिंदी वगैरेतून आल्याने ते शुद्ध भाषेची सवय असलेल्यांना ईतर ग्रामीण भाषांच्या तुलनेत जास्त खटकतात ईतकेच.
माझ्यापरीने मी मराठी संकेतस्थळावर बागडायला लागल्यापासून जे मराठी शिकतोय त्याची लिहिताना काळजी घेतो. लेखागणिक सुधारायचा प्रयत्न करतो. पण बोलताना ईतक्या वर्षांची सवय बदलणे अवघड आहे. आणि एक मुंबईकर म्हणून शुद्ध भाषेचे फार स्तोम माजवू नये असेही संस्कार मनात रुजले आहेतच, भैय्या ये वांगा कितनेका दिया असे बिनधास्त बोलून मोकळे व्हायचे
एमएनसीत असतांना तर अशा शुद्ध
एमएनसीत असतांना तर अशा शुद्ध मराठी शब्दांना वापरणे मजेदार असे.
>>>>>>
याला +७८६
मी मायबोलीवर वावरायला सुरुवात केल्यपासून आणि इथे लिहायला सुरुवात केल्यापासून बरेचदा काही शब्द वा वाक्ये पुस्तकी ढंगात बोलतो. तेव्हा ऑफिसमधले बोलतात, अरे ए ते तुझे ब्लॉगचे मराठी आमच्याशी बोलू नकोस, माहीत आहे मोठा शहाणा अहेस. (मायबोली हा ऑफिसमधेल काही जणांना माझा ब्लॉग वाटतो. )
MK, तू मायबोलीवर आहेस माहिती
MK, तू मायबोलीवर आहेस माहिती नव्हतं

छान लेख!
मुंबईकरांना काय शुद्ध काय
मुंबईकरांना काय शुद्ध काय अशुद्ध, कोणते शब्द मूळचे मराठी आणि कोणते हिंदीतून आले आहेत हे समजत नाही
Submitted by ऋन्मेऽऽष
>>>>>>
खर आहे का हे ?
मोरपंखी, अजिबात नाही. (हाडाची
मोरपंखी, अजिबात नाही. (हाडाची मुंबईकर)
मुंबईकरांना काय शुद्ध काय
मुंबईकरांना काय शुद्ध काय अशुद्ध, कोणते शब्द मूळचे मराठी आणि कोणते हिंदीतून आले आहेत हे समजत नाही >>> टोटली disagree ऋ. मी डोंबिवलीकर असले तरी माझे जवळचे नातेवाईक प्रॉपर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि लहानपणापासून तिथे जाणे, येणे, राहणे आहे. तिथली आजूबाजूची पण भाषा बघितली आहे ऐकली आहे.
हल्ली काही वर्षात काही प्रमाणात भाषा इथेही बिघडत चाललीय, नाही असं नाही. पण मुंबईकर म्हणून ऋ ने सरसकटीकरण केलंय ते चुकीचं आहे.
Pages