सुशोभना - १
जेहेत्तेकाळाच्या ठायी, बृहदाकार वनखंडाच्या गर्भागारात एक जनपद. नांव मंडुक जनपद. नाना आकारांच्या नाना रूपांच्या जलाशयानी चितारलेल्या वनस्थलीत ते वसले आहे. मंडुक हे त्यांचे दैवत. एक महाकाय मंडुक, मानवसदृश व्यवहार, मंडुकरूप असे या दैवताचे ध्यान आहे. कधीकाळी अशाच महाकाय मंडुकापासून आपली उत्पत्ती झाली असे जनपदवासी मानतात. जळी स्थळी सारख्याच चपळतेने वावरणा-या या मानवांचा मुळपुरूष एक मंडुक असेल यावर कोणाचाही विश्वास बसतो. कारण यांचा जनवेश मंडुकासारखा, आणि गणवेशही मंडुकाचा आहे. अनायास प्राप्त झालेल्या विस्तीर्ण जलशेतीवर ते आपली उपजीविका करतात. मंडुकासारखे विहरतात.
या गणराज्याचा गणपती राजा आहे आयु. वनस्थलीच्या मध्यभागी विशाल जलाशयाच्या एका तटावर त्याचा पाषाणी प्रासाद आहे. दुस-या तटावर त्याच्या कन्येचे उपवन. लताकुंज, तलावाटिका आणि स्फटीकसुंदर सरोवरांनी नटलेले उपवन. राजकन्या सुशोभना आपल्या सख्यांसह तेथे अखंड विहार करीत असते. लावण्यसपंन्न, कला-विद्या-निपुण, आनंदाउल्हासाची मूर्ती, नाचरी, हसरी, खटयाळ, खोडकर, राजकन्येची नाना रूपे. पण प्रत्येक रूप पुरूषालाच काय पण सख्यांनाही मोहवणारे.
वैशाखाची रणरणती दुपार. तांब्याचा पत्रा तापावा तसे आकाश तापलेय. त्यातून लसलसते सूर्यकिरण वनस्थलीवर बरसताहेत. आकाशातील नित्याच्या बगळयांच्या माळा, नयनरम्य रचना करून दिगंतराला जाणारे पक्षी लुप्त आहेत. शिकारीसाठी रिंगणे घेत फिरणारे श्वेत पक्षी, फार काय गिधाडांनीही आपली तोंडे दिवाभीताप्रमाणे कोटरांतून लपविली आहेत.
त्या विशालकाय सरोवराच्या नानाविध हंसानी, बदकांनी, अन्य नानाविध पाणपक्षांनी पंख समेटून कमलपुष्पांच्या जाळीत आसरा घेतला आहे. नेहमी नेत्रसुखद वाटणारा जलाशयाचा निळसर पृष्ठभाग, बिलोरी आरशासारखा सूर्यकिरण पीत, पहाणा-याच्या नजरेवर भक्कम आग बरसत आहे.
या तटावरील शेवाळाने लिंपलेला आयुमहाराजांचा पाषाणी प्रासाद तेवढा नजरेला बोथटपणे भिडत आहे, शांतवीत आहे. पैलतटावरील वनलतांनी वेढिलेल्या वाटिका, कुंज, शीतल सौम्य वायुच्या पंख्याने आपल्या आश्रयाला असलेल्या, फुला पाखरांना, भ्रमर पतंगाना, वसंतपालवीला आश्वस्त करीत आहे.
शांत निद्रिस्त दिसणा-या राजप्रासादात मंडुकराज आयु अशांत आहे. कित्येक दिवस मंडुकराज आयुने आपल्या कन्येच्या विवाहाची स्वप्ने पाहिली. मातृविहीन, लावण्यमयी, कलावती, सुकुमार कन्या, तिचे स्वयंवर रचावे. वरसंशोधनास देशोदेशी दूत पाठवावेत, असे नाना बेत त्याने आखले. राजकन्येने ते नेहमीच उधळून लावलेत, कधी लाडीकपणे, कधी रूसून रागावून, तर कधी फुत्कारूनही.
का? सुशोभना अशी का वागते? उलगडा झाला तेव्हा मंडुकराज हादरून गेला. आपल्या कन्येचे मुलखावेगळे चरित्र जगभर होईल, सारा मंडुकवंश बदनाम, नामशेष होईल. या भीतीने राजा काळवंडला आहे. आयुच्या महालात आताशा दीप प्रज्वलितच होत नाही. मळकट, भयग्रस्त महाल. विझलेला राजा.
इकडे सुशोभनातील कक्षातील मणीदीप वेळोवेळी विशेष प्रखरतेने पेटतात. शत्रूला नामोहरम करून, कोमेजलेल्या पुष्पमालांसह, सुशोभना जेव्हा प्रासादात परतते; तेव्हा तिच्या महालात जणू विजयोत्सव सुरू होतो. दासी सारसी तिचा वेश उतरवून अंगमर्दन सुरू करते. आणि हसत खिदळत सुशोभनाची विजयकथा सुरू होते. मी मी म्हणणा-या पुरूषसिंहाच्या पराभवाच्या कथा.
आकाशातून चंद्रकोर खाली उतरावी, मेघमालेतील विद्युतरेखा कामिनी बनून यावी. अशी ती अयाचीत प्रिया एखाद्या नरसिंहापुढे प्रकट होते. शालीन तरी प्रणयचतुर नायिका, बघता बघता सारा सुखावेग घेऊन त्याच्या अंगावर झेपावते. त्याला फुलवते, सुखवते, अखेर उन्मत करते. आणि तत्क्षणी आली तशीच अंतर्धान पावते. प्रेमभंगाच्या आघाताने गोंधळलेले, हताश झालेले, फजित पावलेले ते नरसिंह. त्यांच्या कथा राजकन्येच्या कानावर येतात. ती सुखावते माधवीरसाचे घुटके घेत मत्तपणे नृत्य करते. नृत्यावेश संपल्यावर थकून राजकन्या मंचावर विश्रांतीसाठी पहुडते, तेव्हा तिच्या कपाळावरील धर्मबिंदू टिपताना, दासी सारसीच्या अंगावर काटा उभा राहिलेला असतो.
दासी सारसीच्या हातात प्रसाधनाचे अतुल कौशल्य आहे. मस्तकात शहाणपण आहे, हृदयात ओतप्रोत स्नेह आहे - राजकन्येसाठी, कष्टी राजा आयुसाठी. मंडुकराज आयुप्रमाणे राजकन्येच्या बदनामीची, मंडुक वंशाच्या क्षयाची भीती मात्र तिचे मन कुरतडत नाही. कारण राजकन्येची सारी रहस्ये तिला माहीत आहेत.
सुशोभनाची बदनामी होत नाही, होणारही नाही. अभिनयकुशला सुशोभना आपल्या आकर्षणाने पागल झालेल्या पुरूषाला आपला जरासुध्दा थांगपत्ता कधी लागू देत नाही. देणार नाही. याची सारसीला खात्री आहे. आपल्याला भेटलेली, अतूलनीय सुखाचा वर्षाव करणारी, प्रणयाच्या नाना रंगात धुंद करणारी कोणी जीतीजिवंत स्त्री होती, की आपल्याला झालेला भ्रम, इथवर संभ्रमात हे प्रेमिक पडतात हे सारसीला गुप्तचराकरवी कळले आहे.
तरीपण सारसी सुशोभनेवर नाराज आहे ’मायविनी, नको खेळू हे खेळ.’ असा इशाराही सुशोभनेला ती वारंवार देते.
मंडुक जनपदाला, मंडुक वनस्थलीला वेढून असणा-या निबीड अरण्यात इक्ष्वाकु परिक्षित आला आहे. प्रजावत्सल राजा वनांतील ऋषीमुनींचे कुशल विचारायला आला आहे. हिंस्त्र पशुंपासून हरणे गायींचा फार मोठा संहार तर होत नाही ना याची खात्री करून घ्यायला आला आहे.
जवळच त्याची छावणी पडली आहे. हिंस्त्र पशुंची शिकार करायला, वनविहाराला तो नित्य हिंडत आहे.
वार्ता ऐकताच खटयाळ सुशोभना हरखून गेलीय. ती आज वनमार्गावर अभिसाराला जाणार. सारसीच्या मनातही आशा पालवलीय. इक्ष्वाकु वंशाचा गौरव परिक्षित, अयोध्यापति, प्रजावत्सल इंद्रासारखा पराक्रमी इ.इ. पुरूष याच्या मोहात सुशोभना नक्की पडेल. प्रेमळ सारसीला आनंद झालाय.
सुशोभनाचे लावण्य अनेकपटीने लखलखून काढणारे प्रसाधन तिने मोठया तन्मयतेने करून दिले. यौवन अंगोपांगी लगडलेल्या त्या तनूला फुल्लकुसुमिता अधीरकामिनीचे वेधक रूपडे चढवले. प्रसन्नतेने निरोप दिला. सुशोभना अभिसाराला निघाली. जलीस्थली सारख्याच चपळ हालचाली करण्याचे मंडुक कौशल्य सुशोभनेकडे अंगभूत होते. परिक्षिताला अरण्यात जाताना हेरून त्याच्याआधीच ती अरण्यात पोचणार होती.
..............................
ऋतु वसंत. प्राचीन, जणू कालातीत भासणारे अरण्य. डेरेदार जुनाट वृक्षांना आणि त्यांना वेढणा-या अक्राळविक्राळ लतांनाही वसंताने नाजूक पुष्पित गंधीत रूप दिलेय. फळभारांनी कृतार्थ बनवलेय. कीर्र रानात, वैशाख उन्हे हिरवट शीतल होऊन झिरपताहेत. नानारंगी प्रकाश फाकलाय. पक्षांचे प्रणयी कुंजन चालले आहे. रंगीत पिसारे मिरवीत प्रणयाराधन चालले आहे. रंग गंध रसांची एक मायावी दुनिया उभी राहिलीय. त्यामुळे सारेच कसे मधुरमधूर वाटतेय. सा-यांचा सुखेनैव आस्वाद घेत, शीळ घालीत अश्वारूढ परिक्षित वनविहार करतोय. घोडा डौलात पण संथ गतीने चाललाय. पाण्याच्या शोधात, जलाशयाच्या दिशेने.
विशाल अरण्याला जल पयोपान करविणारे तेवढेच विशाल सरोवर. नानाप्रकारच्या कमललतांनी आच्छादलेले, नाना पाणपक्षांना आश्रय देणारे सरोवर. भोवताली थंडगार सावलीत तृणे तृणपुष्पे रसरसून डोलताहेत. सुवर्णरंगी चानगवताचे विस्तीर्ण पट्टे झळकताहेत. परिक्षित मोहरला. त्याचा अणू रेणू उत्तेजित झाला. आणि अशावेळी वा-यावरून सुरेल संगीतलहरी येताहेत याचे भान त्याला आले. वीणेचा झंकार, त्याच्या जोडीला मानवी कंठातील सुरेल सूर. चंचल वाराही जणू त्या स्वरमाधुरीने भारावला आहे. कुठून येताहेत सूर?
जरा दूर खडकावर प्रफुल्ल चंद्रकमळे माळलेली एक कन्या. वीणेच्या तारांवरून सुकुमार बोटे फिरताहेत. कंठातून निघतेय स्वर्गीय आलापी. आणि खाली अळिता रचलेल्या पायांनी ताल धरलाय. सरोवराच्या पाण्यावर त्या आघाताने तरंग उठताहेत. सुबक चक्राकार.
इश्वाकू परिक्षित मुग्ध होऊन जागच्या जागी थबकला.
आलापीची उत्कटता वाढत होती. शिगेला पोचली, तेव्हा आतापर्यंत हळूवार ताल धरणारी पावले नाचू लागली. जणू आनंद दुथडी भरून वहातोय. निखळ आनंदाचे कारंजे थुईथुई करतेय. राजाच्या सर्वागात आनंदाचे भरते आले. अद्भुत अनुभव, केवळ स्वर्गीय.
चुंबकाने आकर्षाचे तसा परिक्षित नर्तकीला सन्मुख झाला. गीत थांबले. नर्तन थांबले. राजनंदिनीने नाना गूढ भाव मिश्रित नजरेने राजाकडे पाहिले. आपल्या उदंड यौवनाचा, अलौकिक लावण्याचा आणि स्वर्गीय कलागुणांचा अभिमान तिच्या गात्रागात्रातून झिरपत होता. पण नजरेत होते एक गूढ आमंत्रण, एक स्वागत.
“यावेळी, या स्थळी, निवांत विहरणारी तू, कन्यके कोण आहेस?” राजाने नितांत कौतुकाने विचाराले.
शालीन सौम्य स्वरात सुशोभना म्हणाली, ’हे शस्त्रसज्जित वीरबाहू, तुला देण्यासारखी ओळख, परिचय माझ्याकडे नाही. या वनप्रदेशात तुला भेटलेल्या अनेकांपैकी मी एक. तशीच अनाम, परिचयहीना.’
’तुझे माता पिता, तुझा वंश, तुझा देश?’ परीक्षित
सुशोभनेने दीर्घ निश्वास सोडला. उदास स्वरात ती म्हणाली ’मला यातले काहीच नाही.’
हा कलापूर्ण शृंगार, ही अव्दितीय वीणा. दैवी संगीत आणि निर्भर नृत्य. वन्यजीवाची ही लक्षणे नव्हेत; परिक्षित मनाशी म्हणाला. आणि एकटक राजकन्येला न्यायाळीत राहिला.
’काय पहाताय नरवीर? कोण आहात आपण?’ सुशोभना.
’मी इक्ष्वाकु परिक्षित, पहातोय समोर जगातील कोणते आश्चर्य आहे ते,’ राजा स्मितपूर्वक म्हणाला.
’काय आपण महाराज परिक्षित? महाप्रतापी प्रजावत्सल नृपवरा, माझ्यासारखीच्या परिचयाचा आपणास उपयोग नाही. आपण याक्षणीच पुढे जावे ते बरे’. सुशोभना.
’उपयोग? नसेल, उपयोग नसेल; पण कर्तव्य तर आहे?’ परिक्षित.
सुशोभनेच्या मुखावर तेज चमकू लागले. किंचित कठोर स्वरात ती म्हणाली.
’ओहो, सम्राट परिक्षित आपले राजकर्तव्य पार पाडू इच्छितात तर! पण मी सम्राटांची प्रजानन नव्हे, राजांच्या कृपादृष्टिची मला आवश्यकता नाही नृपती.’
गर्वोव्दत सुशोभनेने परिक्षितीला क्षणभर निरूत्तर केले. हे मृगशवक नव्हे, सिंहाची बछडी आहे, त्याच्या मनात आले; आणि तिच्याबद्दलचे आकर्षण अनिवार झाले. आर्जवून तो म्हणाला, ’लावण्यलतिके, कृपादृष्टीची आवश्यकता मला आहे. ललने, तू माझे स्वप्न आहेस, तुझ्या मनप्रासादात मला जागा दे. मला धन्य कर.’
सुशोभनाचा अविर्भाव क्षणात बदलला. करूण कातर स्वरात ती म्हणाली, मलाही खूप आवडेल नृपती, तुझी संगती. पण मी तुझ्यासाठी खरोखरीचे स्वप्न ठरू शकेन. सुशोभना किंचित थांबली राजाच्या नजरेतील प्रश्न उमजून पुढे म्हणाली, मी अभिशप्त आहे. बहुधा फार काळ जगणार नाही, माझे प्रतिबिंब मी पाहीन, त्याक्षणी माझ्या जीवनाची इतिश्री होणार आहे.’ सुशोभनेचा आर्त विव्हळ स्वर, चेह-यावरील भय आणि उदासी. राजाचे मन द्रवले. तिला आपल्या जवळ घेत तो म्हणाला, ’ कोणी दिला तुला हा शाप राजसे? हा तुझा भ्रम तर नव्हे? ये, माझ्या बाहुपाशात असताना कोणी तुला अपाय करील ते मी पहातो. प्रिये निःशंक रहा.’ मृगाच्या पावसाने कोळपलेली गवते तरारून उठावी, तशी परिक्षिताच्या चुंबनवर्षावाने सुशोभनाची तनु हर्षनिर्भर होऊन उठली. वसंतऋतु भरात होताच. सुशोभना परिक्षिताचे प्रणयाराधनही ऋतुच्या जोडीने भरात येत राहिले.
वैशाखातील कित्येक संध्या परिक्षिताने सुशोभनेबरोबर घालविल्या आहेत. आजही काननगर्भातील संकेतस्थळी निश्चितच तो येईल. सुशोभना व सारसी दोघींनाही याची खात्री आहे.
उपवनातील आपल्या आवडत्या लताकुंजात राजनंदिनी प्रसाधन करून घेत आहे. अभ्यंग नुकतेच आटोपले आहे आता नाना अंगरंगाच्या द्रोणातून रंग पारखून घेत सारसी सखीला सजवीत आहे. पण सखीची, सुशोभनाची नजर लागलेय उपवनाला वळसा घालून बृहदारण्याकडे जाणा-या वाटेकडे
राजकुमारीचा विपुल केशसंभार एका विलोभनीय चक्राकारात रचून, सारसीने तो तिच्या मस्तकावर बांधला. राजकुमारीची हनुवटी हातात घेऊन, किंचित दूर सरून, सारसी सुशोभनेचे रूप न्यहाळू लागली. कौतुकाचे प्रसन्न भाव उमटून बहरून हळुहळु ओसरले. राजकन्येच्या हनुवटीखालून आपला हात काढून घेत, सारसीने दिर्घ निश्वास सोडलो.
’का ग? काही उणे राहिलेय?’ सुशोभनाने कुतुहलाने विचारले.
’रूपराशी तू. तुला गं काय उणे?’ सारसी.
’मग तो निश्वास? तो कां?’ सुशोभना.
’सांगू राजतनये? अनेक दिवस माझ्या मनात एक इच्छा पालवलीय. तुला नाना रूपात मी सजवले, कधी वनदेवता, कधी परी, कधी अप्सरा, कधी देवकन्या तर कधी वनकन्या. मनांत आहे तुला वधूवेशात सजवावे. तुझ्या विपुल केशसंभारावरून पुष्पमंडले मस्तकावर चढावीत, अन् तेथून अवखळपणे कपाळावर झेपावीत. संुदर सुगंधित पुंडलिकांची वरमाला तुझ्या हाती द्यावी. आळत्याने रंगवलेल्या सुबक पावलांनी तालबध्द सरकत तू तूझ्या नटवराला संमुख व्हावेस..........
’पुरे, पुरे’ हसत सुशोभना म्हणाली. ’ते होण्यासारखी नाही’.
’कां? सखे, कां? तुला भेटलेल्या एकाहून एक सरस प्रेमिकांच्या प्रेमाचा सन्मान करावा असे तुला कधी वाटले नाही? तुझ्या पे्रमाच्या अधीन अनेक झाले, तुला कोणाच्याही अधीन व्हावेसे वाटले नाही?
’नेमकं बोललीस सखे तू. मी कोणाच्याही आधीन होत नाही. कधी होइनसे वाटत नाही. प्रणयाराधनेचा हा खेळ मात्र मला खूप आवडतो. मला अंगोपांगी हरखून टाकतो तो’ सुशोभना.
’खेळ? तुझे हृदय गुंतत नाही त्यात?’ सारसीने अधीरपणे विचारले.
’माझे हृदय? आदिमायेच्या गाभा-यात सुरक्षित आहे ते. अभिसाराच्या वेळी ते घेऊन हिंडत नाही मी. या कनकलतेसारख्या तनुनेच मी बलदंड पुरूषांना नाचवते, खेळवते. त्यांच्याजवळ तरी कुठे हृदय असते? त्यांना असते फक्त अंग. तारूण्याने रसरसलेला लिंगदेह. तेच त्यांचे पौरूष. या पौरूषाला सामोरे जाते माझे स्त्रीत्व. माझ्या देहाचे अनेक भाग-विभाग. त्याच्या जोडीला पुरूषांना वेडावून टाकणारा भावभंगिमा. तोही या नाना भागांचा.’
सुशोभना आता क्षुब्ध झाली होती. आपल्या अधरांवरून तिने हलकेच जीभ फिरवली आणि पुन्हा उसळून म्हणाली, ’माझ्या कटाक्षाने घायाळ होते ते पुरूषाचे हृदय? ती तर असते त्याची कामेच्छा. त्यातून जन्मते ती कामपिपासा - प्रेम नव्हे. पुरूष प्रणयी तर खराच पण प्रेमिक मात्र त्याला म्हणू नकोस. पुरूष स्त्रीवर प्रेम करीत नाही, तिचे रक्षण करायला कटीबध्द असत नाही, तिने सुखी व्हावे म्हणून बेचैन होत नाही तो असतो हपापलेला. तिला भोगायला, आणि तेही स्वताःचे काही न त्यागता.’
सुशोभनेने परत एकदा क्षणभर विसावा घेतला. मग शांत स्वरात म्हणाली, ’त्या एका भोगासाठी त्याला त्याचे सर्वस्व त्यागायला लावते मी. सांग सखे, स्त्रीच्या जीवनात यापरता सार्थक आनंद, गौरव आणखी काही असतो?’ याहून अन्य काही हवे असते नारीला?’
’होय, हवे असते, हवे असते पवित्र विवाहबंधन, हवा असतो लहानग्यांचा कमरेभोवती पाश, हवे असते कुटूंबिनी बनून राज्य करणे.’ सारसी ठासून म्हणाली.
’याचा अर्थ पुरूषाची दासी होणे. स्वतः दासी असूनही त्या क्षुद्र जीवनातील दुःखाची कल्पना तु कशी करू शकत नाहीस, सारसी? चल, मला अंधःपाताची वाट दाखवू नकोस.’
बोलता बोल ता सुशोभना पुन्हा क्षुब्ध झाली. सारसी मौनपणे सुशोभनेच्या मस्तकी चवरी ढाळू लागली.
असेच काही क्षण गेले. उपवनाच्या वाटेवर अश्वाच्या टापा वाजू लागल्या. सुशोभना अंगोपांगी चंचल होऊन उठली. सारसीचा खांदा प्रेमाने दाबीत म्हणाली, सखे मला आनंदाने निरोप दे. तुला प्रतिदेव वाटणारा इक्ष्वाकु परिक्षित संकेत स्थळी माझी वाट पाहील.
’राजनंदिनी, म्हणूनच मला हे बोलायला हवेय. आज चैत्र पोर्णिमा. प्रेमिकांची रात्र. हृदय दानांचा मुहूर्त. सखये, आज तूही हृदयदान कर.’ सारसी.
राजकुमारी मिस्किलपणे हसली; “सांगितले ना? ही हृदय नावाची भानगड मला माहीत नाही म्हणून? माझ्याकडे आहेत प्रणयरंग, एकाहून एक रमणीय प्रणयरंग. सा-या प्रेमिकांवर ते मी मुक्त मनाने उधळलेत. यापेक्षा अधिक माझ्याकडे नाही. ते मी कसे कोणाला द्यायचे गं? बोलता बोलता सुशोभनेने एक चंद्रकमळ उचलून आपल्या केशमुकुटात खोचले. मंडुकचापल्याने सुशोभना संकेतस्थळी रवाना झाली.
सारसी कष्टी मनाने जागीच बसून राहिली. ’माझ्या या प्रिय सखीच्या जीवनात हृदयाचा प्रादुर्भाव होवो.’ सारसीने मनोमन इष्टदेवतेची प्रार्थना केली.
क्रमशः
सुशोभना - 2
संकेतस्थळी पुनवेची पूर्वसंध्या सुशोभनेचे संगीत नृत्य शास्त्र हास्य त्यात अनोखे रंग भरीत होते. हळुहळु पूर्वाकाशात पूर्णचंद्र मोहरू लागला. आणि थोडयाच वेळात धुंद चांदण्याची बरसात सुरू झाली. परिक्षिताला वेगळेच काही जाणवू लागले. आजवरून चंचल हसरी कामिनी, गहनगूढ स्त्रीत्व धारण करून त्याच्या सा-या अस्तित्वाला जणू आश्वासन देत आहे असे त्याला वाटू लागले सुशोभनेचा चेहेरा ओंजळीत घेऊन परिक्षिताने गंभीर आवाजात म्हटले , प्रिये आज तुझे नवेच रूप मला जाणवतेय. तू माझी प्रणयिनी नाहीस, तू माझी अंतरतमा. तुझ्याशिवाय मला अस्तित्व नाही.
सुशोभनेला असा घनगंभीर पुरूष अपेक्षित नव्हता. पण राजा आपल्यात पुरता गुंतलाय आणि आपल्यालाही तो अडकवणार. हे तिला स्पष्ट जाणवले.
’हाच क्षण मुक्तीचा’ असे मनात म्हणत प्रमदा आवेगाने उठली, म्हणाली ’राजा चल, चांदण्याने न्हालेल्या या रात्री, या नितांत सुंदर क्षणी आपण अश्वारूढ होऊन तुझ्या उपवनात जाऊ या.’
उपवनात पाय उतार होताच, प्रेमिकांची जोडी पुष्करणीच्या दिशेने चालू लागली, नेटकी पुष्करणी, स्फटिकवत पाणी, हर्षोत्फुलू सुशोभना एखाद्या कालहंस्तीप्रमाणे डौलात पाण्यात उतरली, आणि क्षणार्धात निमूट बनली.
उतरलेल्या उदास चेहे-याने मागे वळून तिने परिक्षिताक्रडे पाहिले; म्हटले ’राजन घात झाला. मी माझे प्रतिबिंब पाहिले. पुष्करणीच्या काठावर बसकण घेत थकल्या स्वरात ती म्हणाली, माझी वेळ झालीय, प्रियतमा, शाप फळाला आलाय. मला निरोप दे.’
शाप? परिक्षिताला सारे आठवले क्षणभर तो भांबावला. पण दुस-याच क्षणी निर्धाराने म्हणाला, तुला निरोप देऊन मी माझा रहाणार नाही. सुभगे तुला मी जाऊ देणार नाही.
हा सूर वेगळाच होता. सुशोभनेने तो कधी अनुभवला नव्हता. सूर लाचार तर नव्हताच, विव्हलहि नव्हता. त्यात नियतीचा निमूट स्वीकार नव्हता. उलट आव्हान होते.
सुशोभना क्षणभर डळमळली. तरीही निकराने म्हणाली, देवतांचा शाप उलटवण्याचे सामर्थ्य कोणात असत नाही. मला पुन्हा संकेतस्थळी न्या. आपण दोघे मिळून इश्वरेच्छेला शरण जाऊया.
अश्व आणण्यासाठी परिक्षित त्वरेने निघून गेला आणि तितक्याच त्वरेने अश्वारूढ होऊन आलाहि. पण पुष्करणीच्या काठावर त्याची प्रिया नव्हती. ’प्रिया’ त्याने वारंवार पुकारले. उत्तर आले नाही. काय! पुष्करणीने तिला गिळले. परिक्षिताने दूताना हाका मारल्या. पुष्करणी फोडून पाणी वहावले. रिकाम्या पुष्करणीत चिमूटभर चिखलहि नव्हता. नारीदेह तर नाहीच.
अश्वारूढ होऊन परिक्षिताने सा-या परिसराचा शोध घेतला. कोणी कुठेहि नाही. कितीतरी वेळ अश्व दौडत होता. थकून त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आणि राजाच्या डोळयातून अश्रूधारा. मनात काही योजून परिक्षित पायउतार झाला; आणि झाडाझुडुपात हिंडू लागला. तोच एका झाडाच्या आडोशाला त्याला आकृती दिसली. कमरेचे खडग उपसून तो धावला. पण ती छायाहि चपळतेने एका नाल्यात उतरली आणि गायब झाली. पण राजाने ती आकृती ओळखली होती. ती होती बेडकाची - मंडुकाकृती.
........................
मंडुक प्रासादात अभिसारिका परतली. पण आज तिने विजयोत्सव केला नाही. सुस्त मनाने आणि सुस्त शरीराने ती मंचकावर पडून राहिली. तिला झोप लागेपर्यंत दीर्घकाळ सारसी तिची सेवा करीत राहिली.
सुशोभनाला जाग आली ती हाहाकार ऐकून. काय झालेय याचा ती कानोसा घेत असता सारसी वेगाने महालात घुसली, तीव्र स्वरात म्हणाली. ”परिक्षिताने मंडुक जनपदावर आक्रमण केलेय; दिसेल त्या मंडुकाला तो झोडपतोय. प्रजा आक्रोश करतोय. राजा दयेची याचना करतोय.“
’निष्ठूर राजकन्ये तुला आगीशी खेळायचेच होते तर तू राजाला आपला परिचय का दिलास? का वंशनाश करवते आहेत?
सुशोभना त्वेषाने उठून उभी राहिली. खोट आरोप करू नकोस. आपला खरा परिचय देण्याइतकी मी मूर्ख कधीच नसते आणि बेसावधहि नसते.’
’मग का बरे हे अकारण युध्द?’ मनाशी विचार करीत सारसी महालाबाहेर पडली.
महालाच्या गवाक्षात निःशढृपणे सुशोभना उभी होती. उन्हे उतरत होती. जनपदात विचित्र शांतता होत. कण्हण्याचे आवाज मधून मधून येत होते. तेवढेच. ’हा प्रेमिक असा चक्रम निघाला तर!’ सुशोभना उपहासाने हंसत स्वतःशी म्हणाली. तिने महालात दीप उजळला, कपाळी तिलक देखला. वस्त्रे सरशी केला. आणि ती वीणेच्या तारा जुळवू लागला.
पहिला झंकार निघण्यापूर्वीच सारसी झंकारली ’राजनंदिनी’.
सुशोभना थंडपणे म्हणाली ’ आता काय आणखी?’
’आणखी एक दुर्वार्ता.’ सारसी कठोर स्वरात उत्तरली. परिक्षित समजतोय त्याची प्रिया पुष्करणीत बुडाली आणि एका मंडुकाने तिला तेथून पळवून नेलीय.’
‘म्हणून आता हा नरवीर मंडुकांच्या पाठी लागलाय? हा तुझा बुध्दीमान पराक्रम राजाहि शेवटी पागलच निघला की! ’ सुशोभना हसत म्हणाली. सारसी वैतागून निघून गेली.
आकाशात अजून अंधार होता. सुशोभना गवाक्षाकडे येऊन बसली. आहत प्रजाजनांचे करूण स्वर वा-यावर वहात येऊन महालाशी थांबत होते. हळुहळु सुशोभना अस्वस्थ होऊ लागली. कण्हण्याच्या प्रत्येक आवाजाबरोबर दचकू लागली; भांबावू लागली. निष्पाप जीव पराकाष्टेचे दुःख भोगत होते. आणि सारे तिच्यासाठी, तिच्यामुळे.
सुशोभनेला सहन होईना. तिने पित्याच्या महालाकडे नजर टाकली. महालात दीप उजळला नव्हता. कदाचित जनपदात कुठेच दीप नव्हता. पण दूर कुठेतरी दीप जळताना दिसला. शत्रू शिबिरातील दीप तर नव्हे? अजून हा पागल प्रेमी दबा धरून बसलाय? असहय होऊन सुशोभना उठली. आपल्याहि महालातील दीप तिने विझवला. ठाम स्वरात हाक मारली, ’ सारसी’
धावत आली सारसी. वैतागलेल्या स्वरात म्हणाली, आज्ञा व्हावी. हे पहा आताच्या आत्ता, परिक्षिताच्या छावणीत दूत पाठव म्हणावे. कोणाहि मंडुकाने त्याच्या प्रेयसीला पळविलेले नाही म्हणावे. ती प्रेयसी मंडुकराज आयुची कन्या आहे. आणि स्वेच्छेने तुला सोडून घरी परतलीय. तिचे तुझ्याशी काही देणे घेणे नाही. ती कोणाचीच कधीच प्रणयांकिता नसते. मूर्खासारखा मंडुकांचा संहार करू नकोस.’
’सांगितलेय त्याला हे सारे. स्वतः आयुमहाराजानी शत्रूच्या छावणीत जाऊन सांगितलेय ’
सुशोभनाचा चेहेरा खरकन उतरला.’काय? पिताश्रीनी स्वतः सांगितले? त्याना माहीत होते त्यांची लाडकी कन्या बहुवल्लभा? पित्याबद्दलच्या ममतेने तिचे मन दाटून आले. ’तरीही पिताश्रीनी आपल्या वात्सल्याची सावली सतत माझ्यावर धरली?
सुशोभना बराच वेळ निमूट बसली. नंतर सारसीला म्हणाली ’एक बरे झाले, माझे चरित्र्य उघड करून प्रजेला वाचवायचा निर्णय ते घेऊ शकले. माझ्या बाबतीत कठोर होऊ शकले.’ जणू स्वगतच ती पुढे म्हणाली, हेहि बरे झाले खुळावलेला तो राजा माझा नाद सोडून आपल्या देशी चालता होईल. आयुमहाराजांची प्रजा वाचली, कन्याहि वाचली.’
सारसीचे डोळे वेदनार्त. चाचरत ती म्हणाली, प्रजा वाचली, राजनंदने, पण तू वाचली नाहीस.’
चमकून सुशोभनेने विचारले, ’म्हणजे? तो राजा माझ्यावर बलप्रयोग करणार आहे?
सारसी कमालीच्या हळुवार स्वरात म्हणाली, नाही सखी. परिक्षित राजा प्रतीक्षेचा प्रदीप पेटवून तुझी वाट पहातोय.’
’नाही, नाही, नाही.’ सुशोभना थिजून म्हणाली. ’हे कसे शक्य आहे. सारसी आताच्या आता तू स्वतः त्याच्याकडे जा. त्याला सांग या कन्येला हृदय नाही. ती फक्त खेळते पुरूषाशी, स्वानंदासाठी आणि स्वानंदापुरती. मी उध्दव्स्त केलेल्या नाना नरश्रेष्ठांच्या कथा त्याला रंगवून सांग; इतके की त्याला माझा तिरस्कार वाटला पाहिजे. आणि तो इथून निघून गेला पाहिजे.’
’आणि नाही गेला तर?’ ’सारसीने विचारले तू चतूर आहेस सखी. शिवाय तुला सत्यच तर सांगायचय. पुरूषाच्या हृदयावर प्रमत्त नृत्य करायला मला किती आवडते ते त्याला सांग. मला नारीधर्माचा किती तिटकारा आहे ते त्याला सांग. मी किती उद्दंड आहे याचे त्याला भान येऊ दे. सारसी जाच तू. आणि काहीही करून माझ्याबद्दल प्रचंड तिरस्कार येईल असे कर.’ सुशोभना.
सारस्तीच्या डोळयात पाणी आले. ’आत्तापर्यंत या सा-या गोष्टी परिक्षितापर्यंत साग्रसंगीत पोचल्या आहेत. आयुमहाराज आणि मंत्रीगण, त्याना हे करावेच लागले. तुझ्या मोहातून त्या प्रतापी प्रेमिकाला मुक्त करण्याचा आणखी काहीच उपाय नव्हता. दुर्भागिनी.’ बोलून सारसी जड पावलाने तेथून निघून गेली.
सुशोभना खाली मान घालून मंचकावर बसलीय. सगळीकडे बेअब्रू खोटारडी, कपटी, उलटया काळजाची बाई. विचार करता करता सुशोभनाची गौरवभावना, तिचा उत्साह, तिची जगायची इच्छा सारेच संपलेय. आप्त - स्वकीयांच्या हजारो डोळयात अपरंपार घृणा बघायची - नको हा जीव.
सुंदर मणीपात्रात हिरवे निळे विष. ’पुरूष गेले उडत. पण पिताश्रीच्या मनांतले शल्य बनून जगता येणार नाही आपल्याला.’ म्हणत सुशोभनाने मणीपात्र ओठाशी नेले. इतक्यात सारसीची चाहुल लागली.
’काय?’ मणीपात्र लपवीत सुशोभनाने विचारले.
’परिक्षिताकडून चारण आलेत. परिक्षित तुझी वाट पहातोय. ’सारसी.
’कळव त्याना, राजनंदिनी सुशोभना कोणाचे दास्य पत्करत नसते.’ सुशोभना.
’चुकते आहेस तू राजकन्ये.’ चारण पुढे येत म्हणाले. परिक्षिताला प्रतीक्षा आहे हृदय देवतेची, दासीची नव्हे. तुझ्याबद्दलचे सारे काही ऐकल्यावर राजा काय म्हणाला माहीत आहे?
किंचित उपरोधाच्या स्वरात सुशोभनेने विचारले, ‘काही म्हणाला की काय?’
’होय’ चारण संयमित स्वरात म्हणाले.’ इश्वाकू परिक्षित, तो परिपक्व पुरूष म्हणाला, माझ्या प्रियेचे वागणे स्वभाव सुंदर आहे. निसर्गाने ज्या मुशीत तिला घडवलेय त्यातून अस्सलपणे उमटतेय तिचे नृत्य गान आणि शृंगार जीवनहि. तिच्या अंतर्मनाची हाक माझ्यापर्यंत पोचलीय. आता माझ्या अंतर्मनाची हाक तिला पोचवा. मला ती हवीय - जशी आहे तशीच. संगीनी, प्रियतमा, वधू, पत्नी, राणी, सर्व काही मी तिच्यात बघतोय.’
चारणाने काढता पाय घेतला. सारसी मंचकाच्या कोपर-यावर बसली. सुशोभना गवाक्षाकडे जाऊन उभी राहिली. शत्रूच्या गोटात एक दिवा जळतोय. सा-या अंधारात एकुलता दिवा. त्याची ज्योत धीर, स्थिर, शांत, निराकंप. कोणतीही चलबिचल नाही. एक आश्वासन, जीवनाचे, आनंदाचे उत्साहाचे आणि तृप्तीचेहि.
सुशोभना एकटक पहात राहिली. ती प्रकाशरेखा तिच्या अंतरंगातील अनंत अंधारात येऊन भिडली. एक नवी अनुभूती. अंतकरणाच्या वैराण वाळवंटात एक कोंभ उगवला. त्याकोंभाची लसलस सुशोभनाच्या अधरावर चमकू लागली.
हळूवार पावले टाकीत सुशोभना सारसीजवळ आली. तिच्या गळयात हात टाकून म्हणाली, सखी मला सजव, एकवार, अखेरचे.
भीतीने सारसी शहराली. तरीही, शांत स्वरात तिने विचारले, आज कुठे जायचेय राजनंदिनी?
दूर शत्रूच्या गोटात प्रकाशणा-या ज्योतीकडे बोट दाखवीत सुशोभना म्हणाली, ‘त्या तिथे, वधुवेशात.’
Khup khup sundar .....
Khup khup sundar .....
अप्रतीम !
अप्रतीम, कथा आवडली.
मायबोलीवर आपले स्वागत असो.
शीर्षकामुळे अजून कथा वाचायला मिळतील अशी अपेक्षा धरून आहे.
सुंदर!
सुंदर!
खूपच सुंदर
खूपच सुंदर
मस्त
मस्तच
शीर्षकामुळे अजून कथा वाचायला मिळतील अशी अपेक्षा धरून आहे. >>>> +११
सुरेख
सुरेख
मस्त कथा! एखादे पुस्तक वाचत
मस्त कथा! एखादे पुस्तक वाचत असल्यासारखे वाटले. पुलेशु!
भारीच लिहिलयं.. पु.ले.शु.
भारीच लिहिलयं..
पु.ले.शु.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
सुंदर...
सुंदर...
अप्रतिम सुंदर लिहिले आहे!!
अप्रतिम सुंदर लिहिले आहे!!
धन्यवाद,
धन्यवाद,
अजून तीनेक पौराणिक कथाबीजे मनात आहेत.
वैवाहिक समस्यांवर Counseling करत असताना पुढ्यात उलगडलेल्या सत्य घटनांच्या शिदोरीचा पौराणिक कथांशी संकर करत त्या खुलवण्याचा संकल्प आहे.
आपल्या प्रोत्साहना मुळे तो पुरा करायची उमेद वाढली आहे.
पुन्हा एकदा आभार
मस्त आहे . अजूनही वाचायला
मस्त आहे . अजूनही वाचायला आवडेल
वा! मस्त जमलीय. प्राचीन कथेला
वा! मस्त जमलीय. प्राचीन कथेला साजेशी भाषा विशेष आवडली.
>>वा! मस्त जमलीय. प्राचीन
>>वा! मस्त जमलीय. प्राचीन कथेला साजेशी भाषा विशेष आवडली.> >+१
प्राचीन कथेला साजेशी भाषा
प्राचीन कथेला साजेशी भाषा विशेष आवडली. >> +१
वैवाहिक समस्यांवर Counseling
वैवाहिक समस्यांवर Counseling करत असताना पुढ्यात उलगडलेल्या सत्य घटनांच्या शिदोरीचा पौराणिक कथांशी संकर करत त्या खुलवण्याचा संकल्प आहे.>>
ग्रेट!
प्राचीन कथेला साजेशी भाषा विशेष आवडली.>>
खरंच! आणि कुठंही कृत्रिम किंवा नकली वाटत नाहीये. मला तर वाटलं होतं की तुम्ही संस्कृतमधून मराठीत भाषांतर केलं आहे. फारच छान लिहिलंय!
खूप सुंदर लिहीलंय,
खूप सुंदर लिहीलंय, महादेवशास्त्री जोश्यांची आठवण झाली
हे फारच वेगळं आणि सुंदर आहे..
हे फारच वेगळं आणि सुंदर आहे..
आणखी कथा नक्कीच लिहा..तुम्हाला माझ्या' फॉलो 'लिस्टमध्ये लगेच टाकत आहे म्हणजे तुमच्या कथा वाचायच्या रहाणार नाहीत!
कथेची बीजे पुराणात आहेतच .
कथेची बीजे पुराणात आहेतच . तपशील मात्र नव्याने भरायचा आहे.
म्हणूनच कालिदासाचा उल्लेख करावासा वाटला. शाकुंतल किंवा कुमारसंभव जर वांग्मय (हे युनिकोड मध्ये टंकता येत नाहीये) चौर्य नसेल तर या कथा सुद्धा स्वतंत्र सर्जन म्हणून मान्य होतील अशी आशा करते.
प्राचीन कथेला साजेशी भाषा >>
प्राचीन कथेला साजेशी भाषा >> अगदी.
पण मला तांब्याचा पत्रा आणि हपापलेले हे दोन शब्द प्रयोग खटकले. चुभुदेघे.
कथा आवडली,
कथा आवडली,
भाषा पण आवडली, पण सतत याच भाषेत कथा आल्या तर कदाचित ओव्हर डोस होईल.
खुप सुंदर लिहिले आहे...
खुप सुंदर लिहिले आहे...
छान आहे कथा. वेगळ्या धाटणीची.
छान आहे कथा. वेगळ्या धाटणीची. काही ठीकाणी टायपो आहेत ते सुधाराल का?
आपल्या कन्येचे मुलखावेगळे चरित्र >>> इथे 'चारित्र्य' हवे असे वाटते.
सारसी सुशोभनेवर नाराज आहे >>> इतर भाषा संस्कृतप्रचुर आहे पण 'नाराज' हा संस्कृत शब्द नसल्याने खटकला.
त्याच्याआधीच ती अरण्यात पोचणार होती. >> इथे 'पोहोचणार' पाहिजे
चुभुदेघे.
मस्त लिहिली आहे कथा.
मस्त लिहिली आहे कथा.
पुढील कथांच्या प्रतीक्षेत...
@प्रभा तुळपुळे ,
@प्रभा तुळपुळे ,
तुम्ही थेट मायबोलीवरच लेखन करत असाल तर , वाङमय ( waaGamaya) असे लिहायचे. लेखनाच्या खिडकीत प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर कुठले अक्षर कसे टंकायचे याचा तक्ता आहे.
मस्त आहे कथा.
मस्त आहे कथा.
नक्की अजून लिहा.
तुम्ही उल्लेख केला आहे की, या कथांची बीजे पुराणात आहेत.
या कथेचे कथाबीज कोणते? उत्सुकता आहे.
हे फारच वेगळं आणि सुंदर आहे..
हे फारच वेगळं आणि सुंदर आहे..
आणखी कथा नक्कीच लिहा..
किती सुंदर! लवकरात लवकर दुसरी
किती सुंदर! लवकरात लवकर दुसरी कथा लिहून इथे टाका.
छान!
छान!
पण मला स्वतःला 'वैवाहिक समस्यांवर Counseling करत असताना पुढ्यात उलगडलेल्या सत्य घटनांच्या शिदोरी' आणि त्यावर तुम्ही सुचवलेले उपाय साध्या भाषेत वाचायला जास्त आवडेल
Pages