नमस्कार मायबोलीकर! मी मायबोलीचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक लेख घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.
अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
"आरक्षण - योग्य कि अयोग्य" या विषयावर चर्चेसाठी मला TV वर बोलावण्यात आलं होतं. चर्चेत प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून आरक्षणाविषयी मत मांडत होता. कोणी तात्विक आणि तर्कशुद्ध मत मांडून आरक्षण हे कसे वरवरचे मलम आहे आणि याने प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच कसे जाणार आहेत असे पटवून देऊ पाहत होता तर कोणी ऐतिहासिक दाखले देऊन आरक्षण हि कशी सामाजिक गरज आहे हे दाखवू पाहत होता. काही चाणाक्ष लोक आरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे असा दोन्ही पक्षांना नाराज न करणारा सावध पवित्रा घेत होते. चर्चेला उधाण आले होते पण निष्पन्न काहीच होत नव्हते. तेवढ्यात एकजण म्हणाला "लै तर्क लावू नका. आम्हाला शिकू दिले असते तर आम्ही पण तर्क लावून वादविवाद केले असते. गुपचूप आरक्षण द्या नाहीतर तलवारी काढून तुम्हाला तुमची जागा दाखवू." त्याचा आवेश पाहून सगळ्यांनी आपआपली तोंडे आवरली आणि आरक्षणाचा मुद्दा सर्वानुमते मान्य झाला. वर कोणावर अन्याय नको म्हणून सर्वांनाच आरक्षण द्यायचे असेही ठरले. "lead by example" या थोरामोठ्यांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्यामुळे आपण नुसता आरक्षणाला पाठिंबाच द्यायचा नाही तर स्वतः तो आचरणात आणायचा असे मी ठरवून टाकले. एवढेच नाही तर सुरुवात अगदी स्वतःच्या घरापासून करायची ठरवली आणि तसा निर्धारही TV वर बोलून दाखवला.
घरी येता येता ड्रायव्हर म्हणाला "सायेब, लै चांगलं बोल्ला तुमी. तुमच्यासारक्या लोकांची देशाला लै गरजंय. तुमचं नुस्तं बोल्णंच न्हाय तर तुमचा निरधार पन लै आवडला. तुमी न्येहमी म्हन्ता की तू आमच्या घरात्लाच हायेस. पन तुमि नुस्तंच तसं म्हन्ता, आजपतवर तुमच्या गाडीत माझ्या घरच्या कुनाला बी कधी बसू दिलं न्हाय. तुमच्यासाटी एवढं करूनबी आमी वंचितच राह्यलो सायेब. माज्या घरच्यान्ला तुमच्या गाडीत ३० टक्के शिटावर आरक्षण पायजे."
घरी आल्याआल्या मुलांनी घेराव घातला. त्यांनी TV वर आमची चर्चा पाहिली होती. पटापट त्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या पुढे केल्या. कायम Video, TV आणि Tablet मध्ये व्यस्त असणारा बारक्या म्हणाला "लात्लीचे पीकचल फक्त तुम्हीच बगता. हा आमच्यावल अन्याय आये. आमालापन त्यातले १० तक्के पीकचल बगायला दिले पायजेत." थोरल्या ने बऱ्याचदा मला कपाटात बाटल्या लपवून ठेवताना पहिले होते. तो म्हणाला "तुमच्या कपाटातल्या बाटल्यापर्येंत आम्हाला कधी पोहोचूच देत नाही. त्या कायम आमच्या पासून सुरक्षित ठेवल्या जातात. आम्हाला त्या सुरक्षित नव्हे तर आरक्षित हव्या आहेत. त्याही १५ टक्के !". आणि त्यापाठोपाठ बायकोने पगारातील ३० टक्के, TV च्या रिमोट मधली ३० टक्के (महत्वाची) बटणे अशा वेगवेगळ्या आरक्षणाच्या मागण्या सुरु केल्या. तेवढ्यात कामवाली काम आटोपून घरी निघताना दिसली. तिने आरक्षणाच्या काही मागण्या करण्याच्या आत मी पटकन काढता पाय घेतला आणि बेडरूम मध्ये जाऊन बसलो.
कुटुंबापासून अंमलबजावणी सुरु करणे जरा अवघड वाटू लागले. मग ठरवले कि पहिल्यांदा स्वतःपासूनच सुरुवात करू. पण स्वतःपासून सुरुवात करायची म्हणजे नेमके काय करायचे ते कळेना. एवढ्यात जाणवले कि शरीरातले वेगवेगळे अवयव काहीतरी आरडा ओरडा करताहेत. नीट लक्ष दिल्यावर माझ्या लक्षात आले कि ज्याला मी एक शरीर समजत होतो तो प्रत्यक्षात वेगवेगळ्या अवयवांचा समूह आहे आणि प्रत्येक अवयवाची आपापली काहीतरी मागणी आहे. पाऊले म्हणत होती की वर्षानुवर्षे आम्हाला नीचतम दर्जा दिला गेला. आम्हाला कधीच उत्कर्षाची संधी दिली नाही. अन्नग्रहणासारख्या प्रतिष्ठित कामांपासून आम्हाला वंचित ठेवण्यात आले. नेहमी फक्त हातांनाच अन्न खाऊ घालण्याची संधी मिळते. येथून पुढे दिवसातील एक तरी जेवण खाऊ घालण्याचा हक्क आम्हाला मिळावा. मला त्यांचे म्हणणे पटले आणि दिवसातून एक वेळ पायाने जेवायचे मी ठरवले. लोक भले म्हणोत कि ह्या माणसाने माती खाल्ली. पण अशा टीकाकारांकडे लक्ष न देता दुर्बल आणि उपेक्षित घटकांना न्याय द्यायचाच असे मी ठरवले. गुडघे म्हणाले कि आमचा फक्त वापर केला जातो. उठता बसता प्रत्येक कठीण काम आमच्याकडून करवून घेतले जाते पण विचार करणे, निर्णय घेणे अशी सगळी पांढरपेशी कामे फक्त मेंदूलाच दिली जातात. आम्हालाहि त्यात ३० टक्के आरक्षण हवे. त्यांचेही म्हणणे पटले म्हणून त्यांचीही मागणी मान्य केली. ३० टक्के विचार गुडघ्यांनीच करायचे ठरवले. (इथे लिहिलेली ३० टक्के वाक्ये पण गुडघ्यांनी विचार करूनच लिहिली आहेत. जिज्ञासूंनी ती शोधून काढावीत.) आणखी काही उपेक्षित आणि दुर्लक्षित अवयव मागण्या मांडणार एवढ्यात बायकोच्या खेकसण्याने जाग आली. धडपडून उठलो, सर्व प्रातःर्विधी आवरून घरातून बाहेर पडलो आणि आरक्षण मोर्चात सामील झालो. दिवसभराच्या हजेरीच्या बदल्यात २ वेळचे जेवण आणि १०० रुपये मिळणार होते.
- आ. र. षण्मुखानंद
--------------------------------------------------------------------------------------------------
'तर्र क्षण' या अप्रकाशित व अलिखित संग्रहातुन. कृपया - एक गंमत म्हणूनच याचा आस्वाद घ्यावा. कोणत्याही जाती-धर्म, राजकीय पक्ष, शासकीय नियम इत्यादींशी याचा संबंध जोडू नये.