Submitted by संतोष वाटपाडे on 22 November, 2017 - 04:05
नाव वेगळे प्रत्येकाचे भाव वेगळे प्रत्येकाचे
पोट भराया आलो येथे गाव वेगळे मुक्कामाचे
कामासाठी पोटासाठी जरी जोडला धागा आहे
नका वाढवू इथे पसारा ही भाड्याची जागा आहे...
प्रत्येकाला इथे मिळाली निजण्यासाठी छोटी खोली
संवादाला या शहराची जरी शिकवली गेली बोली
या जागेला शाप कलीचा अन लोभाची बाधा आहे
नका वाढवू इथे पसारा ही भाड्याची जागा आहे...
एकच आहे मालक इथला त्याचे आहे सारेकाही
बाग बगीचे शेती वाडी त्याचे आहे अपुले नाही
माती दळणे काम आपले जीवन म्हणजे घाणा आहे
नका वाढवू इथे पसारा ही भाड्याची जागा आहे...
श्वास ओढणे पुन्हा सोडणे या जागेचे भाडे समजा
निजणे कुजणे कुढणे थिजणे यांना आपण खाडे समजा
राम येथला रहीम येशू तोच यशोदा राधा आहे
नका वाढवू इथे पसारा ही भाड्याची जागा आहे...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा! सुरेख, सहज-सोपी!!!
व्वा! सुरेख, सहज-सोपी!!! आवडली..
क्या बात है....
क्या बात है....
सुरेख कविता!
सुरेख कविता!