पाच बहिणी
एका मोठ्या देशात घडलेली गोष्ट आहे ही! एक दिवस थंड, चकाकत्या पाण्याने जीवनाचे सुंदर शरीर लख्ख धुतले. फुलांनी त्याला मनापासून सुगंध चोपडला. सात रंग जीवनासाठी सुंदर वस्त्र घेऊन आले. सूर्याने आपल्या किरणांनी जीवनामध्ये रस भरला. जीवनाच्या डोळ्यात परिपूर्णता व्यापून गेली. ते वार्याला म्हणाले,
'या शताब्दीच्या पाच मुली आहेत म्हणे, सुंदर आणि तरुण! '
'हो. '
'मी आज त्यांच्या घरी जाईन. ' जीवन म्हणाले. वारा हसला.
'माझ्या जवळ पाच भेटवस्तू आहेत. सारख्याच मोलाच्या. मी त्या पाची जणींना एक-एक भेटवस्तू देईन. तू येशील माझ्या सोबत? '
'ठीक आहे, तुला हवं तर येईन. '
'पहिल्यांदा पाच बहिणींपैकी मी सगळ्यात मोठ्या बहिणीकडे जाईन. '
'ठीक आहे. पण तिच्या घराला खिडक्या-दारं नाहीत. फक्त एकच दरवाजा आहे. तिचा नवरा बाहेर जाताना त्या दाराला बाहेरून लोखंडाचं कुलूप लावून जातो आणि जेव्हा घरी येतो तेव्हा तेच कुलूप घराच्या आतल्या बाजूला लावतो.. '
'मग तू मला तुझ्यात भरून घे. एखाद्या सुवासासारखं! म्हणजे तुझ्याबरोबर मीही तिच्या घरात शिरेन. '
'नाही रे बाबा, सुवासामुळे मी फार जड होतो. एखाद्या फटीतून सुद्धा शिरणं मग कठीण होतं मला! भिंती ओलांडून तिच्या घरात जायला मला जितका वेळ लागतो तेव्हढ्या वेळात माझं अंग मोडून येतं.'
वारा जीवनाला पाच बहिणींपैकी मोठ्या बहिणीच्या घरी घेऊन गेला.
'ह्या प्रचंड भिंतीवर तर पुष्कळ चित्रं काढली आहेत. शेकडो, हजारो चित्रं! ' जीवन चकित होऊन बघतच राहिलं.
'ही भिंत शेकडो वर्षांपूर्वीपासूनची आहे. जेव्हा ह्या घरातली कुणीही स्त्री ह्या मर्यादा न ओलांडता याच घरात मरून जाते तेव्हा ह्या देशातले लोक ह्या भिंतीवर तिचं चित्र काढतात. '
'ह्या घरातली एकही स्त्री त्या मर्यादा ओलांडून बाहेर येत नाही?'
'कधीच नाही.'
'ह्या भिंतीचे नाव काय? ' जीवनानं विचारलं.
'परंपरा! कुलाची परंपरा, धर्माची परंपरा, समाजाची परंपरा... '
'मला ह्या घरातल्या स्त्रीला एकदा बघावसं वाटतं.'
'अरे, सूर्याच्या किरणांनीसुद्धा कधी ह्या घरातली स्त्री पाहिली नाही. मग तू कसा बघू शकशील?'
'हे विसावं शतक आहे, वार्या! तू कुठच्या काळातल्या गोष्टी करतोयस? '
'इथे शतकं घराच्या बाहेरूनच निघून जातात. दहा शतकं जरी इकडची तिकडे झाली तरी ह्या घरात राहणार्याना त्यामुळं काहीच परक पडत नाही.'
'मी तिच्यासाठी भेटवस्तू आणलीय.'
'तुझी भेट तिच्यापर्यंत पोहोचली तरी ती त्याला हातही लावणार नाही.'
'का? '
'कारण दुनियेतल्या सगळ्या वस्तू तिला वर्ज्य आहेत'
'तिला माझा आवाज तरी ऐकू जाईल ना? '
'नाही. तिच्या कानांना ह्या भिंतीबाहेरून येणारे सगळे आवाज निषिद्ध आहेत.'
'तू हे काय सांगतोयस, वार्या! अरे, शेवटी तीही एक तरूण स्त्री आहे.'
'तू वयाचं गणित मांडतोयस? पण या घरातली स्त्री कधी तरुण होतच नाही. जेव्हा ती लहान असते तेव्हाच तिला म्हातारपण येतं.'
जीवनाचे पाय लटपटल्यासारखे झाले. माघार घेऊन ते हळूच पुढे चालू लागले.
'ही या शताब्दीची दुसरी मुलगी! ' वारा म्हणाला.
'कोणती? '
'ती समोर रेल्वेच्या रुळावर कोळसे वेचतेय ना? ती! ' तीस वर्षाच्या एका बाईने डाव्या हाताने काखेत फाटलेली चोळी पदराने झाकून घेतली. उजव्या हाताने टोपलीत मूठभर कोळसे टाकले. दहा-बारा फुटांवर पडलेल्या आपल्या पोरीकडे नजर टाकली. पोरीच्या रडण्याचा आवाज अजूनच वाढला होता. बाईने टोपली एका बाजूला ठेवली आणि पोरीला मांडीवर घेतलं. पोरीने आईच्या छातीशी अनेक वेळा तोंड नेले पण तिला दूध मिळू शकले नाही. ती आता किंचाळून रडू लागली. जीवनाने जवळ जाऊन हाक मारली, 'ताई! '
त्य़ा बाईने बहुतेक हाक ऐकली नाही. जीवनाने अजून थोडे जवळ जाऊन हाक मारली, 'ताई! ' आता बाईने अनोळखी नजरेने एकदा जीवनाकडे पाहिले आणि नजर वळवली. जणू त्याने दुसर्याच कुणाला तरी हाक मारली असावी अशा विचाराने!
जीवनाचे ओठ अधिकच व्याकुळ झाले, 'ताई! ' बाईने त्याच्याकडे पाहिले आणि बेपर्वाईने विचारले,
'कोण तू? '
'मला 'जीवन' म्हणतात. '
बाईने मग आपले लक्ष रडणाऱ्या पोरीला शांत करण्यात गुंतवले. जणू रस्त्यावरून येणार्या - जाणार्याशी तिला काय देण-घेणं!
'मी तुझ्या देशात आलोय. तुझ्या शहरात, तुझ्या घरी! ' देश, शहर आणि घर-बिर त्या बाईला काही समजले नसावे.
'मी आज तुझ्या घरी राहीन. ' जीवन म्हणाले.
बाईने रागातच जीवनाच्या तोंडाकडे पाहिले. जणू तिला सुचवायचं होतं की जीवनाने तिचा असा उपहास करायला नको होता.
'मुलीला दूध का नाही पाजत? बिचारी केव्हापासून रडतेय. '
बाईने एकदा आपल्या सुकलेल्या देहावर नजर टाकली आणि मग रडणार्या पोरीच्या चेहर्याकडे पाहिले. तरीही तिला कळेना, हा काय प्रश्न झाला? जर तिच्याजवळ दूध असते तर तिने मुलीला दिलेच असते ना?
'तुझं घर किती लांब आहे? '
'त्या गटाराच्या पलीकडं. '
'मी येईन तुझ्याबरोबर! '
'पण तिथे घर नाही. गवत-काड्यांचं छप्पर आहे. '
'चालेल! '
'पण माझ्याकडे पलंग-बिलंग नाही. फक्त दोन गोण्या आहेत. '
'तुझा नवरा? '
'तो आजारी आहे.. '
'काम काय करतो? '
'कारखान्यात मजूर होता. पण मागच्या वर्षी मजूर कमी केले तेव्हा त्याला काढून टाकलं.'
'मग? '
'एक वर्ष झालं, त्याला नेहमी ताप येतो. '
'तुला ही एकच मुलगी आहे? '
'एक मुलगाही आहे. पण.. '
'कुठंय तो? '
'एक दिवस तो उपाशी होता. फार भुकेलेला होता. त्यानं एका श्रीमंत माणसाच्या मोटारीतून एक सफरचंद चोरलं. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलंय. '
'मी तुझ्या घरी येऊ का? '
'पण तू आहेस तरी कोण? '
'मला जीवन म्हणतात. '
'पण मी तर कधी तुझं नाव ऐकलं नाही ते! '
'कधी तरी लहानपणी तू गोष्टी ऐकल्या असशील! '
'माझ्या आईला खूप गोष्टी ठाऊक होत्या. माझा बाप शेतकरी होता पण त्याच्याकडं स्वत:ची जमीन नव्हती. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी आम्ही कर्ज काढलं होतं, ते आम्ही फेडू शकलो नाही. सावकारानं आमच्या सगळ्या वस्तू, आमचे पशू, सगळं काही हिरावून घेतलं होतं. आणि माझा बाप दूर कुठं तरी रोजगाराच्या शोधात निघून गेला होता. माझ्या आईला रात्र-रात्र झोप यायची नाही. ती रात्री मला उठवून गोष्टी सांगत बसायची. भुता-खेतांच्या, देवांच्या गोष्टी! पण मी तुझं नाव कधी नाही ऐकलं. '
'मग तुझ्या बापानं काय कमवून आणलं?
'माझी आई सांगायची तो जेव्हा येईल' तेव्हा खूप सोनं घेऊन येईल. पण तो कधी परत आलाच नाही' एव्हढे बोलून बाईने जरा घाबरतच विचारले, 'पण तू काय करणार माझ्या घरी येऊन?
'मी?.... ' जीवन काही बोलूच शकले नाही. बाईने कोळशाची टोपली उचलली आणि ती उठली.
'मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणलीय. ' जीवनाने रंग आणि सुगंधाने भरलेली एक पेटी बाईच्या पुढ्यात ठेवली.
'नको बाबा, ही तू तुझ्याजवळच ठेव. ' बाईने घाबरून नजर दुसरीकडे वळवली.
'पण ही मी तुझ्याचसाठी आणलीय. '
'नको, नको! उद्या पोलीसवाले म्हणतील तू कुणाची तरी चोरलीस. '
बाई चटकन आपल्या घराकडे वळली. थोड्या अंतरावर जाऊन जेव्हा तिने वळून पाहिले की जीवन अजूनही तिच्या मागे मागे येत आहे, तेव्हा ती घाबरून थांबली.
'तू परत जा. माझ्याबरोबर येऊ नकोस. मला नवख्या लोकांची फार भीती वाटते. आधी पण एकदा... एकदा एक शहरी तरुण आला होता. म्हणत होता मी तुझ्या नवर्याला काम मिळवून देईन, तुझ्या मुलाला तुरुंगातून सोडवेन... शेजार्यांकडून उसनं पीठ घेऊन मी त्याच्यासाठी भाकर्या भाजल्या... पण जेव्हा मी माझ्या मुलाला भेटायला त्याच्यासोबत शहरात गेले तेव्हा... तेव्हा... रस्त्यात... रस्त्यात तो.... '
बाई नखशिखांत थरथरली आणि तिथून पळत सुटली.
जीवनाच्या डोळ्यात तरळलेली आसवे वार्याने आपल्या. हाताने हलकेच पुसली, 'चल, मी तुला तिसर्या बहिणीकडे घेऊन चलतो. '
जीवन जेव्हा एका महालासारख्या घराजवळून चालले तेव्हा वार्याने हळूच त्याच्या कानात सांगितले, 'हेच तिचे घर! '
दरवाजाजवळच द्वारपालाने जीवनाचा रस्ता अडवला. दासीमार्फत आत संदेश पाठविण्यात आला. जीवन बाहेर प्रतीक्षा करीत उभे होते. बराच वेळ गेला. जेव्हा आतून बालावणे आले तेव्हा जीवन दासी पाठोपाठ काचेचे अनेक दरवाजे पार करीत, अनेक रेशमी पडदे सरकवीत एका विशेष दालनात पोहोचले.
बाईची एक सफेद संगमरवरी दगडाची मूर्ती दालनाच्या एका कोपऱ्यात उभी होती. पाण्याचा कारंजा तिचे शरीर झाकत होते. सफेद, संगमरवरी दगडासारखी, बाईची एक दुसरी मूर्ती एका नाजुकशा खुर्चीवर पहुडली होती. रेशमी तारा तिचं शरीर झाकण्याचा प्रयत्न करीत होत्या. बाईच्या उभ्या मूर्तीतून काहीच आवाज आला नाही. पण बसलेल्या मूर्तीतून आवाज आला...
'तू कोण आहेस? मी ओळखलं नाही. ' जीवनाने चक्रावून सगळीकडे नजर फिरवली. पण तिथे कुणीच नव्हते. मग त्याने उभ्या मूर्तीला हात लावला. ती दगडासारखी कठीण होती. नंतर त्याने बसलेल्या मूर्तीला हात लावला. ती रबरासारखी मऊ-मुलायम होती.
'मला जीवन म्हणतात'. जीवनाने हळूच सांगितले.
'आठवत नाही. पण हे नाव कुठं तरी ऐकल्यासारखं वाटतंय. कदाचित लहानपणी पुस्तकात वाचलं असेल. '
'पुस्तकात? '
'हो! आठवलं! माझ्याबरोबर एक मुलगा शिकायचा. तो गाणी-कविता लिहायचा. एकदा त्यानं मला त्याच्या गाण्यांची वही दिली होती. त्यात हे नाव आलं होतं. '
'तो आता कुठं राहतो? '
'गरीब मुलगा होता. माहीत नाही कुठं राहतो ते! '
'त्याची ती वही?
'या नवीन हवेलीत येताना मी जुनं सामान इथे आणलं नाही. इथलं सगळं सामान आम्ही नवीन घेतलं! '
'खूप महागातलं दिसतंय! '
'माझे पती या देशातली एक मोठी व्यक्ती आहेत. आताच्या निवडणुकीतही मला आशा आहे, पुन्हा ते निवडून येतील. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही असलं किंवा याहून चांगलं सामान खरेदी करू शकतो. '
रबरासारख्या मुलायम स्त्रीच्या मूर्तीनं मेजावर ठेवलेली फळं जीवनाच्या पुढे केली. फळांना स्पर्श करताच जीवनाला त्यातून एक सुगंध जाणवला.
'मी आत्ताच मजुरांकडून ताजी फळं तोडून आणवली आहेत. दासीनं बहुतेक ती धुतली नाहीत. मजुरांच्या हाताचा वास येत असेल. आज उकाडा आहे. माझी तब्येत जरा बरी नाही. आज.... '
'तुला आवडत असेल तर मी तुला बाहेरच्या थंड आणि मोकळ्या हवेत घेऊन जाईन. ' जीवन एका दमात बोललं.
'नाही, नाही! मी अशी बाहेर जाऊ शकत नाही. आपल्यापेक्षा कमी पातळीच्या लोकांत ऊठबस केल्यानं आमचा मान राहत नाही.... खरं तर माझं ऑपरेशन झालं तेव्हाच काही तरी कमतरता राहिलीय. कधी-कधी मला खूप वेदना होतात... '
जीवनानं उठून त्या रबरासारख्या मऊ-मुलायम स्त्रीचा दंड पकडला. मग तिच्या अंगावर हात ठेवला.
'तुझ्या हृदयाचे ठोके कसे पडत नाहीत? दगडासारखं शांत, थंड आहे तुझं हृदय... '
'हीच तर कमतरता राहून गेलीय. माझे पती म्हणतात आता आपण परदेशी जाऊ... बहुतेक अमेरिकेत! तिथले डॉक्टर तज्ज्ञ आहेत. कदाचित माझं पुन्हा ऑपरेशन होईल.... '.
'कसलं ऑपरेशन? '
'जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन मोठ्या घरात येते तेव्हा लग्नाच्या पहिल्याच रात्री देशातले कुशल डॉक्टर तिचं ऑपरेशन करतात. हा मोठ्या घरांचा रिवाज आहे. '
'लग्नाच्या रात्री ऑपरेशन? '
'हो! मुलीचं शरीर कापून तिचं हृदय बाहेर काढलं जातं. त्या जागी सुवर्णाची एक शिळा बसवतात. सुंदर, आकर्षक शिळा! फार किंमती असते ती! माझ्या ऑपरेशनमध्ये थोडी उणीव राहिली होती. येत्या निवडणुकीत जर माझा नवरा निवडून आला तर आम्ही पुढच्या महिन्यात विमानानं परदेशी जाऊ. मग माझं ऑपरेशन होईल आणि मी ठीक होईन. '
मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणलीय.
'नको, नको! माझ्या पतीनं मला सांगितलंय, हल्ली कुणाकडून काही वस्तू घ्यायची नाही म्हणून! निवडणुका जवळ आल्यात... आणि देशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आमचा शेअर आहे. आम्हाला या छोट्या-छोट्या वस्तू घ्यायची गरजच काय? '
टेलीफोनची घंटी वाजली आणि रबरी मुलायम स्त्री टेलीफोनवर दोन-तीन मिनिटं बोलून झाल्यावर जीवनाला म्हणाली,
'हे बघ, तुझं माझ्याकडं काही काम असेल तर तू पुन्हा केव्हा तरी ये. आत्ता माझा नवरा आणि त्याच्या पार्टीचे काही लोक घरी येताहेत... '
वार्याने जीवनाचा हात पकडला आणि त्याला आधार देत चौथ्या बहिणीच्या घरी घेऊन आला. एकदम साधंसुधं घर होतं. पण घराच्या दारासमोरच उभी असलेली चमचमती गाडी डोळे दिपवत होती. संध्याकाळ होत आली होती. जीवनाने घराचा उंबरा ओलांडून आत डोकावून पाहिले. बावीस-तेवीस वर्षांची एक तरुण स्त्री लहान मुलाला थोपटून झोपवत होती. खोलीतील सगळे सामान जेमतेम, जरुरीपुरतेच होते. तरीही तरुणीचे कपडे झुळझुळीत रेशमी होते. जीवनाने हळूच दरवाजावर थाप दिली.
'कोण? ' तरुणी सावकाश उंबरठ्याजवळ आली. 'मूल जागं होईल! ' तिने पाहिले आणि दचकून म्हणाली, 'तू.. तू...! ' तिचे शब्द अडखळले.
'मला जीवन म्हणतात! '
'मला ठाऊक आहे. '
'ओळखतेस तू मला? '
'उभे आयुष्य मी तुझ्या सावलीमागे धावत राहिले. आता थकलेय मी! आणि मी तुझा मार्गच सोडून दिलाय आता.! तू निघून जा. जिथून आलास तिकडेच परत जा. तुला दिसत नाही? माझ्या दरवाजावर शापाची एक रेषा आखलेली आहे. ती रेषा तू ओलांडू शकत नाहीस. ती पुसूनही टाकू शकत नाहीस. तू जा. इथून निघून जा.... ' तरुणीला एव्हढ्या बोलण्याने धाप लागली.
'ताई.. '
'ताई? मी कुणाची बहीण नाही. मी कुणाची मुलगी नाही. मी कुणाची कुणीच नाही. '
'तुझं हे मूल?.. ' जीवनाने खोलीत झोपलेल्या मुलाकडे पाहिले.
'माझं मूल! हो, माझं मूल!! पण याचा बाप कुणीही नाही. '
'म्हणजे? '
'जेव्हा माझ्या देशात स्वातंत्र्याचा पाया खोदला गेला होता तेव्हा त्यात माझी हाडं गाडली होती. जेव्हा माझ्या देशात स्वतंत्रतेचं रोपटं लावलं होतं तेव्हा माझ्या रक्तानं त्याला शिंपलं होतं. ज्या रात्री माझ्या देशात जल्लोषाचे दिवे जळत होते त्या रात्री माझ्या अब्रूच्या पदराला आग लागली होती. हे मूल त्याच रात्रीची निशाणी आहे, त्याच आगीची राख आहे, त्याच जखमेचा व्रण आहे. '
'अरेरे,.. ताई... '
'मग माझ्या सगळ्याच रात्री त्या रात्रीसारख्या झाल्या. मी तुझी स्वप्न पाहत होते. वाटायचं माझ्या कुंवार स्वप्नांना तू मेंदीचा रंग देशील! माझ्या आईच्या अंगणात देशाची गाणी गायली जातील... आणि माझे कान सनईच्या आवाजाने तृप्त होतील... माझ्या गावचा तरुण मुलगा माझ्या स्वप्नातला राजकुमार होता. मी तुझ्या सावलीशी खेळत होते. जेव्हा माझं गाव लुटलं गेलं तेव्हा माझ्या वडिलांची हत्त्या झाली. माझे भाऊही मारले गेले... आणि मला एक साप डसला. मग दुसरा साप.. तिसरा साप... माणसासारख्या तोंडांचे हे कसले साप? ते डसले तर कुणी मरत नाही, पण आयुष्यभर त्याच्या विषामुळं जळत राहतं. मग मी तुझी आणखी एक सावली पाहिली, माझ्या देशाचे लोक म्हणू लागले की या सापांपासून माझी सुटका केली जाईल. त्यांचं विष माझ्या शरीरीतून काढून टाकलं जाईल. मग मी पुन्हा पहिल्यासारखी भोळीभाबडी स्वच्छ मुलगी होईन! मी धावत सुटले.. तुझ्या सावलीच्या मागे वेड्यासारखी धावत सुटले... पण ते सगळं खोटं होतं. सगळं खोटं. माझ्या स्वप्नातल्या राजकुमारानं मला स्वीकारलं नाही. मला घराच्या दारातूनच परत पाठवून दिलं. मी पुन्हा त्याच विषात जळत राहिले. तसल्याच सापांसरखे आणखी साप माझ्या भोवती लपेटले गेले... बाहेर ती गाडी बघतोयस ना? कशी चमकतेय! ती एका मोठ्या सापाची गाडी आहे. आज रात्री तो मला डसेल... '
जीवन काही बोलूच शकेना. त्याच्या हातातली भेटवस्तू त्याच्या आसवांत भिजून निघाली.
'ही भेटवस्तू आणलीस तू माझ्यासाठी? तुला दिसत नाही? माझं सगळं शरीर विषानं माखलंय! मी जर तुझ्या भेटवस्तूला हात लावला नं, तर ती सुद्धा विषारी होईल. हे रंग... माझ्या रोमारोमात विष भिनलंय. विष! विष...! '
वार्याने बेशुद्ध जीवनाच्या चेहर्यावर आपल्या वस्त्राने हवा दिली. जेव्हा जीवनाला थोडी शुद्ध आली तेव्हा वारा त्याला पाच बहिणींपैकी सगळ्यात छोटया बहिणीकडे घेऊन गेला.
वीस वर्षांच्या एका युवतीच्या आसपास पुष्कळशी पुस्तकं, वाद्यं आणि रंग पडलेले होते.
जीवनाने समाधानाने श्वास घेतला. समोर बसलेल्या युवतीने आपल्या नाजुक बोटाने वाद्याची तार छेडली आणि वातावरणात एक मधुर झंकार पसरला. युवती गात राहिली... तिच्या डोळ्यात अश्रुंचे तारे चमकत होते. नंतर तिने रंगांच्या बारीक रेषांनी एका कागदावर मोठे रंगीत चित्र काढले!
जीवनाला वाटले त्या युवतीच्या कलाकार हातांचे चुंबन घ्यावे. स्वर, शब्द आणि चित्रांची एक जादू वातावरणात पसरत होती.
जीवनाने एक मोठा श्वास घेतला आणि हातात रंग आणि सुगंधाची पेटी घेऊन ते पुढे सरकले. युवतीच्या डोळ्यात आश्चर्य उमटले.
'मी जीवन.. '
'मला माहीत आहे. ' युवती म्हणाली. पण जीवनाच्या स्वागतासाठी सामोरी आली नाही. अचानक जीवनाची पावले थबकली. लोखंडाच्या बारीक तारा खोलीच्या दरवाजासमोर उभ्या दिसत होत्या.
'मी यावेळी तुझं स्वागत करू शकत नाही. ' युवती खाली मान घालून म्हणाली.
'का? ' जीवन गोंधळून गेलं.
'मी झोपलेली असताना रात्री तू माझ्या स्वप्नात किंवा जागी असताना माझ्या कल्पनेत येशील तर मी तुझ्याशी खूप गप्पा मारेन. तुझ्याशी खूप बोलेन... तशी मी नेहमी तुझी सावली पकडत असते.... हे बघ, या रंगांनी मी तुझा पदर चितारलाय! या तारांच्या स्पर्शाने मी तुझी गीतं गायलीत... या लेखणीनं मी तुझ्या प्रेमाच्या कहाण्या रचल्यात. '
'पण आज स्वत: मी तुझ्या जवळ आलो असताना तू... '
'हळू.. एकदम हळू बोल! माझ्या घरातल्या सगळ्या भिंतींना छिद्रं आहेत. शेकडो हजारो डोळे माझी राखण करताहेत. तिकडे त्या छिद्रात बघ... तुला प्रत्येक छिद्रात दोन भयानक डोळे दिसतील. हे डोळे ज्वालारसानं भरलेले आहेत... आणि एक-एक जीभ.., यातून शेकडो तीर बाहेर पडतात. जर मी तुझ्याजवळ बसले, तुझ्याजवळ! तर यांचे तीर क्षणात माझे रंग उधळून देतील. माझ्या वाद्यांच्या तारा तोडून टाकतील... माझ्या गीतांचा एक-एक स्वर फाडून काढतील.. आणि या डोळ्यांचा ज्वालारस... '
'पण हे लोक तुझी गाणी ऐकतात.... तुझ्या गोष्टी वाचतात... तुझी चित्रं पाहतात! '
'इथले कलाकार तुझ्याबद्दल चर्चा करू शकतात पण तुझं तोंड बघू शकत नाहीत. आणि जो कुणी तुझं तोंड पाहील त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.... आता तू निघून जा! माझ्या स्वप्नांशिवाय कुठेही मी तुला येऊ देऊ शकत नाही.... '
' मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली होती. '
'ती पण मी तेव्हाच घेईन... जरूर ये... स्वप्नात.. मी सप्तस्वर्ग सजवेन, तू ये. तुझ्या भेटवस्तूने मी माझ्या स्वर्गाची शोभा वाढवेन. तू नक्की ये. आणि मग सकाळी उठून मी तुझ्या प्रेमाचं गीत रचेन.. तुझ्या रूपाचं चित्रं काढेन, तुझ्या सौंदर्याचं गाणं गाईन... पण आत्ता तू इथून जा. कुणी पाहील.... ' आणि युवतीने जीवनाकडे पाठ फिरवली.
--------------------------------------------------------------------------------
(कथा, कादंबर्या, काव्य अशा साहित्याच्या विविध प्रकारात अमृता प्रीतम यांनी स्त्री जीवनाच्या अनेकविध पैलूंचे समर्थपणे दर्शन घडविले आहे. त्यांच्या कथा जीवन आणि प्रेम याबद्दल स्त्रीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. 'पाँच बहनें' या त्यांच्या कथेत स्त्री जातीच्या मूक दु:खाचा आविष्कार आहे हे मूकपण धर्म आणि परंपरांच्या पुरातन मूल्याचा स्वीकार केल्यामुळे किंवा त्या पुरातन मूल्यांचा अस्वीकार करण्यात अपयशी ठरल्यामुळे तिच्या नशिबी आले आहे. धर्म, परंपरा, प्रतिष्ठा, रीती-रिवीज, समाज इत्यादीच्या भिंतीआड जगणार्या पाच बहिणी जीवनाला सामोरे जाऊ शकतात का? की जीवन दाराशी आले तरी त्याच्याकडे पाठ फिरवतात? या कथेतील पाच बहिणी व त्यांचे जीवनाशी असणारे नाते असंख्य स्त्रियांचे जीवनच आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत.)
अमृता प्रीतम यांच्या 'पाँच बहनें' या कथेचा माझ्या बहिणीने काही वर्षांपूर्वी केलेला मराठी अनुवाद मायबोलीकरांसाठी इथे प्रकाशित केला आहे.
खासच!!!!
खासच!!!!
सुरेख..
सुरेख..
ईथे सलाम
ईथे सलाम ठोकण्यासाठी एक smiley हवी होती.
ग्रेट.
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
छान
छान
वा खूप छान.
वा खूप छान. चौथ्या बहिणीची कथा वाचताना गलबललं अगदी
सुरेख
सुरेख केलाय अनुवाद...
छान!!! शब्दच
छान!!! शब्दच नाहीत....
छानच आहे
छानच आहे गोष्ट आणि अनुवाद पण अगदी साधा सोपा आहे.
सुरेख कथा,
सुरेख कथा, पण मला पाचव्या बहिणीचा अर्थ कळला नाही.
पण मला
पण मला पाचव्या बहिणीचा अर्थ कळला नाही.>>कोणतिही general स्त्री असे धर.
अप्रतिम.....
अप्रतिम.....
कथा आणि
कथा आणि अनुवाद दोन्ही सुरेख !
छान
छान
दोन्ही
दोन्ही सुरेख !
>>>जेव्हा ती लहान असते तेव्हाच तिला म्हातारपण येतं... देश, शहर आणि घर-बिर त्या बाईला काही समजले नसावे.... इथले कलाकार तुझ्याबद्दल चर्चा करू शकतात पण तुझं तोंड बघू शकत नाहीत.
अप्रतीम !
तुझं भाष्यसुद्धा आवडलं. "हे मूकपण धर्म आणि परंपरांच्या पुरातन मूल्याचा स्वीकार केल्यामुळे किंवा त्या पुरातन मूल्यांचा अस्वीकार करण्यात अपयशी ठरल्यामुळे तिच्या नशिबी आले आहे." हीच खोच आहे. स्वीकार केला तर तो मूकपणाचाच स्वीकार होतो आणि नाही केला तर मूकपण लादले जाते.
***
Entropy : It isn't what it used to be.
लालू हीच
लालू हीच गोष्ट मी मनोगत वर वाचली. तूच अनुवादित केली होतीस का?
भाग्या, मी
भाग्या, मी नाही गं, बहिणीने केलाय. मी लिहिलं आहे तसं.
आता मी ती italics मधली ओळ शेवटी हलवली आहे त्यामुळे लक्षात येईल.
स्लार्टी, ते भाष्यही तिचंच आहे.
मी अमृता प्रीतम यांचे अभ्यासक्रमातले सोडल्यास फारसे काही वाचलेले नाही. ही कथा खूपच आवडली. आता वाचावे वाटते आहे.
सुरेख
सुरेख अनुवाद !!!
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
सुरेख
सुरेख अनुवाद, धन्यवाद लालु.
मूळ
मूळ कथेच्या तोलामोलाचा झालाय अनुवाद.. अप्रतिम.
सुरेख !!
सुरेख !! धन्यवाद लालू.
अंतर्मुख
अंतर्मुख करणारा लेख!
अनुवाद वाटत नाही इतका अप्रतिम अनुवाद!
-----------------------------------
Its all in your mind!
खुप सुंदर
खुप सुंदर झाला आहे अनुवाद. खुपच छान!
- सुरुचि
सुरेख
सुरेख अनुवाद. कुठेही शब्दांची ओढाताण नाही, कृत्रिम वाक्यरचना नाहीत. अगदी सहज आणि तरीही प्रभावी लेखन.
सहज सुंदर
सहज सुंदर आणि चपखल अनुवाद!!
चौथ्या बहिणीबद्दल वाचताना कसंतरीच झालं अगदी..
सुरेख...
सुरेख...
कथा तर
कथा तर सुंदर आहेच पण अनुवाद एकदम छान केलाय...
अनुवादित
अनुवादित जास्त चांगल!
*********************

कंपून कंपूत सार्या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
छान आहे..
छान आहे.. काही दिवसांपूर्वीच मनोगतवर वाचली तेंव्हाही आवडली.
सुंदरच आहे
सुंदरच आहे . अनुवाद ,अनुवाद वाटतच नाही इतका सुरेख झालाय.
....................................................................
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन.
अप्रतिम!
अप्रतिम!
Pages