आषाढ कृष्ण अष्टमी (१७ जुलै) - मनाली
गजर वाजायच्या आधीच उठलो. हे माझं नेहमीचं आहे. ज्यावेळेचा गजर लावला असेल त्याच्या पाच मिनिटे आधीच मला जाग येते. सव्वापाचला आम्ही दोघे तंबूबाहेर होतो. निघणारच होतो. इतक्यात ब्रेड बटर जॅमचा नाश्ता तयार आहे असे कळले म्हणून तिकडे गेलो. खाणं आणि चहा पिणं झालं तोपर्यंत दोन-तीन जण देखील खायला आले होते. हे लोकही सहा वाजेपर्यंत निघणारच होते. म्हणूनच नाश्ता तयार होता. पण ते निघतीलच याची खात्री नव्हती. आणि ते तसे रमतगमत येणार हे नक्की होतं. साडेपाचला आम्ही सुटलो. पाऊण एक तास फाट्याला पोचायला लागेल अस गृहीत धरलं होतं पण आम्ही पंचवीस मिनीटांतच तिथे पोचलो. चांगलाच हुरूप आला. बतलला एक चांगला ढाबा आहे असं कळलं होतं. ढाबा इतक्या पहाटे चक्क उघडला होता व तिथला मुख्य माणूस बाहेर उभा राहून हात करत होता. पण अर्थातच एवढ्या पहाटे खायचा संबंध नव्हता. त्याला हात करून आम्ही पुढे सुटलो. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. एकही गाडी दिसत नव्हती. नसणारच म्हणा ! इतक्या पहाटे कोण कशाला निघेल? आमच्या डाव्या बाजूला चिनाब नदी प्रचंड रोरावत होती. आज जरा जास्तच फेसाळ पाणी दिसत होते. गेले दोन दिवस आम्हाला निरोप येत होते की मनालीच्या आसपास प्रचंड पाऊस पडतो आहे. पर्यटक दोन दिवस मनालीतच अडकून पडले आहेत. म्हणजे अगदी दुचाकी चालवणारे देखील. त्यामुळे नदीला जास्त पाणी असणे स्वाभाविक होते. रस्त्यावरती इतके दगडधोंडे होते की याला रस्ता का म्हणायचे हा प्रश्न होता. आज मी या दगडधोंड्यातून किती वेगाने गाडी हाकत होतो. आणि तरी कुठे डगमगलो देखील नाही. आणि लडाखला मात्र चांगल्या डांबरी रस्त्यावर असलेल्या एका छोट्या दगडावरून फिरकी घेऊन पाय मोडला होता. नशीब दुसरे काय ! माझी स्पिती वारी त्यावेळेस होणार नव्हती म्हणूनच तसे घडले. स्पिती प्रवास लडाखच्या मानाने खडतर होता. कदाचित शारीरिक श्रम खूपच जास्त झाले असते जर मागच्या वेळेस लडाखच्या पाठोपाठ स्पिती केली असती तर. म्हणूनच कदाचित मागच्या वेळेस मला पाडून छोटेसे फ्रॅक्चर देऊन नशिबाने मला दोन्ही पाठोपाठ करू दिल्या नाहीत. असो. जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणायचे.
आम्ही दणादण गाडी पळवत होतो. आणि एक भलामोठा ओढा सरळ रस्त्यावर येऊन रस्त्यावरूनच पंचवीस-तीस फुट वाहत होता. याला तुफानी पाणी होते. आणि दगड धोंडे ही भरपूर होते. अक्षयने आधी गाडी टाकायची व नंतर मी असे ठरवले. कारण त्याला बुलेटची सवय आहे. महत्प्रयासाने तो ओढा पार करून गेला. मग मीही जवळपास त्याच जागेवरून माझी गाडी पलीकडे नेली. सुटलो एका भयानक ओढ्यातून ! एकूण सतरा ओढे वगैरे आहेत असे नायकाने सांगितले होते. पुढचे ओढेही असेच असतील तर आज काही आम्ही वेळेत पोचणार नाही असे वाटले. आणि आता बारीक बारीक पाऊस सुरु झाला. झटपट अंगावरती पावसाळी पोशाख चढवला. पाऊस जोराचा पडू नये अशी खूप इच्छा होती. पण समोर दरीच्या तोंडावर चांगलेच ढग जमा दिसत होते. थोड्या वेळाने छतडू आले. इथल्या धाब्यावरील लोकांनी आम्हाला थांबवले. ते म्हणाले काल रात्रीपासून आम्ही इथेच अडकलो आहोत. आमची गाडी मनालीहून येताना इथून दोन ओढे अलीकडे अडकली. ओढ्यांना खूप पाणी आहे. आणि एक ट्रक रस्त्यातच आडवा पडला आहे. त्यामुळे गाडी पुढे येऊ शकली नाही. आम्ही चालत या धाब्यावर पोचलो व रात्रभर इथेच आहोत. आमच्या बरोबर एक लहान मूल आहे. त्याचे दूध आणि खाणे गाडीत अडकले आहे. तुम्ही आमच्या माणसाला तुमच्या बरोबर घेऊन जा आणि आमच्या गाडीपाशी सोडा. मग तो ते खाणे घेऊन परत इकडे येईल. तो तुम्हाला ओढा पार करायला मदत करेल.
मग त्याला अक्षयच्या गाडीवर बसवून पुढे नेले. लोक एवढ्या तान्ह्या मुलांना घेऊन कशाला इकडे येतात काही कळत नाही. तो धाबा इतका छोटा होता की त्या माणसांना झोपायला देखील जागा मिळाली नसेल आणि अंथरूण-पांघरूण तर सोडूनच द्या. आता परत धो धो वाहणारा एक ओढा आडवा आला. त्या माणसाला विचारले तर टाका डावीकडून असे म्हणाला. तो काल तिथूनच गेला असल्यामुळे त्याला माहीत असेल असे आम्ही गृहीत धरले. अक्षयने गाडी घातली पण डाव्या बाजूने जाणे फारच त्रासदायक ठरले. एकदम मोठ्या खड्ड्यातच गाडी गेली. लगेच पुढे धोंडे पण होते. त्यामुळे गाडी निघेना. मग मी त्याची गाडी मागून ढकलली. तीन-चार वेळा चांगलाच जोर लावावा लागला. विरळ हवेमुळे धाप लागत होती. कशीबशी गाडी बाहेर काढली. हे सगळं करत असताना मला उजवीकडून जास्त सोपं आहे असं दिसत होतं. मग मी माझी गाडी उजवीकडे घातली. इथून देखील कष्ट पडले पण गाडी जास्त ढकलावी लागली नाही. गुडघ्यापर्यंत पाय तर कधीच ओले झाले होते. सकाळी सकाळी फाट्यावर पोहोचायच्या आधीच. तेव्हापासून बुटात पाणी शिरलं होतं ते तसच होतं. पाय एकदम गारठून गेले होते. पण ते पायमोजे काढून पिळणे प्रत्येक ओढ्याच्या वेळेस करता येणे शक्यच नव्हते. आणि माझे बूट ओलेगच्च राहिलेच असते. आता एकदम मनालीमधेच. अजून दोन-पाच किलोमीटर गेल्यावर एका धाब्यावर पोचलो. इथे बरेच बायकर्स दिसले. त्यांनी आम्हाला लगेच विचारले की पुढे किती खतरनाक ओढे आहेत चंद्रतालच्या दिशेला? म्हटलं बरेच आहेत. ते थोडे घाबरल्यासारखे दिसले. तेव्हाच आम्हाला कळून चुकले की आम्हाला अजून खतरनाक ओढे पुढे वाढून ठेवले आहेत. इथे उजवीकडे दरी आणि पलीकडे असलेल्या पर्वतावर मखमली आच्छादन आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांची फुले उमललेली दिसली. आत्तापर्यंत असा मखमल ल्यालेला जांभळटसर रंगाचा पर्वत पाहीला नव्हता. खूपच सुंदर दृष्य होते. म्हणून फोटोसाठी पाचच मिनिटे थांबूया असे ठरवले.
-
-
इथे आम्ही त्या माणसाला सोडले. इथून थोडेसेच पुढे गेल्यावर तो उलटलेला ट्रक दिसला आणि त्याच्या अलीकडे पलीकडे अडकलेल्या चारचाकी देखील दिसल्या. नशिबाने दुचाकी जाईल एवढी जागा बाजूनी होती. हो इथे रस्ता इतका अरुंद असतो की दुचाकी देखील कदाचित जायला जागा राहणार नाही असे होऊ शकते. पण इथे आपल्या मुंबई पुण्यासारखे कुठेही गाड्या घुसवून सगळ्याच प्रकारची वाहने अडकून पडतील याची दक्षता घेत नाहीत. उलट नीट रस्त्याच्या डाव्याकडेला वाहन अडचण होणार नाही असे लावून शांतपणे वाट बघतात. याच ट्रकच्या पलीकडे त्या माणसाची गाडी होती. चला म्हणजे आता तो त्या तान्ह्या बाळासाठी दूध घेऊन त्या बायकर्स बरोबर परत आपल्या मुक्कामी पोहोचला असता. आम्ही अजून थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडच्या वळणावर एक मोठा धबधबा रस्त्यावर कोसळतो आहे असे दिसले. ते वळण अजून शंभर एक मीटर अंतरावर होते. आणि पलीकडच्या बाजूने एक मोठा ट्रक या दिशेला येताना दिसत होता. अक्षयला म्हटले चल वेगाने पळव. तो ट्रक नक्कीच त्या धबधब्यात अडकणार आणि आपली गोची करणार. पण दुर्दैवाने तो ट्रक आधी पोचला आणि नेमका ओढ्याच्या मध्यातच सगळा रस्ता अडवून स्वतः अडकला. आम्हाला जायला जागाच दिसत नव्हती. तरीही डाव्या बाजूने अक्षयने गाडी घातली. मला तर कळतच नव्हते की तिथे कुठे जागा आहे. कारण तो धबधबा चक्क चालकाच्या सीटवरच पडत होता. पण अक्षयच्या अंगात मुरारबाजी शिरला होता बहुतेक. अब आर या पार... मनाली पहूँचकेही रहेगा टाईम पे ! जराही न थांबता त्याने तिथे गाडी घातली. गाडी घातली पण लगेच अडकलीच. खाली खडकावर चासी आपटलीच. खांद्यावरती पाणी पडत होते. मग परत मी ढकलायचे आणि त्याने गाडीची ताकद वापरायची हा उद्योग चालू केला. सात-आठ वेळा प्रयत्न केल्यानंतर गाडी इंच इंच भूमी लढवत ट्रकच्या पलीकडे बाहेर पडली. ट्रकच्या बाजूला जागा एवढी कमी होती की गाडीचं पदसंरक्षक एकतर ट्रकला घासायचं किंवा बाजूच्या दगडाला. शेवटी एकदाची अक्षयची गाडी पलीकडे गेली. दहा पंधरा मिनिटेतरी सहज लागली असतील सगळ्या द्राविडी प्राणायामाला. गाडीच्या सायलेन्सर मध्ये पाणी जाऊन गाडी बंद कशी पडली नाही याचे फारच आश्चर्य वाटले. अक्षयने मग मुद्दाम पाच मिनिटे गाडी घूरघूर केली. पुन्हा सगळा उपदव्याप माझ्या गाडीसाठी करण्यात आला. पण आता आम्ही सरावलो होतो. नाटकातली आमची भूमिका प्रत्येकाला माहीत होती. इतके की अगदी कोणत्या ठिकाणी कोणी काय शिवी हासडायची तेही लक्षात होते अक्षयने चालवायची आणि मी ढकलायची. दोघांच्या गाड्या पलीकडे नेऊन पोचवल्यावर आम्ही चांगलेच दमलो होतो. इथे अक्षयने त्याचे गमबूट काढून पायमोजे पिळले. तुम्हाला आठवत असेल तर पहा. हे गमबूट त्याने लडाखवारीत विकत घेतले होते चांगलाला जाताना. ते त्याने जपून घरी नेले होते. मी पण तेंव्हाच घेतले होते पण जागेअभावी मनालीत सोडून दिले होते. माझे आत्ता स्पोर्ट्स शूज होते. त्यामूळे मी मात्र ते टाळले. दहा मिनिटे विश्रांती घेतल्यावर परत पुढे निघालो.
हा खतरनाक ओढा पार केल्यावर पुढचे ओढे आम्ही चिल्लरमध्ये पार केले. लवकरच गमडूला पोचलो. इथल्या फाट्यावर समोरच टेकाडावर नाश्त्यासाठी उपाहारगृह दिसले. भूक तर चांगलीच लागली होती. साडेनऊ वाजता आम्ही इथे पोचलो होतो. वर जाऊन झकासपैकी पराठा आणि गाडग्यात लावलेले कवडी दही खाल्ले. ऑम्लेट-पाव देखील चापण्यात आला. आणि वर गरम गरम ताजे दूध प्यायले. सगळा शीण एकदम निघून गेला. आता पाऊस पूर्ण थांबला होता व ऊन पडले होते. ज्या दरीतून आम्ही बाहेर पडलो ती अतिशय विलोभनीय दिसत होती. तिथेच पडून राहावे असे वाटत होते.
-
चार-पाच बायकर्स समोरून आले. त्यांनी सांगितले की गेले दोन दिवस ते मनालीमध्ये अडकून पडले होते. आजच पावसाने उघडीप दिली आहे. तेव्हा ते लेहकडे निघाले आहेत. आमच्यासाठी पुढे चिखल वाढून ठेवला आहे. चला तर मग ! आता लगीन रोहतांग पासचे ! ठिकठिकाणी चिखल चांगल्यापैकी होता पण आम्ही तसे आरामात पार करून गेलो. करता करता दोन तासांनी रोहतांग शिखरावर पोचलो. मागच्या वेळेस इथे कसली प्रचंड गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा बर्फच बर्फ, वाहनेच वाहने आणि बर्फावरती माणसेच माणसे ! पण आज काहीच नव्हते. दोन दिवसाच्या पावसामुळे रोहतांगला पर्यटकांना सोडलेच नव्हते. आजही मनालीमध्ये सकाळपासून पाऊस सुरू होताच. म्हणूनही पर्यटकांना आज येण्याची परवानगी असली तरी अगदी तुरळक गाड्या आल्या होत्या. त्यामुळे मागच्या वेळेस न दिसलेला रोहतांगचा शिखरदगड या वेळेस दिसला व आम्ही फोटो काढून घेतले.
लडाखच्या वेळेस ह्या एका घाटाच्या शिखर दगडाचे फुटवा राहिले होते. आता बहुतेक साडे बारा वाजले होते. म्हणजे नायकाने सात तासांत रोहतांग शिखरावर पोचाल असे सांगितले होते ते बरोबर होते. पण आजचा अतिशय खडतर, भरपूर ओढ्यांचा रस्ता प्रतिकूल परिस्थिती असतानाही आम्ही सात तासातच पार केला होता. आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेतली. आता उतरायला सुरुवात केली. प्रचंड धुके रस्त्यावर होते. आणि दहा फूटांपलिकडचे काही दिसत नव्हते. पाऊसही भुरु भुरु चालू होता. वर येणारे सगळेच बायकर्स म्हणत होते की खाली जोरात पाऊस आहे. त्यामुळे वाटले की खाली उतरायला देखील भरपूर वेळ लागणार. पण नशिबाने आम्हाला खूपच कमी पाऊस लागला. वर जाताना चारचाकी वाहनांना जिथे कर भरावा लागतो तिथे आता वाहनांची रांग लागायला सुरवात झाली होती. म्हणजे आता मनालीतले जागे झालेले दिसत होते. नंतर एका ठिकाणी दोन भली मोठी श्वेतगिधाडे दिसली. अगदी दहा फुटांच्या अंतरावर. पण फोटो काही काढता आले नाहीत कारण कॅमेरा चालू करेपर्यंत ती लांब निघून गेली.
मला वाटतं दोन तासांत खाली उतरून आलो. माझा ठाण्याच्या घरून निघताना जो अंदाज होता की आम्ही सात तासात मनालीमध्ये पोचू, तो चुकीचा ठरला व दोन तास जास्त लागले. पण कदाचित आजच्या इतकी वाईट परिस्थिती नसेल तर नक्कीच अंदाजाच्या जवळपास पोचलो असतो. सांगायचं उद्देश हा की आमच्या चालवण्याबद्दलचा माझा जो अंदाज होता तो बरोबरच होता. अर्थात, पहिल्या दिवशी आम्ही ते स्वतःलाच दाखवून दिलं होतच म्हणा ! असो. वेळेत पोचलो होतो हे महत्वाचं. आता आम्हाला प्रचंड शीण आला होता. अंग तर पूर्ण भिजल होत. कपड्यांवर चिखल उडाला होता. अगदीच दारुण अवस्था होती. अशा स्थितीत आम्ही बसमध्ये बसणं शक्यच नव्हतं. पण आमची इतर मंडळी ज्या हॉटेलमध्ये थांबणार होती तिथे आम्ही गेलो. मंडळाच्या पुण्यातील सहाय्यकांनी त्यांना आधीच सांगून ठेवले होते की दोन जण आधी येतील व दोन-तीन तासच असतील. त्याप्रमाणे हॉटेलवाल्यांनी आम्हाला एक खोली उघडून दिली. हॉटेल अगदी 3 किंवा चार चांदण्यांचे वगैरे होते. मुख्य म्हणजे गरम पाण्याचा हिटर उत्तम चालत होता. मस्त आंघोळी करून घेतल्या. भूक प्रचंड लागली होती. पण हॉटेल मालरस्त्यापासून खूपच लांब होते. व आता तेवढ्यासाठी तिकडे जाऊन खाऊन परत ये व परत तिकडेच सामान घेऊन जा असला उपदव्याप करण्याचे त्राण आमच्यात नव्हते. आता खोगीरं परत व्यवस्थित भरली. कारण आता पावसाळी पोशाख, हातमोजे, पायमोजे, बूट वगैरे गाडी चालवण्याच्या वेळेस लागणाऱ्या गोष्टी आत टाकून दिल्या. मग उपाशीपोटीच झोपी गेलो. पण तास-दीड तास कशीतरी झोप झाली. आता आम्ही निघायच्याच बेतात होतो. तरीही आमची मंडळी आली नव्हती. आम्हाला त्याची कल्पना होतीच कारण रस्ता ! त्यात आमची दुरुस्ती गाडी तर येऊच शकणार नव्हती कारण तो रस्त्यात उलटलेला ट्रक. आम्ही खोली सोडत आहोत असे सांगायला तिथला माणूस शोधत होतो. पण तो काही सापडेना. आता आम्हाला मात्र निघायलाच हवे होते. अजून गाड्या परत द्यायच्या होत्या. हिशोब पूर्ण करायचा होता. म्हणून आम्ही गाड्यांपाशी पोचलो. तर आमचा नायक हजर झाला. तो म्हणाला बाकीचे रोहतांग शिखरावरच आहेत. त्यांनादेखील प्रचंड त्रास झाला. पण सैनिकांच्या गाडीने तो ट्रक परत उभा केल्यामुळे निदान रस्ता वाहता झाला व आमची दुरुस्ती गाडीदेखील पुढे येऊ शकली. आमच्या मंडळींनी त्या धबधब्यात अडकलेल्या ट्रकला देखील ढकलून पलीकडे पोचवले. चला म्हणजे सगळेच पर्यटक आणि मालवाहतूकदार देखील सुटले. आता त्या तान्ह्या मुलाच्या मंडळींनादेखील त्यांची गाडी मिळेल व ते पुढे जाऊ शकतील. आम्ही नायकाच्या ताब्यात खोली दिली. पाच मिनिटे त्याच्याशी बोललो व निघालोच. आता आधी निशीतला गाड्या परत दिल्या. त्याने आमचे पैसे परत दिले. हिशोब पुर्ण झाला. नऊ दिवसांपूर्वी चालू केलेली दुचाकीवरील सफर आज दुचाकी परत दिल्यावर संपली.
आम्हाला प्रचंड समाधान होते की काहीही अपघात न होता आम्ही सुखरुप मनाली मध्ये पोचलो होतो. मग त्याने आम्हाला हिमाचल रोड ट्रान्सपोर्टच्या बसथांब्यावर सोडले. अजून साडेसहाच्या बसला एक दिड तास अवकाश होता. बाजूलाच मालरस्ता होता. तिथे जाऊन आज बऱ्याच दिवसांनी पंजाबी जेवण खाल्ले. मग अक्षय तिथेच बसून राहिला व मी रस्त्यावर फिरायला गेलो. मागच्या वेळेस ज्या चौथऱ्यावर मी प्लास्टर घातलेल्या स्थितीत बसलो होतो, तिथेच आज धड पायांनी जाऊन बसलो. किती बरे वाटले म्हणून सांगू !
मागच्या वेळेस वाटले होते की आता स्पिती वारी होणार की नाही. पण पण उतलो नाही मातलो नाही घेतला वसा टाकला नाही ! वसा दोन वर्षांतच सुफळ संपूर्ण केला मग परत येऊन अक्षयला घेऊन बस थांब्यावर जाऊन बसलो.
HRTC सरकारी असल्यामुळे जरी ते इतर खाजगी बसेस एवढेच पैसे घेत असले वोल्वो बससाठी, तरी कळा तद्दन सरकारी होती. कोणाची हाताची फळी मोडली आहे, कोणाच्या पायाखाली सरकारी सामान ठेवले आहे, कोणाची पाय ठेवायची फळी मोडली आहे, कोणाचं आसन खराब स्थितीत आहे, ते मागे झुकतच नाहीये आणि असं बरंच काही. नशिबाने आमची आसने व्यवस्थित होती. त्यामुळे आम्ही स्थानापन्न होऊन गप्पा मारू लागलो. सरकारी बसचा एकमेव फायदा म्हणजे बस अगदी वेळेवर सुटली. हा कदाचित तोटादेखील ठरू शकला असता पण नशिबाने तसे झाले नाही. अंधार पडेपर्यंत बाहेर बघत बसलो. मागचे सगळे नऊ दिवस स्वप्नवत होते. ते आठवत बसलो होतो. अंधार पडल्या पडल्या मंडी गाव आले जिथे विमानतळ आहे. त्यामुळे माल रस्त्यावर भरपूर फिरंगी फिरत होते. आधी मला वाटायचे की मंडीला विमानाने जाणे, तिथून खाजगी टॅक्सी करून मनालीला जाणे आणि हे सगळे अति पैसे देऊन कोण करत असेल. पण आज दिसले फिरंगी ही गोष्ट करतात. करोत बापडे ! आता आम्ही झोपी गेलो ते गाडी बारा साडेबारा वाजता कुठेतरी खायला थांबली तेव्हा उठलो. बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे बसमधून बाहेर पडलो नाही.
---
सर्व भाग
https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप
बताल पासूनचा पुढच्या रस्त्यात
बताल पासूनचा पुढच्या रस्त्यात बरेच ओढे लागतात.. त्या रस्त्याचा विडियो काढला होता. त्या डोक्यावर कोसळणार्या धबधब्यात आमची गाडी देखिल अडकली होती.
मस्त सफर झाली तुमची...
धन्यवाद इंद्रधनुष्य ! मला
धन्यवाद इंद्रधनुष्य ! मला वाटलं हा भाग कोणाला दिसतच नाहीये की काय. एकही प्रतिसाद नव्हता या भागावर