स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ९

Submitted by सव्यसाची on 10 November, 2017 - 01:04

आषाढ कृष्ण षष्ठी (१५ जुलै) - लोसर

आज पहाटेपासूनच दुसऱ्या गाडीशी झटापट चालू होती. आमचा नाश्ता होईपर्यंत तज्ञाने दुसरी गाडी दुरुस्त करून आणली. सगळ्यांच्या मनात हुश्श झाले. आता आम्ही वेगाने कोमिक या गावी निघालो. हे गाव म्हणे जगातील सगळ्यात उंचावरचे गाडी जाण्यासारखे गाव आहे. इथेदेखील एक छान गुहा होती. आत जाऊन बघतो तर गुहेमध्ये मुख्य दालनात ती प्रसिद्ध लामा लोकांची रांगोळी काढणे चालू होते. खरं तर काही उत्सव वगैरे नव्हता मग हे कसे काय असा प्रश्न पडला. पण आजूबाजूला बघितल्यावर उत्तर मिळाले. नॅट जिओची लोकं येथे चित्रीकरण करायला आली होती. गावात समोरासमोर एकूण दोन गुहा होत्या. एक जुनी व एक नवी. ही रांगोळी काढण्याचे काम नवीन गुहेत चालू होते. जुन्या गुहेमध्ये बर्फाळ प्रदेशात सापडणारा बिबळ्या पेंढा भरून ठेवला होता. गुहेबाहेर समोर बर्फाच्छादित शिखरांची रांगच रांग होती. फोटोसाठी एकदम उत्तम जागा.


-

मारवाडी बंधूंनी अर्थातच उघड्याने फोटोसेशन केले. काही लोकांनी तिथे आलेल्या स्थानिक माणसाकडून जीवाश्म विकत घेतले. काही काही खूपच सुंदर होते. हिमालय बनायच्याआधी इथे समुद्र होता याची खात्री पटली. मग त्यावर अर्थातच जोरदार चर्चा झाली. कारण काही लोक अनभिज्ञ होतेच. तेवढ्यात भारतीय सैनिकांनी भरलेला एक ट्रक आला. यातसुद्धा काही महिला होत्या. एकूणच सीमेवरील भागात महिला सैनिकही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सज्ज असतात असे दिसले. कारण आम्ही चिटकूलला पण महिला सैनिक पाहिल्या होत्या. आज सगळ्यांच्या हातात मशीनगन्स होत्या. तेवढ्यात एकाने नवीन गुहेमागील पर्वतावर नॅट जिओच्या माणसांनी कॅम्प ठोकला आहे असे सांगितले. आमचा आधी विश्वासच बसला नाही. गावापासून एवढ्या दूर, एवढ्या वरती कुठेतरी खबदाडात कोण कशाला रहायची व्यवस्था करेल. पण जरा निरखून पाहिले तर खरच एक माणूस डोक्यावर मोठं ओझं घेऊन त्या डोंगरावर चढत होता. त्याचा अगदी ठिपका दिसत होता. तो त्यांच्यासाठी रसद घेऊन चाललेला होता असे समजले. आम्ही तर तोंडात बोटेच घातली. ही फिरंगी लोकं जरा वेडीच असतात. असो.

आता आम्ही इथून जगातल्या सगळ्यात उंचावरच्या टपालघराला भेट द्यायला निघालो. लवकरच हिक्कीमला पोचलो. पण रस्ता वर आणि गाव शंभरएक फूट खाली. या विरळ वातावरणात कोणी आधी खाली उतरायला तयार नव्हते. अपवाद अर्थातच मारवाडी बंधूंचा. यांचा उत्साह वर्णनातीत होता. ते धडाधड खाली उतरत सुटले. त्यांच्याकडे बघताना असे लक्षात आले की टपालघर मागच्या वळणाच्या खाली आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले इथून जास्त खाली जावे लागणार नाहीये. मग आम्ही देखील पटापट उतरलो. नायकाने सगळ्यांसाठी कार्ड आणली होती. प्रत्येकाला एक-एक दोन-दोन अशी कार्ड पाच रुपयाच्या स्टॅम्पसहित वाटली. मग त्यावर पत्ता लिहिणे, स्टॅम्प चिकटवणे, पेटीत टाकताना फोटो काढणे असे सगळे सोपस्कार यथासांग झाले.

फारच धमाल आली. पण गाडीपाशी चढून जाताना नाकी नऊ आले. जबरदस्त धाप लागत होती. ऊनही मी म्हणत होते. म्हणजे हवा थंड होती, पण उन्हाला आडोसा नव्हता. आता आम्ही जे निघालो ते थेट काजालाच जाऊन थांबलो. जवळपास एक वाजला होता. आमच्या कालच्या निवासस्थानाच्या अलीकडेच एक निवांत हॉटेल होते. तिथे आम्ही गप्पांचा फड जमवला. वाहन दुरुस्तीवाले कालच्या वायरिंग जळालेल्या गाडीशी लढू लागले. काल वाटलं होतं त्याप्रमाणेच मनालीहून वायरिंग आलं नव्हतं. प्रकरण अवघडच वाटत होतं पण तज्ञाला खूपच आशा होती काहीतरी जुगाड करता येईलच अशी. आम्ही निवांतपणे जेवत होतो. मग हात धुतल्यावर तिथेच लिहिल्यानुसार जगातल्या सर्वात उंचावरच्या एअर ड्रायरवर हात कोरडे केले Happy जवळपास दोन अडीच तासानंतर गाडी दुरुस्त झाली आहे अशी बातमी कानावर आली व सगळेच बाहेर गेलो. बघतो तर गाडी खरोखरच चालु होत होती आणि चालवताही येत होती. तज्ञांच्या हिकमतीची कमालच म्हटली पाहिजे.

आता मात्र आम्ही घाई केली. झटपट इंधन भरले व लगेच लोसर या पुढील निवासस्थानाकडे कूच केले. हा रस्ता तसा सपाटच होता त्यामुळे वेगाने मार्गक्रमण करता आले. अंधार पडता पडता आम्ही इच्छितस्थळी पोचलो. आजचे पण होमस्टे होते. इथे म्हणे आमिर खान येऊन राहिला होता. हॉटेल छानच होतं पण मग कळले की आम्हा दोघांना आणि अजून दोन जणांना दुसऱ्या हॉटेलवर जावे लागणार आहे. मग म्हटले चला आपण आधी तिकडे जाऊन सामान टाकू. ते हॉटेल मात्र बंडल होते. बहुदा ते बंदच पडायला आले असावे. आधी पाणी येत नव्हते. मग टॉवेल साबण मागितला तर दोन टॉवेल आणून दिले व म्हणतो की एक टॉवेल एका खोलीला तेव्हा दुसरा तुम्ही दुसऱ्या खोलीत द्या. हा म्हणजे अगदीच कहर झाला. आणि त्यांनी शेवटपर्यंत खरंच अजून टॉवेल आणून दिले नाहीत. आमच्या खोलीतून समोर नजारा मात्र फारच सुंदर होता. खिडकी पलीकडे हिरवी शेते, त्यापलीकडे नदी आणि त्याच्या पलीकडे उंच पर्वत. सगळीकडे निरव शांतता. आम्ही थोडी झोप काढली. उठल्यावर लक्षात आले की इंधनाची बाटली खोगीरात नाहीये. पहिल्या हॉटेलपाशी थांबलो तेव्हा ती नक्कीच होती. म्हणजे कदाचित वाटेत पडली असावी. अंधार पडल्यानंतर पहिल्या हॉटेलमध्ये गेलो. जाताना बाटली दिसते आहे का याचा शोध घेत गेलो. पण मिळाली नाही. माझा तर दावा असाच होता की पहिल्या हॉटेलपाशी जेव्हा थांबलो आणि आत जाऊन खोल्या बघून आलो तेवढ्यात कोणीतरी ती चोरली. पण आता काय करणार म्हणा. अर्थात ती अतिरिक्त इंधनाचीच होती. त्यामुळे एवढा प्रश्न नव्हता. आमची जेवायची व्यवस्था तिकडेच होती हे बरेच झाले. कारण त्या दुसऱ्या हॉटेलमध्ये चहा मिळायची देखील मारामार होती. इथले वातावरण मात्र फारच मस्त उबदार होते. आजचे जेवणाआधीचे दारूकाम आणि गप्पा मस्त चालू होत्या. नंतरचे जेवणही छान होते. जेवण झाल्यावर मात्र लगेचच आम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊन झोपी गेलो. मी थोड्या वेळाने काही कारणासाठी उठलो होतो. तेव्हा बाहेर जाऊन दहा मिनिटे आकाश पाहून घेतले.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users