अत्तराचे भाव: माझी त्रिशतकोत्तर अर्ध-शतकी कामगिरी !!
अशोक कुलकर्णी, औरंगाबाद
हे फेसबूक म्हणजे कमालीची गोष्ट आहे राव ! म्हणजे त्याचं असं झालं की मी ३१ मे रोजी एका हिंदी कवितेच्या दोन ओळींचं मराठीत रुपांतर करून टाकल्या. मूळ हिंदी कवीचं नाव खाली दिलेलं नव्हतं, म्हणून “मूळ हिंदी कवी अद्न्यात” अशी तळटीप टाकून आणि मराठी रुपांतराखाली माझं नाव (अशोक) लिहून पोस्टून टाकलं फेसबूकवर. मूळ हिंदी ओळी ही आता आठवत नाहीत. पण मराठी रुपांतर असं:
**
अत्तराचे भाव आज पार कोसळले
थेंब पावसाचे पहिल्या, जमिनीवर पडले
**
नीट वाचलं तर लक्षात येईल की दोन ओळीतल्या मात्रांची संख्या इथं सारखी नाही, त्यामुळे आणि इतर कारणांनी हा काही गझलेचा मतल्याचा शेर होऊ शकत नाही. पण अर्थ चांगला होता, आवडलं म्हणून पोस्ट केलं. तीस-चाळीस लाईक्स १५-१६ अभिप्राय आणि १ शेअर अशी कामगिरी झाली आणि मी यथावकाश विसरून गेलो. त्यानंतर एक दोन दिवसांनीच एका मित्राचा अभिनंदनाचा फोन आला, मला कळेचना. तो म्हणाला: "बॉस, तुझी पोस्ट व्हायरल झालीय. बघून घे." मी बघून घ्यायचं ठरवलं. फेसबूकवर "सर्च" नावाची एक सोय आहे. पूर्वी डिटेक्टीव्ह मंडळी वापरायची तशा भिंग असलेलं चिन्ह फेसबूकवर दिसतं. ते क्लिक केल्यावर आपण आपल्याला पाहिजे ते टाईप करायचं, फेसबूक तो शब्द किंवा शब्द-समूहाचा धांडोळा घेतं आणि परिणाम आपल्या समोर ठेवतं. मी "अत्तराचे भाव" हे शब्द एन्टर करून धांडोळा घेतला आणि थक्क झालो. साडे-तीनशेच्या वर मंडळींनी ह्या दोन ओळी रि-पोस्ट केल्या होत्या. त्या सगळ्यांना मिळून आलेल्या लाईक्स ची संख्या ३४ हजाराच्या वर जात होती. सगळ्यांच्या एकत्रित अभिप्रायांची संख्या चौदाशेच्या वर गेली होती आणि "शेअर"ची संख्या पाचशेच्या वर गेली होती! हा सगळा फेसबूकचा हिशोब. व्हॉट्स अपचा हिशोब वेगळा.
**
मी जरा खोलात जायचं ठरवलं आणि बघितलं तेंव्हा लक्षात आलं की बहुतेकांनी दोन ओळींच्या खाली दिलेलं माझं "अशोक" हे नाव आणि "मूळ हिंदी कवी अद्न्यात" ही माझी तळटीप उडवून लावली होती आणि जणू काय ही त्यांची स्वत:ची रचना असल्याचा आव आणला होता. काहींनी तर यावर आलेले अभिनंदन पण स्मायली टाकून किंवा थॅन्क्स म्हणून स्विकारले होते ! माझं डोकं तडकलं. मी काहींना ही बाब लक्षात आणून दिली. काही लोकांनी आपली चूक प्रांजळपणानं मान्य केली आणि आपल्या वॉलवर तशी दुरुस्तीपण टाकली. मात्र काही नाठाळ होतेच. त्यातल्या राजू डबीर ह्या सदगृहस्थाबरोबर झालेला संवाद सोबत दिलाय. (चित्र-१) त्यातली भाषा पहा, आपण जे केलं ती काही चूक नाही, उलट मीच काही तरी विचित्र वागतोय हा “टोन” सहज लक्षात यावा.
योगेश लोंढेला त्याचा एक मित्र विनोद पाटीलनं लिहिलं: “दोन ओळीतला सुगंध मनाला भावून गेला.” दुसरा एक मित्र शशिकांत चिंचोलकरनं लिहिलंय: don thembat tu tar kavi zalas mitra ! यावर या मित्रानं म्हणजे योगेश लोंढेनं “लाईक” दिलाय ! यावर मी योगेशच्या वॉलवर लिहिलं तर पठठ्यानं उत्तरच दिलं नाही. (चित्र-२)
योगेश लिंबाजी खेडकरला एक जूनला मोहिनी जमदग्नी-दांडगे ह्यांनी विचारलं की “ही रचना तुमचीच आहे कां?” यावर योगेशनं दिलेलं उत्तर त्याच्या खोटारडेपणावर प्रकाश टाकतंय. (चित्र-३)
ही काही प्रातिनिधिक उदाहरणं झाली. मोजके अपवाद वगळता सगळीकडे हेच ! ह्यात डॉक्टर आहेत, वकिल आहेत, इंजिनिअर आहेत. “नागपुर पोलीस प्राईड” ह्या नावानं अकाऊंट असलेले पोलीस आहेत !! स्त्रीयांची संख्याही दुर्लक्षणीय नाही. आशू तांबोळी, विट्ठल बांगर आणि भारत मिसाळ या सज्जनांना तर या ओळी इतक्या आवडल्या की त्यांनी स्वत:च्या वॉलवर ह्या ओळी दोनदा टाकल्या आणि दोन्ही वेळेला वाचकांचे अभिनंदन सुद्धा स्विकारले ! सुरेश शहापूरकर आणि सुरेश भातंब्रे ह्या दोन सुरेशांची कहाणी वेगळी आहे. त्यांनी ह्या दोन ओळीत आपल्या ओळी टाकल्या आणि ही कविता आपली म्हणून खपवली! सुरेश शहापूरकरची ओळ अशी: “सुगंध भाव मातीचे आसमंतात दरवळले” तर सुरेश भातंब्रेची अशी: “त्या मृदगंधाने मन माझे वेडावले.”
फेसबूकवर “सखाराम गटणे” ह्या नावानं एक अकाऊंट आहे. त्यावर त्यानं अकरा जूनला ह्या ओळी टाकल्या. त्यावर अझीम अत्तार ह्यांनी "He wakya Rushi Golande yane lihilel aahe” असं लिहून विचारणा केल्यानंतर गटण्यांनी “चार दिवस झाले, व्हाटस अप वर फिरतेय.” असं म्हणून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (चित्र-४)
गंमत म्हणजे ही उचलेगिरी दाखवून दिल्याबद्दल ऋषिकेष गोलांडे यांनी अझिम यांचे आभार मानलेले पण आपल्याला चित्र क्र-४ मधे दिसतेय, म्हणजे गोलांडे यांनी पण माझ्या ओळी आपल्या स्वत:च्या म्हणून खपवायला मूक संमती दिलेली आपल्याला दिसते आहे!
ह्या सगळ्या प्रकाराचा भरपूर मन:स्ताप झाला. पण समाधानाची बाब ही की हे ही कळालंय की आपलं रुपांतर खूप जणांना आवडलंय. साडेतीनशे पेक्षा जास्त जणांनी ही उचलेगिरी केलीय, पण त्यामुळे चौतीस हजारांपेक्षा जास्त जणांना कवितेच्या ह्या ओळी आवडल्याचं दिसून आलंय. पाचशे पेक्षा जास्त वाचकांनी ह्या ओळी आपल्या मित्रांशी शेअर केल्या आहेत. एखाद्या कलाकाराला तरी आणखी काय हवं असतं?
-अशोक
एखाद्या कलाकाराला तरी आणखी
एखाद्या कलाकाराला तरी आणखी काय हवं असतं? >> हे तो मूळ हिंदी कवीच काय ते सांगू शकेल
सरजी, सोडा ते. हे फेसबुक
सरजी, सोडा ते. हे फेसबुक लाइकचे मनावर घेऊ नका इतके. एकदा जालावर टाकलं की त्यावर कोणाचा कन्ट्रोल राहत नाही.
तसे पाहिले तर तुमची कविता कोणीही चोरत नाहीये फक्त शेअर होत आहे, आता ते श्रेय घेणारे त्यांच्यापुरत्या घोळक्यात वाहवा करुन घेतात त्यालाही काही फार अर्थ नाही. इथे स्वतःच्या कवितांवर कोणाची उपजीविका चालत नाही, ते चोरीच्या कवितेवर कुठे चालणार? सगळ्या क्षणभंगुर गोष्टी.
फारच त्रास होत असेल तर रायटर्स असोशिएशनचे सदस्यत्व घ्या. कायदेशीर लेखन सुरक्षित करा, प्रसिद्ध करा. पुस्तकात, वर्तमानपत्रात छापून आणा. मगच इन्टरनेटवर सोडा.
स्वस्त वस्तूंचे त्रास महाग असतात. इन्टरनेट स्वस्त आहे, त्याचे त्रास फार महाग आहेत.
स्वतःची पुस्तके, कवितासंग्रह छापणे महाग आहे पण त्याचा आनंद व स्वामित्व कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
जालावर लेखन सोडणे जांभई देण्यासारखे आहे, एकाने दिली की सगळ्यांनाच येते, कोणाकोणाचे तोंड बंद करणार?
अशोकराव,
अशोकराव,
कविता तुमची आहे पण त्यातल्या मराठी शब्दांपेक्षा मूळ संकल्पनेची ताकद जास्त आहे हे तुम्हीही मान्य करालच. तुम्ही जरी ती प्रकाशित करताना मूळ कवि अज्ञात असे लिहले असले तरी नंतर फेसबुक वर प्रतिसादात , तुम्ही फक्त "माझी कविता" असे म्हटले आहे. मी ही कविता पहिल्यांदा भाषांतरीत केली असे म्हटले नाही. मग जो आरोप तुम्ही इतरांवर करता आहात , तो कुठेतरी तुम्हालाही लागू होत नाही का?
आता तुम्ही जे भाषांतर केले त्याबद्दल .
जर त्याच हिंंदी कवितेचे भाषांतर मी असे केले
भाव अत्तराचे, कोसळले पार आज
जमिनीवर पडले ,पहिल्या पावसाचे थेंब
आणि आता ही कविता माझी म्हणून लिहिली (मूळ कवि अज्ञात) तर ते तुम्हाला चालेल का? कारण माझं भाषांतर तुमच्यापेक्षा वेगळं आहे. यात काय चुकलं? तर चुकलं हेच, की या कवितेच्या ओळी, मूळ संकल्पनेमुळे कविता झाल्या आहेत. तुम्ही /मी केलेले भाषांतर नगण्य आहे, म्हणून ती "माझी कविता" होत नाही. ते "माझे भाषांतर" होते.
वर इतरांनी फेसबुकवर केलेली ढापूगिरी चुकीचीच आहे. पण तुम्ही त्याला "माझी कविता" म्हणणं तितकंच चुकीचे आहे.
पण तुम्ही तेच भाषांतर जर असे केले असते.
भाव अत्तराचे, झाले आज मातीमोल
पहिल्या पावसात मिरवे, त्याच मातीची ओल.
तर "कदाचित" ही तुमची कविता झाली असती. कारण भाषांतर करताना "मातीमोल" हा शब्द वापरून , त्याचे दुसर्या ओळीशी संधान बांधून एक नवीन गंमत होते ती मूळ कवितेत नाही.
मै आणि माने गुरुजींशी सहमत.
मै आणि माने गुरुजींशी सहमत.
दोन ओळी चोरल्या तर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन इतका मोठा लेख विथ स्क्रीन शॉट लिहिलात... मूळ कवी शोधण्यासाठी किती परिश्रम घेतलेत ते ऐकायला आवडेल.
अरे!? मी महत्त्वाचा तपशील
अरे!? मी महत्त्वाचा तपशील मिसला.....!!!! मूळ कवी तुम्ही नाहीच? मग का ताप काढताय राव इतका?
मै और माने, आप दोनोंसे सहमत हूं!
अत्तराचे भाव आज पार कोसळले
अत्तराचे भाव आज पार कोसळले
थेंब पावसाचे पहिल्या, जमिनीवर पडले
>>>>
मी हे व्हॉटसपवर वाचलेले. आणि आवडलेलेही ...
शेअर केले नव्हते कारण माझ्या गर्लफ्रेण्डला अत्तराची एलर्जी आहे
ते एक असो,
अत्तराचा उल्लेख वाचून हे मूळ प्रकरण हिंदी वा उर्दू असावे याची कल्पना आलेली.
पण बेसिकली मला आवडतात भाषांतरे. म्हणजे मला हे कन्सेप्ट आवडते. दुसरया भाषेतील साहित्य कोणी मेहनत घेऊन आपल्या भाषेत आणत असेल तर त्याचे मी आभारच मानतो. खास करून ईंग्रजीसारखी परकीय भाषा असेल तर जास्तच. अन्यथा एक ईंग्रजी नॉवेल डिक्शनरी घेऊन अर्थ काढत वाचायला मला वर्ष जाईल. पण तेच कोणी भाषांतर केले तर एका रात्रीत वाचून होईल. शेवटी काय तर आशय पोहोचणे महत्वाचा. जो या सुंदर रचनेतील आशय आपल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचला. अन्यथा मी हिंदी वा उर्दू साहित्य मुद्दामून वाचायला जाण्याची शक्यता तशी कमीच..
एक उत्सुकता म्हणून - मूळ रचना ईथे पोस्ट करता येईल का? जेवढी आठवून करता येईल तेवढी. किंवा आपण् कुठे वाचले याचा काही संदर्भ देता येईल का? त्यानुसार चार पोरे कामाला लाऊन ती कोणाची होती हे शोधता येईल. त्यांचे आणखीही लिखाण वाचता येईल.
@ आंतरजालीय साहित्यचोरी - हा प्रकार तर आता नाश्त्याला कांदेपोहे ईतका कॉमन झालाय. शोध घ्यायला गेले तर फक्त मनस्तापच पदरी पडतो. त्या मनस्तापावर उतारा म्हणून तुम्ही हा लेख लिहिला असेल. पण हा लेख देखील तुम्हाला मनस्ताप देण्याची शक्यता आहेच
माझे स्वत:चे कित्येक टुक्कार लेखन जिथे चोरले गेले आहे तिथे लोकं आपले दर्जेदार लेखन कसे बिनधास्त प्रकाशित करतात हा प्रश्न पडतो मला. मी तर आता माझा फंडा ठरवला आहे -
तेलात तळली, तुपात घोळली,
जिलेबी सोडली, गंगेला मिळाली !
- ऋन्मेष
सर्वांना एक विनंती - उद्या या वरच्या दोन ओळी माझे नाव हटवून कुठे फिरताना दिसल्या तर माझा मनस्ताप वाढवायला मला सांगत येऊ नका
स्वतःची म्हणून कोणी टाकताना
स्वतःची म्हणून कोणी टाकताना दिसत नाहीय... फक्त तुमचं नाव खालून काढलेलं आहे. लोक त्यांच्या पोस्ट ला आलेल्या लाईक्स आणि कंमेंट्स चे अभिनंदन स्वीकारतायत, ओळख ना पाळख असताना अनोळखी लोकांना उचलेगिरी का करताय हे काय कंमेंट टाकतेय तुमि... ओळखीच्या दोन चार लोकांमध्ये थोडा फील गुड घेतायत लोक, घेऊ द्या की, ते काय पुस्तक छापायला जाणार आहेत का तुमच्या 4 ओळी घेऊन।
मूळ हिंदी कवी खरच ग्रेट, काय मस्त आशय आहे.
माझे वैयक्तिक मत -तुम्ही जरा पोलायतली विचारले असते लोकांनी ऐकले असते, तुमचा पहिलाच डायलॉग डेंजर आहे,
काय म्हणावे तुमच्या या उचलेगिरीला...
लोक का रिप्लाय करतील.
शाळेतील मुलांची सहल परत येते.
शाळेतील मुलांची सहल परत येते. एका मुलाची आई वर्गशिक्षिके कडे तक्रार घेऊन जाते,
"माझ्या मुलाचा टर्कीश टॉवेल चोरीला गेला आहे. माझी ही अपेक्षा नव्हती की माझ्या मुलाच्या बरोबर असे चोर शिकत आहेत"
वर्गशिक्षिका अजीजीने सांगतात "अहो चुकून कुणाच्या कडे गेला असेल. कोण कशाला चोंरेल. मुले लहानच आहेत. मी शोधून देते. कसा होता टॉवेल?"
मुलाची आई :- "पांढऱ्या स्वच्छ रंगाचा, फुल साईझ टॉवेल होता. त्यावर - HOTEL HOLIDAY INN, Pune असे लिहीलेलं पण आहे"
(No subject)
जालावर लेखन सोडणे जांभई
जालावर लेखन सोडणे जांभई देण्यासारखे आहे, एकाने दिली की सगळ्यांनाच येते, कोणाकोणाचे तोंड बंद करणार? > +१.
अत्तराचे भाव आज पार कोसळले
थेंब पावसाचे पहिल्या, जमिनीवर पडले > सुरेख!
त्या कवितेला माझी कविता
त्या कवितेला माझी कविता म्हणणे सोडा राव. तुमचा काहीही संबंध नाहीये मुळ कवितेशी. भाषांतराच्या नावाखाली तुम्ही देखिल ती ढापलीच होती. वर शहाजोगपणे मुळ कविचे नाव शोधायचा प्रयत्न न करता लोकांना कसला शहाणपणा शिकवायला जाता. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना झालाय तुमचा.
शाळेतील मुलांची सहल परत येते.
शाळेतील मुलांची सहल परत येते. एका मुलाची आई वर्गशिक्षिके कडे तक्रार घेऊन जाते,
"माझ्या मुलाचा टर्कीश टॉवेल चोरीला गेला आहे. माझी ही अपेक्षा नव्हती की माझ्या मुलाच्या बरोबर असे चोर शिकत आहेत"
वर्गशिक्षिका अजीजीने सांगतात "अहो चुकून कुणाच्या कडे गेला असेल. कोण कशाला चोंरेल. मुले लहानच आहेत. मी शोधून देते. कसा होता टॉवेल?"
मुलाची आई :- "पांढऱ्या स्वच्छ रंगाचा, फुल साईझ टॉवेल होता. त्यावर - HOTEL HOLIDAY INN, Pune असे लिहीलेलं पण आहे"
Submitted by शालिनी_वादघाले on 27 October, 2017 - 13:29
>>>>>>>>>१००
हे सहि आहे
स्वता:च्या भाषान्तराला कविता म्हणून मिरवणे
इथे स्वतःच्या कवितांवर कोणाची
इथे स्वतःच्या कवितांवर कोणाची उपजीविका चालत नाही, ते चोरीच्या कवितेवर कुठे चालणार? >>>>>>>१०० टक्के अचूक
आज सोशल मीडियावर धुमाकूळ
आज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय या ओळीने
अशोक जी हात दाखवून अवलक्षण.
अशोक जी हात दाखवून अवलक्षण. होतं असं कधी कधी. पण माबोवर रोज बघायला मिळतं. पण म्हणून कुणी हात दाखवायचं थांबवत नाही.
वर्जिनल का काय ते टाइप लिखाण
वर्जिनल का काय ते टाइप लिखाण तर हल्ली सफेद गेंडयावानी दुर्मिळ झालंय... काय काय लेखक तर १० तमिल पिक्चरच्या ईस्टोऱ्या परातीत घालून मस्त कालवतात आन देतात छापुन इकडे मरहाटमोळा गिलावा चोपडुन ! त्याना बी लई पब्लिसिटी मिळते राव... तवा ऊगा दोसक्यात राख घालून नका घिवु.. चलायंचं असं कधीमधी ... लोकासनी बी आवडतया आसं तर का आपण नाद करायचा उगाच ?
माने गुरुजींशी सहमत
माने गुरुजींशी सहमत
मायबोलीवर आजकल एक नवीनच जमात
मायबोलीवर आजकल एक नवीनच जमात अवतरलेली दिसतेय. स्वतःच्या नावावर लेखनाचा टिपूस नाही, आणि हे इथून उचललं, ते तिथून उचललं, करत बोंबा मारायच्या. लेखकाने इग्नोर केलं तर या जमातीचा तिळपापड होतो.
कथेचं एका माध्यमातून रूपांतरण करतानासुद्धा डोकं लागतं. शोधा फक्त प्रेरणा आहे की उचलेगिरी. येरा गबाळ्याचे काम नोहे. कायम फक्त एका आय डी चा हुंगत, माग काढत त्याच्या धाग्यावर विष्ठणाऱ्यांचे नक्कीच नाही.
( हा प्रतिसाद जनरल समजावा. जर कुणाला लागलं असेल तर बर्नोल आहेच.)
चांगली हाणलीत चपराक.
चांगली हाणलीत चपराक.
पाऊस तिच्या डोळ्यांच्या देशी
पाऊस तिच्या डोळ्यांच्या देशी पडला अन इंद्रधनू इथले विस्कटले आहे
ही ओळ कुणाची आहे? पुढे आहे का ही कविता की एवढेच एक वाक्य आहे?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/26755 इथे उल्लेख केला आहे
हो, मी दाद यांच्या लेखातच
हो, मी दाद यांच्या लेखातच वाचली ही ओळ. पण ती पुर्ण कविता आहे की दाद सहज लिहुन गेल्या ही ओळ?
अप्रतिम आहे. ओळ आणि लेखही.
त्यांनाच विचारावे लागेल. वैभव
त्यांनाच विचारावे लागेल. वैभव यांच्या हितशत्रू या गझलेतील शेर असा उल्लेख आहे.