शेजाऱ्याचा डामाडुमा -भारताचे सख्खे शेजारी - नेपाळी इतिहासाचा एक धावता आढावा - नेपाळ-२

Submitted by अनिंद्य on 23 October, 2017 - 07:47

या लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:

भाग १ - प्रस्तावना

https://www.maayboli.com/node/64140

भाग २ - नेपाळ १
https://www.maayboli.com/node/64175

शेजाऱ्याचा डामाडुमा -एक होते हिंदुराष्ट्र - नेपाळी इतिहासाचा एक धावता आढावा - भाग २

नेपाळ हे नाव घेऊन एकसंध राष्ट्राचे स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी नेपाळी प्रदेशाने अनेक युद्धे, अनेक राजे आणि राजवटी अनुभवल्या आहेत.

नेपाळचा प्रदेश अगदी रामायण-महाभारत काळापासून भारतीयांना ओळखीचा असावा. मिथिलेच्या राज्याची मानसकन्या जनकनंदिनी सीता ही लग्न करून भारतात आलेली आद्य नेपाळकन्या समजली जाते. मिथिलेच्या जनकराजाला ती सध्याच्या नेपाळातील 'जनकपूर' येथे यज्ञाची जमीन नांगरताना सापडली असा उल्लेख रामायणात आहे. राजा जनक हा महाविद्वान राजा होता आणि त्याच्या राज्यात 'रजक (धोबी) आणि 'कुंजर' (भाजीविक्रेते) सुद्धा अस्खलित संस्कृत भाषेत सर्व व्यवहार करत असत असे उल्लेख प्राचीन नेपाळी साहित्यातही आहेत. आजही नेपाळमध्ये जनकपुरचा उल्लेख 'जनकपूरधाम' असा आदरार्थी केला जातो आणि ते नेपाळचे संस्कृत अध्ययन-अध्यापनाचे केंद्र आहे.

हिमालयाच्या पायथ्याशी 'मतातीर्थ' नावाची राजधानी असलेल्या शिवभक्त 'किरात' किंवा 'किरांत' राज्यांचा उल्लेख महाभारतात आहे. पांडव समर्थक सात्यकी राजाच्या मुखी असलेल्या संवादात 'युद्धापूर्वी अर्जुनाच्या बाजूने लढायला निघालेली ७०० विक्राळ हत्ती आणि अमाप धनुर्धारी वीर असलेली' किरात सेना ऐनवेळी पक्षबदल करून कौरवांच्या बाजूने लढली असे वर्णन आहे. प्राग्ज्योतिष (सध्याचे आसाम) चा राजा भगदत्तच्या 'एक औक्षहणी' सैन्यात बहुसंख्येने असलेल्या काटक किरातांना युद्धात हरवणे महाकठीण असल्याचे संवाद अन्य पांडव समर्थक राजांच्या तोंडी आहेत.

अनन्य शिवभक्त असलेल्या याच किरात राजांपैकी एक राजा (बहुदा यालांबर) हा प्रत्यक्ष देवराज इंद्राला भेटायला सदेह स्वर्गात जाऊन आला असल्याची वर्णने पाली आणि नेपाळी लोकसाहित्यात आहेत. ह्या भेटीची आठवण म्हणून आजही नेपाळमध्ये 'इंद्र जात्रा' नावाचा सण दरवर्षी प्रचंड उत्साहात साजरा केला जातो.

पण ही झाली लोकस्मृती आणि पुराणग्रंथातली माहिती.

इतिहासाला ठाऊक असलेली पहिली नेपाळी राजवट होती गवळी/गोपालक असलेल्या 'गोपाळ' राज्यकर्त्यांची. नंतर 'अहिर' राज्यकर्ते नेपाळवर काबीज झालेत, हे अहिर राजे स्वतःला 'यदुवंशी' आणि भगवान श्रीकृष्णाचे वंशज म्हणवत. ह्या दोन्ही राज्यकर्त्या घराण्यांबद्दल फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.

मग आलेत किरात किंवा किरांत राजे. नेपाळच्या ज्ञात इतिहासात किरातांच्या काळाबद्दल मतांतरे आहेत पण बहुतांश विद्वानांमध्ये किरात राज्यकर्त्यानी नेपाळच्या भूमीवर जवळपास १२०० वर्षे सलग निर्वेध राज्य केले ह्याबद्दल एकमत आहे. मग आले अल्पजीवी 'सोम' राजघराणे आणि तदनंतर चौथ्या शतकात नेपाळच्या सुवर्णकाळाचे शिल्पकार 'लिच्छवी' साम्राज्य स्थापन झाले. नेपाळची समृद्धी वर्धिष्णू झाली ती ह्याच लिच्छवी काळात.

लिच्छवी राजा अंशुवर्माने तिबेट आणि पुढे चीनपर्यंत व्यापारी मार्ग शोधला आणि भरभराटीस आणला. व्यापार हेच राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे ह्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणून 'ट्रेड डिप्लोमसी' वगैरे शब्द आंतरराष्ट्रीय संबंधात प्रचलित नव्हते तेंव्हा त्याने राजकोषातील धन वापरून व्यापाऱ्यांना कर्जे, कर्ज-हमी, सुरक्षा रक्षक, याक आणि घोडे, राजाज्ञा पत्रे अशी सर्व मदत करून स्वतःच्या राज्याची भरभराट घडवून आणली. त्याकाळी जवळपास सर्व राज्यकर्त्यांचे प्रमुख उत्पन्न हे शासकीय करवसुली आणि युद्धात जिकंलेले धन एवढ्याच मार्गाने यायचे. राजाने स्वतः पुढाकार घेऊन नवीन व्यापारासाठी मार्ग शोधणे, व्यापारासाठी सुरक्षित रस्ते-चौक्या बांधणे आणि स्वतःकडे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि ट्रेड फायनान्सर (मराठी प्रतिशब्द सुचवा) वगैरे जबाबदारी घेणे जगाच्या ह्या भागात नवीन होते. म्हणजे स्पेन, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि काही प्रमाणात अरब-रोमन राजवटी ह्या व्यापाऱ्यांना व्यापार मोहिमेसाठी वगैरे सरकारी/ स्वतःचे पैसे कर्जाऊ देत असत पण त्यापुढे फारश्या जात नसत. आपल्या उपखंडात हे प्रमाण फार कमी होते. ह्या अंशुवर्माची कन्या 'भृकुटी' त्याच्या एक पाऊल पुढे होती, अगदी धाडसी आणि व्यापारनिपुण. अश्याच एका व्यापारी दलाची प्रमुख म्हणून तिबेटला गेली आणि तिने तिबेटच्या तत्कालीन सम्राटांशी लग्न केले. तिच्यामुळे तिबेट आणि चीनमध्ये बौद्धमताला मोठा राजाश्रय मिळाला असे मानतात. तिबेटमध्ये तिच्या सन्मानार्थ मंदिरे आणि गोम्पा बांधले आहेत. त्यापैकी काही आजही सुस्थितीत आहेत.

तर पार सातव्या शतकात तुटपुंज्या साधनांनिशी अवाढव्य हिमालय ओलांडून पलीकडच्या लोकांशी राजकीय-व्यापारी संबंध स्थापित करणारा अंशुवर्मा पहिला राज्यकर्ता ठरला आणि भृकुटीचे लग्न ठरले नेपाळ-तिबेट-चीन संबंधांची पहिली पायरी !

पुढे यथावकाश समृद्ध लिच्छवी साम्राज्य अंतर्गत यादवीमुळे खिळखिळे होत असताना उदय झाला तो 'मल्ल' सम्राटांचा. मल्ल राजांची प्रदीर्घ राजवट साधारण इसवी ११०० ते १७७० पर्यंत मानली जाते. जवळपास सर्वच मल्ल राजे युद्धनिपुण वीर, धुरंधर राजकारणी, कलाप्रिय रसिक आणि विद्वान होते. त्यांच्या काळात नेपाळ वैभवाच्या शिखरावर होता. ह्या सात-आठशे वर्षांच्या प्रदीर्घ मल्ल राजवटीला नेपाळचा दुसरा सुवर्णकाळ म्हणता येईल. १२२५ चा महाविनाशकारी भूकंप आणि १३४५ चे बंगालच्या सुलतान शमसुद्दीनने नेपाळवर केलेले आक्रमण ह्या दोन घटना वगळता मल्लकाळ हा बहुतांशी युद्धरहित आणि भरभराटीचा काळ होता. मल्ल राज्यांनी लिच्छवी राज्यांप्रमाणेच व्यापारउदीमाला भरघोस प्रोत्साहन आणि कलागुणांना उदार आश्रय दिल्यामुळे नेपाळचे वैभव वृद्धिंगत झाले आणि नेपाळी कलासंस्कृती बहरली. 'नेवार' शैलीतील अप्रतिम कलाकुसर असलेली अनेकमजली भव्य मंदिरे, राजवाडे आणि स्तूप राज्यभर उभे राहिले. आजही नेपाळमध्ये हे पुरातन वैभव काही प्रमाणात टिकून आहे. (मागच्या वर्षी झालेल्या विनाशकारी भूकंपात यातील अनेक देखण्या वास्तूंची बरीच पडझड झाली आहे)

पण सर्व वैभवशाली साम्राज्यांना असलेला शाप मल्लांना कसा चुकेल? त्यामुळे पुढे मल्ल साम्राज्य अंतर्गत भांडणे, ईर्षा आणि भाऊबंदकीला बळी पडून काठमांडू, भक्तपुर आणि ललितपुर अश्या छोट्या राज्यात विभागले गेले. राज्याच्या सीमांत प्रदेशातील अनेक छोट्या मांडलिक राज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले आणि मल्लांच्या शक्तीचा ऱ्हास सुरु झाला. राजकारणनिपुण अशी ओळख असलेले मल्ल राजे स्वतःच्या छोट्या छोट्या राज्यातील हेवेदावे आणि एकमेकांविरुद्ध युद्धात गुंतून पडले होते त्याचवेळी राजकीय पटलावर उदय होत होता तो नंतर अखंड नेपाळचे जनक गणल्या जाणाया पृथ्वीनारायण शाह ह्यांचा!

थोडे अवांतर:

एक गोष्ट एव्हाना तुमच्या लक्षात आलीच असेल. नेपाळला 'लोकशाही' किंवा 'गणतंत्राचा' फारसा इतिहास नाही. अगदी पूर्वापार एकछत्री साम्राज्य आणि अनिर्बध सत्ता राबवणारी राजेशाहीच कायम ह्या देशात होती. अर्थात इतर अनेक देशांप्रमाणे काही प्रजाहितदक्ष राजे नेपाळलाही लाभलेत, पण अगदी अलीकडे, म्हणजे १९५१ मध्ये भारताच्या सक्रिय समर्थनाने पहिला 'मर्यादित' लोकशाहीचा प्रयोग घडेपर्यंत नेपाळी जनतेला 'लोकशाही' म्हणजे काय हे फारसे माहिती नव्हते. एक सक्षम-स्थिर-टिकावू लोकशाही राज्य स्थापन करण्यात आज नेपाळला पुन्हा पुन्हा येणाऱ्या अनेक अडचणीचे मूळ नेपाळच्या ह्या इतिहासात तर नसेल?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेपाळला स्वातंत्र्यदिन असा नाही कारण ते कधी पारतंत्र्यात नव्हते.
हे रोचक वाटते.
ही लेखमाला अर्धवट राहिलेली दिसते
जरूर पूर्ण करावी

भारी सुरुवात.
सलग वाचायचं म्हणून राखुन ठेवलेली ही लेखमाला.