पक्षी वैभव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2017 - 15:07

(फोटो गुगल क्रोम वरुन दिसतील)

उगवणार्या सूर्याबरोबर पक्ष्यांच्या गोड किलबिलाट आमची पहाट मंगलमय होते. आमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडीमुळे अनेक पशू पक्ष्यांच्या सहवासाचा आम्हाला आनंद घेता येतो.

सकाळी पहिले की पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर बागडत असतात, काही पक्षी कोवळ्या किरणांच्या उबेत फांद्यांवर आरामात पहुडलेले असतात तर काही स्वतःची साफसफाई करत असतात. कुणी दाण्या-पाण्याची सोय करण्यात गुंग असतात तर कुणी मस्ती करण्यात दंग असतात. पक्षांचे निरीक्षण करताना बर्यााच गमती जमती अनुभवता येतात.

आमच्या बागेतील जाम, चिकू, आंबा, पेरू, तुती अशा फळझाडांवर पक्षाच राज्य असत. पाऊण भाग त्यांचा तर पाव भाग आमचा असतो. सकाळी खारूताईंचा ग्रुप आणि पोपटांचा थवा जमांवर पोपटपंची करत फळांची मेजवानी लुटत असतात. प्राजक्ताचा सडा पडावा तसा जामांचा सडा पडतो ह्या फौजेमुळे. रात्रीही पाकोळ्या, वटवाघळांची झुंड येऊन जाते. सातभाई तर भाई नावाला जागत सात-आठ जणांची गँग आंब्याच्या झाडावर मोहोर, कैरीच्या दिवसांत धाड टाकतात. पक्षांना त्यांचं अन्न निवारा मिळतो ह्याच आम्हाला समाधान मिळत. घरातील कोणीही फळांवर तुटून पडलेल्या पक्षांना हाश हुश करून पिटाळून लावत नाहीत. कारण निसर्गाने त्यांच्यासाठी ठेवलेला तो वाटा आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

पोपट
१)

२)

खाटीक
३)

झाडांना पाणी घालण्यासाठी आम्ही पाइप लावतो. कधी एखादा लिक होऊन त्यातून फवारा उडत असेल तर ह्या कारंज्यात बुलबुल, दयाळ पक्षी शॉवर बाथ घेतात. कावळे आपली तहान भागवतात. ही गंमत पाहताना गारेगार वाटत. कावळेही नळावर बसून नळातून थिबकणारे थेंब प्राशन करतात. आम्ही उन्हाळ्यात पक्षांसाठी बागेत आणि टेरेसवरही पाणी ठेवतो पसरट भांड्यांमध्ये जेणेकरून पक्षी तहानले राहू नयेत. ह्या कामात पुतण्या आणि माझ्या मुली अग्रेसर असतात.

४)

मी हौशी फोटोग्राफर आहे. ह्या पक्षांनी माझ्या फोटोग्राफीच्या छंदाला अधिक प्रोत्साहन दिले आहे. साळूंखी, दयाळ, सूर्यपक्षी, कावळे, बुलबुल, भारद्वाज, खंड्या हे नियमित दिसणारे पक्षी. बाकी पक्षी अधून मधून हजेरी लावतात. वारंवार ह्या पक्षांच निरीक्षण केल्याने मला ह्या सगळ्याच पक्षांचा लळा लागला आहे. ह्या पक्षांनाही माझी इतकी सवय झाली आहे की ते मला पोज देतात अस वाटत कारण बरेचदा त्यांची नजरही माझ्या म्हणजे कॅमेर्यासच्या डोळ्यात असते. फोटो काढताना त्यांचे हावभावही ओळखीचे वाटतात. कधी त्यांच्या चेहर्यावर ही नक्की काय करतेय हे कुतूहल असत कधी तुला काय करायचे ते कर आम्ही आमचं काम करतो असा बेफिकीरपणा तर सूर्यपक्षी, शिंपी, नाचरा असे काही पक्षी मला अजिबात वेळ नाही च्या तोर्यायत ह्या फांदीवरून त्या फांदीवर तुरु तुरू उडतच असतात.

शिंपी
५)

सूर्यपक्षी
६)

दयाळ
७)

८)

होला

९)

शिक्रा
१०)

११)

पक्षांच्या वेगवेगळ्या बदलणार्या आवाजावरून त्यांचे मूड टिपता येतात. भारद्वाज सकाळी अशा आवाजात बोलतात की जणू शंखध्वनी फुंकला जातोय असा त्यांचा आवाज घुमतो. दयाळ कोणाच्या अध्यात ना मध्यात असे शांतपणे गोड गळ्याने बागडत असतात. कोकिळ पक्षांची कुहु कुहु कधी शांतपणे तान लावून असते तर कधी अगदी घाई गडबडीत असल्यासारखी. खंड्याची ललकारी तो कुठे उडतोय हे लगेच सुचीत करते. बुलबलची कुजबुज पण गोड असते. शिंपी पक्षाची च्युईट च्युईट विशिष्ट लयीत लक्ष वेधत असते. तांबट आपल्या तांबट कामाच्या चुबुक चुबुक आवाजा सोबत लपंडाव खेळत असतो. हा कुठे बसलेला आहे ते दिसणं फार मुष्किल. आवाज स्पष्ट खणखणीत असतो पण पानांचाच हिरवा रंग आणि छोटा आकार त्यात अतिशय चपळ असल्याने हा एका जागी स्थिर नसतो.

आमच्या आंब्याच्या एका झाडावरील ढोलींमध्ये साळुंख्यांची वस्ती आहे. ह्या समूहातच असतात त्यामुळे ह्यांचे एक मेकांशी न पटून वादावादी होत असते. ह्यांची आवाज चढवून कचकच भांडणे चालू असतात. भांडणाची कारणे बर्या चदा ढोलीतील एखादा कपड्याचा तुकडा, गवत अशीच काहीतरी वाटतात. बरं नुसत्या भांडून ह्या शांत बसत नाहीत तर एक मेकांना जमिनीवर लोळवत कुस्ती खेळतात. साळूंख्या इतर पक्षांपेक्षा जास्त धीट असतात हे जेव्हा त्यांच्यावर संकट येत तेव्हा प्रत्यक्षात दिसत. पक्षांप्रमाणेच सापांच्याही काही जाती आमच्याकडे फिरत असतात. त्यातील धामण ही सरळ झाडावर चढून ह्या पक्षांच्या ढोलीत, घरट्यांमध्ये घुसून त्यातली अंडी, पिले फस्त करण्याच्या हेतूने झाडावर चढतात. धामण किंवा कोणताही साप दिसला की कावळे, पोपट, खारी आणि साळुंख्या यांचा एकच आरडाओरडा चालू होतो. त्यात साळुंख्यांचा अगदी गळ्यातून चिरकलेला मोठा आवाज येतो. त्या अशा ओरडल्या की साप आला हे आम्हाला समजते. इतर पक्षी फक्त सापाच्या आसपास ओरडत असतात पण साळुंख्या मात्र तडक सापांवर वार करतात. त्यांच्यातली माता धाडसी वृत्ती घेऊन अंडी पिलांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा बचाव करत सापाला टोचतात. सापही साळुंख्यांपासून लपण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी तो टोचण्यामुळे जखमीही होतो. कधी साप जिंकतो तर कधी साळुंख्या हे थरार नाट्य बरेचदा चालू असत. एकदा सापाने साळुंखीला आख्खी गिळताना आम्ही पाहील आणि आम्ही दोन दिवस झोपू शकलो नाही इतका अस्वस्थपणा आला होता.

साळुंखी
१२)

१३)

१४)

बुलबुलांचे आणि आमचे काही वर्षापासून घट्ट नाते झाले आहे. आमच्या घरात सुरक्षित वाटत, ह्या माणसांकडून काही आपल्याला धोका नाही म्हणून आमच्या घरातील झुंबरावर गेले ७-८ वर्षे नियमित बुलबुल पक्षी घरटे बांधून बाळंतपणे करतात. जणू माहेरीच येतात बाळंतपणाला. त्यांची घरटे विणण्याची धडपण, कलाकुसर, एकमेकांची साथ, बाळ जन्मल्यावरची त्यांची अती दक्षतेतील लगबग थक्क करणारी असते. आमच्या घरात ते बुलबुल दांपत्य नवीन जीव जन्माला देऊन उडायला शिकतात, खायला शिकतात ह्याचा आनंद आम्हा घरातल्या सगळ्यांनाच होतो.

१५)

१६)
bulbul3.jpg

१७)
Bulbul11.JPG

काळ्या डोक्याचे बुलबुलही बागडताना दिसतात.
१८)

पावसाळ्यात आमच्या आवारात शेतातील पाणी जाण्यासाठी एक ओढा आहे. ह्या ओढ्यात डिसेंबर पर्यंत काही प्रमाणात पाणी असते. त्यामुळे पाणकोंबड्या आमच्या घराच्या मागील बाजूच्या झाडांवर गुण्या गोविंद्याने राहतात. ह्या पाणकोंबड्या सूर्य उगवताच आमच्या घराभोवती गोल प्रदक्षिणा घालत आपले भक्ष्य शोधत फिरतात. ह्या फिरताना अशा तोर्याळत फिरतात की जणूकाही कॅटवॉकच करत आहेत. पण ह्यांना जेव्हा पिले होतात तेव्हा त्यांच्यातील मातृत्वामुळे त्या पिलांसोबत त्यांचे रक्षण करत सावधगिरीने चालतात. ह्यांची पिले म्हणजे जणू काळा कापसाचा गोळाच. ह्या कधी लांब गेलेल्या दिसल्या नाहीत. त्यांच्या तेवढ्या ठरलेल्या परिसरातच ह्या फिरतात.

१९)

२०)

सकाळी खंड्या नेहमी करंज्याच्या झाडाच्या एका फांदीवर बसलेला असतो. रोज तिच फांदी आणि तिच जागा ह्याच मला आश्चर्य वाटायचं. नंतर अंदाज लावला तो त्यावेळी येणार ऊन अंगावर घेण्यासाठी येत असावा. ह्यावेळी आपले भक्ष्यही तो शोधत असतो. जेव्हा ओढ्यात पाणी असते तेव्हा ओढ्यालगतच्या झाडावर हा डोळ्याचे गळ लावूनच जणू बसलेला असतो. पाण्यातले मासे, किडे ह्याचे खाद्य ठरलेले आहेच. ओढ्यातले पाणी संपले तरी खंड्याची रोज फेरी असतेच झाडावर. आमच्या घराभोवतालच्या इतर झाडांवरही हा मुक्त विहार करत असतो.

२१)

२२)

२३)

ह्या झाडावरून त्या झाडावर बागडून लक्ष वेधून घेणारा हळद्या हा मात्र आमच्यासाठी सेलिब्रेटी असतो. हा मधूनच कधीतरी दिसतो. पण आला की आपलाच वाटतो. पिवळा धमक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हळद्या जणू पक्षांतील हीरोच. पहिला मी फोटो काढायचे तेव्हा हा घाबरून उडायचा. मग त्याला हळू हळू सवय झाली आणि आता तो जणू नटून थटून येऊनच फोटो काढून देत असतो.

२४)

२५)

२६)

कोकीळ/कोकिळा आणि भारद्वाज देखील आता जवळ गेले तरी उडून जात नाहीत. माणसाळल्याप्रमाणेच राहतात. कोकीळ तर ४-५ च्या थव्याने एका झाडावर असतात. कोकिळ गुंजन सुरू झाले की परिसर मंत्र मुग्ध होतो. कोकीळ-कोकिळा यांची विणीच्या हंगामातली अंडी कावळ्याच्या घरात घालण्यासाठीचे युक्तिवादही मला झाडावर पाहायला मिळाले आहेत.

कोकीळा
२७)

२८)

कोकीळ
२९)

३०)

भारद्वाज
३१)

३२)

सकाळी किचनमध्ये असते तेव्हा किचनच्या खिडकीसमोर असलेल्या पेरू-चिकूच्या झाडावर हमखास स्वर्गीय नर्तक काही दिवसांपूर्वी यायचा. माझ्या स्वयंपाक करण्याची गडबड तर ह्याची भक्ष्य पकडण्याची. हा एकटाच दिसल्याने खूप अप्रूप वाटायचं. हाही पक्षी दिसायला सुंदर. रंग चॉकलेटी आणि डोकं काळ, डोळे चमकदार, लांब शेपूट आणि डोक्यावर तुरा असा रुबाबशीर पक्षी. मध्येच गॅस बंद करून ह्याचे फोटो काढण्याची माझी लगबग चालू व्हायची. सध्या तो दिसत नाही. पण काही दिवस फिरतीला जाऊन परत आपल्या आवडत्या ठिकाणी येतात हे पक्षी.

३३)

३४)

धनेश जेव्हा प्रथम दिसला तेव्हा एवढा मोठा पक्षी आपल्याकडे येतो ह्याच खूप कुतूहल वाटलेलं. आम्ही लक्ष ठेवायचो. त्याचा किंकाळल्यासारखा मोठा आवाज त्याची दिशा लगेच दाखवतो. आमच्या आंब्याचे जे ढोलीचे झाड आहे त्यावर हे धनेश आले की साळुंखी आणि पिंगळ्यांची आरडा ओरड चालू होते. आमच्या कबिल्यात यायचे नाही असे हे पक्षी धनेशला बजावत असतात. हळू हळू धनेशची जोडी दिसू लागली. आता ४-५ धनेश येतात आणि किलकिलत करत फिरत असतात.

३५)

३६)

ढोलीत वास्तव्य असणारे पिंगळे सूर्योदयालाच झाडांच्या फांद्यांवर येतात आणि त्यांच्या पकाक पकाक आवाजात कुजबूज चालू करतात. आई-बाबा आणि पिले असे कुटुंब फांद्यांवर एकमेकांवरील प्रेम आणि लाडिक रागाचे चाळे करण्यात दंग असतात. बाळांना रागे भरणं, पंखात घेणं, बाळांनी लाडात येणं हे वात्सल्य प्रेम पाहताना मन पाझरत. हे फोटो काढताना अनेक हावभाव व्यक्त करतात हे त्यांच्या फोटोवरून स्पष्ट दिसत. आणि कितीही वेळ फोटो काढले तरी ते न कंटाळता तितक्याच नवलाईने माझ्याकडे पाहत असतात.

३७)

३८)

३९)

पाऊस चालू झाला की काही पाहुणे पक्षीही आमच्या परिसरात पाहुणचाराला येतात. जोरदार सरींनी शेते भरली की आमच्या कुंपणाच्या बाहेर एक पडीक शेत आहे त्यात पाणी साचत व उधाण आले की ह्यात मासेही येतात. ह्या शेतात हेरॉन (बगळे) जातीचे काही पक्षी माशांवर ताव मारायला येतात. त्यात एक चित्रबलाक येतो. पांढरे-सोनेरी बगळे व नाइट हेरॉन येतात. नाइट हेरॉनने तर गेले दोन वर्षे आपली वस्तीच केली आहे या शेतात एका करंज्याच्या मोठ्या झाडावर. दोन तीन जोडपी इथे राहतात आता कायमची.

४०)

४१)

४२)

साधारण ऑगस्ट मध्ये आमच्या कुंपणा शेजारच्या आवारातील मोकळ्या जागेत गवत वाढले की त्यावर कीटक येतात. ह्या कीटकांचा आस्वाद घेण्यासाठी वेडे राघू आणि ठिपकेवाल्या मुनीया ह्या सुंदर पक्षांचे आगमन होते. वेडे राघू घिरट्या घालून अचूक भक्ष्य पकडतात ती कसब वाखाणण्याजोगी असते. होलाही ह्याच दिवसांत दिसतात आमच्याकडे. गवतावरील कीटक खाण्यार्याग पक्षांचे विजेच्या तारेवर पावसाळी स्नेहसंमेलन भरते. तुम्हाला खरे नाही वाटणार पण ह्या संमेलनात वेडे राघू, मुनिया, खाटीक, साळुंखी, बुलबुल, खंड्या हे चक्क एकत्र एका तारेवर हितगुज करत असतात.

४३)

४४)

४५)

हे संमेलन पाहताना जे समाधान वाटत ते शब्दात सांगणं कठिण आहे. पक्षी एकात्मता पाहून मनात पक्षांबद्दलचा आदर दुणावतो. प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या लकबींमधून काही बोध घ्यावा असे ह्यांचे वर्तन मनाला भिडते.

हा लेख १७ जून २०१७ रोजी लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशीत झालेला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो आणि वर्णन भारी हा जागुताई

घरातील कोणीही फळांवर तुटून पडलेल्या पक्षांना हाश हुश करून पिटाळून लावत नाहीत. कारण निसर्गाने त्यांच्यासाठी ठेवलेला तो वाटा आहे हे सगळ्यांना माहीत आहे.>>>>+++१११

खुपच सुंदर प्राजक्ता...
एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असलेला परीसर खुपच सुंदर व निसर्गाने परिपुर्ण असावा..
हळद्याचे फोटो अप्रतिम .. (हळद्या खुपच लाजरा पक्षी आहे व नेहमी पानांच्या आड असतो..) मला आजुन हि हळद्याचे एवढे छान (clear photos) नाही काढता आलेले..

भारीच
फोटो आणि वर्णन दोन्ही भारी

जागू , घराजवळ एवढे पक्शी आहेत ? Happy भेट द्यावी म्हणतोय एकदा...
फोटोबद्दल सांगायचे तर...Some are good but Seems like you dont have proper gear to shoot birds.

फोटोची साइझही थोडी कमी हवी आहे त्यामुळे ते नीट दिसतील. पण मला जमतच नाहीये कस कराव काहीच कळत नाही.

मला कुठलेच फोटो दिसत नाहे>> google chrome वर try करून बघा त्यांनी तसं वर म्हटलंय

वर्णन खुपच छान पण फोटो दिसत नाहीत. ते दिसले तर फार आवडला. तुमच्या प्रमाणेच आमच्याही घराच्या आजूबाजूला मोठी झाड आहेत. वेग वेगळे पक्षी तिथ रोज येतात. मी अनेकदा फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण मी खिडकीत गेले की ते ऊडून जातात. हॉलच्या खिडकीजवळ राम फळाच झाड आहे. फळं लागल्यावर नव नविन पक्षी बघायला मिळतात. आम्ही एकही रामफळ खात नाही. जर दुसर कोणी तोडायचा प्रयत्न केला तर सासरेबुआ त्यांना ओरडतात.
सकाळी उठल्यावर पक्ष्यांच्या आवाजाने मस्त वाटत.
असं म्हणतात की सकाळी उठल्यावर देवाच नाव घ्याव आणि आरशात आपला चेहरा बघावा. पण आम्ही बेडवरून उठून पहिले खिडकीचा पडदा बाजूला करून बाहेरच्या धुंद वातारणाचा आनंद डोळ्यात साठवऊन घेतो.

निर्झरा तुमचा प्रतिसाद अगदी नावाप्रमाणे आहे. Happy

शोभा, शशांकदा, वावे, धनवन्ती, अंजली धन्यवाद.

झंपी फोटो क्रोम मधून दिसतील.

जागू, मस्त लेख!!
फोटो तर अप्रतीम!!
आमच्या घराच्या खिड्की समोर एक बुचाचे झाड आहे.
सध्या त्याला बहर आला आहे. त्यावर इतके पक्षी येतात.
फोटो काढ्ण्याचा प्रयत्न करीन या वीक एन्ड ला.
तुमचा लेख वाचुन स्फुर्ती मिळते.

अमृता बुचाचे झाड मला खुप प्रिय आहे त्याच्या फुलांमुळे. ती फुले गोळा करण्यासाठी मी भल्या पहाटे उठून दिवा घेऊन जायचे. कारण नंतर गावतल्या मुली उजेडल्यावर येऊन गोळा करून घेऊन जायच्या. अजुनही तो सुगंध वा फोटो जरी पाहीला तर मला त्या स्मृतींनी रोमांचीत व्हायला होत.

नक्की फोटो काढा.

मस्तच..
यायला पाहिजे तुमच्याकडे एकदा पक्षिनिरिक्षणासाठी Wink

Pages