कासव म्हणताच सर्वप्रथम आठवते ती अगदी लहानपणी ऐकलेली ससा कासवाची गोष्ट आणि त्याचे तात्पर्य. शर्यतीकरता आवश्यक असा वेग नसला तरी केवळ दृढनिश्चय आणि चिकाटी ह्यांच्या जोरावर सातत्याने केलेली वाटचाल कासवाला जिंकवून देते. एकंदरीत वाटचाल ही कासवाच्या पाचवीला खरेतर पहिलीलाच पुजलेली. संपूर्ण आयुष्य समुद्रात घालवणारी कासवेदेखील त्यांच्या जन्माच्या वेळेस, अंड्यातून बाहेर येताना मात्र जमिनीवर असतात. पण अंड्यातून बाहेर येताक्षणीच निव्वळ अंत:स्फुर्तीने त्यांची वाटचाल ताबडतोब जमिनीकडून पाण्याकडे चालू होते. त्यांचे पालनपोषण करायला अथवा अन्य कसल्याही प्रकारचे मार्गदर्शन करायला बरोबर ना आई असते ना वडील. धोके तर हजार पण तरीही त्यांचे जीवन सुरक्षित राहते ते त्यांच्यापाशी असलेल्या कवचामुळे. कुठेही कसल्याही प्रकारचा धोका संभवल्यास ते स्वत:चे शरीर आक्रसून घेत कवचात जणू गुप्त होऊन होते.
पण मानवाचे मात्र तसे नाही. त्याला जन्माला आल्यापासून आईवडील, मित्रमंडळी, आप्तेष्ट असतात, लागतात. ‘No man is an island’ ह्या उक्तीप्रमाणे त्याला आयुष्यभर कोणाची ना कोणाची सोबत लागताच असते. एका प्रकारे परावलंबीच असतो म्हणा ना आणि मग अशी मनाजोगती सोबत संगत न मिळाल्याने तो सैरभैर होउ शकतो. आपणही कधी ना कधी ‘या जगात माझं कोणी कोणी नाही’ असं वाटल्याचे निदान काही क्षण तरी अनुभवले असतीलच. अशा चुकार क्षणांना शरण जावून आपण जर आपल्याच कोषा-कवचात गेलो तर ते आपले संरक्षण तर करत नाहीच उलट आपण निराशेच्या गर्तेत ढकलले जातो.
कासव ह्या चित्रपटाची कथा आहे अशाच एका निश उर्फ मानवची (आलोक राजवाडे) आणि जानकी (इरावती हर्षे) यदु (किशोर कदम) अशा इतरही माणसांची आणि त्यांनी दाखवलेल्या दुर्मिळ अशा माणुसकीची.
हा संपूर्ण चित्रपट आपल्याला अनेक प्रकारे, अनेक अंगांनी भिडतो.
रचना किंवा ज्याला आपण डिझाईन असे म्हणतो त्याबाबत असे म्हटले जाते की ज्या विशिष्ट उद्देशाकरता ती रचना केली जाते तो हेतू साध्य करताना ती रचना उगाचच उठून दिसायला नको. ती रचना त्या गोष्टीसोबत पूर्णतः एकरूप झालेली असावी.
चित्रपटाच्या बाबतीत खरेतर दिग्दर्शन हा शब्द वापरतात, पण मी म्हणेन हा चित्रपट खूप सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे. ह्या चित्रपटाच्या बाबतीत, त्यात काम करणारे अभिनेते, त्यांना केलेला मेकप, त्यानी घातलेले कपडे, त्यांच्या तोंडी असलेले संवाद, गाणी, कॅमेरावर्क, पार्श्वसंगीत, कुठेही हे जाणवून देत नाहीत की पडद्यावर ‘जे’ चालू आहे तो सगळा अनेक अडचणींवर मात करून, चौकट-उजेड-आवाज-रंग अशा अनेक तांत्रिक बाबी सांभाळत, प्रचंड मेहेनतीने, खटाटोप घेऊन रचलेला एक ‘बनाव’ आहे. हा चित्रपट कुठेही जरासुद्धा खोटा वाटत नाही आणि त्यामुळे तो भिडतो. (इतका की चित्रपट संपल्यावर मी आलोकला ‘खूप छान काम केले आहेस असे सांगून झाल्यावर ‘सगळे काही ठीक होईल’ असे ही सांगणार होतो. ) चित्रपटाच्या झलकीमधे जरासे, आगाऊ सल्ले देणारे वाटलेले बालकलाकाराचे पात्र, नेहेमीसारखे उपदेशाचे अतिरेकी डोस पाजणारे निघेल ही माझी भीती देखील खोटी ठरली. रस्त्यावरच्या अनोळखी मुलाला उचलून आपल्या घरात आणणे हे सकृतदर्शनी, सध्याच्या काळात अविश्वसनीय वाटणारे कृत्य करणारे जानकीचे पात्र ज्या प्रकारे खुलवले आहे ते पाहून ‘कोण असं करेल का’ हे ‘तीच असे करू शकेल’ पर्यंत पोहोचते.
मी स्वत: प्रचंड आणि निरंतर आशावादी मनुष्य आहे. मला जगायला आवडतं. एकंदरीतच मनाला आलेली मरगळ झटकून टाकायला बऱ्यापैकी चांगले जमते मला. त्यामुळे असेल कदाचित पण ‘नैराश्य’ जे माणसाला आत्महत्या करायच्या थराला नेवू शकेल असा ‘रोग’ म्हणून माझ्याकरता संपूर्णतः अपरिचित असाच म्हणावा लागेल. पण म्हणून हे असे आजार म्हणजे सगळी भरल्यापोटची, ज्याला ‘सुख’ दुखतय म्हणतात अशी फर्स्ट वर्ल्ड मधल्या लोकांची समस्या आहे, किंवा म्हणून कमी महत्वाची आहे किंवा नैराश्य हा रोग आपल्यापर्यंत पोचणारच नाही असे मानणे मात्र शहामृगी बाणा ठरेल याची जाणीव आहे मला.
सोशल मिडियात हजारो मित्र असण्याच्या ह्या काळात आणि संपर्क क्रांतीमुळे जगाच्या पाठीवर असलेल्या कोणाही बरोबर संपर्क साधू शकणाऱ्या युगात आज माणसाला समोरासमोर बसून एकमेकां चे /शी ऐकाय-बोलायला वेळ नसतो ही सत्य परिस्थिती आहे. कामावरच्या ताण तणावामुळे घटकाभर करमणूक हवी म्हणून टीव्ही समोर बसणाऱ्या लोकांना हसणारे, हिंदी मराठी सास्वासुनांच्या सिरीयली बघणाऱ्या आपल्या पालकांना रिमोटचे गुलाम म्हणणारे देखील आपल्या हातातल्या स्मार्ट फोन मधल्या आभासी दुनियेवर इतकी अवलंबून राहणारे झाले आहेत की ती देखील एक प्रकारची गुलामीच. नवीन पद्धतीच्या कुटुंब व्यवस्थेमुळे आधीच घरात माणसे कमी असतात. भावंडेही कमी किंवा नसतातच. त्यात भरीस भर म्हणून टीव्ही किंवा स्मार्ट फोन मध्ये डोके खुपसून बसणारे आपण. ह्याचा एक मोठाच तोटा म्हणजे प्रत्यक्ष संवाद नीटपणे साधता न येणे. बहुदा ह्याची परिणीती म्हणून आपल्या आसपासची अनेक माणसे एककल्लीपणाकडे किंवा एकटेपणाकडे झुकत चाललेली दिसू लागली आहेत. कित्येक वेळा आपल्याला घरातल्या लोकांचे किंवा घरातल्या लोकांना आपले म्हणणे ऐकून घ्यायला पुरेसा वेळ नसतो, जागेपणीचे बरेच तास आपण घराबाहेर रक्ताच्या नात्याच्या नसलेल्या लोकांमध्ये घालवतो हे ही सत्यच आहे. त्यामुळे आता कुटुंबाच्या व्याख्याच बदलून टाकल्या पाहिजेत हे चित्रपटातले वाक्य अगदी मनास भिडते.
ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला माझे कुटुंब विस्तारित करायची प्रेरणा अधिक प्रबळ झाली आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात देखील दृढनिश्चय, चिकाटी आणि सातत्य यामुळे आपल्याला शर्यती पूर्ण करता येतात हे ही परत एकदा नव्याने पटले आहे.
गोष्टीतल्या सारखे पहिले जरी नाही आलो तरी शर्यत ‘अर्धवट’ न सोडता पूर्ण करता येण म्हणजे ही जिंकल्यासारखेच नाही का.
मायबोलीवर या अगोदरच सई केसकर,
मायबोलीवर या अगोदरच सई केसकर, सई., सिम्बा, अगो, भारती ताई अशा एका पेक्षा एक हस्तींनी लिहिल्या नंतर मी लिहावे तरी का आणि काय असे वाटत होते.
पण एखादी सुंदर कलाकृती पाहिल्यावर त्याबद्दल काहीच न बोलता थांबता येतच नाही, तसेच पुण्यातील प्रथमखेळाच्या वेळेस (बहुतेक) आलोक म्हणाला त्याप्रमाणे हा चित्रपट ठराविक प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून बनवलेला नाही, हा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे भावेल असा आहे.
इतक्या जणांना ह्यावर लिहावेसे वाटणे हे याचेच निदर्शक आहे.
तर मला हा चित्रपट का भावला हे सांगण्याचा हा प्रयत्न, जरूर पहावा अशी जोरदार शिफारस
मस्त लिहील आहेस.
मस्त लिहील आहेस.
प्रत्येकाला दिसलेला कासव एकाचवेळी काही समान मुद्दे असणारा आणि तरीही किती वेगळा आहे हे प्रत्येकाने लिहीलेल्या परिक्षणावरून कळतय .
खूपच वेगळा दृष्टीकोन.....
खूपच वेगळा दृष्टीकोन..... मस्त.... अावडला...
हा कासव सुद्धा आवडला... दोन
हा कासव सुद्धा आवडला... दोन झाले.. जमल्यास आणखी एखादा वाचतो.. मला स्टोरी हवी आहे, अजून कुठे सापडत नाहीये
वॉव, फार सुरेख लिहिलंय.
वॉव, फार सुरेख लिहिलंय.
आताच कासव बघून आले. परीक्षणे
आताच कासव बघून आले. परीक्षणे नसती तरीही बघायचा होताच. सगळ्यांनी आधीच खूप सुंदर लिहीलंय त्यामुळे नव्या धाग्याचा मोह टाळून इथेच लिहितेय. खूप खूप टचिंग चित्रपट आहे माझ्यासाठी. Overall treatment च खूप सुंदर दिलीय. मेंटल हेल्थवरचा एवढा deep thought असूनही अजिबात नाट्यमय केला नाही हे खूपच आवडलं. थिएटर अर्ध्याहून जास्त भरलं होतं, हेही नसे थोडके. शेवटी सगळे प्रेक्षक निःशब्द होऊन श्रेयानामावली पूर्ण संपून गेल्यावरच बाहेर पडले यातच चित्रपटाचं यश असावं.
सुरुवातीला मायबोलीचा लोगो पाहून छान वाटलं
धन्यवाद कविन, पुरंदरे, ऋन्मेष
धन्यवाद कविन, पुरंदरे, ऋन्मेष, अन्जू आणि मॅगी
ऋन्मेष - कथा कशाला कळायला हवी हे कळेल का?
मॅगी - मी देखिल आज दुपारी मित्रांसोबत परत पाहिला. सातारा रस्त्यावरच्या सिटी प्राईड मधे, तू कुठे पाहिलास?
मी ११.४५ चा पाहिला,
मी ११.४५ चा पाहिला, सिटीप्राईड कोथरूड
ओह ओके, अर्ध्याहून जास्त
ओह ओके, अर्ध्याहून जास्त भरलेलं थिएटर शेवट पर्यंत बसलेले प्रेक्षक हे वर्णन तंतोतंत जुळत होतं म्हणून विचारलं
ऋन्मेष - कथा कशाला कळायला हवी
ऋन्मेष - कथा कशाला कळायला हवी हे कळेल का?
>>>>>>
कथा कळल्याशिवाय पिक्चरला जाणे म्हणजे फोटो न बघता लग्नाला होकार देण्यासारखे आहे
लग्न नको करू , चित्रपटांशी
लग्न नको करू , चित्रपटांशी नटांशी नसतेच करायचे,
ONS असतो तो
कासव चित्रपटगृहात जाऊन जरूर पहा, तुझा त्यावरचा लेख वाचायला आवडेल मला.
काल सहकुटुंब पाहिला!
काल सहकुटुंब पाहिला!
अतिशय सुंदर आणि ह्यद्य चित्रपट! भावला!
'न्युटन' पेक्षा ह्याची निर्मितिमुल्ये अधिक असल्याचे पदोपदी जाणवते व मग प्रश्न पडतो...हाही चित्रपट 'ऑस्करसाठी' का नाही?
रिकाम्या खुर्च्यांचे पहिले जाणवले पण ....
कासवीण किनर्याला येउन अंडी घालून चालली जाते....आणि कितिही संकटे आली तरी ह्या कासवांची वंशावळ (अतिभव्य डायनोसोरही जिथे टिकू शकले नाही तिथे) समर्थपणे टिकून राहते...ह्यातच एक वेगळा संदेश मिळाला....!
सर्व परिचितांन्ना बघण्यास सांगितले....
'न्युटन' पेक्षा ह्याची
'न्युटन' पेक्षा ह्याची निर्मितिमुल्ये अधिक असल्याचे पदोपदी जाणवते व मग प्रश्न पडतो...हाही चित्रपट 'ऑस्करसाठी' का नाही? + १
पण म्हणून हे असे आजार म्हणजे
पण म्हणून हे असे आजार म्हणजे सगळी भरल्यापोटची, ज्याला ‘सुख’ दुखतय म्हणतात अशी फर्स्ट वर्ल्ड मधल्या लोकांची समस्या आहे, किंवा म्हणून कमी महत्वाची आहे किंवा नैराश्य हा रोग आपल्यापर्यंत पोचणारच नाही असे मानणे मात्र शहामृगी बाणा ठरेल याची जाणीव आहे मला.>>> अगदी खर आहे. काही लोक यावर म्हणतात होईल तेव्हा बघू आत्त्ता मस्तीत जगू!
हर्पेन अगदी सुरेख लिहिलय!
हर्षद, जबरदस्त लिहिलंयस! फारच
हर्षद, जबरदस्त लिहिलंयस! फारच आवडलंय. सिनेमाइतकंच.
सोशल मिडियाच्या परिच्छेदातलं भाष्य अगदी पटण्यासारखं आहे.