भाग चौथा – खारदुंग गाव ते लेह , ७२ किमी मार्गे खारदुंग ला
तारीख ८ सप्टेंबर २०१७
सकाळी घरीच न्याहारी करून निघायचे ठरले होते त्याप्रमाणे जुनैद गेस्ट हाऊस मधेच मस्तपैकी भरपेट खाल्ले. रिमो एक्स्पिडिशन पाशी साडेनऊ वाजता पोचलो तर आम्हाला मिळालेली बस सगळ्यात शेवटची बस होती. आयोजकांनी जसजसे लोक आले, बस भरली तसतसे बस सोडत गेले. त्यामुळे आम्हाला जरा वाट पाहायला लागली आणि शेवटचा धावक आल्यावर आम्ही निघालो. मग वाटेत एकदा कोसळलेली दरड काढण्याचे काम चालू असताना सगळ्या बसेस एकामागोमाग थांबल्या आणि नंतर एकत्रच चालू पडल्या. 'खारदुंग ला' ला पोहोचेपर्यंत आमच्या बसने आधी निघालेल्या बसेसना गाठले होते. खारदुंग ‘ला’ पाशी पोहोचलो तेव्हाही बर्फ पडत होता. आता बर्फाचे अप्रूप राहिले नव्हते उलट उद्या ह्याच वेळेस बर्फ पडत असेल आणि अशी थंड गार वारे सुटलेले हवामान असेल तर किती जड जाईल ह्याचेच विचार मनात येत होते त्या विचारांना झटकून त्या खारदुंग ला जगातील सर्वात उंचावरचा रस्ता असे लिहिलेल्या मैलाच्या दगडासोबत फोटो सेशन पार पडले.
नंतरचा खारदुंग गावात पोहोचेपर्यंतचा प्रवास करत असताना इतर धावकांचे अनेक अनुभव ऐकत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. सगळे एक सो एक धुरंधर होते त्यानी अनेक अल्ट्रा मेरेथोन स्पर्धा या आधी केल्या होत्या. उद्याची स्ट्रेटेजी काय ह्यावर बहुतेक जणांचे मत इथे रन-वॉकच करावे लागणार असेच पडले होते. म्हणजे मला तर अजूनच जड जाईल हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. आम्हा सगळ्यांना दुपारचे जेवण वाटेत खायला बांधून आणायला सांगितले होते. पण मी आणि अमन दोघेही त्यापासून अनभिज्ञ होतो. अर्थात आम्ही बरोबर घेतलेले एनर्जी बार वगैरे खाल्ले, शिवाय खारदुंग ला पाशी बस १५ मिनिटे थांबली होती त्यावेळीही काहीबाही खाल्ले. पण तरी मग ‘जेवण’ म्हणून गावात पोचल्यावर ‘थुपका’ खाल्ला. या वर्षीपासून आम्हाला तंबूत ठेवायऐवजी ‘होम स्टे’ मधे ठेवण्यात आले होते. आम्ही एका खोलीत ४ जण होतो. त्यात मी, अमन, ख्रिस्तोफर नामक फिरंगी आणि एक जण मुंबईचे होते. त्या मुंबईच्या धावकाचे हे चौथे वर्ष होते तर ख्रिस्तोफर खास ह्या स्पर्धे करता एक महिना आधीपासून लडाख मध्ये तळ ठोकून होता त्याचे मधले नॉर्थ पुलू ते खारदुंगला असे टप्पे सरावाकरता धावून झाले होते.
दुपारचे जेवण झाल्यावर परत येउन थोडी झोप काढली. नंतर स्थानिक स्त्रियांनी सादर केलेला लोकनृत्याचा कार्यक्रम पहायला गेलो. खूप मजा आली. किनरा पण गोड आवाज आणि बाळबोध हातवारे यांचे मनमोहक मिश्रण असलेले हे लोकनृत्य म्हणजे तसे पाहता त्यांनी धरलेला फक्त एक फेर होता. पण त्यांच्या साध्यासुध्या हालचाली आणि आविर्भावामधून त्या न कळणाऱ्या भाषेतील गोडवा थेट पोहोचत होता. सगळ्यात शेवट त्यांनी ह्या नृत्यात आम्हा सर्वच धावकांना सामील करून घेतले. ह्या नाचगाण्या दरम्यानच्या काळात, आपल्याला उद्या पहाटे धावायचे आहे याचा मला तर विसरच पडला होता.
पण आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर गोष्टीचा शेवट हा होतोच. तसा हा कार्यक्रमही संपलाच. आणि वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी उद्घोषणा झाली की आमची वैद्यकीय तपासणी तिथेच आणि लगेचच होणार आहे. वैद्यकीय तपासणी ची उद्घोषणा होताच सगळ्यांनाच दुसऱ्या दिवशीच्या धावण्याची आठवण झाली आणि वातावरण जरा बदललेच. नाचून जरा अंगात उब निर्माण झाली होती ती नाचणे थांबताच परत गार वाटायला लागले. थंडगार वाऱ्यांमुळे फक्त आम्हालाच नव्हे तर आम्हाला तपासणाऱ्या स्थानिक डॉक्टरला देखील जॅकेट घालायची पाळी आली. बहुतेक जणांनी आपापल्या नंबराची वाट बघत असताना त्या ठिकाणी असलेल्या कॅन्टीन मधील कॉफी पिउन अंगात ऊब आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी वाट पाहताना देखील अनेक धावकांबरोबर ओळखी आणि गप्पा झाल्या. काही जण शांत राहणे पसंत करत होते तर काही त्याना आलेले टेन्शन जाणवून देण्याइतपत जोरजोरात बोलून हसून लक्ष वेधून घेत होते. वैद्यकीय तपासणीच्या कसोटीत बहुतेक सर्व स्पर्धक पास झाले. एक दोघांचे बिपी आणि अजून २-३ जणांचे रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण हे अगदी बोर्डर लाईन वर असल्याने त्याच्याकडे लक्ष ठेवायचे अशा अर्थाची खूण त्यांच्या नावासमोर करण्यात आली.
हे सर्व होईपर्यंत रात्रीच्या जेवायची वेळ झाली. म्हणायला रात्रीचे जेवण पण संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यानच त्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांची वैद्यकीय तपासणी झाली असेल त्यांनी भोजनगृहाकडे प्रस्थान करावे असे सांगण्यात आले. जेवणाचा बुफे लावला होता. सुरुवात सूप आणि पॉपकॉर्न ने झाली. मग एकेक जण पदार्थ येत गेले. जेवण चांगले होते पण मला जास्त भूकच नव्हती शिवाय जेवण यायला जरा वेळ लागल्याने गरमागरम सूप दोन-तीनदा प्यायले गेले होते. त्यामुळे जे गेले ते खाल्ले आणि मग आमच्या खोलीकडे गेलो. दुसऱ्या दिवसाची तयारी करणे गरजेचे होते. मी एकूण तीन पिशव्या बनवल्या होत्या. स्पर्धा संपते तिकडे मिळाले तरी चालेल असे सामान असणारी एक पिशवी ज्यात दुसर्या दिवशी सकाळचे आवरून झाल्यावर काही सामान जाणार होते, बरोबर काही खायच्या गोष्टी आणि पाण्याची पिशवी ठेवण्याकरता एक पाठपिशवी, आपल्याला वाटेत साउथ पुलूला मिळू शकणारी एक पिशवी अशा त्या तीन पिशव्या होत्या. (ब्रीफिंगच्या दिवशी अनेक धावकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन ही सोय करण्यात आली होती. अनेक धावक ह्या स्पर्धा रस्त्यावर आधीच जावून आल्या मुळे त्यांना मधल्या खराब रस्त्यावर धावण्याकरता ट्रेल रनिंग बूट वापरायचा होता. तसेच काही वैयक्तिक सवयीचे खाद्यपदार्थ सुरुवातीपासून बाळगण्यापेक्षा मधेच मिळाले तर बरे पडेल म्हणून त्यांनी ही विनंती केली होती. आयोजकांनी अत्यंत उदार मनाने अजिबात आढेवेढे न घेता ती मान्य केली होती.) बाकीचे दोघे परत येईतोपर्यन्त जरा वेळ गेला. मग उद्या किती वाजता उठायला हवे, कोण किती कपडे घालून धावणार, किती पुरायला हवे, थंड हवेमुळे बेटरी मधली ताकद लवकर संपते त्यामुळे स्पेअर बटरी बरोबर बाळगायला हवी की नको ई विषयांवर माफक चर्चा झाली. आम्ही रहात होतो तिथे (गावाकडच्या पद्धतीप्रमाणे) संडास घरापासून थोडा दूर होता. त्यामुळे रात्री जायला लागला तर हवा म्हणून टॉर्च हाताशी मिळेल असा ठेवणे, हेडलॅम्प मधे नवीन बॅटरी घालणे अशी कामेही आटोपली. मोबाईलवर गजर लावला होता पण नंतर आमच्या खोलीत चार्जिंग करता इलेक्ट्रिक पोईन्ट नसल्याने तो चार्जिंगला म्हणून खाली मालकीणीकडेच दिला आणि त्या मुंबईकर धावकाने तिलाच सांगितले आम्हाला रात्री १ वाजता उठवायला. ते तर अजून लवकर उठवायला सांगणार होते. ‘एक’ही जरा जास्तच लवकर नाही का होणार असे वाटत असतानाच अमनने लगेचच मला दीड वाजता उठव असे सांगितले. मलाही असे जरा उशीरा उठून चालते. पण चार जणांना आवरायचे असल्याने म्हटले एक तर एक. अर्थात सकाळी आवरायला कोणाला किती वेळ लागतो यावर देखील खूप काही अवलंबून असते हे परत एकदा प्रकर्षाने जाणवले.
९ सप्टेंबर २०१७
अर्थातच पहाटे उठण्यात मुंबईच्या धावकाने सगळ्यात पहिला नंबर लावला. पहाट कुठली रात्रीचे १ वाजता, त्याच्या जरा आधीच तो उठला मग मलाही जाग आली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी प्यायलेले सूप आणि नंतर घरी आल्यावर प्यायलेले गरम पाणी असे भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ पोटात गेले असल्याकारणाने रात्री दोन वेळा झोपमोड झाली होती. पण जितका झोपलो ते छान झोपलो. खोलीतले वातावरण उबदार होते. मधे उठून बाहेर जावून आल्यावर परत झोप येते की नाही असे वाटले होते पण पांघरुणात गुरफटलो आणि लगेच झोप आली. पहाटे (म्हणजे १ वाजता) उठलो तेव्हा डोळ्यावर तशी झोप होती पण बाहेर मोकळ्या थंडगार हवेत गेल्यावर ताजेतवानेही वाटले. घरमालकीणीने गरम पाणी दिल्याने चंगळ झाली. दात घासणे, तोंड धुणे प्रकार व्यवस्थितपणे करता आले. दोन वाजता ब्रेकफास्ट करता जमायचे होते. त्याआधी आपापल्या पिशव्या जमा करायच्या होत्या. त्या सगळ्या गडबडीत वेळ कसा गेला ते कळलेच नाही. अमन तयार होत होता पण मग दोन वाजून गेल्यावर मात्र मग मी पुढे झालो. पिशव्या जमा केल्या. नाश्ता करायचा मूड / भूक अजिबात नव्हती आणि तसा उशीरही झाला होता (धावायला सुरुवात करायच्या किमान एक तास आधी खावे असे म्हणतात, मी एरवीही खात नाही पण ही अल्ट्रा म्हणून जरा थोडेसे काहीतरी खाल्ले)
स्टार्ट लाईन भोजनगृहापासून, विरुद्ध दिशेला अर्धा किमी होती, मग स्टार्ट लाईन पाशी गेलो. तिकडे गेल्यावर लक्षात आले की मी माझे नाव नंबर दर्शवणारा बिल्ला (बिब) लावलाच नव्हता. मी अंगावर एकावर एक चार थर चढवले होते (थर्मल, त्यावर एक पुर्ण हाताचा टी शर्ट , त्यावर आमच्या क्लबचा टी शर्ट आणि त्यावर एक फ्लीसचे जर्किन) त्यातल्या नक्की कशावर बिब लावायचे ह्याचा विचार करत करत मी बिब लावायचेच विसरून गेलो होतो. स्टार्टलाईन वर पोचल्यावर ते लक्षात आले आणि मग बिब मी माझ्या पाण-पिशवीवरच लावले कारण काहीही झाले तरी ती पाठपिशवी कायम बरोबरच असणार होती आणि नियमानुसार माझे बिब दर्शनी भागावर राहिले असते.
हवेत गारठा जाणवत होता पण तरी तसा सुसह्य होता. आकाश निरभ्र होते नुकतीच पौर्णिमा होउन गेल्यावरचा चंद्र मनोहर दिसत होता पण त्याचे कोड कौतुक पुरवण्याकडे अजिबात ध्यान नव्हते. अंधार, गारठा आणि सगळ्यांच्या हेडलाम्पमुळे पडणारे प्रकाश झोत ह्यामुळे अत्यंत अद्भुतरम्य वातावरण तयार झाले होते. जसजशी स्पर्धा चालू व्हायची वेळ जवळ आली तसतसे औत्सुक्य, हुरहूर, उत्कंठा, जरासा तणाव गेले अनेक महिने ज्याकरता आपण मेहेनत घेतली होती ती स्पर्धा आता चालू होत्ये याचा आनंद अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या होत्या. ह्यावर्षी प्रथमच सहभागी स्पर्धकांचा आकडा तीन आकडी झाला होता. सव्वाशेहून अधिक नावनोंदणी केलेल्यांपैकी तब्बल १०४ स्पर्धक माझ्यासोबत तिथे उभे होते.
अखेरीस उलटी मोजणी चालू झालीच
१०, ९, ८, ७, ६, ५, ४, ३, २, १ गो
असे म्हणता क्षणीच सगळे धावू लागले. आपापल्या गतीने जात असतानाही पहिल्या ५ किमी पर्यंत आजूबाजूला बरेच स्पर्धक दिसत होते म्हणजे खरेतर त्यांचे दिवे जाणवत होते. तसे पाहता रात्र अजिबात काळोखी नव्हती सुंदर चंद्रप्रकाश पसरला होता. मला हेडलँपच्या प्रकाशात जरासे अस्वस्थ वाटायला लागले. पायाखाली जिथे प्रकाश हवा आहे तिकडून जरा नजर इकडे तिकडे गेली की डोळ्यासमोर काळोखी येत होती. आणि दुसऱ्या स्पर्धकांच्या दिव्याचे झोत आपल्या डोळ्यावर आल्यानंतर तर त्या प्रकाशामुळेही गडबड उडू लागली. जरा वेळानी सगळेजण आपापल्या गतीनुसार मागे-पुढे झाल्यावर, पायाखालचे नीट दिसू शकेल असा विश्वास वाटल्यावर मी तर माझा हेडलँप बंदच करून टाकला. आपला वेग वाढवून आपण कुणाच्या जवळ जाऊ लागलो की आपल्या दिव्याच्या प्रकाशामुळे समोरचा ही जोरात व्ह्यायचा आणि उगाचच त्याला रेसचे स्वरूप यायचे ते बंद झाले.
नंतर अचानक वातावरणातला गारवा वाढला. थोडा वारा सुटला. धावत असतानाही अंगात ऊब येईना. हातात हातमोजे, पायात तर दोन मोजे असे असतानाही हाता-पायाची बोटे गारठून थिजली होती. तितक्यात नॉर्थ पुलू आले तिथे चहा मिळेल तर बरे असे वाटत असतानाच खरोखरच गरमागरम चहा मिळाला. त्याच्या जरा आधीच एका स्पर्धकाने थंडीमुळे स्पर्धा सोडली होती. तो हळहळत होता. चहा प्यायल्यावर त्याला तरतरी आली होती पण आता उशीर झाला होता. त्याने मला त्याचे हातमोजे देउ केले. एकावर एक चढवायला म्हणून. तो मला शेवटाकडे भेटून ते परत घेईन म्हणाला पण आजही ते माझ्याकडेच आहेत आणि मला त्याचे नावही आठवत नाहीये.
इथवर उंची आणि चढ तुलनेने कमी म्हणता येईल अशी होती. इथून पुढे मात्र व्यवस्थित चढ लागणार होता. तांबडे फुटायला लागण्याची सुरुवात झाली होती. अशी सकाळ उजाडताना बाहेर असणे हा एक निरतिशय सुंदर अनुभव असतो त्यातून हा अनुभव हिमालयातला होता.
मन अनेक पातळ्यांवर काम करत होते एकीकडे थंडी वाजत होती, त्यावर उपाय म्हणून सुर्यभेदन प्राणायाम on द मूव्ह चालू होता, तर एकीकडे (बऱ्याच मागच्या) पार्श्वभूमीवर का होईना सकाळ होतानाच्या स्वर्गीय वातावरणाचा आस्वाद घेणे चालू होते. बर्फाच्छदीत पर्वतराजींवर सूर्याची पहिली किरणे पडून सोनेरी झालेली शिखरे आजवर केवळ फोटोतच बघितली होती ती प्रत्यक्ष पहायला मिळाली.
फिरते सपोर्ट व्हेईकल दर दोन किमी थांबत होते आम्हाला हवे नको ते विचारत होते. पाण्याच्या २०० मिलीच्या बाटल्या दिल्या जात होत्या. प्रत्येक थांब्यावर एक बाटली पाणी तिथल्या तिथेच प्यायचे आणि वाटेत प्यायला एक बाटली घेउन ती संपवायची असा क्रम चालू होता त्याचा साईड इफेक्ट म्हणून भरपूर लू ब्रेकही घ्यावे लागत होते. अर्थात ते एका परीने चांगलेही होते. (आपण वातावरणाला रुळतो आहोत याचे हे एक निदर्शक मानले जाते)
नेहमी इतर कुठल्याही स्पर्धेत पळताना आजूबाजूला धावणारी, स्पर्धकांना प्रोत्साहन देणारी अनेक माणसे असण्याची सवय आणि एकंदरीतच आपल्या नेहेमीच्या शहरी जगण्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत विपरीत अशा वातावरणात हे धावणे होते. संपूर्ण रस्ता केवळ ह्या स्पर्धेकरता म्हणून वाहनांच्या रहदारीकरता बंद ठेवण्यात आला होता. वाटेत वस्ती नाही, गावे नाहीत त्यामुळे माणसे नाहीत जनावरे नाहीत. बरोबरचे धावणारे पुढे किंवा मागे लांबवर; आपण त्याच्या सोबत जाण्याचा / रहाण्याचा निष्फळ ठरत असलेला प्रयत्न, मग काय मनाशी हवा तो (आणि मधेच नको तो देखील) विचार करायला सुपीक वातावरण. मग पुढचा बराच टप्पा एका तंद्रीतच पार पडला. मधेच फिरते मदत वाहन पथक हवे-नको विचारणा करतील तितकाच काय तो व्यत्यय. त्यांच्याकडून पाणी घेताना देखील बोलणे माफकच होत होते.
पुढची मार्गक्रमणा, आपल्याला 'हे इतके' धावायचे असा विचार करत घालवण्यापेक्षा आता फक्त पुढच्या मदत केंद्रापर्यंत जायचे आहे असा विचार मनात ठेवून मजल दरमजल करत 'खार दुंग ला' च्या माथ्यावर सात तासाच्या आत पोचायचे असा प्लान होता. त्याप्रमाणे मार्गक्रमणा चालू असतानाच मधेच एक स्पर्धक थांबलेला दिसला त्याला श्वास घ्यायला जरा त्रास होता होता असे त्याचे म्हणणे होते पण तितकी वाईट अवस्था वाटत नव्हती आणि वयाकडूनही लहान वाटत होता, त्याला जरा मानसिक बळ दिले. मलाही लू ब्रेक घ्यायचा होताच तर त्याला म्हटले मी ब्रेक घेतोय तोवर एका जागी थांबून दीर्घ श्वसन कर आणि कस वाटतंय ते पहा आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने 'हे इथं तर दिसतंय खारदुंग ला, आलंच की जवळ आता' असे सांगून तिथपर्यंत तरी चल असे सांगितले. त्यानेही माझे म्हणणे मानले आणि आमची एकत्र मार्गक्रमणा चालू झाली. जसजसे वर वर जात होतो तसतसे हवामान अधिकाधिक थंड होत होते सूर्यदेव वर आले तरी त्यांचा म्हणावा तितका प्रभाव पडत नव्हता. पण आता सोबत असल्यामुळे बोलायला चालायला (सलग धावायला अजिबात जमत नव्हते) साथीदार मिळाल्याने हा टप्पा तसा व्यवस्थित पार पडला.
मधेच एक किस्सा झाला. हा सगळा घाटरस्ता वळणावळणाचा असल्याने पार पुढचे स्पर्धक देखील दिसत होते मला ओलांडून गेलेल्यातला एक स्पर्धक अचानक झोकांड्या खाताना दिसू लागला. काही जण पुण्यात पर्वती च्या पायऱ्या चढताना जसे नागमोडी चढतात तसा काहीसा मला पहिल्यांदा वाटले त्याचीही पद्धतच आहे की काय पण नंतर त्याच्या हालचालींमध्ये बेबंद पणा वाढताना दिसला मग कळले की तो AMS चा शिकार झाला आहे आणि मागून फिरत्या पथकाने त्याला गाठून गाडीत बसवले आणि घेउन गेले. म्हणजे अर्थातच त्याची स्पर्धा अपुरी राहिली. नाही म्हटले तरी जरा घाबरायला झालेच मग मनाशी ठरवले की काही झाले तरी आपल्याला DNF व्हायचे नाहीये. शेवटपर्यंत स्पर्धेत राहायचे आहे. वेग कमी झाला (कमी व्ह्यायला मुळात आधी तो जास्त नव्हताच खरेतर) तरी चालेल म्हणून मग चक्क फक्त चालायचेच असे ठरवले. हे इथे जवळ आहे असे सांगितलेला माथा अजूनही तसा लांबवरच होता पण आता नजरेच्या टप्प्यात अधिक जवळ आला होता. बरोबरचा (अनंत त्याचे नाव) म्हणाला सुद्धा मला फसवलं म्हणून पण आता तोही उत्साहात होता. तिकडे गेल्यावर गरम सूप मिळणार आहे असे कळले होते त्यामुळे न रेंगाळता लवकरात लवकर तिथे पोचायचा प्रयत्न केला. आणि चालू केल्यापासून साडेसात तासां अखेरीस तिकडे पोचलो. (आठ तास कट ऑफ होता) मग तिकडे एक सेल्फी म्हणजे खरोखरच एकट्याने आणि एक अनंत बरोबर काढली. एक टप्पा पार केल्याचा आनंद आणि सूप प्यायल्याने आलेली तरतरी यामुळे एकदम उभारी आली.
अनंतला म्हटले चला आता पुढे सगळा उतार. खरेतर मी उतारावर अजिबात नीट धावू शकत नाही त्यामुळे त्याला म्हटले मला सोडून जाउ नको तर तो म्हणे त्याच्या घोट्याला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली असल्याने तोही जोरात जाणार नाहीये. म्हटले चला सोबत अजून राहील तर पण कसले काय अनंत करता थांबल्यानंतर देखील तो मागे पडू लागला मग मात्र त्याला म्हटले पुढचे टप्पे कट ऑफ च्या आत पार करायचे आहेत जरा वेग वाढव तर मग तो म्हणे तू हो पुढे कच्चा रस्ता संपल्यावर मी गाठतोच तुला. कच्चा रस्ता खरोखरच वाईट होता पण अजून वाईट होते ऊन, बुटात पाय उबायला लागले होते उतार चालू झाला तरी ऑक्सिजन चे प्रमाण कमीच असल्याने नीट धावता येत नव्हते, धावायला एक साथीदार मिळाला होता तो ही साथ सोडता झाला. साउथपुलू येईपर्यंतचा रस्ता कापताना सगळ्यात जास्त चीडचीड झाली. पण चिडून करतो काय आणि सांगतो कुणाला त्या तिरीमिरीत धावचाल करत असताना एकाने मदतगाडीतून टाटा केला मी ही त्याला प्रतिक्षिप्त क्रियेने हात केला आणि मेंदूने नोंद घेई पर्यंत गाडी पुढे निघून गेली पण तो अनंत होता त्याची तब्येत बिघडल्याने तो गाडीत बसता झाला होता. झालं, त्याचा आधार होता तो ही गेला. पण तरी दूरवर पुढे माणसे दिसत होती आमच्या मागेही काही स्पर्धक होतेच पहिल्या कट ऑफ च्या वेळी अर्धा तास आधी पोचलो होतो हा ही एक दिलासा होता पण त्यावेळी जरा (उगाचच) गैरसमजूत झाली होती की खारदुंगला माथ्यावर पोचलो तेव्हा आपण निम्मे अंतर पार केलंय आणि आता निम्मे तेही उतारावरचे अंतर पार करायला ६ तास आहेत पण साउथ पुलू येथे पोचल्यावर एका स्वयंसेवकांशी उरलेले अंतर विचारताना लक्षात आले की खारदुंग ला माथा ३२ किमी वर होता आणि उतारावरचे अंतर ४० किमी आहे मग वेग वाढवायचा प्रयत्न केला पण उन्हाने पार वाट लागत होती पाणी भरपूर पीत होतो पण पाणी होते बर्फगार त्यामुळे घसा बसला, नाकही एका नाकपुडीकडून चोंदले होते, परत वेग काही वाढवू शकलो नाही. साउथ पुलू येथ पोचलो तेव्हा कट ऑफच्या फक्त १५ मिनिटे आधी पोचू शकलो. मात्र इकडे आमची जमा केलेली पिशवी मिळायची होती. त्यात मी माझा नेहेमीच्या न्यू फील बुटाचा एक जोड ठेवला होता. नवीन घेतलेल्या जोड्याने चांगली साथ दिली होती प ण उन्हामुळे म्हणा किंवा पाय थोडे सुजतात त्यामुळे म्हणा ते एकदम घट्ट झाले होते. मग नेहेमीचे जोडे घातल्याने परत एकदा उभारी आली पण आता ऊन मी ओरडत होते. रखरखाट जाणवत होता. वाहणाऱ्या झऱ्यात जाउन डूम्बावे असे वाटत होते. दूरवर दिसणाऱ्या स्टोक च्या पर्वत रांगा आणि तिकडे गेलो असताना वाजलेली थंडी आठवून आठवून धावत होतो. जाम पकलो होतो. मध्ये एकदा एका मदत गाडी तल्या लहान मुलाने तर मला विचारले देखील की बसायचे का गाडीत. बहुदा माझे दृश्य स्वरूप त्याला फारसे आश्वासक वाटले नसावे मग मात्र मी म्हटले आता आपल्याला नीटच धावले पाहिजे. तसा प्रयत्न चालू केला. पण तरी लय सापडायला वेळ लागलाच.
पुढचा कट ऑफ चा टप्पा होता मेंढकमोड मी म्हटले तसे वाटेत फारशी वस्ती गावे नसल्यामुळे landmark असे काही नव्हतेच दोन्हीकडचे पुलू हे मिलिटरीचे / BRO चे तळ होते. मेंढकमोडची वाट पाहता पाहता पार वाट लागली. मी अगदी लहान मुलासारखे कधी येणार हा प्रश्न मदत गाडीतल्या लोकांना दोनदा तरी विचारला असेल. कधी येणार अशा प्रश्नाला मलाही हे इथे ह्या वळणानंतर असे सांगण्यात आले. पण असे सांगितलेले मेंढकमोड प्रत्यक्षात त्या वळणानंतर केवळ दृष्टीक्षेपात आले. पण त्यावेळी भेटलेला एक स्वयंसेवक मात्र, ‘तू मस्त धावतोयस’ ‘जरा वेग वाढव, आता उतार आहे, मस्तपैकी पोचशील तू’ असे सांगून माझे मनोबळ प्रचंड प्रमाणात वाढवून गेला. वाटेत ठिकठीकाणी माझा बिब नंबर आणि वेळ टिपून घेणारी मंडळी देखील मस्त चाललंय पण जरा लवकर पोचा, वेळ कमी उरलाय असे सांगून सावध करत होती. मधे एकदा ‘आपल्याला हे जमणार का’ असे वाटून गेलेच पण मनाने मी खंबीर होतो ठरवले की ७२ किमी धावून संपवायचे फार फार तर काय होईल उशीरा पोचलो म्हणून मेडल मिळणार नाही. असे करता करता पुढे दोन स्पर्धक दिसताहेत हे पाहून मी माझा वेग वाढवला. मेंढकमोडला मी पोचलो तेव्हा रूट डायरेक्टर जातीने हजर होते दुरूनच त्यांना पाहून ह्यांनी आता उशीरा पोचल्यामुळे डीबार केले तर काय घ्या म्हणून अजून वेग वाढवला आणि तिथे पोचता पोचता मी माझ्या पुढच्या स्पर्धकालाही गाठले. खरेतर आम्ही दोघे त्या ठिकाणी एक मिनिट उशीरा पोचलो होतो पण रेस डायरेक्टरने आम्हाला दोघांना ते एक मिनिट ग्रेस देण्यात आले आहे असे सांगून आता मात्र लवकर निघा शेवट एकही मिनिटाचा ग्रेस टाईम मिळणार नाही असे निक्षून बजावले. आता उरलेले अंतर होते १२.५ किमी आणि वेळ दीड तास. मी धावायला कंपनी करता तो स्पर्धक येतोय का हे पाहिले पण तशी काही चिन्हे दिसली नाहीत त्यामुळे माझा माझाच निघालो.
आता मात्र खरी शर्यत सुरु झाली. Race against time. त्यानंतर मी जे काही धावलो असेन त्याला तोडच नाही. उतार होताच पण लेहही दिसू लागले होते. माझे सगळे मित्र माझी वाट बघत असतील अजून कसा नाही आलो म्हणून काळजीतही असतील असे वाटले आणि मग एकंदरीतच सगळे-सगळे आठवले. ट्रेनिंगचे ते चार महिने, मैत्रीचे अनेक अनोळखी-ओळखीचे हितचिंतक, ज्यांनी आपल्याला ह्या स्पर्धेकरता वेळोवेळी शुभेच्छा दिल्यात, धावक मित्र ज्यांनी स्वतःला ह्या स्पर्धेत धावायचे नसतानाही सरावाच्यावेळी बरोबर धावून दिलेली साथ, खराडीहून डेक्कनला भल्या पहाटे चार वाजता केवळ पाणी पाजायला येणारे धावक मित्र, ही स्पर्धा मी नक्की पार करू शकेन अशी ज्यांना माझ्यापेक्षा जास्त खात्री आहे अशी अनेक माणसे. अशा अनेक जणांच्या पाठबळावर आपण इथवर येउन पोचलो आहोत ते काय मेडल न घेता जायला? आणि आपण ७२ किमी पार तर करणारच आहोत तर मेडल हे घ्यायचेच. शिवाय या खेपेस मेडल मिळाले नाही तर परत पुढच्या वर्षी यायला लागेल ते वेगळेच. त्यामुळे मनाशी निर्धार केला की आता माघार नाही वेळेच्या आता ही स्पर्धा संपवायाचीच.
असा निर्धार केला खरा आणि जरा पुढे जातोय तो अचानक दूरवरून वाहने येताना दिसली. दुरून ही वाहने पाहून खरेतर चांगलेच वाटले, पण आता ह्या स्पर्धेकरता बारा तास थांबवलेली रहदारी चालू करायची वेळ झाली होती. पहिल्यांदा भेटले ट्रकना ओव्हरटेक करत आलेले बायकर, त्यांनी थम्स-अपच्या खुणा केल्याने तर खूप मस्त वाटले. पण मग अचानक एका मागोमाग ५० तरी ट्रक आणि त्यांना ओव्हरटेक करू पाहणाऱ्या चारचाक्या ह्यांची वर्दळ अंगावरच येऊ लागली. त्यांनी उडवलेली धूळ आणि सोडलेला काळा धूर यांनी तर अक्षरश: श्वास कोंडला आणि जीव गुदमरू लागला. लागली वाट. परत एकदा वेग मंदावला. पण तितक्यात आम्हाला ब्रीफिंगच्या वेळी ज्या यु टर्न पासून चालवत नेले होते ती जागा नजरेच्या टप्प्यात आली. त्यामुळे पुन्हा बळ एकवटले.
तिकडून आम्हाला शेवट पर्यंत सोडायला काही स्वयंसेवक सायकलवरून येणार होते पण मी पोचलो तेव्हा आधीच्या लोकांना सोडून ते परत यायचे होते म्हणून एक चारचाकी माझ्यासोबत पाठवली ती पुढे आणि मी मागे असे आम्ही काही अंतर गेलो पण त्या आतल्या रस्त्यावरून जाताना धूळ खूप उडायला लागल्याने मी तिला माझ्या मागून यायला सांगितले. 'आता काय पाचच किमी राहिलेत' अशा आनंदात यु टर्न पाशी मी पाणी प्यायचे आणि बरोबर घ्यायचे देखील विसरलो ते आता परिणाम दाखवू लागले. डाव्या पायाच्या पोटरीत गोळे आल्यासारखे वाटायला लागले. झाली का आता पंचाईत, मग ताबडतोब गाडीतून पाणी घेऊन दोन बाटल्या पाणी तिथल्या तिथे प्यायलो आणि परत काही अंतर चाललो. मग शांती स्तूपा जवळ पोचल्यावर परत धावायला सुरु केले आता गाव / शेवट अगदी जवळ आला होता पण वेळही संपायला आलेली. त्या रस्त्यावर दुसऱ्या दिवशीच्या फुल आणि हाफ मध्ये भाग घ्यायला आलेले स्पर्धक, काही स्थानिक माणसे, सायकलवरून परत येणारे स्वयंसेवक सर्वच मला प्रोत्साहन देत होते. एकाने पाठीवरच्या बिबवर असलेले माझे नाव वाचून बकअप पेंडसे (बहुतेक पुणेरी मराठी असावा त्याने पेंडसे चा उच्चार अगदी व्यवस्थित केला आणि त्या दमलेल्या अवस्थेतही मी तो टिपला ) असे जोरात ओरडला. त्यामुळे आपोआपच माझा वेग वाढत गेला.
तेवढ्यात आले रिमोचे ऑफिस जिथून शेवट ३००-४०० मीटर अंतरावर असेल. तोच राम अय्यर दिसला, त्याने मोठ्यांदा आरोळी ठोकून मला ताब्यातच घेतले. हातातली पिशवी वगैरे तिकडेच टाकून त्याच्या सोबतच्य मित्राला ते सगळे बघ असे सांगून तो माझ्या सोबत पळू लागला. लवकर चल लवकर चल वेळ कमी राहिला म्हणून मला ओढतच घेउन जाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर जो ताण होता तो पाहून मी देखील जोर लावून पळत सुटलो. बाजारात जातोय ना जातोय तोवर लगेचच पहिल्यांदा निखील दिसला मग ट्रेक मधला नितीन, असे हे माझे मित्र माझ्या डाव्या उजव्या बाजूला धावताहेत, गावातले दुकानदार, फुल आणि हाफ मध्ये भाग घ्यायला आलेले धावक, इतर पर्यटक, बायकर्स, स्थानिक सगळेच मला जोरदार टाळ्या वाजवून प्रोत्साहन देताहेत, ओरडताहेत आणि मग वळल्यावर शेवट नजरेसमोर आला. ते शेवटचे ५० मी अंतर जे काही जोरात धावलोय म्हणून सांगू. मी कसे धावलो माझे मलाच माहीत नाही. माझ्या आजूबाजूच्या ओळखी अनोळखी सगळ्यांच्या चेहर्यावर जो आनंद दिसत होता तेव्हाच मला कळले आपण वेळेच्या आत आहोत. मग निखील वेळ नोंदवत होते तिथे पाहूनच आला आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. मी तीन मिनिटे आधी पोचलो होतो. मेडल मिळणार तर म्हणून हुश्श केलं आणि एका खुर्चीवर बसलो.
छातीचा भाता जोरजोरात चालू होता, हृदयाची धडधड जोरात ऐकू येत होती. असा काही वेळ गेला आणि मग श्वास नियंत्रणात आल्यावर एकेक गोष्टी समजायला लागल्या. औरंगाबादचा नितीन ज्याने माझ्या आधी ती स्पर्धा पूर्ण केली होती (आम्ही स्पर्धेत भेटून भेटून एकमेकांच्या ओळखीचे झालो आहोत) त्याने येउन माझे अभिनंदन केले. राम अय्यरचा मित्र मंदार, जपानी जोडपे ज्यातला नवरा धावतो (हे मला रन द रण स्पर्धेच्या वेळेस ढोलवीरा, कच्च्छ येथे भेटले होते), पुण्याहून आलेल्या गृप मधले कल्याणी टोकेकर, रोहन शंभरकर हे सगळे येउन हात मिळवणी करून गेले. कोण कोण फोटो काढत होते. राम अय्यरने फोन करून पुण्यात गृपला कळवून टाकले. मग १०-१५ मिनिटानी माझी वैद्यकीय तपासणी झाली. म्हणजे परत तेच पल्स आणि रक्तातले ओक्सिजनचे प्रमाण. दोन्ही व्यवस्थित होते. बीपी थोडे जास्त होते पण ते ही काळजी करण्याइतके अजिबात नाही असेही आवर्जून सांगितले गेले. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी माझी परतीचे विमान असल्याने मेडल आजच घायला हवे होते (नाहीतर दुसऱ्या दिवशी हाफ आणि फुल मेरेथोन झाल्यावर एक सोहळा होता त्यात सर्व खारदुंग ला फिनिशर्स ना ते मेडल समारंभ पूर्वक देण्यात येणार होते) ते घेतले. त्याशिवाय आयोजकांतर्फे सर्व फिनिशर्स ना गिफ्ट म्हणून एक जर्किन देण्यात येत होते ते ही घेतले.
अशा रीतीने माझ्या हातून एक मोठीच गोष्ट पूर्ण केली गेली.
हे मी 'केलंय' असे मला खरोखरच वाटत नाही. माझ्या हातून हे कसे झाले याचा अचंबा अजुनही वाटतो. कित्येकदा कसून प्रयत्न केल्यानंतरही हातातोंडाशी आलेले यश हुलकावणी देते. माझ्याबाबतीत तसे झाले नाही. मी सुदैवी ठरलो संपुर्ण सुदैवी.
मस्त रे !!
मस्त रे !!
अभिनंदन. ३ मिनीटे बाकी ठेउन म्हणजे भारीच. कट्टाकट्टीत झाली तरी त्या वातावरणात वाट लागली असेल एकदम.
वा मस्त झाली चारही भाग!
वा मस्त झाले चारही भाग! हार्दिक अभिनंदन तुमचं!!
_/\_
_/\_
दंडवत आहे हर्पेन तुला !! काय डेंजर अल्ट्रा मॅरॅथॉन पूर्ण केलीस. मस्त लिहीले आहेस सगळे वर्णन पण. असे तुझ्यासोबत पळतो आहे की काय असे वाटत होते. मध्येच तुला दम लागलेला असताना वाचताना मलाच दम लागत होता.
लगे रहो !!
जबरीच रे... फुल टू टेन्शन मधे
जबरीच रे... फुल टू टेन्शन मधे धावलास की शेवटी..
सॉलिड. शब्द अपुरे तुमचं कौतुक
सॉलिड. शब्द अपुरे तुमचं कौतुक करायला. नतमस्तक अगदी. वर्णन इतकं सुंदर की समोर चित्रपट पहावा डायलॉगसह, तुम्हाला अगदी धावताना बघितलं असं वाटलं. ग्रेट ग्रेट , hats off.
कडक सॅल्युट स्वीकारावा राजे
कडक सॅल्युट स्वीकारावा राजे
च्यायला नुसते चालताना तिथे वाट लागते तिथे अल्ट्रा मॅरेथॉन हा विचारही भयानक आहे.
कसली जबरदस्त इच्छाशक्ती आणि मेहनत बाबा, पायांचा एक फोटो टाकावा
सॉलिड. शब्द अपुरे तुमचं कौतुक
सॉलिड. शब्द अपुरे तुमचं कौतुक करायला. नतमस्तक अगदी. वर्णन इतकं सुंदर की समोर चित्रपट पहावा डायलॉगसह, तुम्हाला अगदी धावताना बघितलं असं वाटलं. ग्रेट ग्रेट , hats off >>> +9999999
_______/\______
पराग, जोरदार वाट लागली रे
पराग, जोरदार वाट लागली रे बाबा,
इथे फक्त धावण्याचा सराव उपयोगी नाही.
उणे तपमान, गार वारे ते प्रचंड ऊन असे बदलते,बेभरवशाचे, लहरी हवामान, विरळ हवा, कमी ऑक्सिजन, खराब रस्ते, पहाटे ३ वाजता सुरुवात असल्याने अपुरी राहिलेली झोप अशा अनेक गोष्टी ही स्पर्धा अवघड बनवतात. तुमच्या एकंदरीत शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहते ही स्पर्धा.
वातावरणाचा सराव हाच कळीचा मुद्दा जो आपण इकडे राहून करूच शकत नाही.
धन्यवाद मैत्रेयी, धनि, हिम्या
धन्यवाद मैत्रेयी, धनि, हिम्या, अंजू, आशू, शशांक
सगळे भाग एकदम वाचले. जबरदस्त
सगळे भाग एकदम वाचले. जबरदस्त आहे. अभिनंदन हर्षद !! तुमचे सुयश आणि लेखन दोन्हीही प्रेरणादायी आहे.
म हा न !!!
म हा न !!!
हर्पेन पुन्हा एकदा हार्दिक
हर्पेन पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. Hats off तुमच्या मेहनतीला.
तुम्ही रेस वेळेत पूर्ण केली आहे हे माहिती असूनही शेवटचे काही para श्वास रोखून वाचले.
धन्यवाद जीएस , धनश्री आणि
धन्यवाद जीएस , धनश्री आणि झेलम
जबरदस्त अनुभव. शेवटचे पॅरा
जबरदस्त अनुभव. शेवटचे पॅरा वाचताना ( आरामशीर ऑफिसात असून देखील) माझंच ब्लड प्रेशर वाढलं की.
अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धांकरता शुभेच्छा
अल्ट्रासुपर्ब! हार्दिक
अल्ट्रासुपर्ब! हार्दिक अभिनंदन ...
अभिनंदन,अतिशय रोमांचकारक
अभिनंदन,अतिशय रोमांचकारक अनुभव आणि तितकंच खिळवून ठेवणारं लिखित वर्णन.
पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
परत एकदा जोरदार अभिनंदन.
परत एकदा जोरदार अभिनंदन.
वाचताना प्रत्येक परिच्छेदा बरोबर उत्सुकता ताणली जात होती.
शेवटचे १-२ परिच्छेद वाचताना 'बक अप पेंडसे' असंच होत होतं..
आता प्रत्येक भाग एडिट करत करत भरपूर फोटो अपलोड करणे
अ फा ट ! ! ! ! ! ! ! !
अ फा ट ! ! ! ! ! ! ! !
शानदार जबरदस्त झिंदाबाद
शानदार जबरदस्त झिंदाबाद
तुमचे मनपूर्वक खुप खुप अभिनंदन
धन्यवाद आणि सॉरी मेधा, माझा
धन्यवाद आणि सॉरी मेधा, माझा असा काही हेतू नव्हता, पुढच्या वेळेस नीट लवकर संपवेन स्पर्धा
धन्यवाद - विजिगीषु , असुफ, मित, मार्गी, निलेश ८१
मित - स्पर्धेत धावताना जास्त फोटो काढलेच नाहीयेत, पण आधीच्या भागात जसे जमतील तसे अपलोड करतो फोटो
मस्तच हर्पेन !!
मस्तच हर्पेन !!
परत एकदा कडकडीत अभिनंदन
मजा आली वाचायला
आज सगळे भाग वाचून काढले ....
आज सगळे भाग वाचून काढले ....
म हा न !!!!
हे सगळं खूप अफाट आहे. पण इथे
हे सगळं खूप अफाट आहे. पण इथे सांगताना खूप ईझी केल्यासारखं वाटतं. A great batsman makes batting look easy तसं! एक अवांतर बोलू का? सुरूवातीला तुमचे फोटो बघितले तेव्हा वाटलं होतं की बर्फामुळे तुमची दाढी पांढरी दिसतेय! पण नंतर कळालं की ते तसं नव्हतं!
आज सगळे भाग वाचून काढले ....
आज सगळे भाग वाचून काढले .... अभिनंदन हर्पेन!
बापरे !!कसलं भारी! सॉलिड च
बापरे !!कसलं भारी! सॉलिड च एकदम !!
मन:पूर्वक अभिनंदन हर्पेन!!!
वर्णन पण खूप छान
वाचताना एकदम उत्कंठा वाढत होती काटा येत होता अंगावर !!
पुढील वाटचालीकरता शुभेच्छा
धन्यवाद आदित्य, प्राची.,
धन्यवाद आदित्य, प्राची., मार्गी, राजू७६, anjali_kool
मार्गी, (आता झाली दाढी पांढरी तर काय करू राव, वयही झालंच म्हणायचं आता)
हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
तुझ्या तयारीचे अपडेटस् वाचून तू किती फोकस्ड आहेस, ते कळत होतं. ऐनवेळी काही हवामानाच्या, प्रकृतीच्या अडचणी आल्या नाहीत, हे चांगलं झालं. मस्त यश मिळालं. ग्रेट!
मनःपूर्वक अभिनंदन! खूपच सुंदर
मनःपूर्वक अभिनंदन! खूपच सुंदर लिहिलंय.
धन्यवाद अनया, वावे
धन्यवाद अनया, वावे
ऐनवेळी काही हवामानाच्या, प्रकृतीच्या अडचणी आल्या नाहीत, हे चांगलं झालं. - हे अगदी सोळा आणे खरंय
अरे, हे आधी दिसलंच नव्हतं.
अरे, हे आधी दिसलंच नव्हतं. मस्त वाटलं वाचून हर्पेन! खूप सुंदर अनुभव आणि लिखाण!
Pages