https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)
https://www.maayboli.com/node/64000 ------> गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)
https://www.maayboli.com/node/64002 ------> गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)
https://www.maayboli.com/node/64016 ------> गडदुर्गा - धोडंबदेवी, धोडप (६)
===========================================================================
जोगेश्वरी हे नाव उच्चारले की आपल्या डोक्यात येते मुंबई व तेथील जोगेश्वरी देवी आणि मुंबईतील एक उच्चभृ भाग, परंतु आज ज्या देवीच्या नावाने जागरण मांडले आहे ती शहरातील देवी नसून नेहमी प्रमाणेच आहे एक गड दुर्गा. सातारा जिल्ह्यातील कोयनानगर ह्या नव्या वसाहतीजवळ असलेल्या हेळवाक ह्या रानात वसलेल्या पायथ्याच्या गावापासून साधारण १०किमीची जंगल रपेट मारली की येणारा किल्ला "भैरवगड" ची निवासिनी *श्री जोगेश्वरी देवी*, आहे की नाही देवी हाकेच्या अंतरावर
महाराष्ट्रात तसे माझ्या माहितीत चार भैरवगड आहेत. मोरोशीचा भैरवगड, शिरपुंजे भैरवगड, भेद्रेवाडीचा भैरवगड (रांगण्या जवळ) आणि हेळवाकचा भैरवगड. ह्यातील हेळवाकचा भैरवगड हा दाट जंगलात आहे. बिबटे, अस्वल, गवे, खोकड आणि इतर जंगली श्वापदे ह्यांचा इथे मुक्तवावर असतो त्यामुळे काळजी पूर्वक भटकंती करण्याचा सल्ला मित्रमंडळी व जुने ट्रेकर देतात. साधारण ९००मीटर उंच असलेला हा किल्ला संपूर्ण कोयना अभयारण्याचे विहंगम दृश्य देतो.
भैरवगड ओळखला जातो तो येथील मूलनायक देवता भैरावदेवा मुळे. हातात नाग धारण केलेला हा देव आदिनाथाचे एक रूप आहे आणि पंचक्रोशीतील कुलदैवत. ह्याच भरैवदेवा शेजारी खड्गासनात उभी आहे चतुर्भुज "जोगेश्वरी" देवी. सद्य स्थितीतील मूर्तिचे दोन हस्त खंडित झाले असून मागील दोन हातात अस्त्र-शस्त्र असल्याचे दिसते. पाषाणातील ह्या मूर्तिची उंची २ ते २.५ फुट आहे.
मंदिर ऐवढ्या दुर्गम प्रदेशात असून सुद्धा दिवसा येथे गावकर्यांची येजा असते. नवरात्रात तर येथे मोठी वर्दळ असते. गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे पण पुरातन कौलारु राऊळाची सर सीमेंट कॉन्क्रीटच्या मंदिरात नाही. तरी सुद्धा नीरव शांतता, गुढ एकांत, प्राण्यांची चाहुल एक वेगळीच मोहिनी मनावर घालते. मंदिरात वरील उल्लेखलेल्या देवतासह वाघजाई, सुकाई, विठ्ठलाई व लक्ष्मी देवीच्या मूर्ती आहेत. सभामंडपात पूर्वी प्राण्यांची शिंगे लावली होती, माझ्या ह्या भटकंतीत ती मला काही दिसली नाही.
गडावर चार दरवाजे आहेत, वाड्याची जोती आहेत, बुरुज आहेत तसेच पाण्याची दोन टाकी आहेत ह्या पैकी एक टाके मंदिरा शेजारी असून येथील पाण्याच्या वापर पिण्यासाठी केला जातो. मंदिरात भांडी सुद्धा आहेत जी वापरून एका छोट्या तुकडीचा स्वयंपाक केला जाऊ शकतो. शिधा मात्र आपली आपण घेवुन यावी लागते.
हेळवाक मार्गे किल्ल्याकडे जाताना वाटेत सुप्रसिद्ध "रामघळ" बघता येते. रामदास स्वामीचे येथे वास्तव्य झाल्याने ही घळ पावन झाली आहे. शिवथरघळी समान येथे धबधब्या मागे अंदाजे ६०फुट रुंद व २० फुट खोल अशी निसर्ग निर्मित गुहा म्हणजेच घळ आहे. गुहेत उभे राहीले असता पुढुन कोसळणारा जलप्रपात त्या पुढे दुरवर पसरलेले जंगल आणि निळेभोर आकाश फक्त आणि फक्त स्वर्गसुख देतात.
१२व्या शतकात शिलाहार भोज राजानी बांधलेल्या ह्या किल्ल्याने त्याच्या भौगोलिक स्थितिमुळे त्याकाळी राज्य व पुढे स्वराज्यास निश्चित अमूल्य योगदान दिले असेल. ह्या गडाला "सारंगगड" असेही दूसरे नाव आहे पण ते ऐवढे प्रचलित नाही. गडावरुन डोंगरभटक्या आणि जंगलभटक्यांच्या आवडता वासोटा किल्ल्याचे दर्शन होवू शकते तर दक्षिणेस प्रचितगड ही दिसू शकतो.
निबिड जंगल, जंगालातील श्वापदांची भेट, नीरव शांतता, स्वर्गसुख ह्याची अनुभूति घ्यायची असेल तर ह्या अरण्य गडदुर्गेचे दर्शन घ्यायला हवे आणि हो किल्ल्याला जाताना किंवा त्यापूर्वी वन विभागाची परवानगी घ्यायला विसरू नका.
~विराग
छान महिती
छान महिती
धन्यवाद इनमीन तीन
धन्यवाद इनमीन तीन
छान माहिती आणि फोटो
छान माहिती आणि फोटो
20०० साली गेलो होतो,तेव्हा
20०० साली गेलो होतो,तेव्हा आजच्यासारखे कमर्शीयल ट्रेक ग्रुप न्हवते.छान अनुभव होता तो.