काल सकाळी दिवस उजाडलाच ते एक टेंशन घेऊन. मी काम करत असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये एक गोंधळ झाला होता. काही लाख युरोंचा क्लेम येण्याची शक्यता दिसत होती. ज्यात चूक कोणाची म्हणून पाठपुरावा करायचा झाल्यास सारी बोटे माझ्याच दिशेने येऊन थांबली असती. आणि ती चूक माझीच होती. छोटीशीच होती, थोडासा धांदरटपणा, थोडा हलगर्जीपणा. पण त्याचे परीणाम फार मोठे होते. जर युरोचे रुपयांत गुणोत्तर मांडले तर मला आयुष्यभर याच कंपनीत फुकट राबावे लागले असते ईतके मोठे.
सकाळचा चहा माझ्या घश्याखाली एवढ्यासाठीच उतरला की अजून त्या गोंधळाचा मेल तीन लोकांच्या बाहेर गेला नव्हता. तातडीने प्रोजेक्ट मॅनेजरने संध्याकाळी एक ईंटरनल स्काईप मिटींग ठेवली. ज्यात एक मी, दुसरे माझे सर, तिसरा तो प्रोजेक्ट मॅनेजर स्वत: आणि क्लायंटची दोन वरच्या लेव्हलची माणसे असे पाचच जण असणार होते. त्या मोठ्या लोकांसमोर काय घोळ झालाय, कश्यामुळे झालाय, कोणामुळे झालाय, हे सारे मलाच सांगावे लागणार होते. त्यानंतर आम्ही सर्व मिळून तो घोळ कसा निस्तरावा याची चर्चा करणार होतो.
दुपारचे जेवण एवढ्यासाठीच घश्याखाली उतरले की माझ्या बॉसने मला सांगितले की वाईटात वाईट म्हणजे तुझी नोकरी जाईल. "यूह कॅन लूज युअर जॉब !".. पण पैश्याचा क्लेम आल्यास कंपनीचा इन्शुरन्स असतो. नुकसानभरपाईसाठी कोणी तुझी कॉलर धरणार नाही.
नोकरी गेली अशी मनाची तयारी केल्यावर जेवण तर घश्याखाली उतरले. पण पोटात ढवळू लागले. दुपारी मी नेहमी जेवल्यावर एकटाच वॉल्कला जातो. हल्ली अॅसिडीटीचा त्रास वाढल्याने ही चांगली सवय लावली आहे. दहा मिनिटे चालतो, दहा मिनिटे एका बाकावर बसतो, दहा मिनिटे पुन्हा परतीचे चालून ऑफिसला पोहोचतो. टोटल अर्धा तास. आज मात्र दोन मिनिटे चालत होतो, दोन मिनिटे बसत होतो. फार काळ स्वस्थ बसता येत नव्हते. दोन मिनिटांनी पुन्हा उठून चालत होतो. चालता चालता डोक्यात त्याच नकारात्मक विचारांना पुन्हा चालना मिळत होती आणि डोके शांत करायला पुन्हा दोन मिनिटे बसत होतो. बसल्यावर पुन्हा दोनच मिनिटांत, ‘आपण असे हातावर हात धरून स्वस्थ बसूच कसे शकतो’ या विचाराने, या भितीने उठून पुन्हा चालत होतो. अगदी वेडा झालो होतो. "आता पुढे काय?" हे विचार डोक्यात येताच छातीतील धडधड वाढत होती. पण ते विचार थोड्याच वेळात प्रत्यक्षात घडणार असल्याने डोक्यातून काढूनही टाकता येत नव्हते.
एखाद्या वडिलधार्या माणसाने पाठीवर आश्वासक थोपटावे, आईने कुशीत घ्यावे, गर्लफ्रेंडने ‘सारे काही ठिक होईल रुनम्या’ म्हणत हात हातात घ्यावा, असे आणि बरेच काही वाटत होते. पण त्यांच्यापैकी कोणीही आता माझ्या जवळ नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रोज मी एक ते दिड फेरफटका मारतो, पण आज दोन वाजत आले तरी ऑफिसबाहेरच होतो. ठिक पाच वाजता मिटींग होती. पण मला आज पाच वाजूच नये असे वाटत होते. शेवटी सर मला शोधत बसतील आणि जागेवर न दिसल्यास आणखी चिडतील म्हणून नाईलाजाने उठलो आणि पावले ऑफिसच्या दिशेने वळली.
आता पर्यंत ऑफिसमध्ये सर्वांना हे समजून गोंगाट झाला असेल का? लंचटाईममध्ये सोबत जेवताना सरांनी सेक्शन मॅनेजरला याबद्दल सांगितले असेल का? ऑफिसमध्ये पाय ठेवताच मला केबिनमध्ये बोलावणे येईल का? कोणाच्या नजरेत सहानुभुती असेल, कोणाच्या नजरेत कुत्सितपणा, कोण अरेरे म्हणत असेल, कोण म्हणत असेल बरे झाले जिरली याची... एखाद्या फाशीच्या कैद्याला वधस्तंभाकडे जाताना जे काही वाटत असेल अगदी तसेच मला ऑफिसमध्ये परतताना वाटत होते. पावले जड होत होती, छातीतील धडधड कुठल्याही क्षणी मी हार्ट अॅटेक येऊन जमिनीवर कोसळेन ईतकी वाढली होती. मला खरेच त्याक्षणी गरज होती ती कुठल्यातरी मानसिक आधाराची. अजून काही वेळ ही धडधड अशीच राहिली तर माझी छाती फाडून बाहेर येईल. नाही नाही, नोकरी जाईल ते परवडले.. पण जीव नाही गेला पाहिजे.. माझी आई, माझे बाबा, माझी गर्लफ्रेंड... माझे कित्येक मित्र.. या सर्वांना मी हवा आहे. आयुष्यात आलेला हा फक्त एक प्रॉब्लेम आहे. आज आहे तर उद्या नसेल. मी मात्र असलोच पाहिजे. ही छातीतली धडधड कमी झालीच पाहिजे. सारे काही समजंसपणाचे सुचत होते, पण ती धडधड त्या विचारांनी काही कमी होत नव्हती. कारण मी स्वत:च स्वत:ला मुर्खासारखा धीर देतोय हे जाणवत होते. आयुष्य फार किंमती आहे हे माझ्या मनात येणारे विचार अगदी बरोबर असले तरी माझे मीच मला पटवून देऊ शकत नव्हतो. येणार्या संकटाशी लढायची हिंमत, मानसिक बळ मला कुठूनही मिळत नव्हते, आणि अश्यातच त्याची आठवण झाली...
हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून गौरवल्या गेलेल्या परमेश्वराची. सर्व शक्यतांचा विचार करता आता एखादा देवाचा चमत्कारच मला यातून बाहेर काढू शकत होता. पण जगात देव नाही यावर माझा ठाम विश्वास असल्याने तसे होणार नाही हे देखील मला माहीत होते. आणि अचानक मला फार वाईट वाटले. कारण आज जर माझा देवावर विश्वास असता, तर त्याचा मी धावा केला असता. त्याला साकडे घातले असते. आणि अद्रुश्य रुपात तो आपल्या पाठीशी उभा आहे असा विश्वास स्वत:ला मिळवून दिला असता,. आणि भले प्रत्यक्षात कोणीही देव नसला तरी, निव्वळ त्या देवावरच्या विश्वासाने माझ्या छातीतील धडधड नक्कीच कमी झाली असती.
एक क्षण असेही वाटले की हीच योग्य वेळ आहे देवावर विश्वास ठेवायची. आज आत्ता ताबडतोब, बोलूयाच देवाला नवस. आणि ठेवूयाच त्यावर विश्वास. घेऊया तर आज देवाची परीक्षा. काढ मला या संक्टातून बाहेर. मग मानतो तुला...
पण मुळातच विश्वास नसल्याने उगाच आव आणून खोटा विश्वास भासवण्यात अर्थ नव्हता. कारण ते स्वत:लाच पटणारे नव्हते. स्वत:च स्वत:ला असे फसवता येत नाही. थोडक्यात छातीतली धडधड काही कमी होणार नव्हती. आणि ती शेवटपर्यंत झाली नाहीच.
आजवर मी समजायचो की नास्तिक लोकं म्हणजे फार डेअरींगबाज. त्यांना देव नावाच्या कुबड्यांची गरज पडत नाही. पण आज मला समजले, संकटात सापडले की ज्याची गाळण उडायची त्याची ती उडतेच. मग आस्तिक असो वा नास्तिक. फरक ईतकाच, की आस्तिक लोकं देवाचा जप करत मन:शांती मिळवतात. पण त्याचवेळी नास्तिक विचारांचा माणूस छातीतील धडधड टाळू शकत नाही. भले देव जगात नसला तरीही आस्तिकांना मिळणारी मन:शांती मात्र खरीखुरी असते. पण तीच नास्तिक ईतक्या सहजी मिळवू शकत नाही. खर्रंच, नास्तिकत्व हा एक शाप असतो.
__________________________________________
लेख ईथेच संपला, पण किस्सा अनुत्तरीत राहायला नको.
__________________________________________
छातीतल्या त्याच धडधडीसह मी ऑफिसला पोहोचलो. क्लायंटची माणसे संध्याकाळी हजर राहू शकत नसल्याने मीटींग दुसर्या दिवशी संध्याकाळी ठेवण्यात आली असे समजले. छातीतली धडधड तात्पुरती थांबली. दुसर्या दिवशी म्हणजे आज पुन्हा एकदा ती मिटींग तासभर पुढे ढकलली गेली. अखेर सहा वाजता एकदाची झाली. अर्ध्या तासांतच संपली. निव्वळ आश्चर्यकारकरीत्या मी यातून सहीसलामत सुटलो. या आधी मला कल्पना नसलेली काही नवीन माहीती समोर आली, ज्यानुसार फार मोठा आर्थिक फटका बसला नव्हता. आणि जो थोडाथोडका बसला होता त्यात माझी एकट्याचीच चूक नव्हती, थोडीफार क्लायंटचीही चूक असल्याचे पुढे आले. तसेच माझी चूक देखील "बडे बडे प्रोजेक्ट मे ऐसी छोटी छोटी गलतिया होती रहती है" म्हणून सोडून देण्यासारखी होती.
मिटींग संपल्यावर मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता. मी तसाच बॉसच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांच्यासमोर केवळ एक समाधानाचा सुस्कारा टाकून परत आलो. एकीकडे आनंद होत होता, तर दुसरीकडे मनात विचार येत होते.. जर मी काल देवावर विश्वास ठेवायचा असे ठरवून त्याचे नामस्मरण केले असते, तर आजच्या चमत्कारानंतर माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला असता. आणि कदाचित ते चांगलेच झाले असते. कारण नास्तिक असणे हा शाप असतो हे मला काल उमगले होते.
- समाप्त -
ईतर नास्तिकांनी आपापले विचार झरूर मांडा
शुभरात्री शब्बाखैर....
शुक्रिया,
- ऋन्मेष
मात्र जास्त आयक्यू असलेल्या
मात्र जास्त आयक्यू असलेल्या व्यक्तीकडे त्याच्या वैचारिक क्षमतेमुळे या बाबी आधीच असतात. त्यामुळे त्याला कदाचित त्याची गरज नसू शकते.
>>>>>
सोनू, ओके.
आणि हो, पुढे हे स्पष्टी सविस्तर लिहिलेत हे चांगलेच ना. कारण तुम्ही अमुकतमुक अर्थ काढू नका म्हटले तरी लोकं पहिला अर्थ सोयीने सरळ आणि सोपाच काढणार. कारण लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचणे लगेच होत नाही. मराठीत असेल तर थोड्यावेळाने जेवून चेक करतो
शीर्षक संपादले आहे आणि त्यात
शीर्षक संपादले आहे आणि त्यात प्रश्नचिन्ह टाकले आहे
नास्तिक
नास्तिक
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते,
की कोणीतरी आपापल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो,
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा..
कोणीतरी स्वत:चे ओझे, स्वत:च्याच पायांवर,
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच !
म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो,
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित,
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे !
मौनाची भाषांतरे - संदीप खरे
* दामले मास्तरांच्या भीतीने एडिटेड व्हर्जन आहे, अजून 2 कडवी हवी असल्यास गुगल करावे
पगारेजी, गाडगेबाबांबद्दल
पगारेजी, गाडगेबाबांबद्दल माहिती नाही मात्र म.फुले त्या काळाच्या मानाने सुशिक्षीत वर्गातच गणले जातील. दुर्दैवाने म. ज्योतीराव फुल्यांचा जो फोटो प्रसिद्ध आहे मुंडासे घातलेला व घोंगडी घेतलेला तो त्यांनी एका विशिष्ट प्रसंगी विशिष्ट कारणास्तव घातला होता. त्यांचे चरीत्र वाचले तर हा प्रसंग समजेल.** मात्र या एका फोटो/प्रतिमेमुळे लोकांचा समज होतो की ते अशिक्षीत शेतकरी होते. म. फुले एक यशस्वी उद्योजक सरकारी कंत्राटदार (बांधकाम/मटेरिअल सप्लाय) होते.
माझ्या मते त्यांना मिळालेल्या शिक्षणामुळे त्यांचे विचार बनले व त्यांच्या हातून पुढे इतके महत्वाचे कार्य झाले.
** पगारेंनी ते नक्की वाचले असेल व त्यांना या प्रसंगाची माहिती आहे हे गृहीत धरुन
एक खराखुरा नास्तिक जेव्हा
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
हे माझ्याबाबत फार सहज घडते. म्हणजे मी कसा नास्तिक आहे बघा हे दाखवायला बाहेर थांबत नाही तर बस्स बोअर होते मला आतमध्ये तर मी बाहेरच हवा खात थांबतो असे सहज होते. किंवा बाहेर बोअर होतेय, गोंगाट चालूय, तर चला आत एक कोपरा पकडून बसूया बाकीच्यांचे दर्शन आटपेपर्यंत असेही होते. प्रसादात तर निव्वळ मिठाई दिसते. पेढा दिसल्यास आपसूक हात पुढे होतो तर खडीसाखर, फुटाणे दिसल्यास राहू द्या, घेतला बोलून पुढे जातो.
टवणे सर, तो प्रसंग माहित आहे
टवणे सर, तो प्रसंग माहित आहे. महात्मा फुले हे शिकलेले असले तरी लौकिकद्रुष्ट्या त्यांचे शिक्षण हे कमी होते असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तरी त्यांच्यापुढे स्वतंत्र बुध्दिमत्तेच्या बाबतीत सध्याचे पिएचडिही कमी पडतील.
छान चर्चा चालू आहे.माझे
छान चर्चा चालू आहे.माझे म्हणने आहे की तुम्ही एमोशनल ग्रांउंड्स वर नास्तिक होऊ नका तर इंटेलेक्ट्युअल ग्राउंड्सवर व्हा.
माझे वाईट झाले,जवळच्या कुणाचा मृत्यु झाला,सुनामी आली व लोक मेले अशी भावनिक कारणाने देव नाकारु नका.जर आपण नीट विचार केला तर विश्वात काहीच phenomenal नाही हे सहज लक्षात येईल.त्यामुळे बुद्धीच्या पातळीवर आस्तिक नास्तिकतेचा विचार करावा.
आस्तिक खूप विचारांती नास्तिक
आस्तिक खूप विचारांती नास्तिक बनू शकतो ,
आस्तिक जो भावनिक धक्क्याने नास्तिक बनतो तो खरा नास्तिक नव्हे, ते त्याचे लटके भांडण असते त्याच्या देवाशी.
आस्तिक ते नास्तिक बदल बराच सुरळीतपणे पार पडतो.
पण नास्तिक ते आस्तिक बदल खूप disruptive असतो, जास्तीत जास्त वेळा असा बदल होणारा माणूस बुवाबाजी, कर्मकांड च्या मागे लागलेला दिसतो.
* पाहण्यात आलेल्या anecdotal उदाहरणांवरून
जे आस्तिक आहेत त्यानांही दु:ख
जे आस्तिक आहेत त्यानांही दु:ख आहे . जे नास्तिक आहेत त्यानाही दु:ख आहे . कोणी कसे असावे हा वैयक्तिक चॉइस आहे . ज्याला जसे जमेल तसे राहावे . पण शेवटी माणूस म्हणूनच जगावे .
छन्नी हातोड्याचा घाव
करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे
त्याचं माणूस हे नाव
सिंबा, सिंजी ... दोघांचाही
सिंबा, सिंजी ... दोघांचाही मुद्दा बहुधा एकच आहे आणि त्याला प्लस वन आहे.
वर लेखातल्या घटनेत देवाची गरज भासण्यापेक्षा जी भावनिक वा मानसिक गरज भासली ती देव नावाची संकल्पना पुर्ण करू शकते हे मला जाणवले. पण त्यासाठी तुमचा त्यावर आतून मनापासून विश्वास हवा तरच तो देव ईफेक्टीव्हली काम करणार.
ईथे देव मानणे हा सकारात्मक एटीट्यूड झाला की नकारात्मक हे केवळ देव मानतो की नाही यावरूनच ठरवणे ईथे चूक ठरेल. एक्चुअल प्रॉब्लेम फेस करताना तुम्ही त्या विश्वासाला स्ट्रेंथ बनवता की निव्वळ आधार बनवत त्यावर विसंबून राहता यावर ते ठरते. पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये कमी अधिक प्रमाणात विसंबून राहणे होतच असावे.
>>>इथे भारंभार धागे काढायचे
>>>इथे भारंभार धागे काढायचे आणि इतरांनी काढलेल्या धाग्यांवर जाऊन भारंभार प्रतिसाद द्यायचे थांबवून कंपनीच्या कामात , ज्यामुळे रोजीरोटी मिळते , त्या कामात लक्ष घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवला तर अशा चुका सहज टाळता येतील. मग आस्तिकांनी आपल्यासाठी देवाला वेठीला धरायचा किंवा नास्तिकांनी मी देव मानतच नाही मग आता फक्त आपले बिपि जितके वाढेल तितके बघू म्हणायचा प्रसंगच येणार नाही.<<<
साधना ह्या आयडीने इतका वैयक्तिक प्रतिसाद द्यायचे कारण समजले नाही . आणि ऑफीसमधून "बहुतेक" जण मायबोली वर येत असावेत . किंबुहुना तुम्ही सुद्धा येतच असाल असं म्हणायला वाव आहे. पण त्याचा अर्थ, तुम्ही सुद्धा किती कामचुकार आहात असे "ऊगीच" जजमेंत पास कशाला करा व ते चुकीचेच आहे आनि सर्व्सकटीकरण ठरेल.
अतिशय अस्थानी प्रतिसाद वाटला नक्की म्हणून हि पोस्ट नाहीतर ...
@वेमा,साधना व टिपापावरचे अनेक
@वेमा,साधना व टिपापावरचे अनेक सदस्य ऋन्मेषला वैयक्तीत प्रतिसाद देत असतात.वर झंपी यांनी तोच मुद्दा मांडला आहे.कृपया आपण लक्ष देणार का?
ऋन्मेऽऽष, आपले नास्तिकत्व
कबुतर बनलेला देव पोरका झाला!
कबुतर बनलेला देव पोरका झाला!
अनंतयात्री राहुल
अनंतयात्री

राहुल
<<<ज्यामुळे रोजीरोटी मिळते ,
<<<ज्यामुळे रोजीरोटी मिळते , त्या कामात लक्ष घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवला तर अशा चुका सहज टाळता येतील. >>>
अगदी खरे!
मायबोली वर वेळ घालवण्यापेक्षा कामात लक्ष घातले तर आस्तिकता, नास्तिकता याचा काही फरक पडत नाही. नि जीवावर नि नोकरीवर बेतल्यावर एकदम आस्तिकता नास्तिकता यांचे विचार आणून काSSहिही उपयोग नाही. त्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार महत्वाचा.
जर कठीण प्रसंगी “आपल्याला
जर कठीण प्रसंगी “आपल्याला जास्त दडपण येतंय, जास्त मानसीक त्रास होतोय, त्या आस्तिकांच एक बरं असतं, देवावर हवाला ठेवून मोकळे. मला मात्र माझं स्व:लाच निस्तरावं लागतं” असं काही वाटत असेल तर आपली नास्तिकता अजून बऱ्याच अप्रगल्भ अवस्थेत आहे असे समजावे.
नास्तिकता अप्रगल्भ अवस्थेत
नास्तिकता अप्रगल्भ अवस्थेत असणे..... म्हणजे काय? प्लीज ईलॅबोरेट
मायबोली वर वेळ घालवण्यापेक्षा
मायबोली वर वेळ घालवण्यापेक्षा कामात लक्ष घातले तर.... >>>>>> यावर बोलण्यात बरेच लोकांना ईण्टरेस्ट आहे हे लक्षात आल्याने याचा मी वेगळा धागा काढायचा ठरवले आहे. त्या धाग्यावर ही चर्चा पुढे नेता येईल. तरी येथील नास्तिकत्व एक शापाची चर्चा भरकटू नये याबाबत सर्वांचे सहकार्य अपेक्षित.
धन्यवाद
- धागाकर्ता ऋन्मेष
प्रसंगाचं वर्णन चांगलं केलंय.
प्रसंगाचं वर्णन चांगलं केलंय. लेखातला विचार पटला.
<इथे भारंभार धागे काढायचे आणि इतरांनी काढलेल्या धाग्यांवर जाऊन भारंभार प्रतिसाद द्यायचे थांबवून कंपनीच्या कामात , ज्यामुळे रोजीरोटी मिळते , त्या कामात लक्ष घालण्याचा प्रामाणिकपणा दाखवला तर अशा चुका सहज टाळता येतील. मग आस्तिकांनी आपल्यासाठी देवाला वेठीला धरायचा किंवा नास्तिकांनी मी देव मानतच नाही मग आता फक्त आपले बिपि जितके वाढेल तितके बघू म्हणायचा प्रसंगच येणार नाही.
Submitted by साधना on 27 September, 2017 - 14:38 >
वेबमास्तरांचा फेरा या धाग्यावर पडतो का त्याची वाट पाहतोय.
इथे अभिप्रेत अस्णारी ' देव'
इथे अभिप्रेत अस्णारी ' देव' या सन्कलपनेची व्याख्या कुणी
पोस्ट करेल का?
हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून
हो त्याच, परमशक्तीशाली म्हणून गौरवल्या गेलेल्या परमेश्वराची. सर्व शक्यतांचा विचार करता आता एखादा देवाचा चमत्कारच मला यातून बाहेर काढू शकत होता. पण जगात देव नाही यावर माझा ठाम विश्वास असल्याने तसे होणार नाही हे देखील मला माहीत होते. आणि अचानक मला फार वाईट वाटले. कारण आज जर माझा देवावर विश्वास असता, तर त्याचा मी धावा केला असता. त्याला साकडे घातले असते. आणि अद्रुश्य रुपात तो आपल्या पाठीशी उभा आहे असा विश्वास स्वत:ला मिळवून दिला असता,.
ईथे तुम्ही नकळत देवाचे नुसते स्मरण केले आहे. देवाला तेवढेच पुरेसे असते. त्यामुळे देवानी तुम्हाला त्याची प्रचिती दाखवली. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका देव त्याचे काम करून गेला आहे.
तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू
तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका देव त्याचे काम करून गेला आहे. >>>
व्वा! निर्झरा, तुम्ही एकदम मुळावरच घाव घातलांत की हो!!!!
देव त्याचे काम करुन गेला असा
देव त्याचे काम करुन गेला असा विचार हा भाबडेपणाचा आहे.
ईथे तुम्ही नकळत देवाचे नुसते
ईथे तुम्ही नकळत देवाचे नुसते स्मरण केले आहे. देवाला तेवढेच पुरेसे असते. त्यामुळे देवानी तुम्हाला त्याची प्रचिती दाखवली. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका देव त्याचे काम करून गेला आहे. >>> देव ज्याला फारशी गरज नसते त्यालाच का मदत करतो. अगदी देवावर विश्वास नसून सुध्दा.
ऋन्मेऽऽष ला देवाने मदत केली नसती तर काय बिघडल असते. फारतर त्याचा जॉब गेला असता. एक जॉब गेल्यावर त्याला दूसरा मिळालाच असता की. एकंदरीत देवाने मदत केलि नसती तर ऋन्मेऽऽष ला फारसा फरक पडला नसता.
पण आज जे मुंबईला झाल, त्यात मरण पावलेल्या लोकांना देवाने का वाचवले नसेल? त्यांच्या वर तर अतिशय वाईट वेळ आली. नास्तिक असलेल्या ला तत्परतेने मदत करणारा देव ज्यांना गरज आहे अशा लो़कांना मदत करायला का नाही आला.
कंसराज हेच सांगायचे होते.
कंसराज हेच सांगायचे होते. विभागातला लहान मुलगा आईबरोबर फुले आणायला गेला होता पुजेसाठी त्याचाही चिरडुन म्रुत्यु झालाय.
<<<<आस्तिक हा सुशिक्षित असु
<<<<आस्तिक हा सुशिक्षित असु शकतो पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता त्यात नसते.पुराणांना तो कवटाळतो इसापनितीला लाजवतील अशा कथांवर तो विश्वास ठेवतो प्रतिप्रश्न
विचारण्याची सोडा त्याबाबत विचार करण्याबाबतही तो मानसिकद्रुष्ट्या पंगु असतो.>>>
बरे झाले सांगितलेत.
मी ऐकले होते की महात्मा गांधी आस्तिक होते, नक्कीच नसणार.
स्वतंत्र विचार नाहीच, प्रतिप्रश्न विचारण्याची गोष्टच सोडा, मानसिक दृष्ट्या अतिशय पंगू!
त्यांचा सगळ्या पुराणातल्या गोष्टींवर विश्वास, त्यात जात पात यावर बरेच लिहीले होते, ते सगळे त्यांनी प्रमाण मानले होते. रघुपती राघव राजाराम असले भजन म्हणत!
हे सगळे आत्ता कळले. त्यांच्या काँग्रेसमधे कुणि सामीलच व्हायला नको होते, त्यांनी सांगितले म्हणून अहिंसक चळवळ करायलाच नको होती.
आस्तिक लेकाचे!!
महात्माजिंची आस्तिकता मला
महात्माजिंची आस्तिकता मला पसंद आहे हे तुम्हाला कुणी सांगितले? पण त्यांच्यातील इतर गुणांनी ह्या अवगुणावर मात केली.सर्वसामान्य आस्तिकांना हे शक्य नसते.
सर्वसामान्य आस्तिकांना >>>
सर्वसामान्य आस्तिकांना >>>
सर्वसामान्य आस्तिक, असामान्य आस्तिक, सर्वसामान्य नास्तिक, असामान्य नास्तिक...
हा नविनच शोध म्हणावा लागेल!!!
मी विच्चार करतोय माझी नक्की कुठली कैटेगरी
....आणि आस्तिक असणं हा अवगुण
....आणि आस्तिक असणं हा अवगुण आहे, हे ऐकून मी खरंच धन्य झालो!
आता वाटतंय, ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांना खरंच काही कळत नसावे,नाही का????? उगाचच काहीही लिहीण्याचा काथ्याकूट करत बसले लेकाचे... आणि त्यांचं ऐकून, नंतर शरीराच्या अभ्यासातून सांगितलेलं सगळं ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं ते सगळे वेडेच आहेत. निरर्थक निरर्थक....
Pages