तुझ्या आत आहे

Submitted by निशिकांत on 26 September, 2017 - 01:36

झुकावे असे काय दगडात आहे?
तुझा देव मित्रा तुझ्या आत आहे

हरी पावतो संकटी भक्त असता
असे फक्त लिहिले पुराणात आहे

उधारीत सुख आणि नगदीत दु:खे
प्रभूही हिशोबात निष्णात आहे

खुले दार, खिडक्या, हवा खेळते पण
किती कुंद गुदमर उसास्यात आहे!

कसेही असूद्या खुराडे घराचे
समाधान तिथल्या उबार्‍यात आहे

न कचरा न प्लॅस्टिक, हवा शुध्द जेथे
असे गाव कुठल्या नकाशात आहे?

मना वाटते संपवावीच यात्रा
कुठे राम उरला विरामात आहे?

जरी पोट भरतोस सांगून भाकित
उद्या का स्वतःचा तुला ज्ञात आहे?

कुणाला खबर कोण "निशिकांत" कुठला?
तरी गुंफतो नाव मक्त्यात आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
फक्त न कचरा न प्लॅस्टिक... हा शेर अस्थानी वाटला.