आजकाल प्रत्येकाकडे एकतरी लॅपटॉप / डेस्क्टॉप संगणक असतोच. आपण काही आपले संगणक २४ तास वापरत नाही. आपल्या वयक्तीक संगणकाच्या याच रिकाम्या (Idle) वेळेचा वापर करुन आपण काही संशोधन किंवा समाजोपयोगी कामं करु शकतो. यासाठी आपल्याला आपल्या संगणकाचा रिकामा वेळ व त्याची गणक शक्ती ( Computing Power) याचे एक स्वयंसेवक म्हणून योगदान द्यायचे आहे. त्यातले परग्रहवासीय शोधण्याचे काम कसे करावे ते या लेखात बघु. या व्यतिरिक्त इतर कोणत्या संशोधन कामाला तुमचा रिकामा संगणक वापरता येईल त्याची यादी लेखाच्या शेवटी दिली आहे.
हे संशोधन करण्यासाठी आपल्याला एक आधुनिक वयक्तीक संगणक (लॅपटॉप किंवा डेस्क्टॉप), पुरेसे वेगवान व स्थिर ईंटरनेट कनेक्शन आणि रिकाम्या वेळेत संगणक चालवण्यासाठी लागणारी वीज या गोष्टी आवश्यक आहेत. आज आपण जे वयक्तीक संगणक वापरतो ते पुर्वीच्या मानाने खुपच शक्तिशाली आहेत. फार पुर्वी सुपरकंप्युटरमधे वापरात असलेल्या रॅम पेक्षा जास्त रॅम आपल्या वयक्तीक संगणकाची असते. तरीही कोणत्याही संशोधनासाठी लागणारी संगणक शक्तीची गरज ही प्रचंड असते व ती गरज एकटा आपला वयक्तीक संगणक पुरवु शकत नाही. त्यासाठी अशा संशोधनात स्वयंसेवक म्हणुन भाग घेणा-या सर्व संगणकांची एक ग्रीड बनवलेली असते. या ग्रीडची मिळुन एकत्रीत शक्ती पुरेशा कालावधीसाठी हवी तेवढी मिळाली तर ती पुरेशी असते.
यासाठी डिस्ट्रीब्युटेड कंप्युटींग व ग्रीड कंप्युटींग ( Distributed and Grid Computing ) या दोन संकल्पना वापरल्या जातात. डिस्ट्रीब्युटेड कंप्युटींग म्हणजे एका नेटवर्कमधे असलेले सर्व संगणक एकमेकांना संदेश पाठवुन सहयोगाने एखादे काम करत असतात. तर ग्रीड कंप्युटींग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले असे अनेक डिस्ट्रीब्युटेड कंप्युटींग संच एकत्रितपणे एक प्रचंड मोठा व्हर्चुअल संगणक म्हणुन काम करत असतात. हे फारच थोडक्यात सांगितलेले आहे. डिस्ट्रीब्युटेड कंप्युटींग बद्दल आणखी जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा. ग्रीड कंप्युटींग बद्दल आणखी जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.
परग्रहवासीय शोधण्यासाठी आपण ज्या प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून भाग घेणार आहोत, त्या प्रकल्पाचे नाव आहे SETI@home. सेटी अॅट होम ( SETI at home ) यातील सेटी म्हणजेच सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रिअल ईंटेलिजन्स ( Search for ExtraTerrestrial Intelligence ).

अनेक देशांच्या अवकाश संशोधन संस्थांच्या अनेक दुर्बीनी या अवकाशातुन येणा-या रेडीओ लहरी पकडुन त्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना तो डेटा उपलब्ध करुन देत असतात. १९९५ मधे डेविड गेड्ये यांनी SETI@home प्रकल्पाचा विचार मांडुन त्याची जुळवाजुळव केली. दुर्बिनींकडून मिळालेला रेडीओ लहरींचा हा डेटा प्रोसेस करण्यासाठी जगभरातले अनेक वयक्तीक संगणक ग्रीड कंप्युटींग मधे वापरुन तो डेटा प्रोसस करण्याचा वेग व कार्यक्षमता वाढवणे ही यामागची मुळ कल्पना आहे. मे १९९९ पासुन युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेच्या ( The University of California, Berkeley ) स्पेस सायन्सेस लॅबॉरेटरी ( Space Sciences Laboratory - SSL ) इथे हा प्रकल्प कार्यान्वित आहे.

SETI@home हा आंतरजालाच्या माध्यमातुन चालणारा स्वयंसेवक संगणकीय प्रकल्प असुन परग्रहवासीय शोधणे हे त्याचे मुख्य धेय्य आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
प्रकल्पाची साधारण रुपरेषा:
- सेटी अॅट होम या प्रकल्पाला, अरेसिबो रेडीओ टेलिस्कोप ( Arecibo Radio Telescobe Observatory ) व ग्रीन बँक टेलिस्कोप ( Green Bank Radio Telescope Observatory ) या दोन दुर्बीनींकडून रेडीओ लहरींचा डेटा मिळतो.
- तो डेटा सेटी अॅट होम डिजीटाईज करुन एकेकट्याने प्रोसेस करता येतील अशा छोट्या छोट्या टास्क्स मधे रुपांतरीत करतो.
- ते टास्कस जगभरच्या स्वयंसेवक संगणकांना प्रोसेस करण्यासाठी पाठवले जातात.
- वयक्तीत संगणक त्याचे काम झाले की, झालेले काम परत सेटी अॅट होम च्या सर्वर वर चढवतो.
मिळालेल्या टास्कमधील डेटा मधे विशिष्ट अल्गोरिदम व नियमावली प्रमाणे जुळणारा एखादा सिग्नल सापडतो का हे तपासणे हे तुमच्या संगणकाचे काम असते. कोणता डेटा म्हणजे परग्रहवासींयाकडुन आलेला अपेक्षीत सिग्नल आहे हे या लेखाच्या अवाक्याबाहेरचे आहे म्हणुन ते इथे समाविष्ट केलेले नाही.
सेटी अॅट होम च्या सर्वर ला जोडने, टास्क उतरवुन घेणे व काम झाल्यावर ते परत चढवणे. हे करताना तुम्ही किती काम केले त्यासंबंधी माहिती साठवुन ठेवणे व हे सगळे तुमच्या हस्तक्षेपाशिवाय ठरावीक वेळी आपोआप करणे यासाठी तुमच्या संगणकावर एक सॉफ्टवेअर टाकणे जरुरी आहे.
बर्कले ओपन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नेटवर्क कंप्युटींग (Berkeley Open Infrastructure for Network Computing) अर्थात BOINC असे या सॉफ्टवेअरचे नाव असुन ते एक मुक्तस्त्रोत स्वयंसेवक ग्रीड कंप्युटींग अॅप्लिकेशन ( Open Source Volunteer Grid Computing Application ) आहे. हे एक मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर असुन, स्पेस सायन्सेस लॅबोरेटरी, युनिवर्सीटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील एका टीमने ते तयार केलेले आहे. सद्ध्या बॉइन्क व सेटी हे दोन्ही प्रकल्प डेवीड अॅन्डरसन यांच्या नेतृत्वाखाली युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नीया इथे चालु आहेत.

BOINC वापरुन तुम्ही सेटी अॅट होम व इतर अनेक स्वयंसेवक ग्रीड कंप्युटींग प्रकल्पांमधे भाग घेऊन विविध संशोधनासाठी किंवा समाजोपयोगी कामासाठी योगदान देऊ शकता. बॉईन्क बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
बॉईन्क ईन्स्टॉल कसे करावे:
http://boinc.berkeley.edu/download.php या पानावर जाऊन तुमच्या ऑपरेटींग सिस्टीमसाठीचे बॉईन्क ईन्स्टॉलर उतरवुन घ्या. विंडोजवर नेहमीप्रमाणे दोनदा क्लिक करुन त्याचे इन्स्टॉलेशन सुरु करु शकता. लिनक्सवर अधिकॄत रिपॉझिटरीमधुन मिळालेले ईन्स्टॉल करणे उत्तम. सुरुवातील बॉईन्कचे एकदाच कन्फिगरेशन करावे लागेल. यात तुमच्या आवडीचा प्रकल्प, तुमचा संगणक कोणत्या वेळेत काम करणार ती वेळ ई. तपशील भरावा लागेल. खाली दाखवलेले सर्व स्क्रिनशॉट हे बॉईन्क च्या ७.६.३१ आवृत्तीमधुन आहेत व बॉईन्कचे "सिम्पल व्ह्यु" वापरलेले आहे. अॅडव्हान्स व्ह्यु साठी View -> Advanced View ईथे जाऊ शकता.
सॉफ्टवेअर चालु केल्यानंतर पहिल्याच स्क्रिनवर तुमच्या पसंतीचा प्रकल्प निवडता येईल:
प्रोजेक्ट्सच्या यादी मधे खाली स्क्रोल करुन SETI@home हा पर्याय निवडा. त्याच्या उजव्या बाजुला त्या प्रकल्पाबद्दल माहिती व लिंक दिसेल.
नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर सेटी च्या सर्वरला जोडणी चालु होईल.
सर्वरला जोडल्यानंतर तुम्हाला लॉगीन करावे लागेल. याच स्क्रिनवर ईमेल व पासवर्ड टाकुन नवीन खाते बनवु शकता किंवा असलेल्या खात्यात लॉगिन करु शकता.
एकदा तुम्ही लॉगीन झालात की, तुम्ही निवडलेला प्रकल्प तुमच्या खात्यात समाविष्ट केला जाईल.
फिनिश बटनावर क्लिक केल्यानंतर ही विंडो बंद होईल व तुम्ही मुख्य स्क्रिनवर याल. इथे तुम्ही नुकताच साठवलेला प्रकल्प दिसेल. आपण सेटी अॅट होम हा प्रकल्प निवडला होता. चित्रात दाखवल्याप्रमाणे बॉईन्क आता सेटी सर्वरला जोडुन पुढिल सुचना व डेटासाठी प्रतिक्षा करत आहे.

सेटी सर्वरवरुन टास्क्स उतरवुन घेतले जात आहेत.

तुम्ही निवडलेल्या प्रकल्पाकडुन वेळोवेळी विविध सुचना तुम्हाला मिळतील. नवी सुचना आल्यानंतर नोटीसेस बटनाभोवती लाल चौकोन दिसु लागेल.

नोटिसेस बटनावर क्लिक केल्यानंतर, त्या प्रकल्पाकडुन आलेल्या अलिकडच्या सुचना वाचु शकता.

Options -> Computing Preferences या मेनुमधे जाऊन तुमचा संगणक या प्रकल्पावर कधी व किती वेळ काम करेल, डिस्क स्पेस किती वापरेल व लॅपटॉप जर बॅटरीवर असेल तेव्हा तुम्हाला बॉइन्क चालु ठेवायचे की नाही इ. पर्यायांचे तपशील ठरवु शकता.

दिवसाच्या विशिष्ट वेळेतच सेटी चे काम करण्यासाठी "Compute Only Between" हा पर्याय वापरा. २४ तास रुपात इथे वेळ टाका.
प्रत्येक काम झाल्यानंतर तुमच्या संगणकाला ते सेटी च्या सर्वरवर अपलोड करायचे असते. यासाठी तुमच्या ईंटरनेट सेवेच्या अपलोड बँडविड्थचा वापर होईल. हे अपलोड दिवसाच्या विशिष्ट वेळेतच करण्यासाठी "Transfer Files Only Between" या पर्यायाचा वापर करावा. तिथेच खाली तुमच्या संगणकाची जास्तीत जास्त किती डिस्क स्पेस या कामासाठी वापरली जावी हे ठरवु शकता.
Options -> Other Options या मेनु मधे जाऊन भाषा, HTTP & SOCKS Proxy यांचे कंफिगरेशन करु शकता. तुमच्या घरच्या ईंटरनेट सेवेमधे शक्यतो या प्रॉक्सि वापरात नसतील तेव्हा हा पर्याय तुम्ही दुर्लक्षु शकता. कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजात यांचे तपशील तुम्ही तुमच्या नेटवर्क अॅडमीनला विचारु शकता. कामाच्या ठिकाणीही या प्रॉक्सी वापरात नसतील तर तिथेही तुम्हाला याचे कंफिगरेशन करण्याची गरज नाही.

तुमचे बॉईन्क सॉफ्टवेअर आता सेटी कडून मिळालेले काम चालु करण्यास तयार आहे. तुम्ही कंफिगर केलेल्या वेळेनुसार हे काम चालु होईल. बॉईन्क ने आत्तापर्यंत नक्की काय काम केले व सद्ध्या काय चालु आहे याचा लॉग बघण्यासाठी Tools -> Event Log या मेनुचा वापर करुन खालील प्रमाणे लॉग बघु शकता. खालील चित्रात १ टास्क डाऊनलोड केले आहे हा मेसेज दिसत आहे.
सर्व कंफिगरेशन झाल्यानंतर बॉईन्क तुम्ही दिलेल्या वेळेप्रमाणे आपोआप काम करण्यास तयार आहे. तुम्ही ही विंडो बंद करु शकता. इथुन बाहेर पडताना, चालु असलेले सगळे टास्क बंद करा किंवा बाहेर पडल्यानंतरही ते टास्क्स बॅकग्राऊंडमधे चालु ठेवा असे पर्याय आहेत.
इथुन बाहेर पडताना सर्व टास्क बंद केले तर लिनक्समधे बॉइन्क डेमोनही बंद होतो. तो परत चालु करण्यासाठी "boinc" ही कमांड बॅकग्राऊंडमधे वापरु शकता.
ईन्स्टॉल करताना काही समस्या आल्यास आणखी माहितीसाठी इथे क्लिक करा. बॉईन्क सॉफ्टवेअरचे युजर मॅनुअल वाचण्यासाठी इथे क्लिक करा. बॉईन्क हे खरेतर फक्त सेटी अॅट होम प्रकल्पासाठी बनवलेले होते. पण नंतर ते इतर अनेक प्रकल्पांमधे वापरले जाऊ लागले. तुम्ही जर एकापेक्षा जास्त प्रकल्पांमधे योगदान देणार असाल तर ते सर्व प्रकल्प मॅनेज करण्यासाठी बॉईन्क अकाऊंट मॅनेजर वापरुन काम सोपे करु शकता. त्याबद्द्ल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
बॉईंन्क वापरुन विविध प्रकल्पांवार काम केल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून बॉईन्क क्रेडीट पॉईन्ट्स मिळतात. अनेक युजर यासाठी खेळीमेळीची स्पर्धा करत असतात. बॉईन्क क्रेडीट बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. तुमच्या संगणकाने सबमीट केलेले काम खरे व योग्य गुणवत्तेचे आहे की नाही हे तपासण्याची सुविधा बॉईन्क सॉफ्टवेरमधेच असते. अशा प्रकल्पांमधे काम करताना तुम्ही तुमचा संघ बनवुन जास्तीत जास्त योगदान देऊ शकता. बॉईन्क टीम्स बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
इतर बॉईन्क प्रकल्पः
सर्व बॉईन्क प्रकल्पांची यादी इथे मिळेल. यामधे जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, कॅन्सर संशोधन यापासुन ते गणीत, खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र, धुमकेतु, क्वेसार, आकाशगंगा ई. अनेक संशोधन शाखांचा समावेश आहे. सेटी अॅट होम व्यतिरिक्त काही इतर प्रसिद्ध प्रकल्प याप्रमाणे:
- Climate Prediction - जागतीक हवामानावर व त्यातील बदलांवर प्रयोग करणे व अभ्यास करणे यासाठी युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड इथे climateprediction.net हा प्रकल्प चालवला जातो.
- ROSETTA@home - प्रथिनांच्या रचनेचा अंदाज बांधण्यासाठी व नविन प्रथिनांची रचना करणे या संबंधी संशोधनासाठी ROSETTA@home हा प्रकल्प आहे. याचा उपयोग जीवशास्त्र व वैद्यकशास्त्रात केला जाऊ शकतो. या प्रकल्पात विविध रोगांवर उपाय शोधण्याचेही काम केले जाते.
- Similarity Matrix of Protiens (SIMAP) - सदरचा प्रकल्प हा प्रथिनांची क्रमवारी व त्यातील क्रमवारीतील सारखेपणा याचा डेटाबेस आहे. टॅक्निकल युनिवर्सिटी ऑफ म्युनिच आणि युनिवर्सिटी ऑफ वियेन्ना यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
- EINSTEIN@home - न्युट्रॉन ता-यांकडुन येणा-या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध घेण्यासाठी EINSTEIN@home या प्रकल्पात भाग घेऊ शकता.
- Malaria Control - Swiss Tropical and Public Health Institute यांनी Malaria Control हा प्रकल्प २००६ मधे चालु केला. मलेरीया रोग कसा पसरतो व त्याचे आरोग्यावरील परिणाम याची संगणकीय नक्कल ( Simulation ) करण्यासाठी हा प्रकल्प आहे.
जाता जाता स्टीफन हॉकिंग परग्रहवासीयांबद्दल काय म्हणाले आहेत ते बघा:
If Aliens visit us, the outcome would be much as when Columbus landed in America, which didn't turn out well for the Native Americans. We only have to look at ourselves to see how intelligent life might develop into something we wouldn't want to meet.
तेव्हा हा लेख वाचुन जर तुम्ही सेटी अॅट होम प्रकल्पात भाग घेतला व एलियन्सनी तुम्हाला पकडून नेले तर त्याची जबाबदारी लेखकाची नाही!
लिंक्सः
सेटी ट्विटरः https://twitter.com/BerkeleySETI
सेटी टिम्सः https://setiathome.berkeley.edu/team.php
सेटी मेसेज बोर्डः https://setiathome.berkeley.edu/forum_index.php
टीपः
BOINC अँड्रॉईड ओ.एस. साठीही उपलब्ध आहे. पण जी ताकद लॅपटॉप / डेस्कटॉप देऊ शकतात ती मोबोईल फोन देऊ शकणार नाही व मोबाईल फोन आपल्याला सतत २४ तास लागत असतो असे वाटल्यामुळे त्याचा उल्लेख लेखात केलेला नाही. तरी तुम्हाला ईच्छा असल्यास अधिक माहिती इथे मिळेल http://boinc.berkeley.edu/wiki/Android_FAQ
श्रेयः
Header Image: The Galactic Centre above the ESO 3.6-metre telescope
सेटी अॅट होम, बोईन्क व स्पेस सायन्सेस लॅबोरेटरी यांचे लोगो ज्या त्या संस्थेचे कॉपिराईट आसुन, इथे फेअर युज अंतर्गत फक्त ओळख दर्शवण्यासाठी वापरलेले आहेत. ( Logos of SETI@home, BOINC and Space Sciences Laboratory are Copyrights of those organizations respectively and used here as Fair Use only for Identification purpose. )
इतर लेख वाचण्यासाठी इथे भेट द्या.
इंटरेस्टींग कन्सेप्ट !
इंटरेस्टींग कन्सेप्ट !
सिद्धि,
सिद्धि,
मागच्या लेखावर प्रतिसाद दिल्यानंतर एकाच मिनिटाच्या आत तुम्ही हा गहन विषयावरचा लेख वाचून, त्यातला कॉन्सेप्ट समजाऊन घेऊन प्रतिसाद दिलात. अमेझिंग... मानलं बुवा!
Arecibo दुर्बीण उद्ध्वस्त.
Arecibo दुर्बीण उद्ध्वस्त.
the huge telescope at the renowned Arecibo Observatory in Puerto Rico has collapsed. Last week, officials said it was in danger of collapse & would be closed.
https://twitter.com/davidbegnaud/status/1333746725354426370?s=21
Huge Puerto Rico radio telescope to close in blow to science
https://apnews.com/article/puerto-rico-radio-telescrope-to-close-b63df9e...
Pages