घर वादळाचे!

Submitted by पद्मावति on 9 September, 2017 - 14:21

ओबरसॉल्ज़बर्ग!!

जर्मनीमधे म्यूनिचपासून साधारण दोन अडीच तासांवर असलेले एक गाव. गाव म्हणावे तर फारशी वस्तीसुद्धा नाही इथे. बर्कटेसगाडन या चिमुकल्या गावापासून काहीशा उंचीवर, डोंगराने कडेवर घेतलेला हा भूभाग. अत्यंत रमणीय निसर्ग, नजर जाईल तिथे हिरवीगार झाडी आणि जीवाला गारवा देणारी निवांत शांतता. ओबरसॉल्ज़बर्ग किंवा बर्कटेसगाडन, वरवर कुठल्याही सुंदर युरोपीयन लहानशा खेड्यांपैकी दिसणारी ही गावे गेल्या शतकात जागतीक रंगमंचावर घडलेल्या एका तूफानी नाट्याच्या केंद्रस्थानी होती याची आज कल्पनासुद्धा येणार नाही. या भागाने अवघ्या वीसेक वर्षांच्या काळात प्रचंड उलथापालथ बघितलीय, विनाश अनुभवलाय. ओबरसॉल्ज़बर्ग हे गाव एकेकाळी युरोपातल्या राजकीय घडामोडींचे एक प्रमुख केन्द्र बनले होते. या गावाने एका वादळाला घर दिले, एका ' फ्युरर' ला घरकुल….आणि एका गरुडाला दिले त्याचे घरटे!!!

डिट्रीच एखर्ट हा जर्मन लेखक आणि विचारवंत त्याच्या कट्टर वांशीक विचारांमुळे सरकारच्या नजरेत सलत होता. सरकारी यंत्रणेपासून स्वत:ला एका अंतरावर ठेवण्यासाठी हा माणूस ओबरसॉल्ज़बर्ग सारख्या निवांत जागी राहायचा. त्याकाळी डिट्रीच एखर्टला गुरूस्थानी मानणार्या अनेक तरुणांपैकी एक होता 'अॅडॉल्फ अॅलोइस हिटलर'!
हिटलर आपल्या या गुरूला भेटायला म्हणून सर्वप्रथम ओबेरसॉल्ज़बर्गला सन १९२३ मधे आला आणि येताक्षणी इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडला. मग तो वारंवार इथे येतच राहिला. त्याने एक लहानसे घर भाड्याने घेतले. या घरात वास्तव्याला असतांना त्याने त्याच्या ‘ mein kamph’ या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला. या पुस्तकाच्या विक्रीमधून जो पैसा मिळाला त्या पैशाने मग त्याने ते घरच विकत घेतले.

प्रथम महायुद्धानंतरचा काळ जर्मनीसाठी मोठा खडतर होता. गरीबी आणि बेरोजगारीने जनता गांजली होती. पराभवाचे शल्य प्रत्येक जर्मन व्यक्तीला सलत होते. पराभवानंतरच्या तहाच्या अटी त्यांना अत्यंत अपमानजनक वाटत होत्या. मनात खदखदणरा संताप, डोळ्यात हतबलता आणि पोटातली भूक प्रत्येक जर्मन माणसाला जाळत होती. हा सर्वसामान्य माणूस आता एका चमत्काराची वाट पाहत होता. एखादा देवदूत येईल आणि आपल्या सगळ्या समस्यांचे निवारण करेल, पराभवाचा सूड घेईल आणि देशाला उज्वल सुवर्णयुगाकडे पुन्हा एकदा घेऊन जाईल. नेमक्या या अशाच वेळी अॅडॉल्फ हिटलर जर्मन राजकारणात प्रवेश करता झाला. त्याने जनतेला स्वप्ने दाखवीली. स्वप्ने उद्याच्या जर्मनीची. एका संपन्न, शस्त्रसज्ज आणि बलाढ्य सत्तेचे स्वप्न. या स्वप्नाला साकार करण्याची धमक आहे ती फक्त एका माणसात...माझ्यात! ...मी या देशाचा तारणहार....मी, अॅडॉल्फ हिटलर, तुमचा 'फ्युरर!!’

हिटलरची लोकप्रीयता मोठ्या झपाट्याने वाढत होती. जनसामान्यांच्या भावनेला हात घालणारी त्याची भाषणे, त्याचे तूफानी दौरे या सगळ्याचा परिणाम व्हायला लागला होता. १९३३ मधे नाझी पार्टीने देशावर सत्ता मिळवली आणि हिटलर देशाचा सर्वेसर्वा चॅन्सेलर बनला.
त्याचे प्रमुख कार्यालय जरी बर्लिन असले तरी म्यूनिच हे नाझी पार्टीचे दक्षिणेतील हेडक्वॉर्टर्स ठरवले गेले. कामानिमीत्ताने हिटलर देशभर सतत फिरत असे पण तरी त्याला आता एका अधिष्ठानाची, घराची निकड वाटू लागली. घर, होम स्वीट होम म्हणताच हिटलरच्या डोळ्यासमोर एकच नाव आले ते म्हणजे ओबरसॉल्ज़बर्ग!

मग काय, राजा बोले दळ हाले... सुरुवातीला एक साधेसे घर विकत घेण्यात आले. मग त्यावर बांधकाम, अजुन बांधकाम, एक्स्टेन्शन्स असे करत करत दीड वर्षांमधेच त्या साध्याश्या घराचा कायापलट झाला. फ्युररच्या इभ्रतीला साजेलेसे घर बघता बघता पुर्णत्वास आले. या नवीन आलीशान महालाचे नामकरण करण्यात आले. नाव ठेवले " बर्ग हॉफ".
हे 'बर्ग हॉफ' पुढच्या दहा वर्षांमधे जर्मन राजकारणाचे एक अतिमहत्वाचे सत्ताकेन्द्र बनले.

lekhmala3.jpg

इव्हा ब्राउन ही स्त्री हिटलरच्या भावाविश्वाचा हळवा कोपरा होता. हा कोपरा त्याने आपल्या देशवासीयांपासून फार कटाक्षाने दूर ठेवला होता. इव्हा - त्याची सखी, प्रेयसी आणि मैत्रीण. हिटलरने त्याचे इव्हाशी असलेले नाते सर्वसामान्य जर्मन जनतेसमोर कधीही जाहीर केले नव्हते आणि पुढेही त्याला तसे करण्याची इच्छा नव्हती. पण हे बर्गहॉफ मात्र या दोघांचे अगदी स्वत:चे असे घरकुल होते. या घरापुरती का होईना इव्हा अॅडॉल्फची पत्नी होती आणि कागदोपत्री जरी घरच्या स्टाफपैकी एक असली तरी इव्हा ब्राउन या बर्गहॉफची गृहस्वामिनी होती.

lekhmala7.jpg

बर्गहॉफ समोर इव्हा आणि अॅडॉल्फ.

एकदा ओबरसॉल्ज़बर्ग मधे साक्षात फ्युरर राहायला येणार म्हटल्यावर वर या लहानशा गावाचे रंगरूप पलटणे क्रमप्राप्तच होते. हिटलरबरोबर मग मार्टीन बॉर्मन, अल्बर्ट स्पियर आणि हर्मन गोअरिंग हे त्याचे निकट सहकारीसुद्धा आपापल्या कुटुंबासमवेत इकडे राहायला आले.
या सर्वांसाठी घरे, मुलांसाठी शाळा, दवाखाने, सुरक्षादलाच्या बराकी, महत्वाच्या पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊसेस इत्यादींची व्यवस्था करायची होती. या सर्व बंधकामाची जबाबदारी मार्टीन बॉर्मनने घेतली. एका मागुन एक नवीन इमारती आकाराला येउ लागल्या. रस्ते बांधण्यात आले. दळणवळण वाढले तसे लोकांची आणि वाहनांची गर्दी सुद्धा अव्याहत सुरू झाली.

हिटलरच्या वास्तव्याने या लहानशा परिसराला आता तीर्थस्थळाचे रूप येऊ लागले होते. रोजच्या रोज कितीतरी हजारोंच्या संख्येने गर्दी जमायला लागली. आपल्या नेत्याची एक तरी झलक दिसावी म्हणून लोक दूरदुरुन येऊन बर्गहॉफ समोर उभे राहायचे, मुक्काम ठोकायचे.
हिटलरची प्रचंड लोकप्रियता हिटलरच्या सुरक्षादलाच्या दृष्टीने डोकेदुखी बनायला लागली होती. केवळ बर्गहॉफ नव्हे तर आता संपूर्ण ओबरसॉल्ज़बर्गला कडेकोट सुरक्षाकवचाची आवश्यकता होती. मग एस.एस. च्या बराकी, मशीनगन्सचा पहारा, ठिकठीकाणी चेक पोस्ट्स….आजतागायत नकाशावरही नसलेल्या या एकाट गावाचे थोड्याच दिवसांमधे बुलंद, बंदीस्त आणि शस्त्रसज्ज गडामधे रुपांतर झाले. मार्टीन बोर्मनने गावाचा इतका प्रचंड कायापालट केला की एकेकाळचे हे खेडेगाव सुरक्षा पथकांच्या खडखडाटाने, इमारतींच्या गर्दीने अगदी बुजून गेले. पण ही सर्व व्यवस्था हिटलरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यकही होती.
प्रत्येक महत्वाच्या इमरतीखाली बंकर्स बांधण्यात आले. फ्युरर बंकर, गेस्ट हाऊसचा बंकर, बोर्मन, स्पीयर आणि गोअरिंग सारख्या अधीकार्यांच्या घराखाली बंकर्स. अत्यंत मजबूत बांधकाम असलेल्या या बंकर्सच्या तोंडावर मशीन गन्सचा कायम पहारा असायचा. हे बंकर्स म्हणजे जमिनीखालची प्रतीसृष्टीच जणू .सुसज्ज दालने, आलीशान गालीचे, गरम पाणी, हीटिंग, एसी, मूल्यवान चीजवस्तू, मनोरंजनाची सर्व साधने इतकेच काय बंकर्समधे लिफ्टस, ये जा करायला वाहने असा सगळा सरंजाम असायचा.

lekhmala1.jpglekhmala2.jpg

हिटलरचा पन्नासावा वाढदिवस जवळ येत होता आणि त्याच्या वाढदिवसाला एक अत्यंत अनोखी भेट द्यावी असे बोर्मनने ठरवीले. उंच डोंगरमाथ्यावर आपल्या फ्युररसाठी एक घर बांधावे अशी योजना त्याने केली. खरे म्हणजे हिटलरला उंचीची भीती होती तरीही त्याने या योजनेला संमती का द्यावी हे एक कोडेच आहे. पण म्हणतात की इव्हा ब्राउनला अशा उंच ठीकाणी, लोकांच्या नजरेपासुन दूर राहायला आवडायचे म्हणून हिटलरने संमती दिली असावी.

काम सुरू झाले. सुरुंग लावून डोंगर फोडण्यात आला. डोंगर माथ्यावर जाण्यासाठी वळणावळणाचे, तीव्र चढाईचे रस्ते बांधले गेले. बोगदे काढले. लिफ्ट बनवण्यात आली. या योजनेवर ३०, ००० कामगार दिवसरात्र राबत होते.१४ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आजच्या काळातले सुमारे १५ मिलियन युरो खर्चून १९३८ मधे हा खर्चीक प्रॉजेक्ट पूर्ण झाला. उंच डोंगराच्या माथ्यावर एक सुंदर घर बांधण्यात आले. या घराला नाव देण्यात आले 'केहलस्टीनहाऊस' अर्थात ' ईगल'स नेस्ट ‘

या ईगल'स नेस्ट मधे हिटलरला राहायला अजिबात आवडायचे नाही. पण आपल्या देशोदेशीच्या पाहुण्यांना , राजदूतांना मात्र तो आवर्जुन तिथे घेउन जायचा. अभियांत्रीकी चमत्कार असलेल्या आपल्या या उन्नत गरूड घरट्याचा त्याला प्रचंड अभिमान होता.
ईगल'स नेस्टला आजही भेट देता येते. ओबरसॉल्ज़बर्गहून बसने एका उंच डोंगर डोंगरमाथ्यावर आपण पोहोचतो. त्यानंतर एका बोगद्यातुन चालत एका लिफ्टपाशी येतो.मग ही लिफ्ट आपल्याला काही सेकंदातच घेऊन जाते ईगल'स नेस्टमधे...थेट गरूडाच्या घरट्यामधे!!

lekhmala4.jpg
ही मुख्य डाइनिंग रूम. फोटोत जी फायरप्लेस दिसतेय ती मुसोलीनीने हिटलरला भेट दिली होती.

lekhmala5.jpglekhmala12.jpg

आजही तो बोगदा, लिफ्ट आणि ते गरूडघरटे आपल्या मालकाच्या खाणाखुणा जपत मोठ्या दिमाखात उभे आहे.
हिटलरची आठवण करून देणारी ही त्याची एकमेव निशाणी आता उरलेली असावी.

हिटलरमुळे देशभरात आशादायी वातावरण निर्माण झाले होते. पण आता मात्र त्याची महत्वाकांक्षा राक्षसीपणाकडे झुकायला लागली होती. प्रथम महायुद्धानंतर जर्मनीवर लादल्या गेलेल्या अपमानास्पद तहाचे खापर त्याकाळच्या ज्यू नेत्यांवर आणि आर्थिक दिवाळ्याचे खापर ज्यू समाजावर सोयीस्कररीत्या फोडण्यात आले. जोसेफ गोबेल्सची प्रोपॉगंडा यंत्रणा आपले काम चोख करीत होती. आता जर्मनी म्हणजे हिटलर आणि हिटलर म्हणजे जर्मनी! जळी, स्थळी फक्त आणि फक्त हिटलर दिसावा...कानी फक्त त्याचेच शब्द पडावे यासाठी गोबेल्स यंत्रणा जबरदस्त वेगाने काम करीत होती. सळसळत्या रक्ताचे निष्ठावान तरुण आपल्या या लाडक्या नेत्यासाठी जीव द्यायला आतुर होते. त्यांची निष्ठा ना देशासाठी होती ना अजुन कोणासाठी. त्यांची निष्ठा होती फक्त त्यांच्या फ्युररसाठी.

१९३९ साल! पोलंड गिळंकृत करून जर्मन गरूड आता भरारी घ्यायला तयार झाला होता आणि संपूर्ण युरोपचा घास घ्यायला उतावीळ. हिटलर पर्वाचा शेवटचा अंक सुरू झाला होता. द्वितीय महायुद्धाची सुरूवात झाली. पुढच्या दोन वर्षात डेन्मार्क, नॉर्वे, फ्रांससहीत बहुतांश युरोप आणि उत्तर आफ्रिका जर्मन फौजांनी काबीज केला. अजेय, अजिंक्य जर्मन सैनिकांचे मनोबल गगनाला भिडले होते तर त्यांच्या फ्युररचा आत्मविश्वास नको इतका वाढला होता. आत्मविश्वास जेव्हा विचारीपणाची सीमा पार करतो तेव्हा माणसाच्या अध:पतनाला सुरूवात होते. हिटलरच्या बाबतीतही हेच घडले.
जून १९४१ मधे रशिया बरोबर असलेला करार हिटलरने मोडला आणि रशियन हद्दीत जर्मन फौजा घुसल्या. हिटलरच्या पराभावाची ती सुरूवात होती.

पुढे अमेरीका युद्धात उतरली. १९४४ मधे फ्रान्समधे दोस्तराष्ट्रांचे सैन्य घुसले त्यावेळपर्यंत जर्मनीची हार जवळजवळ निश्चित झाली होती. जर्मन फौजांना आता नेस्तनाबूत करीत दोस्तराष्ट्रांच्या फौजा १९४५ च्या मार्चमधे जर्मनीमधे शिरल्या. हॅम्बर्ग, ड्रेस्डन बेचिराख झाले. बर्लिन पडले. म्यूनिचवर बॉंब्सचा वर्षाव होत होता. आता सर्वनाशाची पाळी होती ओबरसॉल्ज़बर्गची. अनिवार्यच होते ते.

२५ एप्रिल १९४५ या दिवशी ब्रिटीश रॉयल एयर फोर्सने बर्कटेसगाडन, ओबरसॉल्ज़बर्ग आणि बर्गहॉफ वर बॉम्ब हल्ले सुरू केले. त्याच दिवशी एका अमेरिकन यूनिटने ईगल'स नेस्ट वरही कब्जा केला.
माघार घेण्याआधी एस.एस. या हिटलरच्या सैन्यदलाने बर्गहॉफला आग लावली. त्या आगीत आणि मग नंतर दोस्त सैन्यानी केलेल्या तोडफोडीत बर्गहॉफ नामशेष झाले. बर्कटेसगाडन, ओबरसॉल्ज़बर्ग मधल्या सगळ्या इमारतींची आधी लूट आणि मग त्यांचा विनाश केला गेला. हिटलरची कुठलीही निशाणी मागे उरु नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली. या हुकुमशहाच्या कुठल्याही खुणेला जपले तर त्या ठिकाणी नाझी तीर्थस्थळ निर्माण होईल ही रास्त भीती सगळ्यांना होती. या जागेपासून प्रेरणा घेऊन दुसरा अडोल्फ हिटलर जन्म घेऊ नये ही आशा.

lekhmala9.jpg

आज बर्गहॉफच्या जागी जंगल आहे पण त्या दिशेने जाणारा हा एक रस्ता शिल्लक आहे.

ईगल'स नेस्ट मात्र जर्मनीच्या खास विनंतीवरुन दोस्तांच्या सैन्याने फारशी इजा न करता तसेच ठेवले. बाकीच्या इमारती, घरे मात्र पार धाराशायी करण्यात आली.

एका इमारतीच्या नशिबात मात्र हॅपी एंडिंग होते. बर्गहॉफ चे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून या इमारतीची कथा सुरू झाली.
सुरक्षिततेच्या कारणाने फ्युररचे निवासस्थान जिथे, तिथल्या आजूबाजूच्या घरमालकांना, हॉटेल मालकांना पैशाचा मोबदला देऊन सक्तीने जागा सोडायला सांगितले गेले. सहाजिकच सगळे रहिवासी तिथून निघाले. पण एक हॉटेल मालक मात्र ठामपणे उभा राहीला तो होता 'हॉटेल झूम टर्कन' चा मालक कार्ल शुस्तेर्.
या कार्ल शुस्तेर् ने आपली जागा सोडायला साफ नकार दिला. तो नकार पचवणे हिटलरच्या सुरक्षादलाला शक्यच नव्हते. साम आणि दाम दोन्ही या माणसापुढे चालत नाही असे दिसल्यावर हिटलरच्या लोकांनी त्याला उचलून सरळ दाखऊच्या छळछावणीमधे टाकले. छळछावणीमधे काही दिवस काढल्यानंतर मात्र नाइलाजाने कार्ल शुस्तेर् ने आपली जागा सोडली. मग या हॉटेलच्या अगदी शेजारी लागून बर्गहॉफची उभारणी झाली.

१९४५ च्या बॉम्बहल्ल्यात हे हॉटेल पूर्णपणे नाही पण बरेचसे उध्वस्त झाले. महायुद्ध संपेपर्यंत कार्ल शुस्तेर् स्वर्गवासी झाला होता पण त्याची लेक मात्र जिद्दीची. तिने सरकार दरबारी अथक प्रयत्न करून हे हॉटेल परत मिळवले. त्याची डागडुजी केली, रंगरंगोटी केली. अक्षरश: मातीमोल बनलेल्या आपल्या हॉटेलला ‘ झूम टर्कन'ला नवीन जीवन दिले आणि आयुष्याचा पुन्हा एकदा श्री गणेशा केला.

zum turken.jpg
डावीकडे दिसतेय ते झुम टर्कन आणि उजवीकडे मागे बर्गहॉफ (जालावरून साभार)

lekhmala10.jpg
'झूम टर्कन' फोटोच्या खाली उजवीकडे कोपर्‍यात दिसतेय ते अजूनही शिल्लक असलेले एस.एस.चे गार्ड पोस्ट. या पोस्टच्या उजवीकडे मागे बर्गहॉफला जाणारा ड्राईव्हवे होता त्याचा फोटो वरती दिलाय.

झूम टर्कन आज उत्तम कारभार करीत आहे. झूम टर्कनच नव्हे तर आपल्या वादळी इतिहासाच्या खाणाखुणा स्वच्छ करून बर्कटेसगार्डन आणि ओबरसॉल्ज़बर्ग हा प्रदेश मोठ्या डौलात आज उभा आहे. ईगल'स नेस्टकडे जायला किंवा निसर्गाचा आस्वाद घ्यायला या भागात पर्यटकांची सतत गर्दी असते. बर्कटेसगाडन निसर्ग सौंदर्यासाठी अतिशय प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ बनले आहे. ओबरसॉल्ज़बर्ग सुद्धा अगदी पुर्वी जसे असेल तसेच शांत आणि निवांत झालेय. स्वत:च्या झंझावती भूतकाळाचा कुठलाही भार न वाहता आता आरामात पहुडलेय.

lekhmala11.jpg
बर्कटेसगाडन आजचे.

आज बर्गहॉफ आणि इतर नाझी इमारतींच्या जागी सुंदर वृक्षराजी, वनराई आहे. ना जुन्या इमारतींचे उदासवाणे अवशेष आहेत ना त्यांची आठवण काढत उसासे टाकण्याची इथल्या लोकांची वृत्ती. खरेतर हिटलर विषयी बोलायला इथला माणूस अजिबात इच्छुक नसतो. त्यांना तो इतिहास नको नकोसा वाटतो. जुन्या कडू आठवणी, हिटलरशी असलेले नाते या प्रदेशाने जुन्या वस्त्रांसारखे टाकून दिले आहेत.
हिटलरचा गड, त्याचे घर म्हणून मिळालेली ओळख, कौतुकाची फुले मग घडलेला संपूर्ण विनाश, उध्वस्त इमारती, मृत्यूचे तांडव, सार्या जगाचा तिरस्कार……सगळं काही, झालं ते झालं, गंगार्पण! सहजपणे या गावाने जुनी पाटी पुसून टाकलीय कधीचीच!
आज बर्कटेसगाडन आणि ओबरसॉल्ज़बर्ग राखेतून उमललेल्या टवटवीत फुलांसारखे प्रसन्न उभे आहेत, आनंदी चेहर्यामोहर्याने आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत...

..........................................................................................................................................................................................................................

( स्त्रोत - ईगल'स नेस्ट आणि ओबरसॉल्ज़बर्गचा गाइडेड टूर आणि आमच्या टूर गाइडने दिलेली माहीती.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख/ओळख.. आवडला. तुम्ही नेहमी हटके ठिकाणांना भेट देत असता!

छान माहिती,
आणि लिहिण्याची पद्धत सुद्धा छान

छान