कोकणात आगर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर. अलिबाग साईडला वाडी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच आमच्या भागात आगर ह्या शब्दाला.
आमचं आगर खूप मोठं आहे. पण आमचं घरच उतारावर असल्याने आगर ही तीन लेव्हल वर आहे . प्रत्येक लेव्हलला पाच सहा तरी पायऱ्या आहेत. पावसाळ्यात आगरातल्या सगळ्या वाटा कोकणातल्या अति पावसामुळे उखडल्या जातात म्हणून दिवाळी पूर्वी सगळ्या वाटा चोपण्याने चोपून, शेणाने सारवून नीट केल्या जातात. दिवाळीत या वाटांवर पणत्या ठेवून त्या उजळल्या ही जातात . एरवी मात्र आगरात रात्री अगदी मिट्ट काळोख असतो.
घरात काही कार्य वैगेरे असलं की आगारातल्या वाटा ही अशा रांगोळ्या घालून सुशोभित केल्या जातात.
आगराचा खुपसा भाग नारळी पोफळीनी व्यापला आहे . ही झाड उंच वाढतात. वाऱ्या वादळाने झाड घरावर पडून काही नुकसान किंवा अपघात होऊ नये म्हणून ती घरापासून थोडी दूरच लावलेली आहेत. पोफळीना नागवेली आणि मिरीवेल ह्यांनी लपेटून घेतले आहे. एक ठराविक अंतर सोडून लावलेली ती झाडं भर दुपारी ही आगरात सूर्य प्रकाश येऊ देत नाहीत . आणि दररोज शिपण केल्यामुळे आगर नेहमीच गार असतं. उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर पुरुष माणसं सरळ आगरातल्या पंप स्टेशन वरच्या स्लॅब वर चटई टाकतात आणि ताणून देतात. अंतू बर्व्याच्या शब्दात म्हणजे अगदी 'एअर कंडिशन की हो' ! तिथे एकदा तरी दुपारी झोपायचं माझं स्वप्न आहे .. बघू कधी प्रत्यक्षात येत ते . नारळ मुद्दाम झाडावर चढून उतरवावे लागतात पण नवरात्राच्या सुमारास पोफळी ( ओल्या सुपाऱ्या ,) पिकतात आणि आपसूकच खाली पडतात . रोज दोन वेळा त्या वेचून आणणे हे मोठंच काम असत त्या दिवसात . त्या ओल्या सुपाऱ्या पंधरा वीस दिवस खळ्यात वाळवल्या आणि वरच टरफल काढलं की मग आत आपण शहरात पाहतो तशी सुपारी मिळते.
पोफळी आणि खाली आगरात जाणारी वाट
पपई, चिकू पेरू अननस अशी फळझाड ही आहेत आमच्याकडे. कोकण प्रसिद्ध आहे आंब्यासाठी पण आमच्या घरचे चिकू आंब्याला ही मागे टाकतील इतके मस्त असतात. असतात. आकाराने लांबट गोल आणि ह्याची साल असते बाहेरून खरखरीत. त्यामुळे सालासकट खाता नाही येत. पण चवीला साखर फिकी पडेल इतके गोड आणि रसाळ. अननसाला कधी कधी घुशी लागतात आणि वरून दिसतो भरलेला पण आतून खाऊन पोकळ करून टाकलेला असतो. इतकं वाईट वाटत त्यावेळेस ...
पपई, पेरू किंवा इतर कोणती ही फळ आम्ही सगळी नाही उतरवत झाडाकरून. थोडी पक्ष्यांसाठी ठेऊन देतो झाडावर . त्यामुळे सकाळ संध्याकाळ साळुंक्या, खंड्या, दयाळ, कोकिळा, पोपट, भारद्वाज, असे पक्षी फळ खायला येत असतात आगरात . दयाळ तर इतके माणसाळलेत की आम्ही मागच्या मांडवात काही काम करत असलो तरी धीटपणे आमच्या अगदी जवळ येतात न घाबरता. कधी कधी पपई खायला डोक्यावर शिंग असलेला भला मोठा हॉर्न बिल ही येतो . तो आला की मग मात्र इतर छोट्या पक्ष्यांची तिथून गच्छंती झालीच म्हणून समजा.
हे अवीट गोडीचे चिकू
फोटो चांगला नाहिये पण तरी ही
आरारूट ही घरीच करतो आम्ही. एक दळा आरारूट ही लावतो आगरात दरवर्षी. ह्याची पान साधरण हळदी सारखी असतात. आणि रताळ्या सारखे कंद लागतात ह्याला. ते स्वच्छ धुवून किसायचे आणि मग पाण्यात घालून चांगले चोळायचे . किस पिळून काढून टाकायचा . ते पाणी संथावल की साका खाली बसतो . वरच पाणी हळू काढायचं आणि खाली बसलेला साका उन्हात चार आठ दिवस वाळवायचा .. की झालं आरारूट तयार . हे बाजारात मिळतं तसं अगदी गुळगुळीत नसून थोडं दाणेदार असत आणि तितकं शुभ्र ही नसत. पण चवीला अप्रतिम लागत. ह्याची गोड खीर किंवा जिरं, मिरची घालून तिखट लापशी ही छानच लागते. तोंड आलं तर आरारूटाची खीर हा उत्तम घरगुती उपाय आहे. …कोकणातून येताना आरारूटाची छोटीशी पुडी असतेच प्रत्येकाच्या सामानात.
हे आरारूट
पूर्वी जेव्हा तिन्ही त्रिकाळ भातच असे जेवणात आणि गडी माणसं ही असत न्येरी आणि जेवायला तेव्हा आम्हाला तांदूळ खूपच लागत असे. त्यावेळी आगरात ही आम्ही भात लावत असू. तो दिवसा गणिक वाढणारा, वाऱ्यावर डुलणारा, मन प्रसन्न करणारा भात शेतीचा हिरवा गालिचा आम्हाला सैपाकघराच्या खिडकीतून अगदी सहज दिसत असे. भाद्रपदात भाताला लोंब्या आल्या की त्याचा सुवास आमच्या सैपकघरात ही दरवळत असे. हल्ली मात्र भाताचा खपच कमी झाल्याने आम्ही आगरात भात लावत नाही आणि म्हणून ह्या स्वर्गीय सुखाला आम्ही मुकलो आहोत.
एक रिठ्याचं झाड ही आहे आमच्या आगरात. अजूनही खूप रिठे लागतात त्याला. पण आता वापरच होत नाही. पूर्वी साबण वापरणे परवडणारे नव्हते तेव्हा केस धुवायला, कपडे धुवायला आणि अंगाला लावायला सगळ्या साठी रिठयांचांच वापर होत असे. कोकणात रिठयाला रिंगी असं म्हणतात. आज ज्या रिठयाकडे ढुंकून ही पाहिलं जातं नाही त्या रिठयांचं एके काळी रेशनिंग करावं लागे हे सांगितलं तर कोणाचा विश्वास ही बसणार नाही. कालाय तस्मै नमः . दुसरं काय ?
सांडपाणी जिथे सोडलं जात तिथे पाणी जास्त लागणारी झाडं जसं की केळी, कर्दळी आणि अळू वगैरे लावलं जातं. ती बुटकी, जाडी, गावठी केळी चवीला फारच सुरेख लागतात. कोकणात घरोघरी अळू आणि शेवगा असतातच. मुंबईची मुलं सुट्टीत आली कोकणात की त्यांचा आळवाच्या पानावर पाणी टाकून मोती जमवण्याचा खेळ चाललेला असतो. शहरात अळूची देठ खूपदा फेकून देतात पण आमच्याकडे देठीची सुद्धा चिंचगुळ, नारळ घालून अगदी चविष्ट भाजी केली जाते.
आमच्या घरात तर नेहमीच माणसांची वर्दळ असते . त्यामुळे कधी कोणाशी काही जिवा भावाच्या गोष्टी बोलायच्या असतील किंवा कधी काही सिक्रेट कुणाला सांगायचं असेल तर त्याला आगरा सारखी दुसरी योग्य जागा नाही. कधी कधी तर आगरात आमच्या इतक्या गप्पा रंगतात की घरातल्या माणसाना आम्हाला कुकारे घालून बोलवावं लागतं . कधी लहान मूल किरकिरत असेल तर आगरातून जरा फिरवून आणलं की ते हमखास रमत .
दुपार झाली की कोकणात भर उन्हाळ्यात ही वारा सुटतो. मागच्या गॅलरीत बसून वाऱ्यावर डुलणाऱ्या पोफळी बघणे हा माझ्या अवीट गोडीचा कार्यक्रम आहे. समुद्राच्या लाटा बघण्याचा जसा कधी कंटाळा येत नाही तसच हे पोफळीचं नर्तन बघण्याचा ही कधी कंटाळा येत नाही. संध्याकाळ झाली, काळोख पडला की मात्र दिवसभर नयनरम्य दिसणार आगर गूढ भासायला लागतं. मिट्ट काळोख आणि गर्द झाडी यामुळे कंदील किंवा बॅटरी असली तरी आगरात जाण्याचं डेअरिंग नाही होत माझं.
मे महिन्याचे दिवस होते . आंब्या फणसाची कामं, पाव्हणे आणि गप्पा टप्पा यामुळे झोपायला उशीरच झाला होता. रात्री मला जाग आली तर चूकून मागील दारचा दिवा राहिलाय अस वाटलं कारण उजेड दिसत होता. नाहीतर इथे बाहेर मिट्ट काळोख असतो . पण क्षणभरातच लक्षात आलं आणि मग खोलीत राहणं अशक्यच होत. दार उघडून बाल्कनीत आले आणि किती बघु असं झालं . पौर्णिमा जवळ आली होती. आकाशात चंद्र माथ्यावर आला होता. मनात म्हटलं दिवा लागला आहेच ... पण देवाजीचा आकाशीचा दिवा लागलाय... सगळा आसमंत त्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होता. सगळीकडे निःशब्द, निरव शांतता होती. अप्रतिम दृश्य होत. चंदेरी प्रकाश म्हणजे काय ते मला तेव्हा कळलं. . आकाश निरभ्र होत त्यामुळे अधिकच सुंदर दिसत होत. रोजच्याच नारळी पोफळीना चंदेरी रंग प्राप्त झाला होता. ती लांबवर दिसणारी घाटी ही चंद्र प्रकाशात चमकून उठली होती. किती तरी वेळ भान हरपून मी बघत होते.... आगराचं ते मनमोहक रूप माझ्या मनावर कायमच कोरलं गेलं आहे
आगरातली विविध प्रकारची वृक्षसंपदा, नाना प्रकारची फुलं , अनेकविध पक्षी यामुळे आमच्या घराची शोभा कैक पटीने वाढली आहे.
आमचं आगर आवडलं , आवर्जून
आमचं आगर आवडलं , आवर्जून सांगितलत खूप खूप आभार.
काही फोटो अपलोड केलेत . खूप चांगले नाहीयेत पण आयडिया येईल.
योकु, पुढच्या वेळी जाईन तेव्हा जिप्सिला घेऊन जाईन बरोबर तो छान फोटो काढून देईल मला.
आशिका , माझ्या यज्मानांच्या ही मनात आहे निदान आपल्याला स्वतःला तरि आनंद मिळेल म्हणून पुस्तक काढायचं असं... बघु कस जमतं ते.
हेच वर्णन आमच्या वसई च्या घराला १००% लागु होत. फक्त आगराच्या ऐवजी घराच्या चारी बाजूनी भात शेती आणि स्वयंपाकघरा बरोबर मागची पडवी, पुढची ओटी आणि कोणतीही खिडकी इतकाच फरक >>> स्निग्धा काय मजा ना !
ज्यांनी कोकणातलं घर अनुभवलयं त्यांना पुनर्भेटिचा आनंद मिळाला ज्यांनी हे पाहिलं नाहिये त्यांना कळलं आगर म्हणजे काय ते . बरोबर ना ?
कोकणातील निसर्गाचं सौंदर्य तर
कोकणातील निसर्गाचं सौंदर्य तर आहेच पण ते टिपणारी सौंदर्यदृष्टी पण आहे ही फार मोलाची गोष्ट आहे! ममो, तुमचे लेख नेहमीच मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारे असतात.. लिहित रहा!
जसं दुर्गा भागवतांचं ऋतूचक्र आहे तसं कोकणातील ऋतूचक्राचं वर्णन करणारं एखादं सचित्र पुस्तक लिहायचं मनावर घ्याच!
वाह अजून एक कोकण स्पेशल मस्त
वाह अजून एक कोकण स्पेशल मस्त लेख !
तो जमिनीवर उताणे झोपून काढलेला नारळांचा फोटो आवडला
ममो, सुंदर लेख लिहीलात. हे
ममो, सुंदर लेख लिहीलात. हे सर्व निसर्गाचे सौंदर्य उघड्या डोळ्यांनी जेवढे सुंदर दिसते आणि मनात ठसते त्यावेळी त्या निसर्गाच्या अद्भुततेचं एक गारूड आपल्यावर झालेलं असतं. त्यावेळचा निसर्गाचा जो अविष्कार असतो त्यात आपण आपली भावनोत्कटता पुर्णपणे ओतलेली असते. ही समरसता three dimensional photography ने सुध्दा येणार नाही.
Mast lihiley.tumche lekh
Mast lihiley.tumche lekh wachtana maruti chitampallinchi aathwan yete. Mala tumachi shaili tashich watate.sundar.lihit raha.
सुरेख!
सुरेख!
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर !
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर ! पुस्तक नक्की काढा, शुभेच्छा !
सुरेख नेहमीप्रमाणे!
सुरेख नेहमीप्रमाणे!
कित्ती गोड लिहीलंय हेमाताई.
कित्ती गोड लिहीलंय हेमाताई. फोटोही गोड.
आमचं पण खालचं आगर आणि वरचं आगर असं आहे, खूप पायऱ्या आहेत त्यात. वरच्या आगरात आंब्याची कलमे आहेत आणि ते रस्त्यापलीकडे आहे. खालच्या आगरात नारळ, पोफळी, केळी, फणस, फुलझाडं आणि दोन विहिरी आहेत. एकीचं पाणी आटते उन्हाळ्यात म्हणून दुसरी खोदली. चला तुमच्या लेखानिमित्याने मी फिरून आले.
ममो, परत एकदा अभिनंदन. छान
ममो, परत एकदा अभिनंदन. छान ओघवती शैली आहे तुमची. एकदा वाचायला सुरवात केली की लेख कधी संपूच नये असे वाटते. प्रचि असतील तर मजा येतेच पण वाचतांनाच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते हेच लिखाणाचे यश आहे. पुनश्र्च शुभेच्छा आणि पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत
क्या बात है!!
क्या बात है!!
पुन्हा एकदा मनाला भिडणारा सर्वांगसुंदर लेख.
छान पैकी कॅमेरा घेऊन गावाला मुक्काम कर ८/१० दिवस आणि गाव, घर, आड, आगर याचा मस्त फोटो कोलाज/ पोर्ट्फोलिओ करून इथे दे>>>>>नाहीतर मला घेऊन जा. पाहिजे तेव्हढे फोटो काढुन देतो.
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर.
"मे महिन्याचे दिवस होते . ...." हा संपूर्ण परिच्छेद फार हेवा वाटण्यासारखा !
नाहीतर मला घेऊन जा. पाहिजे तेव्हढे फोटो काढुन देतो >> +१ .. खरंच जिप्स्याला घेऊन जा.. बरेच दिवसात त्याचे नवीन फोटो आले नाहीत
एका निसर्गकन्येने कोकणातील
एका निसर्गकन्येने कोकणातील रसरशीत निसर्गाचे भरभरून केलेले वर्णन वाचून जीव अगदीच सुखावला....
लाजवाब.....
अप्रतिम लेखन....
_____/\_____
मने, मस्त लेख व फोटो.
मने, मस्त लेख व फोटो.
ज्यांनी कोकणातलं घर अनुभवलयं त्यांना पुनर्भेटिचा आनंद मिळाला >>>>>>>>>.१००% खरंं. लेखाच्या नावातला "आगर" शब्द वाचूनच मी आगरात पोहोचले. तर बरोबर बोट धरून तुही आलीस की.
आगर, माड, पोफळी, आणि चिकू चे फोटो पाहून मी माझ्या काकूच्या आगरात आहे असचं वाटलं. पहिले चारही फोटो अगदी सारखेच. पहिल्या फोटोत आहे ना? अगदी तसाच चिर्यांचा गडगा आणि मधून अगदी तशीच पायवाट. तिथलाच फोटो काढलाय असं वाटतय.
तो केळी आणि चिकूचा पण अगदी तिथलाच फोटो.
तुझी लेखन शैली खूपच छान आहे अगदी तिथेच असल्याचा भास होतो. सुंदर!
आणि ते पुस्तकाचं मनावर घेच.
जिप्सी बघ, एका पायावर तयार आहे यायला.
अप्रतिम! खूपच सुरेख!
अप्रतिम! खूपच सुरेख!
आम्ही (घरमालकांच्या लहानशा) आगरात जाऊन अभ्यास करायचो. (किती अरसिक!!!) आमचे ठरलेले माड होते, त्याचे बुंधे जरा जमिनीशी समांतर वाढून मग थेट आकाशात गेले होते. त्यामुळे बुंध्याशी बसता येई पाय मोकळे करून. तिथे बसून उजळण्या होत उन्हाळी परीक्षेच्या. पोफळ एकच होती.
आमच्याकडे कामाला येणारी गंगूआक्का आगराच्या खालच्या बाजूला रहायची. रात्रीच्या वेळी अन्न उरलं तर आई ते तसंच ताजं असतानाच तिला द्यायला म्हणून जायची. मग आमचीपण वरात आगरातून जायची. चपला असल्य-नसल्या तरी भिती नाही वाटली कधी. ऐन पावसाळी रात्रीपण मजा वाटायची. आगरात दिवे नसत, कंदील घेऊन आणि अन्नचे डबे सांभाळत छत्रीतून जायचं. तिच्या घरी गणपतीचा लहानसा कारखाना असे आषाढापासून. मग काही अन्न उरायचा अवकाश, की आम्ही तिच्याकडे जायला पाऊस असूनही धावायचो. मग येताना कुठे गणपतीच्या पायाशी असलेला इतकुस्सा उंदीरच रंगवून ये वगैरे उद्योग करून यायचं. आणि ताई तर एकदा गाण्याचा कार्यक्रम ऐकून संपल्यावर भर रात्री २ वाजता चिमुकल्या बॅटरीच्या झोतावर आगर ओलांडून घरी आली होती. असो.
ममो, खूप विषयांतर झालंय का? सॉरी अगदीच रहावत नाही तुमचे लेख वाचून म्हणून लिहिलं.
ममो, खूप विषयांतर झालंय का?>>
ममो, खूप विषयांतर झालंय का?>>>>>.नाही ग. हा विषयच इतका जिव्हाळ्याचा की सगळ्या आठवणीत रंगून जातो आपण.
जिज्ञासा, खूप छान लिहिल आहेस
जिज्ञासा, खूप छान लिहिल आहेस . आवडलच.
ऋ, अरे, तो फोटो मीच काढलाय. थँक्स.
हे सर्व निसर्गाचे सौंदर्य उघड्या डोळ्यांनी जेवढे सुंदर दिसते आणि मनात ठसते त्यावेळी त्या निसर्गाच्या अद्भुततेचं एक गारूड आपल्यावर झालेलं असतं. त्यावेळचा निसर्गाचा जो अविष्कार असतो त्यात आपण आपली भावनोत्कटता पुर्णपणे ओतलेली असते. ही समरसता three dimensional photography ने सुध्दा येणार नाही. >>> निशदीप, अगदी पटलं
छान ओघवती शैली आहे तुमची. एकदा वाचायला सुरवात केली की लेख कधी संपूच नये असे वाटते. प्रचि असतील तर मजा येतेच पण वाचतांनाच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते हेच लिखाणाचे यश आहे. >> पाथफाईंडर, धन्यवाद .
अन्जू घरबसल्या गावाला जाऊन आलीस , आणखी काय हवय ना ?
हो जिप्स्याला घेऊन जाणारच आहे . तो आहे त्यापेक्षा शंभर पटीने सुंदर करुन दाखवेल तुम्हाला कोकण.
शशांक, प्रतिसाद खूप आवडलाय.
शोभा आणि प्रज्ञा तुमच्या कोकणच्या मातीतल्या अस्सल प्रतिसादांमुळे विषयांतर न होता उलट लेखाची शोभा वाढली आहे.
माझ्या मनात हे नेहमीच येतं ... आज पुन्हा लिहिते... मला व्यक्त होण्या साठी एक प्लॅट्फॉर्म देणार्या मायबोलीची मी खूप आभारी आहे.
सुरेख अगदी.
सुरेख अगदी.
छान लिहिलेय! आवडले!
छान लिहिलेय! आवडले!
दिवसा रम्य आणि शांत वाटणार्या आगरावर तिन्हीसांजेला एक गुढ छटा पसरु लागते, हे मात्र खरे आहे. कातरवेळ म्हणजे काय त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर दिवस मावळताना आगरात जावे.
आमच्या गावी सुपार्या उतरवायला खास गडी असतात, एका पोफळीवर चढून हाताने दुसरी पोफळीच्या झावळ्या(?) ओढून ती पोफळ जवळ आणतात आणि मग त्यावर चढतात. एका पोफळीवर चढले की जमिनीवर अजिबात न उतरता सगळ्या आगरातल्या सुपार्या उतरवतात. एखाद्या माकडासारखे ह्या पोफळीवरुन त्या पोफळीवर जाताना बघायला गंमत वाटते.
ममो नेहमीप्रमाणे मस्त लेख.
ममो नेहमीप्रमाणे मस्त लेख. शब्दा शब्दातुन तुमच कोकण आणि घर प्रेम जाणवत.
कोकणातलं सौंदर्य किनारपट्टी
कोकणातलं सौंदर्य किनारपट्टी भागतच जास्त दिसते.थोडे आत आले की एकदम भिक्कार वाटायला लागते.मागच्याच फेब्रुवारीमध्ये लांजा राजापुरला भेट दिली.नाही आवडले वातावरण .पण दाभोळ मंडणगड दापोली गुहागर एरीया आवडतो.
Nehmisarkhach mast lekh....
Nehmisarkhach mast lekh.... Kharach yavese vattey koknat tumchya agarat...nyAl na?
मनीमोहोर ..!!! खुपच सुंदर ...
मनीमोहोर ..!!! खुपच सुंदर ....
तुमचं आगर सुंदर असाव पण तुम्ही केलेल्या वर्णना मुळे ते आजुन खुपच सुंदर वाटतय ...
अस वाटत अत्ता पुढच्या विकची सुट्टि टाकावी, टिकीट काढाव आणि जाव कोकणात..
इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी
इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद.
आमच्या गावी सुपार्या उतरवायला खास गडी असतात, एका पोफळीवर चढून हाताने दुसरी पोफळीच्या झावळ्या(?) ओढून ती पोफळ जवळ आणतात आणि मग त्यावर चढतात. एका पोफळीवर चढले की जमिनीवर अजिबात न उतरता सगळ्या आगरातल्या सुपार्या उतरवतात. एखाद्या माकडासारखे ह्या पोफळीवरुन त्या पोफळीवर जाताना बघायला गंमत >>> हे बघितलंय मीही . काळजाचा ठोका चुकतो ,वरच्या वर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो तेव्हा.
तुमचं आगर सुंदर असाव पण तुम्ही केलेल्या वर्णना मुळे ते आजुन खुपच सुंदर वाटतय ... >> थँक यू सो मच.
कोकणात आमच्या घरी येण्याचे सर्वाना आग्रहाचे आमंत्रण .
मनीमोहोर फारंच सुंदर लिखाण
मनीमोहोर फारंच सुंदर लिखाण आणि फोटो. एकदम ताबडतोब निघून कोकणात जावे असे वाटले. मी असं आतलं कोकण पाहिलंच नाहिये. खूप भावलं.
ममो प्रतीसादासाठी माझ्याकडे
ममो प्रतीसादासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत, कारण बर्याच जणांचे प्रतीसाद सुरेख असतात. लेखातल्या फोटो आणी आगराच्या वर्णनाबद्दल किती कौतुक करावे हेच समजत नाही.
हा आपला कोकण असाच बहरता आणी नैसर्गीक राहु दे, मला नाही आवडणार पर्यटनाच्या नावाखाली कोकणाचे सिमेंटचे जंगल झालेले.
आवडला लेख !
आवडला लेख !
नेहेमीप्रमाणेच सुंदर
हेमाताई, फारच सुंदर वर्णन.
हेमाताई, फारच सुंदर वर्णन. रिंग्ये, पोफळी, दयाळ वगैरे वाचून आजोळची आठवण झाली.
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
हे सगळे पाहून आणि वाचून आता खरोखरी गांवी जाऊन रहावे असे वाटू लागलेय! नको हे सगळे नोकरी वैगेरे उपद्व्याप!
लेखात खास कोकणातील शब्द
लेखात खास कोकणातील शब्द जसेच्या तसे घेतल्याने लेख जवळचा झालाय. प्रचि सुंदर. आणखी प्रचि हवे होते.
Pages