प्रभात वंदन

Submitted by कनू on 24 August, 2017 - 08:33

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही सकाळची प्रार्थना माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.

प्रभात झाली दिशा उजळल्या रवी उदया आला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला || धृ ||

थकुनि भागूनी निजलो असता पाहुनी विश्रांती
आनंदित मज करुनि उठविले देऊनिया स्फूर्ती |
करुनि शोऊच मुख संमार्जन करू नंतर स्नानाला
ईशस्तवना करुनि लागो आपुल्या कामाला || १ ||

कुटुंब पालन करण्या घेऊ व्रत उद्योगाचे
आत्मोद्धारा करण्या करिता पालन योगाचे |
परोपकारी देह लावूनी साधन धर्माचे
मनापासूनि साधू हित हो आपुल्या देशाचे || २ ||

शास्त्र पुराणे वेदादिकही नाही वाचियली
केले नाही तपाचरण वा तीर्थे देखियली |
कर्म करावे कृष्ण बोलिला नसो फली प्रीती
लावुनिया मन कर्मे करितो जी जी तुज रूचती || ३ ||

भक्ती करितो जैसी तैसी मानून ती घेई
संकट पडता धावुनी येई विनंती तव पायी |
कृपा करोनि कर्तव्याचे पैलतीरा नेई
आज्ञा होता आनंदाने येईन तव पायी || ४ ||

प्रभात झाली दिशा उजळल्या रवी उदया आला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला ||

नरहर गोविंद मायदेव
७-१०-१९२६

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users