संध्या वंदन

Submitted by कनू on 24 August, 2017 - 08:23

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही संध्याकाळची प्रार्थना माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.

रवी मावळला दिन हा गेला आलो सदनाला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला || धृ ||

दिवसा माझी नाना कामे जी जी रे पडली
आनंदाने दुःखाने वा सर्वही ती केली
कायिक वाचिक मानसिक वा कर्मे जी घडली
ती ती देवा प्रेम भराने अर्पी पद कमली || १ ||

मन हा वारू भुलूनी जातो नाना मोहाला
क्रोधावे ते मत्त होऊनि नेत अधोगतीला
बुद्धी सारथी धडपड करतो आवारण्या त्याला
नाटोपे तो प्रबळ होऊनि नेई कुमार्गाला || २ ||

तुझ्यावाचुनी त्राता कोणी अन्य नसे उरला
किती दयाळा अंत पहासी जीव हा घाबरला
धाव धाव रे येई सखया आता मदतीला
हेचि विनंती तव चरणासी लावी सुमार्गाला || ३ ||

चुकला मुकला थकुनि भागूनी जीव झोपे आला
मायभूमीवरी ठेवीतसे मी आता देहाला
हेचि मागणे कर जोडुनिया करितो नमनाला
प्रातःकाळी पुन्हा उठोनि लागो कार्याला || ४ ||

रवी मावळला दिन हा गेला आलो सदनाला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला ||

नरहर गोविंद मायदेव
७-१०-१९२६

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान वाटले वाचून.
खरच हिचा प्रसार व्हायला पाहिजे.. १९२६ - नव्वद वर्षांपुर्वींची मराठी केवढी वेगळी होती ना!