चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग ३)

Submitted by पद्म on 2 August, 2017 - 07:38

भाग १
भाग २

कितीतरी वेळ मी त्या मेसेजकडेच पाहत होतो. काय रिप्लाय करावा याचाच विचार करताना परत मेसेज आला, "ओळखलं नाही का?"

आता लगेच रिप्लाय करावा लागणार होता, "ओळखलं. पण तुला माझा नंबर कसा मिळाला?"

"तू मुग्धाला दिला होता, आणि मी तिच्या मोबाईलमधून घेतला. तुला राग तर नाही ना आला, तुला न विचारता तुझा नंबर घेतला म्हणून?"

"नाही.. उलट नंबर घेतल्याबद्दल थँक्स."

"ए पण तिला सांगू नको, तिच्या मोबाईलमधून मी नंबर घेतला म्हणून."

"ओके.. नाही सांगणार"

आम्ही आता असे बोलत होतो, जसे कधी दूर गेलोच नव्हतो. तिने परत मेसेज केला, "तुला माहितीये, आज मी मुग्धाकडे खूप रडले..."

आता मुलींशी अशा विषयावर कसं बोलायचं, कळत नव्हतं, "का? काय झालं?"

"अरे आज तू जवळपास १५ वर्षांनी भेटला. तुझी आम्हाला आठवणसुद्धा खूप यायची, पण आज तू आला आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाहीस. खूप वाईट वाटलं.."

आता काय बोलावं, "अगं मला मुलींशी बोलायची सवय नाही, आणि पप्पा आणि मावशीसमोर काहीच बोलता नाही आलं. पण मग तूसुद्धा नाही बोललीस माझ्याशी."

"जाऊदे, तुला नाही कळणार!"

आता मला काय नाही कळणार, हे मला कसं कळणार?

मी म्हणालो, "जाऊदे बाकी, आता बोलतोय ना?"

" ते तर आहेच म्हणून आज खूप दिवसांनी मी खूप खुश आहे. माझा बेस्ट फ्रेंड मला इतक्या दिवसांनी परत मिळाला."

"Happy friendship day!", मी मेसेज केला.

"काय बोलतोय? आज खरंच फ्रेंडशिप डे आहे?"

"नाही! पण आपण आज पुन्हा भेटलो, म्हणून आपण अजाचाच दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करू."

"खरंय.."

मीसुद्धा आज खूप खुश होतो. सृष्टीनंतर माझ्या जीवनात कधीच कोणी जिवलग मित्र नव्हता. पण आज इतक्या वर्षानंतर ती जागा भरून निघाली होती. हा आनंद काहीतरी करून साजरा करायचा होता पण मला कळत नव्हतं, की कसा साजरा करायचा ते. मग एक कल्पना सुचली, मी सृष्टीला मेसेज केला, "उद्या सकाळी सकाळी काहीतरी गोड खा."

"का?"

"काही नाही! असंच आपल्या मैत्रीचं सेलिब्रेशन"

"नक्की खाईन, तूसुद्धा खा काहीतरी गोड."

"नक्की! चला आता, झोपण्याचा प्रयत्न करतो. good night!"

"मीपण प्रयत्न करते..good night!"

त्या रात्री आनंद ओसंडून वाहत होता. झोप येतच नव्हती कितीतरी वेळ. पण झोपणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी मम्मीसोबत मामाकडे जायचं होतं भाऊबीजेला. मग रात्री केव्हातरी झोप लागली...

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी दिवाळीचा एक लाडू खाल्ला आणि सृष्टीलाही काहीतरी गोड खाण्याची आठवण करून देण्यासाठी मेसेज केला. तिचाही लगेच रिप्लाय आला, "dairy milk, my all time favourite"

त्या दिवसानंतर माझा मोबाईल डेटा २४ तास चालू असायचा, आम्ही आता दिवसभर चॅटिंग करायचो. आम्ही परत लहानपणी होतो तेवढेच मनमोकळे झालो होतो. आता मुलींना असणाऱ्या सवयीमुळे माझं नावही बदलत बदलत, अनिकेतपासून अनी आणि पिल्लूपर्यंत पोहोचलं होतं. खरंच मुलींना खूप मजा येते अशा गोष्टींची, आणि मलाही तिच्या या स्वभावाची सवय होत होती. मी तर तिच्याशी चॅटिंग करताना हेही विसरलो की हिचं लग्न झालं होतं आणि हीचा घटस्फोट झालाय म्हणून. मी कट्ट्यावरच्या मुलांशी मारतात तशा गप्पा तिच्याशी मारत होतो, पण घटस्फोट झाल्यानंतर मुलगी खूप संवेदनशील होऊन जाते हे मी विसरलो आणि त्याच्यामुळे मी चॅटिंग करताना एके दिवशी चुकी केली...

माझ्या सध्या राहणीमानामुळे माझे भरपूर मित्र जास्त जिवलग नव्हते, आणि सृष्टीनेही मला या कारणामुळे दूर करू नये; म्हणून मी तिला एके दिवशी मेसेज केला, "The crockery displayed in the showcase, can never be utilized in the kitchen."

तिचा लगेच रिप्लाय आला, "म्हणजे? तुला काय म्हणायचंय?"

"आपल्या आयुष्यातील काही गोष्टी/व्यक्ती जास्त आकर्षक नसतात, पण म्हणून आपण त्यांना आपल्यापासून दूर करू नये.."

"पण तू मला असं का सांगतोय? काही झालंय का? फोन करू का तुला?"

आतापर्यंत मी तिच्याशी चॅटिंग करत होतो, पण फोनवर बोलायची हिम्मत नव्हती. मी तिला लगेच मेसेज केला, "अगं सहज बोललो. फोनची काही गरज नाही.."

"मी फोन करतेय......."

आणि काही सेकंदातच तिचा फोन आला, "मी हिच्याशी फोनवर काय बोलू? आजपर्यंत तिच्याशी बोललो नाहीये", मला खरंच घाम फुटला होता. जे माझ्यासारखे मुलींशी कमी बोलतात त्यांनाच कळेल, माझी काय स्थिती झाली होती...

मी थरथरत्या हाताने फोन घेतला, "हॅलो!"

"काय झालं अनिकेत? मला असा मेसेज का केला?" ती सरळ मुद्यावरच आली.

"काही नाही, सहज केला.."

"सहज म्हणजे? काहीतरी कारण असेल ना?" तिला राग आलाय असं वाटत होतं.

आता मलाही कारण सांगणं भाग होतं, "अगं खरं सांगू का, भरपूर मुलं मी जास्त बोलत नाही, मी तितका डायनॅमिक नाही म्हणून माझ्याशी जास्त मैत्री करत नाहीत आणि भरपूर मित्र या कारणामुळे सोडूनही गेलेत. पण याच कारणामुळे तूसुद्धा सोडून जायला नको; म्हणून मी तुला तो मेसेज केला."

तिकडून लगेच एक कोमल आवाज आला, "अनिकेत! तू वेडा आहेस का? १५ वर्षानंतर मला माझा बेस्ट फ्रेंड मिळाला, आणि या अशा थिल्लर कारणासाठी मी त्याला सोडेल का? आता एक ऐक, एक वेळ तू मला सोडून जाशील, पण मी तुला कधीच सोडून जाणार नाही, मी तुझी कायमस्वरूपी मैत्रीण राहील.."

तिचं पूर्ण वाक्य आता तरी आठवत नाहीये, पण ऐकून माझ्या डोळ्यात कितीतरी दिवसांनी अश्रू तरळत होते, मीसुद्धा आता बोललो, "मीपण तुला कधीच सोडून जाणार नाही, आयुष्यभर मी तुझा मित्र राहील. कोणत्याही परिस्थितीत!"

हा एक छोटासा प्रसंग आम्हाला एकमेकांच्या कितीतरी जवळ घेऊन आला होता. मला तर वाटतंय कि, जितके जिवलग आम्ही लहानपणी नव्हतो, तितके जिवलग आम्ही आता झालो होतो. आता मलाही तिच्याशी बोलायची उत्सुकता असायची आणि तीसुद्धा माझ्या मेसेजची वाट पाहायची. दिवसभर आम्ही गप्पा मारण्याशिवाय काहीच करत नव्हतो. त्या दिवाळीच्या सुट्या माझ्या जीवनाचा एक खास हिस्सा बनल्या होत्या. आणि मला माहिती आहे कि, तिच्या जीवनातही या दिवसांचं तेच महत्त्व आहे,जे माझ्यासाठी आहे...

पण सुट्या लवकरच संपल्या आणि पुन्हा मला कॉलेजसाठी मुंबईला यावं लागलं. ती मला नेहमी विचारायची, "आपण आता कधी भेटणार?" याचं उत्तर तर मलाही माहिती नव्हतं की आम्ही कधी भेटणार, आता हा तर फक्त नशिबाचा भाग होता की, आम्हाला परत भेटवतो किंवा नाही..

मुंबईत आल्यावर तर मी पूर्ण फ्री झालो होतो. घरी असतांना तरी मम्मी समोर असायची; म्हणून जास्त चॅटिंग करता यायची नाही, पण इथे मुंबईत मला कोणाचाच धाक नव्हता. कॉलेजमध्ये तर जात होतो, पण PL चालू असल्यामुळे आम्हाला काही काम नव्हतं. मग काय, बाकी लेक्चरर्स एकमेकांशी गप्पा मारून वेळ घालवायचे, आणि मी त्या वेळेत फक्त आणि फक्त सृष्टीशी गप्पा मारायचो...पण फक्त चॅटिंग स्वरूपात!

असेच दिवस जात होते, आणि एके दिवशी सृष्टीचा विचित्र मेसेज आला, "अनिकेत, तुला माझं लग्न झालंय माहिती होतं का?"

आम्ही इतके दिवस गप्पा मारत होतो, पण मी स्वतःहून या विषयावर काहीच बोललो नव्हतो. माझी इच्छा होती कि, तिने स्वतःहून या विषयावर कधीतरी माझ्याशी बोलावं. मी तिला मेसेज केला, "हो!"

"मग तुला हेही माहिती असेल की, माझा घटस्फोट झालाय."

"हो!"

"अनिकेत, आज माझा घटस्फोट होऊन पूर्ण १ वर्ष झालंय. १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझा घटस्फोट झाला होता.", तिचा आता माझ्यावर विश्वास बसला होता, म्हणून या विषयावर ती माझ्याशी बोलत होती.

आता ती या विषयावर बोलतच होती, म्हणून मलाही आता याबद्दल संपूर्ण चौकशी करायची उत्सुकता होती. मी विचारलं, "तुला राग येणार नसेल, तर एक विचारू का?"

"मला तुझ्यावर कधीच राग नाही येणार पिल्लू! विचार."

"तुझा घटस्फोट कशामुळे झाला?" मला वाटलं, हा प्रश्न विचारणं तिला आवडणार नाही.

पण तिने लगेच रिप्लाय केला, "लग्न करून मी त्याच्याबरोबर गेले, तर भरपूर दिवस सासरीच होते. आणि तो मुंबईत नोकरीला होता. पण १-२ महिन्यातच मला कळालं की त्याने मुंबईत आधीच एका मुलीशी लग्न केलेलं आहे म्हणून. या गोष्टीची त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या लग्नातून त्यांना १ बाळसुद्धा होतं. मी कायद्याचा वापर करून त्या बाईला आमच्या संसारातून दूर करायचा प्रयत्न करू शकले असते, पण त्या बाळाचं भविष्य या सर्वामुळे वाया गेलं असतं. भरपूर प्रयत्न करून शेवटी मी घटस्फोट घेतला."

हे ऐकून मी सुन्न झालो होतो. अशा प्रकारचे माणसं मी सिनेमात भरपूर पहिले होते, पण खऱ्या आयुष्यात असा माणूस बघून मला धक्का बसला होता. "माझा तर विश्वासच बसत नाहीये, जगात असेही माणसं असतात.."

"अरे पिल्लू, तू खूप साधा आणि सरळ आहेस. जगात खूप वाईट लोक सुद्धा आहेत, जश्या लोकांचा तू विचारही केला नसशील. दुर्दैवाने अश्या लोकांचा मला खूप कमी वयात सामना करावा लागलाय.."

माझ्याकडे आता या विषयावर बोलण्यासाठी काहीच शब्द नव्हते. तिचाच पुन्हा मेसेज आला, "पण तू माझं जास्त टेन्शन नको घेऊ. मी त्यानंतर पूर्णपणे कोलमडून पडले होते. ६ महिने मी घरातून बाहेरसुद्धा गेली नव्हती. मुग्धाने मग माझी समजूत काढली आणि हळूहळू मी तिच्या पार्लरमध्ये जाऊ लागली. आता इतक्या वर्षांनी तू माझ्या जीवनात आला आहेस, तर खरंच मला खूप बरं वाटतंय. फक्त मला परत एकटं सोडून जाऊ नकोस, माझी आता जास्त सहन करायची इच्छा नाहीये."

"अगं मी तुला बोललो होतो ना, आता तू माझी आयुष्यभराची मैत्रीण आहेस म्हणून? तुला मी कधीच सोडून जाणार नाही.."

"थँक्स पिल्लू! तुलाही माहिती नाहीये, कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे.."

सगळ्या मुली खरंच इतक्या संवेदनशील असतात का? पण सृष्टी मात्र तशीच होती! आणि हळूहळू ती माझ्या हृदयात जागा करत होती, माझ्याही नकळत! ती मला माझ्या आयुष्यात फक्त एक बेस्ट फ्रेंड म्हणून हवी होती, पण आमच्यातील नातं मैत्रीच्याही पुढे जात होतं, माझ्याही नकळत!

आता आमची चॅटिंग, संभाषणं, कॉल्स याला कसलंच बंधन राहिलं नव्हतं. आम्ही आमच्या संभाषणात मैत्रीच्या सीमा केव्हाच तोडल्या होत्या, आम्ही एकमेकांशी अनेक विषयांवर जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होतो, जसे आम्ही एकमेकांचे आयुष्याचे जोडीदार आहोत.

पण हे सारं आमच्याही नकळत होत होतं, आणि मला तरी वाटतं हे आमच्यासाठी चांगलं नव्हतं.....

पुढील भाग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users