'टिंग टी, टिंग टी, टिंग टी, टिंग टी, टिंग टिडिंंग टिडिंग'.. 'अभी ना जाओ छोडकर'चा रिंगटोन जोरात वाजला आणि समिपा आठवणीतून बाहेर आली. तोंड धुवून पटकन जीन्स चढवली. त्यावर काळा रेसरबॅक आणि वर निळ्याहिरव्या चेक्सचा शर्ट घालून बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या. पिक्सी कटवाल्या केसांमधून ब्रश फिरवला आणि ओठांवर ग्लॉस फिरवून तयार झाली.
"आई, मी जेधेवाडीला चाललेयss नलिन आणि क्यूटी आहेत बरोबर. मी जेऊनच येईन रात्री"
पायात क्रॉक्स सरकवत समिपा जिन्यात जाऊन ओरडली..
"अगss पण तू अलका काकूकडे.." म्हणत रेवती खाली येइपर्यंत समिपा बाहेर जाऊन नलिनशेजारी कारमध्ये बसलीही होती. सुस्कारा टाकत तिला बाय म्हणून रेवती परत घरात वळली.
--------------------------------------------
"ओहो, क्यूटी क्या बात! आज एकदम पंजाब्बी कुडी.. क्यू इतना सज-धजके? मनजीत आया क्या इंडियामें?" नलिनकडे बघून डोळा मारत समिपा म्हणाली.
मागच्या सीटवरून लाजत लाजत क्यूटी, "क्या मॅम आपभी.." वगैरे पुटपुटली. "आज ना करवा चौथ है इसलीये सूट पेहना और झुमके और ये बँगल्स.. बस इतना सा तो पेहना है!"
"हाँ करेक्ट, इतना सा तो है!" समिपाकडे बघून मिश्किल हसत नलिन म्हणाला.
त्यांनतर जेधेवाडीला पोचायला लागणाऱ्या तासाभरात नलिनला एकही जोक करायचा अवधी न देता, समिपाने 'वनराजी'चे स्ट्रक्चर आणि त्यात होणाऱ्या बदलांचा आराखडा त्याला आणि क्यूटीला समजावला.
वनराजीच्या गेटला टेकून सखुबाई बसली होती. कारचा आवाज येताच ती कडेला ठेवलेली काठी धरून उभी राहिली. गाडीतून उतरताच समिपाने नलीनची सखूबाईबरोबर ओळख करून दिली. सहा फूट उंच, हट्टयाकट्या नलीनला भेटून ती जरा चरकलीच पण लागलीच तोंडावर हसू आणून, मी त्या गावचीच नाही असे भासवले.
"चला सायब, मी वाडा दाकवते" म्हणून लगबगीने नलीनला बरोबर घेऊन ती पुढे गेली.
क्युटिने समिपाकडे बघून कानाशेजारी बोट फिरवून चक्रम! अशी खूण केली आणि हसून दोघी मागोमाग जाऊ लागल्या.
पहिल्याच खोलीत जाताना लोखंडी सळ्यांचा कर्रर्रर्र कर्रर्रर्र असा अतिशय कर्कश्य आवाज आल्यामुळे दोघीनी आत डोकावून पाहिलं तर झोपाळा कोणीतरी बसल्यासारखा लयीत हलत होता आणि त्याच्यावरची धूळ स्वच्छ झाली असली तरी लहान लहान हातांचे चिखलाचे ठसे स्पष्ट उमटले होते. बाहेरून झोपाळ्याकडे जाणारे लहान पायांचेहीे चिखलाचे ओले ठसे दिसत होते पण.. आतून बाहेर जाणारा एकही ठसा नव्हता.
तरीही क्यूटी आत जाऊन शोधून आली पण आत कोणीच नव्हते. तिकडे दुर्लक्ष करायचे ठरवून दोघी घाईने नलिन आणि सखुबाई बरोबर चालू लागल्या.
एकेका खोलीत जाऊन आराखडा दाखवून समिपा तिचा प्लॅन समजावत होती. नेहमीप्रमाणेच प्लॅन अगदी बिनचूक होता आणि सगळ्या अँटिक फर्निचरसह सगळे बदल होणार होते. नलिन अभिमानाने समिपाकडे पाहत होता. तितक्यात..
त्याला व्हरांड्याच्या खिडकीत हालचाल जाणवली. काय आहे बघायला तो खोलीबाहेर आला तोच चौकात साचलेल्या तळ्यात धप्प पाणी उडवत एक मोठा दगड येऊन पडला. आवाजाने एव्हाना सगळेच बाहेर आले. समिपाने समोर पाहिले तर एक काळ्या रेषा असलेला पिवळट, मनगटाएवढा रुंद, भलाथोरला चपळ साप पाण्यातून वळवळत तिच्या दिशेने येत होता..
समिपा शांतपणे पुढे झाली, तिची थंड नजर सापावर रोखलेली होती. उजव्या हाताने शेपटाकडे धरून तिने तो साप उचलला! सखुबाई तोंडावर हात धरून डोळे विस्फारून बघत होती.. क्यूटी गुपचूप नलीनच्या जवळ सरकून उभी होती. समिपा सरळ तो साप घेऊन गेटबाहेर गेली आणि तिथल्या झाडोऱ्यात त्याला सोडून आली.
"चला. विषारी नव्हता. साधी धामण होती" म्हणत समिपा पुढे चालायलाही लागली. क्यूटी आणि नलिन जाम इम्प्रेस झाले होते पण सखुबाईच्या ओठांच्या जागी सरळ रेष झाली होती आणि हाताच्या मुठी घट्ट वळल्या गेल्या होत्या. काही क्षणातच तिचं लाळघोटं हसू चेहऱ्यावर परत पसरलं.
-------------------------------------------------
क्यूटीला तिच्या पिजीवर सोडून नलिन आणि समिपा त्याच्या आवडत्या by the bay मध्ये जेवायला आले. तिथली स्पेशालिटी असणारे बटर गार्लिक प्रॉन्स, ग्रील्ड सामन आणि इतर स्टार्टर्स खाता खाताच पोट भरले म्हणून समिपा नुसतीच बडबड करत बसली होती. पूलसाईड टेबल असल्यामुळे वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर पाणी खळखळून लहान लहान लाटा उठत होत्या. आकाशात चतुर्थीचा गोलसर पिवळट चंद्र असला तरी पावसाळ्याची रात्र असल्याने अधेमधे ढगांच्या आड जात होता. इन्स्ट्रुमेंटल वर यानीचे फेलिझा सुरू झाले.
डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकताना तिने अचानक डोळे उघडून पूलच्या पलीकडे पाहिले. एक काळीकभिन्न सावली भिंतीला चिकटून सरकत होती.. अंधारात त्याच्या हसणाऱ्या तोंडातून शुभ्र सुळे चमकत होते. पायातल्या वहाणा दमदार पावलामुळे करकरत होत्या. चंद्राचा एक किरण त्याच्या हातावर पडला आणि हातातला धारधार कोयता चमकला!
समिपाच्या हातातला पाण्याचा ग्लास गळून पडून त्याचा चक्काचूर झाला आणि त्याच क्षणी ती उठून किंचाळत सुटली..
क्रमशः
आज मी पहिली
आज मी पहिली..
आज मी पहिली पुढचा लवकर टाका
आज मी पहिली पुढचा भाग लवकर टाका.
Interesting.. पुलेशु!
Interesting.. पुलेशु!
वा!! उत्कंठावर्धक
वा!! उत्कंठावर्धक
तुमचं लिखाण दमदार आहे पण मी
तुमचं लिखाण दमदार आहे पण मी विनंती करते जरा मोठे भाग टाका ना छान वाटेल मोठे भाग वाचताना....तुम्ही वाट पाहायला लावत नाही हे उत्तम परंतु तुमच्या उत्कृष्ट लेखनशैली मुळे उत्सुकता वाढते....धन्यवाद