पुळण - भाग ४

Submitted by मॅगी on 12 July, 2017 - 02:24

भाग ३

पाऊस थांबला असला तरी 'वनराजी' समोरच्या उंच, भलं भक्कम खोड पसरलेल्या गोरखचिंचेच्या पानापानातून थेंबांचा वर्षाव होत होता. ते पाणी चुकवत समिपा आणि क्यूटी गेटजवळ आल्या. घराची किल्ली जवळ असली तरी घर व्यवस्थित दाखवण्यासाठी जवळ राहणाऱ्या सखुबाई येतील असे मेहतांनी सांगून ठेवले होते. सखुबाईंच्या मुलाला आधी कॉल करूनसुद्धा त्या काही आल्या नव्हत्या.

"ये बाई तो आईही नाही अभीतक! क्या करे मॅम? चलो ना, हम ही अंदर चलते हैं" इतक्या राड्यातही क्यूटीचा उत्साह कायम होता.

हम्म दुसरा काही उपायच नाही म्हणून समिपाने फाटकाचे कुलूप काढून अंगणात पाय ठेवला. अंगण तरी नुकतेच झाडल्यासारखे स्वच्छ होते. वाड्याचा मुख्य दरवाजा अगदी जुन्या किल्ल्यासारखा भलामोठा, सागवानी लाकडाचा आणि त्यावर ठिकठिकाणी लोखंडी टोकेरी कोन ठोकलेले होते.

"क्यूटी, देखो इसे कहते है रिअल हार्डवूड! ऐसा अभी देखने के लिए भी नही मिलता." दाराच्या लाकडाला स्पर्श करत समिपा म्हणाली. घर जरी पूर्ण काळ्या दगडात बांधले असले तरी त्यावर बाहेरून सगळीकडे हिरवेगार शेवाळ तरारून लोंबत होते, बऱ्याच खोबणींमधून चुकार पिंपळाची झाडे डोकावत होती. ह्याच्यावर काम केले पाहिजे, एकेक मेंटल नोट घेत समिपाने दरवाजा उघडला. इतका जड दरवाजा महत्प्रयासाने कर्रर्रर्रsss आवाज करत उघडला गेला.

आत गेल्यागेल्या त्या चौसोपी वाड्याची वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षामुळे झालेली वाईट अवस्था नजरेस पडली. मधोमध उघडा चौकोन त्याच्या चारी बाजूनी व्हरांडे, व्हरांड्याना असलेले काळेभोर लाकडी खांब आणि व्हरांड्याच्या मागे खोल्या अश्या एकमजली वाड्यात आता ठिकठिकाणी फुटलेली कौले, पाणी गळून भिंतींना आलेली बुरशी आणि ओल, मोकळ्या चौकात साठलेले हिरवा तवंग आलेले तळे असे निराश करणारे चित्र होते.

"क्यूटी, तुम अभी नोटपॅड निकालो और नीचे के रूम्स चेक करो. क्या क्या प्रॉब्लेम्स है लिख लो. मै ऊपर के रूम्स देखती हूं" असे म्हणून समिपा डाव्या कोपऱ्यात असलेला लाकडी जिना चढून वर गेली. समोर वाड्याचा दिवाणखाना होता. भिंतीला लागून मूळचे शुभ्र पण आता पिवळी पडलेली खोळ घातलेले भारतीय बैठक आणि भरपूर लोड तक्ये ठेवलेले होते. छताला निळ्या, हिरव्या रंगीत काचेच्या धुळकटलेल्या हंड्या लावलेल्या होत्या. बैठकीसमोर मोठ्ठया लाकडी अल्मीऱ्यात भरपूर पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवली होती. त्याच्या एका दारावर पारा उडत चाललेला आरसा आणि दुसऱ्यावर बैलगाडी हाकणाऱ्या माणसाचे चित्र होते.

चित्राकडे बघता बघता शेजारच्या आरश्यात लक्ककन काहीतरी हलले. समिपाने झटक्यात मागे बघितले तर सगळ्या हंडयांमध्ये आता तेलाने भरलेले ग्लास होते आणि चक्क ज्योती तेवत होत्या. खालच्या सगळ्या खोळी आता पांढऱ्याशुभ्र चमकत होत्या. एवढंच काय तर त्या बिलोरी आरशातली तिची प्रतिमाही लख्ख दिसत होती! समिपा अचंबित होऊन इकडेतिकडे पाहू लागली. अचानक खिडक्यांच्या काचा थडथड वाजू लागल्या, हंडयांमधल्या ज्योती फडफडू लागल्या, वाऱ्याचा एक झोत येऊन अल्मीऱ्याचे दार खाडकन उघडले आणि दोन तीन पुस्तकं खाली पडली. पटकन खिडकी बंद करून समिपाने पुस्तक उचलले तर पुस्तकाचे नाव होते, 'या! किती वाट पहायची' घाबरून तिच्या हातातून पुस्तक गळूनच पडले आणि तोल जाताजाता तिला खिडकीच्या काचेतून अस्पष्ट दिसले रोखून बघणारे लालभडक डोळे आणि डोईच्या हिरव्या पदराखालून वाऱ्यावर अस्ताव्यस्त उडणारे लांब कुरळे केस..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समिपा वर गेल्याचे पाहून क्यूटी पहिल्या खोलीत शिरून मस्तपैकी झोपाळ्यावर बसली. झोके घेता घेता मनजितला कॉल करून सगळे अपडेट देऊन झाले. फोनवर बिझी असताना तिला हे जाणवत नव्हतं की जमिनीला पाय न लावताही झोके आपोआप येत आहेत! कॉल नंतर ती पुढच्या खोलीत जाऊन नोट्स लिहायला लागली तितक्यात मागून कुणीतरी तिच्या पाठीला स्पर्श केला.

जोरात किंकाळी फोडून क्यूटी मागे वळली तर एक निम्मेअधिक दात पडलेली, चेहराभर सुरकुत्या असणारी, हिरवी नऊवार नेसलेली म्हातारी एका हाताने पांढऱ्याफिट्ट केसांचा अंबाडा वळत, दोन मशेरीने काळे पडलेले दात दाखवत बोळकं पसरून हसत होती. तिच्या लालभडक मोठ्या कुंकवाचा ओघळ पोपटासारख्या बाकदार नाकाच्या टोकापर्यंत आला होता..

भाग ५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिताय
भाग छोटे होत असले / झाले तरी फ्रिकवेन्सी मेंटेंड करा म्हणजे लिंक तुटणार नाही

Nd च्या गोष्टीची आठवण झाली।। काळी जोगिण मध्ये त्याला असाच जुना वाडा नव्यासारखा दिसतो।।बापरे भिती वाटली वाचून। मोठा भाग टाकला तर बरं होईल।