आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - १ - अंड्या प्याटीस ! ए लव्ह ई स्टोरी - http://www.maayboli.com/node/62355
मागच्या महिन्यातील गोष्ट!
ऑफिसच्या कामानिमित्त अध्येमध्ये मुंबईत फिरणे होत असते. कंपनी भटकंतीचा भत्ता म्हणून एसी कॅबचे पैसे देते. पावतीचीही अपेक्षा नसते. फार कडक ऊन नसेल आणि कमी गर्दीची वेळ असेल तर मी बस ट्रेनचा वापर करतो आणि काही पैसे वाचवतो. ते माझ्या खिशात जातात. आऊट ड्यूटीचे एक्स्ट्रा पैसे हक्काने मिळत असले तरी असे वाचवून पैसे कमावण्याची मजा न्यारीच असते. खाण्याचेही वेगळे पैसे असतात. तुम्ही कुठेही खा, कितीही खा. त्याचे पाचशे रुपये वेगळे मिळतात. तिथेही आपसूक वाचतात.
तर असेच एके दिवशी मुंबई ते अंधेरी - अंधेरी ते बेलापूर - बेलापूर ते मुंबईला परत घरी असा कार्यक्रम होता. सकाळी साधारण दहा वाजता न्याहारीच्या नावावर चहाच्या पेल्यात दोन बिस्कीटे बुचकाळून खाल्याने लवकरच भूक लागणार हे घरून बाहेर पडताना जाणवले. पण आधी अंधेरीचे काम उरकून घेऊया आणि मग निवांत खाऊन बेलापूरची ट्रेन पकडूया असा विचार केला. पण कामाने दगा दिला. तासाभराचे काम तब्बल अडीच तास खर्ची झाले. साडेअकराच्या ठोक्याला ईच्छित स्थळी पोहोचलेलो. साडेबारा पर्यंत काम उरकने अपेक्षित होते. पण त्या लोकांनी माझे चौदा वाजवले. त्या बदल्यात माझ्या वेळेची भरपाई म्हणून त्यांच्या लंचच्या ऑफरला मी विनम्रपणे नकार दिला. मग त्यांनी मला कॉफी आणि त्यात बुचकळायला पलेटभर बिस्कीटे दिली. मी अर्धीच प्लेट रिकामी केली. निघताना जेव्हा त्यांच्या पॅन्ट्रीमधून चिकन बिर्याणीचा वास आला तेव्हा मला पश्चाताप झाला की मी नेमके कश्याला नकार दिला.
आता आपणही बाहेर हॉटेलात जाऊन बिर्याणीच हादडायची असा विचार करून बाहेर पडलो खरा. पण एसीतून बाहेर पडलेल्या माझ्या गारठलेल्या जीवाला मे महिन्याच्या उन्हाने गाठले. त्या उन्हात मांसाहारी खानावळ शोधायची आणि मग त्या डोके गरम अवस्थेत मांसाहार करायचा यात काही लॉजिक नाही म्हणत जवळच एखादे ठिकठाक एसी हॉटेल दिसते का बघू लागलो. खाण्यापेक्षा थंडाव्याची गरज होती. एखादा ऊडपी पकडून आपला ऑल टाईम फेव्हरेट मसाला डोसा हादडूया असा विचार केला. तेच समोर एक नावातच "डोसा" असलेले हॉटेल दिसले.
भुकेला मागतो एक डोसा आणि देव देतो हजार डोसे असे माझे झाले. मेनूकार्डची पहिली पाच पाने नुसते ह्यांव डोसा आणि त्यांव डोसाने भरून गेली होती. आपले नेहमीचे मैसूर, शेजवान, स्प्रिंग, मसाला ईत्यादी डोसे तर होतेच पण पनीर, मशरूम, कॉर्न, बेबीकॉर्न ते कॅप्सिकम चॅप्सिकम आणि बरेच काही. पावभाजीची भाजी असो वा चायनीज नूडल्स ते अमेरीकन चॉप्सी.. जगभरातले सारे शाकाहारी पदार्थ त्या दहा बाय बाराच्या डोश्यात भरून विकत होते. काय खाऊ आणि काय नको असे झाले. एकेकाची वर्णने वाचतानाच पंधरा मिनिटे खर्ची झाले. नशीब गर्लफ्रेण्ड सोबत नव्हती. ऑर्डर द्यायला तीन मिनिटे विलंब होत चौथे मिनिट उजाडताच तिच्या पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरु होते. मी मात्र आणखी पंधरा मिनिटे घेऊन पुर्ण वाचून काढले. पण जेवढे वाचले तेवढेच काय घ्यावे आणि काय खावे याचा गोंधळ होऊ लागला. कारण खाणारे पोट एकच होते. म्हणजे एवढ्या सारया प्रकारातून एकच काय तो निवडायचा होता. म्हटलं आज जिवाची अंधेरी करूया. पैसे कंपनीनेच दिले असतात. मग नावे वाचायची सोडून किंमतीवरून बोट फिरवू लागलो. एका 180 रुपयांच्या डोश्यावर अडकलो. स्पेशल महाराजा डोसा! नाव वाचताच अंगातला डोसा काढून डोक्यावर गरगर फिरवणारा उघडा गांगुली आठवला. अगदी तसेच वेटरला हात दाखवत म्हटलं हाच ! त्याखाली वर्णनात लिहिलेल्या टॉमेटो ग्रेव्हीने मनात क्षणभर शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र पोटात कोकलणारया कावळ्यांनी त्या चुकचुकीला दाबून टाकले.
एवढा वेळ मेनूकार्डमध्ये खुपसलेले डोके आता बाहेर काढत आजूबाजूला पाहिले तर वाह.. काही सुंदर चेहरे नजरेस पडले. मनात विचार आला बरे झाले नेहमीसारखे मसाला डोसा नाही मागवला. नाहीतर एवढे पर्याय असूनही टिपिकल डोसा मागवला म्हणून या मॉडर्न युवतींसमोर माझे ईंम्प्रेशन गावंढळ झाले असते.
ईतक्यात समोरून वेटर येताना दिसला. हातात निरंजनासारखे ताट. मधोमध मेणबत्ती पेटलेली. सभोवताली डोश्याचे पेस्ट्री किंवा पिझ्यासारखे कट केलेले तुकडे. आधी वाटले त्या शेजारच्या ग्रूपमध्येच कोणाचा तरी बर्थडे असावा. काय एकेक फॅड असते. पण नाही. तो माझ्याच दिशेने येत होता. तो माझाच महाराजा स्पेशल डोसा होता. आता मला टेबलाखाली कुठेतरी लपायची ईच्छा झाली. आजूबाजुचे सारे जरी आपल्याच खाण्यात मग्न असले तरी उगाचच माझ्याकडेच बघताहेत असे वाटू लागले. मेणबत्तीही कमळाच्या आकाराची होती. तिला लाडात फूंकर मारत विझवायला कसेसेच होऊ लागले. बरं पंजा मारत विझवावे तर हल्ली कमळावर पंजा मारायचे दिवस उरले नाहीत. पंजाच भाजला असता. डोश्याच्या आत ढोकळा आणि फाफडा तर भरला नसेल अशीही शंका आली. (माझ्या लेखात राजकीय कॉमेंट नसतात, पण तेव्हा मनात आलेले प्रामाणिक विचार हेच होते. असो..) एक फोटो काढायचा मोह झाला. पण पुन्हा आजूबाजूंच्या युवतींवर मिडलक्लास ईम्प्रेशन व्हायच्या भितीने आवरता घेतला.
हॉटेलमालकाचा बर्थडे होता की काय अशीही शंका मनाला चाटून गेली. अधिक चौकशी करता समजले तो सजावटीचा भाग होता. अर्थातच याचे पैसे माझ्याच खिशातून उकळले जाणार होते. हे ध्यानात येताच मी पटकन त्यावर फूंक मारत उचलून ती मेणबत्ती खिशात टाकली आणि डोश्याचा पहिलाच तुकडा काटाचमच्याने स्टाईलमध्ये उचलत तोण्डात टाकला आणि.... घशातच अडकला.
काटा नाही, तर घास. आंबटपणाचा कळस होता. माझी गर्लफ्रेंड सोबत असती तर नक्की बोलली असती, आंबटपणाची हद्द झाली बाई.. आंबट पदार्थ आम्हा दोघांच्याही डोक्यात जातात. ही बहुधा जगातली दुसरी गोष्ट असावी ज्याबाबत आमची मते जुळतात. पहिली गोष्ट म्हणजे कुठून याच्या/हिच्या प्रेमात पडायची दुर्बुद्धी झाली
असो, तर मी आंबटशौकीन नसल्याने चार पाच तुकडे पचवायचे वायफळ प्रयत्न करून तो डोसा खायचा नाद सोडला. ऑर्डर घेणारया वेटरला हाक मारली आणि त्याला विचारले, "हा महाराजा डोसा कुठल्या आंबटशौकीन महाराजांच्या स्मरणार्थ बनवता? नेहमीच ईतकाच आंबट असतो की आज काही स्पेशल दिवस आहे?"
बहुधा हा त्याच्या अखत्यारीतील प्रश्न नव्हता. त्याने सूटाबूटातील मॅनेजरला बोलावले. तो आणखी चक्रम होता. त्याने माझ्याच ताटातील तुकडा तोडून खाल्ला आणि "फर्स्टक्लास है" बोलून निघून गेला.
समोर चार प्रकारचे सांबार चटण्या दिल्या होत्या. तोंडाची चव घालवायला मी त्यातले एक चमचा तोंडात टाकले तर ते त्यापेक्षा आंबट निघाले. नुसते आंबट नाही तर आंबटशार, आंबटगर्द, आंबटखोर.. यापेक्षा जगात आंबट काही असूच शकत नाही असे आंबटमिट्ट. प्रयोग शाळेत टेस्ट ट्यूब तोंडात धरून खेचतात तसे आम्ल चाखल्यासारखे वाटले. टिश्यूपेपरने जीभ चोळून तडक उठलो आणि अक्कलखाती पैसे जमा करून बाहेर पडलो.
असे भरल्या ताटावरून उठायला जीवावर आले होते पण जे काही समोर होते त्याला अन्न बोलणे हाच मूळात अन्नाचा अपमान होता. जर कोणी अन्नाची नासाडी केलीच असेल तर ती या हॉटेलवाल्यांनी असा पदार्थ बनवून आधीच केली होती. मी फक्त त्यांच्या पापाची शिक्षा भोगायला नकार दिला ईतकेच.
अंधेरी स्टेशनला खडेखडे एखादा भजीपाव खाल्ला असता तर बरे झाले असते असे वाटत होते पण आता काहीच खायची इच्छा नव्हती. पण भूक मात्र होती. बेलापूरला पोहोचेपर्यत ती आणखी वाढली. आता भरपाई म्हणून काहीतरी झणझणीत खायचे ठरवले.
बेलापूर मला या आधी नावावरून गावंच वाटायचे. पण बरेच बरे होते की.. पाहिले तर बरेच बार होते. मी दारू पित असतो तर बरे झाले असते. दोन पेग रिचवून चार उलट्या काढल्या असत्या आणि दारूच्या मदतीने डोश्याचे दुख विसरलो असतो.
मग एका नावातच "कोल्हापूर" असलेले हॉटेल दिसले. ईथे नक्कीच अपेक्षित असे झणझणीत आणि चमचमीत जेवण मिळेल असा विचार करून आत शिरलो. मेनूकार्ड चाळत असतानाच गल्ल्यावर बसलेल्या हॉटेलमालकाचा मंजूळ आवाज कानावर पडला. आंडू गुण्डू थण्डा पाणी.. अरे देवा.. कोल्हापूर नावाने दुकान थाटून बसलेला तो एक सौथेण्डीयन होता. पुन्हा फसवणूक. मेनूकार्डवर तांबडा रस्सा पांढरा रस्सा वाचून जे तोंडाला पाणी सुटलेले ते तोंडातच आटून थोडासा घाम फुटला. तरीही रिस्क घेऊन कोल्हापुरी मिसळ मागवली. मिसळची लाऊन लाऊन किती वाट लावतील हा त्यामागचा विचार. तसेच कार्डावरचा सर्वात स्वस्त मेनू तोच होता. फसवणूक झालीच तर आर्थिकदृष्ट्या कमीत कमी होणार होती.
पण झाले भलतेच..
कदाचित माझ्या अपेक्षाच कमी असल्यामुळेही असेन पण मिसळपावचे पहिलेच दर्शन सुखावून गेले. मस्त तिखट झणझणीत फील चव घेण्याच्या आधीच आला. न संकोचता खिशातून मोबाईल काढला आणि मिसळीचा पावासह फोटो टिपला. प्रत्यक्षात चवही तशीच भन्नाट होती. एका दुर्मुखलेल्या दिवसाचा शेवट असा सुहास्यवदनी झाल्याने एक मराठी आणि मराठीप्रेमी माणूस म्हणून त्या 'मिसळपाव' चा फोटो 'मायबोली' वर शेअर करायचा मोह आवरत नाहीये
क्काय प्रवाही लिहीलंय
क्काय प्रवाही लिहीलंय ऋन्मेssष!! मानलं राव आपल्याला.
बाकी
मिसळचा फोटो बघून खूप भुक
मिसळचा फोटो बघून खूप भुक लागली
नेहमीप्रमाणे खुमासदार लेख
नेहमीप्रमाणे खुमासदार लेख
मला शेवटचे वाक्य जाम आवाडले
भारी लिहिलंय।
भारी लिहिलंय।
आणि मिसळीचा फोटो तर अजून भारी।
बाकी डोसा खाताना माझी मजल जास्तीत जास्त मसाला डोसा यापर्यंतच जाते।।।
मिसळ!!!......तोंपासु.
मिसळ!!!......तोंपासु.
नशीब गर्लफ्रेण्ड सोबत नव्हती.
नशीब गर्लफ्रेण्ड सोबत नव्हती. ऑर्डर द्यायला तीन मिनिटे विलंब होत चौथे मिनिट उजाडताच तिच्या पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरु होते + 1000
-100% खरे आहे. ऋ. माझ्या मनातील व्यथा बोलून दाखविल्याबद्दल शतशः धन्यवाद.
ही बहुधा जगातली दुसरी गोष्ट असावी ज्याबाबत आमची मते जुळतात. पहिली गोष्ट म्हणजे कुठून याच्या/हिच्या प्रेमात पडायची दुर्बुद्धी झाली.
मान्या ऋ आपको क्या लिख्या है. हॅट्स ऑफ.
मिसळ बघून तोंडालापाणी सुटले. आता पुढच्या सप्ताहांतास मिसळीचा बेत नक्की.
लिहीत रहा राव असे.
आहाहा, मिसळ फोटो भारीच. चव
आहाहा, मिसळ फोटो भारीच.
नावावरुन मला रेसीपीज वाटल्या
नावावरुन मला रेसीपीज वाटल्या आणि फोटो बघुन अचानक चिंटू बद्दलचा रिस्पेक्ट वाढलेला मिसळ आणि मेनली कापलेला कांदा बघुन!
डोशाचे वर्णन वाचून पनीर चिली
डोशाचे वर्णन वाचून पनीर चिली रवा डोसा आठवला.प्लेतमधे केळीच्या पानावर डोश्याचे वाफाळलेले तुकडे बघून जीव तृप्त व्हायचा.
अदिती, चिंटू बोले तो?
अदिती, चिंटू बोले तो?
तुझा हेड कुक रे. चिंटू कि
तुझा हेड कुक रे. चिंटू कि पिंटू
अरे व्वा !!! गांगुली अंगात
अरे व्वा !!! गांगुली अंगात डोसा पण घालायला लागला का ???
पोट भरलं वर्णन वाचून. डोशात
पोट भरलं वर्णन वाचून. डोशात एवढं आंबट काय असेल असा विचार आला. मिसळीचा रस्सा म्हणजे कांदा भाजून लाल तिखटात वाटलेला दिसतोय.
एकदा माटुंग्याच्या हाटेलांवर लेखमालिका लिहिशील का?
रून्म्या, भारी लिहिलंय अन्
रून्म्या, भारी लिहिलंय अन् फोटु बी!
दहा बाय बाराच्या डोश्यात >>>> दोसा चौकोनी होता का?
मस्त लिहिलंय, for a change..
मस्त लिहिलंय, for a change.....
हा हा हा !!
हा हा हा !!
मस्त लिहिले आहेस मित्रा. यंदा बरेच दिवसांनी तुझ्या धाग्याकडे मान वळविली आणि मजा आली तुझे लिखाण वाचून
-प्रसन्न
मस्तच.
मस्तच.
मिसळीचा फोटि झक्कास. तोंपासु.
पण हॉटेलात जाउन लंचला दोसा इडल्या कस्काय खातात लोक ह्याचं मला आश्चर्ञ वाटतं.
अदिती ओह.. पिण्ट्या माय
अदिती ओह.. पिण्ट्या माय फ्रेण्ड.. तो यात नव्हता कुठेच. पण पुढच्या एखाद्या भागात नक्कीच असेल.
Srd, माटुंग्याचे म्हणजे रुईया पोद्दारजवळचे का? मनीसच्या खूप आठवणी आहेत .. बाकीचे एकेकदा हजेरी लावलेले.
मंजूताई >>> दोसा चौकोनी होता का?
>>>><
कल्पना नाही. उलगडून पाहिला नाही. पण त्याचे लपेटून केलेले तुकडे मात्र समांतरभुज चौकोन होते.
सस्मित, >>>> पण हॉटेलात जाउन लंचला दोसा इडल्या कस्काय खातात लोक ह्याचं मला आश्चर्ञ वाटतं.
>>>>
माझं लॉजिक सांगतो.
वेज थाळी मागवली तर नको असलेले पन्नास पदार्थ खावे किंवा टाकावे लागतात.
नॉनवेज थाळी मी शक्यतो मागवत नाही कारण त्यात गंडवतात.
सब्जी रोटी कोणी सोबत असले तर शेअर करता येते अन्यथा खूप होते.
दाल खिचडी असो वा अगदी चिकन बिर्याणी, राईस एके राईस बोर होते.
पावभाजी एके पावभाजीही मी खाऊ शकत नाही कारण लेखात उल्लेखल्याप्रमाणे मी आंबट शौकीन नाही. टॉमेटोचे नाव ऐकूनच तोंड आंबट होते.
त्यामुळे डोसा, मिसळ, पुरीभाजी हे सोयीचे, आवडीचे आणि पुरेसे पोटभरीचे प्रकार.
साधना, प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद
एबिपीमाझा -खाद्यभ्रमंतीत
एबिपीमाझा -खाद्यभ्रमंतीत दाखवतात माटुंग्याची हाटेलं. तिकडे रांगाही लागतात शनि रविवारी. पाचसहा आहेत. रुइया ते माहेश्वरी उद्यान परिसरात.
भारी लिहीलय. शेवटचं वाक्य
भारी लिहीलय. शेवटचं वाक्य लईच आवडंल.
भारी...
भारी...
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
शेवटच्या वाक्यात्ली कोटी आवडली..
अदिती ओह.. पिण्ट्या माय
अदिती ओह.. पिण्ट्या माय फ्रेण्ड.. तो यात नव्हता कुठेच. पण पुढच्या एखाद्या भागात नक्कीच असेल. >>> अरे वा, मी वाट पहातेय. फॅन आहेना मी पिंट्याची .
छान लेख ॠन्मेष!
छान लेख ॠन्मेष!
ऋ , मस्तच लिहिलंयस .
ऋ , मस्तच लिहिलंयस .
माबो वरच्या सध्याच्या कोरड्या नीरस उन्हाळ्यात मस्त आनंदाचा शिडकावा केलास रे . मज्जा आली वाचताना .
मिपा चा फोटो माबो वर ? पण आलाय झकास .
मी मिपा ला हात ही लावत नाही . जर ही नाही आवडत .
srd ओके. माझ्या शाळेतील आठवणी
srd ओके. माझ्या शाळेतील आठवणी आहेत. अर्थात लो बजेट. हे रांगा प्रकरणाची कल्पना नाही. बघायला हवे.
अरे हो, एक आठवले. तिथल्या एका हॉटेलात माझी गर्लफ्रेण्ड मला घेऊन गेलेली. सिझलिंग ब्राऊनी खायला. माझ्यासाठी तेव्हा तो प्रकार नवीन असल्याने तो देखील असाच महाराजा डोसा विथ मेणबत्ती क्षण होता
ईतर प्रतिसादांचे आभार धन्यवाद शुकरीया ..!
मी मिपा ला हात ही लावत नाही .
मी मिपा ला हात ही लावत नाही . जर ही नाही आवडत .
>>>>>
विश्वास ठेवा. मिसळपाव न आवडणारी व्यक्ती मी तरी आज पहिल्यांदा बघतोय. कमी आवडणारी पाहिलीय. पण हातही लावत नाही हे ऐकून धक्का बसला .
मिसळपाव + मायबोली
मिसळपाव + मायबोली
गट बंधन आवडले
छान अगदी हल्काफुल्का मूड रिफ्रेशिंग लेख
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
विश्वास ठेवा. मिसळपाव न
विश्वास ठेवा. मिसळपाव न आवडणारी व्यक्ती मी तरी आज पहिल्यांदा बघतोय. कमी आवडणारी पाहिलीय. पण हातही लावत नाही हे ऐकून धक्का बसला ....
ऋन्मेष मिपा वरती पण आहे?????
Pages