स्थळ : जर्मनीतलं एक लहानसं गाव मोल्किंग
काळ : दुसर्या महायुद्धाचा
प्रमुख पात्रं : कम्युनिस्ट आईबापाच्या पोटी जन्माला आलेली आणि (त्यामुळेच?) आता अनाथ झालेली नऊ वर्षांची छोटी लीझेल, तिचा सांभाळ करणारं जर्मन दांपत्य हान्झ आणि रोजा हूबरमन, त्यांनी (तळ)घरात आश्रय दिलेला ज्यू तरुण मॅक्स, लीझेलचा बालमित्र रूडी, लीझेलला आपली लायब्ररी वापरू देणारी इल्सा हर्मन, आणि... हिटलर!
निवेदक : मृत्यू!
खरंतर या परिचयानंतर कथेत 'घटना' काय घडू शकतील याचा आपल्याला अंदाज येतोच. निवेदक प्रत्यक्ष मृत्यूच आहे, आणि नसता तरीही या कथेत त्याचा विसर पडणं अशक्यच. कथेची सुरुवातच मुळी लीझेल तिच्या धाकट्या भावाचा मृत्यू प्रत्यक्ष पाहते तिथून होते. हा मृत्यू तिला आयुष्यभरासाठी पछाडतो. रात्रीअपरात्री स्वप्नात पुन्हा पुन्हा दिसत राहतो. पुढच्या संहाराची जणू तिच्यापुरती नांदी ठरतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर कथा हृद्य आणि संस्मरणीय होते यात नवल नाहीच.
नवल आहे ते मार्कस झ्यूसॅकच्या 'अंदाज-ए-बयाँ', अर्थातच कथनशैलीत!
हा माणूस लबाड आहे! तो बेधडक क्लीशेज वापरतो आणि आता आपल्याला कळलं काय ते - असं वाटेवाटेस्तोवर एखादा धक्का देतो!
घटनाक्रमाइतकीच पात्रयोजनादेखील प्रेडिक्टेबल आहे. रोजा कजाग पण प्रेमळ आहे, हान्झ समजूतदार आणि मिश्किल आहे, ते गरीब आहेत, त्यांचा मुलगा आईबापाला दुरावलेला नाझी सोल्जर आहे, रूडी मूर्तिमंत टीनएजर आहे, इल्सा मेयर नवर्याच्या हस्तिदंती मनोर्यात पुत्रनिधनाच्या दु:खाच्या कारावासात आहे, मॅक्स एकेकाळी उष्ण रक्ताचा बॉक्सर होता, आता तो जेमतेम उरला आहे!
मार्कस या पात्रांच्यात शब्द फुंकतो, रूपकं चेतवतो, आणि ती जागी होऊन त्या हिमल स्ट्रीटवर वावरायला लागतात.
लीझेलच्या भावाला प्रवासात मृत्यू येतो. घर उरलेलं नसतंच, प्रवास सुरू असतो तो दत्तक पालकांकडे पोचायचा! कुठेतरी अनोळखी ठिकाणी अनोळखी बर्फाखाली अनोळखी माणसं त्याला पुरतात. त्या कबर खोदणार्याच्या खिशातून पडलेलं कबरी खोदण्याचं माहितीपुस्तक लीझेल उचलते. तिच्या आईला गरीबीमुळे तिला शाळेत घालता आलेलं नसतं. त्यामुळे लीझेलला वाचता येत नाही. त्यात तिच्या वयाच्या, समजुतीच्या, कुवतीच्या कितीतरी पलीकडच्या घटना - आणि म्हणून शब्द - आयुष्य तिच्यासमोर मांडत जातं! त्या न कळणार्या माहितीपुस्तकासारखं!
मग पुढे हान्झच्या मदतीने ती शब्द वाचायला शिकते. इल्साच्या लायब्ररीमुळे तिच्यापुढे जगाकडे पाहण्याची एक खिडकीच उघडते! शब्दाचं महत्त्व मार्कस तिच्या मदतीने उलगडत नेतो. हिटलरसारख्या हुकूमशहाचं सामर्थ्यही शब्दच, आणि शत्रूही शब्दच. हुकूमशाहीची सुरुवात अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गळचेपीनेच होते. लीझेल त्यानंतरचं पुस्तक चोरते ते नाझींनी केलेल्या पुस्तकांच्या होळीतून! ते शब्द वाचवणं आवश्यक असतं! गावातून धिंड काढत नेलेल्या ज्यूंच्या तोंडी ब्रेडचा घास भरवण्याइतकंच! हान्झ मारहाण सहन करूनदेखील ते घास भरवतो, आणि लीझेल हात भाजत असताना कडा जळू लागलेलं पुस्तक चोरते! रूडी अंगाला काळं फासून जेसी ओवेन्स होतो! हे कोणी क्रांतीकारक नव्हेत, ही माणुसकी जिवंत असलेली सामान्य माणसंच असतात!
हान्झ रंगारी आहे. तो अकॉर्डियन वाजवतो. तो चांगलं वाजवत नाही, पण लीझेलच्या मते वाजवण्यातल्या चुकादेखील त्याच्यासारख्या कोणी करत नाही! तो स्वतःही फारसा शिकलेला नाही, पण तो तिला वाचायला शिकवतो. हा दत्तक बाप ट्रॉमटाइज्ड लीझेलच्या आयुष्यात त्याच्या परीने शब्द, रंग, सूर भरतो. हान्झ आणि रोजा यांच्यातले सगळे संवाद हे एरवी खटकेच असतात, पण मॅक्स त्यांच्या घरी पोचतो तेव्हा काय करायचं याची त्यांना चर्चा करावी लागत नाही. फक्त त्या दिवसानंतर त्यांच्यात नजरानजर जास्त वारंवार व्हायला लागल्याचं लीझेलच्या सहज लक्षात येतं इतकंच. पुढे हिटलरच्या 'माइन काम्फ'ची पानं हे कुटुंब पांढर्या रंगाने रंगवून काढतं. त्या पानांवर मग मॅक्स नवीन गोष्ट लिहितो!
मॅक्सला बॉक्सिंगची प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची आहे. एक दिवस त्याला फ्यूररशी मॅच खेळून जिंकायचं आहे! मॅक्सला त्याच्या जर्मन बालमित्राने वाचवलं होतं, पण तो एकट्या मॅक्सलाच सोबत नेऊ शकणार होता. आपल्या कुटुंबाचं काय होणार आहे हे कळूनसवरूनही मॅक्स त्यांना सोडून निघाला, तेव्हा त्याला ताटातुटीच्या दु:खात मनाच्या एका कोपर्यात स्वत:च्या सुटकेचा आनंदही झाला होता! मॅक्सने अजूनही त्याबद्दल स्वतःला क्षमा केलेली नाही! त्यालाही लीझेलसारखी दु:स्वप्न पडतात. त्या दु:स्वप्नांचंच त्यांच्यात एक नातं आहे. रूडीचा बाप शिंपी आहे. तो ज्यूंचा काय, कोणाचाच द्वेष्टा नाही, पण गावातल्या ज्यूंना पकडून नेल्यावर धंद्यातली स्पर्धा गेली म्हणून हळूच त्याला बरंही वाटून जातंच! लीझेल आणि रूडी भुकेपोटी गावातल्या बागांमधून फळं चोरून खातात. पुढे चोरायलाही काही शिल्लक राहात नाही!
लहानग्या भावाच्या मृत्यूनंतर शोक करायलाही प्रवास थांबवायची मुभा लीझेल आणि तिच्या आईला नसते. निवेदक मृत्यू म्हणतो, 'the journey continued as though everything had happened!'
लीझेलचे खरे वडील तिला फारसे आठवत नाहीत. त्यांच्याबद्दल आईकडे सरकारी अधिकारी तपास करायला यायचे हे आठवतं. त्या वेळी एक 'कम्यूनिस्ट' नावाचा शब्द कोणी उच्चारला न उच्चारला तरी खोलीत वावरत असायचा, कधी कोपर्यात लपलेला, कधी भिंतीला टेकून बसलेला दिसायचा हे आठवतं.
मॅक्स मित्राकडे पुढच्या मार्गक्रमणेची वाट पाहात खितपत पडलेला असतो तेव्हा त्याला वाटून जातं 'if they killed him today, at least he would die alive!'
हे असले भोवरे मार्कसने कथेच्या प्रवाहात सोडून दिले आहेत. वाचताना तिथे जीव अडकतो.
कथेत शेवटी हिमल स्ट्रीटवरच्या बॉम्बहल्ल्यात लीझेल वाचते, ती तळघरात बसून लिहीत असते म्हणून. ती शब्द वाचवते, शब्द तिला वाचवतात. बाकी सगळं उध्वस्त होतं. हिमल स्ट्रीटच्या अवशेषांच्या ढिगार्यात तिच्या हाती लागतो हान्झच्या अकॉर्डियनचा सांगाडा! हान्झला मनाविरुद्ध युद्धात भाग घ्यावा लागतो तेव्हा एरवी त्याचा भांडून जीव नकोसा करणार्या रोजाला याच अकॉर्डियनला कवटाळून रडताना पाहिलेलं असतं तिने. आता तिला ते धरवतही नाही आणि टाकवतही नाही!
आणि रूडी!! तो तिचा मित्र असतो, खेळगडी असतो, चोर्यामार्यांमधला साथीदार असतो आणि ज्यूंना ब्रेड दिल्याबद्दल तिला जर्मन सैनिक मारायला येतात तेव्हा ते घाव आपल्या अंगावर घेणारा जोडीदारही! पूर्ण कथाभर तो एक चुंबन मागत असतो तिच्याकडे! आणि कित्येकदा मनात येऊनही तिने ते नसतंच दिलेलं! आता त्याच्या निष्प्राण ओठांवर ओठ टेकवून ती त्या देण्यातून मुक्त होऊ पाहते.
पुढचा प्रवास अटळच असतो, तो सुरू राहतो. सर्वकाही घडून गेल्यासारखा!!
***
टीपः केदारने लिहिलेल्या या पुस्तक-परिचयामुळे मी हे पुस्तक वाचलं. त्याबद्दल केदारचे आभार.
आणि खरंतर मी पुस्तक 'वाचलं' नाही, ऑडिबलवर ऐकलं. अॅलन कॉर्डनरने फार सुंदर अभिवाचन केलं आहे त्याचं.
बाप रे!
बाप रे!
परिचय हेलावून गेला.
छान लिहिलं आहे.
वाचायलाच हवं आता.
कालच वाचलं. सुरेख लिहिलं आहेस
कालच वाचलं. सुरेख लिहिलं आहेस. पुस्तकही नुकतच वाचल्याने सगळं मनात ताजं आहे. उत्सुकतेने सिनेमाचा प्रिव्हू पाहिला पण तो बघून सिनेमा बघावासा अजिबात वाटेना.
मृत्यूने ही गोष्ट सांगण हे फारच चपखल आहे.
स्वाती, फार सुरेख लिहीलं आहेस
स्वाती, फार सुरेख लिहीलं आहेस. मला वाचायचं आहे, पण आजकाल पुस्तक वाचून झाल्यानंतरही दु:ख मनात रेंगाळत रहाणारी पुस्तकं वाचायची हिंमत होत नाही. याच कारणानं सिरीयावरच्या डॉक्युमेंटरीज बघितल्या नाहीत.
छान परीक्षण. हे पुस्तक
छान परीक्षण. हे पुस्तक वाचायच्या / ऐकायच्या लिस्टमध्ये आहे.
holocaust वर अमेरिका-युरोपमध्ये आजही सकस दर्जाचं फिक्शन / नॉन फिक्शन लिहिलं जातं. वाचताना वाईट वाटतं बट इट्स अ स्मॉल वे टू ऑनर दोज मेमरीज टू.
मी अलीकडेच एक पुस्तक वाचलं ज्यात इज्राईलच्या सुरुवातीच्या काळाचं वर्णन होतं.. महायुद्ध काळात हेल्पलेस असलेले ज्यू नन्तर कसे बलाढ्य मिलिटरी पॉवर झाले तेही वाचण्यासारखं आहे.
अम्जली, तुला वाटतय तितकं ते
अम्जली, तुला वाटतय तितकं ते पुस्तक मला सॅड & दिप्रेसिंग नाही वाटलं. खूप मजा येत होती वाचताना. मे बी ते सगळं सांगणारा यमदूत असल्याने मला एक विचित्र फीलिंग आलं की कारण काही का असेना माणसं सतत मृत्यूकडे वाटचाल करत असतात. मला नेट सांगता येत नाहीये, जौदे.
धन्यवाद.
धन्यवाद.
अंजली, हे ऑड वाटेल, पण उलट या पुस्तकात माणसातला अंगभूत चांगुलपणा आणि चिकाटी, जिद्द यांचाच उद्घोष जास्त परिणामकारकपणे होतो असं वाटलं मला. जरूर वाच असं मी म्हणेन.
छान परिचय आहे.
छान परिचय आहे.
हे पुस्तक लेकीला कोणितरी भेट दिलं. मी आधी वाचायला घेतलं पण दोन तीन पान वाचल्यावर अनेक कारणांमुळे राहून गेलं. तेवढ्यात तीने वाचून काढलं. आणि तीला आवडलंय. ( किती कळलं ते माहित नाही. ) आता मी वाचते.
छान परिचय आहे.
छान परिचय आहे.
तो बेधडक क्लीशेज वापरतो आणि आता आपल्याला कळलं काय ते - असं वाटेवाटेस्तोवर एखादा धक्का देतो! >>> धाडसी लेखनशैली असेच म्हणावे लागेल. पुस्तक लिहीताना असेच ठरवून ते केले असणार. धाडसी अशासाठी, की वाचणारे आधी क्लीशेज पाहून लगेच लेखन 'डिसमिस' न करता नेटाने वाचतील व क्लीशेज च्या पलीकडे जे आहे ते त्यांना कळेल - असे गृहीत धरून लिहीले असावे.
ती शब्द वाचवते, शब्द तिला वाचवतात. >> हे एक जबरी निरीक्षण!
ती शब्द वाचवते, शब्द तिला
ती शब्द वाचवते, शब्द तिला वाचवतात. >> हे एक जबरी निरीक्षण!
>>> हो हो त्या वाक्याला स्पेशल दाद द्यायची राहून गेली होती. खरच कुडोस फॉर दॅट.
तो बेधडक क्लीशेज वापरतो आणि आता आपल्याला कळलं काय ते - असं वाटेवाटेस्तोवर एखादा धक्का देतो!
>> मला ह्यावर जास्ती प्रकाश पाडून हवा आहे. उदाहरण देउन. जरा जास्ती उलगडून सांगशील का प्लीज स्वाती? किंवा फारएण्ड किंवा पुस्तक वाचलेल्या आणखी कोणीही?
शूम्पी, म्हणजे मी लेखात
शूम्पी, म्हणजे मी लेखात म्हटलंय तसंच - कथेची पार्श्वभूमी/त्याने निवडलेला कालखंड आणि त्यामुळे ठळक घटनाक्रम, आणि कॅरेक्टर बिल्डिंग - यात खरोखरच नवीन काही नाही. होलोकॉस्टसंबंधित पुस्तकं किंवा चित्रपट वगैरे आधी वाचले/पाहिले असतील तर यातून नवीन काही 'कळणार' नाही, काही चमकदार हीरोइक नाही किंवा 'इन्ग्लोरियस बास्टर्ड्स'सारखा काही अद्भुत कल्पनाविलासही नाही. दैववशात् युद्धकाळात जगणार्या काही साध्या जर्मन लोकांची साधीच गोष्टच आहे!
) टिपतो आणि लेखात उदाहरणं आली आहेत तशी भाषा वळवतो/वाकवतो (उदा. 'the journey continued like nothing had happened' हे कॉमन एक्स्प्रेशन एका शब्दावर उलटवणं!) म्हणून या सगळयासहदेखील कथा बटबटीत होत नाही.
लेखनतंत्राच्या दृष्टीनेही जी रूपकं (उदा. माइन काम्फची पानं 'रीराइट' करणं) किंवा गिमिक्स (उदा. चेकॉव्हच्या गनसारखं ते अखेरपर्यंत न दिलेलं चुंबन) तो वापरतो, त्यात फार सटल काही नाही. ते केवळ तो त्यातले हळुवार बारकावे (उदा. हूबरमन दांपत्यातली नजरानजरीची वाढलेली वारंवारिता - आय वॉज सोल्ड ऑन धिस वन!!
ओह असं म्हणतेयस..आता कळलं.
ओह असं म्हणतेयस..आता कळलं. धक्का देतो मुळे मी गोंधळले होते. मला तर धक्का नाही बसला हिला कसा बसला
lol
lol
कुछ तो नाज़ुक-मिजाज़ हैं हम भी...