जास्वंदीचे फळ

Submitted by दिनेश. on 8 March, 2009 - 07:03

"दमयंति गो दमयंति, खय असा गो. ता कृष्णकमळीक फ़ूला नाय ती." सुगंधामामी ओसरीवरुन ओरडली. "फ़ूलं नहित ग मामी, पण वेलावर ना फ़ळे आहेत छोटी " दमयंति तिथूनच ओरडली. अप्पामामा पण तिथेच होता. तो लगबगीने आला. खरेच कि, वेलीवर छोटी छोटी फ़ळे होती. त्याने पूर्वी कधीच बघितली नव्हती. मामी पण आली. तिची पूजा खोळबंली होती ना. तिनेपण कधी बघितली नव्हती फ़ळे ती. पण मामीला वेळ नव्हता. ती चाफ़्याची फ़ुले वेचू लागली. दमयंति पण वेचू लागली. उन्हाळ्यात मामाकडे आली कि सगळी फ़ुले बघून ती हरखून जात असे. कृष्णकमळीची निळी सुगंधी फ़ूले तिच्या खास आवडीची. त्यातला तो कृष्ण, पाच पांडव आणि शंभर कौरव याचे तिला फ़ार अप्रूप वाटे. शाळेत दाखवायला म्हणून तिने एकदा सुकवलेली फ़ुले पण नेली होती. पण तोपर्यंत पांडवांचा पाडाव झालेला होता. तिच्या जोशीबाईनी पण त्या फ़ूलांचा वेल मागितला होता. मामा तर म्हणत होता, कि या वेलाची फ़ांदीच लावतात. एवढ्या लांबच्या प्रवासात फ़ांदी कुठली तग धरायला ? पण आता फ़ळे होती म्हणजे बियापण येतील. मग नक्की आपल्याला वेल रुजवता येईल, शाळेत. आणि त्या माधुरीलापण ढेंगा दाखवता येईल. दमयंति मामाला एस्टीत बसेपर्यंत त्या बियांचीच आठवण करुन देत होती.

***
आज सगळे हैबतरावांच्या माजघरात जमले होते. हैबतरावाना अख्खा गाव तात्या गवळी म्हणून ऒळखत होता. त्यांची उभी हयात, गायी म्हशीना संभाळण्यात गेली होती. नाही म्हंटलं तरी चार कमी पन्नास वर्षे तरी गावात रतीब घालत होते ते. गावातले पैलवान त्यानीच पोसले होते. घरावर दोन माड्या चढवल्या. निव्वळ चार्‍यासाटी म्हणून त्यानी पाच एकर जमिन खरीदली होती. घराजवळ आणि शिवारात दोन बोअर मारले होते. पाण्याला काही कमी नव्हती. अजय आणि विजयला पण त्यानी तयार केले होते. थोरला अजय तर गुरांचा डॉक्टर झाला होता. धाकटा विजय तसा हुनरीचा. हैबतरावानी पंचक्रोशीत नाव कमावले होते, पण विजयची स्वप्नं मोठी होती. त्याने गावात पंचवीस तरी गायी म्हशी घ्यायला लावल्या होत्या. ज्याना गरज होती त्याना बॆंकेकडून कर्ज मिळवून दिले होते. गावातल्या गावात एवढे दूध खपणे शक्यच नव्हते. विजयने मग खवा करायच्या भट्ट्या लावल्या. गावातल्या महिलाना रोजगार मिळाला. मोठ्या मागण्या येऊ लागल्या, तसे अनेक तरुण या धंद्यात उतरू लागले. पण गेल्या दहा पंधरा दिवसापासून जरा वेगळाच प्रश्ण निर्माण झाला होता. गावातल्या गायी म्हशी अचानक पान्हा चोरू लागल्या होत्या.ज्या घरात वीस लिटर दूध जमा होत होतं तिथे दोन लिटर मिळायची मारामार होती. घरातल्या मूलाबाळानाच काय आल्यागेल्या पैपावण्याच्या चहाला पण दूध मिळत नव्हते.
आधी अजयला वाटले कि काहीतरी रोगाची साथ आली असेल. पण तशी गुरांची तब्येत उत्तम होती. चारा पण व्यवस्थित खात होत्या. जिथे वासरे पाडसे होती, तिथे त्यांच्यासाठी व्यवस्थित पान्हा होता. पण एरवी मात्र धार काढायला गेलं कि पान्हा चोरत होत्या. अजयला तर जरा जास्तच काळजी होती, कारण एरवी तपासणीसाठी सहकार्य करणाया गायीम्हशी शिंग रोखू लागल्या होत्या. खरं तर गावभरच्या गाय़ीम्ह्शी त्यानेच संभाळल्या होत्या.
हार्मोन वगैरे द्यायच्या विरोधात तो होता. कुणी चोरून देत असेल, असे त्याला वाटतही नव्हते. हैबतरावांच्या समोर सगळे बावचाळून बसले होते. घराची, पोराबाळांच्या शि़क्षणाची स्वप्न विरून जातील कि काय, असेच सगळ्याना वाटत होते.

***

"तू जा पैले, तेरे अब्बूके परिंदे ढूंढके ला" फ़ातिमाबी जावेद्ला सांगत होती. " अब्बी दो चार दिनोमे आयेंगे तो उनको दिखने होना. आत्तेच पूछे तो ".
" बोल दे, जावेद खा गया कबाब बनाके" जावेद परेशान होत म्हणाला. " एक तो अब्बू कि खीट्खीट और उप्परसे इन परिंदोकी गुटर्गू. एंजिनीयरींग का फ़ायनल इयर है ना मेरा. पढने आया हु. अब्बूनेही तो बुलवाया था. बोले कि इत्तासा रूम तेरा, और उसमे चार लोगां. घरहीच आज्जा तो पढाई के वास्ते "
फ़ातिमाबी ला हसू आवरेना. " अरे इत्तेसे परिंदे, क्या बिगाडते तेरा. और उन्हे नही गुटर्गू करे तो क्या तू करे. कही तेरी माशूका कि तो याद नही आ रहेली. "
" तूबी ना. अब्बू को क्या पडी इन परिंदोकी ? फ़ालतू की मगजमारी. उन्हे दाना पानी दो, ये दो , वो दो. इस्से तो मुर्गिया पालते. बैदे देगी और ना दे तो काटके खा जाये. " जावेदने बोलून गेला.
" ऐसे नही सोचते बेटे. अल्लामियाने क्या कम दिया है हमे ? दो चार दाने परिंदेने खाभी डाले तो क्या. अल्लामिया खुद तो नही ना सबको दानापानी दे सके. हमसे कराते है. देख औलाद नही दी तो तूझे भेज दिया. " फ़ातिमाबीचे डोळे भरुन आले, " अब्बी लायेगा तू उने, के मैहीच निकल पडू ? " तिने शेवटचे सांगितले.
जावेदने चारच दिवसांपूर्वी कबुतराना हाकलून दिले होते. त्यांच्यासाठी ठेवलेला बॉक्सहि काढून ठेवला होता.वाचत बसले कि त्यांची मस्ती सुरु. त्या दिवशीतर पुस्तकावरच शीट पडली. मग त्याने वैतागून त्याना हाकलूनच लावले. तो त्याना शोधायला बाहेर पडला. या परिंद्याची जातच हरामी. कायम घराच्या वळचणीला. बाकिच्या परिंद्यासारखे झाडावर बसणारच नाहीत कधी.
तेवढ्यात त्याला त्याच्या डोक्याजवळ फ़डफ़ड झाल्यासारखे वाटले. हो तीच जोडी ती. पण ती तर उडून चक्क समोरच्या झाडावर जाउन बसली होती. लाल लाल डोळ्यानी त्याच्याकडे रोखून पहात होती. त्याना परत कसे आणायचे, याचा विचार करत तो उभा राहिला.

***
पिशवीत बटाटे भरुन चित्रा स्टॆंडवर आली खरी, पण तिचे मन काही ठिकाणावर नव्हते. सगळ्या काकाकाकूंचा विरोध पत्करुन तिला पप्पानी पूढे शिकू दिले होते. नुसती शेतकी पदवीधर होऊन ना तिचे समाधान झाले होते ना त्यांचे. तिने पंजाबराव कृषि विद्यापिठात संशोधन करुन, बटाट्याची संकरीत जात तयार करायला घेतली होती. त्या काळात तिच्यावर लग्नासाठी खुप दबाव आणला जात होता. पण तिचे पप्पा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
तिचे संशोधन पूर्ण झाल्यावर सगळीकडे त्याच वाणाची शिफ़ारस विद्यापिठ करणार होते. पप्पानीच आपली सुपीक अशी चार एकर जमिन तिला प्रयोगासाठी दिली होती. त्याना टिश्यू कल्चर वगैरे नवीन होते, पण त्यासाठी लागणारे सर्व काहि तिला त्यानी उपलब्ध करुन दिले होते. रोपे तरारून आली प्रयोगशाळेत. लावणी झाल्यावर देखील खुप जोमाने वाढ झाली. गावकरी सगळे बघून जात असत.
पण एकाएकी काहीतरी बिघडले आणि पिकाला भरमसाठ फ़ुलोरा आला. हे तसे जरा विचित्रच होते. फ़ुलानंतर तर छोटी छोटी फ़ळे धरु लागली होती. चित्राने पटकन निर्णय घेऊन कापणी करुन टाकली. बटाटे तयार झाले असतील अशी शक्यता जरा कमीच होती, पण तरीही तिने नांगरट करवून जमिन उकरली होती.
अपे़क्षेपेक्शा बटाटे खुपच छोट्या आकाराचे होते. तसे ते निरोगी होते पण साल जाड होती आणि आत हिरवेपणा जास्त होता. या सर्व काळात तिचे पप्पा तिला धीर देत होते. मोठ्या काकूने खवचटपणे नैवेद्याला बटाटे मागितले होते, पण या बटाट्यात सायनाईड्चे प्रमाण जास्त असावे अशी चित्राला शंका होती. तिचे निरसन करुन घ्यायला आणि प्रा. गायकवाडाना भेटण्यासाठी ती विद्यापिठात निघाली होती. पप्पानी गाडीने जा म्हणून सांगितले होते, तरी ती हट्टाने बसनेच निघाली होती.
योगायोगाने त्याच बसमधे तिला प्रसाद भेटला. तो पण विद्यापिठात निघाला होता. संशोधन काळात ते दोघे अनेकवेळा भेटले होते. तशी खास मैत्री नव्हती ओळख होती इतकेच. तो गव्हावर संशोधन करतोय ते तिला माहित होते. पण त्याच्याशी बोलल्यावर मात्र तिच्या लक्षात आले कि त्याचाही अनुभव असाच विचित्र होता. अगदी वजनदार गव्हाच्या दाण्याची अपे़क्षा असताना, तयार झालेले दाणे अगदी हलके होते. पाखडताना तर ते चक्क हवेवर उडत होते. विद्यापिठाच्या वजनाच्या मानकात तर ते अजिबात बसत नव्हते. प्रा. गायकवाड काय म्हणताहेत याचीच त्याना खुप उत्सुकता होती.

****
"मम्मी सी व्हॉट ब्राऊनी हॅज डन. देअर इज ब्लड एव्हरीवेअर" बेडरुममधून अमांडा किंचाळली तसा क्लॅरीसच्या काळजाचा ठोकाच चुकला. हातातले काम टाकून ती धावत गेली. अमांडा बेडवर अवघडून बसली होती. सकाळीच बदललेल्या गुलाबी बेडशीटवर लाल काळे डाग पडले होते. ब्राऊनी तिचा लाडका कुत्रा कुठे दिसत नव्हता. अमांडानेच खुणेने सांगितले कि तो बेडखाली आहे. क्लॅरिसने आधी अमांडाला उचलून घेतले. बेडरुमच्या बाहेर येऊन तिने दरवाजा घट्ट बंद केला. तशीच ती शेजारच्या रोझारिओ आंटिकडे गेली. तिला बोलायला शब्दच सूचेना. आंटिने तिला आधी बसवले. पाणी प्यायला लावले. थोडा दम घेतल्यावर क्क्लॅरिसने सर्व सविस्तर सांगितले. खरे तर तिच्या काहि लक्षातच आले नव्हते. मग तिला आठवले कि बेडरुमधे फ़्लोअरवर पण ब्लड्स्टेन्स होत्या. अमांडाला तिथेच बसवून त्या दोघी घरी आल्या. दरवाज्यातून क्क्लॅरिसने ब्राऊनीला हाक मारुन बघितली, पण मग बेडरूमचे दार आपण बंद केल्याचे तिच्या लक्शात आले. ते उघडायचा तिला धीर होत नव्हता. मग त्या दोघी व्हिक्टरला घेऊन आल्या. त्याने हॉकी स्टिक हातात घेतली. क्लॅरिसने हळूच दरवाजा उघडला.
तिने प्रेमाने ब्राऊनीला एकदोनदा हाक मारली प्रतिसाद आला नाही. फ़्लोअरवर बरेच रक्त पडले होते. ब्राऊनीलाच काही दुखापत झाली असेल असे समजून क्लॅरिस बेडखाली बघू लागली. तर तिला बघून ब्राऊनी गुरगुरु लागला. मग व्हिक्टरने हॉकी स्टिकने त्याला ओढायचा प्रयत्न केला तर तो एकदम अंगावरच आला.आणि सरळ धावतच सुटला. जिना उतरून तो बिल्डिंगमागच्या ओढ्यात शिरला, आणि पलीकडे जाऊन दिसेनासा झाला. व्हिक्टरने बेडखाली स्टीक घालून काहितरी ओढून काढले. एक छोटे कुत्र्याचे पिल्लू होते ते. ब्राऊनीने त्याचा जीव घेतला होता.
ते बघून क्लॅरिसला एकदम मळमळू लागले. ब्राऊनी त्यांचा सगळ्यांचाच लाडका होता.अमांडाच्या फ़र्स्ट बर्थडेला तिला गिफ़्ट म्हणून मिळाला होता तो. अगदी छोटासा होता तो. ती पण त्याच्याशी मजेत खेळत असे. त्याच्या अंगावर झोपत असे.तो जरासा मोठा झाला तर त्याच्या पाठीवर पण बसत असे. त्याने तिच्यावर कधीच नाराजी दाखवली नव्हती. आंटी तिला नेहमीच कॊशस करत असत. पण तिचा ब्राऊनीवर खूप विश्वास होता.
त्याची खूप काळजी घेत असे ती. खास त्याच्यासाठी बेड, टॉईज होत्या. त्याच्यासाठी खास डॉग फ़ूड पण आणत असे ती. खुपच हेल्दी होता तो.
त्याने घरात कधी घाणही केल्याचे तिला आठवत नव्हते.
मग तिला आठवले, गेले दोन दिवस तो काही खात नव्हता. असा अधून मधून तो उपाशी रहात असे. म्हणून तिने लक्ष नव्हते दिले. पण त्याला बाहेर जाऊन शिकार करायची काय गरज होती. ते सुद्धा कुत्र्याचेच पिल्लू ? अगदी छोटेसे होते ते.
हॅज हि गॉन मॅड ? ओह माय गॉड म्हणत तिने अमांडाला जवळ घेतले. आता तो परत आला तरी ती त्याला घरात घेणार नव्हती.

***
रेगेकाकींचा श्री शांतादूर्गेचा नवस फ़ेडायचा कितीतरी वर्षे राहून गेला होता. नातीसाठी बोलल्या होत्या म्हणून तिला घेऊन जाणे भाग होते, नाहीतर त्या काय, कधीच जाऊन आल्या असत्या. यावेळी मात्र त्यानी हट्टच धरला. दोघी तर दोघी, पण जाऊन येउ, असे म्हणत त्या वर्षाच्या मागे लागल्या. शेवटी त्या निघाल्याच. देवस्थानात रहायची सोय होतीच त्यांची. गाभार्‍यात बसून त्या डोळेभरुन देवीकडे पहात बसल्या. अगदी शेजारती होईपर्यंत त्या तिथेच बसून होत्या.
वर्षाला मात्र धीर नव्हता. तिने बाहेर जाऊन जाम, करमळे जे मिळेल ते खाऊन घेतले. आपण इतकी वर्षे का इथे आलो नाही असेच तिला वाटले. एवढा रम्य परिसर. कुठलीही गर्दी नाही कि भिकारी नाहीत. आजूबाजूचा परिसर किती रम्य.
तिने देवळासमोरच्या बागेतली फ़ुले बघायला सुरवात केली. आणि ताटली एवढे जास्वंदीचे फ़ूल बघून ती वेडीच झाली. लालभडक रंगावर पिवळी नक्शी. तिने मुंबईत असे फ़ूल कधी बघितलेच नव्हते. आज्जी बाहेर आल्यावर, तिने त्या झाडाची फ़ांदी मागून घ्यायचा हट्ट केला. रेगेकाकीना अगदी संकोच वाटला. तर वर्षानेच थेट ट्रस्टींच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली. तशी काहि हरकत नव्हती त्यांची.

वर्षाने ती फ़ांदी खास कुंडी आणून तिच्यात लावली. खास कल्चर आणून मुळावर फ़वारले. त्या फ़ांदीने लगेच जीव धरला. खरे तर गरज नव्हती, पण फ़ुले मोठे होण्याचा पण स्प्रे तिने मारला. फ़ांदीला आणतानाच एक कळी होती. यथावकाश तिचे ताटलीएवढे फ़ूल झाले. रेगेकाकीना पहिले फ़ूल म्हणून देवाला वहायचे होते, पण वर्षाने ठाम नकार दिला. जास्वंदीचे फ़ूल एका दिवसातच कोमेजते, असे सांगून पाहिले, पण ती ऐकेना. दुसर्‍या दिवशी ती धावत कुंडीजवळ गेली तर फ़ूल जसेच्या तसेच होते. रेगेकाकीना जरा नवलच वाटले. शाळेत परागीभवन शिकवताना त्याना फ़ुले लागत, पण ती दुपारच्या आत कोमेजून जात. मग त्या मुलाना खास प्रयोगासाठी म्हणून सकाळी बोलावत असत. दुसर्‍या दिवशी सकाळी ते फ़ूल गळून पडले.
एरवी या फ़ूलाचा देठही झाडावर रहात नाही, पण या फ़ूलाचा देठच नव्हे तर पुष्पकोषही झाडावर राहिला होता. आता नातीच्या उत्साहानेच त्या झाडाचे निरिक्षण करु लागल्या. साधारण कापसाच्या बोंडासारखे फ़ळ धरु लागले होते त्याला. पण एके दिवशी ते अचानक पिवळे होऊन गळून गेले. वर्षा खुप हिरमुसली.
रेगेकाकीनाही उत्सुकता होतीच.

त्याना आठवले त्यांचे एक सहकारी शिक्शक रिटायर झाल्यावर एक संस्था चालवत होते. फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज, असे काहितरी नाव होते. एका प्रदर्शनात ते भेटले होते त्यावेळी आवर्जून पत्ता दिला होता. डायरीतून त्यानी तो शोधून काढला. फ़ारसे लांब नव्हते त्यांचे घर. दुसयाच दिवशी त्या भेटायला गेल्या, वागळेसराना.
सर एकटेच होते. कसलातरी रिपोर्ट तयार करत होते. रेगेकाकी ओशाळल्या. आधी फ़ोन करुन यायला हवे होते, असे वाटले त्याना. वागळेसर मात्र त्याची गरज नव्हती असे म्हणाले.
" म्हातारपणी वेळ चांगला जातो हो, संस्थेच्या कामात. खरे तर तूम्हीही यायला हवे. तूम्ही जीवशास्त्र शिकवत होता ना. आम्हाला चांगली मदत होईल. " ते म्हणाले.
रेगेकाकी म्हणाल्या, " यायला आवडेल हो मला. जमवेनच, पण आज एका खास कामासाठी आले होते". असे म्हणत त्यानी रुमालात गुंडाळलेले जास्वंदीचे फ़ळ सराना दाखवले.
सर ते निरखून पाहू लागले, व म्हणाले, " जास्वंदीचे दिसतेय.म्हणजे याचाही विश्वास उडाला तर मानवजातीवरचा "
"म्हणजे काय म्हणताय तूम्ही ?" रेगेकाकीना नीट उलगडा झाला नव्हता.
" तूम्ही बातम्या बघता कि नाही ? गायी म्हशी दूध देत नाहीत. कबूतरं घराच्या वळचणीला रहात नाहीत. कुत्रे शिकार करु लागले आहेत.सीडलेस द्राक्शात बिया तयार होऊ लागल्यात. चिकूचा गोडवा कमी होतोय. बर्‍याच बातम्या येत असतात. " वागळेसरानी विचारले.
" हो येत असते कानावर काहितरी. पण त्याचे काय एवढे ? " काकीनी विचारले.
" दिसतय तेवढे साधे नाही हे. आजवर हे प्राणी, पक्षी, मानवाच्या आधाराने सुखाने जगत होते. मानवाला आणि त्याना एकमेकाच्या सहवासाची इतकी सवय झाली होती, कि हे प्राणी स्वतंत्रपणे जगूच शकत नाहीत. " सर म्हणाले.
" आणि या फ़ुलांचे काय ? " काकीनी विचारले.
" त्यांचेही तसेच. आता या जास्वंदीचेच घ्या. तूम्ही शाळेत मुलाना फ़ुलांचे सर्व भाग शिकवण्यासाठी हे फ़ूल वापरता. फ़लधारणेसाठी आवश्यक ते सर्व या फ़ूलात आहे. पण तरीही या झाडावर फ़ळे दिसत नाहीत. याचे कारण काय असेल बरं " सरानी विचारले. काकींच्या चेहयावरचे भाव बघत, ते पुढे म्हणाले, " अहो या झाडाला कधी त्याची गरजच वाटली नाही. तूम्ही याच्या फ़ांद्या रोवता. काळजी घेता. भरपूर प्रजा वाढतेय त्यांची. मग काळजी कसली ? कुत्र्यांचे बघा. हा मूळचा जंगलातला प्राणी. शिकार करुन पोट भरणारा. आजच्या कुत्र्याना सगळे आयते मिळतेय. मुद्दाम कुणी दिले नाही तरी उकिरडे आहेतच. काय गरज पडलीय त्याना शिकार करायची ? कबूतराना घरांच्या वळचणीला सुरक्षित वाटतेय. ते कशाला झाडावर घरटी बांधतील ? "

" मी कधी असा विचार केला नाही " काकी म्हणाल्या.

" आता विचार करायची वेळ आलीय. पर्यायच नाही. आता बटाटा घ्या. तयार बटाट्याचे तूकडे करुन त्याची लागवड करतात. निसर्गत: हे शक्य आहे का ? गहू हे तर गवत. सगळ्या गवतांच्या बिया वायासवे उडतात. पण पिकवलेला गहु असा वाया जाणे तूम्हाला परवडणार नाही. मग तूम्ही तो जड करुन ठेवलात. आता तूम्हि पेरल्याशिवाय गहू उगवणारच नाही. फ़ळांमधे बिया असणे अगदी नैसर्गिक, पण तूमच्या घश्यात अडकतात, म्हणून तूम्हाला त्या नकोत. निसर्गात फ़ळातील साखरेचे प्रमाण मर्यादित असते. तूम्ही ते वाढवून ठेवता. " सरांचा आवाज नकळत चढला होता.

" म्हणजे हा सगळ्याचा सूड घेताहेत का ते ? " काकीनी शंका काढली.

" तूमच्या जीवशास्रात शिकवतात ना, कि वंशसातत्य ही एक आदीम प्रेरणा असते जीवांची म्हणून, त्यालाच अनूसरुन वागताहेत ते. " सरांचा स्वर जरा तिरकस लागला.

" पण आपण तर त्यांची जोपसनाच करतोय की " काकी म्हणाल्या.

"त्याचीच खात्री वाटेनाशी झालीय त्याना आता. मानवाची खात्री वाटत नाही त्याना आता. " सर म्हणाले. काकी जरा गोंधळल्याच.

" ज्याच्या भरोश्यावर रहायचे, त्या मानवाचाच वंश टिकेल असे त्याना वाटत नाही. आपले आपणच आता जगायला हवे, असे त्याना वाटतेय. आणि त्याना तूमचा धर्म, तूमचे राजकिय विचार, तूमचा पक्ष, याच्याही काहि देणेघेणे नाही. केवळ मानव म्हणून बघतात ते तूमच्याकडे." सर म्हणाले.

" पण एवढा विचार करु शकतात का ते " काकीना अजूनही सरांचे म्हणणे पटत नव्हते.

" केवळ मानवप्राणीच विचार करु शकतो हा भ्रम आहे आपला. मानवाच्या मेंदूच्या तूलनेत त्यांचा मेंदू लहान असेल. झाडांचा मेंदू कुठे असतो हेच आपल्याला माहित नाही. पण तो असतो. साधी मगर घ्या. एक निव्वळ सरपटणारा प्राणी. पण अंडि घातल्यापासून अगदी नेमक्या चाळिसाव्या दिवशी पाउस पडणार हे त्याना कसे कळते. का आपण असे म्हणायचे कि पावसाचा नेमका अंदाज घेउनच मगर अंडी घालते. पावसाचा एवढा नेमका अंदाज तर इतके उपग्रह सोडून, इतक्या वेधशाळा उभारुन मानवाला घेता येत नाही. निव्वळ पाने शिवून घरटे बांधणारा शिंपि पक्षी. पण त्याची पिल्ले मोठी होऊन उडेपर्यंत ते पान गळणार नाही हे त्याला कसे कळते. आजही आपल्याला हिमालय सहज पार करता येत नाही. पण त्याचे सर्वोच्च शिखर पार करत लाखो पक्षी स्थलांतर करतात. त्यापे़क्षा छोटेसे फ़ूलपाखरु घ्या. केवढा असेल त्याचा मेंदू, पण तेही हजारो किलोमीटर स्थलांतर करु शकते. खरं तर आपणच विचार करु शकत नाही. किंवा करत नाही असे म्हणू. " सर म्हणाले.

" कसला विचार सर ? " काकीनी विचारले.

" नदीच्या उगमापाशी राहणार्‍यानी, संपूर्ण नदी स्वाहा करुन टाकलीय त्याचा विचार. प्रवाहाच्या खालच्या दिशेने राहणायांचा विचारच केला नाही कधी आपण. सत्य हे, मी मुद्दामच सुदैव म्हणत नाही, तर सत्य हे कि आपण कालाच्या ओघात आधी जन्मलो. जी चिऊकाऊची गोष्ट ऐकत आपण पहिले घास जेवलो, ती चिऊ आज दाखवायलाही शिल्लक नाही. उद्या वाघ राहणार नाही. परवा मोर नष्ट होईल. आपण हा कालाचा प्रवाहच आटवून टाकला. प्रचंड अपराधी वाटतय मला. या नव्या पिढीचा घोर अपराध केलाय आपण" सर निराश स्वरात बोलले.

" पण तूमची संस्था यासाठीच काम करतेय ना ? " काकीनी धीर द्यायचा प्रयत्न केला.

" कोण आहे हो आमच्या संस्थेत ? माझ्यासारखीच आणखी दहाबारा पिकली पानं. निव्वळ भाषणं करतो आम्ही ऐकायलाच कुणी नसतं. अजून नाही फ़ारसा उशीर झालाय. थांबवता येईल हे सगळं. पण आम्ही थकलो आता. प्रत्यक्ष काही करायचे त्राण नाही आमच्यात. काय करणार आम्ही ? " सर फ़ारच निराश झाले होते.

काकी म्हणाल्या, " कधी आहे तूमची सभा म्हणालात ? मी भेटते प्रिंसिपल साहेबाना. शाळेत सभा घेता येईल का ते बघते. नाहीच जमलं तर, जमतील तितक्या मुलाना मीच घेऊन येते."

समाप्त

गुलमोहर: 

कथा सुंदर आहे. पण त्यावरच्या प्रतिक्रिया खूप विचार करायलालावणार्‍या आहेत. स्लार्टी, जनुकीय माहिती आणि बुद्धीमत्ता याचा काहीच संबंध नसतो का?
--------------
नंदिनी
--------------

हम्म.. चांगली कथा.. आणि विचारांना चालना देणारे प्रतिसाद.
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

सचिन, उत्क्रांतीची तत्त्वे सर्व जीवांना लागू होतात. विचार करू शकणार्‍या मानवांच्या प्रजाती टिकल्या असे म्हणण्यापेक्षा 'जुळवून घेऊ शकणार्‍या जीवांच्या' प्रजाती टिकल्या असे म्हणणे योग्य ठरेल. जुळवून म्हणजे परिस्थितीशी, वातावरणाशी.
उत्क्रांतीबद्दल सर्वात मोठा गैरसमज हा की उत्क्रांती ही 'सर्वोत्कृष्टते'कडे नेते. म्हणजे उत्क्रांतीचे ध्येय 'एखाद्या जीवाला घ्या, त्याला असा बदला की तो सुपरमॅन होईल' असा प्रचलित समज असतो. पण उत्क्रांतीचे असे ठरवलेले ध्येय नाही, म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, कोणी ती घडवून आणत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या विशिष्ट ध्येयाकडे मुळातच उत्क्रांतीची वाटचाल नसते. सर्वोत्कृष्ट बनवणे हे तुचे ध्येय नसून जीव 'पुरेसा चांगला' बनणे हा तिचा परिणाम आहे.
'पुरेसा चांगला' म्हणजे काय ? तर जगण्याला पुरेसा इतकाच चांगला. एक किस्सा सांगतात - दोन मित्र अरण्यातून जात असताना त्यांच्या मागे बिबट्या लागला. त्यातला एक जण दुसर्‍याला म्हणाला, "अरे, तुला बिबट्यापेक्षा वेगात धावता येते का ?" त्यावर दुसरा उत्तरला, "मला बिबट्यापेक्षा वेगात धावता येणे मुळीच आवश्यक नाही. तर तुझ्यापेक्षा जोरात पळू शकणे मला पुरेसे आहे." इथे स्पर्धा ही बिबट्याशी नाही, तर परिस्थितीशी आहे. दोघांमधल्या मागे पडलेल्याला बिबट्याने धरले की दुसरा जगला... तेवढे वेगात धावणे त्याला 'पुरेसे चांगले' आहे. हे उत्क्रांतीचे गमक आहे. त्यामुळे जेव्हा जीवाचा मेंदू जीव जगण्यास पुरेसा चांगला झाला, तिथे त्याच्या मेंदूची वाढ थांबली.
मानवाच्या असंख्य प्रजातींमध्ये जनुकीय बदल झाले, जनुकीय प्रभावकाल व प्रभावकालखंड बदलले. एखाद्या प्रजातीचा मेंदू भाषिक संवादासाठी जास्त उत्तम ठरला, त्यामुळे त्या प्रजातीमधली समाजव्यवस्था अथवा समूहव्यवस्था अधिक प्रभावी ठरली... प्रभावी याचा अर्थ असा की त्या समूहाचे सदस्य जगण्यासाठी समूहाचा उपयोग अधिक परिणामकारकरित्या होऊ लागला... साहजिकच अशी प्रजाती जगण्यास अधिक सक्षम ठरली. असे मानवासंबंधित अनेक बाबतींत घडले.
कॅलिफोर्निया ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इथे एक वाक्य कोरले आहे - It is not the strongest species that survive, nor the most intelligent, but the ones most responsive to change.
.
दिनेश, तुमच्या मधमाशांबद्दलच्या प्रश्नांचे उत्तर मी आधीच्या पोस्टात दिले आहे. तीच गत शिकारी कुत्र्यांचीसुद्धा... ते धोरण ठरवून शिकार करत नाहीत, तर शिकारीच्या अनेक पद्धती अवलंबल्या गेल्या, भिन्न प्रजाती, भिन्न पद्धती. ज्या प्रजातींनी कुठेतरी एकत्र शिकारीची पद्धत सुरु केली. ही सुरुवात म्हणजे अगदी कशीही असू शकते... समजा एखाद्या शिकारी कुत्र्याने केलेल्या शिकारीतले काही कुत्रा खाऊ लागला. स्वभावतःच पहिला कुत्रा 'शांत' असेल तर त्याने हे करू दिले. शांत म्हणजे काय ? तर इथे 'दुसर्‍या कुत्र्याने वाटा घेतल्यावर न गुरगुरणे' इतकीच शांत. हे कुठून आले ? दुसरा वाटा घेऊ लागला असता गुरगुरणे ही अत्यंत स्वाभाविक प्रेरणा. (आपल्या लहान मुलांमध्येसुद्धा ही प्रेरणा दिसते. 'दिलेलं सर्वांबरोबर वाटून खावं' हे आपल्याला शिकवावं/शिकावं लागतं). ही जनुकीय, programmed. ही भावना आपल्या अस्तित्वाशी अगदी नागवेपणाने निगडित.
याचाच अर्थ असा की काही जनुकीय बदलांमुळे (बदलाच्या दोन पद्धतींपैकी एक वा दोन्ही) ही स्वाभाविक प्रेरणा बदलू शकते, बदलते (माझ्या माहितीप्रमाणे असे बदल घडवून आणणारे प्रयोग झाले आहेत, मला संदर्भ सापडले की देतो). आता असा काही बदल झाला की ही प्रेरणा किंचित दाबली गेली. किती ? तर दुसर्‍या कुत्र्याला वाटा देण्याइतकी. मग दुसर्‍या कुत्र्यावर गुरगुरले गेले नाही. त्याबदल्यात दुसर्‍या कुत्र्याने पहिल्या कुत्र्याला मदत केली अथवा केली नाही. आता हे काही वेळा घडले. जर दुसर्‍या कुत्र्याने इतर काही स्वरूपात मदत केली नाही तर या पहिल्या कुत्र्यात झालेल्या बदलाचा survival advantage (= जगण्यास फायदा) काही नाही. म्हणजे या पहिल्या कुत्र्याला उलट खाद्य कमी मिळत राहील आणि तो इतरांपेक्षा अशक्त होत राहील आणि कदाचित त्याला प्रजोत्पादनासाठी कुत्री मिळणार नाही. (सशक्त/अशक्त कळण्याइतकी बुद्धी असते त्यांच्यात :)).
पण समजा, कुत्री मिळाली आणि प्रजोत्पादन झाले, त्या संततीतही या प्रेरणेसंबंधी बदल झाले.
दोन शक्यता -
१. समजा या बदलांमुळे आणखी प्रेरणा दाबली गेली, तर एक वेळ अशी येईल की त्या पहिल्या कुत्र्याचा वंशज 'पुचाट' निघेल, त्याच्या वाटचं सगळंच खाणं इतर कुत्रे घेऊन जातील, तो वंशज लवकरच मरेल अथवा अशक्त राहील आणि त्याला प्रजोत्पादनास कुत्री मिळणार नाही. सारांश, असे प्रेरणा अधिकाधिक दाबणारे बदल टिकणार नाहीत.
२. समजा संततीत हे प्रेरणा दाबणारे बदल झाले नाहीत. तर संतती इतरांसारखीच होईल, वाटा देणार नाही, पण म्हणजे तो मूळ बदल टिकला नाहीच.
म्हणजेच, मला 'जगण्यास फायदा' न देणारे बदल टिकण्याची शक्यता फारच कमी. हे फार महत्त्वाचे.
पण समजा या पहिल्या शांत कुत्र्याने दुसर्‍या कुत्र्याला वाटा दिल्यावर दुसर्‍या कुत्र्यानेसुद्धा त्याच्या शिकारीतला वाटा पहिल्याला घेऊ दिला (कारण तो दुसरासुद्धा पहिल्यासारखाच निघाला). म्हणजे प्रत्येक कुत्र्यास आता फायदा होऊ लागला. पहिला कुत्रा जो आधी महिन्यातून २० वेळा शिकार करायचा, तो आता १२ वेळाच करू लागला, कारण दुसर्‍या कुत्र्याच्या शिकारीतूनही वाटा मिळू लागला, स्वतंत्र शिकारीची गरज कमी झाली. तीच गोष्ट दुसर्‍या कुत्र्याच्या बाबतीतही झाली. तुमचे काम विभागले गेले, कष्ट विभागले गेले, शिकारीचे धोके प्रत्येकाला कमी झाले, जगणे अधिक सुलभ झाले, अर्थात प्रत्येक कुत्रा जगण्याची शक्यता वाढली.
आता दोघांमधले ते प्रेरणा दाबणारे जनुक पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची शक्यतासुद्धा वाढली, कारण त्या दोघांनाही कुत्री मिळण्याची शक्यता वाढली. एवढेच नव्हे, तर ते बदल टिकण्याची शक्यतासुद्धा वाढली, कारण ज्या संततीत असे बदल होतील ती संतती जगण्याची शक्यता जास्त. (जिच्यात हे बदल झाले नाही, तेही जगतील, पण त्यांना असे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी.) यात कुठे काही 'विचार' आलाच नाही. गंमत म्हणजे काही पिढ्यांच्या अंतराने असे झाले की 'उपकारांची परतफेड' न करणार्‍या कुत्र्यावर उपकार केले जाणे बंद झाले, कारण अशा कुत्र्याला मदत करणे हे माझ्या अस्तित्वास घातक आहे हे क़ळले... दुसर्‍या कुत्र्याला वाटा देणे ही माझी प्रवृत्ती झाली... हे ज्ञान आता अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीनंतर माझा उपजत भाग बनले. हे काहीही 'विचार'पूर्वक झाले नाही.
याचा पुढचा टप्पा खुद्द शिकारीत दोघांचा सहभाग हा ठरला. हेसुद्धा खूप 'विचार'पूर्वक झाले नाही.
.
आता हे सर्व -- बदल होणे/न होणे, पुढच्या पिढीत होणे / न होणे, त्यापुढच्या पिढीत जाणे, 'पुचाट' निघणे इ.इ. -- एका पिढीत नाही झाले. हे सर्व अनेकानेक पिढ्यांमध्ये झाले. म्हणजे एकलकोंड्या राहणार्‍या रानकुत्र्याने समूहावस्थेचा स्वीकार केला. त्यानेच का केला ? इतर सर्वांनी का नाही ? कारण तसे न करने हे इतरांच्या 'जगण्यास पुरेसे' होते. वरील गोष्टींचा पुरावा माझ्याकडे नाही. पण अशा प्रकारे विचार करणे योग्य आहे, ते सत्याच्या जवळ नेते याचे पुरावे आपल्याकडे आहेत. म्हणून मी ती विचारपद्धती रानकुत्र्यांना, मधमाशांना लावली एवढेच.
.
प्रत्येक बदल हा फाटे फोडणारा आहे (कोण रे ते 'तुझ्यासारखा' म्हणाले ? :)) हे फाटे म्हणजे केवळ २ रस्त्यांत विभाजन नाही, तर अनेक रस्त्यांत विभाजन. त्यातील प्रत्येक रस्त्याचे परत अनेक रस्त्यांत विभाजन... असे अनंत. हे म्हणजे ती random mutations. या अनंतामध्ये सर्व झाले. डोळ्यासारखा अत्यंत गुंतागुंतीचा अवयवसुद्धा याच उत्क्रांतीतून निर्माण झाला. हे तर केवळ थक्क करणारे आहे.
कोण आणि काय टिकले ? तर जगण्यास जे लायक होते तेच. ही लायकी परिस्थितीतून आली. 'the species most responsive to change' टिकली.
मला सर्वात खल्लास करणारी गोष्ट म्हणजे उत्क्रांती खुद्द उत्क्रांत होते ही. उत्क्रांतीचे हे आवर्ती (recursive) स्वरूप मला अक्षरशः भारून टाकते, कारण तसे असणे हा उत्क्रांतीच्या सत्यतेचा सर्वात कठोर निकष होय. पण त्याबद्दल इथले जाणकार जास्त छान सांगू शकतील.
.
नन्दिनी, तुझा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे, पण मला जरा काही संदर्भ धुंडाळावे लागतील. ते मिळाले की प्रयत्न करतो.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    दिनेश,अंत:प्ररणा अथवा इंस्टींक्ट हे देखील जनुकांचेच काम आहे स्लार्टीचेच (म्हणजे त्याने दिलेले!!) उदा.द्यायचे तर- दुसरा वाटा घेऊ लागला असता गुरगुरणे ही अत्यंत स्वाभाविक प्रेरणा,किंवा नवजात अर्भकांमधे प्रथमपासून आढळणारी हाताची पकड;ही पकड त्यांना कुणी शिकवत नाही किंवा ते त्याचा विचार करीत नाहीत.
    स्लार्टि नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट पोस्ट.एकदम डीटेलमधे समजावले आहेस
    'जगण्यास फायदा' न देणारे बदल टिकण्याची शक्यता फारच कमी.>> माणसातलेच एक उदा.देतो,'ओ' रक्तगट हे खरेतर नॉर्मल 'ए' रक्तगटाच्या जीनचे जेनेटीक म्युटेशन आहे.तरीही ते का टीकून राहिले आहे? कारण 'ओ' रक्तगटच्या व्यक्तींना कॉलर्‍यासारखे आजार कमी प्रमाणात होतात.म्हणजेच 'जगण्यास फायदा' होणारा हा बदल आहे.
    आता नंदिनीचा प्रश्न- जनुकीय ज्ञान आणी बुद्धी एकमेकापासून पुर्ण वेगळे करता येत नाहीत कारण मानवी बुद्धी ही मूळात त्याच्या मेंदूच्या रचनेवर,अ‍ॅनॅटॉमीवर आणी न्युरल सिग्नलींगवर अवलंबून आहे;जे जनूकांमुळेच शक्य आहे.आदीमकालात उत्क्रांत होणार्‍या मानवाचा आहार,त्याच्यावर आलेल्या आपत्ती आणि मोठ्या आकाराच्या मेंदुस पोषक जनुकांचा सतत पुढच्या पिढीत प्रसार या सर्वांच्या एकत्रीत प्रभावाखाली आपली आत्तची बुद्धी तयार झाली आहे (लक्षात घ्या,मी इथे केवळ सर्वसामान्य मानवी मेंदूच्या निर्मितिबद्दल बोलत आहे,तथाकथित 'बुद्धीमत्ता' अथवा 'इंटेलिजेन्स' बद्दल नाही)
    उदा. इनबॉर्न इंस्टींक्ट हे आपल्यालाही अन्य प्राण्यांप्रमाणेच असतात पण भाषेच्या विकासामुळे आपण त्यापुढे जाउन प्रगती करु शकतो,जे पुन्हा स्वरयंत्र्,कान,ब्रोकाज एरिआ अशा जनुकांवर आधारित स्ट्र्क्चर्समुळेच शक्य होते.
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    छान आहे, कथा आणि प्रतिसाद दोन्ही वाचनीय.

    दिनेशभाऊ,

    मस्तच! एकदम छान फ्रेश लिहीलं आहे. पूर्वीसारखे नियमीत लिहीत जा ना, ते वाचण्याच्या निमित्ताने इथे (मला) यावेसे वाटते.

    योग,
    जूने मित्र इथे यावेत, यापेक्षा मला तरी काय हवे ?
    जरुर प्रयत्न करेन नियमित लिहायचा.

    दिनेश, तुमची कथा आवडली.....खासकरून हा विषय मला फार आवडतो त्यामुळे! प्रतिसादांमधली चर्चाही मस्तच! बरीच माहीती आणि मते मतांतरे वाचायला मिळाली. Happy

    Pages