उन्हाळा म्हंटलं की काही जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणीच्या सगळ्या धमाल मज्जा आठवायला लागतात. वार्षिक परीक्षा संपायच्या आधीपासून उन्हाळी सुट्टीचे प्लॅन बनायला लागायचे. आंबे, चिंचा, कैऱ्या, गावाला जाणे, दुपारी कोणाच्यातरी घरी जमून, खेळलेला गड्डा झब्बू, कॅरम, काचकवडे, कधी भातुकलीचा रमलेला डाव, वाटलेल्या पाल्याची चटणी, गूळ शेंगदाण्याचे लाडू, कॉलनीतल्या मुलांशी केलेली भांडणं, सकाळी टिपूला (आमचा कुत्रा) फिरायला घेऊन जाणं, त्याची अंघोळ, बाथरूम मध्ये छोट्या टब मध्ये पाणी भरून त्या पाण्यात डुंबणे, बागेला पाणी घालण्याच्या बहाण्याने एकमेकांना भिजवणे, आते भावंडांसोबत केलेली मस्ती, मारामाऱ्या, छोट्या मोठ्या पिकनिक अश्या एक ना अनेक आठवणी फक्त आणि फक्त उन्हाळ्याशी जोडलेल्या आहेत. कालपरत्वे त्या अंधुक होऊन गेलेल्या, या वर्षी मात्र गावाला गेल्यावर अनेक गोष्टी एक एक करून आठवायला लागल्या.
उन्हाळी सुट्टीला गावाला गेल्यावर बटाट्याचे पापड, ओल्या हळदीचं लोणचं, उडदाचे पापड, शेवया, सालपापड्या, कुरडया, गव्हाचा चीक असे अनेक पदार्थ पाहिले आणि ओसरून गेलेल्या, मनाच्या एका कोपऱ्यात बसलेल्या या वाळवणानी खूप वर्ष जळमट, धूळ साचऊन घेतलेली! या वर्षी मात्र खूप आठवण झाली, शेजारची दारं सतत उघडी पाहिलेली, आईचा मार चुकवायला पळत पळत शेजारच्या काकूंकडे जाणं. काकांनी त्यांच्या मुलांना सोडून माझ्यावर जीव लावणं, तीन चाकी सायकल पासून कार शिकेपर्यंत साथ दिलेल्या सगळ्या सवंगड्यांची खूप आठवण झाली, यावर्षी! "आई मी काय करू आता? कंटाळा आलाय , कोणीच नाहीये खेळायला" बिल्डींग मध्ये खेळायला कोणी नाही आणि सततचे बंद दरवाजे, मुलीचा हा डायलॉग ऐकला आणि मन माझ्या जुन्या भिडूना शोधायला लागले. खरंतर माझ्या वयाचं कोणीच नव्हतं, सगळे दादा आणि ताई. मी लपंडाव, फुटबॉल असले खेळ मुलांसोबत खेळत असे. आणि पत्ते, भातुकली, जीबली असे खेळ फक्त तायांसोबत रंगत! अजून एक मोठ्ठा उद्योग टाय आणि काकूंसोबत रंगायचा, तो म्हणजे हे उन्हाळ्यातली कामं! वाळवण...सालपापड्या,पापड, सांडगे, साबुदाणा पापडी, कुरडया, बटाटा पापड, ताकातली मिरची.....लोणची, पन्ह, चिंचा वाळवणे, मिरच्यांची देठं काढून वाळवून लाल तिखट बनवणे, गोडा मसाला बनवणे, एक ना अनेक पदार्थ बनवण्याची मेजवानी असायची. आमच्या घरी अशी काही कामं आई काढायची नाही, पण मदतीला म्हणून शेजारी जोशी काकूंकडे मात्र आम्ही न बोलावता, हजर!
गच्चीवर प्लॅस्टिकचा कागद अंथरण्यापासून ते वाळत घातलेल्या जिन्नसांची राखण करायची या सगळ्यात मी आणि माझे चार दोन सवंगडी आनंदानी श्रमदानाला तयार असायचो. सकाळी सात आठ पासून कामाला सुरुवात व्हायची. दोन ताया, काकू आणि आम्ही तीन लिंबुटिम्बु! टीम तयार! गच्चीवरच सगळी तयारी केलेली असायची, स्टोव्ह, पातेली, डब्यांची झाकणं, स्टीलच्या छोट्या ताटल्या, लांब सुई आणि अजून काय काय लागणाऱ्या गोष्टी! तेव्हा मी शाळेत असेल चौथी पाचवीत...! सगळ्या श्रमदानाच्या बदल्यात, काय मिळायचं तर, मोडलेल्या सालपापड्या, अर्धवट वाळलेले, अर्धवट ओले सांडगे किंवा साबुदाण्याच्या पापड्या! केवढा आनंद होता, एकमेकांना फितवून न मोडलेल्या पापड्या सुद्धा आम्ही गट्टम्म करायचो. सालपापड्या! माझा विशेष आवडीचा पदार्थ! पातेल्यातलं पातळ पीठ, स्टीलच्या छोट्या खोल ताटलीत ओतायचं, ताटली फिरवून फिरवून ते एकसारखं पसरवून घ्यायचं, उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ती ठेऊन, शिजू द्यायची, मग चिमट्यानी उचलून बाजूला काढली की सालपापडीच्या तळाशी सुई घालून ती सगळ्या बाजूनी मोकळी करून घ्यायची आणि अलगद उचलून प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालायची. कडकडीत उन्हात दिवसभर वाळवायची. बहुदा दुपारनंतर उलटून पण टाकावी लागायची, नीटसं आठवत नाही आता! नीट न उचलता आलेली, मोडकी सालपापड्यांच्या वाटण्या ठरलेल्या असायच्या. दर पापडी काढताना मनातल्या मनात प्रार्थना करत असायचो, ही पापडी मोडू दे म्हणून. हा कार्यक्रम दोन तीन तास चालायचा. ही पापडी सालीसारखी पातळ असते म्हणूनच तीला सालपापडी म्हंटल जात असावं!
यापेक्षा वेगळ्या साबुदाण्याच्या पापड्या! साबुदाणा पाण्यात शिजवून त्यात जिरे, मीठ टाकून बनवत असाव्यात या पापड्या! छोटी छोटी प्लास्टिकची झाकणं(टोपण) वापरायच्या काकू यासाठी. झाकणाला पाणी लावून घ्यायचं, त्यात डावभर शिजवलेला साबुदाणा टाकायचा, हातानी अलगद दाबून घायचा. नंतर प्लास्टिकच्या कागदावर ते झाकण उलट टाकून त्याच्यावर टिचक्या मारायच्या, की पापडी कागदावर! या पापड्या अर्धवट वाळल्यावर स्वर्गीय लागायच्या. निव्वळ अवर्णनीय! काकू बरेचदा त्यात खायचा रंग टाकायच्या, मग काय रंगीबेरंगी पापड्या दिसायलाही सुंदर दिसत. पांढऱ्या, गुलाबी, हिरव्या, केशरी!!
उडदाचे पापड तसे सोप्पे असायचे, कारण ते घरात सावलीत बसून बनवायच्या काकू! लहान असताना फक्त एक एक पापड नेऊन कागदावर वाळत घालायचं काम असायचं, थोडं मोठं झाल्यावर ते लाटायलाही मिळायचे. उडदाच्या पिठाच्या लाट्या खायलाही खूप मज्जा यायची, चिकट, तिखट, खारट लाट्यांची सर त्या पॅकिंगमध्ये येणाऱ्या तयार गोळ्यांना नाही.
ज्वारीचे सांडगे वगैरे प्रकार आठवतात पण त्याची पाककृती नाही आठवत आता. ते पण अर्धवट ओले भारी लागायचे. लोणची वगैरे त्या करायच्या म्हणजे एकदम पाच पाच किलोचं! कैरीचा साखरंबा, कैरीचं गोड लोणचं, फेसलेल्या मोहरीचं फोडणी घालून केलेलं लोणचं,माईनमुळ्याचं, ओल्या हळदीचं, कच्च्या करवंदांचं लोणचं... आत्ता लिहिताना सुद्धा त्याचा वास आणि चव आठवून आजही तोंडाला पाणी सुटतंय!
कच्च्या कैरीच्या फोडी, विलायती चिंचा, मोरावळ्याच्या खरावलेल्या फोडी, करवंदं, जांभुळ, गाभूळलेल्या तिखट मीठ लावलेला चिंचेचा गोळा, अर्धवट वाळलेल्या सालपापड्या, सांडगे,पापड, पिकलेले हापूस,पायरी, रायवळ आंबे, रंगबिरंगी पेप्सीकोला, चोरून पडलेल्या कैऱ्या, त्यांच्या वाटण्या, आणि त्याचे आईकडून हट्ट करून बनवून घेतलेले पदार्थ....कांदाकैरी, वाटली डाळ, पन्ह, तिखट मीठ लावलेल्या होडीसारख्या फोडी, मेथांबा, चुंदा आणि काय काय... !! एवढं सांगण्यासारखं होतं खरंतर...अजूनही असेल साठलेलं, विसरलेलं...आज अचानक सगळं आठवायला लागलं... सगळ्या या गोष्टी परत एकदा अनुभवायला आवडेल. परवा बटाट्याचे पापड केले पहिल्यांदाच! त्या निमित्ताने या जुन्या पोतडीतून अनेक छोटे छोटे शिंपले बाहेर निघाले.
बऱ्यापैकी गोष्टी आठवताहेत, खूप छान वाटलं आज! परत एकदा लहानपण जगून आल्या सारखं वाटतयं. आपल्या मुलांना हे सगळं अनुभवता आलं तर किती मजा येईल ना ? असं उगाचंच वाटून गेलं. बघू काय करता येईल याचा विचार मात्र नक्की करेन!
खरंच. ईथे महिन्याभराने समर
खरंच. ईथे महिन्याभराने समर वेकेशन्स सुरु होतील. मुलासाठी असाच आठवणींचा ठेवा जोडायचा आहे. बघु किती आणि काय जमतं ते
आता अस वाटतय कि घरच्या
आता अस वाटतय कि घरच्या सुट्ट्या जरा लांबवुन आईला हे सार परत एकदा थोड थोड का होईना करुया म्हणावं..
छान लिहिलयं..
आताच्या अपार्टमेंट संस्कृतीमधे कुठे वाळवणं दिसेल याची काही शक्यता नाहीच..
सर्वांच्या बिझी शेड्युलमधुन वेळ पन नाही म्हणा कुणाला..
छान... !
छान... !