नाक्यावर महिन्याभरापूर्वी नवे केक शॉप उघडले. मला केक्स पेस्ट्रीची फारशी आवड नसल्याने महिनाभर्यात कधी चक्कर टाकणे झाले नाही. आज सहज तिथून येताना भूक चाळवली म्हणून पफ, प्याटीस, चिकन बर्गर वगैरे काही मिळतेय का बघायला डोकावलो. तर आहा ! पहिलीच नजर अंडा प्याटीसवर पडली. आणि मला थेट भूतकाळात घेऊन गेली ..
कॉलेजदिवसाच्या आठवणी, तेव्हा मी हॉस्टेलला होतो. मेस मधल्या तेच तेच मसाले वापरून शिजवलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि घासफूस खाऊन सदानकदा त्रासलेलोच असायचो. मोठ्या कष्टाने पाणचट ताकासोबत घास घशाखाली उतरवायचो. त्यामुळे सकाळचा दोन प्लेट पोहे उपम्याचा भरपेट नाश्ता आणि संध्याकाळचे वडा-समोसा असल्या अरबट चरबट खाण्यातूनच सत्तर टक्के कॅलरीज मिळवायला बघायचो. या संध्याकाळच्या नाश्त्यात सर्वात जबरी नाश्ता होता तो म्हणजे हा अंडा प्याटीस!
वेज पॅटीस सारखेच पॅटीस, फक्त आत उकडलेले अंडे अर्धे कापून मसाल्यासोबत भरलेले असायचे. एक प्लेट पोह्याच्या किंमतीतच मिळायचे आणि तेवढीच भूक भागवायचे. फरक ईतकाच की पोहेवाल्याची गाडी हॉस्टेल गेटच्या बाहेरच होती आणि या अंडा पॅटीससाठी सायकलला टांग मारत थोड्या कॅलरीज जाळाव्या लागायच्या. पण वसूल व्हायच्या. तिथे बाजूलाच गार्डन गणपती + बंड्या मारूती + भोला शंकर या तीन देवांचे प्रत्येकी एक मोठाले मंदीर असल्याने आणि हे ही काय कमी म्हणून त्यांच्या शेजारीच ‘सबका मालिक एक’ म्हणत साईबाबांचेही एक छोटाले मंदीर असल्याने हॉस्टेलमधील भाविकही त्या परीसरात पडीक असायचे. खास करून मुली. आणि त्यामुळे मुलांचीही संख्या जास्त असायची. कॉलेजमध्ये कोणतं पाखरू कोणत्या फांदीवर बसलेय किंवा कोणता भुंगा कुठल्या फुलामागे भुणभुणतोय हे सर्वात पहिले तिथेच समजायचे. परीक्षा चालू असली तर प्रार्थनेसाठी आणि ईतरवेळी मौजमजेसाठी तो मंदीर परीसर गजबजलेला असायचा. मी मात्र जायचो ते फक्त अंडा पॅटीस खायला.
बेकरीवाल्याचे दुकान रोड लेवलपेक्षा जरा उंचावर होते. त्यासमोर सुरक्षिततेसाठी एक कठडा होता. बसायला एक कट्टा होता. मी तिथेच बसून वा उभा राहत, बाप्पांच्या दर्शनाला आलेल्या मुलींना न्याहाळत, पण त्यांच्यात कुठेही न गुंतता अंडा पॅटीसवरच कॉन्सट्रेट करत त्याचा आस्वाद घ्यायचो. जेव्हा शिक्षण संपवून घरी परतेन तेव्हा सर्वात जास्त या अंडा पॅटीसलाच मिस करेन असे सतत वाटत राहायचे. कारण त्या आधी कधी मी हे खाल्ले नव्हते. मुंबईत कुठे मिळते की मिळतच नाही हे माहीत नव्हते. आणि मिळालेच तर ते ईतकेच अप्रतिम मिळेल की नाही याची खात्री नव्हती. एकाअर्थी मी त्या अंडा पॅटीसमध्येच गुंतलो होतो.
आणि मग एक तो दिवस उजाडला. जेव्हा काहीच आपल्या मनासारखे होत नाही. सबमिशन वेळेवर नाही म्हणून सरांचा ओरडा खाऊन तेच डोक्यात भरून मी बेकरीजवळ पोहोचलो. तर तिथे कधी नव्हे ते अंडा पॅटीस बनवलेच नव्हते. कारण बेकरीच्या मालकाची अंगारकी संकष्टी होती. असला अव्यावहारीकपणा आपली मराठी माणसेच दाखवू शकतात असे म्हणत माझ्या एवढे दिवसांच्या त्या अन्नदात्याला मनातल्या मनात चार शिव्या हासडल्या आणि तरीही पोटाची आग शमवायला म्हणून शाकाहारी पॅटीस घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर येऊन उभा राहिलो.
आज वेज पॅटीस खायचे असल्याने तोंडाला जराही लाळ सुटली नव्हती. फारच सुके सुके लागत होते. त्यामुळे ते नुसतेच बोटांनी चिवडत मी आज माझे कॉन्सट्रेशन पहिल्यांदा खर्या अर्थाने मुलींवर ठेवले होते. ही चांगली आहे, पण त्या मॅकेनिकलच्या सलमानने आधीच पटवली आहे. ही त्याहून चांगली आहे, पण हिच्या मागे अर्धे कॉलेज लागल्याने जास्तच भाव खाते. ही तर कॉलेज क्वीनच आहे, पण आपल्यासारख्या अंडा पॅटीस खाणार्याला जराही भाव देणार नाही. असे एकेक करत सर्व सुंदर मुलींना खड्यासारखे बाहेर काढत रंगरूपाने एवरेज मुलींवरच फोकस करत होतो. आणि ईतक्यातच तिच्यावर नजर पडली.
आपली भारतीय मध्यमवर्गीय मानसिकता म्हणजे आपल्याला काळी-सावळी मुलगी कधीच पहिल्या नजरेत सुंदर वाटत नाही. पण जर ती खरेच नाकी डोळी नीटस आणि सुबक बांध्याची असेल तर मात्र मन हळूहळू गुंतत जाते. माझेही तसेच झाले. पण हा साधारण भासणे ते मन गुंतण्याचा प्रवास फक्त चाळीस ते साठ सेकंदात झाला. तिने समोर हारवाल्याकडून पानंफुले घेतली आणि चपला तिथेच ठेवून मंदिराच्या आत शिरली. बस्स हिच ती चाळीस ते साठ सेकंद. हे एवढे निरीक्षण मला पुरले. मी बकाबका पॅटीस तोंडात कोंबले आणि घटाघटा पाण्यासोबत गिळून हारवाल्यासमोर उभा राहिलो. सर्वात स्वस्तातले पानाफुलांचे ताट हे दोन अंडा पॅटीसच्या किंमतीपेक्षाही महाग होते. असे सणवार पाळत, देवपूजा करत शाकाहारी बनण्यापेक्षा आपली मांसाहारी नास्तिक लाईफस्टाईलच जास्त ईकॉनॉमिकल आहे याचा साक्षात्कार झाला. मी ताट न घेता त्याच्या हातावर दोनचार रुपये टेकवत "तू फक्त चप्पल सांभाळ भावा" म्हणत मंदिरात एंट्री मारली.
तिथे अंडा पॅटीस खायला येऊ लागल्यापासून आज पहिल्यांदाच मी जवळपासच्या एखाद्या मंदिरात जात होतो. नक्कीच स्वर्गात किंवा गेला बाजार कैलास पर्वतावर घंटानाद सुरू झाला असणार. आकाशातून देवगंधर्वांना त्या मुलीच्या डोक्यावर पुष्पवृष्टी करायचा मोह झाला असणार, जिने मला देवाच्या दारी, नव्हे घरी आणून उभे केले होते. पण ती स्वत: मला दिसेल तर शप्पथ. ज्या अंगारकीने तिला माझ्या आयुष्यात आणले तिनेच घात केला. भक्तांच्या अफाट गर्दीत ती हरवली ते पुन्हा दिसलीच नाही. त्या नादात प्रसादाच्या रांगेत चार वेळा उभे राहत पोटभर बुंदीचा चुरा खाल्ला एवढेच काय ते समाधान!
पण स्टोरी ईथेच संपायची नव्हती. नाहीतरी कॉलेजला आपल्याला कामं काय असतात. मी जवळच्या चार मित्रांना घेत शोधमोहीम आरंभली. वेळ मिळेल तसे परीसरातील कॉलेजेस पिंजून काढायचा सपाटा लावला. पण शोधण्याला मर्यादा होत्या. ना ती मिळत होती, ना दुसरी कुठली आवडत होती. असे करत करत पुढची संकष्टी आली. ही अंगारकी नव्हती. त्यामुळे ती पुन्हा त्या मंदीरात येईलच याची खात्री नव्हती. पण निदान अंडा पॅटीस तरी खाऊ या विचाराने मी मागच्या वेळेच्या तासभर आधीच तिथे पोहोचलो. कोणाला आपला संशय येऊ नये याची काळजी घेत परीसरात घुटमळत राहिलो.
.... आणि नशीब म्हणतात ते हेच! ती दिसली. गणपती स्पेशल लाल रंगाचा ड्रेस घालून आली होती. गेल्यावेळी पेक्षा जास्त उजळ वाटत होती. हा त्या ड्रेसचा परीणाम की तिच्याप्रती माझ्या बदललेल्या भावनांचा हे सांगता येणार नाही. पण बस्स, या दुसर्या नजरेतच ठरवले. आता हीच!
योग्य संधीची वाट बघत तिच्या मागे मागे माझ्याही पुर्ण मंदिराला चारपाच प्रदक्षिणा झाल्या. नकळत माझ्या पारड्यात पुण्य जमा होत होते. प्रेमासारखे पवित्र काही नाही असे म्हणतात ते उगाच नाही. देव दर्शनाचे पुण्य प्रसाद खाल्याशिवाय पुर्ण मिळत नाही असे कुठेतरी वाचल्याचे आठवत हावरटासारखा मी बुंदीचा चुरा खायला गेलो. पण फजिती झाली. तो अंगारकी संकष्टी स्पेशल होता. ही साधी संकष्टी होती. चार फुटाणे हातावर ठेवत, "चला एवढंच, थांबू नका" म्हणत मला कटवले गेले. दुर्दैवाने म्हणा किंवा आज फक्त फुटाणेच मिळतात हे तिला आधीच ठाऊक असल्याने म्हणा ती प्रसादाच्या रांगेत न लागता तशीच बाहेर पडली. रांगेतून बाहेर आल्यावर मला जाणवले की त्या नादात मी काय गमावले. ती निघून गेली होती. आता ती थेट पुढच्या संकष्टीलाच भेटणार होती. तिचे नाव गाव शाळा कॉलेज काहीतरी आज धाडस करत विचारायला हवे होते. श्या, चुकलेच!
स्वत:वरच चरफडतच मी माझ्या नेहमीच्या अंडा पॅटीस कट्ट्यावर आलो. नैराश्य झटकायला म्हणून एक अंडा पॅटीस घेतले. पहिलाच बकाना तोंडात भरणार तोच.... ती समोरच दिसली. अगदी माझ्या समोरच. बेकरीच्याच काऊंटरवर. जशी ती तिथून आपले सामान घेऊन वळली तसे मी जवळजवळ तिचा रस्ताच अडवला, आणि...
थरथरत्या हातांनी, गोठलेल्या श्वासांनी, पापणी न लवता तिच्या नजरेत नजर घालून म्हटले, "हाय!"
"काय?"
"काय नाही हाय! एच वाय ई हाय.. आपलं ते एच आय हाय.." मी काय बोलत होतो ते माझे मलाच समजत नव्हते. मी तिच्या साध्याश्याच पण उलट पावित्र्याने बावरून गेलो. जणू काही ती माझ्या ‘हाय ला हाय’ म्हणत माझी जुनी मैत्रीण असल्याच्या थाटात मला टाळीच देणार होती. खूपच सकारात्मक अपेक्षा ठेवून जातो ना आपण मुलं, एखाद्या मुलीशी पहिल्यांदाच बोलायला जाताना. पण तिच्या कोरड्या प्रतिसादाने भानावर आलो. जर ती माझ्यासारखी हॉस्टेलाईट नसून स्थानिक रहिवाशी निघाली तर बेदम चोप पडेल याची कल्पना होतीच. म्हटलं थांबावे ईथेच. काही नाही ताई म्हणत तिथूनच मागे फिरावे. पण ....
"काय काम होते?" तिच्याकडूनच प्रश्न आला. कडक आवाजात. आता ऊत्तर देणे भागच होते.
ईतरवेळी नको नको ते सुचते पण त्यावेळी भितीने काहीच सुचायला तयार नव्हते. साधं ‘पेन आहे का तुमच्याकडे?’ असे विचारले असते तरी विषय संपला असता. पण विषयालाच ईतक्यात संपायचे नव्हते. काहीच सुचत नाही म्हणताच आता आणखी गोंधळून स्वत:ची शोभा करून घेण्याऐवजी मी तिला थेटच विचारले, "आपण दर संकष्टीला येता का या मंदिरात?"
"तू माझा मागच्या वेळीही पाठलाग करत होतास ना?"
अरे देवा. या राणीने तर थेट वजीरच घुसवला. आता ईथून मागे फिरणे म्हणजे चेकमेट नाहीतर स्टिलमेट. आता ऊंटासारखी तिरपी चाल किंवा एक दोन अडीच घोडा उधळण्यापेक्षा हत्तीसारखे सरळ प्रामाणिकपणे काय ते खरे सांगून टाकावे म्हटले..
"हो, मी गेल्या अंगारकीलाच तुम्हाला पाहिले होते. म्हणूनच या संकष्टीलाही तुम्ही दिसता का बघत होतो. आणि आजही... पण शप्पथ मी असला तसला मुलगा नाहीये हो. तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नव्हता... या अंडा पॅटीसची शप्पथ!.." तिचा विश्वास बसावा म्हणून मी माझ्या आवडत्या अंडा पॅटीसवर हात ठेवत त्याचीच शप्पथ घेतली.... आणि फसलो!
"अंडा पॅटीस? आज संकष्टीला??.. मगाशी देवळात आलेलास ना तू? आणि आता बाहेर हे... चक्क अंडा पॅटीस!!"
शेवटी मी हिट विकेट करून घेतलेच स्वत:ला. अग्ग मी नास्तिकच आहे गं. ते तर मी बस्स तुझ्यासाठी मंदिरात आलेलो... काय सांगणार होतो तिला. भावनांना आवर घातला. एक बरे झाले, तिनेही आपल्या भावना आवरल्या. कुठलाही तमाशा न करता निघून गेली.
जाताना मात्र माझ्या हातातल्या अंडा पॅटीसकडे असा काही लूक देऊन गेली, की ही सातजन्माची शाकाहारी आहे हे मी समजून गेलो. अशी मुलगी आपल्या आयुष्यात आली तर सात जन्म वेज पॅटीसच ताकासोबत गिळावे लागतील अशी स्वत:ची समजूत काढत मी तिचे जाणे मनाला लाऊन घेतले नाही. बाकी त्यानंतरही माझे तिथे अंडा पॅटीस खायला जाणे होत होतेच. फक्त संकष्टी तेवढी आवर्जून पाळू लागलो
....................................................................................
....................................................................................
तर हे आमच्या ईथले अंडा पॅटीस, एका प्रेमभंगाचे दु:ख सहज पचवावे ईतकी याची चव अफाट असते
(No subject)
ऋन्मेष. म्हणून स-विचारी
ऋन्मेष. म्हणून स-विचारी जोडीदार शोधावा
सिम्बा खरंय, पण ते वय अ
सिम्बा खरंय, पण ते वय अ-विचारी असते ना
(No subject)
तो पॅटीसवाला फक्त अंगारकीला
तो पॅटीसवाला फक्त अंगारकीला अंडा पॅटीस करत नव्हता का? बाकी चतुर्थ्यांना त्याला अंडा पॅटीस करायला काही प्रॉब्लेम नव्हता? आश्चर्य वाटले!
बाकी प्रेमभन्ग कुठे? क्रशभन्ग म्हणा फारतर! तशीही क्रश one way street असते त्यामुळे भन्ग कशाला करायची?
उगीचच गप्पा मारत बसलेलो असताना मारलेली बात वाटली.
छान अस प्रत्येक पदार्था सोबत
छान अस प्रत्येक पदार्था सोबत तुझी आठवण असेल तर आम्हांला किती किती आठवणी वाचायला मिळेल.
छान लेख ॠन्मेष...
छान लेख ॠन्मेष...
तो पॅटीसवाला फक्त अंगारकीला
तो पॅटीसवाला फक्त अंगारकीला अंडा पॅटीस करत नव्हता का? बाकी चतुर्थ्यांना त्याला अंडा पॅटीस करायला काही प्रॉब्लेम नव्हता? आश्चर्य वाटले!
>>>>
मलाही बरेच गोष्टींचे आश्चर्य वाटते. पण लोकांच्या धार्मिक भावना जपतो म्हणून शक्यतो बोलायचे टाळतो.
आता आपल्यासारखेच एक उदाहरण, आमच्याकडे एकादशी पाळत नाहीत. पण आषाढी एकादशी मात्र पाळतात. आणि असे बरेच घरांत चालत असेल. कश्याकश्याचे आश्चर्य वाटून घ्यायचे
प्रेम की क्रश? हे माझ्या मनात काय भावना उत्पन्न झाल्या त्यावर अवलंबून आहे ना.. दुसरे कोणी कसे ते सांगू शकते?
बाकी यात मी बाता मारल्या आहेत हे फक्त यावरूनच वाटले की आणखीही काही सबळ कारणे आहेत
याऊपर एक वैश्विक सत्य सांगायचे झाल्यास जगातली कुठलीही सो कॉल्ड सत्यकथा ही कधीच शंभर टक्के सत्यकथा नसते. किंबहुना असूच शकत नाही
अंकु हो, अश्या कित्येक
अंकु हो, अश्या कित्येक पदार्थांसोबत आपल्या आठवणी जोडल्या असतात. आणखी एखाद्या पदार्थाबद्दल लिहावेसे वाटलेच तर म्हणून शीर्षकात १ आकडा टाकून ठेवलाय.
एका प्रेमभंगाचे दु:ख सहज
एका प्रेमभंगाचे दु:ख सहज पचवावे ईतकी याची चव अफाट असते आवडले वाक्य
मस्त किस्सा!
मस्त किस्सा!
फक्त फोटू टाकला की पाकृ होत
फक्त फोटू टाकला की पाकृ होत नाही. त्या पाकृ ग्रुपातून बाहेर पडा बरं
@ ऋन्मेष, वा:, झकास!! सत्यकथा
@ ऋन्मेष, वा:, झकास!! सत्यकथा असो वा नसो, लिहिलंय बाकी मस्त! आवडलं. आणि चेंडू कसाही येऊ दे, तो उत्कृष्टरीत्या टोलवण्याचे आपले चातुर्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. एक माझी ईच्छा तेवढी पूर्ण करा. एकदा तरी आपले दर्शन होऊ द्या.
हाहाहाहा... मस्त आहे अंड़ा
हाहाहाहा... मस्त आहे अंड़ा पॅटिस
(No subject)
प्रतिसादांचे आभार आणि अंबज्ञ
प्रतिसादांचे आभार आणि अंबज्ञ विशेष धन्यवाद. माझ्या लेखातील एक तरी वाक्य किमान एकाला तरी आवडले तरी माझ्या एका दिवसाच्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते
कोणत्या खाद्यपदार्थामुळे
कोणत्या खाद्यपदार्थामुळे कोणाच्या कोणत्या आठवणी जागतील सांगता येत नाही
अहो ऋन्मेष सर, तुमचे ते
अहो ऋन्मेष सर, तुमचे ते "प्रपोजचे किस्से" सीरीज अपूर्ण राहीली आहे. तिच्याकडे पण ज़रा लक्ष दया की..
@ ऋन्मेष, वा:, झकास!! सत्यकथा
@ ऋन्मेष, वा:, झकास!! सत्यकथा असो वा नसो, लिहिलंय बाकी मस्त! आवडलं. आणि चेंडू कसाही येऊ दे, तो उत्कृष्टरीत्या टोलवण्याचे आपले चातुर्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. >>>>>>> +१.
अंडे नॉन व्हेज थोडीच आहे?
अंडे नॉन व्हेज थोडीच आहे?
माणिकमोती अहो ते आहे लक्षात
माणिकमोती अहो ते आहे लक्षात पण त्यावरून माझे माझ्या गर्लफ्रेण्डशी जरा वाजले आहे. तिला मी चोवीस किस्सेच सांगितले आहेत आणि ईथे प्रामाणिकपणे सव्वीस आकडा टाकला. ते बघून ती उरलेले दोन किस्से कोणते आणि माझ्यापासून का लपवलेस म्हणत माझ्या मागे लागलीय. त्यामुळे ती मालिका नाईलाजाने थांबवावी लागलेली. तरी बघूया तिचा मूड कसा आहे ते..
@ अंडे वेज नॉनवेज ... तर ते आपल्या मानन्यावर असते. मी स्वत: अंड्याला नॉनवेज समजत नाही. एखाद्या मित्राने डब्यात नॉनवेज आणलेय असे बोलून माझी भूक चाळवली आणि त्याच्या डब्यात मटणमच्छी न निघता अंडे निघाले तर मी ते त्याच्याच डोक्यावर फोडतो.
सांगून टाका मग ते दोन किस्से
सांगून टाका मग ते दोन किस्से तिला.. म्हणजे मग "ब्रेक अपचे किस्से" अशी पण सीरीज सुरु करता येईल.. तसंही 26 प्रपोज म्हणजे 25 ब्रेक अप्स असतीलच..
Btw, गर्लफ्रेंड पण माबोवार
Btw, गर्लफ्रेंड पण माबोवार आलीये वाटतं.. आता ज़रा जपुनच राहावं लागेल (तुम्हाला)
होप यु guys गेट married सून..
होप यु guys गेट married सून.. ATB..
तसंही 26 प्रपोज म्हणजे 25
तसंही 26 प्रपोज म्हणजे 25 ब्रेक अप्स असतीलच..
>>>>>
चूक! 26 प्रपोज म्हणजे 26 अफेअर नाहीत, म्हणून 25 ब्रेक अप नाहीत. एवढे डाग लाऊ नका माझ्या चारीत्र्यावर
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
एवढे डाग लाऊ नका माझ्या
एवढे डाग लाऊ नका माझ्या चारीत्र्यावर
कुछ दाग अच्छे होते है.. आणि
कुछ दाग अच्छे होते है.. आणि हे एकतर्फी ब्रेक अपच म्हणायला हवेत. आता गफ्रे माबोवर आलीये म्हणून उगीच सारवा सारव नका करू..
आता गफ्रे माबोवर आलीये म्हणून
आता गफ्रे माबोवर आलीये म्हणून उगीच सारवा सारव नका करू.. Wink
>>>>
यावरून मला एक धागा सुचला. सुचवलात म्हणून धन्यवाद. कधी काढलाच तर पुढची चर्चा तिथेच, ईथे अवांतर नको. चला शुभरात्री
Masta jamalay likhan aani
Masta jamalay likhan aani bakery Walyala Anda pattice
Pages