तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते. ह्या शास्त्रालाच उत्पादनाचा वापर करणाऱ्याच्या 'सुलभ अनुभवाची रचना' (User Experience Design) किवा 'मानव-तंत्रज्ञान-सुसंवाद' (Human Computer Interaction) किंवा वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवून केलेली रचना (User Centered Design) म्हणतात. आधुनिक जगातील प्रत्येक उत्पादन किंवा सेवा ह्यांच्या उपयुक्ततेसाठी आणि गुणवत्तेसाठी हे शास्त्र अत्यंत आवश्यक ठरले आहे.
आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपैकी ३४% लोक इंटरनेट वापरतात, इंटरनेटवर ६० कोटींपेक्षा जास्त संकेतस्थळं उपलब्ध आहेत, दरवर्षी ५ कोटी नवीन संकेतस्थळं तयार होतात, जगातील २ अब्जपेक्षा जास्त लोक ईमेल सुविधा वापरतात, दररोज गूगल सर्चद्वारे १८१ देशातील लोक १४६ भाषा वापरून एकूण १ अब्ज प्रश्नांची उत्तरे शोधतात. जगातील ८७% लोक मोबाईल फोन वापरतात (भारतात, लोकसंख्येच्या ७०% लोक मोबाईल फोन वापरतात), साधारणतः २ अब्ज संगणक नियमितपणे वापरले जातात, अब्जावधी लोक आणि शेकडो कंपन्या लाखो कार्यप्रणाली (Software) वापरतात, जगभर साधारणतः 22 लाख एटीएम मशिन्स वापरल्या जातात… ही आकडेवारी पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने/सेवा किती प्रचंड प्रमाणात वापरल्या जातात. अशी उत्पादने/सेवा केवळ आखीव-रेखीव-सुंदर असून चालत नाहीत तर त्या उपयोगशील (Usable) सुद्धा असाव्या लागतात, त्यामागे एक उपयुक्त कल्पना किंवा विचार असावा लागतो. शिवाय जागतिक बाजारपेठेत असणाऱ्या गळेकापू, वेगवान स्पर्धेत टिकून यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच उपयुक्तता आणि आकर्षकपणा हादेखील महत्त्वाचा ठरत आहे.
User Experience Design प्रक्रिया सोप्या भाषेत सांगायची झाल्यास असं म्हणता येईल की, लोकांना (किंवा संभाव्य वापरकर्त्यांना) उत्पादनाकडून किंवा सेवेकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्या सध्याच्या अडचणी काय आहेत? त्यांची आवड-नावड काय आहे? त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांच्या मर्यादा काय आहेत? त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या संधी आहेत? अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन केला जातो. ह्या माहितीच्या आधारे उत्पादनाची संकल्पना तयार केली जाते. ही संकल्पना पुन्हा लोकांना दाखवली जाते. आणि त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेऊन उत्पादनाची अंतिम रचना-अभिकल्पना तयार केली जाते. ह्याचं अगदी आपल्याशी संबंधित उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण जे मोबाईल फोन वापरतो ते फोन तयार करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या संभाव्य वापरकर्त्यांचा परिपूर्ण अभ्यास करतात आणि मगच फोनचे नवीन मॉडेल तयार करतात. आणखी एक उदाहरण म्हणजे पूर्वी याहू किवा रेडीफ ईमेल सुविधा वापरणारे बहुतांश लोक आता गुगलची जीमेल ही ईमेल प्रणाली वापरतात कारण जीमेल खूप उपयुक्त, सोयीचे आणि आकर्षक दिसणारे संकेतस्थळ वाटते, ह्याचं श्रेय गूगल कंपनीच्या उपयोगशीलता-तज्ञांना, रचनाकारांना आणि युजर इंटरफेस डिजाईनर ह्यांना जातं. गूगलने लोकांच्या आवडी-निवडीचा अभ्यास करूनच अशी यशस्वी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. हीच प्रक्रिया कमी-जास्त प्रमाणात जगातील प्रसिद्ध संकेतस्थळे, कंपन्या, सॉफ्टवेअर-हार्डवेअर कंपन्या, बँका, इन्शुरन्स कंपन्या वापरतात. जेवढे उत्पादन उपयुक्त, वेगवान आणि आकर्षक तेवढा कंपनीचा नफा जास्त या सूत्रामुळे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात प्रत्येक कंपनीला या क्षेत्रातील लोकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उत्पादन किवा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना या विषयातील तज्ञ माणसे लागतात. लोकांचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रातील तज्ञ लागतात, उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता-विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी उत्पादन- अभिकल्पकार (Product Designer) लागतात, युजर इंटरफेसचा आराखडा आणि संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिजाईनर, विज्युअल डिजाईनर लागतात. तयार केलेले डिजाईन तांत्रिकदृष्ट्या अमलात आणण्यासाठी प्रोग्रामर, डेव्हलपर लागतात.
तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील संवाद कसा उपयुक्त होईल ह्याविषयीचे संशोधन दुसऱ्या महायुद्धापासून चालू होते पण डोनाल्ड नॉर्मन ह्यांनी १९९३च्या सुमारास User Experience Design ही संकल्पना पहिल्यांदाच ठाशीवपणे मांडली. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्मिती करताना वापरकर्त्याचा(User) विचार केला पाहिजे ही भावना प्रबळ झाली. त्यावेळेस डोनाल्ड नॉर्मन हे अॅपल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत काम करत होते. खरंतर 'सॉफ्टवेअर' ही संकल्पना उदयाला येण्याआधी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सरळसोट, कमी गुंतागुंतीची असत. त्यामुळे उत्पादनाच्या डिजाईन बरोबरच उपयुक्तता-तंत्रज्ञान सुसंवाद याचा फार तीव्रतेने विचार केला गेला नव्हता. पण सॉफ्टवेअर ही संकल्पना उदयाला आली आणि त्याबरोबरीनेच गुंतागुंतीची उत्पादने निर्माण होऊ लागली. त्यातूनच ही गुंतागुंतीची उत्पादने लोकांना सोपी, सोयीची आणि आकर्षक कशी होतील याचा विचार झाला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात कार्यप्रणाली (Software) ही संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली. १९६८ आणि १९६९ ह्या वर्षांमध्ये कार्यप्रणाली (Software) या विषयाला वाहिलेल्या दोन परिषदा आयोजित करण्यात आल्या आणि त्याबरोबरच सॉफ्टवेअर तंत्रज्ञान अधिकृत उद्योग म्हणून उदयाला आला. पुढील काळात आयबीएम, अॅपल, मायक्रोसॉफ्ट या सारख्या संगणक निर्मिती करणाऱ्या कंपन्या उदयाला आल्या आणि उद्योग जगाला तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनाची उपयुक्त आणि आकर्षक रचना (Design) करणारया अभिकल्पकारांची (Designer) गरज भासू लागली. त्या काळात अमेरिकेतील कॅलीफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली परिसरात अनेक झपाटलेले तरुण नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी धडपडत होते. पुढे १९९०च्या दशकात महाजाल (Internet) आणि संकेतस्थळ (Website) ह्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. त्याकाळी वेबसाईटचे डिजाईन करण्यासाठी ग्राफिक डिजाईनर नेमले जात परंतु वेबसाईटच्या संभाव्य वापरकर्त्याचा किंवा वेबसाईटच्या उपयोगशीलतेचा फारसा विचार केला जात नसे. त्यामुळे वेबसाईटचे डिजाईन करणारे ग्राफिक डिजाईनर महत्त्वाचे की वेबसाईटला उपयुक्त बनवणारे उपयोगशीलता-तज्ञ महत्त्वाचे असा गमतीशीर वाद निर्माण झाला. पुढे २०००च्या दशकाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये डिजाईन आणि उपयोगशीलता दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत असा विचार पुढे आला आणि हा वाद संपुष्टात आला. पुढे मोबाईल फोन, टॅब्लेट यांच्या उत्पादनवाढीनंतर ह्या शास्त्राची गरज आणखी व्यापक होत गेली.
हे शास्त्र जरी पाश्चात्य देशात उदयाला आले असले तरी आज ह्या विषयाची जाणीव, प्रयोग आणि काम आपल्या देशातसुद्धा होत आहे. भारतातील उत्पादन कंपन्या आपल्या संभाव्य वापरकर्त्यांचा अभ्यास करून प्रोडक्ट डिजाईन करत आहेत. माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवा किंवा उत्पादन पुरवणाऱ्या प्रत्येक कंपनीमध्ये या विषयातील तज्ञ माणसे लागतात. पाश्चिमात्य उद्योगांना या क्षेत्राचं महत्त्व माहिती असल्यामुळे आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ लोकांची गरज असल्यामुळे आज भारतीय अभिकल्पकारांना (Designers) खूप मोठी मागणी आणि संधी आहे. गेल्या तीन-चार दशकांपासून माहिती-तंत्रज्ञान उद्योग भारतात वाढत आहे. अमेरिका-युरोप येथील बँका, तंत्रज्ञान कंपन्या, टेलिकॉम कंपन्या, आरोग्य-इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्या, विमान-उद्योग कंपन्या कुशल मनुष्यबळाअभावी आणि कमी खर्चात काम करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर-निर्मितीचे काम भारतात देतात. ही सॉफ्टवेअर उत्पादने आणि सेवा उपयुक्त आणि आकर्षक असणे हीसुद्धा स्पर्धेची एक मोठी गरज आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये हे काम करणारे स्वतंत्र विभाग निर्माण झाले. या विभागांमध्ये उपयोगशीलता तपासणारे उपयोगशीलता-विश्लेषक (Usability Analyst), लोकांना सोयीचे असे उत्पादन तयार करण्यासाठी प्रॉडक्ट डिजाईनर, ग्राफिकल युजर इंटरफेसची संकल्पना तयार करण्यासाठी रचनाकार (User Experience Designer), ग्राफिक डिजाईनर, विज्युअल डिजाईनर यांची मोठी गरज निर्माण झाली. त्यामुळे भारतातील कल्पक, कुशल तरुण मुलांना या क्षेत्रात खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतातील आयआयटी, एनआयडी, सिम्बिओसिस यासारख्या प्रख्यात शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाचे दर्जेदार शिक्षणसुद्धा उपलब्ध आहे.
User Experience Design हे क्षेत्र केवळ पाश्चात्य उद्योग किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांपुरते मर्यादित न राहता सामान्य भारतीय लोकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी पडेल असे मुलभूत संशोधनसुद्धा ह्या विषयात होत आहे. आयआयटी, सी-डॅक ह्या सारख्या संस्थांमध्ये अनेक संशोधन-प्रकल्प चालतात. आज ई-गवर्नन्स ही संकल्पना अनेक देशात प्रभावीपणे रुजू पाहते आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, शहरे, गावे आणि खेड्यातील ग्रामपंचायत तंत्रज्ञानाने जोडली जाऊन त्याचा चांगल्या प्रशासनासाठी उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अशा ई-गवर्नन्स व्यवस्थेत तंत्रज्ञान, डिजाईन लोकांना उपयुक्त आणि अनुरूप असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तिथेही हे क्षेत्र खूप उपयोगी पडणार आहे. आज माहिती तंत्रज्ञान भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात, शहरापासून खेड्यांपर्यंत पोहोचत आहे. बँका, सरकारी कचेऱ्या, रेल्वे-यंत्रणा, पोस्ट, मोठी दुकाने, शाळा, महाविद्याले संगणकीकृत होत आहेत. तंत्रज्ञान सर्वदूर पोचत आहे. हे सारे तंत्रज्ञान लोकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि सोयीचे असणे खूप महत्वाचे झाले आहे. ते लोकांच्या प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची उपयुक्त रचना (Usable Design) खूप आवश्यक बनली आहे.
तंत्रज्ञान दिवसेंदिवस आधुनिक होत असतानाच त्याची रचना, डिजाईन लोकांसाठी सोपी, उपयुक्त असावे यासाठी देखील संशोधन चालू आहे. User Experience Design या विषयावर जगभर दरवर्षी शेकडो परिषदा आयोजित करण्यात येतात. विविध देशातील संशोधक, गणिततज्ञ, डिजाईनर, प्रोग्रामर एकत्र येऊन विविध प्रयोगांवरील प्रबंध सादर करतात. त्यातून सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. आयआयटीमधील संशोधन-प्रकल्पांवर काम करताना भारत, नेदरलॅंड आणि अमेरिकेतील काही परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पुण्यात भरलेल्या एका परिषदेत अमेरिकेत असणारे एक भारतीय प्राध्यापक आले होते. त्यांनी अंध, अपंग व्यक्तींचा अभ्यास करून त्यांना उपयोगी पडतील अशी लिहिण्या-वाचण्याची विविध उपकरणे निर्माण केली होती. इंग्लंडमधील एका संशोधकाने, वापरकर्त्याचा अभ्यास न केल्यामुळे कसे गोंधळ उडतात याचे उदाहरण देताना विमानातील सॉफ्टवेअरच्या स्क्रीनचे डिजाईन उपयुक्त नसल्यामुळे एकदा विमान धावपट्टी ओलांडून नागरी वसा हतीत कसे घुसले याचे गमतीशीर उदाहरण दिले. त्याने एका प्रख्यात कंपनीच्या कॅल्क्युलेटरमध्ये अनेक चुका शोधून स्वतःचे सुधारित नवीन कॅल्क्युलेटर डिजाईन केले होते. नेदरलॅंडमधील अॅमस्टरडॅम येथील एका परिषदेत मोबईल फोन-डिजाईनमधील नवनवीन आविष्कार सादर करण्यात आले. मोबाईल फोन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शोध आणि त्याच्या येत्या काही वर्षात मानवी जीवनशैलीवर त्यांचा होणारा परिणाम याविषयी अनेक प्रयोग सादर करण्यात आले. अमेरिकेतील बॉस्टन येथील एका परिषदेमध्ये विकसनशील देशांच्या विकासामध्ये Human Computer Interaction कसे हातभार लावू शकेल या विषयावर एक कार्यशाळा भरली होती. त्यात आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाखंडातील विविध देशातील संशोधकांनी तंत्रज्ञान, डिजाईन आणि त्या देशातील लोकांचा विकास या विषयी केलेले नवनवीन प्रयोग, प्रबंध आणि कल्पना सादर केल्या.
या क्षेत्रातील भारतातील व्यावसायिकांनी आणि संशोधकांनी एकत्र येऊन संघटना (HCI Professionals Association of India) स्थापन केली आणि ही संघटना दरवर्षी India HCI या नावाने या क्षेत्रातील भारतीय पैलूंवर आधारित परिषद आयोजित करते. भारतातील आणि जगभरातील व्यावसायिक, संशोधक, विद्यार्थी आणि शिक्षक या परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. २०१० मध्ये आयआयटी मुंबई येथे भरलेल्या IndiaHCI 2010 परिषदेमध्ये Human Computer Interaction हे शास्त्र भारतीय अर्थव्यवस्थेतील उदयोन्मुख उद्योगांसाठी कसे वापरता येईल, भारतातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हे शास्त्र कसे वापरता येईल, डिजाईनचा वापर अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी कसा करता येईल अशा विविध पैलूंवर प्रबंध सादर करण्यात आले. सप्टेंबर २०१३ मध्ये बंगलोर येथे भरलेल्या परिषदेमध्ये या क्षेत्राचा उपयोग नवनवीन अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रप्रणाली यांच्यासाठी कसा होऊ शकेल, शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी डिजाईन कसे वापरता येईल, अपंग आणि वृद्ध लोकांसाठी तंत्रज्ञानाची रचना करताना डिजाईन कसे वापरता येईल अशा व्यापक पैलूंवर प्रबंध सादर करण्यात आले.
या क्षेत्राचा भारताच्या बाबतीत विचार केला असता असे लक्षात येईल कि इंटरनेट, मोबाईल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्न शहरी आणि ग्रामीण भागात पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा ते वीस वर्षात निम्न शहरी आणि ग्रामीण भागातील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान लोकांना वापरण्यासाठी उपयुक्त, सोपे आणि प्रादेशिक भाषेत उपलब्ध असणे खूप महत्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञान, त्याचे डिजाईन हे केवळ एक कल्पनारम्य निर्मिती न राहता ते सर्व प्रकारच्या लोकांना, उद्योगांना उपयुक्त आणि कार्यक्षम असणे ही येत्या काळाची गरज आहे. यासाठी तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना खूप महत्त्वाची ठरणार आहे.
निखिल वेलणकर
युजर एक्सपीरिअन्स स्ट्रॅटेजिस्ट
अल्फारेट्टा
Email: nikwel@gmail.com
Twitter: @nikhilwelankar
उत्तम लेख. आवडलाच. मराठीत या
उत्तम लेख. आवडलाच. मराठीत या विषयावर वाचलेला पहिलाच लेख. सोपी भाषा / इंग्रजी प्रतिशब्द यामुळे समजायला अडचण नाही आली.
मायबोलीवर स्वागत.
सोप्या भाषेत खूप छान माहिती!
सोप्या भाषेत खूप छान माहिती!
सोप्या भाषेत खूप छान माहिती!<
सोप्या भाषेत खूप छान माहिती!<<<+११
मस्त माहीती. टेस्टर म्हणून मी
मस्त माहीती. टेस्टर म्हणून मी काही युसेबिलिटी इशु सांगितला तरी डेव्हलपर दुर्लक्ष करतात पण तोच बदल क्लाएंट कडून आला की न कुरकुर करता करतात
UX Testing Certification आहे का ? मी गूगल करतेच आहे पण तुम्ही ह्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून विचारलं.
उत्तम लेख !
उत्तम लेख !
इथल्या http://www.loksatta
इथल्या http://www.loksatta.com/abhikalpa/page/2/ लेखांची आणि तुमच्या लेखनाची शैली एकसारखीच वाटते आहे. तुम्हीच लिहिले आहेत का लोकसत्तातले लेख?
इथल्या http://www.loksatta
इथल्या http://www.loksatta.com/abhikalpa/page/2/ लेखांची आणि तुमच्या लेखनाची शैली एकसारखीच वाटते आहे.
>>>
मी हेच म्हणणार होते.
लोकसत्तामधल्या सदराची आठवण झाली.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मी
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मी आयआयटीतील इंडस्ट्रिअल डिजाईन सेंटर मध्ये सहायक संशोधक होतो त्यामुळे माझ्या लेखातील आणि वर दिलेल्या काही दुव्यातील भाषा सारखी वाटते आहे. अभिकल्प (design) या विषयावरील लोकसत्तामधले लेख मी लिहिले नसून माझ्या गुरूंनी-तिथल्या प्राध्यापकांनी लिहिले आहेत.
UX testing किंवा Usability
UX testing किंवा Usability testing ही Software Testing सारखी तांत्रिक प्रक्रिया नाही तर मानवी प्रक्रिया आहे. तुम्ही तयार केलेले डिजाईन किंवा कल्पना वापरकर्त्याला दाखवून त्यांची प्रतिक्रिया घेण्याच्या प्रक्रियेला UX testing किंवा Usability testing असं म्हणतात. या विषयासंदर्भात आयआयटीतील इंडस्ट्रिअल डिजाईन सेंटर मध्ये चांगले कोर्सेस (मास्टर्स किंवा २ आठवड्याचा कोर्स) उपलब्ध आहेत.
वेगळ्या विषयावरचा लेख.
वेगळ्या विषयावरचा लेख. अनिरुद्ध जोशी माझ्याच बॅचचे. त्यांना २ वर्षांपूर्वी आमच्या बॅचच्या स्नेह संमेलनाला भेटलो होतो तेंव्हा त्यांनी "स्वरचक्र" अॅप बद्दल सांगितले होते. तुम्हाला त्या अॅपबद्दल माहिती असेल (किंवा त्यावर काम करणारे विद्यार्थी माहिती असतील) तर जरूर लिहा त्या अॅपबद्दल.
जाता जाता: मायबोलीवरचा सध्याचा फाँट IDC मधे तयार केलेला आहे. आणि मायबोली त्याबद्दल कायमची ऋणी आहे. आणि हा फाँट जगाला अर्पण करणार्या IDC च्या योगदानाचा आणि द्र्ष्टेपणाचा अभिमान आहे. त्याच्या जन्माची गोष्ट वाचायला मिळाली तर खूप मस्त होईल.
उत्तम लेख
उत्तम लेख
लोकसत्ताच्या सदरात `स्वरचक्र'
लोकसत्ताच्या सदरात `स्वरचक्र' अॅपबद्दल वाचूनच मी माझ्या फोनवर ते अॅप डाऊनलोड केलं होतं. फोनवर मराठी टायपिंगसाठी मी आता तेच अॅप वापरते.
खूप कल्पक तरी वापरायला सोपं आहे.
विशेषत: जुन्या पिढीतल्या मोबाईल वापरणार्या मंडळींना लगेच आत्मसात करता येतं. कारण तिथे आपल्या मुळाक्षरांचा क्रम वापरला जातो.