मी लहान असताना माझ्या आजीनी मला पत्र कसे लिहायचे हे शिकवले होते. आलेल्या पत्राला उत्तर द्यायचे असल्यास, सुरुवातीच्या मजकुरात संपूर्णपणे "त्यांच्यावर" लिहायचे. यात, "पुण्यात खूप पाऊस होतोय हे वाचून आनंद झाला" पासून, "तुमच्या नवीन घराबद्दल वाचून आनंद वाटला, अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच इच्छा", पर्यंत सगळं यायचं. शेवटच्या परिच्छेदात आपली माहिती द्यायची. आणि शेवटच्या ओळीत घरातील सगळ्यांची चौकशी करायची. असे साधे साधे नियम होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत, ती काही पत्रं मला लिहायला लावायची आणि तपासायची. पत्रं लिहिण्यासाठी पोस्टकार्ड आणण्यापासून ते टाकताना लावायच्या स्टॅम्पपर्यंत सगळं मला करायला लावायची. मग पाठवलेल्या पत्रांच्या उत्तराची वाट बघण्यात वेगळीच मजा असायची. पत्रव्यवहारातून अप्रत्यक्ष संवाद व्हायचा, ज्यात काही औपचारिकता असायची, जसे, सा. न. वि. वी लिहिणे, मोठ्यांचा उल्लेख करताना तीर्थरूप वापरणे आणि लहानांचा करताना चिरंजीव वापरणे. अनौपचारिकतादेखील असायची, जिथे आपल्याला एखाद्या विषयाबद्दल काय वाटते आहे, याची दिलखुलास एकतर्फी मांडणी करता यायची. कधी कधी तशी मांडणी वाचणाऱ्याला आवडेलच याची खात्री नसायची. पण तो संवाद अप्रत्यक्ष आहे म्हणून लिहिणाऱ्याला मन मोकळं केल्याची भावना यायची.
आता तसे पत्रव्यवहार बंद झाले, पण त्यांची जागा एका दुसऱ्या अप्रत्यक्ष संवादाच्या माध्यमाने घेतली आहे. सोशल मीडिया.
हल्ली, कुणाची बरेच दिवसांनी भेट झाली की पूर्वी विचारले जाणारे कित्येक प्रश्न गैरलागू होतात.
"अरे! तू अजिबात बदलला नाहीस!"
"कुठे असतोस सध्या?"
"छोट्याचं काय चाललंय?"
"तो, तुझा मित्र क्ष आता काय करतो रे?"
असले सगळे प्रश्न सुद्धा, पत्रव्यवहारासारखेच मृत झालेत, कारण हल्ली या सगळ्याची उत्तरं आपल्या खिशात नाहीतर पर्समध्येच सापडतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम असल्या सोशल मीडिया संकेतस्थळांमुळे, संवादातील औपचारिकता निघून जाऊ लागली आहे. एकीकडे हे चांगले आहे. सोशल मीडियामुळे लोकांचे फोन, पत्ते जपून ठेवणे, पत्ता किंवा फोन नंबर बदल्यास सगळ्यांना एक एक करून तो कळवणे, हे सगळे आता एका मेसेज मध्ये नाहीतर एका फेसबुक पोस्टीत करता येते. तसेच शाळेपासून ते अगदी शेवटच्या नोकरीपर्यंत झालेला संपर्कसंचय आपल्या पाठीमागून आपल्या पाऊलखुणा याव्यात तसा येत असतो. तो जपून ठेवण्यासाठी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून लोकांची चौकशी करायला फोन करणे, आवर्जून भेटायला जाणे अशा गोष्टी कमी केल्या तरी संपर्क ठेवता येतो.
जिथे पात्रात लिहिलेल्या काही गोष्टी आपल्याला कल्पनेने समजून घ्याव्या लागायच्या, त्या आता फोटोच्या नाहीतर व्हिडियोच्या माध्यमातून थेट आपल्यासमोर दिसायला लागल्या आहेत. पण हे होण्यात, पत्रव्यवहारातला एक महत्वाचा भाग गळून पडला आहे. तो म्हणजे आपण आस्थेने केलेल्या दुसऱ्याच्या चौकशीचा. फेसबुकच्या आपल्या पानावर आपल्याला जगाला कशाची माहिती द्यायचीये ती आपण टाकतो, तशीच दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काय सांगायचे आहे हे पाहतो. जे आवडेल त्यावर निळ्या अंगठ्याची मोहोर लावून आवडले असे जाहीर करतो. पण या संवादात, आजीचा तो "आपले" विषय बाजूला ठेऊन आधी "त्यांची" चौकशी करायचा शिष्टाचार आणि अट्टाहास निघून गेल्यासारखा वाटतो. आणि कुठेतरी बारीक, असूयेची झालर या सगळ्या देवाणघेवाणीत आल्यासारखी जाणवते.
अलीकडच्या काळात विविध देशातील शात्रज्ञांच्या कामातून सोशल मीडिया आणि एकटेपणा यावर बरेच संशोधन होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा अतिरेक एकटेपणाच्या भावनेला वाढवणारा आहे असे सिद्ध होते आहे. तसेच असा अतिरेक उदासीनता वाढवण्याचे काम करू शकतो असेही संशोधनातून सिद्ध होते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे दिसून येते की सोशल मीडियावर, दुसऱ्यांचे आनंदी आणि ऐषोआरामाचे आयुष्य बघून तरुणांना वैषम्य,उदासीनता आणि त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतघ्नता वाटते. यातील कृतघ्नतेच्या भावनेमुळे ते पुन्हा पुन्हा एकटेपणा आणि उदासीतेच्या चक्रामध्ये अडकतात. डिजिटल फोटोग्राफीमुळे आणि त्याच्या स्मार्टफोनशी झालेल्या संयोगामुळे आयुष्यातले साधे साधे प्रसंग आता कायमचे टिपून ठेवता येतात. आणि एखाद्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे साथीदार होण्याची जबाबदारी आपल्यावर येते. माणूस स्वभावत: जसा सांघिक आयुष्य आवडणारा प्राणी आहे, तसंच वरचढ ठरण्यासाठी स्पर्धा करणे, हादेखील मानवी गुणधर्म आहे. सोशल मीडियामधून या दोन्ही गुणधर्मांचे चांगले वाईट परिणाम बघायला मिळतात.
तसेच, संवादाच्या अप्रत्यक्ष असल्यामुळे, काही बाबतीत, खासकरून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्यांची भीड चेपून संवादाचे विघटन गुंडगिरीमध्ये होताना पाहायला मिळते. सोशल मीडियावर टोपण नावाने वावरणारे लोक जसे सोशल मीडियावर लिहतात तसे ते प्रत्यक्ष बोलू शकतील का हा मुद्दा विचार कारण्यासाखा आहे. आपल्याला कुणी ओळखत नाही म्हणून आपण एखाद्या स्त्रीला बलात्काराची धमकी देऊ शकतो, हा आत्मविश्वास फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादीत असतो हे कितीही खरे असले, तरी शहरी तरुण/तरुणी त्यांचा अधिकांश दिवस सोशल मीडियावर घालवतात हे गृहीत धरल्यावर अशी पडद्याआडून केलेली वागणूकदेखील धोकादायक वाटू लागते.
एखादी तान्ह्या बाळाची आई जेव्हा तिचे आणि तिच्या गोंडस बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकते, तेव्हा तिला त्या बाळासाठी रात्री अपरात्री उठावे लागणे आणि तिची झालेली दमछाक आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. एखाद्या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोशूट टाकले, तर ते कुठे करायचे आणि कसे करायचे याबद्दलच त्यांच्यात झालेली असंख्य भांडणे त्या फोटोंमध्ये दिसत नाहीत. आणि ग्लॅमरस कपडे घालणाऱ्या, आणि मेकअप करून असंख्य फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या सिनेतारकासुद्धा सकाळी आरशात बघताना आपल्यासारख्याच, रंगवलेल्या केसातून डोकावणारा तो एक पांढरा केस बघून खट्टू होत असतात, हे मात्र आपल्या कधीच लक्षात येत नाही.
हेच जर फोन उचलून किंवा त्याहीपेक्षा चांगले, प्रत्यक्ष भेटून, आपल्याला ज्यांचा हेवा वाटतो त्यांची चौकशी केली असता असे लक्षात येते की तेही आपल्यासारखीच कशाशीतरी झुंज देत असतात. प्रत्यक्ष भेटून बोलताना, संवादातील शिष्टाचारही पाळला जातो. आणि हल्ली दुर्लक्षित झालेल्या संवादातील श्रोत्याच्या भूमिकेतही आपल्याला जाता येते. वेळ वाचवणारी कितीही तांत्रिक उपकरणे आणि ऍप्स आपल्या हाताशी आली तरीही कित्येकांना वेळ कमीच पडतो अशी त्यांची तक्रार असते. पण हातातल्या मोबाईलला आपण जितका वेळ देतो, त्याच्या दहा टक्के वेळ जरी आपण खऱ्या खुऱ्या माणसांना भेटण्यासाठी दिला, तरी या मायाजालातून बाहेर येऊन थोडावेळ, आपल्या आयुष्याकडे लांबून बघायची संधी आपल्याला मिळू शकते. आणि असे बघितले असता लक्षात येते की प्रत्यक्ष भेटून मिठी मारण्याची, हातावर टाळी देऊन फिदीफिदी हसण्याची, कटिंग चहा पीत राजकारणावर चर्चा करण्याची मजा कमी झालेली नाही.
हा लेख सकाळ पेपर्स यांच्या तनिष्का मासिकाच्या एप्रिल आवृत्तीत प्रसिद्ध झाला आहे. परवानगी घेऊन इथे देत आहे.
खुप मस्त लिहिलाय लेख.तुझं
खुप मस्त लिहिलाय लेख.तुझं लिखाण नेहेमीच आवडतं मला.
मस्तच!
मस्तच!
मस्त! आवडलं!
मस्त! आवडलं!
छान लिहिलय्स.. आवडेश..
छान लिहिलय्स.. आवडेश..
संपर्क क्रांतीने जग बदलले
संपर्क क्रांतीने जग बदलले ,त्याचा मस्त धांडोळा घेतलात.
आवडलं!
आवडलं!
चांगला आहे लेख.
चांगला आहे लेख.
छान आहे लेख. सर्व मुद्दे
छान आहे लेख. सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत आणि योग्यही आहेत. पण मला वाटते जी जवळ्ची माणसे असतात त्यांच्याशी नियमित संपर्क
राहतोच.
लेखातला आशय पोचला. डिजिटल
लेखातला आशय पोचला. डिजिटल संवादाने प्रत्यक्ष संवादावर कुरघोडी केली आहे आणि प्रत्यक्ष संवाद हरवायला नको हे खरं.
पण हे फक्त अमुक तमुकचा हेवा वाटतो म्हणून असं नाही. तुम्हाला तसं म्हणायचं नसेलच. पण ते तसं समोर आलंय किंवा माझ्यापर्यंत तरी पोचलंय.
मला वाटते जी जवळ्ची माणसे
मला वाटते जी जवळ्ची माणसे असतात त्यांच्याशी नियमित संपर्क राहतोच.---+1
मला फेसबुक चा वापर काय ते कळतं नाही म्हणून मी वापरत नाही. माझ्या फोनवर ते अँप नाही.
जसं personal communicAtion होतं नाही हा तोटा आहे. तसेच खवचट लोकांना टाळता येत हा फायदा आहे. ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते कळत, चांगले तर चांगले.
खूपदा जेव्हा लोक त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो टाकतात, तेंव्हा कोणाचा आनंदी क्षण टपरीवर पुर्वी सारखा चहा पिणं असू शकतो. मी जर एखाद वेळेस डाउन असताना असा simple फोटो पाहिला तर मला अंतर्मुख व्हायला होत. ती व्यक्ती साधा चहा पिते आहे म्हणून आनंदी आहे and I have so many more things in my life to be happy about, going right in life. I should be happy.
It helps me to become happy.
छान लिहिलयसं.
छान लिहिलयसं.
भरत +१
भरत +१
लेखाचे नाव वाचून माझ्या मनात पहिल्यांदा असाच विचार आला कि दुसर्याचे किती चांगले चालू आहे असे वाटून होणारे दु:ख असे काही असेल.
यापुढे जाऊन अजून एक विचार म्हणजे तिच्या/त्याच्या पेक्षा चांगले चालले आहे कि माझे असे वाटून होणारा आनंद.
या दोन्ही विचारांमधे माणूस दुसर्याचाच जास्त विचार करून त्यात स्वतःचे सूख शोधत असतो. हे जर थांबविले तर आपले जीवन अधिक छान होईल.
छान लेख.
छान लेख.
नाही पटला मला लेख. एकुणातच
नाही पटला मला लेख. एकुणातच नॉस्टॅलजीक होऊन उसासे टाकणाऱ्या लेखांची जी फॅशन आलीय त्यातलाच एक.
{आणि कुठेतरी बारीक, असूयेची झालर या सगळ्या देवाणघेवाणीत आल्यासारखी जाणवते.}
हे तर अजिबातच नाही पटलं.
सोशल मिडियावरच सोशल मीडियाला नावं ठेवायच्या दांभिकपणाची मजा वाटते मला.
व्यत्यय यांच्या प्रतिसादाशी
व्यत्यय यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत.
चांगला आहे लेख.
चांगला आहे लेख.
व्यत्यय यांच्या प्रतिसादाचा जरूर विचार व्हावा. जरा विरुद्ध मत आले तरी रागावू नये, किंवा त्यांना नावे ठेवू नये, पण या बाबत स्वतःचेहि मत जरूर लिहावे.
सोशल मिडियावरच सोशल मीडियाला नावं ठेवायच्या दांभिकपणाची मजा वाटते मला.
मला यात दांभिकपणा दिसत नाही - बदलत्या परिस्थितीबद्दल लिहीले आहे एव्हढेच. सोशल मिडिया वापरूच नये असे म्हणायचे नसावे.
नॉस्टॅलजीक होऊन उसासे टाकणाऱ्या लेखांची जी फॅशन
जरी फॅशन म्हणून लिहिला असला तरी त्यात बिघडले कुठे? मला आवडला लेख.
उगीचच निरनिराळ्या प्रकारच्या गझला लिहायच्या अशीहि एक फॅशन मायबोलीवर आहे. मध्यंतरी सतत गांधी वि. सावरकर, भाजप वि. काँग्रेस, ब्राह्मण वि. इतर असे सगळे प्रत्येक लेखात आणायचे. अशीहि फॅशन इथे आली.
पूर्वी मायबोलीवर एक वेगळेच वातावरण असे. सगळे नुसते गंमत करायचे, कुणि उगाच गंभीरपणे एखाद्याच्या लिखाणाची चिरफाड (रसग्रहण??) करत नसे. वादावादी नव्हती.
या सगळ्या आजकालच्या फॅशन. तश्या मलाहि आवडत नाहीत. पण असेच आहे ना?
छान आले लेख !
छान आले लेख !
पण अंशतः सहमत नाही
मला तर गर्लफ्रेंडही सोशल मिडीयवर भेटली आहे, आणि एकदा ती माझी गर्लफ्रेंड झाल्यावर आम्ही चॅट वगैरे कधी फारशी केलीच नाही तर फोनाफोनी किंवा वरचेवर भेटणे असाच संवाद होतो. तर आपले सोशल मिडियावरचे फ्रेंडस वेगळे असतात आणि प्रत्यक्ष आयुष्यातील भेटणारे, भेटावेसे वाटणारे वेगळे असतात. ज्यांच्याशी आपली ऑनलाईन केमिस्ट्री जुळते त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत जमेलच असे नाही. आणि व्हायसे वर्सा. पण जेव्हा प्रत्यक्षात केमिस्ट्री जुळते तेव्हा ऑनलाईन भेटीची गरज वाटत नाही जसे वर माझ्या गर्लफ्रेंडचे उदाहरण. म्हणजेच आपण प्रत्यक्ष भेटींना वेटेज जास्त देतोच.
सई लेख आवडला.
सई लेख आवडला.
गेल्या दहा हून जास्त वर्षात
गेल्या दहा हून जास्त वर्षात सोशल मिडियावरच सॅन होजे, न्यू जर्सी, अमेरिकेतली बरीच शहरे, पुणे, मुंबई ते ऑस्ट्रेलिया इ. सर्व ठिकाणच्या बर्याच लोकांशी "मैत्री झाली".
ते तेंव्हाचे मायबोलीकर - हसत खेळत, खिलाडूपणे एकमेकांची चेष्टा मस्करी करत.कुणालाहि उगाचच दुसर्याबद्दल, मत्सर, असूया किंवा त्यांचे वाचून स्वतःबद्दल नैराश्य असले काही होत नसे.
मग जशी जशी संधि मिळाली तसतसे त्यांना प्रत्यक्ष भेटलो. तो आनंद वेगळाच.
विशेषतः पुणेकर - मी इथे पुणेकरांची (उगीचच) गंमत म्हणून बरीच चेष्टा केली. तरी पुण्यात गेल्यावर मला त्यांनी वैशाली मधे बटाटेवडा व फुकट चहा पाजला. घरी बोलावून आंबरसाचे जेवण दिले, संगिताच्या कार्यक्रमाला नेले. फारच कौतुक केले, दिलदार पुणेकर.
मुंबईमधे बीअर पाजली, नि कोथिंबिरीच्या काड्या, भाज्यांची देठे इ. बेसनात घोळून महागाइ चे व्हेज पकोडे दिले. (भजी नाही बरं का? भजी स्वस्त असतात, इंग्रजी नाव दिले की जास्त किंमत. फ्रेंच नाव असेल तर बहुधा भारतीयांनाच परवडेल, अमेरिकनांना नाही)). त्यांना प्रत्यक्ष भेटण्यात फार आनंद झाला. नंतर अनेक वर्षांनी कळले की कोथिंबीरीच्या काड्यातच खरा स्वाद व उपयुक्त द्रव्ये असतात. भारत म्हणजे जगाच्या एक पाऊल पुढेच.
न्यू जर्सीचे मायबोलीकर तर काय - एकदम बी एफ एफ! प्रत्यक्ष भेटीगाठी साठी अजूनहि फुकट दूरवर नेतात, खायला प्यायला देतात, विविध करमणूक, गप्पा करतात.
हे सगळे सोशल मिडियामुळेच.
आता मायबोली म्हणजे लोक एकदम भांडायला च उठतात!
त्यामुळे आता जरा सोशल मिडियावरच पुरे.
>>पूर्वी मायबोलीवर एक वेगळेच
>>पूर्वी मायबोलीवर एक वेगळेच वातावरण असे. सगळे नुसते गंमत करायचे, कुणि उगाच गंभीरपणे एखाद्याच्या लिखाणाची चिरफाड (रसग्रहण??) करत नसे. वादावादी नव्हती.
या सगळ्या आजकालच्या फॅशन. तश्या मलाहि आवडत नाहीत. पण असेच आहे ना?
हे खूप पटले. मी मुद्दाम कधी कधी खास प्रतिक्रिया वाचण्यासाठी माझे जुने मायबोलीचे लेख वाचते. २०१०-११ मध्ये शुम्पी, श्री, फारएन्ड, मामी वगैरे आयडी अगदी मस्त प्रतिसाद द्यायचे. लेख आवडला किंवा नाही आवडला या दोन्हीचे. आता हे सगळे लोक गायब झालेत. मध्ये मध्ये येतात. पण त्यांच्यामुळे खूप गमतीचे वातावरण असायचे.
अजूनही आयडी होते. सगळेच मला लक्षात नाहीत.
https://hbr.org/2017/04/a-new-more-rigorous-study-confirms-the-more-you-...
व्यत्यय, ही वरील लिंक पाहावी. लेखात मांडलेले माझे मत (फक्त) वैयक्तिक नाहीये.
आणि नंद्या म्हणतो तसे, मायबोलीतच सोशल मीडिया किती सकारात्मक असू शकतो याचे उदाहरण आहे. मी माझा उन्हाळ्याची सुट्टी हा ब्लॉग लिहीत असताना मायबोली हा माझा बॅरोमीटर असायचा. इथल्या लोकांची प्रतिक्रिया महत्वाची असायची आणि अजूनही आहे. एकूणच माझ्या लिखाणात मायबोलीचा मोठा मॉरल सपोर्ट आहे.
वैयक्तिक पातळीवर मला स्वतःला सोशल मीडियाशी एक संतुलित नातं निर्माण करायला खूप झगडावे लागले. मागल्या वर्षीच्या श्रावणात मी सोमवार आणि शुक्रवार सोशल मीडिया आणि व्हाट्सअप बंद ठेऊन केले. तोच माझा उपास होता. तिथपासून मात्र ठरवून व्हाट्सअँप कमी केले आहे. मायबोलीवरदेखील (अगदीच काही वादावादी चालली नसेल) तर फक्त पहाटे आणि दिवसातून ठरलेल्या वेळी मी येते. घरातला देखील ऑफिस नंतरचा वेळ फोन आणि मीडिया फ्री ठेवण्याचा प्रयत्न करते.
मुलाला गाणी शिकवायची असतील तर मी आधी पाठ करून त्याला म्हणून दाखवते. शक्यतो यूट्यूबचा आधार घेत नाही. पण अगदीच त्याच्या विरोधात आहे असेही नाही. गोष्टी सुद्धा स्क्रीन वरून न वाचता खरी खरी पुस्तके आणून वाचते.
हे सगळे करताना सोशल मीडिया म्हणजे मोठा राक्षस आहे अशी भावना नसून, आयुष्यात स्क्रीन फ्री टाइम आणि स्क्रीन टाइम या दोन्हीचे संतुलन हवे अशी असते. आधी जेव्हा मला आजूबाजूचे लोक मी खूप व्हाट्सअँप वर असते असे सांगायचे, तेव्हा मला ते पटायचे नाही. पण घरच्यांकडून रिपीटेड निरीक्षणे येऊ लागली तेव्हा लक्षात आले की घरात असलेल्या आणि माझ्याशी बोलायला उत्सुक असलेल्या व्यक्तीला बाजूला ठेऊन मी दूर राहणाऱ्या मैत्रिणींचे प्रश्न आणि प्रॉब्लेम व्हाट्सअँपवर सोडवत बसते.
>>न्यू जर्सीचे मायबोलीकर तर काय - एकदम बी एफ एफ! प्रत्यक्ष भेटीगाठी साठी अजूनहि फुकट दूरवर नेतात, खायला प्यायला देतात, विविध करमणूक, गप्पा करतात.
मला कित्येक दिवस माबोवरच्या काही आयडीना प्रत्यक्षात भेटायचे आहे. त्यातील चिनुक्स, भास्कराचार्य नुकतेच झाले.शुम्पीला सुद्धा मी भेटले आहे. आणि जितका सकारात्मक तिचा माबोवरचा वावर असतो तितकीच ती प्रत्यक्षात आहे हे सुद्धा लक्षात आले.
विद्याला मी पूर्वी भेटले आहे पण आता तिचे लेख वाचून पुन्हा भेटावेसे नक्कीच वाटते. सगळ्यांनाच भेटता येत नाही म्हणून काहींना फेसबुकवर ऍड केले आहे. पण अजूनही असे वातावरण होऊ शकते. ते खरे तर आपणच तयार करायचे आहे. 
>>एखादी तान्ह्या बाळाची आई
>>एखादी तान्ह्या बाळाची आई जेव्हा तिचे आणि तिच्या गोंडस बाळाचे फोटो सोशल मीडियावर टाकते, तेव्हा तिला त्या बाळासाठी रात्री अपरात्री उठावे लागणे आणि तिची झालेली दमछाक आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही.
मग तुम्ही जेव्हा अशा आयांशी प्रत्यक्ष बोलता तेव्हा त्या आपल्या बाळाचं कौतुक करतात की रात्रीच्या जागरणाचं रडगाणं गातात?
>>एखाद्या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोशूट टाकले, तर ते कुठे करायचे आणि कसे करायचे याबद्दलच त्यांच्यात झालेली असंख्य भांडणे त्या फोटोंमध्ये दिसत नाहीत.
जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कोणा जोडप्याच्या लग्नाचा अल्बम बघता तेव्हा ते तुम्हाला त्यांच्यातल्या असंख्य भांडणाचे डिटेल्स तुम्हाला सांगतात का?
>>आणि ग्लॅमरस कपडे घालणाऱ्या, आणि मेकअप करून असंख्य फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या सिनेतारकासुद्धा सकाळी आरशात बघताना आपल्यासारख्याच, रंगवलेल्या केसातून डोकावणारा तो एक पांढरा केस बघून खट्टू होत असतात, हे मात्र आपल्या कधीच लक्षात येत नाही.
वरचा लेख अशा निरर्थक उदाहरणांनी बुजबुजलेला आहे.
>>आयुष्यातले साधे साधे प्रसंग आता कायमचे टिपून ठेवता येतात. आणि एखाद्याच्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे साथीदार होण्याची जबाबदारी आपल्यावर येते.
जबाबदारी? आनंदाचे साथीदार व्हायची जबाबदारी? आणि याचा दोष तुम्ही स्मार्टफोन/सोशल मीडिया ला देता?
असो जास्त काही लिहीत नाही सध्या वेबमास्टर गस्तीवर असतात.