प्रत्येक माणसात पशुवृत्ती असते, सैतान असतो व त्यावर नियंत्रण ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे,
पण ते कधी नीटसे घडत नाही. त्याची हाव, महत्त्वाकांक्षा आणि लैंगिक इच्छा त्याला विनाशाकडं नेत असतात.
त्याच्या लक्षात येतं, की त्याच्या हृदयातच अंधार आहे व त्यापासून दूर जाता येणार नाही,
तेव्हा तो आपल्या दुष्कृत्याची कबुली देतो.
कोणे एके काळी माणुसकीची श्रद्धा जपता येईल, असा त्याचा ठाम विश्वास होता. पण ...
जे-जे काही मिळेल त्यावर प्रक्रिया करणे.. आणि साठवून घेणं... हा त्याचा ध्यास बनतो..!
जेव्हा त्याला जन्मताच मिळतं धर्म नांवाचे धनुष्य आणि जात नावाचा बाण ...
बाळबोध विचारांनी ग्रासलेली त्याची बुद्धी हयाविषयीचा भेदाभेद मोठ्यांना विचारू लागते.
पण इथला सगळ्यात महत्वाचा संस्कार हा आहे... की 'प्रश्न विचारणारी मानसिकता मारून टाकायची..?'
आणि 'कॉपी कॅट संस्कृती' रुजवायची..!
समाधान होणार नसतं...
मग तो आणखी पुढे जाऊन ज्यावेळी अस विचारतो की..
त्याच्यापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ , माझी जात उच्च ... बरोबर न ?
मग त्याला ती नेहमीचीच कथा ऐकवली जाते..
आपले पूर्वज कसे लढले आणि सर्वांना अंमलाखाली आणून गुलाम बनवले.
एवढ्यानेही तो गप्प बसत नाही....
यापुढेही जाऊन तो असे अनेक प्रश्न विचारू पाहतो... की ज्याची उत्तरं देणं, हे जमणं शक्यच नसतं...
म्हणून मग आता त्याच्या हातात एक अजून शस्त्र दिले जाते .... हिंसेचे ... संहाराचे.
'माणसाचा आजवरचा इतिहास.. हे दुसरं-तिसरं काही नसून तो निव्वळ नरसंहार आणि दुसऱ्यावर हुकमत गाजवणे ह्यापलीकडे जात नाही, गेलेला नाही आणि जाणारही नाही.
पण आता 'प्रश्न विचारायचा नाही... जे पूर्वापार चालत आलेले आहे... ते मुकाट्यांनं स्विकारायचं..!'
आणि ... किमान आपली मान कापली जावू नये म्हणून फक्त वाट पहायची !! ... अजून एका तलवारीची.