या आठवड्यात तीन विलक्षण बातम्या लागोपाठ वाचायला मिळाल्या. विशेष म्हणजे तिन्हीमध्ये समान धागा एकच होता तो म्हणजे "प्रेम"
पहिली बातमी: अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्राने प्रेमभराने मारलेल्या मिठीमुळे एका डॉक्टरच्या बरगड्याच मोडल्या. कदाचित तुम्ही पण हि बातमी वाचली असेलच. मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर मित्र एकमेकांना अनेक वर्षांनी प्रथमच भेटले. भेटल्यानंतर प्रेम इतके उतू गेले कि एकमेकाला कडकडून मारलेल्या मिठीत त्यातल्या एका डॉक्टर महोदयांच्या छातीच्या तीन बरगड्या तुटल्या. आणि मिठी सुटल्यावर ते वेदनेने अक्षरशः जमिनीवरच कोसळले. सुदैवाने ते हॉस्पिटलच असल्याने तिथेच त्यांच्यावर त्वरित उपचार पण झाले हा भाग वेगळा.
दुसरी बातमी: बिबट्याने जबड्यात पकडलेल्या आपल्या बाळाला वाचवण्यासाठी एका मातेने चक्क त्या बिबट्यावर झडप घातली आणि अक्षरशः मृत्युच्या दाढेतून त्याला वाचवले. हि थरारक बातमी सुद्धा अनेकांनी वाचली असेल. आरे कॉलनीत राहणाऱ्या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्या ओढून नेत असल्याचे दिसताच त्या बाळाच्या आईने आपल्या जीवाची पर्वा न करता या बिबट्यावरच उडी मारली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बिबट्या बावचळला आणि त्याने बाळाला तिथेच टाकून धूम ठोकली.बाळाच्या पाठीवर बिबट्याचे दात, नखे लागली होती. पण जीवावरचे संकट टळले होते.
या दोन्ही घटना वरकरणी भिन्न वाटत असल्या तरी त्यांच्यात खूप काही साम्य सुद्धा आहे.
१. एक आहे मित्रप्रेम, तर दुसरे पुत्रप्रेम
२. एकात मित्राचा अनेक वर्षांचा विरह संपला म्हणून आनंदापोटी आलेला प्रेमावेग आहे तर दुसऱ्यात आलेला प्रेमावेग पुत्राचा कायमचा विरह होईल कि काय या नैसर्गिक भावनेतून आलेला आहे
३. एकात प्रिय व्यक्तीवर प्रेमापोटी जणू हल्लाच चढवला आहे तर दुसऱ्यात श्वापदाने चढवलेल्या हल्ल्यापासून प्रिय व्यक्तीला वाचवले आहे
४. एकात तगड्या व बलवान व्यक्तीच्या प्रेमापोटी मित्राला शारीरिक इजा झाली आहे , तर दुसऱ्यात समाजाने जिला अबला ठरवलेय तिने प्रेमापोटी बाळाला शारीरिक इजा होण्यापासून वाचवले आहे
५. एकात अतीव प्रेम करून प्रिय व्यक्तीलाच धोक्यात आणले आहे तर दुसऱ्यात अतीव प्रेमापोटी स्वत:चा जीव धोक्यात टाकून प्रिय व्यक्तीला सुरक्षित ठेवले आहे
याच प्रमाणे अजूनही काही मुद्दे या यादीत घालता येतील. पण मानवी स्वभावाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती किती विविध आणि त्याचीच दोन टोके पण किती विरुद्ध आहेत हे दिसून येते. "प्रेमाला उपमा नाही..." असे एक जुने मराठी गाणे यानिमित्ताने आठवले. क्षणभर असे वाटले कि Valentine Day यावर्षी जरा लवकरच आला. या आठवड्यात हवा होता
आणि हो, तिसरी बातमी सांगायचीच राहिली. बिहार मधल्या एका दुर्गम खेडेगावात राहणाऱ्या बारा वर्षाच्या मुलास हजारो किलोमीटर अंतरावर बंगळुरू येथे असलेले वडील आजारी आहेत असे त्याच्या आईकडून कळले. तेंव्हा आयुष्यात आपल्या छोट्या गावाबाहेरसुद्धा न पडलेला हा मुलगा केवळ वडिलांच्या प्रेमाखातर तब्बल अडीच हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगळुरू शहराकडे एकटाच जायला निघाला. इथून पुढचा भाग ज्या वृत्तपत्रात मी हि बातमी वाचली त्यांच्याच शब्दात इथे देत आहे:
हिंमत न हारता विचारपूस करीत तो एकदाचा बंगळुरू येथे पोहचला. वडील काम करीत असलेल्या ठिकाणाचा पत्ता शोधला आणि त्याने वडिलांची भेट घेतली. तोपर्यंत त्यांची प्रकृती बरीच ढासळली होती. त्यांना घेऊन बंगळुरू-पाटलीपुत्र संघमित्रा एक्सप्रेसने तो परत यायला निघाला. प्रवासादरम्यान बराच वेळ झाला तरी वडील काहीच बोलत नव्हते. ‘पप्पा आंखे खोलो, मुझसे बात करो. आपको कुछ नहीं होगा’ असे बोलून तो वडिलांना बोलते करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, त्याच्या वडिलांचा केव्हा प्राण गेला हे त्यालाही समजले नाही. संघमित्रा एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना समजली. लोहमार्ग पोलिसांसोबत असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
... नियती आणि प्रेम यात कधीकधी नियती जिंकते तेंव्हा मात्र आपण नि:शब्द होतो !
२री बातमी,कालचं बहिणीने
२री बातमी,कालचं बहिणीने टीवीवर दाखवली होती...
पण तुम्ही लॉजिक खतर्नाक वापरलयं...लिहिताना..
१ली आणि ३री आता समजली...
लेख आवडला अतुल.
लेख आवडला अतुल.
@कावेरि: @पियू: धन्यवाद
@कावेरि:
@पियू: धन्यवाद
लेख चांगला आणि खूप आश्वासक.
लेख चांगला आणि खूप आश्वासक. मातृप्रेम, मित्र प्रेम, पिता प्रेम, प्रेमाचे हे तिन्ही धागे उलगडणारे ...
मस्त! अश्या बातम्या गुंफून
मस्त! अश्या बातम्या गुंफून लेख लिहिता येतो आणि धागा काढता येतो हे दाखवल्याबद्दल धन्यवाद
जोक्स द अपार्ट, पहिल्या दोन बातम्या छान जमलेल्या, तिसरी उगाच सेंटी केलीत..
पहिलीबाबत काही नवलही वाटले नाही, हल्ली असे हल्लाबोल मिठ्या मारत यारीदोस्ती दाखवायचे एक फॅड आले आहे. प्रेमी युगुलांमध्ये भावना अनावर झाल्याने लव बाईटस समजू शकतो, पण मित्रांमध्ये आवर घालायला हवा ना.
@ स्मिता२०१६: धन्यवाद
@ स्मिता२०१६: धन्यवाद
ऋन्मेषा... धन्यवाद
ऋन्मेषा... धन्यवाद प्रतिसादाबद्दल वाचनात आल्या तशा मांडल्या बातम्या. नकळत, काम करता करता, कुठेतरी डोक्यात विचार सुरु असताना लक्षात आले कि बातम्या इतर बातम्यांपेक्षा वेगळ्या तर आहेतच पण काहीतरी त्यांच्यात कॉमनही आहे हो तिसरी आहे सेंटी. पण ती सुद्धा एक बाजू आहे प्रेमाची. म्हणून ती बातमी सुद्धा याच रांगेतली वाटली.
आवडले...
आवडले...
तिसर्या बातमीचे वाईट वाटले.
तिसर्या बातमीचे वाईट वाटले. आजुबाजुला असे प्रसंग होउन गेल्यावर कळते तेव्हा खुप अस्वस्थ वाटते. काही मदत करता आली असती तर.
हा मुलगा जेथे राहत होता ती
हा मुलगा जेथे राहत होता ती जागा बन्गळुरुपासुन अडीच हजार किमीवर आहे हे वाचून आश्चर्य वाटले. कारण आपला देश हा फक्त तेव्हेढा उभा व आडवा आहे.
@शाबुत धन्यवाद.
@शाबुत धन्यवाद.
@राया: खरे आहे. अर्थात या बारा वर्षाच्या मुलाला पण अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली असेलच जमेल तितकी. त्याशिवाय त्याला एकट्याला त्यांच्या पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. पण जी मिळाली ती मदत अपुरीच म्हणायला हवी. आपल्याकडे आपत्कालीन यंत्रणा जवळजवळ अस्तित्वात नाहीच. कुठे असेलच तर प्रगत देशात असते तितकी प्रभावी नाही.
@दिगोचि: हे हवाई अंतर नाही. रस्त्याचे आहे. अनेकदा ते पूर्ण देशाच्या लांबी रुंदी पेक्षा (हवाई अंतर) जास्त भरते. अर्थात ट्रेनने रस्त्यापेक्षा थोडेसे कमी भरेल.