आज सकाळी घडलेली घटना. दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दारात किशोरवयीन मुलांचं टोळकं उभं होतं. ओळखीची नव्हतीच. होळीची वर्गणी मागायला आली होती. ‘ शाळा नाही का रे? शाळेच्या वेळेत कसे काय फिरताय?’ असं विचारलं तर शाळेला सुट्टी आहे असं त्यांनी उत्तर दिलं. अशी मध्येच कशी असेल सुट्टी?
खरं तर हा मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. अभ्यासाचे दिवस. ते सोडून होळीची वर्गणी मागत मुलं फिरत होती. आणि समजा सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.
आम्हाला खूपच खटकली ही गोष्ट. पैसे द्यायला आमचा विरोध नव्हता, पण तरीही अभ्यास सोडून फिरतायत म्हणून थोडंसं रागावलो त्यांना; आणि वर्गणी न देता परत पाठवलं.
नंतर माञ माझं विचार चक्र सुरु झालं. एकीकडे आपण म्हणतो, आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे. त्या संस्कृतीचं एक महत्वाचं अंग म्हणजे सण . बरं तेदेखील चांगले साजरे झाले पाहिजेत असंही मनापासून वाटतं. काही सण कुटुंबांपुरते मर्यादित असतात तर काही समाजातल्या सर्वांनी मिळून पार पाडायचे असे असतात. इथे तर मुले त्यासाठीच आली होती. मग काय बरं चुकलं त्यांचं?
बऱ्याचदा असं होताना दिसतं. सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो आहे असा शाळांवर आरोप सगळेच करत असतात. इथे मुलांनाच आपल्या शिक्षणाची फिकीर नाही असं जाणवलं. होळी सारखे सामाजिक सण मुलांना आकृष्ट करतात, आणि ते साजरे करण्यातही गैर काहीच नाही; पण ते साजरे करण्यामागचा हेतू तरी मुलांना कमीत कमी ज्ञात असावा. त्याशिवाय विद्यार्थी दशेतील कर्तव्य म्हणजे विद्याभ्यास यावर लक्ष कमी होऊन मजा आणि धांगडधींगा करण्यासाठी तो वेळ व्यतीत होत असेल तर ते चुकीचं आहे.
मग याला पर्याय तरी काय?
‘संस्कृती रक्षणा’च कार्य म्हणजे- ‘होळी सण’ तर साजरा व्हायला हवा , पण मुलांनी त्यासाठी अभ्यासाचा वेळही वाया जाऊ द्यायचा नाही..... हेही जमवायला हवं. इथे त्यासाठी महत्वाचा आहे मुलांचा आणि पालकांचा संवाद, पालकांचं मार्गदर्शन. त्यातून, मर्यादित वेळेतच फिरणे, अभ्यास करून झाल्यावरच बाहेर पडणे, सणांना संस्कृतीच्या रूपात समजून घेणे हे व्हायला हवं. हे सगळं फारच आदर्शवादी वगैरे होतंय का? आणि तसं ही आपल्याकडे एवढा खोलवर विचार तरी कोण करतंय? मुलांमध्ये भविष्य बद्दल काही विशिष्ट उद्दिष्ट विकसित करणाऱ्या घरांमध्ये मुले आणि त्यांचे आई-बाप असं ‘वेळेचं व्यवस्थापन’ करतात , पण बऱ्याचदा ‘खरोखरीच वेळ मूल्यवान आहे, आणि तो योग्य गोष्टीसाठी योग्य तेवढाच खर्च करावा’ अशी विचारधारा ना पालकांमध्ये असते…. ना- मुलांमध्ये!
उद्याच्या प्रगतिशील भारतासाठी मुलांना वेळेचं महत्व समजणे हे खूप आवश्यक आहे असं मला मनापासून वाटतंय.
तुमचं काय मत आहे?
होळी, मुले आणि वर्गणी
Submitted by दीपा जोशी on 13 March, 2017 - 02:22
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सगळं जपण्याचा अट्टाहास मला
सगळं जपण्याचा अट्टाहास मला तरी फारसा पटत नाही. जगणं इतकं वेगवान झालंय, काही ना काही हातातून सुटणारच.
सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो आहे असा शाळांवर आरोप सगळेच करत असतात. इथे मुलांनाच आपल्या शिक्षणाची फिकीर नाही असं जाणवलं.>>
मुलांना काय म्हणून असावी शिक्षणाची फिकीर? ज्या दर्जाचे शिक्षण बऱ्याच ठिकाणी मिळतंय, ते पाहता अशा शिक्षणासाठी मुलांना काय म्हणून ओढ वाटेल? यातल्या कित्येक मुलांना आपण हे का अन कशासाठी शिकतोय, याची जरासुध्दा कल्पना नसेल. अर्ध्याअधिक जणांना शाळा म्हणजे वेगळी सजा वाटते. जिथे मनापासून रमायला हवे त्या शाळाच कोंडवाड्याप्रमाणे भासू लागल्या, तर दोष कुणाचा ? अशा परिस्थितीत शिक्षणाची आवड निर्माण होणे जरा कठीणच आहे.
होळी सारखे सामाजिक सण मुलांना आकृष्ट करतात, आणि ते साजरे करण्यातही गैर काहीच नाही; पण ते साजरे करण्यामागचा हेतू तरी मुलांना कमीत कमी ज्ञात असावा. >>
होळीमागची किंवा अन्य कुठल्याही सणामागची कथा-कहाणी तोंडी लावण्यापुरतीच उरलीय. सिनेमा सुरु असताना "Fun Facts" असतात, तशी अवस्था या पुराणकथांची आहे. माहिती असेल तर ठीक नाहीतर कुणालाही काही फरक पडत नाही.
चार लोकांबरोबर आनंद लुटावा, रोजच्या जगण्यातला एक दिवस वेगळा काढावा..... सणांचा खरा उद्देश हा आहे. मग तुम्ही त्याला सण समारंभ म्हणा, पार्टी म्हणा फारसा फरक पडत नाही. त्यामागचा हेतू एकच, बरोबरीने मजा लुटणे. त्यामागची कथा अन पारायणात तरुण मुलांना रस वाटणे अपवादानेच घडते.
संस्कृती समाजाबरोबर चालते, तो बदलतो तशी संस्कृतीसुद्धा बदलते. आज होळीच्या सणाला होलिकेची कथा आहे, काय सांगावं , उद्या दुसरी असेल. आपल्या परीने होता होईल तेवढी जपायची,पण इतरांवरसुद्धा ती पाळण्याचा अट्टहास नको.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!
जरा ओव्हररिअॅक्शन वाटली ही.
जरा ओव्हररिअॅक्शन वाटली ही. होळी करता २-३ तास धमाल करण्यात काय चूक आहे?
सुट्टी असली तरी शाळेत
सुट्टी असली तरी शाळेत असण्याचा वेळ प्राधान्याने अभ्यासासाठी देऊन नंतरच वर्गणी साठी फिरणे वगैरे व्हायला हवे.>>झाला असेल त्यांचा अभ्यास. त्यावरुन तुम्ही भारतीय संस्कृती, शिक्षणाचा खेळखंडोबा, वेळेचे महत्व याचा केव्हढा विचार करता!!!
होळी हा सण नेहमीच परिक्षेच्या दिवसात येतो. मुले अभ्यास करुनच आई-बाबांची परवाणगी घेऊन २-३ तास बाहेर पडतात. तेव्हा आम्ही तरी तसेच करत होतो.
काय होतंय एक दिवस अभ्यास
काय होतंय एक दिवस अभ्यास नाही केला तर....
मुलांना एन्जॉय करू द्या हो..
होळी रविवारी होती ना?
होळी रविवारी होती ना? मग वर्गणी सोमवारी का?
फारच सज्जन आणि अभ्यासु मुलं
फारच सज्जन आणि अभ्यासु मुलं होती तुमच्याकडे वर्गणी मागायला आलेली.
आमच्याकडे तोंडे काळीकुट्ट झालेली सेना खंडणी वसुल करायला निघायची.
"आयना का बायना घेतल्याशिवाय जायना; रम्याची आय, कवटा खाय, पाच पाच मिंटांनी हगायला जाय" असा कायबाय गदारोळ करुन पैसे वसूल करायची. रम्या स्वतः मागे कुठेतरी तोंड लपवत हसत असायचा.
अदिती
अदिती
अहो अभ्यास करुन वर्गणी
अहो अभ्यास करुन वर्गणी मागायला आले असतील किंवा नंतर जाउन अभ्यासाला बसणार असतील.
किती विचार ते. भारतीय संस्कृती, संस्कृती रक्षण, वेळेचं व्यवस्थापन काय नी काय.
त्या मुलांना नाही ना ऐकवलंत हे सगळं. कारण वर्गणी तर दिलीच नाहीत म्हणता.
मी कोकणात राहतो बरेचदा
मी कोकणात राहतो बरेचदा त्यामुळे इकड़चा शिमगा जवळून अनुभवता येतो
होळी अन शिमगा एकच सण असला तरी मला वाटते सादरीकरण आणि साजरीकरण हयात खुप फरक आहे
शिमगा म्हटले की पालखी आलीच आणि मग थोरांचे अनुकरण नाही करणार ती छोटी वानरसेना काय कामाची
तर त्यांनाही पालखी खेळवत दारोदारी जायला आवडतं आणि मग त्यांच्यातील काही शंकासुर डान्स करून आपल्या कडून हळूच बक्षिसी रुपात पैसे मिळवू पाहतात.
अल्प स्वरूपातील रक्कम देवून ह्या बच्चे कंपनीला प्रोत्साहन देणे नक्कीच चांगले असे मला तरी वाटते. हे पैसे जमवून बच्चा कंपनी थोड़ी हौस मौज करते काही आवडीचे खाणे किंवा छोट्या स्वरूपातील छंद जसे की लहान मुलांना रंगीत मासे आवडतात तर ते अक़्वेरियम मधून घेणे इतपत ही हौस असते आणि ती भागवली गेली पाहिजे असे माझे प्रांजल मत आहे.
कारण एकच ----
कोण असतात ही मुले ?
सधन मध्यम वर्गीय किंवा उच्चभ्रू लोकांची तर खचितच नसतात म्हणजेच हां समाजाचा असा वर्ग आहे जो कष्ट करतोय पण घरची परिस्थिती हौसमौज करायला परवानगी नाही देवू शकत. आणि मग शिमग्याची वर्गणी हीच ह्या बाल गोपालांसाठी पर्वणी ठरते.
माझे वैयक्तिक मत काहीही असले तरी प्रत्येकाने असे पैसे द्यावेत हे खचितच बंधनकारक नाही आणि माझा तसा आग्रहही नाही