फॉर हूम द बेल टोल्स -- अर्नेस्ट हेमिंग्वे

Submitted by सई केसकर on 20 February, 2017 - 04:34

या वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.

बऱ्याच लोकांना हेमिंग्वे वाचताना कंटाळा येतो. मलाही आधी यायचा. कधी कधी. आणि त्याचं कारण लेखन चांगलं नाही हे नसून आपलं वाचन बदलायची गरज आहे हे आहे. हेमिंग्वे वाचायच्या आधी वाचकांनी मन स्थिर ठेवायची प्रॅक्टिस करावी. कारण हेमिंग्वेची शैली वेगळी आहे. याचं वेगळेपण असं, की काही लेखक/लेखिका त्यांच्या पात्राला काय वाटलं हे उलगडून लिहितात. त्यामुळे वाचकाला फारसा विचार न करता कथानकाबरोबर वाहवत जाता येतं. त्यामुळेच कदाचित काही पुस्तके भुरर्कन वाचून संपतात. पण हेमिंग्वेची शैली अशी नाही. हेमिंग्वे पात्रांना काय वाटलं हे खूप कमी लिहितो. त्यांनी काय विचार केला हे लिहितो. पण त्यांना काय वाटलं हे फारसे लिहीत नाही. यामुळे पात्राला काय वाटले असेल, याचा विचार वाचकाला करायला लागतो. आणि तो वाचकाच्या मनःस्थिती, परिस्थिती आणि व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी हेमिंग्वेसारखा लेखक नाही. दुसरी खासियत म्हणजे हेमिंग्वेची भाषा अलंकारिक बिलकुल नाही. पण आशय मात्र विचार करायला भाग पडणारा असतो. कदाचित हे असे व्हावे म्हणूनच भाषेचा मुलामा काढून टाकला असावा.

हेमिंग्वे बद्दल केलेल्या वाचनात नेहमीच असे जाणवते की तो आपल्या लेखनावर प्रचंड कष्ट घेणारा लेखक होता. आणि सुरुवात वृत्तपत्रातून केली असल्यामुळे संक्षिप्त लेखनाचे संस्कार आधीपासूनच झाले असावेत. त्यामुळे त्याच्या काळात त्याची लेखनशैली क्रांतिकारी मानली जायची. अर्थात संक्षिप्त हे विशेषण फक्त त्याच्या वाक्यरचनेला लागू आहे. कारण हेमिंग्वेचे लिखाण आपल्या डोळ्यासमोर संबंध चित्र उभे करणारे असते. वाक्यरचना साधी असली तरी वर्णन अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत पूर्ण असते. फक्त ते वस्तूंचे, विचारांचे किंवा संवादाचे असते. त्या चित्रातून बोध वाचकाला घ्यायचा असतो.

फॉर हुम द बेल टोल्स ही रॉबर्ट जॉर्डन या अमेरिकन युवकाची गोष्ट आहे. स्पॅनिश सिव्हिल युद्धात तो फेसिस्ट राजवटीविरुद्ध गेरीला सैन्याची मदत करण्यासाठी आलेला असतो. त्याला सोव्हिएत राजवटीकडून एक पूल उध्वस्त करायचे आदेश असतात. आणि त्यात त्याची मदत करणाऱ्या लोकांसोबत त्याला काही दिवस घालवावे लागतात. त्या समूहात मारिया नावाची एक तरुणी असते जिच्या तो प्रेमात पडतो. याच गटात पूर्वी फेसिस्टांविरुद्ध मोठी बंडाळी घडवून आणलेला, पण आता निराश झालेला पाब्लो असतो. आणि अतिशय कणखर, स्वतःचे सर्वांवर वर्चस्व गाजवणारी त्याची जोडीदार पिलार. रॉबर्ट जॉर्डनला पूल उडवण्यात सर्वात जास्ती मदत करणारा साठीचा अनसेल्मो आणि इतर काही छोटी पात्र अशी या पुस्तकाची बांधणी आहे.

या पुस्तकात खटकणारी, जी हेमिंग्वेच्या इतर पुस्तकांमध्ये दिसत नाही, गोष्ट म्हणजे त्यातली भाषा. भाषा जरी इंग्रजी असली तरी हेमिंग्वेनी यात एक अभिनव प्रयोग केला आहे. स्पॅनिश किंवा फ्रेंच लोक एका विशिष्ट प्रकारे इंग्रजी बोलतात. जसे की इंग्रजी मध्ये "सईची आई" हे सईज आई असे म्हणता येते. पण एखादी स्पॅनिश व्यक्ती बऱ्याचदा हे "आई ऑफ सई", असे म्हणते. या पुस्तकाची स्पॅनिश लोकांचे संवाद हे अशा प्रकारच्या इंग्रजीत लिहिले आहेत. आणि काही स्पॅनिश, खासकरून अपभाषा, जशीच्या तशी इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायची सवय व्हावी लागते. पण सवय करून घेऊन वाचण्याइतके हे चांगले आहे का?, असा पुणेरी सवाल येईल म्हणून त्याचे उत्तर आधीच हो असे देते आणि का ते सांगते. ज्यांना कुणाला स्पॅनिश किंवा फ्रेंच मित्र मैत्रिणी आहेत, त्यांना हे पुस्तक वाचणे सोपे जाईल. मला हे वाचताना सतत माझ्या फ्रेंच मैत्रिणीची म्हणजे एलोडीची आठवण येत होती. त्यामुळे जो प्रयोग केला आहे तो सफल झाला आहे असे म्हणता येईल. कारण त्या शिवाय ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा माझ्यासारख्या लोकांना मित्र मैत्रिणींची आठवण येईपर्यंत हे पुस्तक आवडलं नसतं.

यातील प्रेमकथा मला फारशी रुचली नाही. कारण मारिया आणि रॉबर्ट यांची प्रेमकथा नुसतीच शारीरिक आणि भावनिक पातळीवर दाखवण्यात आली आहे. या पुस्तकात मनाला स्पर्शून जातील, आणि कायम लक्षात राहतील असे दोन प्रसंग आहेत. पहिला म्हणजे पिलारनी तिच्या आठवणीतून कथन केलेला, पाब्लोनी त्याच्या उमेदीच्या काळात घडवून आणलेला फेसिस्टांच्या वधाचा प्रसंग. हा प्रसंग लिहिताना हेमिंग्वेच्या लेखणीचा कस लागला आहे हे लगेच लक्षात येते. आणि या पुस्तकाचे नाव काढले की हा एकच प्रसंग डोळ्यासमोर आधी येणार याची खात्री पटते. "फेसिस्ट" या लेबल खाली ज्या ज्या व्यक्तींचे वर्णन होते त्या सगळ्यांना "सधन" हे विशेषण अगदी सहज लागू होते. पाब्लोच्या नेतृत्वाखाली अशा फेसिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील व्यक्तींना जाहीरपणे मारायचा बेत असतो. पण मारणारे आणि मरणारे एकमेकांना जवळून ओळखणारे असतात. त्यामुळे त्या कत्तलीची तीव्रता आणि क्रूरता, तसेच सधन व्यक्तींबद्दलचा द्वेष आणि त्यांची दैना बघून निर्धनांना होणारा विकृत आनंद हे सगळे मन सुन्न करणारे आहे. आणि हेमिंग्वेच्या लेखणीतून ते आणखीनच धारदार बनून निघाले आहे. हा प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतो कारण जरी या पुस्तकात तो फेसिस्ट विरुद्ध रिपब्लिकन असा दाखवला असला, तरी तो आजही ज्यांच्याकडे आहे विरुद्ध ज्यांच्याकडे नाही या नजरेतून आपल्यातला वाटतो.

दुसरा प्रसंग म्हणजे पिलार, मारिया आणि रॉबर्ट जेव्हा एका क्रांतिकार्याला भेटायला जातात, तेव्हा वाटेत ते एका सैनिकाला भेटतात. तो सैनिक मारियाशी खूप खेळीमेळीने आणि प्रेमानी वागतो. त्याच्या गावात फेसिस्टांनी केलेल्या अत्याचारात त्याचे घरचे कसे मरण पावले याची कहाणी सांगून भावुक होतो. तेव्हा पिलार त्याला जवळ घेऊ पाहत असताना, तो अगदी हलकेच तिला जवळ येण्यापासून परावृत्त करतो. तरुण मारियाच्या तुलनेत मिळालेला हा नकार पिलारला सहन होत नाही. आणि त्यामुळे तिच्यातील दिसण्याबद्दल आणि उतरत्या वयाबद्दल असलेला न्यूनगंड जागृत होतो. आपल्याला वाटत असलेल्या मत्सराची पिलारने दिलेली कबुली मनाला स्पर्शून जाणारी आहे. मत्सर हे बऱ्याचवेळा नाती आणि मैत्री तुटायचे प्रमुख कारण असते. ज्याला मत्सर वाटतो, इतकच काय पण ज्याचा मत्सर होतो, ती व्यक्तीदेखील उघडपणे त्याला मत्सर म्हणायला कचरते. असे असताना, जर कुणी आपल्याला मत्सर वाटतो आहे अशी प्रांजळ कबुली दिली तर समोरच्याला देखील नकळत त्याचा आदर वाटू लागतो. तसे काहीसे हा प्रसंग वाचताना होते. पिलारचा अहंकार आणि तिचा प्रामाणिकपणा या दोन्हीचे फार सुंदर रेखाटन हेमिंग्वेने केले आहे.

हेमिंग्वेच्या युद्धकथा रम्य आणि तपशीलवार असतात. त्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे प्रचंड खोलात जाऊन वर्णन केलेले वाचायला मिळते. युद्धाचा नुसताच माहोल तयार न करता, त्यामध्ये रणनीतीचे देखील खोलवर वर्णन असते. युद्ध जवळून पाहिल्यामुळे, ते वाचकाच्या डोळ्यासमोर खुबीने उभे करायची युक्ती हेमिंग्वेला अवगत होती. पण असे असले तरी हेमिंग्वेच्या वाचकाला कधीही युद्धाबद्दल आपुलकी वाटणार नाही याची काळजी त्याने घेतलेली असते. युद्धाबद्दल सलग पाचशे पाने वाचूनसुद्धा एकदाही युद्ध गरजेचे आहे असे हे पुस्तक वाचताना वाटत नाही. तसेच युद्ध काळातील माणसांच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. युद्ध अचानक आपल्यलाला भविष्यातून वर्तमानकाळात आणून ठेवते. त्यामुळे आपल्या हातात असलेल्या प्रत्येक क्षणाला भोगून टाकण्याची धिटाई माणसाला युद्धकाळात अचानक जमायला लागते. या पुस्तकातील मारिया आणि रॉबर्टचे प्रेम हे या भावनेतून निर्माण झाले आहे असे सारखे वाटत राहते. तसेच पाब्लोचे सतत चाललेले मद्यपानदेखील अशा निराशेतून जन्माला आल्यासारखे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. कारण हेमिंग्वे कधीही युद्धाचा मनावर कसा परिणाम होतो याबद्दल उलगडून लिहीत नाही. ते वाचकाला असेच टिपावे लागते.

इतर कोणी हे पुस्तक वाचले असेल तर त्यांची मतेदेखील वाचायला आवडतील. आणि हेमिंग्वेची आवर्जून वाचण्यासारखी अजून कोणती पुस्तके आहेत तेही वाचायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान ओळख करुन दिलीस सई...
मी याच फक्त नाव ऐकलं.. मुळात झेपेल कि नाही या भितीनेसुद्धा वाचायची हिम्मत नाही केली असं म्हणाव लागेल..
पुस्तकाची भाषा छान समजावून सांगितली आहे. माझ्यासारख्या लोकांना ज्यांना परदेशी भाषेचे इतके डिटेल्स माहिती नसतात त्यांना हे बारकावे अश्या पद्धतीने आले आहे हे लक्षात नसतं आलं..
रुमवर सद्ध्या मागे बोलवलेल 'द ओल्ड मॅन अँड द सी' हे पुस्तक पडून आहे पण अजुन हात नाही लावला मी त्याला..
तुझा हा पुस्तक परिचय वाचुन हाती घ्याव घरच पुस्तक अस वाटू लागलय..
धन्यवाद Happy

चांगला परिचय. पु.भा.प्र.

मी फक्त 'The old man & the sea' चा 'एका कोळीयाने' हा अनुवाद वाचला आहे. सुंदर.
आणि अर्थात ती जगप्रसिद्ध ६ शब्दांची कथा !

या लेखकाचे एक वाक्य जबरदस्त आवडते, '' The world breaks everyone and afterwards, some are strong at the broken places !''

छान पुस्तक परिचय सई. हे आता मिळवून वाचेन. मी हेमिंग्वे चं तेवढं 'The old man & the sea' एकच पुस्तक वाचलं होतं, पु.लंमुळे. त्या छोट्याश्या पुस्तकात केवढं नाट्य आहे! हे पण नक्कीच छान असेल. हेमिंग्वे ताकदीचा लेखक आहे.

माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक! माझा रुमाल सध्या. दोन-तीन दिवसांत विस्ताराने लिहितो.

लेख वाचून आठवणीतून आलेले काही `क्विक' विचार -

मृत्यू ही ओव्हरबेअरींग थीम आहे. पुस्तकातल्या प्रत्येक पात्राने स्वतःचा मृत्यू जवळपास अ‍ॅक्सेप्ट केलेला आहे. रॉबर्ट जॉर्डनला मिशनवर जातानाच माहीत असतं, की तो ह्यातून काही बहुधा वाचणार नाही. आणि तरी त्याला मारिया भेटल्यावर जगायची आस पुन्हा येते. त्यामुळे त्यांच्या प्रेमाबद्दल मी तुझ्याशी सहमत नाही. मला उलट तो खूप आयडिअलीस्टीक वाटला, व अत्यंत इंप्रेशनेबल वयात हे वाचल्याने माझ्या स्वतःच्या काही कल्पना ह्यातून पक्क्या झाल्या.

मारिया हे पात्र स्पेनच्या भूमीचे रुपक म्हणूनच आले आहे की काय, असे मला पूर्वी पुस्तक वाचताना जाणवलेले. हेमिंग्वेच्या एक-दोन उपमांमधून ते प्रकर्षाने वाटलेले, असे स्मरते. दोघींवरही अनन्वित अत्याचार होऊनही दोघी नवीन फुलोर्‍याने फुलणार्‍या आणि नवीन दिवसांची आतुरतेने वाट पाहणार्‍या अशा.

मला उलट ह्या पुस्तकातली भाषा खूप आवडली. त्याबद्दल विस्ताराने लिहीन. पण एकंदरीत तुला आणि मला ह्या पुस्तकातल्या गोष्टी विरुद्ध वाटल्या, आणि तरीही आपणा दोघांना पुस्तक आवडले, असे दिसते आहे. Happy

आता फेअरवेल टू आर्म्स जरूर वाच. हेमिंग्वेला तिथे युद्धाचा आलेला वीट त्याने इथे हातच्याला घेतला आहे, असे मला वाटले. (मी ते पुस्तक आधी वाचलेले, व हेमिंग्वेने ते आधी लिहिलेही आहे.)

>>>>मृत्यू ही ओव्हरबेअरींग थीम आहे. पुस्तकातल्या प्रत्येक पात्राने स्वतःचा मृत्यू जवळपास अ‍ॅक्सेप्ट केलेला आहे. रॉबर्ट जॉर्डनला मिशनवर जातानाच माहीत असतं, की तो ह्यातून काही बहुधा वाचणार नाही.

हे माझे लिहायचे राहिले होते. मृत्यू तसेच आत्महत्या ही सुद्धा पुन्हा पुन्हा येणारी थीम आहे. आणि हेमिंग्वेनी स्वतः आत्महत्या केली असल्यामुळे कदाचित त्याबद्दल त्याचे आधीच काही विचार असतील असे वाटते आहे. कारण पुस्तकात पुन्हा पुन्हा "छळ होऊ नये" म्हणून आत्महत्या केलेल्या लोकांचे संदर्भ येतात.

>>>>आणि तरी त्याला मारिया भेटल्यावर जगायची आस पुन्हा येते.

मारिया भेटल्यावर रॉबर्टला जगावेसे वाटते हे बारोबर आहे. पण मारिया या पात्राची हाताळणी अगदीच सेक्सिस्ट आहे. जर स्पेन मध्ये पिलार असू शकते, तर रॉबर्टच्या प्रेमात पडणारी मारिया ही अगदीच डोरमॅट केल्याचे खटकते. पण ते मी स्त्री असल्यामुळे असू शकेल. एकूणच मला या असल्या पुस्तकांमधले स्त्रियांचे सपोर्टींग रोल आवडत नाहीत. त्यामुळे तो माझा बायस असू शकतो.
असेच जॅक केरूआक चे ऑन द रोड मला भावले आणि खटकले होते. कारण त्यातही स्त्री ही पुरुषाला बांधून ठेवणारी आणि त्याच्या स्वच्छंद वगैरे आयुष्यात स्पीड ब्रेकर निर्माण करणारी म्हणून रेखाटली आहे.

हेमिंग्वेने एका पत्रात लिहीलेले पुढील वाक्य मार्मिक आहे:

'मला जे काही यश लेखक म्हणून मिळाले त्याचे कारण म्हणजे मला नीट माहीत असलेल्या विषयांबद्दलच मी लिहीले'.

प्रत्येक लेखकाने मनन करावे असे वाक्य आहे हे.

आणि हेमिंग्वेची आवर्जून वाचण्यासारखी अजून कोणती पुस्तके आहेत तेही वाचायला आवडेल. >>

१. फेअरवेल टू आर्म्स
२. द सन अल्सो राइजेस
३. फादर्स अ‍ॅण्ड सन्स
४. फॉर हूम
५. ग्रीन हिल्स ऑफ अफ्रिका
६. द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी
७. लिस्टचा कंटाळा आला. सर्वच !! पण वरची एकदम जबरी आहेत.