मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय करावे लागते?

Submitted by सचिन काळे on 25 December, 2016 - 03:30

नमस्कार, मी सचिन काळे. एक नवलेखक! वास्तविक एवढी वर्षे माझा साहित्यलेखनाशी कधी संबंध आला नव्हता. हो! शाळेत बालपणी तेवढे 'मी मोठेपणी शिक्षक/पंतप्रधान/वैज्ञानिक झालो तर!!!' छाप निबंध लिहिल्याचे तेवढे आठवते. आणि त्या निबंधात मी तोडलेले तारे, शिक्षकांच्या डोळ्यांपुढे चमकल्याचे अजूनही आठवते. तसेच, अजून एकदा एका छोकरीला पत्रलेखन करण्याचा माझा प्रयत्न त्या मुलीच्या बापाने हाणून पाडून माझ्यातल्या लेखकाचा/कवीचा अंत केला होता. ज्याचा दुर्दैवी परिणाम एवढे दिवस आपल्यासारख्या साहित्यरसिकांना माझ्याकडून भविष्यात होऊ शकणाऱ्या साहित्यरचनेपासून दूर ठेवण्यात झाला. असो!

तर सांगायचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वर्षांच्या कालखंडानंतर माझ्या साहित्यरचनेच्या प्रसववेदना पुन्हा सुरु झाल्या आहेत. नुकतेच माझ्याकडून प्रसूत झालेले दोन-चार लेख मी माबोकरांसमोर ठेवले. आणि ते आवडल्याचेही आपण प्रतिक्रिया देऊन कळविलेत.

आणि इथेच घात झाला कि हो!!! मला तर आता वाटायला लागलेय कि मी छान छान लेख पाडतोय. मी नवलेखक नाही तर आता लेखकच झालोय. विशेषतः 'श्री. प्रकाश घाटपांडे' यांनी माझ्या 'HORN - (NOT) OK - PLEASE' ह्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलेय कि "हा लेख कोणत्या तरी वर्तमानपत्रात छापून यायला हवा" अहो!, आता हीच 'हवा' माझ्या डोक्यात शिरलीय ना!!!

मलाही आता वाटायला लागलेय, कि माझेही लेख वर्तमानपत्रात, मासिकांत छापून यायला हवेत. हजारो नाही, लाखों लोकांनी ते वाचावेत. वेगवेगळ्या साहित्यस्पर्धांत त्या लेखांना प्रथम पारितोषिक मिळावे. एखादा 'बुकर', 'नोबल' नको पण गेलाबाजार राज्यशासनाच्या पुरस्काराकरिता तरी माझ्या लेखांचा विचार व्हावा. माझ्या लेखांनी लोकांचे मतपरिवर्तन व्हावे. जगाला बदलून टाकावे.

पण इथेच तर माझं घोडं पेंढ खातंय ना! आमचा उभा जन्म गेला खालमानेने खर्डेघाशी करण्यात. हे साहित्यविश्व मला नवे आहे. आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर कसे आणावे? मासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्याकरिता काय आणि कसे प्रयत्न करावेत? याची मला काहीच कल्पना नाही. म्हणून मी मायबाप मायबोलीकरांसमोर माझी झोळी पसरून आलोय. कृपया माझ्या झोळीत पुढील माहिती टाकावी.

वर्तमानपत्रांत/मासिकांत/स्पर्धेत आपले लेख कसे छापून आणावेत? त्यांच्याशी संपर्क कसा करावा? त्यांच्या कार्यालयात आपणांस खेटा घालाव्या लागतात का? त्यांच्याशी ओळखी काढाव्या लागतात का? त्यांना आपले लेखनसाहित्य कशा स्वरूपात पाठवावे लागते? लिखित, छापील कि इमेलद्वारे? साहित्य पाठवताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी? साहित्य छापून आणायच्या व्यवहारात कोणती आणि कशी फसवेगिरी होण्याची शक्यता असते? काही मानधन वगैरे मिळते का? कोणत्या प्रकारे मिळते? कि नुसत्याच लष्करी भाकऱ्या भाजाव्या लागतात?

तूर्त एवढेच प्रश्न मी लिहिलेत. पण मला जसे अजून प्रश्न पडतील तसे मी इथे लिहीन. आणि मला खात्री आहे कि समस्त मायबोलीकर हे प्रश्न सोडवायला मला नक्कीच मदत करतील. हो, ना!!?

ता. क. - सद्या तरी माझ्या साहित्यलेखनाच्या प्रसिद्धीकरीता मी माझा www.sachinkale763.blogspot.com नावाचा एक 'ब्लॉग' चालू केलाय. कृपया, मला जमलाय का ते कळवावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक लेख ईमेलने लोकसत्तेच्या हास्यरंग पुरवणीकरता पाठवला होता.
एका रविवारी सकाळी सुखद धक्का बसला. त्यानंतर काही आठवड्यांनी मानधनाचा धनादेश आला होता.

हे सगळं कोणाच्याही ओळखीशिवाय, कुठे खेटे न घालता.

जागू, मनीमोहोर यांचेही लेख लोकसत्तेच्या पुरवण्यांत प्रकाशित झालेत.

@ भरत., लेख पाठवण्यापूर्वी तो कुठेही प्रसिद्ध झालेला नसावा, अशी काही अट असते का? इमेलने पाठविलेला लेख आपणच लिहिलाय, कॉपी पेस्ट किंवा फॉर्वर्डेड नाही हे आपण कसे सिद्ध करू शकतो? वृत्तपत्राने मागीतलेला नसताना, आपण लेख पाठवून दिला तर चालतो का? इमेलमध्ये मी माझ्या ब्लॉगची लिंक पाठवून दिली तर चालेल का? म्हणजे त्यांना आवडेल तो लेख ते उचलू शकतील. असे करणे योग्य आहे का?

तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !!

काही दिवसांनी " वृत्तपत्र / मासिकांचे संपादक आणि प्रकाशकांना टाळण्यासाठी काय करावे लागते " असा धागा काढण्याची पाळी तुमच्यावर येवो.

काही दिवसांनी " वृत्तपत्र / मासिकांचे संपादक आणि प्रकाशकांना टाळण्यासाठी काय करावे लागते " असा धागा काढण्याची पाळी तुमच्यावर येवो.>>> अरे व्वा: !!! ऐसा भी होता है!!? Rofl

सचिन काळे,
सर्वप्रथम अभिनंदन. तुम्ही लिहायला सुरुवात केल्याबद्दल. वृत्तपत्रात लेख छापून येणे ही नवलेखकांसाठी अतिशय समाधानाची आणि लिखाणास प्रवृत्त करणारी बाब आहे. वर्तमानपत्रात लेख छापून येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला लेख छापून यावा असे वाटणारया दैनिकाच्या कार्यालयात जाऊन या. संपादकांशी, उपसंपादकांशी ओळख करून तुमच्या लिखाणाबद्दल त्यांना कल्पना द्या. त्यानंतर तुम्ही ज्या पध्दतीचं लिखाण केलं आहे, अशा पुरवणीसाठी ते सांगतील त्या किंवा तुम्हीला आवश्यक त्या पध्दतीने तुम्ही लेख देऊ शकता. पूर्वी लेख कागदावर सुवाच्च्य (?) अक्षरात लिहून पाठवावे लागायचे. पण आता बहुतेक पेप्रांमध्ये ऑपरेटर नसल्यामुळे तुम्ही शक्यतो युनिकोडमध्ये लेख टाइप करून ई मेलवर ओपन फाइलमध्ये पाठवलात तर तो छापून यायची शक्यता वाढते. त्याचे कारण, हाताने लिहिलेला लेख टाइप करणे, त्यातील करेक्‍शन्स करणे हे सगळं करण्यापेक्षा उपसंपादकांना असा तयार लेख एडिट करणे सोपे पडते. पेपरमध्ये ओळख नसली तरी लेख छापून येण्यास अडचण नाही, पण हल्ली इंटरनेटमुळे तयार मजकूर उचलून आपल्या नावे खपविण्याचे प्रकार वाढल्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून येणार्या मजकुरावर विश्वास ठेवणे कठीण असते. त्यामुळे आधी ओळख करून घ्यावी. त्याचा तुम्हाला पुढे नक्कीच फायदा होईल. तुमच्या लिखाणासाठी शुभेच्छा!!

@ टोच्या, आपण पुरविलेल्या मौलिक माहितीबद्दल आणि आपण मला देत असलेल्या प्रोत्साहनाकरीता धन्यवाद.

शक्यतो युनिकोडमध्ये लेख टाइप करून ई मेलवर ओपन फाइलमध्ये पाठवलात>>> युनिकोड म्हणजे मराठीतच ना?

त्यानंतर काही आठवड्यांनी मानधनाचा धनादेश आला होता. >>> मानधन मिळतं ?
लोकसत्तात दोनदा लेख छापून आले होते. एकदा वृत्तांत पुरवणीत 'मि. अँड मिसेस अय्यर' चित्रपटावरचा लेख आणि एकदा चतुरंगमध्ये लेख. दुसर्‍यांदा बहुधा मेलमधून पाठवला होता पण पहिल्यांदा लोकसत्ताच्या कार्यालयात जाऊन तिथल्या एका सहाय्यक संपादंकांच्या हातात दिला होता. मानधन दोन्ही वेळा मिळालं नव्हतं.
प्रत्येक शाळेला रविवारचं बालरंग पुरवणीचं पान लिहायला द्यायची छान कल्पना अनेक वर्षांपूर्वी राबवली गेली होती. त्यात कविता छापून आली होती. त्याआधी चौथीत असतानाही एकदा कविता आली होती पण तेव्हाही नव्हतं मिळालं. अर्थात सगळा हौशीचाच मामला असल्याने कधी अपेक्षाही नव्हती केली. शिवाय माझी खरंच अशी समजूत होती की नेमलेले पत्रकार, कॉलमिस्ट्स किंवा वृत्तपत्राने विनंती करुन लिहून घेतलेल्या लेखांनाच मानधन मिळतं !!

आवडलं.
मी जरी लेख पाठवला नाही अजूनपर्यंत तरी माझ्या मित्रांनी, ओळखीच्या लोकांनी पाठवलेले लेख पेपरात आले आहेत.
१)विषयाची निवड: पेपर हे बय्राच वाचकांपर्यत पोहेचणारं माध्यम असल्याने असे विषय शोधा की ज्यांबद्दल त्यांना वाचायला आवडेल.
२) समयसूचक: तो विषय आगामी आठवड्यात महत्त्वाचा ठरणार आहे.
३)समर्पक चित्र: शक्यतो दोन पाठवा. एकच घेतील पण स्वत:चे असावे. चित्रामुळे मानधन वाढते.
४) शब्दसंख्या : पाव /अर्ध पान भरेल इतके.
५) शुद्ध लेखन हवेच.
६) राजकीय, समाज,गटावर दोषारोप नकोच.
७) अतितांत्रिक,गणिती नको.

सचिन, प्रत्येक प्रकाशनाच्या वेगवेगळ्या अटी असाव्यात. मी आणि वर ज्यांचे उल्लेख केलेत त्यांनी मायबोलीवर प्रकाशित झालेलं लेखनच पाठवलेलं.
अगो, हो मला तरी मानधनाचा चेक आला होता. लेख सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाला. मानधनाचा चेक डिसेंबरात आलेला.

मला पण लिहायचेय मसिकात.......छोटच स्वप्न आहे, सुरुवात फेसबुक वर स्वत च्या पेज वरुन केलिये..ब्लोग पण तयार केलाय..

http://vrundavani.blogspot.in/

प्लीज व्हिजिट करा आणि अभिप्राय पण द्या.. Happy

>>माझा एक लेख ईमेलने लोकसत्तेच्या हास्यरंग पुरवणीकरता पाठवला होता.<<

आय्ला मयेकर, लोकसत्तेला विनोदि लेख आणि माबोला सापत्नभाव? धिस इज नाॅट डन, लोकसत्तेची लिंक द्या... Happy

कधी कधी इमेल हा स्पॅम मधे जातो. संपादकीय टेबल पहाणार्‍याला ते लक्षात पण येत नाही. फोन करुनही खात्री करावी.

तावडे, तुम्ही नेहमीच सिलेक्टिव्ह वाचता हो. पुढले प्रतिसाद वाचले असतेत तर...

आजकाल फेसबुक हे अनेक संपादक आणि माध्यमांमधल्या कळीच्या लोकांसाठी रिक्रुटिंग चे महत्वाचे स्थान बनले आहे . फेसबुकवर सातत्याने चांगले लिखाण करणाऱ्या लोकांना मुख्य माध्यमांमध्ये लिहिण्याची संधी मिळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे . माध्यमातल्या महत्वाच्या लोकांना फेसबुकवर ऍड करा आणि सातत्याने फेबु वर लिखाण करा असा सल्ला देईल

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!! आपण सर्वच फार छान माहिती पुरवीत आहात. आमच्यासारख्या नवलेखकांना आपल्यासारख्या अनुभवी लोकांचा निश्चितच आधार वाटतोय.

वर्तमान पत्राच्या सदराखाली इमेल अ‍ॅडरेस दिलेले असतात. त्यावर मेल करायचे.
आधी पूर्वप्रकाशीत टाकू नका. पेपरमधे प्रकाशीत झाल्यानंतर इतर ठिकाणी टाकलेत तर चालते.
सगळेच लेख घेतात असे नाही. त्यांच्या विषयाच्या चौकटीत बसणारे व लिखाणा नुसार लेख निवडले जातात.

@ जागू, आधी पूर्वप्रकाशीत टाकू नका. पेपरमधे प्रकाशीत झाल्यानंतर इतर ठिकाणी टाकलेत तर चालते.>>> माबोवर, फेसबुकवर आणि आपल्या ब्लॉगवर प्रकाशित लेखांना पूर्वप्रकाशित म्हणता येईल का?

हो.

फेसबुक, व्हॉट्स अॅप, कुठल्याही ऑनलाइन पोर्टल, मासिके यात एकदा प्रसिध्द झालेले लेख पेपरला देऊ नका. प्रसिध्द होण्यापूर्वी लक्षात नाही आलं तर लेख प्रसिध्द झाल्यानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

अगो माझ्या मते मानधन मिळत . कारण मला मिळालं होत Wink
मानधन अगदी व्यवस्थित पुरेसं होत. त्यानंतर सुमेधा वडावाला यांनी एकदा फोन करून काही तरी लिहून पाठवा असं सांगितलं होत यॊग्य ते मानधन देऊ असंही सांगितलं होत पण मलाच माझ्या वैयक्तिक कारणामुळे लिहून द्यायला जमलं नव्हतं Happy

आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर यावे ही तुमची गरज आहे. त्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करायचे सोडून तुम्हाला मानधन हवंय?

आपले लेखनसाहित्य चार लोकांसमोर यावे ही तुमची गरज आहे. त्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करायचे सोडून तुम्हाला मानधन हवंय?
>>>>
यावरून तो गर्ल्स हॉस्टेलमध्ये चौकीदार म्हणून कामाला लागलेल्या मुलाचा जोक आठवला .... हायला पगार पण मिळणार Happy

बाकी धागा वाचतोय. एखाद्या संपादकाचा जावई होण्यासारखा सोपा उपाय सुचवायचा सोडून लोकं भलभलते क्लिष्ट सल्ले का देत आहेत समजत नाही..

सपनाजी काय झाले?
एखाद्या शांत निवांत रविवारच्या दुपारी एक ते चार झोपेच्या वेळेत, जेवण झाल्याझाल्या वामकुक्षी घेता देता, रवंथ करता भरता जवळच्या टेबलावर पडलेले वृत्तपत्र उचलावे, मुख्य बातम्या सकाळीच वाचून झाल्या असल्याने थेट पुरवणीत हात घालावा आणि पहिल्याच पानावर ऋन्मेषचा लेख बघून पोटात पार ढवळून यावे आणि एक ते चार ही झोपेची मौल्यवान वेळ उचक्या आणि ढेकर देण्यातच वाया जावी असे काही वाटले का Happy

गंमत केली हो, धागा सहज वाचतोय. वृत्तपत्रात काही छापून यावे ईतकी माझ्यात लेखन प्रतिभा नाही. निदान आजच्या तारखेला तरी..

उद्या वृत्तपत्रांचा दर्जा घसरला तर छापूनही येईल काही बाही Happy

Pages