पडद्यामागे...

Submitted by मृण्मयी on 25 October, 2007 - 11:58

"आ
ज गॅदरींगची मिटींग आहे हं शाळा सुटल्यावर. टीचर्स रुम मधे आहे. विसरु नकोस यायला." साने बाईंनी आठवण करून दिली कॉरिडोरमधे भेटल्यावर. "उशीर नको करुस. नाहीतर सासूबाई नाराज होतात!"
सासूबाई म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका, सोनाळकर बाई. अगदी खाष्ट सासूच्या वरताण!
शाळेत नुकतीच जॉईन झाले होते. आल्या आल्या सलामीलाच सासूबाईंचे दणके खाऊन चुकले होते. तेव्हा पुढल्या चुका टाळणं भाग होतं. मनातल्या मनात सानेबाईंचे आभार मानून घाई घाईत पुढल्या तासाला गेले. शाळेतलं पहिलंच स्नेहसंमेलन माझ्यासाठी! भरपूर कामं करायची तयारी मनात ठेवून शिकवायला सुरवात केली. मुलींच्या कानावर बहुदा तारखा गेल्या असाव्यात. एकीचं अभ्यासात लक्ष असेल तर शपथ!
"बाई, मस्त तीन अंकी नाटक बसवू गेल्या वर्षीसारखं!"
"बाई, कांचन छान मोराचा 'डॅन्स' करते."
"बाई, आम्ही 'डोला रे डोला' करणार आहोत."
"ए गप गं. सिनेमाच्या गाण्यावर कुठे नाचू देतात का सोनाळकर बाई?"
गलका वाढतच होता.

शाळा सुटल्यावर लागलीच टीचर्स रुम गाठली. शेवटाचा तास ऑफ असलेले बारटक्के सर, पोतनीस बाई आणि भालेराव बाई आधीच येऊन बसले होते.
"काय भिसेबाई, कशी वाटतेय शाळा?" बारटक्क्यांनी विचारलं
"चांगलीच आहे हो! आवडतंय शिकवायला. तुम्ही सगळेजण असल्यावर फारसं नवखेपण वाटत नाहीये बघा."
"इतक्यात आमच्या प्रेमात पडू नकोस नेत्रा! आजची मिटींग होऊ दे. मग बघू!" भालेराव बाई डोळे मिचकावत म्हणाल्या.
हळूहळू इतर मंडळी जमली आणि सोनाळकर बाईंच्या आगमनानंतर सारं कसं शांत शांत झालं.
"तर सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मुख्य मुद्दयाकडे वळूयात." सोनाळकर बाईंचा दणदणीत आवाज उमटला. "उद्घाटनाचे पाहुणे ठरलेत. त्यांच्या सोयीनुसार तारखा पण ठरल्याच आहेत. स्वागत समिती, भोजन समिती, क्रीडा समिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं खातं संभाळणारे शिक्षक हवेत. आपापसात ठरवून घ्या. मला नावं द्या लवकरात लवकर."
बाईंचं बोलणं होतं न होतं तेवढ्यात एक लांबलचक कागद त्यांच्यापुढे आला.
"अरे वा! बराच एफिशिअंट झालेला दिसतोय शिक्षक वर्ग! कमिट्या तयार! ह्यात ज्यांची नावं नाहीत त्यांनी लवकरात लवकर घाला. आणि फायनल लिस्ट द्या मला उद्या सकाळपर्यंत!" दोन मिनिटात मिटींग बरखास्त!
"नेत्रा, हं, तुझं नाव घाल तुला कुठे हवंय तिथे." भालेराव बाईंनी माझ्या हातात कागद दिला.
सगळ्या कमिट्या फुल्ल! पण सांस्कृतिक खात्यात एक नाव नाही! जरा विचित्र वाटलं खरं. पण माझ्या मुलींचे चेहरे आठवले, "बाई नाच, बाई नाटक.." आणि मागचा पुढचा विचार न करता मी निमूटपणे त्या सांस्कृतिक खात्यापुढल्या रिकाम्या रकान्यात नाव लिहिलं.. "नेत्रा भिसे".

दुसर्‍या दिवशी कागद सोनाळकर बाईंकडे गेल्यावर माझ्याबरोबर आणखी एक नाव दिसलं. महिन्याभरात रिटायर होणार्‍या भोसलेबाईंचं!
"काही लागलं सवरलं तर सांग हं. तशी मी सुट्टीवर आहे पुढले तीन आठवडे."
मग नेमकं कशासाठी ह्यांनी यादीत नाव घातलंय हे न समजून मी निमूटपणे कामाला सुरुवात केली. शाळेचं दरवर्षी गाजणारं तीन अंकी नाटक, नाच, एकांकीका, एकपात्री सगळ्यांची एकेक झलक बघायची, त्यातून मग सिलेक्शन आणि मग फायनल प्रोग्राम असं ठरलेलं.

आज सिलेक्शन कमिटीत चार शिक्षकांना आणि चार विद्यार्थिनींना आणून बसवलं. मुलींचा उत्साह उतू चालला होता. पण माझे सहकर्मचारी सोनाळकर बाईंनी शाळेअखेर घेतलेली मिटींग लांबल्यावर होणारे चेहरे करून बसले होते.
"अगं रतन, 'मी सोडून सारी लाज' वर नाच करणार म्हणतेस तू?" मी दचकून विचारलं.
"मग काय झालं? लावणीत एवढं दचकण्यासारखं काय हो बाई? महाराष्ट्राची लोककला आहे ती".. पासून सुरुवात होऊन "दुसर्‍या काही गाण्यावर बसव गं बाई, हात जोडते तुला" पर्यंत पाळी आली. जवळपास अर्धेअधिक नाच, एकपात्री म्हणजे निव्वळ आचरटपणा! नकार दिल्यावर मग रडारड, हुंदके, समजुती घालण्यात उरलेला दिवस गेला. त्यातल्या त्यात मनासारखे कार्यक्रम सिलेक्ट झाल्यावर एक पक्की यादी झाली आणि मी तात्पुरता सुटकेचा श्वास सोडला. एव्हाना इतर कमिट्यांतली मंडळी 'एकमेका सहाय्य करुन' सुपंथी लागलेली.

महिन्याभराच्या तयारीत असंख्य भानगडी!
"बाई, साठे बाई म्हणताहेत, माझ्या तासाला गुपचूप वर्गात बसा. काही नाच गाण्याला जायला नको."
"नाटकाच्या प्रॉपर्टीची लिस्ट बारटक्के सरांकडे दिली ती त्यांनी हरवली. आता काय करायचं?"
"तावडेला हिरॉईन केलं. आता इतक्या दिवसांच्या प्रॅक्टिस नंतर तिला उजाडलंय, तिचं नेमकं गॅदरींगच्या दिवसात बडोद्याला जायचं रिझर्वेशन झाल्याचं! घरात लग्न आहे म्हणे. आता कोणाला घ्यायचं?"

ह्या असल्या अगणित भानगडी निस्तरत शेवटी गॅदरींगचा आठवडा उजाडला. एव्हाना "सांस्कृतिक खात्यात नाव न घालण्याचा' इतर शिक्षकांचा सूज्ञपणा पटू लागला होता. पण मी अशी हिंमत हारणारी नव्हे. 'सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सुरेख कार्यक्रम करून दाखवीन तरच नावाची नेत्रा भिसे' वगैरे छाप विचार मनात यायला लागले होते. अखेर उद्घाटनाचा सोहळा पार पडून 'आमचा' दिवस उजाडला!

सकाळी सातापासून नाच, नाटकातल्या मुलींना बोलवून घेतलं. होमसायन्स लॅब ही ग्रीन रूम झालेली. चार दोन 'मेक अप आर्टिस्ट', दोन चार आया मुलींच्या साड्या अन कपडे बदलण्यात मदतीला.. तयारी जोरदार सुरू होती. समोरच फळ्यावर सगळे कार्यक्रम क्रमवार लिहून ठेवलेले. नवाला पहिला कार्यक्रम सुरू. विद्यार्थिनी, शिक्षक मिळून मांडव गच्च भरलेला. सगळं सुरळीत पार पडणार हे मनात घोकत असतानाच कानावर आदळलं,
"अगं तू 'हिमगौरी' झालेला नाच आधी आहे ना? मग गाढवे आत्तापासून अंगाला, तोंडाला काळं फासून 'विठोबा' कशाला होऊन बसलीस? भिसे बाई जरा बघा हो!" विठोबा बिचारा ऑलरेडी रडायच्या तयारीत! बाकी सगळे आपल्या व्यापात. मी हातातलं काम बाजूला टाकून तो विठोबाचा कार्यक्रम आधी करता येतो का ते बघायला गेले. पण त्यातल्या इतर मुलींचे बाकी नाच, नाटक. तेव्हा विठोबाला बेसिनकडे नेऊन तोंड धुवून देण्यापलीकडे पर्याय नव्हता.

तेवढं उरकून आले तर समोर तुंबळ युध्द सुरु! पाचवीतल्या 'मयूरनृत्यांगना' कुठल्याश्या कारणानं भांडून एकमेकींची पिसं ओरबाडत होत्या. खोलीतली इतर मोठी मंडळी आपापल्या कामात मग्न (असल्याचं दाखवत तरी) होती. ते सोडवण्यात आणि पिसं जागी खोचण्यात काही मिनिटं गेली.

एव्हाना बाहेर स्टेजवर कार्यक्रम सुरू झाला होता. तिथे घडणार्‍या भानगडी तर विचारात घ्यायला वेळही झाला नाही. बॅकस्टेजचं रण सांभाळण्यात इतर गोष्टींचा विचार कुठला! जरा कुठे मागे निवांत झालं म्हणून विंगेकडे डोकवायला निघाले तर तळलेल्या पदार्थांचा घमघमाट एका कोपर्‍यातून आला. मुलींना भुका लागल्या असतील असं वाटलं. बघते तर काय, कार्यक्रमाच्या शेवटी असलेल्या तीन अंकी नाटकाच्या 'प्रॉपर्टीचा' भाग असलेल्या पुडाच्या वड्या आणि सरबतावर काही 'कोळी' आणि 'कोळणी' तुटून पडलेले!
"अगं हे काय खायला बसलात? कुठे मिळाल्या वड्या?"
"बाई, हिच्या आईनी सांगितलं, नाचातल्या सगळ्यांसाठी डबा आणलाय म्हणून. ह्या कोपर्‍याकडे बोट दाखवलं. आम्हाला वाटलं हाच तो डबा!"
डब्याच्या तळाशी एक जळकी वडी तेवढी उरली होती. चिडून उपयोग नव्हता. आता कोणालातरी बाजारात पाठवणं आलं!
दुपारपर्यंत माझी बॅटरी अर्धी संपलेली! पुढले चार तास कठीण होते. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून उरलेली वडी मी तोंडात टाकली. ग्लासभर पाणी प्यायले. जरा हुशारी आली.

स्टेजवरचे कार्यक्रम ठीकठाक पार पडत असावे. हशे, टाळ्या नियमित ऐकू येत होत्या. उरलेल्या आयटम्सची यादी हातात घेऊन मी मुलींना तयार करून स्टेजवर पाठवायला लागले.
"बाई, मळमळतंय!" 'आज गोकुळात रंग" मधली गोपी.
"बाई, मला पण." श्रीकृष्ण!
"का गं काय झालं? डबा आणला होता का? भुकेनी गरगरतंय का?" मी विचारलं.
"बाई ह्या दोघींनी किनै वृंदावनातल्या झाडाचा पाला खाल्ला!"
"म्हणजे तुळस?" माझा प्रश्न.
"नाही बाई, ती कुंडीतली मोठ्ठी झाडं ठेवायची आहेत नं स्टेजवर, कृष्णाचं वृंदावन करायला, त्याची पानं खाल्ली. पैज म्हणून!.." 'आज गोकुळात' हा नाच! त्यासाठी कृष्णाचं 'वृंदावन'!! काय नी काय!! मला काही समजेनासं झालं. आणि तेवढ्यात स्टेजमागे, मळमळणार्‍या गोपी-कृष्णानी सफाई कर्मचार्‍यांचं काम वाढवून ठेवलं! मी डॉक्टर शोधायच्या तयारीला लागले. आता कान्हाच नाही म्हणल्यावर नाच कॅन्सल करण्याची पाळी आली. आणि 'कुठल्या दुर्दैवी क्षणी मी ह्या सांस्कृतिक खात्यात नाव घातलं' म्हणून मी कपाळावर हात मारला!

त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे सोनाळकर बाईंनी जाता येता "छान चाललेत हो कार्यक्रम! चांगलं मेहेनतीचं काम केलंत भिसेबाई!" असा शेरा दिला. पण आता ह्या क्षणी मी ढगावर तरंगण्यापलिकडे गेले होते.

***

आणखी काही तासात थोड्याफार गोंधळासकट कार्यक्रम पार पडला. मी अगदी "हुश्श" केलं. मागून 'गोपीच्या आईनी' येऊन विचारलं,
"भिसे बाई, आज तर नाच झाला नाही मुलींचा. पण परवा पालकांसाठी तिकीट लावून जो आजचा प्रोग्राम रिपीट होणारेय, त्यात करणार नं हा नाच?"

माझ्या डोळ्यापुढे फक्त अंधारी यायची बाकी होतं. स्टेजमागचे सगळे सावळे गोंधळ आटोपताना मला परवा हाच धिंगाणा नव्या दमानं पालकांसाठी करायचाय ह्याचा चक्क विसर पडला होता.
'देवा, तूच रे बाबा!' मी मनोमन हात जोडले.

एवढ्यात साने बाई येताना दिसल्या. बरोबर आणखी कुणीतरी होतं.
"भिसे बाई, ह्यांना भेटा, ह्या सावंत बाई. भोसले बाईंच्या जागी येणार आहेत. म्हणून गॅदरिंगला पण आवर्जून बोलवलंय ह्यांना! म्हणजे पुढल्या वर्षीसाठी ह्यांना पण कल्पना येईल!"
मी मनातल्यामनात खुदकन हसले. देव इतक्या पटकन पावतो म्हणता?

-मृण्मयी

विशेषांक लेखन: