अंतिम सत्य ___ ८२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 December, 2016 - 16:31

साधारण पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सोमवारची सकाळ. रविवारचा हॅंगओवर उतरायला तयार नव्हता. ऑफिसला जायचे की नाही या विचारांत बिछान्यातच लोळत पडलो होतो. जसा दिवस चढत होता तसे ऑफिसला जायचा उत्साह अजून मावळत होता. ऑफिसमध्ये फारसे महत्वाचे काम नव्हते. गेलेच पाहिजे असे गरजेचे नव्हते. सुट्ट्या देखील बर्‍याच शिल्लक होत्या. थोडक्यात चादर झटकून उठण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज होती. ईतक्यात अलार्म वाजल्यासारखा फोन खणखणला. रात्री अवेळी वाजलेल्या फोनपेक्षा भल्या सकाळी वाजलेला फोन मला जास्त धडकी भरवतो. कारण तो फोन ऑफिसचा असण्याची शक्यता असते. काहीतरी अर्जंट काम निघाले असणार. अजून कुठे कडमडला आहेस म्हणून विचारणा होणार. पण हा फोन त्यापेक्षा वाईट होता. खरेच वाईट होता..

"हेल्लो रिशी, मी विशाल बोलतोय.. अरे यार एक वाईट बातमी आहे. आपला योग्या गेला...."

थोड्यावेळासाठी मी शांत झालो...
योग्या गेला म्हणून मला काय बोलावे हे सुचत नव्हते अश्यातला भाग नाही. तर कोण हा योग्या हे चटकन आठवायला मागत नव्हते. डोळ्यावर अर्धवट झोप अश्या अवस्थेत, समोरून कोण विशाल बोलतोय हे समजायलाच दिड मिनिट जावे लागले.

"हेल्लो, ऑफिसला आहेस का? बघ जमलं तर अ‍ॅटलास मिल कंपांऊंडला जमतोय आम्ही सर्व.. येणार असशील तर कॉल कर.. आणि विक्याचा नंबर आहे का रे तुझ्याकडे, आपला तंबाखू..?"

"ह्मम, करतो मी तुला मेसेज.. नाहीतर थांब, मीच करतो त्याला कॉल, बघतो तो कुठेय" ... हळूहळू मला टोटल लागत होती. योग्या, विशाल, विक्या.. आणि अ‍ॅटलास मिल कंपाऊंड! सारी जुन्या बिल्डींगमधली, आमच्या गिरणगावची पोरं. आमचा क्रिकेटचा ग्रूप!

हा योग्या मात्र आमच्या बिल्डींगमधला नव्हता. तो जवळच्या अ‍ॅटलास मिल शेजारच्या क्वार्टरमध्ये राहायचा. त्याचे वडील तिथले वॉचमन होते. आईसुद्धा त्याच मिलमध्ये कुठल्यातरी मशीनवर काम करायची. परीस्थिती आमच्यापेक्षा बेताची. पण आम्ही शोधून हा हिरा काढला होता. अभ्यासात जेमतेमच. पण क्रिकेटमध्ये एक नंबर. बारा ओवरचा सामना, हा ओपनिंगला येत त्यातल्या आठ-दहा ओवर एकटा खेळून जायचा. म्हटलं तर माझ्याच टीममधील माझा एक स्पर्धक. माझी स्वत:ची फलंदाजी चांगली असली तरी त्याच्यामुळे मी झाकाळलो जायचो. यामुळेच मनात एक असूया. पण ती कधी मैत्रीच्या वरचढ झाली नव्हती. एका ताटात पावभाजी खाताना, एका बाटलीतले पाणी पिताना, आम्ही तेवढेच एक होतो जेवढे टीमसाठी एखादा रन घेताना दोघे एकजुटीने धावायचो.

पण तरीही एक शल्य कायम होतेच. कधी एखाद्या बाहेरच्याने तुमच्यातला बेस्ट बॅटसमन कोण हे विचारले असता त्याचेच नाव घेतले जायचे.
जर तो आमच्यात नसता, तर ते माझे घेतले गेले असते.

पुढे शिक्षण संपले, तसे क्रिकेट संपले. दहा जणांचे दहा मार्ग झाले. जो तो आपल्या नोकरीधंद्याला लागला. ज्या मित्रांना भेटायचे निमित्त फक्त क्रिकेट होते ते भेटायचे बंद झाले. यामध्ये योग्याशीही संबंध दुरावला. कधीतरी एकदा भेटल्याचे अंधुकसे आठवते, पण बोलणे काही झाल्याचे आठवत नाही. तरी कधी जुन्या मित्रांचा कट्टा भरायचा, क्रिकेटच्या आठवणी निघायच्या, तेव्हा त्याचाही विषय निघायचा. त्याच्या बॅटींगचे कौतुक व्हायचे. पण आता कुठलाही त्रास मला व्हायचा नाही. कारण ते जग आता फार मागे सुटले होते. आज ज्या जगात मी वावरत होतो तिथे मी एक ईंजिनीअर होतो. योग्या देखील एका नावाजलेल्या बॅंकेत कामाला होता. पण याबाबत आता त्याच्याशी स्पर्धा नव्हतीच. आता स्पर्धेचे क्षेत्र बदलले होते. एखादा आपल्या ईंजिनीअरींग फिल्डमधील मित्र, आपल्यापेक्षा मोठ्या कंपनीत, आपल्यापेक्षा जास्त पगारावर कामाला लागला आहे, याचा हल्ली त्रास व्हायचा. क्रिकेटमधील ती तेव्हाची चढाओढ आता हास्यास्पद वाटू लागली होती. बालपणीच्या रम्य आठवणीचा एक हिस्सा म्हणून मजेशीर वाटू लागली होती. ‘लाईफ इझ नॉट जस्ट क्रिकेट’ हे सत्य जणू समजले होते.

मनात गोळा झालेले सारे विचार तसेच डोक्यात घोळवत मी अ‍ॅटलास मिल कंपाऊंड जवळ पोहोचलो. विशल्या, विक्या, अव्या, हेम्या, काका, बाबू, जवळपास अर्धी टीम तिथे जमली होती. अजून संत्या, मिल्या यायचे बाकी होते. जुनी बिल्डींग पडल्यानंतर कुठे कुठे दुरावलेले, सारे मित्र आज एकत्र जमले होते. पण भेटीचा जो प्रसंग असायला हवा होता, तसा तो नव्हता. कोण कुठे आहे आणि कोणाचे काय चालू आहे, या विषयांवर जुजबी बोलणे होत होते. कोण माझ्यासारखाच ईंजिनीअरच झाला होता, तर कोणी बॅंकेत कामाला लागला होता. कोण बापाचा व्यवसाय सांभाळत होता, तर कोणी आपली स्वत:ची प्रॅक्टीस सुरू केली होती. बिल्डींगमधल्या मुली सध्या काय कुठे आहेत हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते, पण अश्या प्रसंगी या विषयावर चर्चा करणे प्रशस्त वाटत नव्हते.

मधल्या काळात एक विशल्याच योग्याच्या संपर्कात असल्याने तोच त्याच्याबद्दल सांगत होता. काय झाले, कसे झाले. रोड अ‍ॅक्सिडंट, स्वत:चीच चुकी. बाईकवरचा कंट्रोल गेला, हेल्मेट नसल्याने ऑन द स्पॉट गेला. पार्श्वभूमीला त्याच्या नातेवाईकांची रडारड कानावर पडत होती. बायकांचा आक्रोश ऐकू येत होता. त्यातले आमच्या फारसे कोणी ओळखीचे नव्हते. आम्ही क्रिकेटच्या मैदानावरचे त्याचे जिगरी दोस्त असलो तरी त्यापलीकडे त्याच्या घरच्यांशी संबंध आमचे कोणाचेच नव्हते. त्यामुळे एक कोपरा पकडून सारे शांत उभे होतो. समोर बांधाबांध चालू होती. चिता रचली जात होती. आमच्याच वयाच्या, आमच्यातल्याच एकाची. आणि जगातले अंतिम सत्य उलगडल्यासारखे आम्ही काही न बोलता त्या सत्याचा स्विकार करत होतो.

अग्नी दिली जाणार तोच ऐनवेळी कोणीतरी एक बॅट त्या रचलेल्या चितेवर ठेवली. एक लाकडाचे फळकूट. त्या गडबडीतही ओळखीचे वाटले. आज आठ वर्षे तरी झाली असावीत त्या फळकूटाला पाहून. हलकेसे गलबलून आले. ईतक्यात कोणीतरी म्हणाले, त्याची लकी बॅट होती. वापरायचा नाही, पण प्रत्येक सामन्याला बरोबर न्यायचा. येत्या रविवारच्या सामन्यात देखील... आणि त्या सांगणार्‍याला हुंदका आवरला नाही.

म्हणजे?? आम्ही शॉकड ! अजून तो खेळत होता .. ??
मनात विचारांचे नुसते काहूर उठले.

ईतक्यात काहीतरी तडतडल्याचा आवाज आला. ती बॅट होती की त्याची कवटी, काही समजले नाही. पण आमच्याही आत कुठेतरी, काहीतरी तुटल्यासारखे झाले. कोणीतरी, काहीतरी, फार दूर निघून गेल्याची जाणीव होती ती..

अंतिम सत्याच्या पलीकडे काय असते याची कल्पना नाही, पण त्या अलीकडचे एक सत्य आम्हाला उमगले होते !

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप वाईट झालं .................

जन्माला आलेला प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस मातीत मिसळणार हे एक कटू सत्य आहे ,आणि प्रयेकालाच याचा सामना करावा लागणार.............................

छान लिहिले आहे..पु.ले.शु...! ! !

छान लिहिले आहे!!! आपण अमर असल्यासारखे जगत असतो, पण असे प्रसंग आपल्यला शाश्वत सत्याची जाणीव करून देतात.

@ ऋन्मेष, छान लिहिलंय. पण तुम्ही कवटी तडतडली असलं काही सिरीयस लिहू नका हो!! मग आम्हाला ते नेहमीचे ऋन्मेष वाटत नाहीत.