पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60903
मे १९११, बॉम्बे ब्रिटिश इंडिया
"द लॉर्ड इज माय शेफर्ड; आय शॉल नॉट वॉन्ट"
शेवटचे साम सुरू होते. अॅलेक्सिस आर्टोरिअस बिंगहॅम! भारतात त्याला ओळखणारे खूपच कमीजण होते. जोसेफला यानिमित्ताने अॅलेक्सीचे इंग्लंडमध्ये कोणीही नातेवाईक नसल्याची माहिती झाली. ख्रिसचेही कोणी नातेवाईक जिवंत नाहीत हे ऐकून विशेष नवल वाटले. ख्रिसच्या चेहरा निर्विकार होता.
"ही मेकथ मी टू लाय डाऊन इन ग्रीन पेश्चर्सः ही लीडथ मी बिसाईड द स्टिल वॉटर्स"
अॅलेक्सी शवपेटीत शांतपणे झोपला होता. कधीही तो उठून "वी डेस्परेटली नीड अ टी ऑन सच अ सनी डे" म्हणेल असे जोसेफला राहून राहून वाटत होते. दफनभूमिपासून समुद्र फार लांब नव्हता पण कधी नव्हे तो समुद्रही आज अगदी शांत होता. अॅलेक्सीची शवपेटी साधीशीच होती. पण त्यातही तो देखणा दिसत होता.
"ही रिस्टोरथ माय सोल: ही लीडथ मी इन द पाथ्स ऑफ राईटिअसनेस फॉर हिज नेम्स सेक"
ख्रिसचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता पण त्याला ती रात्र अजून आठवत होती जेव्हा अॅलेक्सी त्याला पहिल्यांदा अॅलेक्सी म्हणून भेटला होता. सर मॅक्सवेलना सुद्धा ती रात्र आठवत होती जेव्हा त्या आगीत अॅलेक्सीने ख्रिसला वाचवण्यासाठी उडी घेतली होती. ख्रिसमध्ये झालेला बदल त्यांनी जवळून पाहिला होता. अॅलेक्सीच्या जाण्याने ख्रिसइतके दु:ख कोणाला झाले नव्हते हेच खरे!
"यिआह्, दो आय वॉक थ्रू द व्हॅली ऑफ द शॅडो ऑफ डेथ, आय विल फिअर नो इव्हिल: फॉर दाऊ आर्ट विथ मी; दाय रॉड अॅन्ड दाय स्टाफ दे कम्फर्ट मी"
ख्रिस परतीच्या वाटेवर गप्प गप्पच होता. जोसेफला जेव्हा तो सापडला तेव्हा ख्रिस थरथरत होता. अॅलिस्टरचा हात तुटला असला तरी बाकी त्याला विशेष जखमा झाल्या नव्हत्या. त्याची मदत घेऊन जोसेफने वेळीच ख्रिसला शहरात आणले. अॅलेक्सी सुद्धा सापडला तेव्हा जिवंत होता परंतु गोळी त्याच्या कण्यात रुतून बसली होती. तो फार वेळ जगणार नाही हे स्पष्ट होते. सुदैवाने अॅलेक्सी बेशुद्धीतच असल्याने त्याला यातना झाल्या नाहीत.
"दाऊ प्रिपरेस्ट अ टेबल बिफोर मी इन द प्रेजेन्स ऑफ माईन एनेमीज: दाऊ अॅनॉईंटेस्ट माय हेड विथ ऑईल; माय कप रनथ ओवर"
ख्रिसने गाडीत जेवणासोबत आलेल्या पुडिंगला हातही लावला नाही. जोसेफने काही न बोलता ती वाटी परत पाठवली. त्याला ख्रिसची मनस्थिती समजू शकत होती. त्याही अवस्थेत ख्रिस आणखी कसला तरी विचार करत होता हेही त्याच्या नजरेतून सुटले नाही. जणू अॅलेक्सी रुपी झाकण आता निघाले होते आणि आतला पदार्थ कसा असेल हे कोणालाही नक्की माहित नव्हते. त्याने सर मॅक्सवेलकडे बघितले. कोणाला नाही तरी या म्हातार्याला कल्पना असलीच पाहिजे.
"शुअरली गुडनेस अॅन्ड मर्सी शॉल फॉलो मी ऑल द डेज ऑफ माय लाईफ: अॅन्ड आय विल ड्वेल इन द हाऊस ऑफ द लॉर्ड फॉर एव्हर"
शवपेटीचे झाकण अलगद लावण्यात आले. हळूच ती तिच्या निर्धारित ठिकाणी ठेवण्यात आली. हेडस्टोनवर फक्त अॅलेक्सीचे नाव आणि अ ब्रेव्ह मॅन एवढेच लिहिले होते. जोसेफने ख्रिसकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत साठलेले अश्रू अगदी हळू हळू गालावर ओघळत होते. त्याने ख्रिसच्या खांद्यावर हात ठेवला. दोघेही परत फिरले. अॅलेक्सी बिंगहॅम लेफ्ट द वर्ल्ड फॉर एव्हर. आमेन!!
~*~*~*~*~
जोसेफने ख्रिस सावरल्यावर त्याला अनेक प्रश्न विचारले. अॅलेक्सीचा मृत्यु कोणामुळे झाला यावर ख्रिसने मौन बाळगले. त्या सिंहासोबत कोण होते हेही त्याने सांगण्यास नकार दिला. जोसेफला फक्त रुद्रची आकृती दिसली होती. त्याला मनोमन हे ठाऊक होते कि सर्कसमध्ये त्या दिवशी भेटलेला आढ्यताखोर तरूणच त्या रात्री त्याचा सिंह घेऊन आला होता पण ख्रिस काही सांगत नसल्याने त्याच्यावर कसलाही आरोप लावणे शक्य नव्हते. त्यात अॅलिस्टरच्या साक्षीनुसार त्या तरूणामुळे अॅलिस्टरचा वाघापासून बचाव झाला होता हे सत्य नाकारता येत नव्हते. अखेर जोसेफने तो धागा तिथेच सोडला.
त्या रात्री तो तरूण वगळता एकूण पाच जणांशी त्यांचा सामना झाला होता. त्यापैकी डेव्हिड तर निसटला. फणींद्र व ड्रायव्हरही निसटले. सलीलने आत्महत्या केली. आता फक्त तो केबिन मध्ये लपलेला सलीलचा साथीदार उरला होता. अॅलेक्सीची गोळी त्याच्या दंडात घुसली होती. अॅलिस्टरने त्याच्याकडून माहिती काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण फार काही हाती लागले नाही. मग संशयितांची यादी बनवली गेली. आजूबाजूच्या गावांमध्ये धरपकड सत्र चालू झाले. कित्येकांना अटक झाली. त्यामध्ये एकजण सलीलशी संबंधित असल्याची त्याची खात्री पटली. त्याला तुरुंगात घेऊन अॅलिस्टरने हरप्रकारे त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. अखेर या सर्वाची परिणती त्या दोन्ही संशयितांना फाशीची शिक्षा सुनावण्यात झाली. तर अॅलिस्टरच्या हातात फक्त एवढीच माहिती पडली कि वर्षाअखेरीस बंडखोरांना जे काही अपेक्षित आहे ते साध्य होईल अशी अपेक्षा आहे.
ख्रिस व जोसेफ पुन्हा एकदा पुण्यात आले होते. अॅलिस्टरने त्यांच्या ताब्यात आपला रिपोर्ट दिला व ते दोघे बाहेर पडले. बग्गीत बसल्या बसल्या ख्रिस इतर काही फाईल्सवर नजर टाकत होता. जोसेफने न राहवून विचारले
"ख्रिस काय आहे त्या फाईल्स मध्ये? ही फणींद्रशी संबंधित फाईल नाहीये. "
"जोसेफ तुला आता सांगण्यात काही हरकत नाही. माझा तर्क असा आहे कि फणींद्रने बर्थोल्टचा खून नाही केला. त्याच्या खुनाचा या सर्कशीतल्या लोकांशी संबंध आहे."
"काय? पण का? बर्थोल्ट एक जर्मन अभ्यासक होता. योगायोगाने तो सर्कस बघायला गेला. किंबहुना फणींद्रने त्याची भेट सर्कशीत घ्यायची ठरवली. यात सर्कसच्या लोकांचा संबंध अगदीच नाममात्र आहे. मला मान्य आहे कि ती सर्कस जरा विचित्र आहे, खासकरून तो उद्धट तरूण तर मला अजिबात आवडत नाही. पण त्यांचा बर्थोल्टशी संबंध जोडणे जरा जास्त होतंय."
"ओके. आपण फणींद्रचा बर्थोल्टच्या खुनाशी संबंध जोडण्याचे कारण काय? फ्री हे त्याचे शब्द राईट? मला मान्य आहे कि फ्री वरून फ्रिस्क, फ्रील, फ्रीक, फ्रिक्शन, फ्रिवोलस असे इतर शब्द असतानाही आपण फ्रीडमशी त्याचा संबंध जोडतोय कारण फणींद्र व इतर बंडखोरांचे लक्ष्य स्वातंत्र्य आहे. असे असेल तर मग बर्थोल्टने आपल्या साथीदाराविषयी इतकी महत्त्वाची माहिती इतक्या सहजासहजी का द्यावी? त्याचा फणींद्रशी काही वाद झाला म्हणून? तसेच फणींद्रला बर्थोल्टला मारून काय मिळेल?"
"फणींद्रने त्या रात्री तुला सांगितले कि त्याने बर्थोल्टचा खून नाही केला आणि तू लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत आहेस? रिडिक्युलस!"
"ऐक माझे, फणींद्र म्हणाला म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आहे. ती सर्कस खूप रहस्यमय आहे. हे वाच."
जोसेफच्या हातात त्याने त्या फाईल्स सरकावल्या. सदा व अॅलेक्सी जाता जाता आपल्यापरीने भरपूर माहिती गोळा केली होती. त्या सर्कशीचा इतिहास कोणालाच फारसा माहित नव्हता. काही वर्षांपूर्वी अचानक त्या सर्कशीचा ग्वाल्हेरजवळ उदय झाला. ते कुठून आले हे न सुटलेले कोडे होते. जोसेफचे लक्ष ख्रिसने खूण केलेल्या गोष्टींवर गेले. ती काही कात्रणे होती. त्या सर्कशीच्या शेवटच्या शोच्या बातम्या आणि लोकांच्या गायब होण्याच्या पोलिसांत केलेल्या तक्रारी असे एकमेकांच्या शेजारी शेजारी लावल्या होत्या. दोन्हींच्या तारखा जवळ जवळ होत्या. जोसेफने चमकून ख्रिसकडे पाहिले.
"राजाराम नावाचा तरूण हरवला आहे या आपल्या तक्रारीचे काय झाले हे विचारायला त्याचे वडील आज चौकीवर आले होते. तू अॅलिस्टरसोबत चर्चा करण्यात गुंतला होतास. हा राजाराम एकंदरीत काही कामधंदा करत नसल्याने त्याच्या वडलांनी सुरुवातीला लक्ष दिले नाही. प्रथम त्यांनी आजूबाजूला चौकशी करून पाहिली. अखेर राजारामच्या आईने खूप तगादा लावल्यामुळे त्यांनी चौकीची वाट धरली. राजारामच्या मित्रांकडून इतकेच कळले कि तो सर्कस बघायला रोजच जात असे. माझे अंतर्मन सांगत आहे कि या सर्कशीचा काही ना काही संबंध आहे."
"समजा ते खरे मानले तरी सर्कस वाले फणींद्रप्रमाणे ब्रिटिश क्राऊनला धोका पोचेल असे काहीही करत नाही आहेत. तुला या सर्कशीत एवढा रस का?"
"जोसेफ ..." ख्रिस अडखळला. आता याला कसे सांगावे कि भलेही अॅलेक्सीच्या मृत्युला फणींद्र अप्रत्यक्षरित्या जबाबदार असला तरी ती गोळी रुद्रने चालवली होती.
~*~*~*~*~
मेच्छोबाजार स्ट्रीट
कलकत्ता, ब्रिटिश इंडिया
एका छोट्याशा घरात ही बैठक जमली होती. मेणबत्त्यांचा मिणमिणता प्रकाश सोडला तर त्या खोलीत अंधकाराचे साम्राज्य होते. काहीजणांच्या हातात चहाचे कुल्हड होते. कोणीही तिशीच्या पलीकडे असेल असे वाटत नव्हते. हातात घेऊन ते काही कागद चाळत होते. त्या बैठकीचा जो कोणी अध्यक्ष होता त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे होते. त्यानेच मग विषयाला हात घातला.
"फणींद्राची काही खबर?"
"नाही जतिनदा. पण तो पकडला गेला नाही हे निश्चित! गोर्यांना चकवायला तो लांबच्या मार्गाने कलकत्त्याला यायचा विचार करतो आहे. त्याचा जर्मनांशी संपर्क झाला. योजना अजूनही योग्य मार्गावर आहे."
"पण त्याच्यामागे गोरे लागलेच कसे? आपल्यापैकी कोणी फुटला काय?"
"पुण्यातून जेवढे कळू शकले त्यानुसार तरी फितुरी झाल्याची शक्यता कमी आहे. पण फणींद्र ज्याला भेटला तो जर्मन मारला गेला असे आपल्या बॉम्बेतल्या सूत्रांकडून कळले. त्याचा माग काढत गोरे फणींद्रपर्यंत पोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही."
"तसे असेल तर मग आपण दिल्ली गाठण्याआधीच ते कलकत्त्यात येतील. तरी जतिनदा मी म्हणत होतो कि फणींद्रवर हे काम सोपवू नका. त्याच्या मनाचा आजवर कोणाला थांग लागला आहे. अगदी किरकोळ कारण असले तरी तो जीव घ्यायला मागेपुढे बघणार नाही."
"पण मग दुसरा पर्याय काय होता आपल्यासमोर? जतिनदा तुम्हाला ठाऊकच आहे कि आपण जेवढे लोक जर्मनांशी संधान साधायला पाठवले ते सर्व एकतर पकडले गेले किंवा काही कारणाने नाहीसे झाले. फणींद्र पहिलाच असा ज्याने यशस्वीरित्या त्या एजंटशी संपर्क साधला. एवढी मोठी योजना तयार केली. आता हे सर्व इतक्या वेगाने घडत आहे कि थोडे धक्के बसणार हे अपेक्षितच आहे."
"ठीक आहे. जोवर फणींद्र पकडला जात नाही तोवर युगांतर पर्यंत ब्रिटिश कायद्याचे हात थेट पोहोचू शकत नाहीत. तो कलकत्यात आला कि तडक माझी भेट घ्यायला सांगा."
जतिनदांनी आपली एक अटकळ बोलून नाही दाखवली. तो जर्मन एजंट आत्ता आपल्याला मदत करतोय खरा पण त्याचा आपल्यावर, फणींद्रवर विश्वास आहे का?
~*~*~*~*~
डेव्हिड बॉम्बेत परतला होता. पॅपीला रिपेअर करण्यात तो गुंग होता. दारावर झालेली टकटक त्याला जाणवली नाही. चार पाच वेळा दार वाजवल्यानंतर अखेर बाहेरची व्यक्ती कंटाळली व तिने दार ढकलले. अपेक्षेप्रमाणे डेव्हिडने कडी न लावता नुसते दार लोटले होते. आत आलेल्या स्त्रीला डेव्हिड ओळखत होता. तिचे नाव एल्सा फ्रिट्झ! एल्सा डेव्हिडप्रमाणेच जर्मन होती आणि ती डेव्हिडच्याही आधीपासून भारतात होती. एल्साचा व डेव्हिडचा भारतात येण्याचा उद्देश एकच होता, भारतातील क्रांतिकारकांशी संपर्क साधणे. येत्या काळात युद्ध पेटण्याची शक्यता पाहता जर्मन मुत्सद्द्यांचे 'शत्रूचा शत्रू आपला मित्र' हे धोरण चूक नव्हते. एल्साला यात खास यश आले नसले तरी तिने जर्मन जाळे पसरवण्याचे काम केले होते. एल्सा काही वेळ शांतपणे डेव्हिडकडे बघत होती. अखेर तिने एक पुरचुंडी डेव्हिडच्या पुढ्यात टाकली. डेव्हिडची तंद्री भंगली. त्याने ती पुरचुंडी उघडून पाहिली तर त्यात पॅपीचे काही पार्ट्स होते. तो परत कामात गुंतणार एवढ्यात एल्सानेच त्याला प्रश्न विचारला.
"डेव्हिड, त्या फणींद्रला तू अजूनही भेटलेला नाहीस. तुला असं वाटत नाहीये का कि आपण जरा जास्तच वेळकाढूपणा करतोय. आय मीन डिसेंबर आधी बरीच कामे करता येऊ शकतात."
"एल्सा" डेव्हिडच्या स्वरात कीव जाणवत होती. "एल्सा तुला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत का? जर डिसेंबर आधी भडका उडाला तर ज्या सिंहाची शिकार होणार आहे तो सिंह भारतात येईल का? आता त्याला सिंह म्हणायचे म्हणजे विनोदच आहे पण त्यांचे चिन्हच ते आहे तर त्याला काही इलाज नाही."
"पण आता ब्रिटिश त्याच्या मागे लागले त्याचे काय? तुला त्या बर्थोल्टला मध्ये आणायची गरज काय होती? तुला त्याला प्रत्यक्ष भेटण्यात अडचण काय आहे? नशीब त्या बर्थोल्टला संपवलेस. त्याचे ओठ सीलबंद राहिले नसते."
"मी बर्थोल्टला मारले नाही."
"काय?"
एल्साला क्षणार्धात डेव्हिडचा मुद्दा लक्षात आला. तसे तिला बंगालमधल्या क्रांतिकारकांकडून या माणसाच्या विचित्र स्वभावाविषयी कल्पना मिळाली होती. पण त्यांच्याकडे फारसे पर्याय नव्हते. त्यांच्या जर्मन धन्यांच्या नजरेत ही योजना सफल झाली तर बोनस होता आणि असफल झाली तरी जोवर गुप्तता बाळगली जात आहे तोवर त्यांना काही फरक पडत नव्हता. डेव्हिडने चोखाळलेल्या मार्गात म्हणूनच धोका शून्य होता. कारण कितीही प्रयत्न केला तरी ब्रिटिशांना जर्मनीविरुद्ध आवाज उठवता येणार नव्हता. डेव्हिडच्या डोक्यात फणींद्रचे विचार घोळत होते. त्याने बर्थोल्टचा खून केला असेल?
~*~*~*~*~
सर्कसीचा लवाजमा घेऊन प्रवास करणे फारच कष्टप्रद असते. त्यात सर्कशीत खूप प्राणी असतील तर ते आणखीनच अवघड होऊन जाते. १९०७ मध्ये बार्नम अॅन्ड बेली सर्कशीने खास ट्रेनचा वापर करायला सुरुवात केली. भारतात हे बदल अजून पोहोचले नव्हते आणि इतर प्रवाशांबरोबर इतके प्राणी घेऊन प्रवास करणे नेहमीच शक्य होईल असे नाही. नटराजा सर्कस एका बाबतीत फायद्यात होती कि त्यांच्याकडे फारसे प्राणी नव्हते. त्यामुळे कधी कधी मलिका रात्रीचा ट्रेन प्रवास करत असे. पण अनेकदा ते घोड्यांचा गाडी ओढण्यासाठी वापर करत असत. रुद्र संग्राम बरोबर जथ्याच्या मागे राहून लक्ष ठेवत असे. संग्रामच्या भीतिने त्यांच्यावर शक्यतो कोणी लुटारू हल्ले करण्याच्या फंदात पडत नसत. पुढच्या शोसाठी ते इंदूराच्या दिशेने निघाले होते. रणरणत्या उन्हाळ्यात प्रवास रात्रीचाच होत असे तर आत्ता दुपारी ते सावलीसाठी टेकले होते. अखेर ओल्गा व उमाला एकांत मिळाला. उमाने आपला अनुभव कथन केला. ओल्गाने मग तिने जे पाहिले ते सांगायला सुरुवात केली.
"तू गेल्यानंतर मी भद्रासोबत मीरच्या तंबूतून बाहेर पडले. आम्ही भद्राच्या तंबूत गेलो. त्याने एका ट्रंकेतून कुदळ व फावडे काढले. अंगावरून घोंगडे ओढून घेतले. त्याचा रंग काय होता ते अंधारात कळले नाही पण कोणतातरी गडद रंग असावा. मलाही त्याने एक शाल पांघरायला सांगितली. मग आम्ही मलिकाच्या तंबूत गेलो. तिथे अगदी काही क्षणच आम्ही थांबलो. आत एक पोते पडले होते ते भद्राने उचलले, त्याची शिवण पक्की आहे ना ते बघितले व आम्ही बाहेर पडलो. माझ्या हातात त्याने कुदळ, फावडे दिले तर ते पोते त्याने खांद्यावर घेतले. आम्ही शक्य तितका कमी आवाज करत जंगलात शिरलो. तसेही फारसे कोणी जागे नव्हतेच. थोडे आत गेल्यावर फार झाडी नसलेल्या एका जागी भद्र थांबला. खांद्यावरून पोते उतरवून जमिनीवर ठेवले आणि माझ्याकडून कुदळ घेऊन त्याने खणायला सुरुवात केली.
मला आजूबाजूला लक्ष ठेवण्याचे आणि त्याला उजेड दाखवण्याचे काम होते. आता इथे कोण येणार होते? तुझी गोष्ट ऐकल्यावर मात्र वाटते कि मी सुदैवी होते कि कोणीच आले नाही. मग मी त्या पोत्याचे निरीक्षण करायला सुरुवात केले. त्यात काही विशेष वाटत तरी नव्हते. पण अंधुक प्रकाशात त्यावर काही डाग दिसत होते. माझ्या घशाला कोरड पडली. एवढ्यात भद्र खेकसला. त्याला मी पोत्याचे निरीक्षण करणे फारसे रुचले नव्हते. एव्हाना त्याचा खड्डा खणून झाला होता. त्याने माझ्या मदतीने पोते खड्ड्यात टाकले आणि भराभर माती सारून तो खड्डा बुजवला. परत आल्यावर त्याने मला कसलासा काढा बळेबळेच प्यायला लावला. आधी मी घाबरत होते पण आता त्याचा चेहरा पूर्वीसारखाच शांत वाटत होता. त्याने मला थोडी हुशारी वाटली आणि मनातली खळबळही कमी झाली. मग थोड्या वेळाने मला झोप लागली. उमा या सर्वाचा अर्थ काय असेल?"
उमाकडे ओल्गाच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. तिला एवढेच कळत होते कि हे सर्कस तिचे घर होते आणि या घरात काहीतरी अनिष्ट घडत आहे. हे अनिष्ट कसे टाळता येईल याची मात्र तिला कल्पना नव्हती.
~*~*~*~*~
मे १९११ बॉम्बे, ब्रिटिश इंडिया
सर मॅक्सवेल यांचे निवासस्थान
जोसेफ व ख्रिसने लायब्ररीत प्रवेश केला. सर मॅक्सवेल काही कागदपत्रांवर नजर फिरवत होते. त्या दोघांना आलेले पाहून त्यांनी मंद स्मित करत दोघांना बसण्याचा इशारा केला. सर्व कागद पुन्हा आपापल्या लिफाफ्यांमध्ये गेले होते. आपला सोनेरी काड्यांचा चष्मा काढून त्याला साध्याच पण पांढर्याशुभ्र रुमालाने पुसत हेन्री मॅक्सवेल त्या दोघांच्या समोरच्या खुर्चीत बसले. काही क्षण असेच गेले. मग हेन्रींनी कोटातून आपले पेरिगल रिपिटर काढून वेळ बघितली. ते घड्याळ परत ठेवेपर्यंत चहा, बिस्किटे व मफिन्सने भरलेला ट्रे त्यांच्या पुढ्यात होता. एक घोट घेतल्यावर मॅक्सवेल यांनी ख्रिसकडे बघितले. आजचा चहा दार्जिलिंगचा असूनही ख्रिसकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती.
"अॅलेक्सी बरोबर जे काही झालं ते व्हायला नको होते. मी अॅलेक्सीला खूप वर्षांपासून ओळखायचो ख्रिस! बिलिव्ह मी, ही इज रेस्टिंग इन पीस इन हेवन. पण जर तुझ्यासारखा चहाबाज अशा रीतिने गप्प राहणार असेल तर मी समजतो कि त्याचे लक्ष केसमधून उडालेले आहे."
"दार्जिलिंग चहा. पण कालिम्पाँगपासच्या कुठल्या तरी मळ्यातून आलेला आहे. लवंगा कुटून घातल्या आहेत आणि साखरेऐवजी मध वापरला आहे. म्हणूनच जोसेफला त्याचा चहा गोड लागणार आहे."
जोसेफने शुगर क्युब पुन्हा परत ठेवून दिला. हेन्रींकडे बघून त्याने डोळे मिचकावले. ख्रिस आता पुष्कळच सावरला होता.
"गुड! जोसेफने मला त्या सर्कशीविषयी थोडी कल्पना दिली. ती सर्कस प्रचंड संशयास्पद आहे हे मी मान्य करतो. अॅलेक्सीच्या मृत्युशी त्यांचा काही संबंध आहे का? ख्रिस? ओके, किमान या एका प्रश्नाचे उत्तर मला दे. ती सर्कस कितीही संशयास्पद असली तरी तिचे रहस्य अधिक महत्त्वाचे आहे का फणींद्र जे काही करणार आहे ते जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे?"
"फणींद्राचे लक्ष्य जाणून घेणे, सर."
"मग तू त्या सर्कशीच्या मागे का जाऊ इच्छित आहेस? आपला हा विभाग नव्यानेच स्थापित झाला आहे. उणीपुरी दोन वर्षे झाली आहेत आणि अशा वेळी तू जर भलत्या कामात गुंतून पडलास तर मग महत्त्वाची कामे कशी उरकणार?"
जोसेफने घसा खाकरला. हेन्रींनी त्याला बोलण्याचा इशारा केला. जोसेफने ख्रिसकडे बघितले व एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली.
"सर. इथे मी आणि ख्रिस केवळ ख्रिसला कशाचा माग काढायची इच्छा आहे हे निवेदन करायला नाही आलो आहोत. आता आमच्याकडे इतकी माहिती निश्चित आहे कि त्या जोरावर आपण काही अंदाज बांधू शकतो. त्या अटकळी जर खर्या असतील तर आपल्याला एकट्या माझी किंवा ख्रिसची नाही तर प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. इथे ख्रिसप्रमाणे कोणा आर्मचेअर डिटेक्टिवची नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान पिंजून काढू शकेल अशा पोलिसांची, सार्जंट्सची गरज भासणार आहे. बर्थोल्टच्या खुनाचे रहस्य आम्ही अजूनही खात्रीलायक सोडवू शकत नाही पण आमच्या अंदाजाप्रमाणे फणींद्रला काय साध्य करायचे आहे हे रहस्य आम्ही सोडवले आहे."
"काय?" हेन्रींचे डोळे लकाकले. बर्थोल्ट हा पटावरचा नगण्य मोहरा होता याची कल्पना त्यांना होती. बर्थोल्टच्या खुन्यात त्यांना फारसा रस नव्हता. त्यांना रस होता त्या खुनाचे निमित्त होऊन ज्या षडयंत्राचा सुगावा लागला होता त्या षडयंत्रामध्ये, त्याच्या सूत्रधारांमध्ये! त्यांनी उत्सुकतेने ख्रिसला विचारले, "खरंच?"
"सर आमच्याकडे सबळ पुरावे नाहीत. हे सर्व अजूनही अंदाजच आहेत पण जर ते खरे असतील तर मात्र जोसेफ म्हणाला तसे आपल्याला सबंध हिंदुस्थान पालथा घालून फणींद्र व त्याच्या साथीदारांना पकडावे लागेल. या सर्वाची सुरुवात तुम्ही आम्हाला दाखवलेल्या त्या चित्रापासून होते."
हेन्रींनी घाईघाईने एका खणातून ते चित्र काढून आणले. डेव्हिड वोल्फ असे नाव धारण करणार्या व्यक्तीचा ते चित्र होते. याच चित्राबरोबर व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन असा त्यांना इशारा मिळाला होता. ख्रिसने त्या चित्राकडे बघून मान डोलावली. हा माणूस कोणी जर्मन हेर असल्याची कल्पना त्यांना होती. तो भारतात कसा काय आला हेही त्यांच्यासाठी कोडेच होते. ख्रिसने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"मोरोक्कोतल्या परिस्थितीचा जर्मनांना फायदा घ्यायचा आहे हे उघड आहे. फ्रेंच या महिन्याअखेरपर्यंत गरजेपेक्षा जास्त सैन्य मोरोक्कोत पाठवणार हेही आता स्पष्ट झाले आहे. कदाचित ते राजधानी किंवा एखादे मोठे शहर ताब्यात घ्यायचा मूर्खपणाही करतील. तरी जर्मनीला फ्रेंचांशी वाद ओढवून घेताना जरा जपून राहावे लागेल कारण फ्रान्सला एकटे पाडण्याचा त्यांचा १९०५ मधला प्रयत्न सपशेल फसला होता. युरोपात त्यांची कोणीही मित्रराष्ट्रे नाहीत, एक ऑस्ट्रिया-हंगेरी सोडली तर. पण त्यांचे ऑटोमन साम्राज्यासोबत निराळेच वाद चालू आहेत. अशा वेळी फ्रान्सच्या एका तरी मित्रराष्ट्रामागे डो़केदुखी लावल्याशिवाय जर्मनांना असा प्रयत्न करणे परवडणारे नाही."
"हे मी व ख्रिस आधीही बोललो होतो आणि तेव्हा आपण एक प्राथमिक अंदाज बांधला कि जर्मनांना इथे उठाव घडवून आणायचे आहेत. पण हे तेवढे सोपे आहे का? तेव्हा आपण फणींद्रला गाठणे अत्यावश्यक असल्याने खूप विचार केला नाही. पण मग डेव्हिड चित्रात आला. बर्थोल्ट नक्कीच डेव्हिडने पुढे सरकवलेले प्यादे होते. कदाचित डेव्हिडनेच त्याचा खून केला असेल, हू नोज? पण एक नक्की कि डेव्हिड अत्यंत थंड डोक्याचा माणूस आहे. तो केवळ शक्यता आहे म्हणून कोणतीही योजना उचलून धरणार नाही. जर ही योजना फणींद्रने आखली असती तर कदाचित त्याने असा प्रयत्न केलाही असता पण डेव्हिड असे काही करेल याची शक्यता खूप कमी आहे."
"पण एक गोष्ट नक्की कि डेव्हिड आणि फणींद्र एकमेकांच्या संपर्कात आहेत. ते प्रत्यक्ष भेटले नसतीलही पण त्यांना एकमेकांच्या डोक्यात काय चालू आहे, एकमेकांचे काय फायदे होणार आहेत याची पूर्ण कल्पना आहे. अशा वेळी डेव्हिडने जी काही योजना आखली ती केवळ देशव्यापी उठाव एवढीच असू शकत नाही. जर ब्रिटनला पुरते हादरून टाकायचे असेल तर त्याला याहून काहीतरी मोठे करावे लागेल. असे काहीतरी ज्याने ब्रिटनची जबरदस्त नाचक्की होईल. असे काही ज्याने भले मोरोक्कोत जर्मनांना यश मिळाले नाही तरी त्यांना विजयाचे समाधान लाभेल."
"पुण्यात मी जेव्हा अॅलिस्टरला भेटलो तेव्हा त्याने इतर बंडखोरांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने फणींद्रने फक्त सलीलला विश्वासात घेऊन अधिक माहिती पुरवली होती. बहुधा आत्ता अगदी युगांतरमध्येही खूप कमी लोकांना या षडयंत्राची कल्पना असावी. पण याचा अर्थ असा नाही कि आपल्या हाती कोणताच धागा लागला नाही. अॅलिस्टरला एवढे जाणून घेता आले कि जे काही होणार आहे ते या वर्षाअखेर होणार आहे. माझ्या डोक्यात याने आधी काहीच प्रकाश पडला नाही पण ख्रिसला मात्र यात लपलेला भयंकर अर्थ दिसला."
"काय कळलं तुला ख्रिस? सांग लवकर." सर मॅक्सवेल आता अधीर झाले होते.
"सांगतो. पण त्याआधी सांगा कि जंगलचा राजा कोण? सिंह कि वाघ?" ख्रिस निर्विकारपणे म्हणाला.
"त्याचा काय संबंध ख्रिस? असो तू माझ्याकडून उत्तर ऐकल्याशिवाय पुढे जाणार नाहीस. आपल्या संस्कृतीत जंगलचा राजा सिंहाला मानतात. आपले राष्ट्रीय चिन्ह सिंह आहे."
"हो पण इंग्लंडमध्ये आज ना सिंह आहे ना वाघ. तरीही आपण सिंहाला मान्यता देऊन टाकली आहे. पूर्वेकडे जिथे सिंह नाहीत फक्त वाघ आहेत तिथे तशीच मान्यता वाघाला मिळाली. अॅलिस्टरकडून आम्हाला हेही कळले कि फणींद्रला या सिंह-वाघ मुद्द्यावरून चर्चा करायची सवय आहे. मला मान्य आहे कि यातून थेट काहीच कळत नाही. पणा आता फणींद्रच्या मानसिकतेचा विचार करूयात. फणींद्र इतर बंडखोरांप्रमाणे जरी हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा अशी मनीषा बाळगून असला तरी त्याला स्वत:ची वेगळी मते आहेत. जसे हे इतर बंडखोर स्वतःला क्रांतिकारक म्हणवतात, समाजवादाने प्रेरित होऊन काम करतात तसा तो समाजवादी मुळीच नाही. त्यामुळे तो अधिक विचारही करत असावा. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ सतत घोंगावत असले पाहिजे अन्यथा तो इतरांप्रमाणेच बनून जाईल, जे त्याला टाळावेसे वाटणे साहजिक आहे. जर असे असेल तर त्याच्या बोलण्यात त्याचे विचार डोकावले पाहिजेत. नकळत, सटल हिंट देणारी त्याची ही वाक्ये आपल्यासाठी गुरुकिल्ली ठरू शकतात. मग सिंह काय, वाघ काय, जंगलचा राजा हे एक पद आहे. यात महत्त्वाचा मुद्दा असा कि जंगलचा राजा एकच असू शकतो. ते इतके महत्त्वाचे पद आहे कि याचा निर्णय विभागून देणे शक्य नाही."
"अर्थात! राजा एकच हवा."
"देन व्हॉट इफ तो राजा मान्य नसेल? मग तुम्ही काय कराल? जमल्यास त्या राजाला सामोपचाराने, लोकसमर्थनाच्या बळावर, शक्यतो रक्त न सांडणारे राजकारण खेळून बाजूला करायचा प्रयत्न कराल. पण तेही शक्य नसेल आणि हे मान्य नसलेला मनुष्य जर फणींद्र असेल तर ..."
"तर त्या राजाला हटवण्यासाठी तो कोणत्याही मार्गाचा अवलंब करेल. अगदी गरज पडल्यास त्याचा खूनही तो करेल. मला कळले हे सर्व पण याचा वर्षाअखेरीस .... " खळ्ळ् आवाज होऊन हेन्रींचा कप फुटला. त्यांच्या हातातून सुटून तो जमिनीवर पडला होता. त्यातला चहाचा ओघळ हेन्रींच्या पायापासून दूर वाहत होता. याचा भयानक अर्थ हेन्रींच्या ध्यानी आला होता. जोसेफने ते वाक्य पूर्ण केले.
"याचा अर्थ स्पष्ट आहे. डिसेंबर मध्ये दिल्ली दरबाराच्या निमित्ताने प्रथमच हिज मॅजेस्टी राजे पंचम जॉर्ज हिंदुस्थानला भेट देणार आहेत. डेव्हिडला जर स्टॅटस को मेंटेन करायचा असेल, जर त्याला अशी एक योजना हवी असेल ज्यात त्याचे नुकसान होण्याची शक्यता कमीत कमी आहे आणि त्याच्या दिमतीला फणींद्र असेल तर त्यांचे एकच लक्ष्य असू शकते. डिसेंबर, दिल्ली दरबार, ब्रिटिश साम्राज्याचे व पर्यायाने ज्ञात जगाच्या जवळ जवळ एक चतुर्थांश भूभागाचे सम्राट पंचम जॉर्ज यांची हत्या!!"
~*~*~*~*~*~
जून पहिला आठवडा, १९११
सर मॅक्सवेल व जोसेफ कलकत्त्याकडे जाणार्या ट्रेनमध्ये बसले. सर मॅक्सवेल यांचा आपल्या काठीशी चाळा सुरू होता. जोसेफ खिडकीतून बाहेर बघत होता. मोठ्या मुश्किलीने व्हॉईसरॉय हार्डिंग्ज यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्या दोघांसाठी वेळ काढण्यात आला होता. हेन्रींची थोडी चिडचिडच झाली होती. हे सावट डोक्यावर असतानाही लॉर्ड हार्डिंग्ज यांनी भेट ठरवण्यात जवळ जवळ दहा दिवस खर्ची घातले होते. त्यात जेवढा मॅक्सवेल ख्रिसच्या अंदाजावर विचार करत होते तेवढी त्यांची खात्री पटत होती कि डेव्हिड-फणींद्र जोडगोळीचे लक्ष्य राजे पंचम जॉर्जच आहेत. या भयानक शक्यतेसमोर इतर कोणतीही कामे महत्त्वाची असू शकत नाहीत.
"तुम्हाला काय वाटतं? लॉर्ड हार्डिंग्ज ऐकतील?" जोसेफने विचारले.
हेन्रींनी हताशपणे हात वर केले. "सांगू शकत नाही. हार्डिंग्ज पक्का राजकारणी आहे. राजघराण्याशी संबंध नसतानाही त्याला सहावेळा सरदारकी मिळालेली आहे. आत्ता ब्रिटिश राजकारणात त्याच्या इतकी प्रभावशाली व्यक्ती दुसरी नसेल. याचा तोटा असा कि त्याला जे वाटेल तेच तो करेल. म्हटले तर हिज मॅजेस्टी जॉर्ज यांनी हिंदुस्थानात न येणे हा सर्वात सोपा उपाय आहे. तसेही आधीच्या दोन्ही दिल्ली दरबारात राजघराण्याचे सदस्य आले नव्हतेच. पण हार्डिंग्जच्या मनात जर सम्राटांना हिंदुस्थानात आणायचे असेल तर मात्र कठीण आहे."
जोसेफने डोळे मोठे करून निराशेने मान हलविली. त्याच्या मते आत्ता राजकीय फायद्याचा विचार करणे शतमूर्खपणाचे लक्षण होते. हेन्रींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून स्मित केले. इतक्यात आशा सोडून देण्यात काही हशील नव्हते.
"ख्रिसचा इथे उपयोग होऊ शकला असता. पण त्याला त्या सर्कशीत एवढा का रस आहे?"
"माहित नाही सर. पण दोन गोष्टी असू शकतात. फणींद्रच्या हेतुविषयी आता पुरेशी स्पष्टता असल्याने त्याच्या डोक्याला इथे फारसे खाद्य नाही. म्हणून तो बर्थोल्टच्या खुन्यामागे लागणे स्वाभाविक आहे. आणि दुसरे ..."
"दुसरे?"
"मला तरी असं वाटतं कि त्या सर्कशीतल्या तरूणाचा आणि अॅलेक्सीच्या मृत्युचा निकटचा संबंध आहे. मला अॅलेक्सी व ख्रिसमध्ये नक्की काय नातं होतं पण ख्रिसला अॅलेक्सीच्या मृत्युला जबाबदार असलेल्या त्या तरूणाचा पिच्छा पुरवावासा वाटला तर मला तरी नवल वाटत नाही."
सर मॅक्सवेल यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांना अनेक वर्षांपूर्वी अॅलेक्सीशी झालेली भेट आठवली. ख्रिसवर डॉक्टर उपचार करत असताना अॅलेक्सीकडून त्यांनी जी कहाणी ऐकली होती त्याच्यावर त्यांना विश्वास ठेवायला थोडा वेळ लागला होता. त्यांचे ओठ विलग झाले पण थोड्या वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"अनेक वर्षांपूर्वी काल्डवेल घराण्याच्या पिढीजात घराला आग लागून त्या वास्तूची व आतल्या रहिवाशांची राखरांगोळी झाली होती. तुला हे माहिती होतं का?"
"मी ऐकलं आहे याबद्दल. तिथे त्या रात्री असलेल्या सर्वांचा जळून मृत्यु झाला होता ना?"
"चूक! सर्वांचा नाही. त्या रात्री दोघेजण मृत्युच्या जबड्यातून सुटले. एक काल्डवेल घराण्याचा निष्ठावान नोकर अॅलेक्सी बिंगहॅम आणि शेवटचा काल्डवेल म्हणजेच ख्रिस्तोफर काल्डवेल. टू बी स्पेसिफिक, अॅलेक्सीने त्या रात्री ख्रिसच्या रुपाने काल्डवेल घराण्याची वंशवेल वाचवली."
जोसेफला ख्रिसची मनःस्थिती स्पष्ट करायला एवढी माहिती पुरेशी होती. पण त्याला हे ठाऊक नव्हते कि हेन्रींनी त्या रात्रीची सगळी रहस्ये उघड केली नव्हती.
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/61278
आवडली
आवडली कथा............!!!!!!!!!!!!!
पु.ले.शु.................
अप्रतिम ... पु.ले.शु.!!!
अप्रतिम ... पु.ले.शु.!!!
चांगली चाललीये कथा..
चांगली चाललीये कथा..
Mast
Mast
खुपच छान। जितके वाचावे तितकि
खुपच छान। जितके वाचावे तितकि उत्सुकता अजून वाढतिये.....
हा भाग ही छान!
हा भाग ही छान!
जोसेफचे लक्ष रुद्रने खूण
जोसेफचे लक्ष रुद्रने खूण केलेल्या गोष्टींवर गेले>> येथे रुद्र ऐवजी ख्रिस हवे का???
बाकी कथा छान चालली आहे.... पुभाप्र....
सर्वांना धन्यवाद विवेक - हो,
सर्वांना धन्यवाद
विवेक - हो, माझी नजरचूक. बदल केला आहे.
कथा मस्त चालली आहे, पायस.
कथा मस्त चालली आहे, पायस.
एक नम्बर !! पायस, कृपया
एक नम्बर !!
पायस, कृपया पटापटा येवु द्या हो भाग्...आम्ही चातकासारखे डोळे लाउन बसतो...जबरदस्त मांड्णी आणि अभ्यास आहे तुमचा...
-प्रसन्न
अप्रतिम पुढच्या भागाची
अप्रतिम
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे!
कथा आता पकड घेऊ लागलीये. रोचक
कथा आता पकड घेऊ लागलीये. रोचक एकदम.
या भागात extra फीचर्स नाहीत का
सही... जबरदस्त मांड्णी आणि
सही...
जबरदस्त मांड्णी आणि अभ्यास आहे तुमचा...>> +१००
आहेत ना एक्स्ट्रॉ फीचर्स
आहेत ना एक्स्ट्रॉ फीचर्स
सिंह झाला आता वाघ, तोही नरभक्षक!
बेस्ट.. आता पुढचा भाग उद्याच
बेस्ट.. आता पुढचा भाग उद्याच येऊ द्या... म्हणजे लिंक राहिल..
अहो पुढचा भाग कधी?
अहो पुढचा भाग कधी?