एक न पाठवलेली गोष्ट

Submitted by विद्या भुतकर on 30 November, 2016 - 00:12

ती सकाळची दुसरी झोप काढून उठली. सकाळी ५.३०-६ पासून नवऱ्याचा डबा, मुलाला उठवून, आवरून शाळेत पाठवणे सर्व ७ च्या आत होऊन जातं. मग उगाच कधी चहा घेत, पेपर वाचत वेळ घालवायचा तर कधी असा एखादी डुलकी काढून. कधी लिहायची इच्छा असली की मग कामाला मावशी आल्या तरी तिचं उठणं व्हायचं नाही. त्या आपलं दिलेलं काम करून निघून जायच्या. तर कधी अगदीच त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचंही काम थांबवून बसायची. मावशींना आता सवय झाली होती तिच्या अशा वागण्याची. त्याही ती बोलायला लागली की घरचं सांगायच्या, कधी शेजारणीचं. गेले तीनचार दिवस डोक्यात सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. कसं आणि काय काय लिहावं सुचत नव्हतं.

अनेकवेळा डिलीट करून तिने पुन्हा सुरुवात केली. ..... "वृषाली तणतणत घरी आली. असंच कशावरून तरी तिचं तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबत छोटंसं भांडण झालं होतं. भांडण कुठलं, वाद फक्त. पण जवळच्या मैत्रिणीशी झालेला छोटासा वादही अगदी मोठा वाटतो. आणि मग कशातच लक्ष लागत नाही. जगात आपलं कुणीच नाही असं वाटतं. जाऊ दे, म्हणून तिने आपलं काम उरकायला सुरुवात केली. आशिष आला, जेवण झाले, सगळं आवरून ते निघाले. हे सर्व चालू असताना तिचे विचार मात्र कमी होत नव्हते. त्याला तर काही लक्षातही आले नाही, तो त्याच्याच नादात होता."................ शी... किती बोअर आहे. मैत्रिणीशी भांडण झालं, मग पुढे काय? असं काय असणार आहे मैत्रिणीशी भांडायला? आणि अगदी असेल काही मोठंसं, पण ते काय होतंच असतं सगळीकडे? उगाच 'गिर्ल्फ्रेंड्स' या विषयावर किती आणि काय लिहिणार? तिला अनेकवेळा जीवश्च मैत्रिणींशी झालेलं भांडण आठवलं, त्यात मनावर येणारं उदासीचं वलय आणि कंटाळवाणा जाणार दिवसही. पण मग पुढे काय?..... त्याच त्या मैत्रिणींवर लिहिलेल्या कविताही आठवल्या आणि तिने तो विषय सोडून दिला.

वैतागून ती बाहेर आली. मावशींसाठी भांडी काढूनच ठेवलेली होती.त्या मुकाट्याने आपलं काम करत होत्या. पण तिला कुठे करमत होतं? ती बाथरुमसमोर जाऊन उभी राहिली. तिला पाहून त्याही मग बोलू लागल्या,"पोराला काल रात्री यायला उशीर झाला. आजकाल पोरं जरा मोटी झाली की लक्ष द्याया लागतंय. नायतर लगेच दारू येतीयच हातात. कुटं जाताय, काय करताय सारखं विचाराय लागतंय."

तीबोलली,"होय. अभ्यास कर म्हणावं त्याला. तुम्ही पण त्याला लगेच कामाला लावू नका. जरा शिकू दे, म्हणजे चांगली नोकरी लागेल. लहान वयात हातात पैसे आले की अजून वेगळेच उद्योग सुरु व्हायचे."

त्यांच्याशी ती आजतागायत सर्व विषयांवर बोलली होती. मुलीच्या लवकर होणाऱ्या लग्नापासून, दारुड्या नवऱ्यापर्यंत. माहेरपणाला आलेल्या पोरीच्या धडाधड होणाऱ्या पोरांपासून जावयाच्या मागण्यांपर्यंत. रोज एक वेगळी कथा असायची. त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी तिची एक कादंबरी होऊन गेली असती. पण स्वतः न घेतलेल्या अनुभवांवर लिहिणं म्हणजे उगाच आपणच प्रश्न शोधून आपणच त्यांची उत्तरं द्यायची असं वाटत होतं. शिवाय 'गरीब, कामवाली बाई आणि तिचे अनुभव' यावर काही कमी गोष्टी लिहिल्या नसतील, तेही तिच्यासारख्या तिसऱ्याच बाईने. त्यामुळे तिने तो नाद केंव्हाच सोडून दिला होता.

बराच वेळ झाल्यावर, त्यांच्याशी बोलत बोलत तिने संध्याकाळची भाजी निवडायला सुरुवात केली.

"भेंडी कशी आणली ताई तुम्ही?", मावशी.

"२० ला पाव होती. किती महाग काय बोलायलाच नको."

"तुम्ही त्या कोपऱ्याव नका घेत जाऊ, लै दर लावतुय तो."

"हो, पण मग सकाळी गाडी घेऊन जावं लागतं मंडईला. इतक्या ट्रॅफिकमध्ये नको वाटतं.हे जवळ आहे ना? त्याचेच पैसे घेतो तो, दुसरं काय?"

दोघीही एक मिनिट त्या कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याचा चेहरा आणि त्यांचे भांज्याचे दर आठवत रमल्या. तिने भाजी धुवून, चिरून, डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवली. तिकडे मावशींनी केर, फरशी करून घेतलं. घर कसं चकाचक दिसत होतं. मावशींना 'उद्या लवकर या' म्हणून ती कामाला लागली.

कपडे मशिनमधे धुवायला लावले, कालचे वाळलेले कपडे नीट घडी करून जागेवर ठेवले. बाल्कनीत कुंड्याना पाणी घातलं. वाढलेल्या जास्वंदीकडे पाहताना तिला 'त्याची' आठवण झाली. त्याला खूप आवडायचा मोगरा. तिलाही, पण दुरूनच, वास घ्यायला. उगाच ते तोडून त्याचा गजरा वगैरे तर तिला अगदीच 'जुनाट' वाटायचं. "कुणी घालतं का रे गजरा आजकाल?" म्हणत तिने तो नाकारलाही होता. हेच नाही, अशा अनेक गोष्टी तिला त्याच्या जुनाट वाटायच्या. 'तुम्ही भारतीय पुरुष म्हणजे ना? शेवटी तुम्हाला आम्ही साडीतच छान दिसणार. ", कितीतरी वेळा ती त्याला गमतीने म्हणायची. तिने कधी नव्हे ते नेसलेल्या साडीत पाहणारी त्याची नजर तिला आठवली. उगाच तिच्या काहीतरी डोक्यात आलं आलं आणि ती आत गेली लिहायला.

"इतक्या वर्षांनी ते दोघे समोरासमोर आले होते, तेही असं अनपेक्षित, परदेशात. आपल्याला न विचारता असं पाहुणा म्हणून कुणालाही उचलून आणल्याबद्दल नवऱ्यावर राग येत होता की त्याला इतक्या दिवसांनी पाहून रडू, हेच तिला कळत नव्हतं. ती आपल्यावर चिडलीय समजून नवरा तिला मदत करत होता. कसंबसं जेवण उरकलं आणि आवरायचं काम आपल्यावर घेत नवऱ्याने तिला त्याच्याशी बोलायला बसवलं. टेबलावर राहिलेलं 'त्या'चं ताटही उचलून नेलं नव्हतं त्याने. आणि तिला एकदम 'त्या'च्या 'जुनाट' विचारांचा राग आला पुन्हा एकदा...."

लिहिता लिहिता तिला अजूनच चिडचिड झाली. तिने वैतागून सर्व लिहिलेले डिलीट करून टाकले......... कितीवेळा तेच तेच लिहिणार? तेच जुने विचार असलेले पुरुष, त्याच नवीन विचारांच्या स्त्रिया आणि त्यांचे अफेअर? कितीवेळा जुना बॉयफ्रेंड समोर येणार आहे आणि कितीवेळा नवराच चांगला वाटणार आहे? कितीवेळा लग्न झाल्यावर, 'नवराच कसा योग्य साथीदार आहे हे' समजावून सांगणार आहे. तेही कुणाला? स्वतःला? कदाचित असेल किंवा नसेलही.... आणि बंडखोरीचं म्हणावं तर तीही काही कमी जणींनी केलीय का? किती वेळा बंड पुकारणार आहे? समाजाविरुद्ध, घरच्यांविरुद्ध, स्वतःच्याच बुरसटलेल्या विचारांविरुद्ध? तिला अजून वैताग आला. कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली. भानावर आली तसं तिला टेबलावर पडलेला पसारा, त्याच्या खणात असलेला कचरा, सर्व दिसू लागलं. वैतागून तिने लॅपटॉप बंद केला आणि घर आवरायला घेतलं....... पुन्हा एकदा......

दुपार होत आली, पोटात थोडी भुकेची जाणीव झाली. तिने फ्रिजमध्ये सकाळी कापून ठेवलेलं सॅलड काढलं, सकाळीच केलेली एक पोळी-भाजी आणि टीव्ही समोर बसली. जेवता जेवता, 'आम्ही सारे खवैय्ये' बघून झालं. जरा कुठे एखादी सिरीयल पाहतेय तोवर तिच्या मैत्रिणीचा फोन आला उचलू की नको विचारात तिने तो उचलला.

"काय गं, भांडण झालं म्हणून फोन उचलणार नव्हतीस की काय?", पलीकडून मोकळ्या आवाजात हसून प्रश्न आला आणि बराच वेळ हसून दोघीनी बराच वेळ गप्पा मारल्या. सकाळपासून आपल्याला का उदास वाटत होतं याचं उत्तर तिला मिळालं होतं. मुलाला आणायची वेळ झाल्यावर तिने घाईत फोन ठेवला आणि खाली गेली. बसमधून त्याला घेऊन येताना शेजारणीशी गप्पाही झाल्या. घरी आल्यावर त्याला खायला देऊन, टीव्ही लावून दिला. पुढे त्याला स्विमिंग क्लास आणि होमवर्कही होतंच.

तिने त्याची तयारी केली, स्वतःही आवरून मुलाला क्लासला घेऊन गेली. क्लासमधून येताना घरातल्या दोन चार छोट्या मोठया वस्तूही घेऊन आली. घरी आल्यावर त्याला अभ्यासाला जबरदस्तीने बसवावं लागलं. जरा चिडचिड- रडारड करून अभ्यास करवून घेऊन त्याला खेळायला सोडून तिने जेवणाची तयारी सुरु केली. कधी कधी तिला वाटायचं सकाळ-संध्याकाळ तेच रहाटगाडगं सुरु, काही वेगळं काम होतंच नाही. ती वैतागली, घाईघाईत एक भाजी चपाती उरकून मुलाला घेऊन आली. थोड्या वेळात नवराही आलाच. सोबत जेवणं, गप्पा,टीव्ही सर्व झालंही. तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे हे त्याला दिसतही होतं. त्याने विचारल्यावर 'काहीही नाही' म्हणून तिने टाळलं होतं. टीव्ही पाहताना मधेच त्याने विचारलं," संध्याकाळी प्लम्बरला भेटून आलीस का?".

"अर्रर्रर्रर्रर्र" म्हणत तिने जीभ चावली. त्याने तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि म्हणाला, "निदान हे तरी काम करायचंस ना?".

ती,"अरे हो विसरले ना. सॉरी. उद्या बोलते नक्की."

त्याचा चेहरा अजून वैतागलेलाच होता. ती दुर्लक्ष करत समोर बघत राहिली. काहीतरी डोक्यात आलं म्हणून उठून गेली आत आणि लिहायला लागली.

"करमरकर सर, तुमच्या मासिकाने माझ्याकडून अशा लेखाची मागणी करावी म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मी सध्या घरीच असते. घरी असते म्हणजे, बाहेरही पडतेच, घरातली, बाहेरची कामेही करतेच. नोकरी सोडणं हा पर्याय मीच स्वतः निवडला होता. मुलाला सांभाळणे आणि कधीही घरी बसून ज्या आवडीच्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करायच्या असं ठरवलं होतं आणि ते आवडलंही होतं. कधी कधी कंटाळवाणे दिवस येतातच, पण ते होणारंच होतं. ते तर नोकरीतही होतंच. उलट स्त्री म्हणून मी या अशा गोष्टी करणे स्वाभाविक समजले जात असल्याने मला त्यांचं कुठलंही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. उलट माझ्या जागी नवरा घरी राहिला असता तर त्याला मात्र द्यावं लागलं असतं. त्यामुळे मी घरी राहून स्वतःचे छंद पूर्ण करू शकते ही माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे. असो.

घरी आल्यावर 'घरी बसून इतकंही काम करू शकत नाहीस का?' म्हणणाऱ्या नवऱ्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही किंवा रागही येत नाही. मी इतकी weak नाही. माझ्या जागी तो घरी बसला असता तर मीही हेच विचारलं असतं. मी दिवसभर किती कामं करते आणि तरीही 'housewife' म्हणून मला कुणीही किंमत देत नाही असं मला वाटत नाही. प्रत्येक लग्नातच काय किंवा कुठल्याही नात्यात एक देवाणघेवाण असतेच, अगदी नोकरीतही असते. प्रत्येकाच्या अपेक्षा असतातच, भांडणं, रुसवे-फुगवे असतातच. पण म्हणून त्यात मला स्वतःला 'अशक्त' म्हणवून घ्यायला मला आवडत नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने काहीतरी लिहायचा विचार होता. अनेक विषय डोक्यात आले पण त्यातला कुठलाही आधी लिहिला गेला नाहीये असं वाटलं नाही. शिवाय त्यात मी माझे विचार मांडताना मी स्वतःला एक 'व्यक्ती' ना समजता 'स्त्री' म्हणून वेगळं काढू पाहतेय हे मला पटलं नाही. खास महिलादिनासाठी लिहून मी माझं 'स्त्री' पण सिद्ध करावं किंवा उगाच काहीतरी लिहून माझं जे हे 'व्यक्ती' मत्व आहे ते घालवायची अजिबात इच्छा होत नाहीये. म्हणून मी कुठलीही गोष्ट पाठवू शकत नाही. क्षमस्व. लोभ असावा.

अपर्णा. "

इतकं लिहून तिने ती मेल पाठवून दिली आणि पुन्हा टीव्ही बघायला गेली.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ठराविक पॅटर्नविषयी म्हणायचं तर 'गोष्टीतली गोष्ट' हा पॅटर्नही माबोवर /इतरत्र बर्‍याचदा येऊन गेलाय.

Happy

मला अमांना दिलेली कमेंट
'its scary to know..' सुद्धा आवडली.
आणि शुद्धलेखनाच्या चुका मान्य करून त्या दुरूस्त करणेही.

Pages