मैफिल
सारं जग उजळून गेल आणि मनातले काही अंधारे कोपरे, आज जरा जास्तच सलू लागले. आयुष्यातली ती रिकामी जागा अन् मनांत न मावणाऱ्या असंख्य आठवणी. एखादी मैफिल संपूच नये असं वाटत असताना संपते अन मनाला चूटपूट लावून जाते. पण काही स्वर आणि शब्द मात्र मनातच रेंगाळतात तसच काहीस...
तिन्हीसांजा झगमगणारे आकाश दिवे, दिपमाळा, रांगोळ्या, मातीचे किल्ले, त्यावरची चित्रे, फटाक्यांची आतिशबाजी.... एकीकडे रंगांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा आसमंत न्हाऊन गेला होता तर दुसरीकडे सारा काळोख, इथे दाटला होता, माझ्या मनांत.
सकाळची तिची चाललेली लगबग, ती खमंग फराळाची तयारी, दारासमोर तिने लावलेली दिवाळीची पहिली पणती, उटणं-तेल वाटीत काढून , पाट रांगोळी सजवून , गरम पाण्याची तयारी होताच आपल्याला गाढ झोपेतून उठवणारी आपली 'आई'. घराघरांतून दिसणार हे दिवाळीच चित्रं. पण माझ्या या चित्रातून मात्र, ती केव्हाच हरवली होती, आकाशातील त्या लक्ष लक्ष चांदण्यात.
'बोले अखेरचे तो, आलो इथे रिकामा ; सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे '... आरती प्रभूंच्या या ओळींप्रमाणेच या बहरलेल्या बागेतून ती मात्र गेली होती ... कायमचीच .
आता मागे उरल्या होत्या फक्त तिच्या आठवणी. या शब्द नि:शब्द किनाऱ्यावरती आता कोणाचीही सोबत नको होती. दिवाळीच्या पणत्यांच्या त्या मंद प्रकाशात, त्या पोरकेपणाच्या जाणीवेने डोळे मिटताच या मैफिलीत मला एकच गाणं ऐकू येतं होत .... ग्रेस याचे शब्द आणि हृदयनाथजींचा आवाज...
'ती गेली तेंव्हा रिमझिम , पाऊस निनादत होता ....... '
- कविता केयुर
एकदम हुंदकाच आला...
एकदम हुंदकाच आला...
दिवाळी - माझा अत्यंत आवडता
दिवाळी - माझा अत्यंत आवडता सण. तोच डोळ्यात पाणी आणेल असे कधीच वाटले नव्हते.
आयुष्य पुढे सरकतेच पण गेलेला तडा काही सांधत नाही.
खूप छान शब्दबद्ध केलीये मनातली भावना.
कविता, अगदि ह्रुदयाला हात
कविता,
अगदि ह्रुदयाला हात घातलात,