पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

Submitted by आतिवास on 15 November, 2016 - 01:49

“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?”  बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं.
“राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला.
दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे. म्हणजे निदान दादा आणि त्यांची माणसं तरी असचं सागंतात.
“आता या कमळवाल्याला हितं काय करायचंय? केली की भर सगळी मागच्या विलेक्शनला, अजून दोन वरीसबी न्हाय झाली तर ...” शेवंता कुजबुजली. पण ते ऐकून अलका फणफणली. बाया कलकल करायल्या लागल्या. कोण कॉंग्रेसची, तर कोण भाजपची तर कोणी सेनेची. गलका व्हायला लागला. ते पाहून कांता म्हणाली, “उगा का भांडताय बायांनो? कधी ते हातवाले असतात तर कधी तेच कमळवाले असतात. आज येक आला, उद्या दुसरा यील.आपण कशाला बरबाद करायची आपली एकी?” बाया हसल्या. रामापण हसला.
“काय निरोप आहे दादांचा?” कांताने विचारलं.
“काय न्हाई. दादा म्हणले किती दिवस शंभराचीच बचत करणार बाया? हजार-दोन हजार टाका की म्हन्ले आता. दिपाळीतून वाचले असतील ते पुडं सक्रातीला मिळतील.” रामा म्हणाला.
“ अरे बाबा, दादा मोठा माणूस हाये. आमी शंभरच कसंतरी करून वाचिवतोय, हजार कुठनं आणायचे बाबा? झाड नाही पैशाचं आमच्या दारात. सांग जा जाऊन तुझ्या दादास्नी.” रखमाआजी फिस्कारली. रखमा दादांची लांबच्या नात्यातली चुलती होती. तिचं असलं बोलणं दादा मनावर न घेता हसण्यावारी नेतील हे आख्ख्या गावाला माहिती. त्यामुळे सगळे हसले.
“मंग काय तर! सांगायला काय होतंय त्यास्नी. दादा देणारेत का पैसे?” आणखी एकीने धीर करून विचारलं.
“तेच तर सांगाया आलतू. दादा म्हणले दोन दोन हजार देतील दादा प्रत्येक बाईला.” रामा म्हणाला.
“अन अट काय? परत कदी द्यायचे? व्याज किती?” प्रश्नांचा भडिमार झाला रामावर.
“अट एकच. पयशे लगोलग गटाच्या खात्यात जमा करायचे. याज बीज काय नाय. जमलं तसं सा मैन्यांनी परत करायचे. कुणाला परत करायचे नसतील तरी बी चालंतंय. आपल्या गावच्या बायांची बचत वाढली पायजे असं दादांना लई दिसांपासून वाटतंय बगा.” रामाने सांगितलं.
बायांची नजरानजर झाली. फुकट मिळतंय तर कशाला सोडा – असा विचार प्रत्येकीच्या मनात आला. तसंही दादा नेहमी ओरबाडून घेतो, आज देतोय म्हणजे काहीतरी भानगड असणार असाही विचार त्यांच्या मनात आला.
“आम्ही काय लिखापढी करणार नाही बघ,” कांताने ठासून सांगितलं.
“काय गरज नाही अध्यक्षीणबाई. दादांकडून भाऊबीज समजा,” असं म्हणून रामाने पिशवीतून पाचशेच्या नोटांचा गड्डा बाहेर काढला.
रामाच्या वाटच्या ऐशी नोटा आज संपल्या. अजून एक महिना बाकी आहे.
आसपासच्या गावातल्या बचत गटांचा हिशोब रामाने मनातल्या मनात सुरू केला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्लूर येथील एका राजकारणी भाऊंनी जवळच्या गावांतील महिला बचतगटातील प्रत्येक महिलेस अडीच / तीन लाख रूपये रोख कर्जाऊ दिले व तेही सहा महिने बिनव्याजी वापरता येतील असे सांगितल्याची बातमी सदर महिलागटाच्या बायका, काही नेतेछाप मंडळी व टेबलांवर मांडलेल्या पाचशे हजारच्या नोटांच्या थप्प्यांसकटच्या फोटोसहित व्हॉट्सपवर ९ /१० नोव्हेंबरला फिरत होती. तेव्हाच 'अगदी, अगदी' झाले होते मनात.

लोभ. लोभ. आणखी लोभ.
एका लोभातून प्रसवलेले अनेक लोभ.

अकु, कोल्लूरवाल्य व्हाट्सॲप मेसेजातले फोटो जूने होते आणि कोऑपरेटिव्ह बॅंकेच्या ऑफिशियल कर्जवाटपाचे होते.

पण असली कामं झाली असतिल खूप ठिकाणी. या कथेतल्या बाया- बापड्यांना नोटा रद्द झाल्याचे माहित नव्हते याचे मात्र आश्चर्य आहे.

तो फोटो मी पाहिला आहे.
तो जुना आहे.

डिसीसी बँकेच्या कर्जवाटप कार्यक्रमाचा तो फोटो आहे.
पाठच्या फलकावर नाव 'कोलूर चिकबल्लापूर डिसीसी बॅंकच्या बंगारपेटशाखेतर्फे' असे लिहिले आहे.

आमची यांडुगुंडु भाषा कुणाला कळत नाही म्हणून हे फेबु /वॉट्सप वाले कुठलेही फोटो काहिही म्हणून खपवतात.
Happy

:))