आज आपण एका वेगळ्याच मुद्यावर बोलू. मला बरेच दिवस या विषयावर लिहू असं वाटत होत आणि आज मला या विषयाची चिट्ठी मिळालीच. ‘व्यक्तिमत्व’… व्यक्तिमत्त्वार आपले काही ‘माईंड सेट’ असतात. उदाहरणचय द्यायचं झालं तर, एखादी व्यक्ती धार्मिक प्रवचन करत असेल तर ताबडतोप डोळ्यासमोर एक संत येतो. राजकारणी व्यक्ती म्हटलं तर खादी वस्त्रधारी व्यक्ती आपल्या डोळ्यांदेखत येते. मोठा बिझनेसमन किंवा उंच पदावरची एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर, ती व्यक्ती आपल्याला सूटात दिसते. तसंच एखादी महिला जर जीन्स- शर्ट असे कपडे घालणारी असेल ‘ मॉड’ असं समजलं जातं . एखादी महिला केसाला तेल लाऊन अगदी चापूनचोपून वेणी घालणारी असेल तर ती ‘मागसलेली’ आहे असं मानलं जातं. खरं बघितलं तर बाहेरून दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आणि त्या व्यक्तीच्या वैचारिक किंवा मानसिक पातळीचा काहीच संबंध नसतो.
अगदी मागसलेली दिसणारी व्यक्ती वैचारिक आणि मानसिक पातळीवर पुढारलेली असू शकते.
अशा विभिन्न व्य्क्तीमत्वांच आपल्या मनात एक ठराविक चित्र असल्याकारणांनी जर ह्या व्यक्तींना आपण जर कुठे दुस-याच रुपात बघितलं तर ताबडतोप आपल्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात. तर हाच प्रश्न माझ्याही मनात सारखा येतो की असं कां असत ?
जर धार्मिक प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला आपण नाईट क्लबमध्ये बघितलं तर आपल्याला हे विसंगत का वाटावं? देव-धर्म करणाऱ्या व्यक्तिंनी अगदी सात्विक जीवन जगावं, आणि त्यांनी जीवनातल्या इतर गोष्टींचा आस्वाद न घ्यावा अशी अपेक्षा कां केली जाते? काही वेळा तर अशा व्यक्तींना ‘दुतोंडी’ समजलं जातं. दुतोंडी असणं आणि बहुगुणी व्यक्तिमत्व यात पुष्कळ फरक आहे.
आपल्या संस्कृती मध्ये तर आपल्याला बहुगुणी व्यक्तित्वाचं महत्व शिकवलं गेलं आहे . योग्य वेळी योग्य ‘टोपी’ घालून जो या संसारात वावरतो, तो पुष्कळ उंच झेप घेतो आणि जीवनात सफल होतो .
‘ नीती सार’ मध्ये एक पद आहे :
कार्येषु दासी , कारणेषु मंत्री , भोज्येषु माता, शैयनेषु रम्भा, रुपेषु लक्ष्मि , धर्मानुकूला क्षमया धरित्री, ।
भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा ॥
हे सहा गुण असलेली पत्नी सर्वश्रेष्ठ असते . याबाबत जर विचार केला तर आताच्या काळामध्ये हे नीती सार पुरुष आणि बाई दोघांवर लागू होतं आणि बहूगुणी व्यक्तिमत्व आपल्याला यश मिळवून देतं.
कुणाच्याही विचारसरणीवर आक्षेप घेण्यासाठी हा लेख लिहिवा हे उद्दीष्ट या लेखामागे नाही. मात्र या दिशेत विचार करायला काहीच हरकत नाही.
- ऐश्वर्या कोकाटे
http://www.marathicultureandfestivals.com/