बेसन मावा लाडू

Submitted by देवीका on 27 October, 2016 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

(इथे जो कोणता तुमच्या घरचा कप घ्याल, तोच इतर सर्व जिन्नस घ्यायला वापरा)

दिड कप रवाळ बेसन,
पाव कप कोमट दूध,
पाव कप मावा,
दोनच मोठे चमचे वितळून घेतलेले गाईचे तूप(माव्याचे तेल सुटेलच),
अर्धा कप बुरा साखर ( इथे बुरा साखरच अपेक्षित आहे, नाहितर घरीच तगार बनवू शकता ; कुठेही तुनळीवर तगार बनवायची कृती मिळेल)

वेलची पूड, केसर, काजू पूड,

क्रमवार पाककृती: 

कच्चे बेसन एका परातीत घेवून, कोमट दूध हळू हळू घालत त्याचे दाणेदार कण बनवा( जे ब्रेड क्रम्स सारखे दिसेल).

तूप एका जाड बुडाच्या पातेल्यात तापवा. जसे तापले की हे बेसन घालून भराभर आधी परतात घ्या. मग आच कमी करून भाजत बसा जोवर खमंग वास नाही येत.

ते काढून, मावा मंद आचेवर छान परता. मावा छान परतला तर लाडू टिकतील कमीत कमी ८-९ दिवस बाहेर.
आता मावा परतून तेल सोडले की त्यातच परत बेसन परता. आणि आच मंद ठेवा. सगळे एकजीव झाले की बंद करा आणि कोमट करायला मिश्रण ठेवा.

बुरा साखर नीट चाळू गुठळ्या मोडून घ्या. त्यातच वेलची पूड, केसर काड्या घाला. छान मिळून येतात.

वरील मावा बेसन मिश्राण कोमट असतानाच चाळळेली बुरा साखर घाला आणि रगडून मळा. बेदाणा लावून लाडू वळा.

अतिशय सुंदर, खुसखुशीत आणि नेहमीच्या बेसनाच्या लाडवापेक्षा वेगळ्या चवीचे लाडू बनतात.

मोतीचूराच्या चवीचे लागतात. पाकाशिवाय बनवायचे असल्याने कमी कटकट.

फोटो उद्याला.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मावा नसेल तर पेढे घाला , पण ते बाहेरचे पेढे ह्यांचा भरवसा नाही किती दिवस आणि काय घालून बनवले अस्तील.
वेळ असेल तर घरीच मावा बनवला तर उत्तम. दूध पावडरचा सुद्धा होतो मावेत.

साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त घ्या.

बुराच साखर का घ्यावी?
हि मऊ ओलसर व योग्य अशी रवाळ (भरड नाही) अशी असते. घरची साखर वाटून ती चव आणि टेक्स्चर येणार नाही. शिवाय पाकाशिवाय करायच्या कुठल्याही लाडवात हि बुरा साखर लाडू वळायला मदत होते. वर चव हि सुंदर लागते.

मावा नाही टाकला तरी असेच बेसन लाडून छान होतात.

आम्ही घरी लाडवात / पेढ्यात बुरा साखर कायम वापरतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खवा-रवा लाडू भयंकर आवडतात. हे पण भारीच लागत असतील. थांबवा रे थांबवा लाडवांच्या कृत्या लिहिणं Proud