सरांचा आणि मॅडमचा आक्रोश कानावर पडला आणि वरच्या मजल्यावरील मुलींच्या कक्षातील सगळ्या मुली आणि मुलांच्या कक्षातील सगळी मुले भेदरली. अंधारात एकमेकांचे हात घट्ट पकडून तशीच झोपून राहिली. अचानक खाली अंगणात मॅडम किंचाळत ओरडल्याचे ऐकू आले.
"असा कसा अपघात झाला हो विकासला!!!!"
हळूहळू, पावलांचे आवाज होऊ न देता त्यातल्यात्यात मोठी मुले गच्चीत येऊन लपून खाली पाहू लागली. त्यांची चाहुल लागल्यामुळे दोन, तीन मोठ्या मुलीही हळूच त्यांच्यामागे येऊन खाली पाहू लागल्या. मोठी मुले आणि मोठ्या मुली म्हणजे काय? तर सर्वात जास्त वय फार तर चौदा! तशी छोटीच! बाकीची मुले मुली तर आठ अन् दहाच वर्षांची!
खाली पोलिसखात्यातील काही अधिकारी उभे होते. त्यातील एक सरांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होते. सर हमसून हमसून रडत होते. अधिकारी त्यांना सांगत होते.
"सगळी पाहणी केली आम्ही, तीन तीन वेळा केली. पाय घसरल्याचेच कारण झाले. प्रत्येक मुलाला आणि मुलीला खोदून खोदून विचारले. लहान मुले तर भेदरून काही बोलूच शकत नाहीयेत. मोठ्या मुलांच्या सांगण्यात तसूभरही फरक नाही. मोहिते, दु:ख स्वीकारा, स्वतःला सावरा! दुर्दैवी अपघात झाला तुमच्या मुलाला! देवाची इच्छा! ह्यापलीकडे तपास म्हणून तसे काही करण्यासारखे नाही. आता बघा, तुमच्या मुलाला ही निवासातली मुलेच उलट म्हणत होती की तिकडे नको जायला खेळायला! पण त्याने ऐकले नाही. एकटाच धावत गेला. कमल आणि आसिफ त्याच्यामागे धावलेही! पण तेवढ्यात तो वर चढला आणि....जे झाले ते झाले मोहिते! आपल्या हातात काय असते? त्याचे आयुष्य तेवढेच होते म्हणायचे. येतो आम्ही"
पोलिसांची गाडी गेली आणि मोहिते मटकन् अंगणातल्या दगडावर बसले. अचानक पद्मा चवताळल्यासारखी उठली आणि मोहितेंसमोर उभी राहून त्यांचे खांदे गदागदा हालवत आणि किंचाळत म्हणाली....
"कुठंय विकास माझा? मला माझा विकास आणून द्या. ज्जा?? उठा...."
मोहितेंनी पद्माला जवळ घेतले आणि पद्मा त्यांच्या छातीवर डोके ठेवून आक्रोशत राहिली. मोहिते स्वतःही रडत होते. आजूबाजूची मंडळी आता पुढे सरसावली. बायकांनी पद्माला आत नेले. पुरुष मंडळी मोहितेंना धीर देत राहिली. वर गच्चीतल्या अंधारात घाबरून उभी असलेली मुले आणि मुली ते सगळे पाहून रडत होती, पण रडण्याचा अजिबात आवाज होऊ देत नव्हती. अचानकच पुन्हा घरातून पद्मा मॅडमची किंचाळी ऐकू आली. त्या म्हणत होत्या....
"ह्या कार्ट्यांना असंच मारायला पाहिजेन्, असं कसं जाऊ दिलं विकासला तिकडे?"
खूप वेळ विलाप चालला होता. शेवटी कधीतरी खालचे लाईट बंद झाले. मोहिते अंगणातच आडवे झाले. दोन तीन बायका पद्माबरोबर आत थांबल्या. बाकीचे लोक निघून गेले. तशी मग गच्चीतली मुले आणि मुले एकमेकांकडे भेदरून बघत आपापल्या कक्षात निघून गेली.
फार भलतंच घडलेलं होतं!
हा अनाथाश्रम सभोवतीच्या चार किलोमीटर त्रिज्येत सर्वांना व्यवस्थित माहीत होता. मोहिते, वय वर्षे साठ! दहा वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली! मूळचे कोकणातले! तिकडे नोकरी करत असतानाच अनाथ मुलांसाठी स्वतःच्याच एका प्लॉटवर दोन खोल्या बांधून घेतल्या. त्यात वीस मुले-मुली राहू लागली. स्वतःच्या पैश्यातून आणि प्रसंगी समाजाकडून मदत घेत मोहितेंनी तो आश्रम टिकवला, वाढवला, इतका वाढला की आता तिथे सत्तरच्या आसपास मुले-मुली! इतकेच नव्हे तर त्याच गावात आणखी एक आश्रमही काढला. तोही अश्याच मुलांसाठी! शासनाने त्या दोन्ही आश्रमांना कायदेशीर परवानगी दिली. पण गेली कैक वर्षे प्रचंड खटाटोप करूनही मोहितेंच्या पदरात अनुदानच पडले नाही. मुलामुलींचे बिचारे चेहरे पाहून त्यांना वार्यावर सोडावेसेही वाटेना! त्यातच मोहितेंच्या पत्नीला मूलबाळ नाही. तिने हीच मुले आपली मानली. मोहितेंना पेन्शन बर्यापैकी! आश्रमांचे महत्व समजल्यामुळे बड्या धेंडांनी मदतीचा ओघ सुरू केला. अन्नधान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य, खेळणी, काही इतर वस्तू ह्यांचा पुरवठा समाजातून होऊ लागला. नांव कर्णोपकर्णी झाल्यावर स्वतःहून मदत येऊ लागली. देणगीदार येऊन भेटू लागले. समाजात किती उदार माणसे असतात ह्याचा मोहितेंना अनुभव येऊ लागला.
पण एक शल्य होतेच! आपल्याला मूल नसल्याचे! मोहितेंना दिसू लागले होते. दोन्ही आश्रम परिसरात नांव मिळवून होते. आज ना उद्या शासन दखल घेणार आणि मागच्या बाकीपासून सगळे पदरात पडणार! मुले पार उस्मानाबाद, कोकण, आंध्र, कुठूनही आलेली! नातलगांनी आणून कायमची इथेच सोडलेली! त्यांना विशेष काहीच भवितव्य नाही. अश्यात हे आश्रम तर काही बंद पडणार नाहीत. मग हे सांभाळणार कोण? आपले नांव कोण काढणार आणि कोण लावणार? वयाच्या पन्नासाव्या वर्षी मोहितेंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, एक्कावन्नाव्या वर्षी पुण्यातल्या स्वतःच्या आणखी एका लहान जागेवर तिसरा आश्रम काढला आणि बावन्नाव्या वर्षी पद्मा ह्या तेहतीस वर्षीय विधवेशी दुसरे लग्न केले. खुलेआम! आधीच्या बायकोला सांगून! तिला काहीच हरकत घ्यावीशी वाटली नाही कारण तिच्यासाठी पहिले दोन आश्रम हेच आता आयुष्य होते.
मोहिते मात्र वीस दिवस पुण्यात आणि दहा दिवस कोकणात असे राहू लागले. दुसृया लग्नाच्या पहिल्याच वर्षात मोहितेंना विकास हा मुलगा झाला.
आता जबाबदारी वाढली. पद्माला शिवण उत्तम येत असे. तिने थेट शिवणाचे दुकानच टाकले. मोहितेंची अख्खी पेन्शन तीन आश्रमांच्या किमान गरजांवर जाऊ लागली. देणगीदार काय देतील ते निराळेच! कोणी पैसे तर कोणी धान्य, वस्तू असे काही द्यायचे.
काही वेळा असे होते की एखादा सेट अप स्थिरस्थावर झाला की त्याच्या अंगभूत पुण्याईवरच तो जगत राहतो. तसे पहिले दोन आश्रम ठीकठाक का होईनात पण चालत राहिले.
पुण्यात स्थिरस्थावर होणे मात्र अवघड जात होते. इथे आधीच सतराशे साठ संस्था होत्या अश्या! तरीही इकडून तिकडून मोहिते जुळवाजुळव करू लागले. आश्रमात मुलामुलींसाठी दहावीपर्यंत शाळा होती. एकुण मुले बत्तीस, चौदा मुले आणि अठरा मुली! पाचवी ते दहावी अशी शाळा ठेवली होती. शिकवणारे चौघेही स्वतःचा इतर काही ना काही व्यवसाय करतच असत. दिवसातून केवळ तीन तास ह्या शाळेसाठी ते देत असत. त्यांचाही त्यात एक स्वार्थ होता. उद्या अनुदान मिळाले तर आश्रमाच्या आरंभापासूनचे हजेरीपत्रक सादर करतआ येणार होते. घबाड मिळू शकले असते.
मात्र अर्थातच मोहितेंनी विकासला मात्र वेगळ्या शाळेत घातले. अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे ह्यासाठी!
विकासला लहानपणापासूनच हक्काचे मित्र आणि मैत्रिणी लाभल्या.
विकासच्या जन्मामुळे पहिल्या बायकोवरचे लक्ष कमीच झाले मोहितेंचे! पण तिची तक्रार नव्हती. ती दोन्ही आश्रम चालवण्यात पूर्णपणे बुडलेली होती. पद्मा मात्र चलाख होती. त्या दोन आश्रमांचा हिशोब मागत जा म्हणून मोहितेंना चाव्या मारत बसायची. कान भरायची. आपल्या आश्रमाला अश्या देणग्या का येत नाहीत म्हणून फुरंगटायची! आयुष्याची माध्यान्ह सरता सरता पद्माने दिलेली गोंडस भेट ही मोहितेंसाठी सबकुछ होती. त्यामुळे पद्माचा शब्द ते खाली पडू द्यायचे नाहीत. पहिल्या बायकोला सतावायला जायचे खरे, पण ते स्वतः आश्रम जसे चालवायचे त्याहीपेक्षा तिचे काम स्वच्छ असल्याचे बघून ते पद्मालाच सुनवायचे! पण पद्मा हार मानायची नाही. दोन महिन्यातून एकदा तरी मोहितेंना तिकडे पिटाळायची. इकडून फोन करून तिकडच्या चौकश्या करून भंडावायची! इकडे येणार्या देणगीदारांशी अतिशय प्रेमाने वागायची. मात्र मोहिते आणि देणगीदारांची पाठ वळली की पद्माचे खरे स्वरूप वर राहणार्या मुलांना समजायचे. त्यांच्यात खेळत असणार्या विकासला जोरजोरात हाका मारून पद्मा खाली बोलवायची. तिची स्टँडर्ड वाक्ये ठरलेलि असायची अश्या वेळी:
"विकू, खाली ये राजा, कितीवेळचा वर बसलायस! अरे ती गरीब असल्यामुळे आपल्याकडे राहायला आलेली मुले आहेत. सारखा त्यांना त्रास देऊ नकोस. त्यांना कोणी नाही म्हणून इथे येतात. तुला आहोत की नाही आम्ही? मग इथे खेळत जा बरे तू?"
विकासला ह्यातील काहीही कळू शकणार नाही अश्या त्याच्या वयातही ती असेच बोलायची. त्याला थोडेफार आणि नंतर बर्यापैकी कळू तेव्हाही ती अशीच बोलत असे!
विकासला हे आवडत नसे. त्याला इतकी मुले आणि मुली पाहून त्यांच्यातच रमावे असे वाटायचे. त्यांचे खेळ तरी किती निरनिराळे असायचे. खाली गेले की फक्त कसला तरी मेकॅनो जोडायचा नाहीतर गाड्या नाहीतर एकट्यानेच बॉल खेळायचा. पण आईपुढे त्याचे चालायचे नाही.
विकास रात्री वर राहायचा हट्ट मात्र करायचा नाही. एकदाच त्याने ती मागणी केली आणि आईने असे काही बघितले होते त्याच्याकडे की त्याची परत हिम्मतच झाली नाही.
मात्र आता कोकणातील आश्रमांमध्ये अचानक देणग्यांचा ओघ वाढला. ते पाहून पद्माचा आणखीनच जळफळाट झाला. पण परिणाम असा झाला की त्या आश्रमांची अवस्था सुधारण्यासाठी आता मोहिते बराच काळ तिकडे राहू लागले. महिन्यातून दहा बारा दिवसच पुण्यात असायचे. एक प्रकारे पद्माला मोकळे रान मिळाले. तिने दुकानाचे काम घरातून सुरू केले. 'आश्रमावर लक्ष कोण ठेवणार' ही सबब सांगितली. शिक्षक कर्मचारी दहा वाजता येऊन दोन वाजता निघून जायचे. आश्रमावर लवकरच पद्माची निरंकुश सत्ता स्थापन झाली.
तिचे स्वारस्य इतकेच होते की ह्या आश्रमाला देणगी स्वरुपात खूप काहीकाही मिळत राहावे आणि आपण आरामात बसून ऑर्डरी सोडाव्यात. त्यामुळे देणगीदार दारावर आले तर ती अशी काही वागायची की मोहितेंना मिळाली नसती अशी देणगी तिला मिळायची. पण तिची खंत अशी होती की प्रत्यक्ष पैसे कमी मिळायचे, अन्नधान्य आणि वस्तू वगैरे जास्त मिळायच्या.
देणगीदारांसमोर किंवा कोणत्याही परक्या व्हिजिटरसमोर कसे वागायचे ह्याचे एक प्रशिक्षणच तिने मुलामुलींना देऊन ठेवलेले होते. त्यात नमस्ते म्हणणे, थँक्यू म्हणणे, सगळे खूप छान छान आहे असा चेहरा करणे, खूप आनंदाने हसत राहणे, विचारलेल्या प्रश्नांवर थेट उत्तर न देता एकमेकांकडे लाजून पाहात हसणे, जेणेकरून विचारणार्याला वाटेल की किती बिचारी मुले आहेत वगैरे! मुले बिचारीच होती, पण ती फारच बिचारी आहेत हे दाखवण्याचा विचारीपणा पद्मा करत होती. स्टँडर्ड वाक्ये मुलांना शिकवून ठेवली होती, देणगीदार निघाले की 'सर परत या हां, मॅडम परत या हां, आम्ही वाट बघतोय' वगैरे! देणगीदार आणि मुले आपल्या अपरोक्ष एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत हे पद्मा जातीने पाहायची. देणगीदारांसमोर पद्मा हटकून एक दोन मुलामुलींना जवळ घेऊन कुरवाळायची! कुरवाळल्यानंतर त्या मुलामुलींनीही खूप आनंद झाल्यासारखा चेहरा करायचा असतो हेही शिकवून ठेवण्यात आले होते. बत्तीस मुलांना कसे खायला घालायचे सांगा येथपासून ते 'साधी कछुआछाप अगरबत्ती नाही' येथपर्यंत पद्मा काहीही खपवायची. दारावर आलेला देणगीदार आणखी काहीतरी कबूल केल्याशिवाय जाणार नाही इतके ती नक्की पाहायची. मुळात दारावर यायचेच कमी लोक हा वेगळा प्रश्न होता.
एकदा कोणीतरी खूप कपडे घेऊन आले. देणगीदार निघून गेल्यावर मुलामुलींनी त्यावर उड्या टाकल्या. विकासही धुडगूस घालत कपडे बघू लागला. ते पाहताच पद्माने त्याला दोन धपाटे दिले आणि ओरडली.
"भिकारीयस का? तुला आम्ही कपडे आणत नाही?"
दोनच वाक्ये! पण तेहतीस निरागस मनांमध्ये एक केवढी मोठी दरी तयार करून गेली ती वाक्ये! अचानक बत्तीस मुलांचा ते कपडे पाहण्यातील उत्साह ओसरला. मुले कपडे नुसती चिवडत बसली. ते पाहून पद्मा पुन्हा खेकसली.
"माधवी, प्रत्येक कपडा हातात घे आणि कोणाच्या साईझचा आहे ते बघून त्याला दे! हे कपडे आजपासून आपापल्या कक्षात घालायचे."
विकास थिजून तो सोहळा पाहत राहिला. विकास अश्या प्रकारच्या वातावरणात वाढू लागला.
एके दिवशी एक वॉशिंग मशीनच आले. वापरलेले, पण सुस्थितीतील!
पद्मा हरखली. आश्रमातील मुलेमुली आपापले कपडे धुवायची. त्यांच्यासाठी ते मशीन आहे असे देणगीदार म्हणालेले होते. देणगीदाराची पाठ फिरल्यावर पद्माने त्याच मुलांच्या मदतीने ते स्वतःच्या घरात नेऊन फिट करून घेतले.
एकदा एक कंप्यूटर आला. त्याबरोबर प्रिटंरही आला. शालेय शिक्षणासाठी, ह्या नावाखाली! दोन्ही पद्माच्या घरात गेले.
एकदा तर मोहिते असतानाच मॅगी नूडल्सची पाकीटे, सहा प्रकारची कडधान्ये, रवा आणि साखर असे मुबलक प्रमाणात आले.
मॅगी नूडल्स म्हणजे काय ते काही मुलामुलींना नक्कीच माहीत होते. त्यांनी ते बाकीच्यांना सांगितले. उद्याला नाश्ता नूडल्सचा असणार ही वदंता वरच्या मजल्यावर पसरली. सकाळी बघतात तर वरणभात आणि कोरा चहा! हिरमुसलेली मुले खाऊन उठताना कोणालातरी दिसले, पलीकडच्या खोलीत विकास नूडल्स खात आहे. विकासने पटकन् डिश स्वतःच्या पाठीमागे लपवली. पण सायली नावाच्या मुलीने सगळ्यांसमोर पद्माला विचारले.
"मॅडम नूडल्स का नाही दिले आज?"
दोन क्षण असे होते की पद्मासकट सगळेजण थिजलेल्या पुतळ्यासारखे एकमेकांकडे बघत राहिले. हा प्रश्न विचारण्याची हिम्मत केली जाईल हेच पद्माला वाटलेले नव्हते. त्यावरच त्या सायलीने आणखीन एक प्रश्न विचारला.
"विकासला मिळाले की नूडल्स?"
त्या बाल्याला कोण सांगणार की विकास रक्ताचा मुलगा होता आणि ती अनाथ होती. पद्मा कडाडली.
"गिळायला मिळतंय ना? आईबापांना विचारलेत का हे प्रश्न कधी? जा अभ्यासाला लागा"
पद्माच्या अवताराकडे पाहून पोरे पळाली खरी, पण दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे विकासला समजून चुकले की तो स्वतःला त्यांच्यातलाच एक मानायचा ते चुकीचे होते. तो कोणीतरी भव्यदिव्य होता. आणि दुसरे म्हणजे 'प्रश्न विचारला गेला हे होताच कामा नये अशी धडकी भरायला हवी' हे पद्माच्या मनाने घेतले. त्या दिवशी संध्याकाळी खालच्या मजल्यावर बोलावल्या गेलेल्या सायलीच्या दबक्या आवाजातील किंकाळ्या बाहेर कोणी ऐकल्या नसल्या तरी विकास, पद्मा आणि वरच्या मजल्यावरच्या सगळ्या मुलामुलींनि ऐकल्या. मार देणारे होते खुद्द मोहिते!
"आई घले, काकानी ठेवलेत का नूडल्स तुझ्या? तुमच्या नरड्यात कितीही ओता, तुम्ही भिकारडेच!"
वगैरे वगैरे!
सायलीला शिव्या देऊन मारताना अजिबात वाईट वाटू नये इतपत परिवर्तन मोहित्यांमध्ये केवळ पद्मामुळे झालेले नव्हते. आपण थोर विभुती आहोत हा माजही त्याला कारणीभूत होता. ही कोण कुठली भिकारडी पोरे आणि आपण आहोत म्हणून आपल्याच घरात येऊन आपल्यालाच जाब विचारतात? मोहितेंमधील राक्षस जागा व्हायला विकासचा जन्म, समाजाने त्यांच्या कार्याचा केलेला गौरव, पद्माने कान फुंकणे, आयुष्यभर समाजासमोर मान झुकवताना दडवलेला संताप आणि पद्माचे शरीर अशी अनेक कारणे होती.
कार्य खरंच चांगले होते. ज्यांना कोणीही नाही अश्यांना तेथे सन्मानपूर्वक आणि कोणतेही शोषण न करता सांभाळण्यात आलेले होते. पण 'दरी' कायम ठेवणे हे अगदी हुकुमीपणे केले जात होते. एकाच वयाच्या दोन मुलांना एखाद्या गोष्टीबाबत समान आकर्षण वाटू शकते हे मान्य करण्याचे मानसिक औदार्य नव्हते राहिलेले, किंवा कधी नव्हतेच!!
'सरही मारतात' आणि 'मुलींनाही मारले जाऊ शकते' हा अनुभव नवीन होता. माधवीने सायलीला कुशीत घेऊन रात्र जागवली होती. कोण होत्या त्या एकमेकांच्या? अजून तर त्यांची 'स्त्री असण्याचे किती धोके असतात' ह्या विषयाशी ओळखही झालेली नव्हती. त्या आधीच मनावर खोल परिणाम करणार्या ह्या घटनांनी हृदये विदीर्ण होत होती.
'आपण आणि विकास वेगळे आहोत' हा सर्वात मोठा धडा ती मुलेमुली त्या शाळेत शिकली.
आश्रम आणि आश्रमातील मुलेमुली दरिद्री अवस्थेतच राहणे हे आश्रमाला अधिकाधिक मदत मिळण्यासाठी अत्यावश्यक होते हा पद्माचा आणखीन एक फंडा होता. पण देणगीदारांच्या अपरोक्ष तरी त्या मुलामुलींना सहज म्हणून काही अद्भुत क्षण अनुभवायला द्यावेत इतकी दिलदारी नव्हती कोणातच!
टीव्ही पाहायला आठवड्यातून दोन दिवस खाली येता यायचे मुलामुलींना!
रिमोट विकासच्या हातात असायचा. समोर काय चाललेले आहे ह्याचा गंधही नसणारा विकास मग वाट्टेल तसे सर्फिंग आणि तेही काहीही कळत नसताना, करत राहायचा. मुलेमुली त्या पोरकटपणाचे खूप्पच हसू येत आहे असे दाखवायची आणि जे काय थोडेफार दिसेल त्यावर समाधान मानायची. विकासला वाटायचे की आपल्या तालावर सध्या बत्तीसजण नाचत आहेत. मग तो विचित्र अंगविक्षेप वगैरे करत रिमोट वापरू लागायचा. नाचताना एखाद्याला उगीच थप्पड वगैरे मारायचा. मार खाणारा क्षणभर हिंस्त्र व्हायचा आणि मॅडमकडे बघून खळखळून हसू लागायचा पण मग लांब बसायचा.
विकासमध्ये फरक पडू लागला होता.
एकदा एक संघटना आली. ते लोक म्हणाले की आम्ही तुम्हाला व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनसाठी लागणारे सगळे साहित्य घेऊन देतो. मोहितेंनी स्पष्ट नकार दिला. मोहिते म्हणाले:
"सर आश्रम चालवताना मेटाकुटीला येतोय. मुलांना खेळायला साहित्य द्याल तुम्ही, अहो पण खायला काय घालू?"
काही मुलामुलींनी ह्या वाक्यावर फार अर्थपूर्णपणे आणि सूचकपणे एकमेकांकडे पाहिले, जे देणगीदारांच्या नजरेतून सुटले. मोहिते पुढे म्हणाले:
"इथे मैदान नाही. मैदान ते टेकाड चढून झाल्यावर आहे. आता मला सांगा, रोज संध्याकाळी तिथे जाऊन नेट लावायचे, मग मुलं खेळणार, मग ते नेट काढणार आणि अंधारात परत येणार. कुठे काही झाले, तर काय करायचे हो सर? मी हात जोडून सांगतो, भले काम करत आहे मी, फक्त धान्य द्या आम्हाला"
मोहितेंचे 'तितके हात जोडणे' मात्र पद्माला फार आवडायचे. देणगीदार भाषणाने खुळे होऊन धान्य देऊन जायचे.
कडधान्ये खाऊन विकास होत होता रगेल आणि मुलामुलींचे चेहरे 'आम्ही विनंती केली नसताना आम्हाला जन्माला का घातले' ह्या अर्थाचे!
एकदा मोहितेही नव्हते आणि पद्माही!
एक देणगीदार आले. शिक्षक त्यांना मुलामुलींचा कक्ष दाखवायला घेऊन गेले. हे कक्ष सगळ्यांनाच दाखवले जात! देणगीदारांनी मुलामुलींना प्रश्न विचारले.
"आम्ही मुलांना एक आणि मुलींना एक असे दोन टीव्ही दिले तर?"
प्रशिक्षित शोषितांनी उच्चारवात आपली कमनशीबी सिद्ध केली.
"हो स्सर, द्या ना, आम्ही रोज पाहू आणि सर, तुम्ही दर सन्डेला येत जा ना????"
देणगीदार खुष होत आहे तोवर विकास बडबडला.
"खाली टीव्ही बघतात हे"
खरे तर एक प्रकारे त्याचे बरोबर होते हे त्यालाच माहीत नव्हते. टीव्ही बघताना सेन्सॉर आवश्यक होते. खाली टीव्ही बघण्यामुळे ते शक्य होते. पण खाली तो स्वतः कोणाला टीव्ही बघूच देत नव्हता.
पण देणगीदारांना ती देनगी देण्यातला फोलपणा समजला. ते काहीतरी कारण काढून निघून गेले. ही बातमी ना मोहितेंना समजली ना पद्माला!
पण मुलामुलींना जे वाटायचे ते वाटलेच!
'माझ्या राज्यात येऊन माझ्या मर्जीप्रमाणे टीव्ही बघणार्या भिकार्यांनो, कोणी उपटसुंभ आला म्हणून तुम्हाला स्वतंत्र टीव्ही मिळावेत काय?"
ही ती भावना होती जी बालिश मनाला शब्दबद्ध करता येणे शक्य नसले तरी व्यक्त करता येत होती.
विकासमध्ये आणखी फरक पडू लागला.
आता मुद्दाम तो अश्या गोष्टी खात खात वर यायचा ज्या त्या मुलामुलींना मिळायच्याच नाहीत. खुदकन् हसायचाही!
एकदा दोन सायकली आल्या. एक दुचाकी आणि एक लहान मुलांची तीनचाकी! मोहितेही होते. देणगीदार गेल्यागेल्या विकासने दुचाकी सायकल स्वतःच्या घरात न्यायला सुरुवात केली. रुपेशने त्याला अडवले आणि म्हणाला:
"तुला चालवताबी यत नाय, तू कुटं घ्यून चाललाय?"
मोहिते काहीच बोलले नाहीत. आजूबाजूच्यांसमोर रुपेशला काही बोलणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे! मोहिते म्हणाले:
"ए विकू बाळा, तू कशाला घेतलीन् ती सायकल, राव्हदे इथं, थांब मी नेतो"
मोहितेंनी सायकल स्वतः उचलून घरात नेली. कोणाची हिम्मत नव्हती त्यांना प्रतिप्रश्न विचारण्याची!
रात्री जेव्हा मोहिते रुपेशला खाली बोलून झापत होते तेव्हा लहानश्या विकासने काहीही नीट समजत नसूनही रुपेशला एकुण चार फटले लगावले.
कार्य चांगलेच होते. पण ते कार्य एक 'उपकारकर्ता' म्हणून करण्यात येत होते, एक समदु:खी म्हणून नव्हे!
असेच एक दिवस मोहिते आणि पद्मा नसताना विकास टेकाडावर धावला. मागून अर्थातच माधवी धावली. तिचा जोर आणि वेग खूपच जास्त होता. तिने विकासला आवळून धरले. तो तिच्या हातांच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न केवळ ह्या कारणासाठी करत होता की त्याच्यामते त्याला अक्कल शिकवण्याची तिची लायकी नव्हती. पण तिला माहीत होते की तिची लायकी होती. तिने जिवाच्या आकांताने त्याला आवळून धरले आणि मोठ्या मुलांना हाका मारायला सुरुवात केली. एक क्षण असा आला की चौदा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान असलेल्या सुमारे सहा सात मुलेमुली तिथे जमा झाल्या. विकासला आता सहज आवरता येत होते. पण विकासला धरून ठेवणार्या हातांमधील धरून ठेवण्याची इच्छाशक्ती क्षणाक्षणाला कमी कमी होत होती. नजरा एकमेकांत गुंफल्या जात होत्या. संदेश दिले-घेतले जात होते. कोणत्यातरी क्षणाला विकासला धरणार्या सगळ्यात मोठ्या मुलाकडे, म्हणजे धन्याकडे बघत माधवीने मान हालवली.
धन्याचे हात सुटले. विकास त्या स्पॉटला गेला. मागे बघून सगळ्यांना म्हणू लागला.
"इथे येऊन दाखवा. तुम्हाला परवानगी नाही. पण मला आहे. मी इथे येऊ शकतो."
तो हे बोलत असतानाच जणू पावित्र्यात क्षणभरासाठी अपवित्रतेने शिरावे तसे सगळे पुढे झाले. नेमके कोणाचे हात त्याच्या पायाला लागले ते समजले नाही, पण ........
विकास मोहितेचे छिन्नविच्छिन्न प्रेत तेवढे रात्री खाली कुठेतरी मिळाले........
त्या स्पॉटपर्यंतच्या चिखलात मिळालेल्या पावलांच्या खुणा ह्या 'विकासला कसेबसे वाचवू पाहणार्यांच्या' पाऊलखुणा ठरल्या.
===================
-'बेफिकीर'!
Bapre......agdi sunna zale he
Bapre......agdi sunna zale he vachun .....mulana sambhalane n tyavar sanskar karne he kiti kiti mothe ani jababdariche kam aste he kalte yatun .....mg ti aapli mule aso va dusryachi.
Befi tumche lekh khup vichar
Befi tumche lekh khup vichar karayla lavnare astat ...
Agdi aat jaun bhidtat ....hats off to you...
तुमच्या कथा, कादम्बर्या खुपच
तुमच्या कथा, कादम्बर्या खुपच मस्त असतात..!!! मी अगदी तुमचा 'फ्यान' झालेलो आहे..!! तुमच्या सगळ्या कादम्बर्या मी खुप आवडीने वाचतो..!!! तुमची लेखन शैली खुपच 'भन्नाट' आहे...!! मी वाचलेल्या सगळ्या कादम्बर्या या पुर्ण झालेल्या आहेत, त्यातल्या त्यात 'अन्या' ही कादम्बरी अपुर्ण आहे...!! एक वाचक म्हणुन तुम्हाला 'रिक्वेश्ट' करतो कि, क्रुपया तेवढी एक कादम्बरी पुर्ण करा, प्लीज....!!!
खुप्च छान
खुप्च छान
मस्त जमलिए कथा...
मस्त जमलिए कथा...
मस्त कथा आवडली.
मस्त कथा आवडली.
भारी कथा आहे! कळत नकळत आपण
भारी कथा आहे! कळत नकळत आपण मुलांना काय काय शिकवत असतो !
मस्त आहे कथा
मस्त आहे कथा
छान आहे कथा. मानवी स्वभाव आणि
छान आहे कथा. मानवी स्वभाव आणि त्याचा लहान मुलांच्या संस्कारक्षम मनावर् होणारा परिणाम/दुष्परिणाम सुंदररित्या मांडलं आहे.
खूप अस्वस्थ करणारे. परिस्थिती
खूप अस्वस्थ करणारे.
परिस्थिती पाहिली नसली तरी यातून बरेच काही शिकले.
बराच विचार करायला लावणारे.
अतिशय दुर्दैवी. वाईट जास्त
अतिशय दुर्दैवी. वाईट जास्त वाटले की कदाचित तुम्ही ही कथा तूमच्या निरिक्षणातुन लिहिली असेल आणी थोडेफार असे सगळ्याच अनाथाश्रमात होत असावे. म्ह्णजे दुजाभाव, असमानता, अपमान. लहान मुलान्ची मने पटकन दुखावतात.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा वचपा पोरांनी नकळत चांगलाच काढला की.
साहब भी मरा और लाठी भी नाही टूटी.
कथा नेहमीप्रमाणेच छान आणि विचार करायला लावणारी आहे बेफि.
मी पण तुमच्या लिखाणाची FAN आहे.
बेफी, अगदी जिव्हारी
बेफी, अगदी जिव्हारी लागण्यासारखं लिहिता तुम्ही.
वाचुन सुन्न झाले.
Befikir ji... Aplya sarv
Befikir ji... Aplya sarv kadambarya vachlya.. Kahini rad rad radvla.. Kahine khup hasval.. Kahine agdi romanch ubhe ke angavar.. Tar kagine bhay... Khup bharavun taknare likhaan ahe tumche... Khup awadle.. Majhyasarkhya vachanvedila tar khadya milvun dilet vachnyache.. Abhaar.. va pudhil lekhnas shubhechcha
वाचुन सुन्न झाले.>>> + १
वाचुन सुन्न झाले.>>> + १
बापरे! अस्वस्थ करणारे लेखन!
बापरे! अस्वस्थ करणारे लेखन!
वाचुन सुन्न झाले.>>>>>१
वाचुन सुन्न झाले.>>>>>१