Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2016 - 14:27
तनाला मुक्त अंगण पाहिजे आहे
मनालाही न कुंपण पाहिजे आहे
खुज्या ठरतील आयुष्या तुझ्या इच्छा
नभालाही नभांगण पाहिजे आहे
तिचे कुठलेच कारण का पटत नाही
मला ह्याचेच कारण पाहिजे आहे
स्वतःचे एवढे होऊ नये कोणी
मला थोडे 'तुझेपण' पाहिजे आहे
अरे आला म्हणेतोवर पुढे गेला?
'जरा थांबेल' तो क्षण पाहिजे आहे
इथे प्रत्येक व्यक्तीची अवस्था ही
नको आहे, तरीपण पाहिजे आहे
बिचारी चुंबनांनी गुदमरत जगते
तिला भलतेच दडपण पाहिजे आहे
तपासावे स्वतःला शिंपडत जगभर
कुणाला कोणता कण पाहिजे आहे
इतरजागी कुणालाही मिळू शकते
घरामध्येच घरपण पाहिजे आहे
'स्वतःचा फक्त' प्रत्येकास वाटे जो
अश्याला आपलेपण पाहिजे आहे
नको आहेत स्वप्ने, स्वप्न ठरणारी
मला निरपेक्ष जाग्रण पाहिजे आहे
अवेळी येत उलथापालथी घडवे
असा 'बेफिकिर' श्रावण पाहिजे आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिचे कुठलेच कारण का पटत
तिचे कुठलेच कारण का पटत नाही
मला ह्याचेच कारण पाहिजे आहे
स्वतःचे एवढे होऊ नये कोणी
मला थोडे 'तुझेपण' पाहिजे आहे
इतरजागी कुणालाही मिळू शकते
घरामध्येच घरपण पाहिजे आहे
>>
व्वाह ! मस्त शेर !