फ्री...? : भाग २

Submitted by पायस on 10 October, 2016 - 14:44

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60399

बॉम्बे, एप्रिलचा पहिला आठवडा, १९११

एकेकाळी बॉम्बे व पूना ही दोन मुख्य शहरे एकमेकांशी जोडलेली नव्हती. तशी गरजही नव्हती म्हणा. बॉम्बे ब्रिटिशांचे पश्चिम किनार्‍यावरचे मुख्य ठाणे. गंमत म्हणजे इंग्रजांनी हे जिंकून वगैरे घेतलं नाही. १६६१ मध्ये इंग्लंडच्या राजाने एका पोर्तुगीज राजकन्येशी लग्न केले व त्याला ही बेटे हुंडा म्हणून मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत बॉम्बे इंग्लंडच्या अखत्यारीत होतं. पूना अथवा पुणे शहराची गोष्ट मात्र वेगळी होती. पेशवाईचा पाडाव होईपर्यंत इंग्लिश संस्कृतीचा जेमतेम स्पर्शच पुण्याला झाला होता. त्यानंतर मात्र इस्ट इंडिया कंपनीने पुण्याचे पश्चिम भारतातील एक ठाणे म्हणून स्थान लक्षात घेऊन पुण्याला इतर शहरांशी जोडण्याचे काम सुरु केले. जीआयपीआरची अर्थात ग्रेट इंडियन पेनिन्शुलार रेलवेची स्थापना या व अशा जोडकामांसाठी तर झाली होती.
ख्रिस व अ‍ॅलेक्सी ट्रेन निघेपर्यंत जीआयपीच्या इतिहासाची उजळणी करत होते. जोसेफला मात्र ही चर्चा भयंकर कंटाळवाणी आणि निरर्थक वाटली. पाच मिनिटं पटकन पाय मोकळे करून यावेत असा विचार करून तो बाहेर पडला. स्टेशनवर बर्‍यापैकी गर्दी होती. ते तिघे फर्स्ट क्लासच्या डब्यात असल्याने तिथे या गर्दीची अजिबात कल्पना येत नव्हती. सेकंड व थर्ड क्लासचे डबे मात्र भारतीयांनी भरलेले होते. पण या सगळ्यात तो युरोपियन जोसेफच्या नजरेत भरला. सोनेरी केस, साधारण जोसेफ एवढी उंची व खांद्यावर बसलेला पोपट. तो जोसेफच्याच दिशेने येत होता. त्याच्या चालीत एक प्रकारचा डौल होता पण ती चाल इंग्लिश नव्हती. अगदी स्कॉटिश किंवा वेल्शही नव्हती. तो झपाझप पावले उचलत जोसेफजवळ आला तसे जोसेफने प्रतिक्षिप्त क्रियेने कोटाच्या आतल्या खिशात लपवलेल्या पिस्तुलाशी हात नेला. तो जोसेफपाशी येऊन थांबला आणि ....
"गुड मॉर्निंग! कॅन यू हेल्प अस?" त्या पोपटाने पंख फडफडवत विचारले. एक मिनिट काय? पोपट कसा बोलेल? त्या माणसाने गुड मॉर्निंग करताना आपली टोपी किंचित उंचावली खरी पण त्याच्या ओठांची हालचाल झालेली दिसली नाही. याउलट त्या पोपटाने चोचेची उघडझाप केलेली दिसून येत होती. तो आवाजही एखाद्या पोपटासारखाच रखरखीत होता.
"पार्डन अवर रुडनेस फॉर नॉट इंट्रोड्युसिंग अवरसेल्व्हज. मी पॅपी द पॅरट आणि हा माझा पाळीव मनुष्य डेव्हिड. डेव्हिड मला पूनाला घेऊन चालला आहे आणि आम्ही फर्स्ट क्लासचा हा कंपार्टमेंट शोधत आहोत. कॅन यू हेल्प अस?"
जोसेफ पूर्णपणे गोंधळून गेला होता. हा नक्की काय प्रकार आहे? एकतर हा माणूस काही बोलत नाहीये पण याचा पोपट बोलतो. बोलके पोपट असतात असं त्याने कधीतरी ऐकलं होतं पण प्रत्यक्ष पाहण्याची त्याची पहिलीच वेळ होती.
"मिस्टर पॅक्स्टन," मागून अ‍ॅलेक्सीचा आवाज ऐकून त्याला थोडं हायसं वाटलं. अ‍ॅलेक्सीही डेव्हिड व पॅपीकडे पाहतच राहिला. पॅपीने पुन्हा एकदा कंपार्टमेंट शोधून देण्यास मदत मागितली. अ‍ॅलेक्सी देखील क्षणभरच का होईना दचकला पण लगेचच तो पुन्हा एकदा पूर्ववत खानदानी वॅलेट मोडमध्ये गेला. व्हेरी वेल, म्हणून त्याने डेव्हिड व पॅपीला त्यांचा डबा शोधून दिला आणि मग जोसेफ बरोबर ट्रेन सुटण्याच्या अगदी मिनिटभर आधी आपल्या डब्यात परतला. ख्रिसला जोसेफने सर्व किस्सा जसा घडला तसा सांगितला. ख्रिस हे ऐकून काही क्षण विचारात पडला. ट्रेनमध्ये इतरही युरोपियन होते पण बोलका पोपट घेऊन फिरणारा कोणी असेल असं त्याला वाटलं नव्हतं. ट्रेन स्टेशनातून बाहेर पडली. काही वेळ ख्रिस दोन्ही तळवे जोडून, त्यांचा कपाळाला टेकू देऊन बसून होता. मग त्याच्या चेहर्‍यावर मंद स्मित आले.
"व्हेंट्रिलोकिस्ट!" जोसेफ आणि अ‍ॅलेक्सी त्याच्याकडे बघू लागले.
"पुढच्या वेळेस जर तो दिसला तर त्याच्या पोपटाने विचलित होऊ नका. त्याच्या ओठांकडे बघा. ते हलले नाहीत तरी विलग नक्की होतील. त्याच्याकडे आवाज फेकण्याची कला आहे."
"ख्रिस समजा तो व्हेंट्रिलोकिस्ट आहे तरी मला त्याच्यापासून एक प्रकारची असुरक्षितता जाणवली तिचे काय? का केवळ तो पोपट आणि त्याचं अचानक बोलणे मला अस्वस्थ करत होते?"
"आय होप दॅट्स द केस जोसेफ. आय होप दॅट्स द केस."
ख्रिसने खिडकीतून बाहेर नजर टाकली. अजूनही बॉम्बेतली घरे दिसत होती. त्यांचा पहिला थांबा ठाण्याला होता. मग कल्याणला ट्रॅक बदलून पुण्याच्या दिशेने जायचे होते. पुण्यास आणखी काय काय वाढून ठेवले होते?

~*~*~*~*~

"इट्स शो टाईम"

राजाराम काहीसा अवघडूनच बसला होता. वय विचाराल तर हल्ली हल्लीच त्याच्या चेहर्‍यावर पुरुषी लक्षणे दिसू लागली होती. त्याने रुमालाने आपल्या कपाळावरचा घाम पुसला. तसा त्या तंबूत प्रकाश मंदच होता. त्यामुळे नक्की कोण कोण बसलं आहे हे कळायला मार्ग नव्हता. तो आत्ता पेठांच्या बाहेर पार शहराच्या एका टोकाला आला होता. नटराजा सर्कस हे नाव वाचून तो सहज कुतुहल म्हणून तिथे आला होता. पण तिला पाहून त्या कुतुहलाची जागा दुसर्‍या कुतुहलाने घेतली. तिचा चेहराही त्याला नीट दिसला नव्हता. तिने लाल रंगाची साडी नेसली होती आणि चेहरा पदराने झाकून घेतला होता. तिकिटाच्या रांगेत लागण्यापूर्वी त्याला ती दिसली होती. खरं तर त्या स्थळी ती काही मुख्य आकर्षण नव्हती, असण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरी का कोण जाणे राजारामला ती आणि तीच दिसत होती. आधी सर्कसच्या आकर्षणाने आलेला राजाराम आता ती कधी स्टेजवर येते याची वाट बघणार होता.
समोर वीरभद्र विविध रंगी पोषाखात उभा होता. त्याचा प्रवेश दिमाखात झाला होता. एका घोड्यावर उभा राहून तो स्टेजवर आला होता. घोड्याने स्टेजला दोन गोल चकरा मारल्यावर तो उडी मारून खाली उतरला. कमरेत झुकून त्याने प्रेक्षकांना अभिवादन केले.

"इट्स शो टाईम!"

नटराजा सर्कसचा पुण्यातला पहिला शो सुरु झाला होता.

~*~*~*~*~

पुण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी,
सर मॅक्सवेल यांच्या निवासस्थानी

ख्रिस व जोसेफने घरामागच्या बागेत प्रवेश केला. बागेत छोटीशी शेड होती व तिथे सर मॅक्सवेल त्यांची वाटच बघत होते. तिथून येणारा चहाचा वास ख्रिसला स्वतःकडे बोलवत होता. तर जोसेफला टॉटी स्कोन्स खुणावत होते. हेन्रींनी त्यांना बसण्यास सांगितले व लगेचच त्यांच्या बटलरने चहाचे कप भरले व त्या तिघांची रजा घेतली. सोनेरी रंगाचे नक्षीकाम केलेल्या काळ्या रंगाच्या कपात चहा अजूनच गडद वाटत होता. ख्रिसने हलकेच वास घेतला - वाह! दालचिनी व पुदिना! चहाचा ब्लेंड दार्जिलिंगच्या जवळपासचा होता. कदाचित थोडा अर्ल ग्रे मिसळला असावा. पण म्हातार्‍याच्या मनाप्रमाणेच आजच्या चहाचा नीट अंदाज येत नव्हता. तरीही ख्रिसला हा चहा आवडला.
"चहा दार्जिलिंगच आहे ख्रिस! ही दार्जिलिंग जवळच्या एका आसामी मळ्यातून आलेली व्हरायटी आहे. प्रत्येक वेळेस मी काही लपवतच आहे असे नाही. त्यामुळे जास्त विचार केलास तर उत्तर समोर असूनही दिसणार नाही."
ख्रिसने चहाचा आणखी एक घोट घेतला. जोसेफने स्कोनला क्रिम लावता लावता त्याच्याकडे बघितले. त्याच्या नजरेने ख्रिसला मूक संमती दिली. मग ख्रिसने कप खाली ठेवला.
"तसं असलं तरी तुम्ही आम्हाला सर्व काही सांगत आहात अशातलाही भाग नाही."
हेन्रींच्या कपाने बशीला हलकेच स्पर्श केला. तेवढ्याने सुद्धा ऐकू जाईल असा टण् आवाज झाला. त्यांनी देखील कप खाली ठेवला. त्यांचा चेहरा हलकाच वाकडा झाला आहे असे जोसेफला वाटले. काही क्षण ते तिघे एकमेकांकडे बघतच राहिले. मागून वाहणारा वारा वगळता कसलाही आवाज होत नव्हता. हेन्रींनी या शांततेचा भंग केला.
"ग्रेग!!" त्यांनी आवाज किंचित उंचावून साद दिली. कुठून तरी तो बटलर अचानक उगवला. त्याच्या तत्पर प्रतिक्रियेकडे बघून ख्रिसने मनोमन सलाम ठोकला.
"सर?"
"आजचा चहा अत्युत्कृष्ट झाला आहे. हे दोघे जंटलमेनही माझ्या मताला दुजोरा देतील. चहा इतका सुंदर झाला आहे कि आय थिंक वी आर गोईंग टू नीड वन मोअर पॉट फुल ऑफ द सेम."
"ओह शुअर सर. थॅंक यू सर."
"मी यांना लायब्ररीत घेऊन जात आहे. चहा, आणखी स्कोन्स व सँडविचेस पाठवण्याची व्यवस्था कर."
"व्हेरी वेल सर. मे आय इंटरेस्ट यू इन सम करी? जेवणाची वेळ थोड्याच वेळात होईल आणि आज उत्तम दर्जाची मटण करी आपल्या शेफने बनवली आहे."
"निश्चितच आम्ही तिचा आस्वाद घेऊ. यू हॅव माय थॅंक्स फॉर नोटिफाईंग अस. पण आत्ता नाही. आमचं बोलणं झाले कि मग जेवण टेबलावर लाव."
"अंडरस्टूड. विल दॅट बी ऑल, सर?"
"येस."
"व्हेरी गुड सर"

~*~*~*~*~

"आणि आता आपल्या समोर येत आहे नटराजाचा एक खास सदस्य. पण तत्पूर्वी .. " भद्र चालत चालत स्टेजच्या कडेला गेला. एका छोट्या मुलाला त्याने विचारले,
"काय नाव रे तुझं?"
"पांडू"
"बरं पांडू, मला सांग. नटराजा म्हणजेच शंकर, शंकराच्या गळ्यात काय असते?"
"एक नाग असतो. रुद्राक्ष माळा असतात."
"शाब्बास. हे घे" असे करून त्याने हवेत हात फिरवला आणि पांडूला काही रानमेवा काढून दिला. मग तो पुन्हा स्टेजच्या मध्यभागी आला. एकदा त्याने समोर बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांवर नजर फिरवली.
"तर शंकराच्या, महादेवांच्या, भगवान शिवाच्या गळ्यात नाग असतो. जर आम्ही शंकराचे नाव आमच्या या छोट्या गटाला देत असू तर नागदेवतेलाही आमच्यात स्थान द्यायलाच हवे. तर तुमच्या समोर सादर करतो नागदेवतेला प्रिय असा, सापांचा जादूगार, संमोहनात प्रवीण असा. येस लेडीज अ‍ॅन्ड जेंटलमेन, अवर व्हेरी ओन स्नेक चार्मर, नागराज!!
भद्र बाजूला होताच त्याच्या पाठीमागे लपलेला नागराज सगळ्यांच्या दृष्टीस पडला. साधारण सव्वापाच फूट उंची, अत्यंत कृश शरीर. खोल गेलेले निस्तेज डोळे. दाढी मिशा वाढलेल्या, त्यांच्यात एखादा पिकलेला केस आताशा दिसू लागला होता. गळ्याच्याही खाली येणार्‍या दाढीमागून अनेक चित्रविचित्र मण्यांच्या माळा दिसत होत्या. डोक्यावर एक गडद निळ्या रंगाची पगडी होती. त्या पगडीच्या मधोमध एक गुलाबी रंगाचा खडा होता. अंगात त्या खड्याच्या रंगाचा झिरझिरीत अंगरखा होता. त्यावर त्याने काळे बिनबाह्यांचे जाकीट घातले होते. त्या जाकीटावर पांढर्‍या सर्पाकृति होत्या. तो नक्की कुठे बघत होता हे सांगणे जरा कठीण होते. त्याची चाल मात्र फारच सफाईदार होती. तो जवळ जवळ तरंगत स्टेजच्या मध्यभागी येऊन पोचला.
"शांती शांती शांती! संपूर्ण शांतता हवी आहे मला. संपूर्ण शांततेशिवाय मी माझ्या सर्पांना इथे बोलवू शकत नाही." नागराजचा आवाज त्याच्या रूपाला अगदीच विजोड होता. आवाज तुम्हाला स्पर्शून जातो असे मानले तर त्या आवाजाचा स्पर्श मुलायम होता. तो गोड नव्हता पण बोचरा, रखरखीतही नव्हता. तरीही त्या शब्दांमध्ये जरब होती. संपूर्ण तंबूत शांतता पसरली. त्याने हात उंचावले, राजारामच्या शब्दात सांगायचे तर तो जणू आवाहन करत होता. त्याच्या नागदेवतांचे, त्याच्या सर्पमित्रांचे, त्याच्या आराध्याचे. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या अंगरख्याच्या बाह्यांमधून दोन फूत्कार ऐकू आले. तंबूतल्या अंधूक उजेडातही ते दोन करडे जीव सर्वांना स्पष्ट दिसले.
"घाबरू नका. या दोन्ही नागांच्या विषकुप्या काढलेल्या आहेत." भद्र मोठ्याने म्हणाला.
हे ऐकूनही इतर वेळी कदाचित ते दोन नाग बघून तिथे घबराट माजली असती. गदारोळात सर्वजण इकडे तिकडे पांगले असते. त्या गोंधळाने बिथरून नागांनी कोणाचा तरी चावा घेतला असता. पण इथे असे काहीही घडले नाही. राजारामचे मन सांगत होते कि पळ, ते करडे जनावर धोकादायक आहे. पण कसली तरी पोलादी पकड त्याच्या शरीरावर होती. त्याला कसल्या तरी अदृश्य बंधनात बांधले होते. त्याची खात्री होती कि उर्वरित प्रेक्षकवर्गही अशाच बंधनांमध्ये जखडला गेला होता. नागराजचे डोळे आता निस्तेज नव्हते.

*****

"ख्रिस, जोसेफ" मॅक्सवेल त्यांच्या दोन्ही हातांकडे बघत एवढे दोनच शब्द उच्चारले. त्या दोघांना मॅक्सवेल कितीतरी वर्षांपूर्वी प्रथम भेटले होते. स्कॉटलंड यार्डमध्ये मॅक्सवेल यांचा एक जवळचा मित्र होता, जेकब पॅक्स्टन. जेकब पॅक्स्टनच्या मुलाला पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा तो शेतावर खेळत होता. तेव्हाचा खेळकर जोसेफ आजचा कर्तव्यकठोर जोसेफ पॅक्स्टन कधी बनला याचे त्यांना अजूनही नवल वाटे.
ख्रिसची गोष्ट वेगळी होती. जेव्हा नद बनतो तेव्हा दोन वेगवेगळ्या दिशेने वाहणार्‍या धारा येऊन मिळतात. ख्रिस व जोसेफ यापेक्षा विरुद्ध धारा दुसर्‍या नसत्या. अजूनही ख्रिसचा काहीसा रापलेला चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर होता. आताचे ख्रिसचे डोळे शांत दिसत होते. हेन्रींना प्रयत्न करूनही त्या दिवशी पाहिलेला विखार त्या डोळ्यांत दिसत नव्हता.
"हेन्री?" मॅक्सवेल भानावर आले. जोसेफ किंचित पुढे झुकून त्यांच्याकडे चिंतेच्या स्वरात विचारत होता.
"मी सर मॅक्सवेल अधिक पसंत करेन." घसा खाकरत हेन्री उत्तरले.
"असो. तर ख्रिस, जोसेफ. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे मांडा."
ख्रिस व जोसेफने एकमेकांकडे बघितले. जोसेफने नजरेनेच ख्रिसला खुणावले. ख्रिसने एकदा दीर्घ श्वास घेतला व तो बोलू लागला.
"सर मॅक्सवेल! प्रथम तुम्हाला माझ्याकडून आणि जोसेफकडून बिग थँक यू! या केसबद्दल माझं पहिले जे इंप्रेशन होते ते पूर्णपणे चुकीचे निघाले. तुम्ही आम्हा दोघांना या केससाठी का निवडले असेल हे थोडं थोडं समजू लागलं आहे. या सर्वांमधून आणखी एक गोष्ट समोर आली. बर्थोल्ट होनेसचा खून कोणी केला यापेक्षा बर्थोल्ट होर्नेसचा खून का झाला हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. होनेसचा खूनी कोण आणि फ्री.. चा अर्थ काय हे प्रश्न नि:संशय महत्त्वाचे आहेत. जोसेफची फणींद्र थिअरी बरोबर असेल तर फ्री म्हणजे फ्रीडम हे उत्तरही कदाचित बरोबर असेल. पण एस एस बी ची जरूर भासावी याकरिता होनेसचा खून का झाला हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. होनेस जर्मन होता व जर्मन सरकार इथल्या जहाल, सशस्त्र बंडखोरांशी संपर्क साधत आहे हा फारच वरवरचा तर्क झाला. एवढ्या इन्व्हेस्टमेंटसाठी जर्मनांना त्याप्रमाणात रिटर्न्सची खात्री असलीच पाहिजे. पाच-साडे पाच वर्षांपूर्वी जर्मनी संपूर्ण युरोपासमोर तोंडघशी पडली होती. त्यांना मोरोक्कोच्या मुद्द्यावर ऑस्ट्रिया-हंगेरी वगळता कोणीही पाठिंबा दिला नव्हता. आत्ताही त्यांचे फारसे कोणी मित्र नाही. बरं मोरोक्को कोणाच्या प्रभुत्वाखाली असेल याचा निवाडा १९०४ मध्ये झाला. तुलनेने इंडिया आपल्या प्रभुत्वाखाली कित्येक दशकांपासून आहे. अगदी हे बंडखोर इथे काही ठोस करून दाखवतात असे गृहीत धरले तरी जर्मन सेनेला येथपर्यंत पोचणे दुरापास्त आहे. आपले नौदल त्यांना थोपवायला पुरेसे सक्षम आहे. आपली सेना या बंडखोरांपेक्षा निश्चितच वरचढ आहे. मग नक्की इथे जर्मनांना काय साध्य करायचे आहे? असं काय आहे जे आम्हाला माहित नाही? प्लीज आमच्यावर थोडा विश्वास ठेवा व आम्हाला संपूर्ण चित्र नाही तरी थोडा उलगडा करा. कदाचित मग आमचा शोध अधिक फोकस्ड असेल."
..........
..........
थरथरत सर हेन्री कापर्‍या स्वरात उद्गारले - "व्हॉट इफ आय टेल यू वी आर ऑन द व्हर्ज ऑफ येट अनदर मोरोक्कन क्रायसिस?"

~*~*~*~*~

"आणि हे होते रहस्यमयी उमा - तिच्या मिशांचे रहस्य काय आहे? विश्वेश्वरच जाणे. तिच्याबरोबर वंडर क्लाऊन केके, आमचा छोटू मास्टर आणि मीसुद्धा होतो नाही का?" मिश्किल हसत भद्राने त्या अ‍ॅक्टची सांगता केली. राजारामच्या चेहर्‍यावर त्याबरोबर गोंधळाचे भाव अधिक गहिरे झाले. त्या सर्कसीतल्या आत्तापर्यंतच्या सर्व मुली स्टेजवर येऊन गेल्या होत्या. राजारामाने पाहिलेली मुलगी मात्र अजूनही त्याला दिसली नव्हती. त्याची खात्री होती कि त्याने लाल साडीतल्या त्या मुलीला एका तंबूत शिरताना पाहिले होते. पण त्याला ती कुठल्याच अ‍ॅक्टमध्ये दिसली नव्हती. हे काय गौडबंगाल आहे? मान्य कि सर्व अ‍ॅक्ट दाखवले जाणार नव्हते पण तरी सर्व कलाकार स्टेजवर येऊन चेहरा तरी दाखवून गेले होते. म्हटलं तर त्याला ती एकदा दिसली होती; नागराजच्या अ‍ॅक्टच्या दरम्यान तिचे ओझरते दर्शन त्याला झाले होते. वार्‍याची एखादी झुळुकही मानवी मनाला सुखावून जाते. तिची ती एक झलकही त्याला पुरेशी होती. पण ती खरंच तिथे होती का? नागराजचे संमोहन किती शक्तिशाली होते याची त्याला प्रचिती आली होती. मग ती नक्की तिथे सशरीर उपस्थित होती का संमोहनाने त्याच्या मनाशी केलेला खेळ?
त्याची शेवटची आशा उमा होती कारण मलिका वगळता त्या संचात भारतीय वाटेल अशी उमाच होती. त्यात तिचा चेहरा ती प्रथम स्टेजवर आली तेव्हा मुद्दाम झाकलेला होता. त्याचे कारण स्पष्ट होताच तो हादरला. तसंही उमाची शरीरयष्टी त्या मुलीशी जुळत नव्हती. जर उमा ती मुलगी नाही मग ती नक्की कोण? ती या सर्कशीत आहे का नाही?
राजारामच्या मनात असे प्रश्न घोंघावत असताना भद्राच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.
"आणि आमचा अंतिम खेळ. मीर व येलेनाचा खास ट्रॅपीज खेळ या शो मध्ये नसेल पण आज रात्रीच्या शोमध्ये तो तुम्ही बघू शकाल. मलिकाच्या गाण्याबरोबर आम्ही शोची सांगता करू पण तत्पूर्वी एक खतरनाक खेळ! एक असा खेळ जो तुम्हाला श्वास रोखून धरायला लावेल. एक असा खेळ जो तुमच्या अंगावर काटा आणेल. एक असा खेळ जो तुम्हाला स्तब्ध करून टाकेल. एक असा खेळ जो पाहण्यासाठी तुमच्या हृदयात अपार हिंमत पाहिजे तर तो खेळ करण्यासाठी किती हिंमत लागेल हे केवळ एकच माणूस जाणे. अर्थातच माझा मित्र रुद्र आणि या सर्कशीतला सर्वात भयंकर प्राणी संग्राम. माझी तुम्हाला एकच विनंती आहे. आपल्या जागेवरून जरासुद्धा हलू नका. हा खेळ तुम्हाला पुढची कित्येक वर्ष लक्षात राहिल ही माझी खात्री!
भद्र बाजूला झाला आणि इतर सदस्यांच्या बरोबरीने त्याने संपूर्ण स्टेजच्या बाजूने कसलेसे जाळे उभे केले. एखादा हत्ती येणार आहे का? जाळी बरीच उंच दिसत होती. राजारामची उत्सुकता पुन्हा एकदा चाळवली. रुद्र म्हणजे सुरुवातीला दिसलेला तो नाजूक तरुण. तो काय करणार आहे आता? असे विचार चालू असतानाच त्या एका आवाजाने उपस्थित सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. त्या एका आवाजाने जाळी लावणारे सदस्यही दचकले. भद्र त्यांच्यातला सर्वात जुना सदस्य होता पण तो सुद्धा क्षणभर का होईना थबकला. ओठांवरून जीभ फिरवून त्याने सर्वांना धीर दिला. उमाला तिचे हात थरथर कापत आहेत हे जाणवले. उमाला एव्हाना हे कळून चुकले होते कि कितीही वेळा या प्रक्रियेतून गेलो तरी ही भीति जाणे शक्य नाही. ती गर्जना ऐकूनच प्रत्येकाला कळून चुकते कि का सिंहाला जंगलाचा राजा समजतात. संग्रामवर बसलेला, पोरसवदा चेहर्‍याचा रुद्र मात्र या माहितीपासून अनभिज्ञ असावा. संग्राम इतकाच किंबहुना काकणभर अधिकच रुबाब त्याच्या चेहर्‍यावर होता.

~*~*~*~*~

ट्रेनमध्ये बसल्या बसल्या ख्रिस विचार करत होता. दुपारचा सूर्य डोक्यावर येऊन थोडा वेळ झाला होता. गाडीने घाटात प्रवेश केला होता. घाट ओलांडला कि अजून साधारण तासाभरात पुणे येणार होते. अ‍ॅलेक्सी व जोसेफ दोघेही डुलकी घेत होते. ख्रिसच्या डोक्यात मात्र हेन्रींचे शब्द ताल धरून बसले होते.
"या सगळ्याची सुरुवात आय गेस बिस्मार्कने जर्मन अस्मिता पुन्हा जागृत केली तिथून झाली. तेव्हा आपण युरोपात म्हणावा तेवढा रस घेत नव्हतो. आपल्या डिप्लोमसीचे संपूर्ण लक्ष वसाहतींवर केंद्रित झालेले होते. तसेही जर्मनी त्या काळात सर्वात कमकुवत शक्ती होती. पण बिस्मार्कने हे चित्र पालटले. त्यांची औद्योगिक प्रगती किती झाली आहे याचा आज आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. मोरोक्कोत जर्मनीचे हितसंबंध गुंतलेले आहेत. १९०५ मध्ये त्यांनी फ्रेंच प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा प्रयत्न आपण हाणून पाडला. या निमित्ताने आपली फ्रेंचांशी मैत्रीही झाली. असं वाटलं कि आपण युद्ध टाळले. असं तेव्हा तरी वाटलेलं ....
जानेवारीत मोरोक्कोच्या सुलतानाच्या विरोधात बंड पुकारले गेले. या बंडामागे जर्मनीचा काही संबंध होता का, मी सांगू शकत नाही. या बंडाने काही दूरगामी परिणाम होऊ शकतात का? निश्चितच! मोरोक्कोत सध्या फ्रेंचांचे वर्चस्व आहे. जर्मनीला त्यातल्या खाणींमध्ये रस आहे. त्यांनी तिथे रेल्वेचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न केला होता पण तो फ्रेंचांनी हाणून पाडला. जर्मन गप्प राहिले. त्यांचे हात दगडाखाली जे होते.
आता परिस्थिती वेगळी आहे. मार्च उजाडला तसे स्पष्ट झाले कि सुलतान एकटा या बंडाळीला आवरू शकत नाही. त्याने अपेक्षेप्रमाणेच फ्रेंचांची मदत मागितली. फ्रान्सला मदत द्यायला काही हरकत नाही पण चिंता आहे ती जर्मन प्रतिक्रियेची! फ्रेंच सेनेने मोरोक्कोमध्ये ठाण मांडले तर भलेही जर्मनीला वचक बसेल पण त्याबरोबरच त्यांच्या हातावरचा दगड उचलला जाईल. अतिरिक्त सेना पाठवल्याचा कांगावा करता येईल. अजून काय काय करता येईल आणि काय होईल हे सगळं तुम्ही इमॅजिन करू शकता. अशा पार्श्वभूमिवर फणींद्र सारखा माणूस एका जर्मन माणसाला भेटतो व त्या जर्मनाचा खून होतो. यातून काय काय निष्पन्न होऊ शकेल याची कल्पना मला तरी करायची नाही. अगदी खूनी कोण हे सापडलं नाही तरी फणींद्रला पकडणे गरजेचे आहे. बर्थोल्ट होनेसचा जर्मन सरकारशी काही संबंध असो वा नसो, आपल्याला त्यांच्यात काय संभाषण झाले हे कळलेच पाहिजे. दुसरा पर्याय आपल्याकडे नाही."

*****

संग्राम एका छोटेखानी स्टूलावर चार पायांवर बसला होता. एवढा मोठा जिवंत सिंह तिथे उपस्थितांपैकी कोणीही पाहिला नव्हता. रुद्र त्याच्या समोर उभा होता. रुद्रच्या हातात कसलेही साहित्य नव्हते. रिंगमास्टर बाळगतात तसा चाबूकही नव्हता. तो काही पावले पुढे झाला. संग्राम जिभेने पंजा साफ करत होता. त्याने ते थांबवले, एक जांभई दिली व तो रुद्रच्या डोळ्यात बघू लागला. त्यांच्यात नजरेच्या भाषेत काहीतरी संवाद घडत होता. संग्रामने नजर फिरवली व आपला आ वासला. त्याचे मोठाले सुळे सहज दिसून येत होते. रुद्रने आपला डावा हात त्या जबड्यात ठेवला. संग्रामने अलगद तो जबडा बंद केला. स्स्स, प्रेक्षकांमधून काही आवाज आले. रुद्र मात्र निर्विकार होता. काही क्षणांनंतर संग्रामने जबडा उघडला. रुद्रच्या हाताला कसलीही जखम झाली नव्हती. काही क्षण सगळे स्तब्ध होते आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला.
रुद्रने त्या टाळ्या स्वीकारल्या व हात उंचावून सर्वांना थांबण्याची विनंती केली. तो पुन्हा संग्रामच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला पण यावेळेस पाठमोरा. त्याने हळू हळू पाठीतून वाकायला सुरुवात केली. त्याचा नाजूक चेहरा सर्वांना दिसत होता. संग्रामने पुन्हा एकदा आ वासला. त्या चेहर्‍याला होऊ शकणार्‍या इजेचा विचार करून अनेकांनी डोळे झाकून घेतले, नजरा फिरवल्या. रुद्रचे डोके संग्रामच्या जबड्यात काही क्षण बंदिस्त होते. पुन्हा एकदा हळू हळू संग्रामने जबडा उघडला. रुद्रला कुठलीही जखम झाली नव्हती. रुद्रच्या विश्वासाला संग्राम पुन्हा एकदा जागला होता.
पुढचं जवळपास एक मिनिट टाळ्यांचा गजर अखंड सुरु होता. रुद्र व संग्राम झुकून प्रेक्षकवर्गाला अभिवादन करत होते. मलिका एका कोपर्‍यात उभी राहून ते पाहत होती. पुण्यातही आपली सर्कस हिट असेल हे तिला कळून चुकले होते. तिने पाईपचा एक झुरका घेतला. वरकरणी तिचा चेहरा निर्विकार असला तरी या प्रतिसादावर ती बेहद्द खुश होती.

*****

राजाराम काहीसा निराश होऊन बाहेर पडला. सहज चाळा म्हणून त्याने खिशात हात घातला तर हाताशी एक कागदाचा कपटा लागला. त्याने डोळे ताणून अगदी बारीक अशी ती अक्षरे वाचली.
"इतक्या सहजा सहजी मी दिसणार नाही. या सर्कसच्या एका फेरीत तर नक्कीच नाही."
राजारामच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले. थोडक्यात ती माझं स्वप्नरंजन नव्हती. एका फेरीत नाही दिसणार काय? ठीक आहे. मी परत येईन. येत राहीन. कधी ना कधी तरी भेटशीलच. त्याने एकदा त्या विशाल तंबूकडे पाहिले व घराच्या दिशेने पावले उचलली.

*****

त्याच ट्रेनच्या दुसर्‍या एका डब्यात डेव्हिड एकटाच होता. त्याच्या सीटवर पॅपी डिसमँटल्ड होऊन पडला होता. अगदी काळजीपूर्वक डेव्हिड त्याच्या वेगवेगळ्या भागांना वंगण लावत होता. त्याचा बाह्य हिस्सा जवळच होता. तो हातात घेऊन डेव्हिड रुमालाने ती कमावलेली कातडी साफ करू लागला.
"चोच साफ करायला विसरू नका हेर डेव्हिड"
"अर्थात हेर पॅपी. हेर पॅपी तुम्हाला अजून काही हवं का?"
"अं, नाही. मी आता थोडी झोप काढतो. पूना आलं कि उठवा हेर डेव्हिड."
"नक्की हेर पॅपी."
बाहेर कोणी असते तर त्याला दोन लोक बोलत आहेत असेच वाटले असते. डेव्हिडचे या कलेतील कौशल्य वादातीत होते. त्याने पॅपीचे डोके कुरवाळले आणि तो स्वतःशीच बोलू लागला. जर तू गरुड असतास तर मी तुझे नाव आडलर ठेवू शकलो असतो. मग खर्‍या अर्थाने गरुड विरुद्ध सिंह सामना चालू आहे असं म्हणता आले असते. काय योगायोग आहे! पलीकडच्या डब्यात नेमके तीन सिंह आहेत. आणि इथे आपण दोघे; एकाच शरीरात जणू दोन आत्मे! दोन तोंडाचा गरुड जणू! याहून जास्त चांगली निवड ना त्यांना करता आली असती ना आपल्याला! या गरुडाने सिंहाच्या जबड्यात प्रवेश केला आहे. सिंह त्याचा जबडा मिटताना गरुडावर कसलीही दयामाया दाखवणे शक्य नाही. पण गरुडही चपळ पक्षी आहे. बघूया त्या सर्कशीतल्या तरुणाप्रमाणे आपण सही सलामत बाहेर येतो का!
डेव्हिड आता भेसूर हसत होता. त्या डब्याच्या बाहेर कोणीही नव्हते. एका अर्थाने ते बरेच होते. तो आवाज असह्य होता. ते हास्य ऐकत तिथे फार वेळ थांबणे अशक्य होते.

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/60553

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म बहुतेक काही रेफरन्सेस द्यायला पाहिजेत. खासकरून शेवटच्या परिच्छेदासाठी.

अगादिर क्रायसिस - https://en.wikipedia.org/wiki/Agadir_Crisis
१९११ मध्ये मोरोक्कोमध्ये हा वाद झाला होता. तेव्हा विश्वयुद्ध पेटणार याची जवळपास सर्वांना खात्री होती.

तीन सिंह - युरोपातल्या देशांना एक कोट ऑफ आर्म्स असतो व त्याच्यावरचे चिन्ह त्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक असते. युनाइटेड किंगडम (ब्रिटन) मधल्या तीनही देशांच्या (इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स) कोट ऑफ आर्म्स वर सिंह आहे. ब्रिटनचा थ्री लायन्स सिंबॉल तिथून आलाय. ब्रिटनमध्ये कधीकाळी सिंहाचे पूर्वज राहत असत. पण मध्ययुग येईपर्यंत सिंह आधी ब्रिटन मधून व नंतर युरोपातून नाहीसा झाला. गंमत म्हणजे संग्राम ज्या प्रजातीचा सिंह आहे तो बर्बर सिंह/बार्बरी लायन इंग्लंडचा राष्ट्रीय प्राणी आहे.

गरुड - आता बाल्ड ईगलच्या रुपात जरी गरुड अमेरिकेबरोबर संलग्न झाला असला तरी कधी काळी जर्मनी देखील गरुड आपले चिन्ह म्हणून वागवत असे. जर्मन कोट ऑफ आर्म्स वर दोन तोंडे असलेला गरुड आहे.

आशुचँप - मला मान्य आहे कि गुंतागुंत खूप असल्याने कळली नसेल पण आणखी एक शक्यता सहज डो़क्यात आली. मी भाग ०, १, २ असे लिहितो. तुमची भाग ० वर मी प्रतिक्रिया पाहिली होती (त्याबद्दल आभार) आणि हा भाग २ आहे. तुम्ही चुकून भाग १ मिस केला असेल तर मात्र काही म्हणजे काहीच कळणार नाही.

नाही मी वाचला होता आधीचाही भाग. ते मोरोक्को प्रकरण कळले नव्हते आणि एकदम सगळे ट्रॅक सुरु आहेत, त्याची लिंकच लागत नाही, पुढे कळतील अशी अशा आहे

ओह ओके. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद Happy

एक्स्ट्रॉ फीचर :

व्हेंट्रिलोकिजम आणि डेव्हिड :
हेर (Herr) डेव्हिड या कथेतील दुसरं जर्मन पात्र आहे. डेव्हिड मागील प्रेरणा रॉब लुची (onepiece.wikia.com/wiki/Rob_Lucci) आहे. तो ही व्हेंट्रिलोकिस्ट दाखवला आहे पण त्याचा पक्षी डेव्हिड प्रमाणे मशीनी नाही आणि तो त्याच्या पपेट/पेट बरोबर अ‍ॅटॅच्ड नाही.
व्हेंट्रिलोकिजम, आवाज फेकण्याची कला एकेकाळी धार्मिक प्रथा होती. लॅटिनमध्ये व्हेंटर = पोट, लोकि = बोलणे. प्राचीन ग्रीकमध्ये याला गॅस्ट्रोमान्सी म्हणत. ग्रीकांचा असा समज होता कि हे पोटातून येणारे आवाज मृतात्म्यांचे आवाज असतात व गॅस्ट्रोमान्सर मृतात्म्यांशी संवाद साधू शकतो/ते. काही ओरॅकल्स या कलेचा वापर करून पूर्वी भविष्य वगैरे सांगत. नंतर काही काळ या कलेला एक प्रकारचे चेटूक मानले गेले. अखेर अठराव्या शतकात सामाजिक मान्यता मिळाली व जत्रां/फेअर्स मधून व्हेंट्रिलोकिस्ट्स दिसू लागले. पपेटिअर व व्हेंट्रिलोकिस्ट मध्ये एक महत्त्वाचा फरक हा कि व्हेंट्रिलोकिस्ट त्याच्या कळसूत्री बाहुलीच्या बरोबरीने स्टेजवर असतो व त्याचे ओठ हलताना दिसता कामा नयेत (अशी अपेक्षा असते). २००७ च्या डेड सायलेन्स मधली मेरी शॉचा परफॉर्मन्स आठवा.
हिंट : व्हेंट्रिलोकिजमचा इतिहास या कथेतल्या रहस्याच्या थीमशी वेल कनेक्टेड आहे.

आपले रामदास पाध्ये आणि अर्धवटराव प्रसिद्ध आहेत की व्हेंट्रोलोकिस्ट.. लिज्जत पापडाची अ‍ॅड पण फेमस आहे त्यांच्या आणि आपला तात्या विंचू पण...

वाचतोय... अल्टरनेट पॅराग्राफ वाचायला पाहिजेत म्हणजे जरा तरी लिंक लागते आहे असे वाटते आहे..

कथा मस्त सुरू आहे... आवडेश!
राजाराम च्या बाबतीत वाचता क्षणी गोंधळ झाला. असे वाटले की तो उमा चा नवराच...मग परत ०, १, २ असा प्रवास झाला.
राजराम ला दिसलेली मुलगी/बाई ही तिच असावी जी बेर्थोल्ड बरोबर आलेली 'डोक्यावरुन पदर घेतलेली बाई'...त्यातुन ती मुळात 'बाई' आहे का? अशी शंका पण येतेय...
गुंतागुंत तर आहेच पण उत्कंठावर्धक आहे हे नक्की.

आशु, पायसच्या कादंबर्‍या अश्याच असतात. प्लॉटची व्याप्ती खूप असते.

मस्त सुरू आहे. किती वेगळं वातावरण उभं केलंय. येउंद्या .....

मस्त चालू आहे. सगळे भाग एकदम वाचायला जास्त मजा येईल. त्यामुळे मी आता उत्सुकतेचं इन्टरमिटंट फास्टिंग करून सगळे भाग एकदम वाचणार.