************************
************************
लेहमध्ये सर्वांचा निरोप घेऊन श्रीनगर कडे कूच केले. कालच भेट दिलेला नदीचा संगम, मॅग्नेटिक हिल, निम्मू वगैरे ठिकाणे मागे पडू लागली.
आंम्ही NH 1 वरून प्रवास करत होतो, मात्र रस्ता जेमतेम अगदी कसाबसा दीड ट्रक जाईल इतकाच मोठा होता. अनेक ठिकाणी तर एकदम अरूंद लोखंडी पूल, ज्यावरून एकावेळी एकच ट्रक जाईल इतकीच जागा होती. असा पूल आला की शांतपणे आपली गाडी बाजुला घ्यायची, समोरून ट्रक पार होईल याची वाट बघायची आणि नंतर आपण पूल ओलांडायचा असा प्रकार करावा लागत होता.
एका ठिकाणी आंम्ही थांबून गप्पा, क्लिकक्लिकाट करत असताना अचानक समोरून एकदम ७ - ८ दुचाकी गाड्या आमच्याजवळ येवून थांबल्या.. हिंदीत सुरू झालेल्या गप्पा आमच्या पुण्याच्या नंबरप्लेट बघून एकदम मराठीवर आल्या कारण ती सगळी टीम मुंबईची होती. त्यांनी जम्मूपर्यंत गाड्या रेल्वेने आणल्या होत्या व जम्मूपासून दुचाकीचा प्रवास सुरू केला होता. त्यांना व्यवस्थीत सगळी माहिती दिली, टाटा केला आणि आंम्ही पुढे निघालो.
वाटेत अचानक एके ठिकाणी हा प्रकार दिसला.
एका उंच खडकावर ही हॉवित्झर विराजमान झाली होती.
थोडी जवळून..
आता चढ सुरू झाला होता आणि जोडीला बर्यापैकी ट्रॅफिक होतेच. मनालीतून निघाल्यानंतर रोहतांग पास ला जे ट्रॅफिक जाम लागले त्यानंतर आजच इतकी वाहनांची वर्दळ जाणवत होती.
आता लेहला मैलोंमैल माणसे दिसायची पंचाईत तेथे वाहने कशी दिसणार... पण इतकी वाहने आपल्या आजुबाजूला दिसण्याची थोडा वेळ नवलाई वाटली हे खरे..!
यथावकाश फोटुला टॉप आले. आम्ही थांबलो तोच रस्त्याच्या पलीकडे एक टेम्पो ट्रॅव्हलर येवून थांबली. गलका करत अनेक मराठी सिनीयर सिटीझन उतरले.. उत्साहाने मारलेल्या गप्पा, फोटोला अशी पोझ दे, तशी पोझ दे.. या मजामजा सुरू झाल्या. आम्हीही अनेक जणांना फोटो काढून दिले, आमचा क्लिकक्लिकाट सुरू होताच.
मनसोक्त फोटो काढून आणि तेथील नजारा बघून पुढे निघालो.
माझ्या गाडीच्या गळणार्या टाकीवर आता सरळ पुण्यात परतून उपचार करण्याचे ठरवले होते. त्यामुळे पेट्रोलच्या थांब्यांची संख्या वाढली होती.
आता कारगिल जवळ आले होते. वाटेत थोडी माहिती काढली असता कळाले होते की झोझिला खिंड वाहतुकीसाठी ४ नंतर बंद ठेवतात त्यामुळे आज कारगिल किंवा द्रास येथे मुक्काम करणे मस्ट होते.
कारगिल शहर..
कारगिलला एक बाईकर्स ग्रूप भेटला त्यांनी भरपूर माहिती दिली व त्या आधारे आम्ही द्रासकडे कूच केले.
अचानक समोर हा बोर्ड आला आणि गाडी थांबवावीच लागली..!!!
आंम्ही का थांबलो आहे हे बघायला लगेचच दोन्ही बाजुंनी जवान प्रकटले आणि मराठीमध्ये गप्पा सुरू झाल्या.
तेथे एक मराठा रेजिमेंट किंवा त्यांचे ठाणे होते. त्यामुळे भिंतीवर मराठी घोषवाक्य, तेथील जवान यांमुंळे आपल्या एखाद्या खेडेगावाचा फील येत होता.
थोडे पुढे आलो तोच एका जवानाने गाडी थांबवण्यासाठी हात केला. कारंडे नामक साहेब लिफ्ट मागत होते. त्यांना माझ्या गाडीवर घेतले आणि प्रवास सुरू केला. त्यांना थोडेच पुढे जायचे होते.
त्यांनी एक हिमाच्छादित शिखर दाखवले, आणि म्हणाले "त्या टोकाच्या मागे पाकिस्तानची छावणी आहे..!!!
हेच ते शिखर..!!
येथे रस्त्यावरच थांबून खादाडी केली. पावसाची चिन्हे दिसत होती त्यामुळे बॅगांना रेन कव्हर चढवली आणि रेनकोट घालून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो.
आजच कारगिल वॉर मेमोरीयल बघणे शक्य होणार होते.
एकंदर ट्रिप प्लॅन केली तेंव्हा कारगिल वॉर मेमोरीयल बघण्याच्या अनुषंगानेच श्रीनगर वरून परत येण्याचा मार्ग आखला होता. आजच ते बघण्याचे स्वप्नही पूर्ण होणार होते.
कारगिल युद्ध आणि त्यादरम्यान आपल्या जवानांनी दाखवलेले असामान्य शौर्य या गोष्टी शब्दात कधीच व्यक्त करता येणार नाहीत. ज्या ठिकाणी जावून कृतज्ञतेने, अभिमानाने आणि आदराने डोके ठेवावे अशा मी ठरवलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे कारगिल वॉर मेमोरीयल. (आत्ता आठवणारी महाराष्ट्राबाहेरील ठिकाणे म्हणजे श्रीशैलमचे शिवरायांचे मंदिर, अंदमान जेल, दिल्लीची अमर जवान ज्योत आणि कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक...!!)
अचानक हे उजव्या बाजूला दिसले..
..आणि लगेचच वॉर मेमोरीयलही दिसले..!!
आम्ही तेथे थोडी माहिती काढली मुख्यतः मेमोरीयल बंद होण्याची वेळ कधी आहे ते चेकवले तर कळाले की मेमोरीयल दिवसरात्र; २४ तास सुरू असते. आम्ही ४ च्या दरम्यान पोहोचलो होतो त्यामुळे भरपूर वेळ हाताशी होता. सर्वप्रथम द्रासमध्ये हॉटेल बघूया आणि नंतर मेमोरीयलला भेट द्यायला येवू असे ठरवले आणि निघालो तोच रोहितने तेथे जवळच एक हॉटेल शोधून काढले. गडबडीने सामान रूममध्ये टाकले व मेमोरीयल कडे परतलो..
गाड्या पार्क केल्या, एके ठिकाणी नोंद केली आणि मुख्य प्रांगणात आलो..
सर्वप्रथम लक्ष वेधून घेत होता तो भल्यामोठ्या खांबावर डौलाने फडकणारा तिरंगा..
झेंड्याच्या मागे दिसत आहेत त्या टोलोलिंग पर्वतरांगा.
..आणि टायगर हिल
तिरंग्याच्या आणखी काही छटा..!!
मेमोरीयलचा आराखडा
तिरंगी ध्वजांनी डवरलेला विजयपथ - समोर एक मोठ्ठा तिरंगा आणि आजुबाजूला असणारे ध्वज त्या विजयपथावरून चालताना खूप वेगळा अनुभव देत होते. अवर्णनीय..!!
लगेचच ही हॉवित्झर तोफ दिसली
स्मारक..
__/\__
एका प्रचंड मोठ्या पितळी फलकावर शहीद जवानांची नांवे कोरली होती.
तेथे एक जवान संपूर्ण कारगिल युद्धाची विस्तृत माहिती देत होता, साधारणपणे २० ते २५ मिनीटे माहिती दिल्यानंतर मनोज पांडे गॅलरीमध्ये एक मोठे प्रदर्शन बघायला नेत होते. आपल्याला आणखी काही शंका असतील तर तेथे उत्तरे दिली जात होती.
मनोज पांडे गॅलरीचे प्रवेशद्वार
गॅलरीमध्ये..
कारगिल कलश
श्रद्धांजली कलश.
पुण्यातल्या एका संस्थेने दिलेली भेट..
तेथे वेगवेगळे फोटो फ्लेक्स प्रिंट करून व आतून दिव्यांची व्यवस्था करून तर काही फोटो फ्रेम करून ठेवले होते..
पाकिस्तानी सैन्याकडून जप्त केलेल्या अनेक वस्तू होत्या..
स्मारकाच्या एक भागात "वीर भूमी" आहे.. ऑपरेशन विजय आणि कारगिल भागामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या प्रत्येक जवानाच्या नावे एक एक शीला उभी केली आहे. आणि प्रत्येक स्मारकाजवळ एक तिरंगा आहे.
स्मारकाच्या एका भागात पाहिस्तानी सेंट्री पोस्ट आणि आसर्यासाठीचे बनवलेले इग्लूसारखे शेल्टरही ठेवले होते.
ऑपरेशन सफेद सागर..
अशा तर्हेने अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा बघून आणि तरीही समाधान न झाल्याने पुन्हा तेथेच बराच वेळ देऊन आम्ही स्मारकाचा निरोप घेतला.
तेथे निरोप घेताना या वाक्याचा अर्थ पुरेपूर उलगडला होता.
__/\__
(क्रमशः)
मस्तच.... आमची ट्रीप
मस्तच.... आमची ट्रीप आठवली....
तुम्ही लेह मधले हॉल ऑफ फेम बघितलेत की नाही?
मला फोटु दिसत नाहीयेत
मला फोटु दिसत नाहीयेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
छानच, पण मलाही काही फोटो दिसत
छानच, पण मलाही काही फोटो दिसत नाहीत. थोड्या वेळाने परत बघतो.
कारगिलमधला डौलाने फडकणारा
कारगिलमधला डौलाने फडकणारा तिरंगा पाहून छान वाटलं. कारगिल मेमोरियल मधले फोटोनी आपल्या जवानांनी दाखवलेल्या असीम शौर्याची आठवण करून दिली . सैन्याने किती निगुतीने जपलंय हे सारं!!! मेजर विक्रम बात्रांना तसेच कारगिलमध्ये शौर्य गाजवण्याऱ्या सर्व सैनिकांना सलाम ..
धन्यवाद.. >>>तुम्ही लेह मधले
धन्यवाद..
>>>तुम्ही लेह मधले हॉल ऑफ फेम बघितलेत की नाही?
नेमके तेंव्हा दुरूस्तीसाठी बंद होते. ;(
ज्या ठिकाणी जावून कृतज्ञतेने,
ज्या ठिकाणी जावून कृतज्ञतेने, अभिमानाने आणि आदराने डोके ठेवावे अशा मी ठरवलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे कारगिल वॉर मेमोरीयल. >>> अगदी!
पानिपत ते कारगिल! चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक आणखी काही असतील तर त्या सगळ्याच तिर्थयात्रा झाल्या की रे तुझ्या.