हा लेख माझी आई सौ.रेवा सदाशिव वैद्य हिने नवरात्रानिमित्त लिहिला आहे. तो ६ ऑक्टोबर २०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स च्या अहमदनगर आवृत्तीत प्रकाशित झालेला आहे.
माझं माहेर चार पाच पिढयांपासून चालत आलेला अहमदनगर येथील नालेगावातील वसंतराव देशपांडे यांचा वाडा. त्यात एका भिंतीत असलेल्या जिन्याखालचं देवघर; घरातील सर्वात पवित्र जागा! नवरात्र सुरू व्हायच्या आधी दोन दिवस सगळे देव काढून एका मोठ्या पितळी डब्यात ठेवायचे आणि देवघराला रंग द्यायला सुरुवात व्हायची. रंग वाळला की त्यावर गेरू कालवून बोरूने चंद्र, सूर्य आणि आसनांची रांगोळी काढायची. देव्हाऱ्यात एक मोठा सागवानी चौरंग होता. त्यावर एक छोटा चौरंग असायचा आणि त्यावर एक सुरेख देव्हारा. दोन्ही चौरंगाना तेल पाणी लावून पॉलीश करायचं. देवघराला सोनेरी कागद लावून सजवायचं. माहूरच्या तांदळ्याला छान शेंदूरलेपन व्हायचं. ओट्या भरण्यासाठी नारळच पोतं, ब्लाऊजपीसचा गठ्ठा आणला जायचा. घरात उपवासाचे पदार्थ तळण्याचा वास, जणूकाही लग्नघरच!
अश्विन शुध्द प्रतिपदेचा दिवस उगवला की घटस्थापनेची तयारी सुरू व्ह्यायची. चौरंगावर चौरंग मांडून त्यावर सोनेरी देव्हारा मांडायचा. त्यात चांदीच्या सिंहासनावर माहूरगड निवासिनी रेणुकामाता विराजमान व्हायची. तांदळ्यावर चांदीचे नाक, डोळे, टोप आणि त्यावर शेवंतीच्या फुलांची वेणी.
सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ चकचकीत आणि त्यांना छान छोटे छोटे झगझगीत कपडे. पुढे शेतातील काळी माती, त्यात चकचकीत कलश, त्यावर परडी आणि परडीत जगदंबेचा टाक. त्यावर मंडपीपासून विड्याच्या पानांची माळ, शेजारी शांत तेवणारी समई; साक्षात देवीचं मंदिरच! हे सर्व उभं करणारी माझी वहिनी मुळातच देखणी, गोरीपान आणि त्यावर हळदी कुंकवाने भरलेलं कपाळ. साक्षात देवीचेच दुसरं रूप.
दुसऱ्या माळेला घरात वीस पंचवीस बायकांना फराळ आणि दुपारी भजन, जोगवा होऊन सर्व बायकांच्या ओट्या भरून पाठवणी व्हायची. तिसर्या माळेला मोहटा देवीला जाण्याचा कार्यक्रम असायचा. रोज संध्याकाळी जरीच्या साड्या नेसून ग्रामदेवतेला जाणे असायचेच. त्यानंतर संध्याकाळी आरती. पंचमीला ललिता पंचमीचा कुलधर्म असायचा. रात्री बारा वाजता देवीला पुराणावरणाचा नैवेद्य, सवाष्ण ब्राम्हण जेवायला आणि त्यात विशेष म्हणजे कांद्याची भजी. सातव्या माळेला सव्वा शेराचा साटोऱ्यांचा फुलवरा आणि हे सर्व सोवळ्यात.
अष्टमीला भक्तांच्या देवीच्या मंदिरात भळांद्याच्या गोंधळाच्या दर्शनाला जायचे.
नवमीला नऊ दिवसांच्या नवरात्राचं पारणं. नऊ दिवस देव्हार्यात तेवणारी समई, उदबत्त्यांचा सुवास, उपवासाच्या पदार्थांची रेलचेल, माणसांची वर्दळ या सर्वांची आज सांगता. घरांत सोवळ्यात पुरणावरणाचा स्वयंपाक, सवाष्ण ब्राह्मण जेवायला, दिवटी बुदली घेऊन तळी उचलायची. जेवताना जोगवा मागायचा. नुसती गडबड आणि धांदल.
अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात नऊ दिवस कुठे संपायचे कळायचेही नाही. अशा या माहेरच्या नवरात्राचा ठसा माझ्या मनावर कायमचा ठसलेला आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान. "अश्विन शुध्द पक्षी अंबा
छान.
"अश्विन शुध्द पक्षी अंबा बैसली" या आरतीचा उल्लेख नाही केला का तुमच्या आईंनी?