आसाममधील विरांगना : जयमती

Submitted by मंजूताई on 27 September, 2016 - 05:58

केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला अ की ठ कळतं नाही पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक असमीया स्त्रीच्या मनात तिच्या बद्दल अपार माया व श्रध्दा आहे. मनांत कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक दुकाने, वाचनालय शोधले पण कुठे काही साहित्य मिळेना . गुवाहाटीला गेले असताना श्री मधुकर लिमयांच डाॅ शरद राजिमवालेंनी इंग्रजीत अनुवादीत केलेलं पुस्तक हाती लागलं त्यातून व इतर काही स्त्रीयांकडून मिळालेल्या माहितीतून मला उमगलेली 'जयमती'

मादुरी गावात लायथेपेना बारगोहाई काही दिवसांपूर्वी घडलेल्या विसंगत घटनांनी अस्वस्थ व भयभीत झाला होता. तो विचारमग्न अवस्थेत एकटाच बसला होता. ज्या मातीत लाचित बारफूकान, राजा स्वर्गदेव सारखे योध्दे जन्मले होते त्याच मातीत कुठे हा स्वार्थी चुलिकफा राजा जन्मला. इकडे लायथेपेनाला राज्याची काळजी होती आणि तिकडे त्यांच्या पत्नीला स्वाली (मुलगी) जयमतीच्या लग्नाची काळजी. लायथेपेनाला विश्वास होता की त्यांचा जुंवाई (जावई) चालत घरी येईल, शोधायची गरज पडणार नाही आणि त्यांचा विश्वास खराही ठरला. जयमतीला गदापाणीकडून मागणी आली. त्यांच्या लाडक्या स्वालीला योग्य जोडीदार मिळाल्याने दोघंही नवराबायको खूप आनंदित होते. लग्नाचा दिवस उजाडला. मंगलाष्टक झाली. अंतरपाट दूर झाला. जयाने नवरदेवाला हार घालायला मान वर केली अन् तिच्या आनंदाला व आश्चर्याला पारावार राहिला नाही . काही दिवसांपूर्वी एक पांथस्थ त्यांच्याकडे येऊन, जेवून गेला होता आणि पाहताक्षणीच ती ज्याच्या प्रेमात पडली होती, तिने ज्याला मनोमन वरले होते तोच तिचा नवरा म्हणून तिच्या समोर उभा होता! तिलाच तिच्या भाग्याचा हेवा वाटला.
जया नवीन घरात , संसारात रममाण झाली होती. तिच्या दोन लोरा लाय व लेचईच्या बाललीलांनी घराच गोकुळ झालं होतं.दिवस सरत होते. .....नियतीला त्यांच सुख पाहवलं नाही. त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली.
आहोम वंशाचा दुष्ट, क्रुर राजा चुलिकफा राज्य करत होता. आहोम राज्यपरंपरे प्रमाणे अव्यंग व्यक्तीच राजा बनू शकतो. एखादं छोटंस व्यंग किंवा जखमी किंवा जखमेचा व्रण असलेली व्यक्ती राजगादीवर बसण्यास अपात्र ठरते. चुलीकफाच्या मनात सदोदित भिती असे की उद्या माझं हे राजसिंहासन इतर आहोम वंशज हिसकावून तर घेणार नाही ना! त्यासाठी अव्यंग व पात्र व्यक्तींना शोधून त्यांना अपात्र करण्याची जबाबदारी त्याने लालुक सोला बारफूकानवर सोपवली. लालुक संधीसाधु व स्वार्थी सेनापती होता आता तर माकडाच्या हाती कोलितच लागलं होतं.

लालुक ताबडतोब कामाला लागला. त्याने कोवळ्या, तरुण राजकुमारांना पकडून आणून त्यांचे हात, पाय, नाक, कानांपैकी एखादा अवयव कापायचा सपाटा लावला.
ही बातमी जयमतीच्या कानावर आली. ह्या विषयी ती गदापाणीला म्हणाली,"मला ह्यात काही काळंबेर दिसतंय. आपण सावध राहायला हवे. लाय व लेचाईला कुठेतरी अज्ञात जागी पाठवायला हवे."
गदाधर कुंवर विचार करु लागला. तो म्हणाला' " आपण मुलांना नागाचांगला पाठवू तिथे माझा विश्वासू मित्र राहतो. तिथे ते सुरक्षित राहतील." जयमतीलाही ही कल्पना पटली.
उजाडण्यापूर्वीच गदापाणी मुलांना नागाचांगला घेऊन निघाला आणि इकडे सैनिक घरी येऊन ठेपले व चौकशी करु लागले, "कुठेय गदापानी ?"
"का?"
" राजाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही मुलांना घेऊन जायला आलोय."
जयमतीची भितीने गाळण उडाली पण चेहऱ्यावर दिसु न देता ती शांत स्वरात म्हणाली, " मुलं मामाच्या गावाला गेली आहेत."
" कोणत्या गावाला?"
"भाती" (कामरुपच्या दक्षिणेला)"
"केव्हा येणार परत?"
"एखाद्या महिन्यात"
"परत आल्याबरोबर लगेच कळवा व राजदरबारी हजर करा."
ही संकाटाची चाहूल तर नाहीयेना, घाबरलेल्या जयाच्या मनात विचार आला. तो वाईट विचार तिने झटकून टाकला व कामाला लागली. संध्याकाळी मुलांना पोचवून गदाधर परतला.
तिने सकाळी घडलेला प्रसंग त्याला सांगितला. तो विचार करु लागला, नेमके कारण काय असावे बरे? तेवढ्यात जयमतीला सैनिकांची टोळी हातात मशाली घेऊन येताना दिसली. तिने गदाधरला सावध केले व मागच्या अंगणात लपायला सांगितले.
"कुठेय गदापानी ?"
"तो तर मुलांबरोबर त्यांच्या मामाच्या गावाला गेलाय आणि महिन्याभरात परतेल." भिती लपवत ती शांत स्वरात उत्तरली.
" हे बघ, खोटं बोलू नकोस, आम्हाला खबर मिळाली आहे की तो आज परत आलाय."
"तुम्हाला विश्वास नसेल तर घराची झडती घ्या," जया शांतपणे म्हणाली. सैनिकांनी संपूर्ण घर शोधलं पण त्यांना गदाधर सापडला नाही. ते परत गेले तसे जया गदाधरला म्हणाली,"वाईट दिवस आले आहेत, राजाला वेड लागलंय. तुम्ही ताबडतोब निघा. इथे राहू नका. तुमच्या जीवाला धोका आहे."
"जया, तुला एकटीला सोडून कसा काय जाऊ?"
"ही वेळ चर्चा करण्याची नाहीये. जनतेला ह्या दृष्ट राजाच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहीजे. माझी काळजी करु नका. आपण दोघंही गेलो तर त्यांना शंका येईल. देव आपल्या पाठीशी आहे, तो आपलं रक्षण करेल."
नागा लोकांचा वेश परिधान करुन गदाधर नागालॅंडला गेला.
सैनिक राज्या राज्यात गदापाणीचा शोध घेत होते पण अपयशी होऊन परतत होते. अखेर जयमतीला अटक करून तिच्याकडे गदापाणीची चौकशी करु लागले. गोडीगुलाबीने विचारुन झाले, ती आपल्या उत्तरावर ठाम होती. नंतर साम ,दाम, दंडही वापरले पण जया बधली नाही. मारझोडीमुळे तिच्या अंगावरच्या जख्मा झाल्या ज्या ठसठसत असतानाच जखमी शरीरावर बांदर केकवाची पाने चोळली. ही खाजरी पाने चोळल्यामुळे अंगाची आग आग होऊ लागली. दिवसेंदिवस छळाची सीमा वाढत चालली ......तिचं अन्नपाणी बंद करण्यात आलं. ....छळाचा कळस म्हणजे तिच्या अंगावर मध टाकला व त्यावर लाल मुंग्या सोडल्या पण तिने तिचे मनोबल ढळू दिले नाही.
जयमतीवर होणाऱ्या अत्याचाराची वार्ता सर्व दूर पसरली.लोकांना तिची दया यायची व त्यांना वाटायचे इतका छळ सोसण्यापेक्षा तिने नवऱ्याचा ठावठिकाणा सांगून द्यावा. पण जया ठाम होती. ही बातमी गदापाणीपर्यंतही पोचली. तो नागा आदिवासींच्या वेशात पत्नीला भेटायला आला. अर्ध मेल्या अवस्थेतही तिने नवऱ्याचा आवाज ओळखला. लाचित बारफुकानचा (आसाममधला बहादुर पराक्रमी राजा) प्रताप आठवा व मागे फिरा, जनतेला ह्या क्रुर राजाच्या तावडीतून मुक्त करा असे तिने क्षीण आवाजात पण निक्षून सांगितले.
जवळपास चौदा दिवस ती अनन्वित छळाला सामोरी गेली पण तिने तिचा मनोनिश्चय ढळू दिला नाही..... अखेर (मार्च/एप्रिल १६७९) 'इथे ओशाळला मृत्यू' !
तिकडे गदापाणीने नागा पासून कामरुपपर्यंत लोकांना संघटित करुन सैन्य उभारले. चुलिकफाशी गडगांव येथे दोन हात करुन आपलं साम्राज्य उभं केलं, सुशासन स्थापित करुन पत्नीची अंतीम इच्छा पूर्ण केली. ह्या यशस्वी राजाच्या पाठीमागे आहे कथा एका धैर्यवान स्त्रीच्या बलिदानाची व त्यागाची!
विरांगना जयमतीच्या साहसाच्या व धैर्याच्या गाथा आजही आसामात गायल्या जातात. तिच्या नातवाने शिवसिंगने शिवसागर येथे 'जयासागर' च्या रुपाने स्मृती जतन केल्या आहेत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट, असामान्य धैर्य!
अजुन येउ द्या, उत्तर पुर्वेच्या राज्यातील स्त्रीशक्तीच्या कहाण्या!
धन्यवाद मन्जुताई! तुमच्यामुळे या अतिदुर राज्याची, त्यांच्या संस्कृतीची ओळख होतेय.

चांगली माहिती.

यांच्या जीवनावर आधारित चित्रपट हा पहिला आसामि चित्रपट आहे अशी पुसटशी माहिती आठवते आहे. चेक करून बघायला हवे.

सरकन काटा आला अंगावर ..किती छळ सोसला तिने. Sad तिच्या नवर्याने तिची इच्छा पुर्ण केली किती बरं वाटल.
जयमतीला ---/\---

वीरांगना जयमतीच्या साहसाच्या व धैर्याच्या गाथा आजही आसामात गायल्या जातात.
तिच्या नातवाने शिवसिंगने शिवसागर येथे भारतातला माणसाने घडवलेला सर्वांत मोठा तलाव - 'जयासागर' बांधला आणि या रुपाने जयमतीच्या स्मृती जतन केल्या आहेत.
तिच्या प्रेमाच्या आणि देशासाठी केलेल्या उत्तुंग त्यागाच्या स्मृतीप्रित्यर्थ तिला 'सती जयमती' म्हणून ओळखले जाते.
आसाममध्ये दर वर्षी २७ मार्च हा दिवस 'सती जयमती दिवस' म्हणून साजरा केला जातो. शिवाय आपआपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या स्त्रियांना दरवर्षी 'सती जयमती पुरस्कार' दिला जातो.
तिच्यावर आधारीत जयमती (१९३५) आणि जयमती (२००६) हे सिनेमेही बनवले गेले आहेत.
* गदापाणीला लांगी गदापाणी किंवा गदाधर सिंह या नावांनी ओळखले जाते. त्याच्याविषयी अधिक माहिती इथे मिळेल.