तुम्हाला जर खरा आणि निखळ आनंद हवा असेल तर पुढील पोस्ट टाकतोय ती कृपया वाचा. (राहुदेत बाजूला ते मोदी, मार्टिअर, मराठे आणि मोर्चे)
पोस्ट वाचा, गाणे वाचा, गाणे ऐका - एका अप्रतिम आनंदाचा अनुभव घ्या.
एक जुनं मराठी गाणं आहे 'प्रेम पिसे भरले अंगी', गायलंय वाणी जयराम, संगीत - वसंत देसाई, सन - माहित नाही साधारण १९७० असेल.
गाणं पुरुषांच्या कोरसमध्ये सुरु होतं, तेच ध्रुवपद आहे, मुख्य गायिकेने अनुनासिक आवाजात फक्त अंतरे गायलेय, ध्रुवपद कायम कोरस मध्येच आहे, सध्या भजनी ठेक्यावर, विशेष ताना मुरक्या नाहीत, चढ उतार नाहीत, थोडीशी सतार, टाळ.... बस्स. वाणी जयराम ह्या तामिळ, बालपणापासून प्रसिद्ध गायिका. त्यांना मराठीचा गंध नाही. संगीतकार त्यांना मराठी उच्चार शिकवत, घोटून घेत.
नामदेवांची साधी सिम्पल ३५० वर्षे जुनी रचना, कोणताही विशेष ज्ञानाचा बडेजाव न आणता केवळ निख्खळ अर्थपूर्ण रचना. कडव्यात मोजके तीन शब्द, त्याच्यापुढे परत तीन चार साधे सोपे मराठीतले शब्द. पण सगळ्याचा एकत्रित परिणाम अत्युच्च आनंद निर्मितीमध्ये होतो. गाण्याची चाल उत्साहपूर्ण आहे, ऐकताना मनामध्ये आनंदाचं नुसतं थुईथुई थुईथुई कारंजं उडत राहतं. सगळं कसं छान, स्वच्छ, निर्मळ झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा हे गाणं कानावर पडतो तेव्हा तेव्हा असाच आरस्पानी अनुभव येतो. गाण्याच्या शब्दांना अनुसरून खरंच प्रेम पिसे भरले अंगी अशी अवस्था होऊन जाते.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Prem_Pise_Bharale
प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतसंगे नाचों रंगीं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें ।
हें तों भगवंता मी नेंणे ॥२॥
वारा धावे भलतया ।
तैसी माझी रंग छाया ॥३॥
टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आह्मी गातों पश्चिमेकडे ॥४॥
बोले बाळक बोबडें ।
तरी तें जननीये आवडे ॥५॥
नामा ह्मणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥
https://www.youtube.com/watch?v=vjSzTiLiGR4
आणि अजून शोध घेताना जुन्या लोकसत्तातील एक सुंदर लेखही समोर आला.
"वाणी जयराम - बाळ कोल्हटकर यांच्या देव दीनाघरी धावला या नाटकातील कुमार गंधर्व यांच्यासोबतचे ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा पाहतोसी अंत’ ही वसंत देसाई यांची चार गाणी या सीडीत खुलून आली आहेत. पैकी ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग दक्षिणेकडे, आम्ही गातो पश्चिमेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. पश्चिम ही भोगाची दिशा आहे तर दक्षिण ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे."
वाचून मस्त वाटलं, म्हटलं कुणी लिहिलंय लेख - तर ' सतीश पटवर्धन'. सतीश माझा देवरुख पासूनचा शाळा-कॉलेज दोस्त, नंतर तो पुण्यात BMCC ला मी आबासाहेब गरवारेला, नंतर तो लोकसत्तामध्ये मी सामाजिक चळवळीमध्ये, आमच्या होणाऱ्या चर्चा, भेटी, सगळं कसं झर्रकन समोर आलं. सतीश दोन-तीन वर्षांपूर्वी वारला. माझा गेलेला मित्र आज मला परत एक दृष्टांत (Insight) देऊन गेला. लेख - http://www.loksatta.com/daily/20090310/mv09.htm
सही! माझे प्रचंड आवडते गाणे.
सही! माझे प्रचंड आवडते गाणे. कोरस बद्दल एकदम सहमत. ते पश्चिमेकडे/दक्षिणेकडे च्या माहितीबद्दलही आभार. ते काय आहे हा प्रश्न नेहमी पडायचा.
मात्र ते राहूदेत बाजूला मधे जरा बदल करा - काश्मीर मधली घटना ही ताजी आणि गंभीर आहे. त्याचा उल्लेख इतर राजकारणासोबत नसावा.
गाणे ओळखीचे आहे पण फारसे
गाणे ओळखीचे आहे पण फारसे आवडते नाही. वसंत देसांईनी तिला प्रमोट करायचा खुप प्रयत्न केला पण ती उच्चारात कमी पडायची.
बाळ कोल्हटाकरांच्या नाटकातील बहुतेक गाणी, त्या काळाच्या प्रथेला मोडून, ध्वनिमुद्रीत असायची.
कुमारांनी पण लहानपण देगा देवा, सारखी इतर गाणी गायलीच शिवाय माणिक वर्मांनी, निघाले आज तिकडच्या घरी आणि आशा भोसले नी, प्रेम प्रेम प्रेम, हा शब्द नवा असे गाणे गायले होते.
कुमारांनी इतर कुठलेही युगुल गीत गायल्याचे आठवत नाही.
मला सुरेश वाडकरांच्या आवाजात
मला सुरेश वाडकरांच्या आवाजात हे गाणे आवडते.
लहानपणी 'काळ दे हा सी आला खाऊ' म्हंजे काय ते कळायचंच नाही.
मग मुद्दाम हा अभंग (खरेतर तीन चार अभंग आहेत- वाडकरांच्या गाण्यात प्रेमपिसे भरले अंगी अभंग नाहीये) ऐकला.
पूर्वी आकाशवाणीवर सकाळीसकाळी भक्तीगीतात लागायचे हे गाणे.
खुप छान. बराचसा अर्थ नव्यानं
खुप छान. बराचसा अर्थ नव्यानं समजला. अतिशय आवडतं गाणं आहे. कोरस आणि वाणी जयराम, दोन्ही भारदस्त आणि प्रसन्न आहे. अप्रतिम गाण्याची आठवण करून दिलीत. हा छोटासाच लेख आणि पटवर्धनांच्या लेखासाठी आभार भारी टॅलेंटेड गायिका. त्या लेखात दिलेली त्यांची चार पाच गाणी माहितीच नाहियेत, जी माहिती आहेत त्यातली किती विस्मृतीत गेली होती.
ह्या गाण्याबरोबर हटकून लहानपणाच्या सुंदर आठवणीसुद्धा येतातच. अशा काही गाण्यांशी रेडिओ, प्रभातवंदन, कुरकुरत अजून पाचच मिनिटं म्हणत पांघरुणात गुरफटणं, गच्च पावसाळ्यातली किंवा थंडीच्या दिवसातली दिवे लावून कामं करावी लागणारी भली सकाळ, शनिवारच्या सकाळच्या शाळेची गडबड अशी अनेक असोसिएशन्स आहेत.